तुर्कस्तानातील निष्फळ बंड

विवेक मराठी    25-Jul-2016   
Total Views |

जसा आपल्यापुढे काश्मीरचा फुटीरतावादाचा प्रश्न आहे, तसाच प्रश्न तुर्कस्तान, सीरिया, इराक, इराण या देशांसमोर कुर्द समुदायाचा आहे. कुर्द समुदायाने निवडणुकांच्या माध्यमातून एरडोगनला सत्तेपासून वंचित केले होते. तुर्की जनमानसात कुर्दांच्या संदर्भात द्वेष आहे. एरडोगनने कुर्दांच्या विरोधात फळी उभारली. त्यांच्यावर चढाया केल्या. आयसिस स्थापन होण्यापूर्वी जे बंडखोर होते, त्यांचा त्याने कुर्दांवर आक्रमण करण्यासाठी उपयोग करून घेतला. त्याने शिया असलेल्या, बेभरवशाचा शेजारी सीरियाचा हुकूमशहा बशर अल अस्साद याला सातत्याने विरोध करण्याचे धोरण ठेवले.




शुक्रवार, दि. 15 जुलै 2016 रोजी अंकारा आणि इस्तंबूल या तुर्कस्तानातील दोन प्रमुख शहरांमध्ये सायंकाळी सातनंतर एकाएकी तोफा-बंदुकांचे आवाज आणि आकाशात लष्करी विमानांच्या घिरटया सुरू झाल्या. थोडयाच वेळात स्थानिक दूरदर्शन माध्यमांमधून लष्कराने सत्ता हाती घेऊन अध्यक्ष रेसेप तय्यीप एरडोगन यांची राजवट संपुष्टात आणल्याचे जाहीर केले. लष्कराने दोन्ही शहरांमधील प्रमुख मार्ग अडविले आणि नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यासाठी जसे लष्करी उठावांमध्ये घडत आले आहे, त्याप्रमाणे सरळ सरळ नागरिकांवर गोळीबार करण्याचे तंत्र अवलंबिले. अर्धा तास जात नाही, तोच तुर्कस्तानचे पंतप्रधान बिनाली यिल्दीरीम यांनी लष्करातील काही लोकांनी बंड केल्याची घोषणा करून नागरिकांनी शांतता पाळण्याचे आवाहन केले. लष्कराने नंतर केलेल्या घोषणेप्रमाणे एरडोगन यांच्या अध्यक्षतेखालील सरकारने देशातील लोकशाही प्रक्रियेला सुरुंग लावण्याचे धोरण अंगीकारले असून निधर्मी प्रशासन नष्ट करण्याचा चंग बांधला आहे, त्याच्या विरोधात लष्करी क्रांती घडवीत असल्याचे जाहीर केले.

हा सगळा धुमाकूळ सुरू असताना, सुरक्षित स्थळी असलेल्या एरडोगन यांनी चक्क दूरध्वनीच्या आणि विद्युत माध्यमांच्या साहाय्याने लोकांपर्यंत पोहोचून त्यांना लष्कराच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आणि महत्त्वाची आणि अघटित घटना अशी की तुर्की नागरिकांनी एरडोगन यांच्या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. लाखोंच्या संख्येने नागरिक ठिकठिकाणी रस्त्यांवर उतरले. त्यांचा तो उसळता आणि लष्कराच्या रणगाडयांना निर्भयपणे सामोरे जाण्याचा आवेश पाहून खुद्द लष्करातील ज्या थोडया लोकांनी हा सत्ता उलटविण्याचा घाट घातला, त्यांचेच धाबे दणाणले. लष्करातील उरलेल्या गटांनी जेव्हा याचा अंदाज घेतला, तेव्हा त्यांनी आपला पवित्रा बदलला. त्यांनी जे गट बंड करून उठले होते, त्यांनाच जेरबंद करायला सुरुवात केली. लोकांच्या साहाय्याला पोलीस प्रशासन उतरले आणि 8-10 तासांच्या अवधीत लोकांनी हे बंड संपुष्टात आणले. बंड शमल्यावर दिवसभर जे महाभारत घडले आणि थोडी हाणामारी आणि धरपकड होत राहिली, त्यात अर्थातच लष्करातील बंडाचा झेंडा उभारणारे अधिकारी आणि सैनिक यांना ताब्यात घेण्यात आले. रविवार संध्याकाळपर्यंत हा आकडा 6000पर्यंत पोहोचला होता. एरडोगन यांनी त्याच वेळी दुसरे महत्त्वाचे पाऊल उचलले, ते म्हणजे सुमारे तीन हजार न्यायाधीशांना त्यांच्या सेवेतून मुक्त केले. एरडोगन यांनी घोषणा केली की ज्यांनी बंडाचा झेंडा उभारला, त्यांनी देशद्रोह केला असून त्यांना देशद्रोहाची पुरेपूर किंमत चुकवावी लागेल. त्याचबरोबर या घटनेचा परिणाम म्हणून लष्करात माजलेली बंडाळी नष्ट करण्यासाठी कडक उपाय केले जातील. केवळ 48 तासांच्या अवधीत बंड पूर्णपणे शमविण्यात एरडोगन सरकारला पूर्णपणे यश आले. रविवारी दुपारी झालेल्या मृतांच्या दफनाच्या कार्यक्रमात एरडोगन यांच्यासोबत हजारो नागरिक आणि मुस्लीम धर्मांतर्गत पंथांचे धर्मगुरू एकत्र जमून त्यांनी मृतांना श्रध्दांजली दिली.

एरडोगन यांच्या विरोधी वातावरण

तुर्कस्तानला लष्कराने राजवटी उलथवून टाकण्याचे अप्रूप नाही. तुर्कस्तानचा आधुनिक राष्ट्रपुरुष म्हणविले गेलेल्या केमाल पाशाने लष्करी क्रांती करून पूर्वीचे ओटोमन साम्राज्य आणि खिलाफत नष्ट केली. आधुनिकतेकडे आणि पाश्चात्त्य - विशेषत: युरोपातील प्रगतिशील देशांबरोबर तुर्कस्तानला जोडण्याकडे त्याचा ओढा होता. त्याने तुर्कस्तानवरील धार्मिक जोखड झुगारून देऊन निधर्मी तुर्कस्तानचा पाया घातला. लष्कर, शिक्षण आणि न्यायव्यवस्था अशा तीन महत्त्वाच्या खात्यांना जाणीवपूर्वक निधर्मी बनविले. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी तुर्कस्तानमध्ये लष्करी राज्यक्रांती झाली. त्यानंतर आणखी दोन वेळा राज्यक्रांत्या होऊन शेवटी 2003मध्ये रितसर निवडणुका होऊन एरडोगन सरकार अस्तित्वात आले. पहिली 5-7 वर्षे एरडोगन यांच्या सरकारने अनेक सुधारणा घडवून आणल्या. पण त्याच वेळी त्यांची स्वत:च्या धोरणातील धार्मिक एकान्तिकता हळूहळू प्रकाशात येऊ लागली. 'ए के' (A K) हा त्यांचा पक्षधर्माचे अधिष्ठान ठेवून राजकारणात उतरला. एका बातमीप्रमाणे एरडोगन यांनी इमाम लोकांना शिकविणाऱ्या शाळांमधून ओटोमन साम्राज्यातील पुराण्या लिपीचे पुनरुज्जीवन करायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे थोडयाच काळात धार्मिक कट्टरतेचे प्रशिक्षण देणाऱ्या या शाळांची संख्या चौपट वाढविली. (इंडियन एक्स्प्रेस, दि. 2 जानेवारी 2015.) एकीकडे इराक आणि सीरिया या देशात लष्करी राजवटी आणि धार्मिक उन्माद यांचे थैमान सुरू असताना त्या विरोधात निधर्मी राजवटीचे भान बाळगून प्रतिबंध करण्याऐवजी युरोपमधून आयसिसला येऊन मिळणाऱ्या अतिरेक्यांना तुर्कस्तानातून वाट मोकळी करून दिली. त्याचे कारण आयसिस हे तुर्कस्तान देशाची डोकेदुखी ठरलेल्या कुर्द लोकांचा खातमा करण्याची मोहीम राबवित होते. त्याला प्रतिबंध घालण्याची दूरदृष्टी न दाखविता उलट आयसिसच्या नराधमांना तुर्कस्तानमधून कुर्दिश लोकांच्या पिछाडीवर जाण्यास व तिथून हल्ले करण्यासाठी वाट मोकळी करून दिली. हे पाऊल पाकिस्तानप्रमाणेच तुर्कस्तानलासुध्दा महागात पडले. गेल्या दोन वर्षांत तुर्कस्तानातसुध्दा इस्तंबूल विमानतळावर दोन (23 डिसेंबर 2015, 29 जून 2016) अतिरेकी हल्ले, अमेरिकेच्या वकिलातीवर हल्ला (दि. 9 ऑगस्ट 2015), दिवार बाकीरवरील दि. 13 ऑक्टोबर 2015चा हल्ला व इतर काही ठिकाणचे हल्ले ही तुर्कस्तानने आयसिसशी जवळीक साधल्याची व त्याची फळे चाखण्याची किंमत होती.

आयसिसची अर्थव्यवस्था ही काळया बाजारात खनिज तेल विकण्यावर अवलंबून आहे. ती चालण्यासाठी तुर्कस्तानने रान मोकळे सोडले. इतकेच नव्हे, तर या काळया बाजाराला खतपाणी घालण्यात एरडोगन याच्या नातेवाइकांचा हात होता, असे पुढे आले. इराक-सीरियामधून येणाऱ्या निर्वासितांना युरोपकडे जाण्यास एरडोगन यांनी वाट मोकळी केली. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याच्या सरकारच्या विरोधात आवाज उठण्यास सुरुवात झाली, तेव्हा एरडोगन यांनी आंदोलन चिरडून टाकले, वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली.

केमाल पाशाने घडवून आणलेल्या सुधारणांमुळे एकंदरच तुर्कस्तानातील साक्षरता वाढली आणि सुशिक्षित वर्ग धर्मांधतेपासून दूर गेला. एरडोगन यांनी सत्तेवर आल्यावर हळूहळू आपले मूलतत्त्ववादी धोरण अंमलात आणण्यास सुरुवात केली. त्यांचा एकेकाळी निकटचा सहकारी असलेला, विचाराने इस्लाममध्ये आधुनिकतेचा पुरस्कार करणारा फेतुल्लाह गुलेन यांच्याशी एरडोगनचे कमालीचे वितुष्ट आले. गुलेनने तुर्कस्तानातून पळ काढला आणि अमेरिकेत आश्रय घेतला. शुक्रवारी झालेल्या उठावासाठी गुलेनला जबाबदार ठरवून एरडोगन याने त्याला अमेरिकेतून घालवून देऊन तुर्कस्तानात परत पाठविण्याची मागणी केली आहे. गेली अनेक दशके गुलेनने सामाजिक स्तरावर सुधारणा आणि शेकडो शाळा काढून समाज प्रशिक्षणाचे काम सुरू ठेवले आहे. त्यातून शिकून बाहेर पडलेले लोक हे सुधारणावादी विचारांचे असल्याने ते बहुसंख्य आणि एरडोगनच्या मूलतत्त्ववादी अनुयायांना धोक्याचा इशारा वाटतात. याचे दुसरे महत्त्वाचे कारण गुलेनच्या इस्लाममध्ये तुर्कस्तानातील परंपरागत गूढवादी आणि सूफी विचारसरणीचा संगम आहे. हा मूलतत्त्ववादी इस्लामला मान्य नाही. गुलेनची फूस असल्यामुळेच स्वत: एरडोगनच्या आणि त्याच्या मुलाच्या विरोधात लाचलुचपतीचे आरोप झालेत, असा एरडोगनला संशय होता. त्याच्या त्रासामुळे गुलेनने 2013मध्ये पळ काढला. आज गुलेनला परत आणण्यासाठी एरडोगन अमेरिकेवर दबाव आणताना तुर्कस्तान हा नाटो (NATO) संघटनेचा सदस्य म्हणून दबाव आणतो आहे. नाटो ही युरोपातील देशाची संघटना अमेरिकेच्या पुढाकाराने स्थापन झाली होती. तेव्हा एरडोगनची मागणी अमेरिकेला सहजासहजी टाळता येणार नाही. सुशिक्षित वर्गातूनच लष्करात तरुण गेलेले असल्याने, केमाल पाशापासून लष्कराचा कलही निधर्मीपणाकडे आहे. तुर्कस्तानातील सुशिक्षित, न्यायसंस्था आणि लष्कर एरडोगनच्या मूलतत्त्ववादी विचारांच्या आणि अंमलबजावणीच्या रेटयामुळे नाराज होते. त्यातूनच एका लष्करी गटाने धोका पत्करून बहुधा इतरांना सहभागी करून न घेता बंडाचा डाव टाकला. त्याची अधिक माहिती हळूहळू पुढे येईल. आजच्या घटकेला बंड पूर्णपणे शमल्याचे जाणवते.

एरडोगनची कमालीची लोकप्रियता

वर दिलेली अनेक कारणे एरडोगनच्या विरोधात जात असली, तरी इतर अनेक कारणांमुळे सर्वसामान्य तुर्की नागरिकांत एरडोगन कमालीचा लोकप्रिय आहे. दूरदर्शनवरवरील घडामोडी पाहताना त्याच्या सभोवती शेकडो नागरिक त्याला खेटून आवतीभोवती वावरताना पाहत होतो. रविवारच्या शोकसभेत सर्वांबरोबर त्याने मृतांना श्रध्दांजली वाहिली. या दोन्ही वेळी त्याच्या आवतीभोवती सुरक्षा रक्षकांचे कोंडाळे नव्हते. ते पाहून मला गोव्यातील वातावरणाची आणि आपल्या समर्थकांसोबत सहजपणे घोळक्यात वावरणाऱ्या संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांची आठवण झाली.

आजच्या घटकेला तुर्कस्तानात लोकप्रियतेच्या संदर्भात केमाल पाशानंतर रेसेप तय्यिप एरडोगन याचे स्थान आहे. त्याचीही अनेक कारणे आहेत. सत्तेवर आल्यानंतर एरडोगनने कठोरपणे आणि भ्रष्टाचाराला आळा घालून तुर्कस्तानला आर्थिकदृष्टया पुढे नेले. अनेक वर्षे दूर राहिलेले युरोपियन युनियनचे सदस्यत्व मिळवून देऊन तुर्कस्तानातील नागरिकांना युरोपची कवाडे खुली करून दिली. त्याने अनेक सुधारणा घडवून आणल्या आणि अरब उन्हाळयाच्या यादवी युध्दाच्या पार्श्वभूमीवर तुर्कस्तानमध्ये कुर्दांचा प्रांत सोडल्यास स्थैर्य दिले. माझ्या माहितीतील अनेक उद्योजकांनी युरोपमध्ये शिरकाव करून उद्योगाचा विस्तार करण्यासाठी तुर्कस्तानातील कंपन्यांबरोबर व्यापार करण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

जसा आपल्यापुढे काश्मीरचा फुटीरतावादाचा प्रश्न आहे, तसाच तुर्कस्तान, सीरिया, इराक, इराण या देशांसमोर कुर्द समुदायाचा प्रश्न आहे. कुर्द समुदायाने निवडणुकांच्या माध्यमातून एरडोगनला सत्तेपासून वंचित केले होते. तुर्की जनमानसात कुर्दांच्या संदर्भात द्वेष आहे. एरडोगनने कुर्दांच्या विरोधात फळी उभारली. त्यांच्यावर चढाया केल्या. आयसिस स्थापन होण्यापूर्वी जे बंडखोर होते, त्यांचा त्याने कुर्दांवर आक्रमण करण्यासाठी उपयोग करून घेतला. त्याने शिया असलेल्या, बेभरवशाचा शेजारी सीरियाचा हुकूमशहा बशर अल अस्साद याला सातत्याने विरोध करण्याचे धोरण ठेवले. इराक-सीरियामधून निर्वासितांचे लोंढे लाखोंच्या संख्येने येत असताना त्यांच्यासाठी युरोपची वाट मोकळी करून दिली. पर्यायाने तुर्कस्तानावरील निर्वासितांचा भार बऱ्याच प्रमाणात कमी केला. जर्मनीच्या ऍंजेला मर्केल यांची दहा लाख निर्वासितांना जर्मनीत सामावून घेण्याची घोषणा एरडोगनच्या पथ्यावरच पडली. जेव्हा युरोपवरील निर्वासितांचे ओझे हाताबाहेर जाते आहे असे युरोपातील देशांच्या लक्षात आले, त्यांनी त्यांचा युरोपातील प्रवेश तुर्कस्तानामधून होतो हे लक्षात घेऊन त्यांना तुर्कस्तानातच थांबविण्याच्या अटीवर निर्वासितांच्या खर्चाचा आर्थिक भार उचलण्याची तयारी दर्शविली. तसेच युरोपातील जे निर्वासित बळजबरीने परत पाठविले जातील, त्यांनाही सामावून घेण्याच्या अटीवर सातशे कोटी डॉलर्सची मदत करार करून मिळविली. तुर्की जनतेसाठी हा फार मोठा आर्थिक आधार झाला. (इंडियन एक्स्प्रेस, 3 जून 2016.) कारण तुर्कस्तानात गेल्या काही महिन्यांपासून उसळलेल्या हिंसाचारामुळे प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या संख्येत फार मोठया प्रमाणावर घट झाली होती. आता निर्वासितांना सामावून घेण्यासाठी लागणारे मनुष्यबळ स्थानिक राहणार असल्याने स्थानिकांना लगेच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.

बशर अल अस्सादच्या वतीने रशियाने आयसिस व बंडखोरांविरोधात आपले सैन्य पाठविल्यामुळे साहजिकच तुर्कस्तान रशियाच्या विरोधात गेला. तसे पाहिले, तर दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध चांगले आणि मोठया प्रमाणावर देवाणघेवाणीचे होते. पण एरडोगनने त्याची दखल घेण्याचे टाळले. रशियाने युध्दात लुडबुड करण्याच्या भूमिकेचा त्याच्या सरकारने स्पष्ट शब्दांत निषेध केला. (इंडियन एक्स्प्रेस, दि. 15 डिसेंबर 2015.) त्याही पुढे जाऊन जेव्हा रशियाच्या विमानाने हल्ला करताना तुर्की सरहद्दीचा भंग केला, तेव्हा ते विमान पाडण्याची कारवाई त्याने केली. त्यासाठी रशियाशी होणाऱ्या व्यापारावर पाणी सोडले. या सर्व गोष्टींमुळे एरडोगन तुर्की नागरिकांसाठी अत्यंत लोकप्रिय नेता ठरल्यास नवल वाटू नये. त्यामुळेच तो सर्वसामान्य लोकांना थेट रस्त्यांवर येण्याचे आवाहन करू शकला.

नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद

एरडोगनने भाषणामधून लोकांना रस्त्यावर उतरून बंडाचा विरोध करण्याचे आवाहन करताच अक्षरश: लाखो लोक बंड करणाऱ्या सैनिकांच्या विरोधात इतक्या मोठया प्रमाणावर आणि भराभर रस्त्यावर आले की बंड करणाऱ्या सैनिकांना त्यांच्यावर गोळीबार करण्याची हिंमत झाली नाही. तरीही सुमारे दोनशे लोक काही तासांत मारले गेले, तर सुमारे 2000 जायबंदी झाले. तरीही लोक हटले नाहीत. त्या वेळचे एक विलक्षण दृश्य होते. एक रणगाडा रस्त्यावरून चालला होता. त्याच्या आजूबाजूने तर लोक विरोध करत होतेच, पण तीन नागरिक त्याला समोरून मागे ढकलण्याचा प्रयत्न करतानाचे अघटित दृश्य पाहायला मिळाले. काही क्षणांतच रणगाडा थांबला आणि लोकांनी त्याच्यावर चढाई करून एकही गोळी चालविली न जाता जणू विजय मिळवून विजयाचा जल्लोश केला. ते दृश्य पाहताना मला रशियात जेव्हा बोरिस येलत्सिन यांच्या नेतृत्वाखाली राज्यक्रांती झाली होती, तेव्हाचे दृश्य डोळयांसमोर आले. समोरून येणाऱ्या रणगाडयातून कधीही तोफेचा गोळा बाहेर पडू शकला असता. बोरिस येलत्सिन एक पाऊलसुध्दा डगमगले नाहीत. ते सरळ पुढे चालत गेले. चक्क रणगाडयावर चढले. त्यांना पाहून रणगाडयाच्या आतील सैनिक उभे राहिले. येलत्सिन यांनी त्या सैनिकांशी हसत हस्तांदोलन करत क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. तसाच प्रकार वर दिलेल्या दृश्यांच्या वेळी होता. ते तिघे सहज चिरडले गेले असते, पण तसे घडले नाही. नि:शस्त्रांनी सशस्त्र सैनिकांचा पराभव केला. नंतर लोकांनी त्यांची शस्त्रे काढून घेतली. नि:शस्त्र झालेले अनेक सैनिक रणगाडयाआडून दोन्ही हात वर करून शरण आल्याच्या भूमिकेत रस्त्यावर येत होते. एक प्रकारे हा एरडोगन यांच्या पाठीशी धैर्याने उभे राहिलेल्या जनशक्तीचा अभूतपूर्व विजय होता.

अरबी उन्हाळयातील घटनांमध्ये जनता राज्यकर्त्यांविरोधात उत्स्फूर्तपणे उतरली होती. त्यासाठी त्यांनी शेकडोंनी बलिदान दिले. मध्यपूर्वेतील देशांमध्ये बंडाळी माजली, युध्दे सुरू झाली आणि एकंदरच अरबी देशांना विध्वंसाचे आणि कत्तलींचे, वस्त्या, शहरे नामशेष होण्याचे ग्रहण लागले. ते अजूनही सुरू आहे. तुर्कस्तानमध्ये मात्र हुकूमशाहीच्या दिशेने वाट चालू लागलेल्या आणि अनेकांनी सुल्तान म्हणून उपरोधाने ज्यांची संभावना केली, त्याला बळ देण्यासाठी लष्कराच्या विरोधात जनसामान्य रस्त्यावर उतरण्याचे अघटित घडले.

यापुढे तुर्कस्तानात स्थैर्य राखण्याची जबाबदारी पूर्णपणे एरडोगन याच्यावर असेल. इस्लामी खाक्या वापरून, पकडलेल्या 6000 लोकांचे शिरकाण केले तर पूर्ण लष्कर आणि जनसामान्य त्याच्या विरोधात जाऊन तुर्कस्तान बंडाळीच्या गर्तेत पडेल. इस्लाम हा शांतीचा धर्म आहे हे दाखविण्याची एक संधी एरडोगनपुढे आहे. पाहू या तो काय करतो.

& 9975559155

डॉ. प्रमोद पाठक

अभियांत्रिक म्हणून उच्चविद्याविभूषित असणारे डॉ. प्रमोद पाठक हे 'गोवा एनर्जी डेव्हलपमेण्ट एजन्सी' अर्थात 'गेडा'चे प्रमुख म्हणून काम पाहतात. कामानिमित्त अनेक वर्षे परदेशी राहण्याचा त्यांना वारंवार योग आला. मुस्लीम प्रश् आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांचा खास अभ्यासविषय आहे. या विषयावरील लेखन साप्ताहिक विवेक तसेच अन्य नियतकालिकांतून सातत्याने प्रकाशित होत असते.