मुलांची गरज, मुलांची आवड, अपेक्षा याकडे लक्षच न देता घराने नि शाळेने कितीही केलं तरी त्यात संवेदनशीलता कशी राहील? वस्तू जबाबदारीने वापरली पाहिजे, तिची नासधूस होता कामा नये, वाया जाता कामा नये, पुष्कळ आहे म्हणून कसंही वापरून चालणार नाही हे मुलांना कळण्यासाठी घरात प्रयत्न करायला हवे. नासधूस होईल म्हणून सगळं उंचावर टांगू, कपाटात बंद ठेवू असं घडतं. म्हणून शाळेत या बाबतीत नेमकेपणा यायला हवा. कोणतीही वस्तू नीट वापरली पाहिजे हा नेटकेपणा गुणच आहे. तो घरी-दारी, सगळीकडे हवा ना!
बाईंनी वर्ग खूप सजवला होता. जिकडे तिकडे पताका, अक्षरपट्टया, वेगवेगळया विषयांचे तक्ते, जमिनीवर आकृत्या, भिंतीवर आकृत्या, चढत्या जिन्यावर अंक... जराही जागा रिकामी नव्हती. अगदी छतही रंगवलं होतं. बाईंनी कपाट उघडलं. बापरे! शैक्षणिक साहित्य कपाटात ठेवायला जागा नव्हती. कितीतरी खोकी साहित्याने भरलेली होती. बाईंनी सर्व सामान बाहेर काढलं. कितीतरी वस्तू वापरून त्यांनी ते बनवलं होतं.
''एवढं सगळं केव्हा बनवता?''
''सारखं बनवत असते. मुलांना काम देते. मुलंही मजेने सगळं आपापलं काम करतात. त्यांना मजा येते. घरी गेल्यावरसुध्दा मी हे बनवण्याचं काम करत असते.''
खरंच, त्या मनापासून सगळं करत होत्या. त्यांचे पती माध्यमिक शाळेत शिक्षक. ते बरोबर होते. म्हणाले,
''अहो, घरीसुध्दा हेच करत असते. सगळं उरकते लवकर आणि मग हाच उद्योग...''
''तुम्हीही बनवता असं काही?''
''छे हो, हा सगळा या प्राथमिकवाल्यांचा उद्योग. आम्ही वर्गात जातो. तीस मिनिटं बोलतो. बास.'' मला नवलच वाटलं. एक अगदी निरुत्साही. एक अगदी अतिउत्साही. बाईंच्या उत्साहाला मी सलाम केला. नक्कीच त्यांचे कष्ट आदराला पात्र होते. त्यांची तळमळ विलक्षण होती. या सगळयालाच मी सलाम केला.
''ताई, मी सगळीकडे ज्ञानरचनावाद आणतेच. सगळं साहित्य मुलं हाताळतात. मुलांना मजा वाटते. मुलं अजिबात कंटाळत नाहीत....''
''अरे वा! छान छान. तुमचा आदर्श ठेवायला हवा सगळयांनीच.'' दोन-तीन प्रश्न नम्रपणे मी त्यांना विचारले.
''वर्गात एवढी गर्दी, एवढी गर्दी केली आहे, पण मुलांना याचा किती उपयोग होतो..? म्हणजे मुलं या सगळया वर्गसजावटीकडे किती बघतात? मुलांना अवकाश हवा ना? असं नाही का वाटत की, वर्गात खूप सगळयांची दाटीवाटी झालीय?... थोडा विचार केला तर!'' प्रश्नाकडे त्यांचं लक्ष नव्हतं. सगळं सगळं प्रत्यक्ष दाखवण्यात, कसं वापरायचं हे दाखवण्यातच त्यांना रस होता. त्यांच्या दृष्टीनं ते बरोबर होतं.
''कोण पाहतंय हो लक्षपूर्वक! तुम्ही पाहताय तरी.'' त्यांची खंतही त्यांनी बोलून दाखवली.
''आमच्या वर्गातली सगळी मुलं आर्थिकदृष्टया खालच्या थरातली असतात. त्यांना कुठलं एवढं बघायला मिळतंय, असं वातावरण मिळतंय!'' त्यांचा हेतूही प्रामाणिक होता. तरीही शैक्षणिक साहित्य किती नि कसं याचा शांतपणे विचार करणं आवश्यकच वाटलं. या सगळयाचा मुलांना फायदा किती?
शैक्षणिक साहित्य कसं असावं, किती असावं, वर्गात त्याची रचना-मांडणी कशी असावी, वापर केव्हा-किती-कसा करावा, गरज किती आणि मुलांसाठी त्याचा परिणाम अशा अनेक गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. वर्गसजावट किती असावी हाही विचारात घेण्यासारखा मुद्दा. छताला लागून अभ्यासपट्टया, लेखनपताका, माहिती तक्ते असतील तर ते मुलं बघतही नाहीत. मग वाचन तर दूरच. तेही फक्त पुस्तकातलीच असतील तर मग प्रश्नच संपला. तळमळ, उत्साह याचंही विचारपूर्वक नियोजन हवंच. सतत बदल करायला हवा.
मुलांच्या दोन शाळा आणि दोन घरं असतात. तशी पालकांचीसुध्दा. घरात शाळा असते नि शाळेत घर असतं. घरातल्या शाळेचीही मजा असते. ज्या आईबाबांना अभ्यास घेणं वगैरे कळतं, तेही मुलांमागे सतत त्यांच्या इच्छा पळवत असतात. ज्या आईबाबांना हे कळत नाही, ते मुलांना 'क्लासेस' नावाच्या शाळेत अडकवतात. जिथे 'मासेस' असतात. मुलांनी सारख्या वह्या भरून काढल्या पाहिजेत, सारखं वाचत असलं पाहिजे अशी दादागिरी करणाऱ्या पालकांच्या आणि शाळेच्या तावडीतून सुटण्याचा मुलं जास्तीत जास्त प्रयत्न करतात. सगळं दिलं म्हणजे मुलांनी सगळं ऐकलं पाहिजे हा दावा असतो.
त्या घरातली अभ्यास खोली पाहून मी थक्क झाले. अभ्यासाचं वेळापत्रक दारामागे चिकवटलं होतं. वेगवेगळी सूत्रं लिहिलेले कागद चिकटवले होते. चांगल्या कॅलेंडरचा पाठकोरा वापर केला होता. पुस्तकांचे रॅक, मुलांचं अभ्यासाचं वेळापत्रक, खेळायचा वेळ वगैरे सगळं. पुस्तकं, गाईड्स, स्वाध्याय, वह्या... सगळं काही पूर्णपणे गच्च होतं.
''एवढी सगळी तयारी?''
''एकदाच वर्षाच्या सुरुवातीला मी स्टेशनरी आणते. मुलं त्यांना हवी त्याप्रमाणे वापरतात. त्यांना मागावं लागत नाही, मला आणावं लागत नाही...''
''वा! छान! किती काळजी घेता मुलांची!''
''तू फक्त अभ्यास कर एवढंच मी सांगते.'' प्रत्यक्षात मात्र वह्या वाटेल तशा वापरलेल्या होत्या. पानं कशीही फाडलेली होती, कितीही कोरी ठेवली होती. आईने घातलेली कव्हर्स फाटली होती. सर्व वस्तू वापरून अर्धवट टाकलेल्या होत्या. स्वाध्याय अपूर्ण... खूप असणं, अती असणं हेही अडचणीचंच होतं. मग इतरांनी काय करायचं? पुष्कळ असणं हेही बेजबाबदार, संवेदनाशून्य बनण्याला कारणीभूत ठरतं.
मुलांची गरज, मुलांची आवड, अपेक्षा याकडे लक्षच न देता घराने नि शाळेने कितीही केलं तरी त्यात संवेदनशीलता कशी राहील? वस्तू जबाबदारीने वापरली पाहिजे, तिची नासधूस होता कामा नये, वाया जाता कामा नये, पुष्कळ आहे म्हणून कसंही वापरून चालणार नाही हे मुलांना कळण्यासाठी घरात प्रयत्न करायला हवे. नासधूस होईल म्हणून सगळं उंचावर टांगू, कपाटात बंद ठेवू असं घडतं. म्हणून शाळेत या बाबतीत नेमकेपणा यायला हवा. कोणतीही वस्तू नीट वापरली पाहिजे हा नेटकेपणा गुणच आहे. तो घरी-दारी, सगळीकडे हवा ना!
& 9403693275
renudandekar@gmail.com