कॅशलेस टूरिझम

विवेक मराठी    20-Dec-2016
Total Views |

नोटबंदीनंतर भारतात सुधारणा होत असली, तरी पैशांशिवाय भ्रमंती कशी शक्य आहे? किंवा हातात काही पैसे नसताना आपण बाहेर फिरायला कसे जाऊ शकतो? असे बरेच प्रश्न लोकांना पडले आहेत. मा. पंतप्रधान मोदी यांनी लोकांना एक उत्तम पर्याय दिला, तो म्हणजे कॅशलेस सोसायटीचा आणि प्लॅस्टिक मनीच्या अधिकाधिक वापराचा. भारतीयांसाठी कॅशलेस व्यवहार ही संकल्पना तशी नवीनच आहे.
''दो
न हजाराची नोट... मॅडम, सुट्टे द्या हो. तुम्हांला दोन हजारांचे सुट्टे पैसे दिले, तर इतर ग्राहकांनाही द्यावे लागतील.'' महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या मैत्रिणीला नुकताच आलेला हा अनुभव. महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्रातील स्वित्झर्लंडच म्हणावे लागेल. हिवाळयात आणि उन्हाळयात या पर्यटन स्थळाला जणू जत्रेचे स्वरूप येते. नोटबंदीचा परिणाम शहरात जेवढा जाणवत होता, तेवढाच तो महाबळेश्वरसारख्या ठिकाणीही प्रकर्षाने जाणवू लागला. हातात पुरेसे सुट्टे पैसे आणि डेबिट-के्रडिट कार्ड असूनदेखील तिला नोटबंदीचा मनस्ताप सहन करावा लागला. बसचे आणि हॉटेलचे ऑनलाइन बुकिंग केले होते. पण मोठयामोठया हॉटेलमध्ये त्यांचे डेबिट कार्ड स्वाइप होत नव्हते. काही ठिकाणी तर कार्ड स्वाइप करण्यासाठी मशीन उपलब्ध नव्हते. अशा वेळेस जवळ असलेल्या पैशांमधून खर्च भागवावा लागला. जेवण, इतर खरेदी, प्रवासखर्च या सगळयांसाठी तिथे रोख रुपये द्यावे लागले. त्यामुळे हातातील रक्कम संपत चाललेली आणि त्यात एटीएमचा घोळ अशा परिस्थितीत तिने नोटबंदीचा अनुभव गाठीशी बांधून 'सफर' पूर्ण केली. 'सफर' म्हणजे हिंदीतली आणि इंग्लिशमधलीदेखील. हा अनुभव बऱ्याच जणांना एव्हाना आला असेल. महाबळेश्वरसारख्या प्रसिध्द ठिकाणी जर ही परिस्थिती, तर इतर ठिकाणी काय स्थिती असेल? हा झाला एक प्रसंग. पण ज्या दिवशी नोटबंदी जाहीर झाली, त्या वेळेस 15-16 जणांचा ग्रूप गोव्याला फिरायला निघाला होता. वाटेत असतानाच नोटबंदीचा निर्णय झाला होता. प्लॅन तर ठरलेला होता, त्यामुळे आता मागे वळून पाहायचे नाही, असे त्या गू्रपने ठरविले. जवळपास 6 ते 7 हजार रुपयांची रोख आणि कार्ड्स यावर सगळी भिस्त होती. पेट्रोल पंपावर जिथे जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार होत्या, त्या ठिकाणी पेट्रोल भरून घेतले. ज्या ठिकाणी डेबिट आणि के्रडिट कार्ड स्वीकारले जात होते, त्याच हॉटेलमध्ये जेवण्याचा आणि राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. नोटबंदीचे असे दोन वेगवेगळे अनुभव पाहायला मिळाले. 

डिसेंबर महिना म्हटला की आपल्याला वेध लागतात ते वेगवेगळया पर्यटनाचे. कोणत्या ठिकाणी फिरायला जायचे? कधी बुकिंग करायचे? हळूहळू याद्या तयार होऊ लागतात. वर्षभराचा ताण या एकाच विकेण्डमध्ये दूर करून नव्या वर्षाला नव्या उत्साहाने सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज होतो. प्रत्येकाचा डिसेंबर महिन्याचा हा नियम ठरलेला असतो. पण या वर्षी मात्र हा नियम मोडीत निघण्याचे चिन्ह दिसत आहे. दि. 8 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या नोटबंदीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे लोकांना पैशाची चणचण भासू लागली आहे. गेल्या काही आठवडयांमध्ये परिस्थितीत बदल झाला असला, तरी सर्वसामान्यांना हवे तसे व्यवहार सुरळीत झाले नाहीत. फिरायला जायचे म्हटल्यास हातात पैसे असणे गरजेचे आहे. पण या सगळया गोंधळामध्ये लोकांना रोजच्या व्यवहारांची चिंता लागून राहिली आहे. त्यात बाहेर जाणे म्हणजे आणखीनच खर्चीक आणि त्यात पैशांची चणचण, एटीएमच्या रांगा पाचवीलाच पुजल्यासारख्या वाटू लागल्या आहेत. शहरांप्रमाणेच पर्यटन स्थळांना या नोटबंदीचा परिणाम जाणवू लागला आहे. अनेक पर्यटन स्थळांवर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांतील पर्यटकांची संख्या कमी होऊ लागली आहे. नोटबंदीनंतर भारतात सुधारणा होत असली, तरी पैशांशिवाय भ्रमंती कशी शक्य आहे? किंवा हातात काही पैसे नसताना आपण बाहेर फिरायला कसे जाऊ शकतो? असे बरेच प्रश्न लोकांना पडले आहेत. मा. पंतप्रधान मोदी यांनी लोकांना एक उत्तम पर्याय दिला, तो म्हणजे कॅशलेस सोसायटीचा आणि प्लॅस्टिक मनीच्या अधिकाधिक वापराचा. भारतीयांसाठी कॅशलेस व्यवहार ही संकल्पना तशी नवीनच आहे. नोटांशिवाय कोणताही व्यवहार हा व्यवहार नसतो अशी समजूत असणाऱ्या सामान्य माणसाला कॅशलेस व्यवहार कसा जमणार?
पर्यटनाला जाताना हातात रोख रक्कम नसली, तर मोठी तारांबळ उडते. त्यात जर एटीएम मशीन जवळपास नसेल, तर आणखीनच पंचाईत होते. पण कमीत कमी पैशांचा वापर करून आपण सहलीचा आनंद घेऊ शकतो. आपण ज्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणार आहोत, त्या ठिकाणांची इत्यंभूत माहिती आपल्या नेटवर सहज उपलब्ध होते. त्यामुळे तिथे असणारे हॉटेल-लॉज यांचे ऑनलाइन बुकिंग आपण सहज करू शकतो. प्रवासाला निघाल्यावर साधारण आपल्याला किती खर्च येऊ शकतो याचा अंदाज असतो. शक्य तेवढीच रोख आपल्याकडे बाळगावी. त्याचबरोबर काही धनादेशही आपल्याला जवळ ठेवता येतील. सगळयात मोठी अडचण म्हणजे सुट्टया पैशांची. मग अशा वेळेस शक्यतो 10 किंवा 20 रुपयांचा आधार आपण घेऊ शकतो. प्रसिध्द पर्यटन स्थळांवर आज मोठया प्रमाणावर स्वाइप मशीन उपलब्ध असतात. पण काही वेळेस ते काम करत नसल्यास आपण आपल्या मोबाइल फोनचा वापर करू शकतो. आता बरेच मोबाइल ऍप कॅश ट्रान्झॅक्शनसाठी वापरता येतात. फक्त ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करत असताना आपण सुरक्षिततेची खबरदारी घ्यायला हवी. आपला कार्डनंबर, पासवर्ड किंवा ओटीपी नंबर कोणालाही सांगू नये. बऱ्याच वेळा आपण हॉटेलमध्ये बिल भरण्यासाठी आपले कार्ड वेटरकडे देतो, तेव्हा आपल्या कार्डचा डेटा चोरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे बिल भरताना कार्ड शक्यतो आपल्या उपस्थितीत स्वाइप करावे. आधार कार्ड हेदेखील आज डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डप्रमाणे आपण वापरू शकतो. कारण आधार कार्ड आपल्या बँकेच्या खात्याशी जोडले असल्यामुळे त्याचाही वापर आपण व्यवहारासाठी करू शकतो. आपल्या बँकेमधून कॅश कार्ड घेऊन त्याने आपला खर्च भागवू शकतो. आता बऱ्याच हवाई कंपन्या ग्राहकांना ट्रॅव्हल कार्ड देत आहेत. बऱ्याच सरकारी आणि खाजगी बँकांनी ग्राहकांना ऑनलाइन पेमेंटचे पर्याय उपलब्ध करून दिले आहे. सीबीआय बँकेचे एसबीआय बडी (SBI Buddy), आयसीआयसीआय बँकेचे 'पॉकेट्स' (ICICI Pockets) अशा बऱ्याच सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहे. पर्यटन स्थळांनीही ग्राहकांसाठी कॅश टोकन किंवा कूपन उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून तिथे प्रवास करण्याऱ्या पर्यटकांना अडचणी येणार नाहीत. प्रत्येक राज्याचे पर्यटन खाते असते. यामधून त्या-त्या राज्याच्या पर्यटनाला प्रोत्सहान देण्यासाठी काम केले पाहिजे. टॅक्सी किंवा खाजगी बस यामध्ये ई-टोकन उपलब्ध करून द्यावे. तिथे असणाऱ्या बाजारपेठांमध्ये मिनी एटीएम आणि स्वाइप मशीन उपलब्ध करून देण्यात याव्या. गोवा हे भारतातील पहिले कॅशलेस पर्यटन स्थळ झाले आहे.

आज आपल्याकडे सगळयांकडे स्मार्ट फोन आहे. यामध्ये आपण आपल्या बँकेचे ऍप डाउनलोड करून त्यातून पैशांची देवाणघेवाण करू शकतो. पे टु यू आणि पेटीएम, मोबीक्विक, फ्रीचार्ज या ऍपची सध्या बाजारात मोठी चलती आहे. ऍपच्या वापरावर ग्राहकांना सवलती दिल्या जातात. ऑनलाइन वेबसाइटने लोकांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्यासाठी आपल्या ऍपमध्ये बदल केले आहे. सामान्य जनतेला सहज शक्य होईल अशा स्वरूपात याची रचना करण्यात आली आहे. आपल्या स्मार्ट फोन हा ई-वॉलेट म्हणून कार्यरत होऊ शकतो. यामार्फत आपण ऑनलाइन बुकिंग किंवा पेमेंट करू शकतो. आपल्या फोनमध्ये हे ऍप डाउनलोड करून आपल्या बँकेशी संबंधित खात्याची माहिती टाकायची आणि मग या ऍपचा वापर करायचा. ही झाली सगळी स्मार्ट फोन यूजर्सची कहाणी. पण ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीये किंवा इंटरनेट कनेक्शन सहज उपलब्ध नाही, ते आपल्या मोबाइलमध्ये *99# डायल करून आपले व्यवहार करू शकतात.

समाज परिवर्तनशील आहे. त्यामुळे या बदलात सहभागी होऊन आपल्या नव्या आणि विकसित समाजात पाऊल टाकायचे आहे. कॅशलेस ही संकल्पना रुजण्यासाठी थोडा वेळ जाईल, पण यातून समाजाचे हित साध्य होणार आहे.

8286650578