शिकण्याचं तंत्र

विवेक मराठी    09-Oct-2016
Total Views |

आपली तयारी, निरीक्षण, अंदाज, प्रक्रिया, परीक्षण या सगळया गोष्टी तिथे घडतात. ही नावं देत नाही, इतकंच. तसंच आहे, Processमध्ये काहीतरी गडबड झाली की जशी घरातली बाई पाणी, तांदूळ, भांडी याला दोष देते. आपलंही तेच आहे... नुसता तांदूळ शिजत ठेवून भात करणं, कुकर लावणं... पध्दत वेगळी. ज्याला जी जमेल ती त्याने वापरावी. विचार करावा. वाचण्या-लिहिण्याचं तसंच आहे. तुम्ही तुमचा विचार करा, तुमची एक Process तयार करा.


गु
रुजी लिखाण करत होते, बाई खूपच वैतागल्या होत्या. त्यांना माहीत होतं, कुणीतरी येणारी व्यक्ती मुलांना लिहायला-वाचायला सांगणार. काय करावं या मुलांना! बाई एकदम अंगावरच आल्या. म्हणजे त्यांनी एकदम सुरूच केलं त्याचं रडगाणं, तक्रार, वैताग. पाहुण्यांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. एकदम त्यांना थांबवायला नको, मोकळं होऊ दे मनातला त्रास ओकून.

''कसं वाटतंय आता? मी काहीच म्हणालो नाही तुम्हाला! बरं वाटतंय का?''

''मला काय झालंय? काय करावं काही सुचत नाही.''

''काहीतरी करावंसं वाटतंय हेही पुष्कळ आहे, चांगलं आहे. ठरवता येईल.''

''आता अजून काही नवीन सांगू नका. रोज काहीतरी नवं फॅड. काहीतरी नव्या पध्दती.''

''मी सांगणार काही नाही, शिकवणार काही नाही. बघणार काही नाही, विचारणार काही नाही.''

''असं कसं?''

''का नाही असं? मला आवडतं नुसतं शांतपणे बघायला. गप्पा मारायला...''

बाई एकदम निवळल्या, शांत झाल्या. ''किती नि काय काय तयार केलंय मुलासाठी! काय काय जमवलंय. मिळेल ते आणते. जमवते.''

''तुमची तळमळ कळतेय मला. तुम्ही खूप काम करता असंही कळंतय...''

''पण यश नाही बघा. मुलं घरी जातात. घरी सगळा अभ्यासाचा आनंद. विसरतात. पुन्हा करून घ्या. सगळं सपाट होतं मुलं घरी गेली की! एकदा घरी गेली की दहा-दहा दिवस येत नाहीत. कितीही पालकांना समजवा.''

''जाऊ दे. सोडून द्या. तुमची मुलं काय करतात?''

''घरात दहावी, बारावी. इथं आले तरी लक्ष लागत नाही. टी.व्ही. बंद केलाय. स्वयंपाकाला बाई. जेवढं करता येईल...''

''अहो, असं कळतंय की आता दहावी-बारावीच्या पालकांची परीक्षा घेतली जाणारेय म्हणे.''

''काहीतरीच बरं का.''

''हो, खरंच. घरचं वातावरण तंग कसं ठेवावं? सगळे फंक्शन्स डिलीट कसे करावे? मुलांच्या मागे अभ्यास म्हणून कसं लागावं?'' 

''काहीतरीच सर तुमचं... कळेल जूनमध्ये काय केलंय ते मुलांनी...'' बाई कामाला लागल्या. त्या बऱ्यापैकी खूश होत्या. 'साहेब आले म्हणजे काहीतरी उणिवा सांगितल्याच पाहिजेत' असं घडलं नाही, याचं नवल बाईंनी त्यांच्याच कलीगजवळ व्यक्त केलं. ''असं होणार नाही बाई, आता नव्या पध्दती आल्यात. त्यामुळे तुम्ही बेफिकीर राहू नका.''

''मी त्यांना सांगितलं, अगदी ठणकावून! त्यांचा मूड वेगळा होता. जनरलच गप्पा मारल्या. ते इकडे तिकडे फिरतायत, बघतायत. मुलांशी गप्पाही मारत असतील....''

इतक्यात सर तिथे आले. ''मुलं फारच स्मार्ट आहेत. न घाबरता बोलत होती. नाहीतर आमच्या वेळी कुणी परकं वर्गात आलं की आम्ही चिडीचुप, तुम्ही चांगलं काम करताय याचा अर्थ. वा! छान, अभिनंदन... मुलं लिहीतही छान होती. असं काही जाणीवपूर्वक मी काही केलं नाही. सहजच...'' बाईंना नवल वाटलं. हा तर वेगळा रिमार्क! असं कसं झालं? काहीतरी गडबड आहे.

''लिहितात तशी मुलं! पण...''

''काही अडचण आहे का तुमची?''

''नाही, म्हणजे... विसरतातही पटकन. काय काय करून पाहिलं. मुळाक्षरं, बाराखडी गिरवायला देते. चिंचोके, दगड देते अक्षरांवर ठेवायला. करते काय काय?''

''बाई, पुन्हा सांगतो. माझा काहीच रिमार्क असणार नाही लेखी. आज फक्त येऊन गेल्याची नोंद असेल.'' हे सगळं थोडं नेहमीपेक्षा वेगळंच वागणं होतं. दोघा शिक्षकांचा विश्वास बसत नव्हता...

''तरीही तुमची काही अडचण असली, तर आपण बोलू या...''

''आमची काहीच अडचण नाही.''

''हीच तर अडचण आहे.''

''आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. तुमचं सहकार्य आहेच.''

''तुम्ही कसे येता शाळेत?''

''गुरुजींनी गाडी घेतलीय. दोघंही गाडीनेच येतो. बरं पडतं.''

''अरे वा! छान. कधी घेतली गाडी?''

''झालेत महिने काही.''

''वा, वा, छान छान... कोणं चालवत गाडी?''

''दोघांनाही येते.''

''सायकल शिकलाय का कधी?''

''काय सर? काहीतरी काय विचारताय. लहानपणी शिकलोय सायकल. पूर्वी सायकलीच होत्या.''

''पूर्वी म्हणजे? तुमचं वय तसं फार नाही. दोघंही 35-40चे असालं.''

''तेच, पण पूर्वी सायकल शिकली जायचीच.''

''विसरला नाहीत नं!''

''विसतोय कसले! आजही चालवू की.''

''का नाही विसरलात?''

''एकदा सायकल चालवायला आली की विसरत नाही.'' सगळं शांत.

''म्हणूनच तुम्हाला सांगतो. एकदा का समजपूर्वक लिहिता येऊ लागलं की विसरत नाही. एक प्रयोग केला मी! माझी आजी 90 होऊन गेली. तेव्हाची ती तिसरी शिकली होती. शेवटपर्यंत तिला वाचता-लिहिता येत होतं. तिच्या दृष्टीने तर, तिला शाळा सोडून 80-82 वर्षं झाली. असं का असेल? वाचायचा सराव ठेवला गेला. हिशोब लिहायची. आकडेमोड ठेवत होती. विसरली नाही.''

''तेव्हा सगळंच वेगळं होतं. शिक्षक घोटून घोटून घ्यायचे.'' बाई म्हणाल्या.

''अगदी बरोबर. आता तयारी करून घेऊ नका असं कुणी सांगितलं? तुम्ही काहीतरी म्हणत होतात - मुलं घरी जातात. बस गेली की येत नाहीत. ....मुलंच ती. शिवाय इथे असं काही घडत असलं तर मुलं धावत येणार. घरी न जाणाऱ्या, शाळा न बुडणाऱ्या मुलांच्या बाबतीत काय अनुभव आहे?''

बाई म्हणाल्या, ''मग त्याचा अभ्यास घेता येत नाही. नवीन काही सुरू करता येत नाही. गोंधळ होतो सगळा.''

''अहो बाई, अजून मी अभ्यासाकडे अालोच नाही. आपण फक्त वाचणं-लिहिणं याबद्दलच बोलतोय. घरी गेलं काय, शाळेत आलं काय, नाही काय, एकदा का लिहिता येऊ लागलं की विसरायचा प्रश्न नसतो. सगळंच सपाट होणं तर नाहीच नाही. म्हणजे गडबड कुठे आहे हे शोधून काढायला हवं. आपलं काहीतरी चुकतंय असं वाटत नाही तुम्हाला?'' आता मात्र सगळं सामसूम झालं. शाळा पाहायला आलेले पाहुणे आणि दोघे शिक्षक स्तब्ध होते. एक मुलगा धावत आला नि म्हणाला ''गुरुजी, लघवीची सुट्टी करू?''

गुरुजी म्हणाले, ''गप्प बसा वर्गात. आता वेळ आहे का?'' खरं तर पाहुण्यांच्या मनात आलं होतं म्हणायचं, की लघवीला जाणं हे निमित्त आहे, वर्गात कुणीच नाही, तर आम्हाला तरी जाऊ दे हेच त्या मुलाला सुचवायचं होतं.

पाहुणे म्हणाले, ''मला वाटतं भात तयार होणं, शेतात आणि घरात शिजणंही... यात एक Process आहे, ती Process follow होणं महत्त्वाचं असतं. त्यातली कोणतेही गोष्ट बिघडली की अपेक्षित गोष्ट घडत नाही. सगळया गोष्टी आपल्या हातात नसतात. मान्य. हेही महत्त्वाचं. भात कुठे लावलं जातं हे ठरलेलं आहे. पाऊस कमी-जास्त होतो, इतकंच. तांदळाचा भात शिजणं यात तर असं काही नाही. आपली तयारी, निरीक्षण, अंदाज, प्रक्रिया, परीक्षण या सगळया गोष्टी तिथे घडतात. ही नावं देत नाही इतकंच, तसंच आहे, Processमध्ये काहीतरी गडबड झाली की जशी घरातली बाई पाणी, तांदूळ, भांडी याला दोष देते. आपलंही तेच आहे... नुसता तांदूळ शिजत ठेवून भात करणं, कुकर लावणं... पध्दत वेगळी. ज्याला जी जमेल ती त्याने वापरावी. विचार करावा. वाचण्या-लिहिण्याचं तसंच आहे. तुम्ही तुमचा विचार करा, तुमची एक Process तयार करा. इतकंच... आणि हो! जमवलेल्या गोष्टींची उपयोगिताही पाहा. नुसत्या वस्तू जमवल्या तर अडगळ होते नि कचरा होतो...''

पाहुणे बाहेर पडले. गुरुजींनी मुलांना घंटा वाजवायला सांगितली...

renudandekar@gmail.com

& 9403693275