श्रीमती जयवंतीबेन मेहता यांच्या निधनामुळे मुंबईच्या राजकीय जीवनामध्ये जवळपास अर्धे शतक प्रभाव गाजवणारे एक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. सुरुवातीला जनसंघाच्या व नंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राजकारणात सर्व थरांवर सक्रिय असलेल्या जयवंतीबेन हे एक अत्यंत शालीन व्यक्तिमत्त्व होते. शालीनता, सुसंस्कृतपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता. पण त्याच वेळेला त्या कमालीच्या कणखर आणि लढाऊदेखील होत्या. महाराष्ट्रामध्ये जनसंघाची उभारणी करणारी अगदी प्रारंभीची जी पिढी होती, त्यात जयवंतीबेन अग्रेसर होत्या.
1958-59पासून त्या जनसंघाच्या कामात आल्या. जनसंघाची महिला आघाडी संघटित करण्याची जबाबदारी त्यांनी अत्यंत कार्यक्षमतेने उचलली. पक्षाची संघटनात्मक उभारणी करत असतानाच जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा त्यांचा सतत आग्रह असायचा. या स्वभावामुळे सामान्य जनतेशी त्यांनी एक जिव्हाळयाचे नाते सहजगत्या निर्माण केले होते. त्यातूनच 1968 साली त्या प्रथम मुंबई महापालिकेत निवडून गेल्या व सलग दहा वर्षे महापालिका सदस्य म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली. महापालिकेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी तेवढयाच सहजतेने विधानसभेतही प्रवेश केला. विधानसभेवर निवडून जाताना त्यांनी शिवसेनेच्या प्रमोद नवलकर या मातब्बर नेत्याचा पराभव केला. महापालिका, विधानसभा यानंतर त्यांनी लोकसभेतही विजय मिळवला. लोकसभेवर निवडून जातानादेखील त्यांनी काँग्रेसच्या मुरली देवरा ह्या विलक्षण ताकदवान नेत्याचा पराभव केला होता. मा. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारमध्ये ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली. जयवंतीबेन कुशल संघटक होत्या, हे त्यांनी पक्षाची महिला आघाडी संघटित करताना दाखवून दिले. त्याचबरोबर त्या प्रभावी वक्त्या होत्या. जन्माने त्या गुजराथी भाषिक होत्या, पण मराठी व हिंदीवरही त्यांचे तेवढेच प्रभुत्व होते. तास-सव्वा तास जरी मराठीमध्ये भाषण केले, तरी त्यांच्या बोलण्यात गुजराथी शब्द अथवा वाक्यरचना येत नसे, इतक्या अस्खलितपणे त्या मराठी बोलत असत. मुंबईसारख्या बहुभाषिक महानगरात त्यांच्या सभांना गर्दी असायची यात काही नवल नव्हते. पण संपूर्ण कोकणपट्टीत जिथे केवळ मराठीच चालत असे, तिथेसुध्दा त्यांच्या सभांना मोठी मागणी असायची. महापालिकेपासून लोकसभेपर्यंत सर्व क्षेत्रात काम करत असताना एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपला ठसा निर्विवादपणे उमटवला होता. त्या अभ्यासू होत्या. सभागृहाच्या कामकाजाची पध्दती व नियम यांचा अभ्यास करून त्यांचा योग्य वापर करण्याचे तंत्र त्यांनी आत्मसात केले होते. त्यामुळे सभागृहाबाहेर त्यांनी जसे मैदान गाजवले, तसाच प्रभाव त्यांनी सभागृहातदेखील निर्माण केला.
जयवंतीबेन वैयक्तिक जीवनात कमालीच्या मृदुभाषी होत्या. जवळपास अर्ध्या शतकाचे राजकीय जीवन व्यतीत केल्यानंतरदेखील त्यांचे चारित्र्य निष्कलंक होते. कोणतेही वादविवाद अथवा त्यांच्यावर आरोप करणे त्यांच्या शत्रूनांही शक्य झाले नाही. माझ्या मते ही त्यांची सर्वात मोठी उपलब्धी होती. 1960 ते 70च्या दशकात मुंबईसह महाराष्ट्रात आणि देशाच्या अन्य भागांत महागाईच्या विरोधात महिलांचे परिणामकारक आंदोलन उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्या आंदोलनामुळेच त्यांना जनतेकडून व पत्रकारांकडून 'भुलेश्वर की भवानी' ही उपाधी मिळाली होती. महागाईच्या विरोधात घंटा नाद, थाळी नाद यासारखे अभिनव कार्यक्रम शोधून काढण्यात त्यांचा पुढाकार होता. सरकारी धोरणांच्या विरोधात सर्वसामान्य, मध्यमवर्गीय व निम्न मध्यमवर्गीय, कष्टकरी महिलांना रस्त्यावर उतरवण्यात जयवंतीबेन यांनी यश मिळवले होते. श्रीमती इंदिरा गांधींच्या विरोधात देशभरात प्रखर वातावरण तयार करण्यामध्येही त्यांचा सहभाग होता. एका अर्थाने मुंबई व महाराष्ट्र जनसंघाचा लढाऊ चेहरा अशी त्यांची ओळख होती असे म्हटले, तरी त्यात अतिशयोक्ती होणार नाही.
कुशल संघटक, जागरूक लोकप्रतिनिधी, लढाऊ नेत्या या सगळयाबरोबरच कुटुंबवत्सल महिला हीसुध्दा जयवंतीबेन यांची ओळख होती. पक्षातल्या विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी दिवसातला बराच वेळ खर्च करावा लागत असताना त्या घरातल्या कुठल्याही जबाबदारीपासून दूर राहिल्या नाहीत. सुरुवातीच्या काळामध्ये तर दौऱ्यावर येणाऱ्या अखिल भारतीय नेत्यांचा निवासदेखील त्यांच्या घरात असायचा. त्यांचे आतिथ्य करून त्या संघटनेतील कामेदेखील पार पाडत असत. त्यांचे पती आणि त्यांचा मुलगा यांनी त्यांना पूर्णपणे साथ दिली. पण त्या तिघांचेही मोठेपण हे होते की त्यांनी राजकीय घराणे तयार होऊ दिले नाही.
जयवंतीबेन कृतार्थ आयुष्य जगल्या. ज्या पक्षाचे काम करणे म्हणजे अग्निपरीक्षेला सामोरे जाणे अशी परिस्थिती होती, तिथपासून पक्षाचे काम करत पक्षाला पूर्ण बहुमतापर्यंत आणण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. पक्षाचा वाढलेला पसारा त्यांना अभिमानाने बघायला मिळाला. गेल्या काही वर्षांमध्ये प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्या फारशा सक्रिय नव्हत्या. पण तरी पक्षाच्या वाटचालीची माहिती त्या सातत्याने घेत असत. काही वेळेला सूचनाही करत असत. त्यांची गैरहजेरी दीर्घकाळ जाणवेल.
(लेखक भाजपाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवक्ता आहेत.)
vivekedit@gmail.com