Enter your Email Address to subscribe to our newsletters
***श्रुतिका जावळे****
आजच्या काळातील तरूणाईला सगळयात जवळचे वाटणारे क्षेत्र म्हणजे ते प्रसिध्दी माध्यम. या क्षेत्राला असलेले ग्लॅमर भुरळ घालणारे असते. सिनेमा, नाटक, मालिका, वृत्तवाहिन्या, रेडिओ असे बरेच पर्याय आज उपलब्ध आहेत. प्रसिध्दी माध्यमात मिळत जाणारा पैसा आणि थोडीफार का होईना मिळत जाणारी प्रसिध्दी त्यांना पुरेशी असते. पण याही पलीकडे केवळ आपली जिद्द आणि आपले काम याच्या जोरावर या क्षेत्रात तग धरून ठेवणारे लोक हाताच्या बोटावर मोजण्याएवढे आहे. 'स्ट्रगल' या शब्दाला ब्रीदवाक्य मानून सतत आपल्या करियरला दिशा मिळेल की नाही या आशेवर जगणारा आजचा युवा वर्ग आहे. प्रसिध्दीच्या शिखरावर असूनदेखील जमिनीवर पाय असणाऱ्या अशाच एका तरुणाची ही कहाणी.
स्टार स्पोर्ट्स प्रो....कबड्डी... ले पंगा आठवतेय का? या स्पधर्ेने संपूर्ण देशाला कबड्डीच्या प्रेमात पाडले. त्यातील सामन्यात रंजकता आली ती खेळातल्या चित्तथरारक क्षणांमुळे, जिगरबाज खेळाडूंमुळे आणि सामन्यांच्या उत्तम सूत्रसंचालनामुळे. याच प्रो कबड्डीमधल्या सूत्रसंचालकांमध्ये एक मराठी आवाजदेखील होता. उत्तम सूत्रसंचालन, स्पष्ट शब्दोच्चारण आणि हटक्या शैलीने खेळ पाहण्यातल्या प्रेक्षकांचा 'रस' वाढवणारा आवाज होता, मराठमोळया सचिन कुंभारचा...
शाळेत असताना थोडासा बावरलेला, कधीही कोणाशी जास्त न बोलणारा, आपल्या सावळया रंगामुळे लोकांपासून थोडा दुरावलेला, कोणत्याही स्पर्धेत सहभागी न होणारा असा सचिन होता. आज मात्र त्याची ओळख आहे ती...सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून येऊनही, मुंबईसारख्या स्वप्ननगरीत आपल्या स्वप्नांना पंख देऊन थेट दुबईच्या रेडिओ केंद्रापर्यंत आपला आवाज पोहोचवणारा तरुण अशी. त्याच्या वैशिष्टयपूर्ण आवाजाने हिंदी आणि इंग्लिश मनोरंजन क्षेत्राला त्याची दखल घ्यायला लावली. 2002पासून दुबईच्या रेडिओ स्टेशनवर तब्बल आठ वर्षे सचिन आपल्या जादूभऱ्या आवाजाने लोकांचे मनोरंजन करत होता. मात्र हा प्रवास इथवरच थांबणारा नव्हता. सूत्रसंचालक, अभिनेता, रेडिओवरील वृत्तनिवेदक, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि बरेच काही या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वात दडले होते, त्याची ही कहाणी...
सचिन मूळचा कोल्हापूरचा, तिथून जवळ असलेल्या अतिग्रे गावचा. पण मुंबईत वाढलेला. आवाजातील रांगडेपणा ही त्या मातीची देणगी असावी. आपल्या आवाजाविषयी तो म्हणाला, ''मला आवाजाची देणगी वडिलांकडून मिळाली. वडील पोलीस खात्यात असल्याने त्यांच्या आवाजातील जरब, आवाजातली धार याचे संस्कार होत गेले. कॉलेजमध्ये असताना मित्रमैत्रिणी सांगायचे की तुझा आवाज चांगला आहे. पण या आवाजाच्या जोरावर करियर होईल असं कधी वाटलं नव्हतं. मी मुंबईच्या विवेकानंद केटरिंग कॉलेजमध्ये बेकरी या विषयाचं शिक्षण घेत होतो. कॉलेजमध्ये असतानाच एका स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत मी विजेता जरी नसलो, तरी ती स्पर्धा माझ्या करियरला एक वेगळं वळण देऊन गेली. कारण त्या स्पर्धेतील एका परीक्षकाने मला सांगितलं होतं की 'तुझा आवाज चांगला आहे, त्याचं काहीतरी कर.' त्या वेळी मला जाणीव झाली की या आवाजाच्या माध्यमातून मी नक्की काहीतरी करू शकतो आणि त्याच दिवशी एंटरटेनमेंट क्षेत्रात यायचं ठरवलं.''
केटरिंग कॉलेज, त्यानंतर चॉकलेट फॅक्टरीतील इंटर्नशिप या दिशेने प्रवास सुरू झालेल्या करियरला रामराम करून सचिनने मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचार केला. 2001 साली कोल्हापूरमध्येच त्याला पहिल्यांदा सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. किती आनंदाची गोष्ट आहे, ज्या मातीत त्याचा जन्म झाला, त्या मातीतूनच त्याच्या करियरला सुरुवात झाली. तेथे मिळालेला प्रतिसाद आणि प्रोत्साहन यामुळे सचिनच्या सूत्रसंचालनाच्या कारकिर्दीला उत्साहवर्धक सुरुवात झाली. या यशाने त्याचा आत्मविश्वास वाढला. कोल्हापूरपासून सुरू झालेला हा प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरांवर यशस्वीपणे सुरू आहे. आयुष्य बदलणाऱ्या प्रवासाबद्दल बोलताना सचिन म्हणाला, ''आवाजाच्या बळावर करिअर करायची तर आवाजाला योग्य प्रशिक्षण द्यायला हवं हे लक्षात आलं. त्यासाठी बोरिवलीच्या राव सरांकडून व्हॉइस कल्चरचे धडे घेतले. साधारण चार ते पाच महिन्यांत मी आरजेचा कोर्स केला. त्याच दरम्यान मुंबईमध्ये दुबईतील एका नवीन रेडिओ केंद्रासाठी आरजेच्या ऑडिशन सुरू होत्या. माझा आवाज चांगला होता पण मला कोणताही अनुभव नव्हता. तेथे आलेले सगळेच बऱ्यापैकी अनुभवी होते. त्यामुळे मला स्वत:बद्दलच विश्वास वाटत नव्हता. पण चक्क पहिल्या फेरीसाठी माझी निवड झाली. 2001 सालच्या दिवाळीची ही गोष्ट असेल, मी घरी सांगितले की मला दुबईच्या एका रेडिओ स्टेशनची ऑफर आली आहे. घरच्यांचा विरोध नव्हताच. ऑफर आल्यानंतर सात दिवसांत त्यांनी मला दुबईला बोलावलं. एकाच वर्षात मी दादर ते दुबई असा प्रवास करेन, याची मी कल्पनादेखील केली नव्हती. कामाला सुरुवात झाल्यावर लक्षात येत होतं की आपल्याकडे फक्त आवाजच आहे. पण आरजे म्हणून काम करत असताना आवाजाव्यतिरिक्त लागणारं कौशल्य माझ्याकडे नव्हतं. खऱ्या अर्थाने माझ्यासाठी तो स्ट्रगलिंग पीरियड होता. पण त्यानेच मला खूप काही शिकवलं. रेडिओ स्टेशनवर काम करत असताना तुम्हांला तुमच्या बोलण्यात चढ-उतार असावे लागतात. आरजे म्हणून जेव्हा तुम्ही लोकांचे मनोरंजन करत असता, त्या वेळेस प्रसंगाला अनुसरून तुम्हांला लोकांशी संवाद साधावा लागतो, बोलण्याच्या शैलीकडे लक्ष द्यावं लागतं. या क्षेत्रात तुम्हांला वाचिक अभिनयातून लोकांचं मनोरंजन करायचं असतं.''
हे काम फारच जिकिरीचे आहे. व्हॉइस ऍक्टिंग म्हणजेच वाचिक अभिनय असला, तरी त्याचबरोबर विविध भाषांवर प्रभुत्व लागते आणि दुसरे म्हणजे प्रसंगावधान. भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी सचिनला दुबईमधील त्याच्या विविध भाषिक मित्रांची खूप मदत झाली. ''माझे तिथले काही सहकारी हे दिल्ली, लखनौ, पाकिस्तान या भागातील असल्यामुळे माझी हिंदी सुधारली आणि दुबईतील परदेशी नागरिकांसोबत बोलून इंग्लिशही सुधारलं. आरजेसोबतच मग मी रेडिओ स्टेशनमध्ये हिंदी वृत्तनिवेदकाचं कामदेखील केलं.''
आठ वर्षे दुबईतील लोकांचे मनोरंजन केल्यानंतर सचिनची घरवापसी झाली. करिअरला फक्त 'रेडिओ जॉकी' अशा चौकटीत न ठेवता त्याने आपला मोहरा जाहीर कार्यक्रमातल्या सूत्रसंचालनाकडे वळवला.
दमदार आवाजाला आकर्षक व्यक्तिमत्त्वाची जोड मिळाल्याने त्याने आजवर बरेच ऍवॉर्ड शो, कॉलेज फेस्ट, इंटरनॅशनल आणि नॅशनल एंटरटेनमेंट कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. तसेच हिंदी आणि मराठीतील जाहिरातींचे व्हॉइस ओव्हर, बिग बॉस शोचे ऑन एअर प्रमोशन, त्याचप्रमाणे कलर्स, व्हीएक्स, झी इंटरनॅशनल आणि एंटरटेनमेंट वाहिन्यांच्या ऑन एअर प्रमोशनच्या मागे हा कोल्हापुरी आवाज आहे. स्टार प्रो कबड्डी, इंडियन हॉकी लीग, फेमिना मिस इंडिया, चॅनेल व्ही फेस्ट, ट्रॅव्हल एक्स पीचा ट्रॅव्हल शो अशा बहुचर्चित कार्यक्रमांत हा मराठी आवाज गाजला आहे. नुसता आवाजच नाही, तर आपल्या प्रसन्न सूत्रसंचालनाने त्यांनी या कार्यक्रमांना चार चाँद लावले आहेत. अस्खलित इंग्लिश एखाद्या गोऱ्या साहेबालाही लाजवेल असे, अन्य भाषांवर असलेले प्रभुत्व, स्पर्धकांशी संवाद साधण्याची हातोटी या हटक्या स्टाईलने सचिनने अनेक ऍवार्ड शोमध्ये लोकांची मने जिंकली आहेत.
प्रत्येक कार्यक्रमाचा एक विशिष्ट प्रेक्षक आणि स्पर्धक वर्ग असतो. त्याची वयोमर्यादा, प्रेक्षकवर्ग आणि कार्यक्रमाची परिभाषा वेगळी असते. उदा. ब्युटी शो, कॉलेजचे टॅलेंट हंट शो, लहान मुलांचे कार्यक्रम या विविध विषयांच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करत असताना त्या त्या विषयानुसार शैली बदलावी लागते. मंचावर असलेला सचिनचा वावर, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी त्याची लकब यामुळे प्रत्येक कार्यक्रमावर आपली छाप उमटवली आहे. याच खासियतीमुळे सचिन हा मुंबईतील प्रसिध्द सूत्रसंचालकांपैकी एक आहे. पण याला एवढे कसे जमते बुवा? त्याविषयी सांगताना तो म्हणतो की ''एकदा सूत्रसंचालन करत असताना एका परिक्षकाने मला विचारलं की तू इतक्या पटकन कसं उत्तर देतोस? त्या वेळेस माझं उत्तर हेच होतं की मी अनुभव हेच माझ्या हजरजबाबीपणाचं रहस्य आहे. आजही तेच उत्तर आहे. लाईव्ह शोचं सूत्रसंचालन करण्यासाठी तुम्हांला हजरजबाबी व्हावंच लागतं. कार्यक्रम जर लहान मुलांसाठी असेल, तर त्यांच्या वयाला अनुसरून भाषा वापरावी लागते. एखादा टॅलेंट शो असेल तर त्या पध्दतीने बोलावं लागतं. आणि इतक्या वर्षांमध्ये बऱ्याच कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करून आता हजरजबाबीपणा माझ्यात चांगलाच मुरला आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व वयातल्या लोकांकडूनही बरंच काही शिकायला मिळतं. ते शिक्षण सतत चालूच असतं.''
मंचावर सूत्रसंचालन करत असताना किंवा त्याचा सराव असताना पडद्यामागे बऱ्याच गोष्टी सुरू असतात. आपल्या आजूबाजूला जे काही सुरू आहे, त्याचे निरीक्षण करून त्यातूनही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत असतात. आज यशाच्या शिखरावर असूनदेखील सचिनचे पाय जमिनीवर आहेत. Let my work speak या ओळीला आपली टॅगलाईन मानून सचिनने आपल्या क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती केली आहे. अशा परिस्थितीत आपल्या डोक्यात प्रसिध्दीची हवा न जाऊ देणे हेच सचिनच्या यशाचे आणि त्याच्या लोकप्रियतेचे खरे गमक आहे. सचिनशी गप्पा मारत असताना त्यांच्या राहणीतील साधेपणा आणि सौम्य भाषा लक्ष वेधून घेते. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या या माणसाने आपल्या जगण्यातील साधेपणा कसा टिकून ठेवला? त्याबद्दल सचिन सांगतो की ''माझे आई-वडील खूपच साधे आहेत. त्यांच्या संस्कारांमुळेच माझ्यातील साधेपणा अजूनही कायम आहे. प्रयत्न करूनही मला प्रसिध्दीच्या तोऱ्यात वावरता येत नाही. माझ्या पॅशनचं माझ्या कामात रूपांतर झालं. काही लोकांना अशी संधीसुध्दा मिळत नाहीत. मला मीडियात करियर करायचं होतं, माझ्या नशिबाने मला सूत्रसंचालन करायला मिळालं. त्यातून मला लोकांशी संवाद साधायला आवडतं. लोकांशी बोलायला आवडतं. पण जर मी प्रसिध्दीच्या तोऱ्यात राहिलो, तर लोकांशी संवादच साधू शकणार नाही. माझं काम किती चांगलं झालं, तरी ते अजून कसं चांगलं होऊ शकेल याचा विचार करत राहतो. या भावनेमुळे मी या इंडस्ट्रीत अजून टिकून आहे.''
अशा विविध क्षेत्रात काम करायचे, रोज असणारे रेकॉर्डिंग, व्हॉइस ओव्हर, सूत्रसंचालनाच्या तालमी अशी सगळी तारेवरची कसरत असते. सतत व्यग्र असणारे वेळापत्रक. यामुळे कधी ना कधी तरी आवाजावर आणि शरीरावर ताण येणारच. मग या सगळया व्यग्र वेळापत्रकातून स्वत:साठी वेळ काढणे अशक्यच असते. वेळेचे नियोजन, आवाजाची काळजी, सुदृढ आरोग्य याचे रहस्य काय असावे? ''मी रोज जिमला जातो, कारण जर तुम्हाला या क्षेत्रात टिकून राहायचे असेल, तर तुम्हाला फिट राहणे खूप आवश्यक आहे. प्रवासात असलो तरी मी व्यायामासाठी वेळ काढतो. आवाजासाठी बाकी काही विशेष करत नाही. पण आवाज आणि शरीर सुदृढ राहण्यासाठी मी पुरेशी झोप घेतो. भरपूर पाणी पितो, ज्याने माझे व्होकल कॉर्ड्स कार्यरत राहतील. व्हॉइस ओव्हरच्या कोर्समध्ये तुम्हांला शिकवलं जातं की पोट धरून बोलू नये किंवा आवाजाच्या चढ-उताराचे नियंत्रण कसं राखावं, श्वासावर कसं नियंत्रण ठेवावं आणि इतकी वर्षं काम करून आता या सगळया गोष्टींचा सराव झाला आहे. तेलकट पदार्थ खूप कमी खातो. कधी कधी आइसक्रीमही खातो. कारण तुमच्या घशाला सगळया पदार्थांची सवय असणं गरजेचं आहे. त्याला तुम्ही नाजूक बनवून ठेवू शकत नाही. काय आणि ते किती प्रमाणात खायचं याची मर्यादा तुम्ही स्वत:हून घातली पाहिजे. ''
या क्षेत्रात काम करत असताना तुम्हांला सतत आपल्या क्षेत्राबद्दल अपडेट असावे लागते. आणि मनोरंजन क्षेत्रात तर बहुतेक वेळा सोशल नेटवर्किंगवरील प्रतिसादांमुळे तुम्हांला तुमच्या कामाची पावती मिळत असते.
भारतात परतल्यानंतर गेल्या 4 वर्षांत सचिन कुंभार महाविद्यालयातील कार्यक्रमांचे सूत्रसंचालनदेखील करतोय. तरुणांच्या विश्वात वावरताना तुम्हांला डोळयात तेल घालून काम करावे लागते, हे त्याच्या अनुभवावरून कळते. ''सगळयाच सोशल नेटवर्किंगवर येणारा प्रतिसाद खूपच सकारात्मक आहे. त्यात मोठया प्रमाणावर तरुणांची संख्या आहे. चार वर्षांपासून मी कॉलेजमधील वेगवेगळे शो ऍंकरिंग करतोय. आणि तेथील मुलांचा येणारा सकारात्मक प्रतिसाद उत्साह वाढवणारा असतो. माझ्या स्टेजवरील ऊर्जेचं हे कारण असावं. जर मुलांना तुमचे ऍंकरिंग आवडलं नाही, तर ते लगेच शो बंद पाडतील. पण मला मात्र अशा कोणत्याही प्रसंगाला अजून सामोरं जावं लागलेलं नाही.''
रोज आपण वेगवेगळया लोकांना भेटत असतो, त्यांच्याशी संवाद साधतो. आणि कधी कोण माणूस आपल्या गरजेला उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना सचिनच्या बाबतीतही घडली होती. ''2015 साली जेव्हा प्रो कबड्डी सुरू होणार होतं, त्या वेळेस मला तेथे माझं नशीब आजमावायचं होतं. म्हणून प्रो कबड्डीच्या आयोजकांशी माझ्या कामासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो. ते काही मला प्रतिसाद देत नव्हते. दोन दिवसांनी मला एका मुलाचा फोन आला. त्याने मला सांगितलं की, 'तुम्ही खूप चांगलं ऍंकरिंग करता, हे मला माहीत आहे. मी सध्या स्टार स्पोर्ट्ससाठी इंटर्न म्हणून काम करतोय आणि त्यासाठी ऍंकरच्या निवडीसाठीचं काम मी पाहतोय, तुम्ही ऑडिशनला या.' मी तेथे गेलो आणि माझी निवड झाली. समीर चतुवर्ेदी त्याचं नाव. त्याने खऱ्या अर्थाने माझ्यासाठी एका संधीचं दार उघडलं. ऑडिशनमध्येच माझा प्रभाव पडल्याने स्टार स्पोर्टस प्रो कबड्डीआधी होणाऱ्या इंडियन हॉकी लीगचं ऍंकरिंग करण्याची संधी मला मिळाली. सगळयांना माझं काम खूप आवडलं. त्यानंतर स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डीसाठी मी सूत्रसंचालन केलं आणि माझी एक नवीन ओळख तयार झाली.
प्रत्येकाला आपल्या स्वप्नांसाठी मेहनत करावीच लागते, मग क्षेत्र कोणतेही असो. जर आपण पैसा आणि प्रसिध्दी यांच्याच मागे धावत राहिलो, तर आपले स्वप्न हवेतच विरून जाते. मनोरंजन क्षेत्रात पर्दापण करणारे बरेच तरुण आणि तरुणी आहेत. हे क्षेत्र खोऱ्याने पैसा मिळवून देणारे आहे म्हणून अनेक जण इकडे वळतात. अशा तरुणाईला सल्ला देताना सचिन म्हणतो की ''जर तुम्ही या क्षेत्रातला प्रसिध्दी आणि पैसा पाहून येणार असाल, तर या क्षेत्रात तात्पुरतं राहण्याची तयारी ठेवा. तुम्हांला जर खरंच या क्षेत्रात काम करायचं असेल, तर 100% मेहनत करावी लागते. प्रत्येक क्षेत्रात काम करण्यासाठी तुम्हांला अभ्यास करण्याची गरज असते. आता जर एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचं असेल, तर तुम्हांला आधी स्क्रिप्ट देण्यात येतं. जर तुम्ही ती नीट वाचली नाही, समजून घेतली नाही, तर त्या विषयाला तुम्ही कधीच स्वत:चा टच देऊ शकणार नाही. तो कागद घेऊन नुसता वाचला, तर तुम्ही लोकांवर तुमची छाप पाडू शकणार नाही. या क्षेत्रात पैसा आणि प्रसिध्दी आहे पण तुमचं पॅशनही हवं आणि ते पॅशनही जागं ठेवावं लागतं. केवळ पैसा आणि ग्लॅमरकडे बघाल तर काही काळातच तुमचे करियर संपेल.''
सचिनची मनोरंजन क्षेत्रातील कामगिरी खरोखरच लक्षणीय आहे. इंग्लिश आणि हिंदी माध्यमात वर्षानुवर्षे वावरत असलेल्या या मराठी तरुणाने महाराष्ट्राचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले आहे. पण अजूनही मराठी विश्वापासून तो लांब आहे. त्याविषयी सचिन म्हणाला की, ''मला नक्की आवडेल मराठीमध्ये काम करायला. पण खरं सांगू का, माझं मार्केटिंग खूप खराब आहे. आणि जी माझी टॅगलाईन आहे, त्यानुसार माझ्या कामातून माझी प्रसिध्दी व्हावी असं मला वाटतं. आणि इतकी वर्षं हिंदी आणि इंग्लिश प्रसारमाध्यमांत वावर असल्यामुळे मराठी इंडस्ट्रीपासून मी थोडा लांब आहे. याचं कारण असं की माझी मराठी भाषा म्हणावी तेवढी चांगली नाहीये, त्यामुळे मराठी इंडस्ट्रीत येण्याइतपत माझ्यात अजूनही आत्मविश्वास नाहीये, माझे उच्चार चुकतील किंवा मी काहीतरी चुकीचं बोलेन याची मला भीती वाटते. पण मला मराठीतून ऑफर्स आल्या आहेत. बऱ्याच प्रोजेक्ट्ससाठी मला विचारण्यात आलं आहे. येणाऱ्या नवीन वर्षात माझं नक्कीच मराठीत पदार्पण होईल.''
येत्या पुढील काळात सचिन कुंभार मराठी प्रेक्षकांचीही मने जिंकेल. आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने हिंदी आणि इंग्लिश क्षेत्र गाजवणाऱ्या सचिनचे मराठीतील पदार्पणही असेच दमदार असेल, अशी खात्री वाटते.