भारताला ऑलिम्पिकमधील पहिलेवहिले पदक मिळाले. सगळयाच भारतीयांसाठी ही अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. भारताची कुस्तीगीर साक्षी मलिक हिने 58 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले. साक्षीने फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये किर्गिस्तानच्या आयसुलू तायनाबेकोव्हवर 8- 5 ने विजय मिळवला. खरेतर सुरुवातीपासून सामन्यावर आयसूलूचे वर्चस्व होते, पण शेवटच्या काही क्षणातच साक्षीने आपल्या देसी स्टाईलचा वापर करत किर्गिस्तानच्या खेळाडूला चित केले. गेली 12 वर्षाच्या कठोर परिश्रमाचे तिला फळ मिळाले. साक्षी मलिक भारताची
पहिली कुस्तीगीर महिला आहे, जिला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले. गेल्या दोन वर्षाची साक्षीची कामगिरी वर लक्ष दिले तर तिने प्रत्येक स्पर्धेत रजत आणि कांस्य पदकाची कमाई केली आहे. साक्षीच्या यशाने सगळयाच भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. रिओ ऑलिम्पिकच्या मैदानावर काल पहिल्यांदा तिरंगा घेऊन फिरणारी साक्षी ही सगळयांचे आकर्षण ठरली. या यशाबद्दल साक्षीवर देशवासियांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पदकाच्या या स्पर्धेत विनेश फोगटही सहभागी होती. पहिल्या सामन्यामध्ये रोमानियाच्या एमिलिया अलिनाचा 11-0 असा पराभव केला. तिच्या दमदार कामगिरीनंतर भारताला पदक मिळण्याच्या आशा दुणावल्या होत्या. पण याच वेळेस तिच्यासोबत एक दुर्देवी अपघात झाला. चीनच्या युनानवर 1-0ने
आघाडी घेतली होती. पण काही वेळातच युनानने तिच्यावर चढाई करून तिला मात देण्याचा प्रयत् केला यातच विनेशच्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली व तिला मैदान सोडावे लागले. आणि तिच्या ऑलिम्पिकच्या स्वप्नाला तडा केला. विनेशचा झालेला अपघात आणि त्यानंतर साक्षीला मिळालेले पदक हे भारतासाठी काही आसू आणि काही हसू असे क्षण होते.