मातीवर चढणे एक नवा थर अंती

विवेक मराठी    19-Dec-2016
Total Views |


भोजपूरच्या मंदिरात जाऊन त्या भव्य शिवलिंगाचं दर्शन घेणं हा खरोखरच एक चित्तथरारक अनुभव आहे. भोजपूरच्या गावातच राहणाऱ्या एका वृध्द गृहस्थांनी माझे गाईड होण्याची तयारी दर्शवली. त्यांना बरोबर घेऊन मी मंदिर बघत होते. तशा मंदिरावर बाहेरच्या बाजूला फारच कमी शिल्पाकृती आहेत. महादरवाजाच्या दोन्ही बाजूंना हातात कुंभ घेतलेल्या गंगा-यमुना आहेत. शिखराच्या भोवती मात्र यक्ष-गंधर्वांच्या सुंदर बॅ्रकेट फिगर्स आहेत
, ज्यांनी शिखराचा गोलाकृती भाग तोलून धरलाय. हे मंदिर भोजराजाच्या काळात - म्हणजे 1000 ते 1055च्या दरम्यान बांधलं गेलं. त्यामुळे दगड दगडाला जोडून मंदिराचं बांधकाम केलं गेलं आहे, चुन्याचा वापर खूपच कमी आहे. भोजराजाच्या काळात इथे मंदिर स्थापत्याची कार्यशाळा असावी, असं पुरातत्त्व शास्त्रज्ञांचं मत आहे, कारण मंदिराच्या परिसरात असलेल्या शिळांवर विविध प्रकारच्या मंदिरांच्या रेखाकृती काढलेल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी 'लोकमंथन' ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या परिषदेत भाग घेण्यासाठी म्हणून भोपाळला जायचा योग आला. भोपाळ म्हणजे मध्य प्रदेशची राजधानी. धारानगरीच्या भोजराजाच्या वास्तव्याने पुनित झालेले हे शहर. भोपाळचे जुने नाव भोजपाल. भोजराजाने दोन डोंगरांमध्ये बांध घालून बांधलेला प्रचंड तलाव आजही भोपाळचं सर्वात मोठं आकर्षण आहे. भोजताल ह्या नावाने प्रसिध्द असलेल्या ह्या तलावाकाठी संध्याकाळी अवघं भोपाळ लोटतं. असं म्हटलं जातं की भोजराजाने हा बांध अकराव्या शतकात बांधवून घेतला. सध्याचं आधुनिक भोपाळ शहर दोस्त मोहम्मद खान ह्या मुघल सरदाराने अठराव्या शतकात वसवलं असं मानलं जातं. 1818मध्ये भोपाळच्या नवाबाने ब्रिटिशांबरोबर तह केला आणि स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत भोपाळवर नवाबांचाच अंमल राहिला.

लोकमंथनचे तीन दिवस हा हा म्हणता निघून गेले. आयोजकांनी उत्तम व्यवस्था केली होती. नंतरचे तीन दिवस मला नुसतं भटकायचं होतं. पण प्रश्न होता रोख पैशांचा. 8 नोव्हेंबरला मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा रद्द केल्याचं जाहीर केलं, 9 आणि 10ला बँका बंद होत्या आणि 11ला मला भोपाळला जायचं होतं. त्यामुळे पाकिटात रोख रक्कम जेमतेमच होती. पाचशेच्या तीनेक नोटा आणि शंभरच्या तीन नोटा, वर काही चिल्लर. लोकमंथनच्या तीन दिवसात सगळी व्यवस्था आयोजकांनी केली होती, पण पुढचे तीन दिवस माझी मीच भटकणार होते. थोडी तरी रोख रक्कम हातात हवी होती.

लोकमंथनच्या आयोजनात एमपी टूरिझमचे काही अधिकारी होते. त्यातल्या एकाला मी माझी अडचण सांगितली. त्याने एक चांगली गाडी करून दिली. गाडीच्या मालकाला मी सांगितलं की माझ्याकडे रोख रक्कम नाही, तर तो म्हणाला, ''काही हरकत नाही, मी माझा बँक अकाउंट नंबर देतो, तुम्ही पैसे ट्रान्स्फर करा.'' माझा फार मोठा प्रश्न सुटला होता. हॉटेलचं बिल तर कार्डनेच देणार होते, आता फक्त रस्त्यावर हातखर्चासाठी काही रक्कम पाहिजे होती. सुदैवाने स्टेट बँकेच्या एका एटीएममधून दोन हजार रुपये काढता आले आणि तोही प्रश्न सुटला.

माझा पहिला मुक्काम होता भीमबेटकाची शैलगृहं आणि तिथली नव-पाषाणयुगीन भित्तिचित्रं. भीमबेटका म्हणजे भोपाळपासून 45 किलोमीटर, दूर विंध्य पर्वताच्या कुशीत दडलेला एक प्रचंड प्रस्तरसमूह आहे. इथल्या गुहांमध्ये आदिमानव समूहाने राहायचे. त्यांनी तिथल्या पाषाण भिंतीवर अनेक चित्रे काढलेली आहेत. वेगवेगळे दगड कुटून आणि खलून बनवलेले रंग आणि काडी दातांनी चावून चावून मऊ करून बनवलेले काडीचे कुंचले ह्यांच्या साहाय्याने काढलेली ही भित्तिचित्रं भारतातली सर्वात प्राचीन भित्तिचित्रं समजली जातात. ह्या चित्रांमधली सगळयात प्राचीन चित्रं जवळजवळ 12000 वर्षांपूर्वीची आहेत, असं पुरातत्त्वशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. भीमबेटकाच्या पंचक्रोशीत अशी जवळजवळ 500 शैलगृहं आहेत, जिथे अशी प्रागैतिहासिक भित्तिचित्रं बघायला मिळतात. पण सर्वसामान्य पर्यटक फक्त भीमबेटकापर्यंतच जाऊ  शकतो, कारण बाकीच्या गुहांपर्यंत जायला रस्ते नाहीयेत. तिथे पायीच जावं लागतं. तिथे जवळपास वस्ती करून असलेल्या आदिवासी लोकांना भीमबेटकाच्या गुहा माहीत होत्या, पण त्यांना वाटायचं की ह्या गुहांमधली चित्रं म्हणजे चेटकिणींचं लिखाण आहे, म्हणून ते तिथे कधी जायचे नाहीत.

आधुनिक जगासाठी ह्या गुहांचा शोध लावला तो श्रीधर विष्णू वाकणकर ह्या मराठी पुरातत्त्वशास्त्रज्ञाने. 1957मध्ये वाकणकर आगगाडीने दिल्लीहून भोपाळला जात होते. रेल्वेचा मार्ग ह्या गुंफांच्या अगदी जवळून जातो. गाडीतल्या आपल्या डब्यात बसून खिडकीतून बाहेर बघत असताना वाकणकरांना भीमबेटकाचे प्रचंड प्रस्तर दिसले. त्यांचं कुतूहल जागृत झालं. भीमबेटकाच्या जवळ कुठलंही स्टेशन नव्हतं, त्यामुळे वाकणकर पुढच्या स्टेशनला गाडीतून उतरले आणि रुळांवरून मागे मागे चालत निघाले, भीमबेटकाच्या प्रस्तरांच्या शोधात. जिथून भीमबेटकाच्या मोठया शिळा दिसायला लागतात, तिथे वाकणकरांना एक छोटं गांव लागलं. डोंगरावर दिसणाऱ्या त्या प्रचंड प्रस्तरखंडाकडे बोट दाखवून वाकणकरांनी गावकऱ्यांना विचारलं की वर काय आहे? गावकरी म्हणाले, ''डोंगरावर गुहा आहेत, तिथे पांडव राहायचे. त्या मोठया शिळेवर भीम बसायचा, म्हणून त्याला भीमबेटका म्हणजे भीमाची बैठक असं म्हणतात.''

वर गुहा आहेत हे ऐकल्यावर वाकणकरांचे डोळे चमकले. त्यांनी वर जायचं ठरवलं, पण त्यांच्याबरोबर वाटाडया म्हणून जायला गावातलं कोणीच तयार होईना. 'वर चेटकिणींची चित्रं आहेत, आम्ही नाही येणार वर' असाच सगळया गावकऱ्यांचा सूर होता. शेवटी वाकणकर एकटेच त्या काटयाकुटयांमधून वर डोंगरावर चालत गेले आणि त्यांना गवसलं आदिमानवाच्या कल्पनेतून साकारलेलं एक अद्भुत विश्व! आज भीमबेटकाच्या गुहा आणि त्या गुहांमधली भित्तिचित्रं युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्सच्या यादीत आहेत. तिथपर्यंत जायला चांगला पक्का रस्ता आहे. इतर सोयी-सुविधा आहेत, पण वाकणकर कसे वर गेले असतील त्याची नुसती कल्पना जरी केली, तरी अंगावर काटा येतो. वाकणकरांना पुढे ह्या कार्यामुळे भारत सरकारने पद्मश्री ह्या पदवीने सन्मानित केलं.

उन्हं वर जायच्या आत मला भीमबेटकाला पोहोचायचं होतं, म्हणून सकाळी सातलाच भोपाळहून निघाले. मध्य प्रदेशमधले रस्ते चांगले आहेत आणि सकाळी लवकर निघाल्यामुळे रहदारीही फारशी नव्हती, त्यामुळे दीड तासातच भीमबेटकाला पोहोचले. गाईडची चौकशी केली तर तिथे तशी काही व्यवस्था नव्हती. पण इंद्रजित नावाचा तिथला एक पोरगेलासा चौकीदार म्हणाला, ''मी दाखवू शकतो तुम्हाला सगळी चित्रं.'' त्याला संगती घेऊन मी निघाले. सकाळची वेळ असल्यामुळे माझ्याशिवाय दुसरा कुणीही पर्यटक आलेला नव्हता. सागवानाच्या झाडांच्या राईमधून आम्ही चालत निघालो. सागाचा खाली पडलेला पाचोळा आमच्या पायाखाली चुरडला जात होता, त्याचा आवाज सोडल्यास दुसरा कुठलाच आवाज ऐकू येत नव्हता. मला एकदम 12000 वर्षं मागे गेल्यासारखं वाटलं. तेव्हाही अशीच नीरव शांतता असेल का भीमबेटकामध्ये?

गुहांमध्ये जाताना पहिलीच गुहा लागते, ती म्हणजे दोन प्रचंड प्रस्तर एकमेकांवर कलून झालेली मोठ्ठी दालनासारखी जागा. ''हा ऑॅडिटोरियम.'' इंद्रजित म्हणाला. ''पूर्वी आदिमानव इथे जमून एकत्र उपासना वगैरे करत असत कदाचित. तुम्ही इथे मोठयांदा बोलून बघा, आवाज किती घुमतो ते.'' खरंच त्या हॉलवजा जागेचं ऍकॉस्टिक्स इतकं चांगलं होतं की मोठमोठया कॉन्सर्ट हॉल्सनी मान खाली घालावी. ह्या गुहेत असलेल्या भित्तिचित्रांमध्ये एका लहान मुलाच्या हाताचा ठसा आहे आणि हत्ती, हरीण, वाघ, चितळ, बैल, मोर इत्यादी प्राणी दाखवले आहेत. मुखत्वे लाल आणि पांढऱ्या रंगाचा वापर करून ही चित्रं काढलेली आहेत. तिथून पुढे चालत गेलो की 'झू शेल्टर' नावाची गुहा लागते. ह्या गुहेच्या छतावर जवळजवळ 450 चित्रं आहेत, त्यातली 252 चित्रं जनावरांची आहेत. 16 वेगवेगळया प्रकारची जनावरं आपल्याला ह्या चित्रांमधून स्पष्ट ओळखता येतात. इतक्या जनावरांची चित्रं आहेत, म्हणून ह्या गुहेला 'झू शेल्टर' असं नाव दिलं गेलंय. ह्याच गुहेमध्ये एक मिरवणूक दाखवली गेली आहे. घोडयावर बसलेली काही माणसं आहेत, त्यांच्या हातात तलवारी आणि भाले आहेत. बरोबर ढोलकी वाजवणारे दोन वाजंत्री आहेत आणि राजदंडासारखा उंच दंडुका घेऊन चालणारा एक माणूस आहे. घोडा हे जनावर भारतात अस्तित्वात असल्याचा हा सगळयात पुरातन पुरावा.


थोडं पुढे गेलं की बेअर रॉक नावाची गुहा लागते. ह्या गुहेच्या वरच्या पाषाण भिंतीवर जमिनीपासून जवळजवळ वीस फुटांवर रानडुकरासारख्या दिसणाऱ्या प्राण्याचं लाल रंगात काढलेलं एक प्रचंड मोठं चित्र आहे. त्याच्या डोक्यावर दोन टोकदार शिंगं आहेत आणि नाकावरचे केस स्पष्ट रंगवले आहेत. ह्या रानडुकराला बघून घाबरून पळून जाणारा एक माणूस पुढे दाखवलेला आहे आणि मागे त्या रानडुकराची शिकार करायला बघणारी इतर दोन माणसं आहेत. खाली एक खेकडादेखील रंगवलेला आहे. इंद्रजित म्हणाला की ''बांबूची शिडी वापरून हे चित्र इतक्या उंचावरती रंगवले गेलेले आहे.''  ह्या चित्रांमध्ये काढलेला घोडा म्हणजे अगदीच प्राथमिक स्वरूपाचं लाइन ड्रॉइंग आहे. एकमेकांना जोडलेले दोन त्रिकोण, खाली पायांसाठी म्हणून ओढलेल्या चार रेघा, शेपटीची एक रेघ आणि तोंडासाठी म्हणून एक वेगळा त्रिकोण, असं अगदी लहान मुलांनी काढावं असं जुजबी स्वरूपाचं चित्र आहे घोडयाचं.

पण पुढे आपण एका गुहेत एक अत्यंत ऐटबाज, पुढचा एक पाय उंचावलेला पांढराशुभ्र घोडा बघतो, तो मात्र ऍनाटॉमीच्या दृष्टीने अत्यंत सुरेख जमलेला आहे. ''हे घोडयाचं चित्र बऱ्याच नंतरच्या काळातलं आहे, जेव्हा त्या लोकांना चित्रकला बऱ्यापैकी जमलेली होती.'' इंद्रजित म्हणाला. मेसोलिथिक काळात - म्हणजे इ.स.पू. 12000 ते 2500 वर्षांपर्यंत भीमबेटकामध्ये आदिमानवाची वस्ती असावी, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. पण पुढे काही कारणामुळे ही साइट खाली झाली आणि ह्या गुहा लोकांच्या विस्मृतीत गेल्या, ते वाकणकरांनी त्या परत जगापुढे आणेपर्यंत.

ह्या गुहा बघताना का कोण जाणे, सतत माझ्या अंगावर काटा येत होता. कोण होते ते अज्ञात लोक ज्यांनी ह्या कलाकृती निर्माण केल्या? कसली गाणी गायचे ते? कुणाची उपासना करायचे? त्यांचे सण कसे होते? त्यांची दिनचर्या कशी होती? खूप प्रश्न मला सतावत होते. त्या विस्तीर्ण परिसरात फक्त मी आणि इंद्रजितच होतो, तरी मला वेगवेगळया आवाजांचे भास होत होते. इथे आपण रात्रीचा मुक्काम करावा अशी तीव्र इच्छा माझ्या मनाला चाटून गेली.. पण ते अर्थातच शक्य नव्हतं. काही काळ तिथेच एका दगडावर बसून राहिले डोळे मिटून, ही चित्रं काढणारे आदिमानव कसे दिसत असतील, कसे राहत असतील ह्याचा विचार करत!

इंद्रजितचा निरोप घेऊन भीमबेटकाहून निघाले. पुढचा मुक्काम होता भोजपूर. अष्मयुगातून आता मला एकदम अकराव्या शतकात उडी घ्यायची होती. भोजपूर ही धारानगरीच्या भोजराजाची एकेकाळची राजधानी. हा राजा शूर तर होताच, तसाच अत्यंत विद्वान होता, रसिक होता, कवी होता. त्याने जवळजवळ 80 ग्रंथांची निर्मिती केली होती, त्यामध्ये 'सरस्वतीकंठाभरण' हे व्याकरणावरचं भाष्य आहे, 'राजमार्तंड' ही पतंजलीच्या योगसूत्रांवरची टीका आहे आणि 'समरांगण सूत्रधार' हा वास्तुशास्त्रावरचा ग्रंथ आहे. अजूनही हिंदी भाषेत त्याचं नाव आदराने घेतलं जातं. 'कहां राजा भोज और कहां गंगू तेली' ही म्हण आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकलीच असेल, तोच हा रसिकराज भोज. भोजराजाविषयी अशी आख्यायिका आहे की त्याने त्याच्या नगरीतल्या कालिदासासारख्या कविश्रेष्ठाला समस्यापूर्तीसाठी 'ठाठं ठठंठं ठठठं ठठंठ:' ही अवघड ओळ दिली होती. त्यावर

'भोजस्य भार्या मदविव्हलाया

कराच्युतं चंदनहेमपात्रं

सोपानमार्गे प्रकरोति शब्दम

ठाठं ठठंठं ठठठं ठठंठ:'

म्हणजे भोजराजाची पत्नी हातात चंदनाची आरती असलेलं सुवर्णपात्र घेऊन शय्यागृहात जात असताना तिचा जिन्यात पाय अडखळला आणि हातातून पडलेलं सुवर्णपात्र पायऱ्यांवरून गडगडत खाली येत असताना 'ठाठं ठठंठं ठठठं ठठंठ:' असा आवाज झाला, अशी ती समस्यापूर्ती कालिदासाने केली होती असं म्हणतात. ह्या भोजराजाला म्हणजे एक असाध्य चर्मविकार जडला होता. त्याला एका वैद्याने सांगितलं की बेटवा नदीवर बांध बांधून झालेल्या सरोवरातल्या पाण्याने आंघोळ केली, तर तुझा चर्मविकार दूर होईल. त्याप्रमाणे भोजराजाने केलं व तो खडखडीत बरा झाला. ह्या आजारातून उठल्यानंतर भोजराजाने भोजपूरचं भव्य शिवमंदिर बांधलं, अशी आख्यायिका आहे.


भोजपूरच्या मंदिरापाशी मी पोहोचले, तेव्हा दुपारचे साडेअकरा वाजले होते. लाल दगडात बांधलेलं भोजपूरचं शिवमंदिर सूर्यप्रकाशात नुसतं झळाळून निघालेलं होतं. ह्या मंदिराची खासियत म्हणजे इथलं शिवलिंग तब्बल 23 फूट उंच आहे आणि एकपाषाणी आहे. भोवतालचं योनिपीठ चौकोनी आहे आणि तेही एकाच दगडातून बनवलेलं आहे. सामान्यतः आपल्याकडे मंदिर आधी बनवलं जातं आणि मग गाभाऱ्यात देवाची प्राणप्रतिष्ठा होते. पण हे भोजपूरचं हे शिवलिंग इतकं विशाल आहे की तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की इथे प्रथम लिंगप्रतिष्ठा केली गेली आणि मग भोवती मंदिर उभारलं गेलं. हे मंदिर आधी वरून उघडं होतं. काही लोकांच्या मते हे मंदिर ध्यानमंदिर आहे आणि म्हणूनच ते वरून उघडं होतं. पण आता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने वर फायबरचं छत उभारून मंदिर बंद केलं आहे. मंदिराच्या मागे एक माती आणि दगडांनी बनवलेला रँप आहे, जो मंदिर उभारणीच्या वेळी मोठमोठाले अवजड दगड वर नेण्यासाठी म्हणून बनवला गेला असावा. सामान्यत: मंदिर बांधून पूर्ण झालं की असे रँप ठेवत नाहीत, ते पडून टाकतात. पण इथे हा रँप अजून आहे, त्यामुळे एक समजूत अशी आहे की हे मंदिर बांधून पूर्ण झालंच नाही.

भोजपूरच्या मंदिरात जाऊन त्या भव्य शिवलिंगाचं दर्शन घेणं हा खरोखरच एक चित्तथरारक अनुभव आहे. भोजपूरच्या गावातच राहणाऱ्या एका वृध्द गृहस्थांनी माझे गाईड होण्याची तयारी दर्शवली. त्यांना बरोबर घेऊन मी मंदिर बघत होते. तशा मंदिरावर बाहेरच्या बाजूला फारच कमी शिल्पाकृती आहेत. महादरवाजाच्या दोन्ही बाजूंना हातात कुंभ घेतलेल्या गंगा-यमुना आहेत. शिखराच्या भोवती मात्र यक्ष-गंधर्वांच्या सुंदर बॅ्रकेट फिगर्स आहेत, ज्यांनी शिखराचा गोलाकृती भाग तोलून धरलाय. हे मंदिर भोजराजाच्या काळात - म्हणजे 1000 ते 1055च्या दरम्यान बांधलं गेलं. त्यामुळे दगड दगडाला जोडून मंदिराचं बांधकाम केलं गेलं आहे, चुन्याचा वापर खूपच कमी आहे. भोजराजाच्या काळात इथे मंदिर स्थापत्याची कार्यशाळा असावी, असं पुरातत्त्व शास्त्रज्ञांचं मत आहे, कारण मंदिराच्या परिसरात असलेल्या शिळांवर विविध प्रकारच्या मंदिरांच्या रेखाकृती काढलेल्या आहेत.

मंदिराच्या परिसरात थोडं दूर चालून गेलो की बेटवा नदीचा हिरवागार प्रवाह दिसतो. काठावर अक्षरश: शेकडो प्रचंड शिळा इथेतिथे विखुरलेल्या आहेत. त्या सर्व शिळा बेटवा नदीवर भोजराजाने उभारलेल्या बांधाच्या होत्या. त्या बांधामुळे निर्माण झालेल्या विशाल सरोवराच्या काठावर एकेकाळी भोजपूरचं शिवमंदिर उभं होतं. पुढे होशंगशहाने भोजपूरवर आक्रमण करून तो बांध तोडून टाकला आणि मंदिराचंही बरेच नुकसान केलं, मूर्तींचा विध्वंस केला. मुसलमानी आक्रमणानंतर प्राचीन हिंदू मंदिरांचं जे काय होतं, तोच भोग भोजपूरच्या ह्या मंदिराच्या वाटयालाही आला. स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा हे मंदिर अत्यंत वाईट स्थितीत होतं. भा.पु.स.वि.ने अत्यंत परिश्रमपूर्वक ह्या मंदिराचं पुनर्वसन केलंय.

भोजपूरच्या ह्या मंदिरातलं शिवलिंग इतकं भव्य आहे की वर चढून पिंडीला बेल वाहायला शिडी लावावी लागते. माझ्याबरोबरचे ते वृध्द गृहस्थ म्हणाले की ''आधी कुणालाही पिंडीवर चढून फुलं वाहता येत होती. पण राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा जेव्हा ह्या मंदिरात दर्शनाला आले होते, तेव्हा त्यांनी विचारलं की आलेल्या कुणालाही असं पिंडीवर चढायची परवानगी का देतात?'' तेव्हापासून फक्त इथले पुजारी सकाळी एकदाच पिंडीवर चढून बेल वाहतात.

मंदिर बघून बाहेर आले. हातातली पाण्याची बाटली खाली ठेवून मी मंदिराचे फोटो काढत होते, तेव्हढयात मंदिर बघायला आलेल्या एका मोठया कुटुंबातली एक चिमुरडी लुटुलुटु येऊन ती पाण्याची बाटली उघडायचा प्रयत्न करू लागली. तिला तहान लागली असावी. मी कदाचित रागावेन म्हणून तिच्या आईने लगेच तिला मागे ओढलं आणि दटावणीच्या स्वरात म्हटलं, ''हात मत लगाना बेटा, वो पानी अपना नही है.'' मी पाण्याची बाटली उघडून त्या मुलीच्या हातात देत तिच्या आईला म्हटलं की, ''पीने दीजिये ना बच्चीको पानी. कोई बात नही.'' हे सगळं संभाषण ऐकत असलेले माझ्याबरोबरचे ते म्हातारे काका त्या मुलीच्या आईला म्हणाले, ''बेटा, पानी पानी होता है, अपना या पराया नही होता.'' माझ्या मनात आलं, किती कमी शब्दात आपल्या संस्कृतीचं सार सांगून गेले होते ते काका!

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मी मंदिरापासून थोडं दूर भा.पु.सं.वि.ने एक छोटं संग्रहालय उभं केलंय, तिथे गेले. तिथे मंदिराचे जुने फोटो आणि मॉडेल्स ठेवलेली आहेत. बाहेर जुन्या देवळांचे शेकडो अवशेष असेच जीर्ण, भग्न अवस्थेत पडलेले आहेत. ते पाहताना असं वाटतं की ह्या परिसरात पूर्वी अनेक मंदिरं असावी. मी त्या संग्रहालयात गेले, तेव्हा दुपारची वेळ होती. चौकीदार बाजूला एका झाडाखाली निवांत झोपला होता, आणि तिथेच पलीकडे त्या प्राचीन मंदिरांच्या अवशेषांच्या राशीवर बसून एक तरुण जोडपं गुजगोष्टी करत होतं. मागे बेटवा नदीचं पात्र दिसत होतं. सगळीकडे तो जुन्या दगडांचा खच आणि एका होडीत बसून मासे पकडणारा एक कोळी. बाकी सगळं शांत होतं. एकेकाळी हाच परिसर किती गजबजून गेलेला असेल! पूजेचे मंत्र, संगीत, ही मंदिरं बनवणाऱ्या कलाकारांच्या छिन्नी-हातोडयाचे घाव ह्यांच्या आवाजाने हा संपूर्ण परिसर निनादत असेल. आज मात्र भोजपूरच्या त्या मंदिराच्या विस्तीर्ण परिसरात एक विचित्र, खिन्न शांतता होती. बाहेर अस्ताव्यस्त पडलेले ते हजार वर्षांपूर्वीचे शिलाखंड बघताना का कोण जाणे, माझ्या उदास मनात कुसुमाग्रजांच्या 'मातीची दर्पोक्ती' ह्या कवितेतल्या ओळी रेंगाळत होत्या -

'कित्येक शिकंदर जग जिंकुनिया गेले

कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले

कित्येक मनू अन् मुनी धुळीने गिळले

स्मृतीतीलहि त्यांच्या ओळी अंधुक होती

शेकडो ताजही जिथे शोभले काल

ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी

मातीवर चढणे एक नवा थर अंती !'

shefv@hotmail.com