मराठा समाजाचे मूक मोर्चे जवळजवळ सर्वच महाराष्ट्रात मोठया शांततेत आणि सुयोग्य नियोजनाचे दर्शन घडवत संपन्न झाले. ज्या जिल्ह्यांत असे मोर्चे निघाले नाहीत, तेथेही आगामी काळात मोर्चे होतील. साधारणपणे दिवाळीनंतर मुंबईत महामोर्चा आयोजित केला जाईल, अशी चिन्हे दिसत आहेत. मोर्चे ही आपली मागण्या मांडण्याची पहिली पायरी होती. मोर्चांतून केलेल्या मागण्यांवर शासकीय पातळीवर विचारही सुरू झालेला आहे. मोर्चांच्या माध्यमातून ज्या मागण्या मांडल्या जात आहेत, त्या स्थैर्याशी जोडलेल्या आहेत. पुढील काळात ही स्थैर्याची चळवळ आपली वहिवाट कशी होईल, याचा आता विचार व्हायला हवा. असा विचार करणे आणि त्यानुसार कृतिप्रवण होणे ही मराठा आंदोलनाची दुसरी पायरी असणार आहे.
महाराष्ट्रात सध्या जे मराठा समाजाचे मोर्चे चालू आहेत, त्यांची व्याप्ती पाहता एक मोठा समाज सर्वार्थाने जागृत झाल्याची अनुभूती येत आहे. ज्या ज्या जिल्ह्यांत हे मोर्चे संपन्न झाले, तेथे तेथे जागृतीची एक लाट उत्पन्न झाली आहे. या लाटेने सरकारला दखल घ्यायला लावली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन न्यायालयात सखोलपणे बाजू मांडू असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे युती शासनकाळात स्थापन झालेल्या आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने अडगळीत टाकलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्याचीही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एका अर्थाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य होण्यास आणि त्याच्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यास सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षण हा विषय न्यायालयीन कसोटीवर कशा प्रकारे टिकतो, यावर त्याचे भवितव्य अवलंबून असले तरी या विषयात सरकार सकारात्मक दृष्टीने पाहत आहे हे मान्य करावे लागेल. मराठा आरक्षणाचा विषय हा खूप काळापासून प्रलंबित असणारा विषय आहे हे सर्वच जण जाणतात. देवेंद्र फडणवीस त्याची कायमची तड लावतील अशी अपेक्षा या निमित्ताने करायला हरकत नाही. शासन या विषयात गतिमान झाले असताना मात्र याआधी ज्यांच्याकडे सत्ता होती आणि मराठा समाज म्हणजे केवळ आपली मताची बाजारपेठ आहे अशा भ्रमात राहून मराठा समाजाविषयी कोणतीही सकारात्मक भूमिका न घेणारी मंडळी आता फडणवीसांना सांगत आहेत - 'मराठयांना तत्काळ आरक्षण द्या'. त्यांच्या अशा या विधानातून मराठा समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न होतो आहे, हे समजण्यासाठी वेगळया भाष्यांची आवश्यकता नाही.
मराठा समाजाची वेदना काय आहे? आणि ती दूर करण्याचे मार्ग काय आहेत? या विषयावर इथे पुन्हा लिहिण्याची आवश्यकता आहे असे आम्हाला वाटत नाही. मागील पंधरा-वीस वर्षांचा कालखंड डोळयासमोर आणला, तर धगधगते समाजवास्तव आपल्या लक्षात येऊ शकते. हे वास्तव बदलणे आणि समाजाला उन्नत करणे हा एकमात्र उपाय आज आपल्या हाती आहे. आणि हा उपाय करताना राजकारण न करता केवळ आणि केवळ सामाजिक भूमिकेतूनच सर्वांनी या विषयाला भिडले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने मार्ग निघेल. आजवर बहुसंख्य मराठा समाजाच्या मतांवर अनेकांनी सत्तेची ऊब चाखली आहे. सत्तेचा सोपान चढताना मात्र याच मंडळींना मराठा समाजाचा सोईस्कर विसर पडलेला आहे. या साऱ्याची परिणती म्हणूनच आता मराठा समाज नव्या बदलाच्या अपेक्षेसह मैदानात उतरला आहे.
आपण काय करणार?
मराठा मूक मोर्चात खूप मोठया प्रमाणात तरुण सहभागी होत आहेत. त्याच्या डोळयात भविष्याचा वेध दिसतो आहे. याच तरुणांच्या प्रयत्नामुळे, एकजुटीमुळे प्रस्थापित मराठा नेते आणि स्वयंभू तारणहार मोर्चापासून दूर राहिले आहेत. ज्यांनी नाडले, शोषण केले, त्यांच्या खांद्यावर आता आपल्या नेतृत्वाचा झेंडा द्यायचा नाही, हे समाजाने ठरवले आहे. असे होण्यामागे मराठा तरुणांनी केलेले प्रबोधन जबाबदार आहे. नव्या जगाची भाषा त्याला कळते आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजबांधवांना एक करण्यात याच तरुणांचा मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचा पुरेपूर वापर करत ज्या पध्दतीने मोर्चे होत आहेत, त्यामागेही हीच युवाशक्ती आहे हे लक्षात घेतले पाहिजे. एका जिल्ह्याचा मोर्चा यशस्वी करायचा, तर किमान पाच हजार तरुण तो जिल्हा पिंजून काढत आहेत. घरचे खाऊन समाजाचे काम करत आहेत. आणि हे करत असताना सर्वांमध्ये एकत्वाची, समतेची भावना दिवसेन्दिवस प्रबळ होत असताना दिसते आहे. समाजांतर्गत असणाऱ्या भेदाच्या भिंती या निमित्ताने खिळखिळया होऊ लागल्या आहेत ही आनंदाची बाब आहे. युवा वर्गाच्या या कार्याला सलाम करायलाच हवा. पण या निमित्ताने एक प्रश्न आमच्यापुढे उभा आहे. त्याचे उत्तर ही युवाशक्ती देईल का?
यथावकाश महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतील मोर्चे संपतील. शासनदरबारी मराठा समाजाच्या मागण्या मान्यही होतील. पण प्रश्न असा आहे की एवढयाच माफक अपेक्षेने मराठा समाज एक झाला होता का? याचसाठी मराठा युवाशक्ती अहोरात्र कष्ट करत होती का? या साऱ्या आंदोलनाचे एका वाक्यात वर्णन करायचे, तर असे म्हणता येईल की 'मराठा समाजाला सबळ व्हायचे आहे.' सबळ होण्यासाठी सर्वसाधारणपणे कमीतकमी तीन गोष्टींची आवश्यकता असते. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सबळ व्हायचे आहे अशी आंतरिक ऊर्मी. या मोर्चातून या ऊर्मीची प्रचिती जिल्ह्याजिल्ह्यातून दिसून येत आहे. गरज आहे ती ही ऊर्मी प्रत्येक समाजघटकाचा स्थायिभाव बनण्याची. दुसरी गोष्ट लागते ती पूरक वातावरणाची आणि साधन-सुविधांची. शासनाच्या विविध योजना, नव्याने सुरू होणारे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून सबळ होण्यासाठी आवश्यक ती साधने आणि सुविधा उपलब्ध होणार आहेत. पुनर्गठित अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना काय असाव्यात, कोणत्या गोष्टीवर या महामंडळाने भर दिला पाहिजे याबाबत मराठा तरुणांनी आपली मते शासनास कळवायला हवीत. कारण हा आपल्या सामाजिक स्थैर्याचा विषय आहे. सबळ बनण्यासाठी तिसरी गोष्ट लागते, ती म्हणजे मेहनत. या तीनपैकी दोन गोष्टी या आपल्यामध्ये असायला हव्यात, आरक्षण, आर्थिक विकास महामंडळ हे आपल्यासाठी केवळ साधन आहे. मानवी शरीर सुदृढ होण्यासाठी ज्या गोष्टींवर विशेष लक्ष दिले जाते, त्याचप्रमाणे समाज सुदृढ होण्यासाठी लक्ष दिले पाहिजे. समाजाला सबळ करायचे तर या गोष्टीचा विचार व्हायलाच हवा. आज समाजात काय कमतरता आहेत आणि त्या आपापल्या पातळीवर कशा प्रकारे दूर करू शकू, यांचा विचार करायला हवा. या बाबतीत युवाशक्तीने पुढाकार घ्यायला हवा. कारण नव्या युगाची हाक आणि दिशा यांचे नव्या पिढीलाच जास्त चंागल्या प्रकारे आकलन होते आहे, असे आमचे निरीक्षण आहे. आपल्या समाजाला आपणच सबळ करायचे आहे अशी मानसिकता पुढील काळात तयार झाली, तर शासन तयार करत असलेल्या योजना योग्य पध्दतीने कार्यान्वित होतील, आणि ज्या समाजबांधवांपर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत तेथेच पोहोचतील. एका अर्थाने आता समाज जागल्याची भूमिका युवापिढीला पार पाडायची आहे. आपण विकसित होताना, सबळ होताना आपला आणखी एक बांधव सबळ कसा होईल याकडे लक्ष देण्याची गरज या निमित्ताने निर्माण होणार आहे. आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, तर पुन्हा एकदा मराठा समाजात संचित आणि वंचित असे दोन तट उभे राहतील आणि आणखी काही वर्षांनी पुन्हा मोर्चे काढावे लागतील. असे होऊ नये असे वाटत असेल, तर आतापासूनच पावले उचलायला हवीत.
आजवर जे मोर्चे झाले, त्याचे कोणीही नेतृत्व केलेले नाही. समाजाने स्वयंस्फूर्तीने मोर्चे काढले. पण पुढील काळात समाजाचा तारू योग्य गतीने आणि योग्य दिशेने घेऊन जायचे असेल, तर समाजाला सर्वक्षेत्रीय नेतृत्व उभे करावेच लागेल. मराठा समाजाला राजकीय नेतृत्वांची वानवा नाही. गरज आहे ती राजकारण वगळून अन्य क्षेत्रांत समाजाला दिशा देणाऱ्या नेतृत्वाची. ही गरज आपण कशी पूर्ण करणार आहोत? मराठा समाजात सर्वच क्षेत्रांत नामवंत आहेत. त्यांनी आता आपल्या समाजाकडे पाहिले पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाची नवी पिढी उभी केली पाहिजे. आज या गोष्टीची खूप मोठी गरज आहे. इतके दिवस आत्ममग्न असणारा मराठा समाज आता जगाकडे उघडया डोळयांनी बघत आहे. त्याला आता आपल्या उणिवा दिसत आहेत. या दूर करण्यासाठीचा मार्गही या समाजाकडे आहे. गरज आहे ती त्यांचा अंगीकार करण्याची.
संयम हेच बळ
जेव्हापासून मराठा समाजाचे मूक मोर्चे सुरू झाले, तेव्हापासूनच काही मंडळींनी विद्वेष पेरण्याची सुपारी घेऊन आपले काम सुरू केले होते. सोशल मीडियासारखे मुक्तमाध्यम हाताशी असल्यामुळे तर अशा बोरूबहाद्दरांना ऊतच आला आहे. त्यात काही 'सुप्रसिध्द' पत्रकारही सामील आहेत. सामनामधील व्यंगचित्र हा विषय घेऊन एका महाभागाने 'चार्ली हेब्दो'ची आठवण जागवली. सामनावर दगडफेक करणारे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते होते. त्यांना अटक झाली. पण संपूर्ण मराठा समाज संभाजी ब्रिगेडच्या अधिन आहे असा याचा अर्थ होत नाही. संभाजी ब्रिगेडच्या माथेफिरूंनी उचलेला एक दगड संपूर्ण मराठा समाजाला बट्टा लावून गेला आहे आणि त्यातून काही महाभाग मराठा समाजाची तुलना कट्टरपंथी, प्रतिगामी मुस्लिमांशी करू लागले आहेत. मराठा समाज असा प्रतिगामी आहे का? या प्रश्नाचे उत्तर जर नाही असे आहे, तर मग संभाजी ब्रिगेडसारख्या उठवळ प्रवृत्तींचा बंदोबस्त आपण कशा प्रकारे करणार आहोत? काही विघ्नसंतोषी लोक मुद्दामहून खिजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा उद्देश स्पष्ट आहे - काहीही करून मराठा समाजाला अनुचित कृत्य करायला भाग पाडायचे आणि त्याच्या आधाराने समाजाचे नामोहरण करायचे, बदनाम करून जे संघटन उभे राहते आहे ते फोडायचे. विघ्नसंतोषी लोकांचा हा डाव लक्षात घ्यायला हवा आणि आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक कृत्य होणार नाही याकडे सर्वच समाजबांधवांनी लक्ष द्यायला हवे. मराठा समाज इतक्या मोठया प्रमाणात आणि शांततेत मोर्चे काढतो आहे. ती शंातता भंग पावावी अशीच काही लोकांची इच्छा आहे. तेव्हा सावध राहणेच चंागले आहे. आजवर सर्वच मोर्चे हे मूक मोर्चे होते. मूक राहून आपले मागणे मांडणे हे खूप अवघड काम आहे. पण मराठा समाजाने ते कृतीतून सिध्द केले आहे. यामागे संयमाचे अधिष्ठान आहे हे लक्षात घ्यायला हवे. मराठा समाजाच्या हाडीमासीच संयम आणि शौर्य खिळलेले आहे. संयम आणि शौर्याचा बांध कुठे आणि कसा फोडायचा हे या समाजाला चांगलेच माहीत आहे. आजवरचे सर्वच मोर्चे ज्या दिमाखात आणि संयमात पार पडले, त्याच प्रकारे पुढील काळातील मोर्चेही संपन्न होतील.
मुळात मराठा समाजाचे मूक मोर्चे आरक्षणासाठी नाहीत हे आधी समजून घेतले पाहिजे. मराठा समाज स्वतःमध्येच आता बदल घडवू पाहत आहे. त्या बदलाच्या दिशेने जाण्याचे निमित्त या मोर्चातून पुढे अाले आहे. कृषी, शिक्षण, सहकार, अर्थकारण या सर्वच क्षेत्रांबाबत आता मराठा समाज बदलत्या मानसिकतेत आहे. आणि मानसिकता भविष्यलक्ष्यी आहे असे आम्हाला वाटते. भविष्याचा वेध घेत स्वतःमध्ये बदल करण्याची आणि बदलत्या जगानुसार आपलेही जीवनमान बदलण्याची तीव्र इच्छा मराठा समाजाच्या मनात उत्पन्न झाली आहे. ही इच्छा केवळ आरक्षणामुळे पूर्ण होणार नाही. कारण मराठा समाजाची व्याप्ती केवळ आरक्षणाच्या साह्याने विकासाचे शिखर गाठता येईल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. आणि म्हणूनच मराठा समाजाला आपली एकजूट कायम राखत विकासाच्या विविध संधींचा शोध घ्यावा लागेल. तरच भविष्यकाळ सुखकर होईल.
9594961860