समाज चालायचा असेल, तर संवाद होणे आवश्यक आहे. असा संवाद व्हायचा असेल तर समान दुवा आवश्यक असतो. यात भाषा ही अशा समान दुव्याचे महत्त्वाचे काम करते. जर एकमेकांना दुसऱ्याची भाषा कळत नसेल, तर हावभाव करून किंवा खुणांच्या माध्यमातून खूपच मर्यादित प्रमाणात संवाद होऊ शकतो. त्यातही गैरसमज होण्याचे धोके भरपूर असतात. परंतु केवळ भाषा समान असल्याने प्रश्न सुटत नाही. अनुभवाचे आकलन, त्या आकलनाचे शब्दांकन करण्याची क्षमता, त्याकरिता आवश्यक असणारी शब्दसंपत्ती असणे, योग्य शब्दांत त्या अनुभवाचे शब्दांकन करणे व योग्य प्रकारे ती मांडणे एवढया गोष्टी साध्य झाल्यानंतर तो अनुभव काही प्रमाणात तरी दुसऱ्यापर्यंत पोहोचविणे शक्य होते.
आपणाला एखादा विषय नेमका समजतो म्हणजे काय होते? असा प्रश्न विचारला, तर तो हास्यास्पद वाटण्याची शक्यता आहे. आपल्या भोवती घडणाऱ्या घडामोडींची जी प्रतिमा आपल्या मनावर उमटते, त्यावरून आपण जे निष्कर्ष काढतो, ते म्हणजे आपले समजणे असे आपण गृहीत धरतो. परंतु ही प्रक्रिया एवढी सोपी नसते. नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा ही आपली जी पाच इंद्रिये आहेत, त्यांच्याद्वारे आपल्याला बाह्य जगताचे ज्ञान होते. या सर्वांची मिळून एक प्रतिमा तयार होते व ती आपल्या मनावर उमटते. परंतु ज्या मनावर ही प्रतिमा उमटते, ते मन कोरे नसते. त्यावर आधीच अनेक प्रतिमा तयार झालेल्या असतात. त्या प्रतिमांमध्ये ही नवी प्रतिमा जाऊन मिसळते. ती आधीच्या प्रतिमांमध्ये मिसळल्यावर असा रंग घेते की ती तिचा मूळ रंग शोधणे अशक्य होते. त्यामुळेच घटना एकच घडली, तरी त्या घटनेच्या प्रत्येक व्यक्तीगणिक वेगळया प्रतिमा निर्माण होतात. या प्रतिमांचे अर्थ लावण्यातून विचारांचा जन्म होतो. परंतु जे मनाच्या बाबतीत घडते, तेच विचारांच्या बाबतीतही असते. येणारा प्रत्येक अनुभव कोऱ्या पाटीवर पडत नसतो. त्या पाटीवर आधीच काहीतरी लिहिलेले असते. त्या लिहिण्यात हे नवे लिहिणे मिसळून जाते. अक्षरावर अक्षरे, शब्दावर शब्द लिहिले जात असल्याने त्यातून नवेच शब्द दिसू लागतात. त्यामुळे कोणताही अनुभव हा वस्तुनिष्ठ नसतो, व्यक्तिनिष्ठ असतो. प्रत्येक बाबतीत असे घडू लागले, तर एकमेकांशी संवाद होणेच कठीण होऊन बसेल. प्रत्यक्षात तसे होतेही. त्यामुळेच अनेक संघर्षाचे प्रश्नही निर्माण होतात. एखाद्या गोष्टीचा किंवा घटनेचा वस्तुनिष्ठपणे अनुभव घेणे व तो दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे ही व्यवहारात खूपच अवघड गोष्ट ठरते. यात हेतुपूर्वक केलेल्या फेरफारांचा विचार केलेला नाही, तो एक स्वतंत्र विषय आहे.
समाज चालायचा असेल, तर संवाद होणे आवश्यक आहे. असा संवाद व्हायचा असेल तर समान दुवा आवश्यक असतो. यात भाषा ही अशा समान दुव्याचे महत्त्वाचे काम करते. जर एकमेकांना दुसऱ्याची भाषा कळत नसेल, तर हावभाव करून किंवा खुणांच्या माध्यमातून खूपच मर्यादित प्रमाणात संवाद होऊ शकतो. त्यातही गैरसमज होण्याचे धोके भरपूर असतात. परंतु केवळ भाषा समान असल्याने प्रश्न सुटत नाही. अनुभवाचे आकलन, त्या आकलनाचे शब्दांकन करण्याची क्षमता, त्याकरिता आवश्यक असणारी शब्दसंपत्ती असणे, योग्य शब्दांत त्या अनुभवाचे शब्दांकन करणे व योग्य प्रकारे ती मांडणे एवढया गोष्टी साध्य झाल्यानंतर तो अनुभव काही प्रमाणात तरी दुसऱ्यापर्यंत पोहोचविणे शक्य होते. परंतु ज्याच्यापाशी हा अनुभव पोहोचवायचा आहे, तोही अशाच एका गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून जात असतो. जो अनुभव सांगतो, त्याची ऐकणाऱ्याच्या मनातील प्रतिमा, त्याचे शब्द आकलनाचे सामर्थ्य, त्या शब्दांमधून जी प्रतिमा निर्मिती होत असते ती समजण्याची क्षमता, त्याच्या आधीच्या अनुभवांमधे ती प्रतिमा मिसळल्यावर त्यातून त्याने काढलेले निष्कर्ष यातून एक नवाच अनुभव तयार होतो. तो त्याच्यापुरता सत्य असतो. असे एक नवे सत्य तयार होते. त्यामुळे व्यक्तीगणिक नवी सत्ये असतील तर 'वस्तुनिष्ठ ' सत्य नावाचे असे काही असते का? असा प्रश्न निर्माण होतो.
यातून आपल्या दैनंदिन जीवनात नवे प्रश्न निर्माण होतात. आपल्या रोजच्या जीवनाला आवश्यक असलेली माहिती आपण एकटे मिळविणे अशक्य आहे. त्यामुळे माहितीच्या वेगवेगळया स्रोतांवर आपल्याला अवलंबून राहावे लागते. या माहितीची विश्वासार्हता कशी तपासायची, हा आपल्यापुढचा महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जे जाणूनबुजून फसविण्यासाठी खोटी माहिती देतात, त्यांचा या विवेचनात आपण समावेश करीत नाही. ती सरळ सरळ गुन्हेगारी प्रवृत्ती झाली. परंतु ज्यांचा हेतू चांगला आहे, त्यांच्यामध्ये ही माहिती मिळविणे, तिचे संकलन करणे, तिचा अर्थ लावणे व ती दुसऱ्यापर्यंत पोहोचविणे यात इतका बदल होऊ शकतो की, या मार्गाने मिळणाऱ्या माहितीच्या विश्वासार्हतेसंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे. आजच्या माहितीच्या युगात तर हा प्रश्न आणखी जटिल होऊन बसतो. माहितीच्या खांद्यावरच विचार निर्माण होत असतात. त्यामुळे विचारांना नियंत्रित करायचे असेल, तर आधी माहिती नियंत्रित करावी लागते. त्यामुळे कोणी दिलेली माहिती प्रमाण मानायची, याची निश्चिती करावी लागते.
व्यक्तिगत स्तरावर माहितीची विश्वासार्हता ठरविण्याची वेगवेगळी सूत्रे आहेत. 'आप्त वाक्य प्रमाण' हे त्यातील प्रमुख सूत्र आहे. जी व्यक्ती आपणाला आपली वाटते, त्याचे म्हणणे प्रमाण मानणे असा त्याचा अर्थ. या आपलेपणाची अनेक कारणे असतात. आपल्या कुटुंबातील, आपल्या नात्यातील, आपल्या जातीतील, आपल्या धर्मातील, देशातील यासारख्या निसर्गनिर्मित कारणाव्यतिरिक्त अनुभवांच्या आधारे, विचारांच्या आधारे आपला वाटणे असे त्याचे वेगवेगळे अर्थ असू शकतात. आपण ज्या पवित्र ग्रंथांना किंवा महापुरुषांना मानतो, त्यातील शब्दांशी किंवा विवेचनाशी माहिती पडताळून पाहणे हा दुसरा मार्ग झाला. काही विषयांच्या संदर्भात आपली स्वत:ची एक विचारप्रणाली वा तर्कप्रणाली आपल्या अनुभवाच्या आधारे तयार झालेली असते. तिच्या आधारे त्या विशिष्ट विषयातील विश्वासार्हता तपासता येणे, हा तिसरा मार्ग झाला. अनेक वेळा आप्तजन, पूज्य असलेले ग़्रंथ वा महापुरुष यांचे विचार, आपले तयार झालेले मत यात विसंवाद असेल तर कोणाचे मत मानायचे? असाही प्रश्न निर्माण होतो. त्यातच जर माहिती नवी असेल आणि आपल्या आजवरच्या अनुभवाशी जुळणारी नसेल, तर त्यासंबंधीचा निर्णय कसा करायचा, हा आणखी जटिल प्रश्न उपस्थित होतो. आलेली प्रत्येक नवी माहिती तपासून पाहून वापरायची म्हटली, तर ते व्यावहारिकदृष्टया अशक्य आहे. त्यामुळे एखाद्या माहितीची विश्वासार्हता तपासण्याची कोणती ना कोणती वस्तुनिष्ठ पध्दत अस्तित्वात आहे का, ते तपासून पाहू.
*****
एखाद्या माहितीच्या वस्तुनिष्ठतेचे काही नियम असू शकतात का? याचा प्रथम विचार करू. वरवर पाहता स्वतंत्र वाटणाऱ्या घटनांमध्ये एखादे समान सूत्र अस्तित्वात आहे का? याचा शोध घेणे हा यातला पहिला ढोबळ नियम म्हणता येईल. वरून वस्तू खाली पडणे आणि अंतरिक्षातील ग्रहमालेतील ग्रहांनी एकमेकांशी संतुलन राखणे या दोन स्वतंत्र गोष्टी वाटतात, परंतु त्या एकाच गुरुत्वाकर्षणाच्या नियमांनी बांधलेल्या आहेत. विश्वाच्या रचनेतील नियमबध्दता शोधण्याच्या प्रयत्नातूनच विज्ञानाची प्रगती होत गेली. कारणांची समानता असेल, तर विशिष्ट नियमांच्या आधारे निश्चित परिणामांचे भाकित करता येऊ शकते, असा विश्वास वैज्ञानिक प्रगतीतून निर्माण झाला. परंतु असेच वस्तुनिष्ठ नियम मानवी वर्तणुकीला लागू शकतात का? असा प्रश्न उपस्थित झाला. विज्ञान केवळ जड जगताबद्दलचेच नियम शोधू शकते, या सिध्दान्ताला छेद देणाऱ्या अनेक घटना घडत गेल्या. आईनस्टाईनने वस्तुमान आणि ऊर्जा यांच्या परस्पर संबंधांचे गणिती सूत्र शोधून काढल्याने, जगातील ऊर्जा व जडतत्त्व परस्परांशी निगडित आहेत हे सिध्द झाले. त्यातच जनुकीय विज्ञानातील व मेंदूच्या प्रक्रियेचे संशोधन यातून मानवी शरीरातील जैवरासायनिक प्रक्रिया व माणसाचे विचार करणे, वागणे यावर नवा प्रकाश पडत आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे जगाच्या प्रारंभी निसर्गाबद्दलची जी गूढता होती, ती जशी नंतरच्या काळात कमी होत गेली, तसेच आगामी काळात विश्व आणि माणूस यांच्यातील परस्परसंबंध हे वैज्ञानिक नियमांच्या आधारे निःसंदिग्धरित्या गणिती पध्दतीने मांडता येतील असे ही शाखा मानते.
माणसाची उत्पत्ती, त्याची वर्तणूक आणि सामाजिक प्रक्रिया या नियमबध्द आहेत व त्या नियमान्वये या सर्वाचे भाकित करता येऊ शकते, असे सांगणारी त्रिमूर्ती म्हणजे डार्विन, फ्रॉईड आणि माक्र्स. इतर प्राण्यांच्या तुलनेत माणसाचा विकास कसा झाला हे सिध्द करता येऊ शकते, असे डार्विनचा सिध्दान्त सांगतो. जो परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो, जो जीवनसंघर्षाला यशस्वीपणे तोंड देऊ शकतो, तोच टिकतो; ज्याची उपयुक्तता संपली आहे, ते काळाच्या ओघात नष्ट होते. संपूर्ण जीवसृष्टीच्या, मानवी विकासाची, सामाजिक विकासाची प्रक्रिया या नियमांच्या आधारे स्पष्ट करता येऊ शकते, असे या विचारसरणीच्या समर्थकांचे मत आहे. मानवी मनाचे मूलभूत घटक आणि एखाद्या व्यक्तीला ज्या प्रसंगातून जावे लागते, याची सांगड घालून मानसशास्त्रीय चिकित्सेच्या आधारे एखाद्या व्यक्तीच्या वर्तणुकीचे नियम सांगता येऊ शकतात, असे फ़्रॉईडचे प्रतिपादन होते. संपूर्ण मानवी समाजाचे भूतकालीन व भविष्यकालीन घटनाक्रमाचे द्वंद्वात्मक जडवादाच्या आधारे विश्लेषण करता येऊ शकते, हे माक्र्सने स्पष्ट केले. एकूणच मानवी जीवनाचे व समाजनियमाचे स्पष्टीकरण जडवादी नियमांप्रमाणे करणे शक्य आहे असा माक्र्सचा व त्याच्या समर्थकांचा दावा आहे. मानवाचे ऐहिक हित केंद्रस्थानी ठेवून मानवी जीवनाचा व मानवी संबंधांचा विचार केला पाहिजे, असे ही विचारप्रणाली सांगते. इहवादाची ही आधारशिला आहे. या आधारावर विसाव्या शतकात अनेक तत्त्वज्ञाने निर्माण झाली आणि त्यांनी जगाच्या समाजकारणावर व राजकारणावर आपला प्रभाव निर्माण केला. आधुनिक लोकशाही, धर्मनिरपेक्षता, अभिव्यक्तिस्वातंत्र्यासहित व्यक्तिस्वातंत्र्याच्या विविध संकल्पना, कायद्याने प्रस्थापित झालेली समता, समाजवाद, साम्यवाद आदी अनेक संकल्पना इहवादातून निर्माण झालेल्या आहेत.
'व्यवहारातील अनुभवांची संगती लावून जे नियम तयार होतात तेच खरे वस्तुनिष्ठ नियम आहेत' असा या विचारप्रणालींचा दावा असतो. धर्म या संकल्पनेने पारलौकिक जगाची भीती दाखवून जे समाज नियम केले आहेत, ते माणसाच्या अवनतीला कारणीभूत ठरले आहेत असे ही विचारसरणी सांगते. पारलौकिक जगाचे आभासात्मक अस्तित्व सत्य आहे, असे भासवून त्या आधारे ज्या मानसिक संकल्पनात्मक प्रतिमा तयार केलेल्या आहेत, त्याच विद्यमान जगातील संघर्षाचे मूळ कारण आहेत. त्या प्रतिमांमुळे माणूस हा वास्तविक जगात न जगता एका आभासात्मक जगात जगत असतो. त्या आभासात्मक जगातच त्याचे शत्रू-मित्र संबंध तयार होतात. त्यामुळे पारलौकिकाधिष्ठित धार्मिक जगाच्या सर्व मानसिक प्रतिमा पुसून टाकून त्याला ऐहिक जीवनातील नियमांशी संवादी बनविणे हे आपले काम आहे असे त्यांना वाटते. पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या तत्त्वज्ञानाचा हा गाभा आहे. ज्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही, दुसऱ्याला देता येत नाही, ते सत्य नाही, ती सर्व अंधश्रध्दा आहे असे त्यांचे प्रतिपादन असते. धर्माच्या नावे विविध समाजात जो संघर्ष चालतो, त्याचे हेच कारण आहे असे ते म्हणतात. अनेक हिंदी चित्रपटात एकाच आईच्या मुलांची एकमेकापासून ताटातूट होते व ती वेगवेगळया धर्मांतील लोकापाशी जातात व एकमेकांशी लढत राहतात असे दाखविले जाते. 'आपण जो धर्म म्हणून स्वीकारलेला असतो, तो जन्माचा अपघात म्हणून आपणाला मिळालेला असतो व नंतर त्या धर्माच्या चश्म्यातूनच आपण जगाकडे शहायला शिकतो. त्यातूनच आपले शत्रू-मित्र भाव तयार होतात. तो चश्मा काढल्याशिवाय जगाचे सत्य स्वरूप आपल्या ध्यानात येत नाही. आपल्या धर्माचे कर्मकांड आपल्याला पुण्यकारक वाटते, पण अन्य धर्मीयांचे मात्र त्रासदायक वाटते. वास्तविक ही दोन्हीही तेवढीच अर्थशून्य असतात. याचाच दुसरा भाग म्हणून भुते-खेते, देवाचे अंगात येणे, चमत्कार आदींवर विश्वास ठेवण्याची मानसिकता तयार होते व यातून फसवणुकीची साधने तयार होतात. त्यामुळे ज्याचे प्रत्यक्ष प्रमाण नाही त्यावर विश्वास ठेवायचा नाही हा विचार लोकमनावर बिंबविणे आवश्यक असते' असे त्याचे प्रतिपादन असते.
*****
याउलट ईश्वरवादी विचारसरणीची भूमिका आहे.
'मानवी जीवनाच्या अस्तित्वाच्या कितीतरी आधीपासून हे जग अस्तित्वात आले आहे व आपल्यानंतरही ते अनंत काळ अस्तित्वात राहणार आहे. त्यातील अत्यंत अल्प भाग मानवी बुध्दीच्या कक्षेत आलेला असताना, त्या आधारे आपणाला जणू काही सर्व ज्ञात झाले आहे, अशा आविर्भावात जे वागत आहेत त्यांचा हा उथळपणा आहे' असे मानणारा एक विचारप्रवाह आहे. 'कोणतीही गोष्ट जर कारणाविना घडत नसेल, तर या जगाच्या निर्मितीलाही काही कारण असले पाहिजे व ज्याने हे जग निर्माण केले केवळ त्यालाच ते ज्ञात असले पाहिजे. जे लोक आपणाला जग समजल्याचा दावा करतात, त्यांचे जगातील कोणत्याही घटकावर नियंत्रण नाही. जगाचे नेमके कसे भले होईल यावर दहा जणांची पन्नास मते आहेत. यापैकी कोणते मत ग्राह्य धरणार? माणूस ही या निर्मात्याची खास निर्मिती आहे व म्हणूच माणसाला आपल्या निर्मात्याची जाणीव आहे, जी इतर प्राण्यांना नाही. त्यामुळे माणसाने आपली प्रत्येक कृती ही त्या निर्मात्याला अपेक्षित असेल तशीच केली पाहिजे. पण निर्मात्याच्या मनात नेमके काय आहे याची कल्पना सर्वसामान्य व्यक्तींना नसते. परंतु त्याचीही काळजी ईश्वराला असल्याने ईश्वराच्या मनात नेमके काय आहे? हे सांगण्यासाठी तो काही दूतांना पाठवितो. त्यांच्या सांगण्यानुसार वागण्यातच माणसाचे हित आहे. त्यांचा शब्द प्रमाण मानूनच आपण आपले जीवन व्यतीत केले पाहिजे. जी शिकवण त्यांच्या शिकवण्याशी विसंगत असेल, तिचा त्याग केला पाहिजे. परमेश्वराच्या इच्छेनुसार जे वागतात त्यांना त्याचे फळ नक्कीच मिळते. परंतु ते मरणोत्तर असते. जे ईश्वराच्या इच्छेनुसार वागण्याचे पुण्यकर्म करतात, ते स्वर्गात जातात. जे त्याच्या इच्छेचा अनादर करतात ते नरकात जातात' हा ईश्वरवादी विचारप्रवाहाचा दुसरा सिध्दान्त आहे. 'आपणाला खऱ्या धर्माचे आकलन झालेले असल्याने ज्यांना ते आकलन झालेले नाही अशांना ते आकलन करून देणे ही आपली जबाबदारी आहे व ते करण्यात मोठे पुण्य आहे' असा त्यांचा तिसरा सिध्दान्त असतो.
जे आपल्या धर्माला मान्य नाही, असा कोणताही विचार आपल्या अनुयायांच्या कानापर्यंत - निदान मनापर्यंत पोहोचू नये असा धार्मिक नेत्यांचा प्रयत्न असतो. त्यांची सर्व भाषणे, प्रवचने यांचा एकमेव उद्देश असतो, तो म्हणजे आपल्या धर्माची शिकवण हीच एकमेव सत्य असून बाकी सर्व गोष्टी या भ्रामक व पापाच्या वाटेकडे नेणाऱ्या आहेत. या धार्मिक तत्त्वज्ञानाच्या भोवती विविध कथांची, प्रसंगांची अशी गुंफण करण्यात येते की त्याच्या मनावर त्या व्यतिरिक्त अन्य कोणती प्रतिमा उमटूच नये. त्याच्या विचारांच्या विपरीत अनुभव आले तर तो ते अनुभवच नाकारतो. ते अनुभव भ्रामक आहेत अशी तो आपली समजूत करून घेतो. जगाला सुधारण्याची आपल्यावर जबाबदारी आहे असे त्याच्यावर सातत्याने बिंबवले गेले असल्याने तो स्वत:ला नैतिकदृष्टया उच्च स्थानावर नेऊन ठेवतो. आपला धर्म वाढविण्याचे काम हे पुण्यकर्म असून त्याकरिता कोणतीही गोष्ट करावी लागली तरी त्यात पाप नसते, ते पुण्यकर्मच असते अशी त्याच्या मनाची धारणा झालेली असते. वर्तमानाकडे किंवा भविष्याकडे मोकळया मनाने पाहण्याची त्याची क्षमताच नसते. त्याच्या विचारात गुंतागुंत नसते, त्याचा जीवनाचा मार्ग सरळ रेषेतून जातो. बरोबर काय व चूक काय याचे त्याचे निकष ठरलेले असतात. पूर्वीच्या काळी हिंदू धर्मात सतीची अमानुष प्रथा होती. परंतु सती जाणे हे धार्मिक पुण्य आहे अशी श्रध्दा असली की सती जाण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलतो. सती जाणारी स्त्री न जाण्यासाठी आरडाओरडा करीत असली, तरी तिला चितेत ढकलणे अमानुष वाटण्याऐवजी भोवतालच्या माणसांना पुण्यप्रद वाटते. आजही शरियतची प्रथा असलेल्या देशात स्त्रीवर व्यभिचाराचा आरोप झाला की तिला दगडाने ठेचून ठार मारणे हे पुण्यप्रद मानले जाते. जो आपल्या धर्माचा नाही त्याचे आपल्या धर्मात परिवर्तन करून घेणे हे आपले कर्तव्य आहे असे इस्लाम सांगतो. जो आपल्या धर्माचा नाही, त्याला जगण्याचा अधिकारच नाही अशी जिहादींची भूमिका यातूनच तयार होते. यात आपण काही चुकतो आहोत असे नैतिक प्रश्नही त्यांना पडत नाहीत.
अनुभवप्रामाण्यवादी विचारधारेच्या बरोबर उलटा त्याचा प्रवास असतो. अनुभवांना प्रमाण मानणारी विचारधारा येणाऱ्या अनुभवानुसार बदलत जाणारी असते, तर ईश्वराधिष्ठित विचारधारा एकतर आपल्या श्रध्देच्या चौकटीत अनुभवांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करते किंवा ज्यांचा तसा अर्थ लावता येत नाही, ते अनुभव सरळ सरळ नाकारते. श्रध्दायुक्त मन स्वत:चेच असे विश्व तयार करते व त्या विश्वाला जोवर धक्का लागत नाही, तोवर त्याला अन्य जगाची फिकीर नसते.
******
'अंत:प्रेरणा' ही मानवी आकलनाची वेगळी शक्ती आहे. माणूस जसे बाह्य अनुभवाच्या आधारे ज्ञान प्राप्त करतो, तसेच तो अंत:प्रेरणेद्वारे ते ग्रहण करतो. मात्र ही प्रक्रिया निराळी असते. अनुभवनिष्ठ ज्ञानप्राप्तीचे अनेक टप्पे असतात व त्यात मर्यादाही येतात. 'प्रथम निरीक्षण करणे, त्यानंतर त्या निरीक्षणातून जी माहिती मिळेल तिचे शास्त्रीय वर्गवारीनुसार संकलन करणे, यापूर्वी अशाच प्रकारे मिळालेल्या माहितीबरोबर त्याची तुलना करणे, त्या आधारे आपले नवे प्रमेय निर्माण करणे, आणखी वेगवेगळया प्रकारचे प्रयोग करून या प्रमेयात अधिक स्पष्टता आणणे' ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहाते. यातील सर्व माहिती वस्तुनिष्ठ असल्याने कोणत्याही प्रयोगाच्या ज्या विशिष्ट अटी असतात, त्या पाळून त्या प्रयोगाची प्रचिती घेऊ शकतो. अंत:प्रेरणेबाबत मात्र असे काही घडत नाही. ज्याची अंत:प्रेरणा असते, त्याच्या आत नेमकी कोणती प्रक़ि्रया घडते ते बाहेरच्या व्यक्तींना समजत नाही. अनेक वेळा त्या व्यक्तीलाही ते उमजत नाही. त्यामुळे अंत:प्रेरणेतून जी ज्ञानप्राप्ती होते, त्याच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह उभे केले जाते. जगातील प्रत्येक धर्मतत्त्व हे अंत:प्रेरणेतून आलेले असते. आपलेच धर्मतत्त्व बरोबर असे प्रत्येक धर्माचा अभिमानी सांगत असतो. यातील अनेक धर्मतत्त्वे एकमेकाशी विसंगत असतात. यापैकी कोणते तत्त्व बरोबर व कोणते चूक हे ठरवायला कोणतीही वस्तुनिष्ठ कसोटी उपलब्ध नसते. अंत:प्रेरणेची तार्किक चिकित्सा करता येत नाही. याउलट अनुभवाधिष्ठित शास्त्रीय विचारप्रणालीत प्रत्येक मुद्दयांची तर्कशुध्द मांडणी केलेली असते व त्यात कोणत्या परिस्थितीत कोणत्या अटीवर कोणती गोष्ट केली तर कोणते परिणाम होतील, याची मांडणी केली जाते. या मांडणीची चिकित्सा करून त्यातील तथ्यांची तपासणी करता येते.
असे असले, तरी अंत:प्रेरणेचे क्षेत्र खूपच व्यापक आहे. कला आणि साहित्य यांची निर्मिती अंत:प्रेरणेतूनच होते. त्यामुळेच ही निर्मिती भावविश्वाला जाऊन भिडते. अशा अभिजात कलाकृती समूहमनाचा अविभाज्य भाग बनतात व त्या भावविश्वाच्या झरोक्यातून समाजघटक आपल्या अनुभवांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. हिंदूंच्या मनावर असलेला रामायण-महाभारत या साहित्यकृतींचा प्रभाव सर्व जीवनाला स्पर्श करून जाणारा आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही अंत:प्रेरणेचे महत्त्व निर्विवाद आहे. वेद-उपनिषदांपासून अनेक तत्त्वज्ञानांचा उदय हा अंत:प्रेरणेत आहे. आंतरिक अनुभूतीतून तो आला आहे. योगापासून अध्यात्माच्या अनेक शाखा अंत:प्रेरणेच्या अनुभूतीतूनच विकसित झाल्या आहेत. वस्तुत: आधुनिक विज्ञानाच्या सर्व शाखा या अनुभवप्रामाण्यावरच उभ्या राहिलेल्या असल्या, तरी या शाखांच्या विकासातही अंत:प्रेरणेचा मोठा वाटा आहे. अनुभवप्रामाण्याची वैचारिक बैठक निर्माण करण्यात ग्रीक तत्त्वज्ञानांचा सिंहाचा वाटा असला, तरी त्या आधारे जी आजच्या वैज्ञानिक शोधांची चौकट निर्माण झाली आहे ती तयार करण्यात रेने देकार्त याने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. 'I Think Therefore I am' - 'माझी विचारशक्ती हेच माझ्या अस्तित्वाचे कारण आहे' या त्याच्या सुप्रसिध्द वाक्याने जगाकडे पाहण्याचा विचारवंतांचा दृष्टीकोन बदलून गेला. आपल्या अनुभवांची गणिती पध्दतीने मांडणी करून, त्याचा अर्थ लावता येऊ शकतो असा त्याचा सिध्दान्त आहे. या सिध्दान्ताचा त्याला साक्षात्कार झाला व ज्या दिवशी तो साक्षात्कार झाला, तो दिवसही त्याने नोंदवून ठेवला आहे. ज्यांच्या सिध्दान्ताने विज्ञान नव्या टप्प्यात गेले, त्या आईनस्टाईन यांनाही त्यांची समीकरणे 'दिसत'. भारतीय गणितज्ञ रामानुजन यांनी अनेक जटिल कूटप्रश्नांची उत्तरे शोधून काढली. औपचारिक शिक्षण झालेले नसताना हे कसे जमते? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणत, ''देवी माझ्या स्वप्नात येऊन उत्तरे देते.'' वैज्ञानिक क्षेत्रातही अनुभवप्रामाण्याप्रमाणेच अंत:प्रेरणेने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.
हिंदू संस्कृतीवर अंत:प्रेरणेतून निर्माण झालेल्या विचारांचा प्रभाव आहे. किंबहुना असा विचारप्रवाह हे या संस्कृतीचे वैशिष्टय म्हटले पाहिजे.
बहुतेक वेळा ईश्वरकेंद्री विचारधारा व अंत:प्रेरणेवर आधारित हिंदू सांस्कृतिक विचारधारा या सारख्याच समजल्या जातात. परंतु, त्यात मूलभूत अंतर आहे. ईश्वरकेंद्री विचारधारांतील ग्रंथ आणि शब्दप्रामाण्य जरी प्रेषितांच्या अंत:प्रेरणेतून निर्माण झालेले असले, तरी ते शब्द ईश्वराचे म्हणून पवित्र, सर्वंकष व सर्वांसाठी सक्तीचे मानले जातात. मात्र हिंदू संस्कृतीतील अंत:प्रेरणेतून निर्माण झालेले विचार हे त्या व्यक्तीने सत्याप्रती टाकलेला प्रकाशझोत अशा प्रकारचे मानले जातात. तो सत्याचा एक अंश असतो. त्यात सर्वंकषतेचा आग़्रह नसतो.
*****
या तिन्ही विचारधारांचे एकमेकांविषयी मूलभूत आक्षेप आहेत. अनुभवप्रामाण्य मानणारी विचारधारा ही स्वत:ला वस्तुनिष्ठ व शास्त्रीय मानते. त्यातील ज्ञान हे प्रयोगसिध्द असल्याने ते कोणीही त्या अटींचे पालन केल्यास तसाच अनुभव घेऊ शकतो. त्यामुळे या ज्ञानाचे प्रमाणीकरण करून ते जगात कुठेही वापरता येऊ शकते. या ज्ञानातील प्रगतीमुळेच सजीवांचे पुनरुत्पादन यासारख्या आजवर ईश्वराच्या अधीन मानल्या गेलेल्या क्षेत्रातही मानवी बुध्दीने प्रवेश केला आहे. आगामी काही वर्षांतच सजीव आणि निर्जीव यांच्यातील सीमारेषा पुसल्या जाण्याच्या शक्यता स्पष्ट होत जातील. आजवरच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे अनेक धर्मग्रंथातील सिध्दान्त, कथा, प्रथा व परंपरा चुकीच्या आहेत, असे सिध्द झाले आहे. 'अंत:प्रेरणेतून मिळालेल्या ज्ञानाची सत्यासत्यता तपासण्याची कोणतीही वस्तुनिष्ठ चाचणी नसल्याने ते जोवर प्रयोग सिध्द होत नाही, तोवर फारतर त्याला एका व्यक्तीचे अनुमान असा दर्जा देता येईल, पूर्ण ज्ञानाचा देता येणार नाही' एवढेच फारतर अनुभवप्रामाण्य मानणारे लोक मान्य करतील. ''व्यक्ती एकच असली तरी ती अंत:प्रेरणेतून विसंवादी बोलू शकते, तेव्हा त्यातील कोणते विधान सत्य मानायचे?'' असा प्रश्न ते विचारतात. अंत:प्रेरणेतून आलेले ज्ञान एखाद्या तार्किक साखळीतून येत नाही. 'मेंदूसकट शरीरातील सर्व रचनेचा जो विद्युत-जैव-रासायनिक अभ्यास सुरू आहे, त्यातून उद्या कदाचित अंत:प्रेरणेचे शास्त्रीय विश्लेषण करता येईलही. पण तोही वैज्ञानिक विचारधारेचाच विजय असेल. अंत:प्रेरणेतून निर्माण झालेल्या कलेला व साहित्याला त्या व्यक्तीने केलेल्या जीवनभाष्याचा दर्जा देता येईल, पण त्या वस्तुनिष्ठ सत्यज्ञानाचा दर्जा देता येणार नाही' असा त्यांचा दावा असतो.
ईश्वराधिष्ठित विचारधारा अन्य विचारधारांना सैतानी मानते. 'वैज्ञानिक विचारधारा ही स्वत:ला कितीही सत्य व वस्तुनिष्ठ समजत असली, तरी तिला ईश्वरी जगतातील केवळ काही अंशाचे ज्ञान झाले आहे, तेसुध्दा वरवरचे आहे. या जगाच्या निर्मितीमागचा जो ईश्वराचा हेतू आहे, तो कधीही विज्ञानातून समजणार नाही. त्याकरिता प्रेषितांचा शब्दच प्रमाण मानला पाहिजे. स्वत:ला विज्ञानवादी समजणारी विचारधारा ही नास्तिक आहे व त्यामुळे ती ऐहिक सुखलोलुपतेची लाच दाखवून माणसाला सैतानी जगाकडे नेते. केवळ प्रेषितांची अंत:प्रेरणाच प्रमाण मानली पाहिजे. कारण ईश्वराला पराभूत करण्यासाठी सैतानही मानवी मनाचा ताबा घेतो. त्यामुळे पवित्र धर्मग्रंथातील वचनांशी विसंगत असणारी वचने ही सैतानाची वचने आहेत. त्यामुळे आपल्या प्रेषिताद्वारे ईश्वराने जे ज्ञान आपल्याकडे पाठविले आहे, तेच सत्य मानून त्याचा प्रचार केला पाहिजे व अन्य ज्ञान हे सैतानाकडे नेणारे असल्यामुळे ते नष्ट केले पाहिजे' असा प्रचार या विचारधारेचे लोक करत असतात.
शास्त्रीय ज्ञान हे सत्याच्या जवळपास जात असले, तरी ते पूर्ण सत्याचा दर्जा घेऊ शकत नाही, असे हिंदू संस्कृतीचे समर्थक मानतात. त्याच्या मते, 'एकतर शास्त्रीय ज्ञानाची कक्षा ही इंद्रिये, मन व बुध्दी यांच्यापर्यंतच मर्यादित आहे. याद्वारा बाह्य अनुभव घेता येतो व अभ्यासता येतो. आत्मा हा मानवाला चैतन्यतत्त्वाशी जोडणारा घटक आहे, त्याचा आपणाला अनुभवही येत असतो, परंतु त्याचे अस्तित्व प्रयोगशाळेत सिध्द करता येत नसल्याने शास्त्रीय विचारधारा त्याची दखल घेत नाही. आत्म्याचे भान हे केवळ माणसालाच असल्याने ते त्याचे वेगळेपण आहे. शास्त्र केवळ जड वस्तूंच्या नियमांपर्यंत मर्यादित असते, तिथपर्यंतच त्याच्या सत्याची सीमा आहे. मन हे बुध्दी व इंद्रिय यांचे अधिष्ठान आहे. ते चंचल आहे. त्यामुळे ते जोवर स्थिर होत नाही, तोवर इंद्रियजन्य ज्ञान व त्यावर आधारलेले बुध्दीचे निर्णय हे चंचलच राहतील. त्यांना सत्य स्वरूपाचे कधीच आकलन होणार नाही. केवळ आत्म्यालाच जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातील परस्पर संबंधाची जाणीव असते. त्यामुळे मनाला जेव्हा आत्म्याचे अधिष्ठान लाभेल, तेव्हाच मन हे इंद्रिये व बुध्दी यांच्यासोबत योग्य निर्णय घेऊ शकेल. मनाला आत्म्याचे अधिष्ठान कसे द्यायचे, हे स्वतंत्र अभ्यासाचे क्षेत्र आहे. आत्म्याच्या अस्तित्वाचे भान यायला अंत:प्रेरणेचा विकास व्हावा लागतो. ते केवळ बाह्य अनुभवांचे प्रामाण्य मानून येणारे भान नाही. सामाजिक संकेत, नीतिमत्ता हे विषय आंतरिक अनुभवाच्या कक्षेत येतात. तिथे अजून विज्ञान पोहोचू शकलेले नाही. अंत:प्रेरणेने जशी आंतरिक जाणीव विस्तारत जाते, तसे आत्मा सर्वव्यापी, सर्वसाक्षी असल्याने त्याच्या आकलनाचे क्षेत्रही व्यापक होत जाते. त्यामुळे ॠग्वेद, उपनिषद यांच्यापासून बौध्द, जैन यांच्यापर्यंत विविध प्रकारची शेकडो तत्त्वज्ञाने तयार झाली. असे असले, तरीही आत्मा सर्वव्यापी असला तरी तो ज्या व्यक्तीशी संबंधित आहे, त्या व्यक्तीच्या त्रिगुणांनी तो मर्यादित झाल्याने त्याच्या आकलनाला मर्यादा पडतात. त्यामुळे मला पूर्ण ज्ञानाचा साक्षात्कार झालेला आहे असे कोणताही एक प्रेषित किंवा अवतार म्हणू शकत नाही.' त्यामुळे अनुभवप्रामाण्यवादी व ईश्वरनिष्ठ विचारधारांना झालेले जगाचे आकलन मर्यादित असते. ते सर्वंकष नसते, असा त्यांचा दावा असतो.
*****
परंतु, अशा तीन विचारप्रवाहांच्या तीन आकलन पध्दती आहेत. आपलीच पध्दत बरोबर आहे असा तिघांचाही आग्रह असल्यामुळे आपल्याच पध्दतीतून सत्य समजून घेतले पाहिजे, यासाठी ते प्रयत्नशील असतात. आजच्या सांस्कृतिक संघर्षाचे स्वरूप हे असे आहे. मन व बुध्दी हे त्यांचे रणांगण आहे
मेंदूवर जे संशोधन सुरू आहे, त्याचा निष्कर्ष असा आहे की या तिन्ही विचारपध्दतींचा उगम मेंदूच्या वेगवेगळया भागांत आहे. डावा मेंदू तार्किकदृष्टया विचार करणारा आहे, तर उजवा मेंदू हा मनुष्याच्या अतींद्रिय शक्तींची जाणीव करून देणारा आहे. प्राणिज मेंदू मानवी मेंदूत उत्क्रांत होत असताना जी प्रक्रिया घडली, त्यातून ईश्वरनिष्ठ विचारांची प्रक्रिया घडली. प्रारंभी ती निसर्गाबद्दलच्या भीतीतून होती, नंतर गूढतेतून विकसित झाली व जसजशी मानवी संस्कृती उत्क्रांत होत गेली, तसतशी ती विचारांची प्रक्रिया अधिक प्रगल्भ झाली व ईश्वरी भावनेला वेगवेगळे पैलू निर्माण झाले. यामुळेच काही अपवाद वगळता सर्वसामान्य व्यक्तींच्या मनात या तीनही विचारधारांचे अंश सापडतात. त्यांचे व्यक्तिगणिक प्रमाण वेगळे असते. परंतु यातील एकच कोणतातरी मार्ग खरा आहे असा प्रचार चालत असल्याने व्यक्ती अशा प्रचारांच्या प्रभावाखाली येतात व त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असंतुलन निर्माण होते. आपले व्यक्तिमत्त्व संतुलित ठेवायचे असेल, तर या तिन्ही विचारप्रवाहांची ओळख असणे आवश्यक आहे. तशी झाली, तरच बाह्य जगताचा जसा सुसंगत अर्थ लावता येईल, तसाच आंतरिक सुसंवादही साधता येईल.
kdilip54@gmail.com