मुलखावेगळा

विवेक मराठी    14-Dec-2015   
Total Views | 156

2012 साली श्री. मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री होते. त्यांचा संघ स्वयंसेवक ते एका राज्याचे मुख्यमंत्री हा प्रवास रेखाटणारा एक दीर्घ लेख 2012 च्या साप्ताहिक विवेकच्या दिवाळी अंकात विवेकच्या कार्यकरी संपादक  अश्विनी मयेकर यांनी लिहिला होता.

सदर लेख मोठा आहे...वेळ काढून नक्की वाचावा असा आहे ...

 

****अश्विनी मयेकर****

 गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि साप्ताहिक विवेकचे स्नेहबंध दोन तपांहून अधिक जुने. म्हणूनच त्यांच्या गोवा विधानसभेतल्या ऐतिहासिक विजयाचं औचित्य साधत, दिवाळी अंकासाठी एक प्रदीर्घ मुलाखत घेण्याचं निश्चित केलं. त्यांच्या मुलाखतीबरोबरच त्यांच्या आप्त-स्नेह्यांशीही संवाद साधावा आणि त्यातून त्यांचं व्यक्तिचित्र रेखाटावं, असं ठरलं. पर्रिकरांनी बोलायला होकार तर लगेच दिला पण निवांत वेळ देण्याची अडचण होती. कारण त्या वेळी गोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं, कामांची भाऊगर्दी होती. अशा वेळी हाताशी असलेला वेळ मुलाखतीसाठी वापरणं ही त्यांच्या तत्त्वात न बसणारी गोष्ट! त्यांच्या कामांच्या 'प्रायॉरिटी लिस्ट'मध्ये मुलाखतीचा क्रमांक सगळयात शेवटचा. त्यामुळे मुलाखत मिळेल ती एकीकडे कामं चालू असताना, त्यासाठी वेगळा वेळ राखून ठेवता येणार नाही, याची त्यांनी कल्पना दिली. आम्हीही ते मान्य केलं. मुलाखत झाली ती टप्प्याटप्प्याने, त्यांच्या कामांच्या गर्दीतून वेळेची फट शोधत... त्यांच्याबरोबर काही कार्यक्रमांना हजेरी लावत, त्यासाठी छोटा प्रवास करत.

आजच्या काळातल्या राजकीय नेत्यांसाठी पैसा, प्रसिध्दी आणि गॉडफादर या तीन आत्यंतिक महत्त्वाच्या गोष्टी. मात्र या तीनही गोष्टींपासून कायम दूर राहिलेला आणि तरीही स्वत:चा ठसा उमटवणारा असा हा राजकारणी. राजकारणातली मळलेली पायवाट चालायचं नाकारून, स्वत:ची वेगळी वाट तयार करणारा... अशा या मुलखावेगळया नेत्याच्या व्यक्तिमत्त्वाचं हे कोलाज... प्रत्यक्ष त्याच्या आणि अनेकांच्या मदतीने तयार केलेलं...

साधारण 4/5 महिन्यांपूर्वीची गोष्ट. जुलैतली एक पावसाळी सकाळ. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा विविध क्षेत्रातल्या कॉर्पोरेट्सबरोबर वार्तालापाचा कार्यक्रम 'आमी गोयंकार' या संस्थेने ठेवला होता. ठिकाण होतं, दक्षिण मुंबईतलं हॉटेल ग्रँड मराठा... मध्यमवर्गीय व्यक्तीच्या मनात प्रवेशद्वारापासूनच संकोच दाटून यावा असा सगळा तिथला माहोल... या वातावरणाला दबूनच हॉटेलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रवेश केला. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे माझी नजर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा वेध घेऊ लागली. इतक्या माणसांमध्ये त्यांना शोधणं अजिबात अवघड गेलं नाही... कारण सूटबूट आणि उंची कपडयांच्या त्या कॉर्पोरेट भाऊगर्दीत, ते एकटेच अगदी साध्या वेषात होते... झटकन ओळखू यावेत आणि पाहून कोणालाही विस्मय वाटावा इतक्या साध्या वेषात!

कोणत्याही सर्वसामान्य माणसाच्या अंगावर दिसेल असा साधा, 'इन' न केलेला हाफशर्ट, शर्टाच्या रंगाशी फारसं जुळवून न घेणारी पँट, पायात जंबो साईजच्या साध्या आणि सैल पडलेल्या सँडल्स् आणि वयाशी इमान राखणारे पांढरे केस!

झब्बा-लेंगा किंवा खादी वस्त्रधारी किंवा सूटबूट... फारफार तर सफारी, या वेषात कोणत्याही मुख्यमंत्र्यांची छबी पाहायची आपल्या डोळयांना सवय लागलेली. आणि यांच्या वेषभूषेने तर मुख्यमंत्र्यांच्या त्या पारंपरिक वेषभूषेशी काडीमोड घेतलेला... जाणीवपूर्वक किंवा सहजधर्म म्हणूनही असेल... कारण समजलं नाही, तरी हे वेगळेपण मनात नोंदलं गेलं. तर सांगायचं तात्पर्य इतकंच की, 'ग्रँड मराठा'च्या त्या साहेबी वातावरणात पर्रिकर अतिशय सहजपणे सर्वांशी संवाद साधत होते. (मात्र, त्यांच्या या अंतर्बाह्य साधेपणाचं दडपण बाकीच्यांना आल्याचं जाणवत होतं.)

 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/



त्याच दिवशी दुपारी साप्ताहिक विवेकच्या (अलीकडेच नूतनीकरण झालेल्या) प्रभादेवी कार्यालय भेटीचा कार्यक्रम. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी कार्यालय भरून गेलेलं. उच्चशिक्षित तरीही अतिशय साध्या (आणि म्हणूनच युनिक) अशा या मुख्यमंत्र्याला भेटण्याची उत्सुकता सर्वांच्याच चेहऱ्यावर वाचता येत होती. त्या तासाभराच्या भेटीत लोकांनी खूप प्रश्न विचारले, त्यांचं गोव्याच्या विकासासंदर्भातलं स्वप्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनीही अगदी आकडेवारीसह सर्वांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिली... आणि, अक्षरश: नावालाही 'सिक्युरिटी' बरोबर न घेता आलेला हा मुख्यमंत्री शिवाजी पार्क येथील स्वा. सावरकर सभागृहात ठरलेल्या पुढच्या कार्यक्रमासाठी रवानाही झाला, तेही एका स्नेह्याच्या गाडीतून, मागेपुढे सिक्युरिटीचा लवाजमा न घेता. कार्यक्रम होता प्रकट मुलाखतीचा, जिथे मुंबईच्या विविध भागातून आलेले लोक त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. दिलेल्या वेळेत ते तिथे पोहोचले, सकाळच्याच कपडयांमध्ये... स्टेजवर जाण्यापूर्वी काही मिनिटं तरी काढलेल्या प्रश्नांसंदर्भात पर्रिकरांशी चर्चा व्हावी, त्यांना आपल्या प्रश्नांची पूर्वकल्पना असावी अशी मुलाखत घेणाऱ्यांची स्वाभाविक इच्छा... त्यातल्या एकाने जरा दबकतच तसं सांगायचा प्रयत्नही केला. त्यावर त्यांचं उत्तर... 'विचारा हो काहीही... मला आधी प्रश्न सांगण्याची काही गरज नाही...' अगदी अनपेक्षित अशा त्यांच्या या उत्तराने मुलाखत घेणाऱ्यांवरचं दडपण अधिकच वाढलं... पण पहिल्या प्रश्नापासूनच मुलाखत रंगत गेली. 'सुखी, समाधानी गोवा हे माझं स्वप्न आहे' अशी अगदी एका वाक्यात त्यांनी आपल्या कामामागची प्रेरणा सांगितली. या मुलाखतीतून पर्रिकरांचं अंतरंग, राजकीय-सामाजिक कामाचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडत गेला. त्यांची मुलाखत ऐकण्यासाठी आलेल्यांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती, हे आणखी एक विशेष. एरव्ही राजकारणातल्या गढुळलेल्या वातावरणामुळे सुशिक्षित, सुसंस्कृत घरातल्या तरुणांनी त्याच्याकडे पाठ फिरवली आहे, अशी सर्वसाधारण स्थिती... ही मुलाखत मात्र त्याला अपवाद होती.

रंगलेली मुलाखत योग्य त्या समेवर संपवून, लोकांच्या मनात उद्याच्या राजकारणाचं एक आशादायी चित्र रंगवून, एका गजबजलेल्या दिवसाला निरोप देत पर्रिकर रात्रीच गोव्याला रवाना झाले...

***

...आणि अगदी अनपेक्षितपणे, पुन्हा अवघ्या 4/5 दिवसांतच पावसाळी अधिवेशन तोंडावर आलेलं असताना त्यांना मुंबईला यावं लागलं... मोठया लेकाच्या - उत्पलच्या आकस्मिक उद्भवलेल्या आजाराचं निमित्त होऊन. मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात त्याला सकाळी दाखल करण्यात आलं... तेही एअर इंडियाच्या साध्यासुध्या विमानाने. वास्तविक अशा स्थितीत खाजगी वा चार्टर विमानाने त्याला घेऊन येण्याचा पर्याय पर्रिकरांना सहज उपलब्ध होता, तरीही.. एका सर्वसामान्य विमानप्रवाशाप्रमाणे ते आपल्या मुलाला घेऊन आले. एक-दोन जवळचे मित्र सोडल्यास अन्य कोणालाही न कळवता... तरीही त्यांच्या येण्याचा सुगावा लागलेली माणसं आस्थेने विचारपूस करण्यासाठी, तर काही मदतीच्या भावनेनेही त्यांना भेटायला येत होती. हिंदुजातील एका खोलीत त्यांचा मुक्काम होता. आपल्या हॉस्पिटलच्या एका खोलीत एका राज्याचा मुख्यमंत्री राहतो आहे, याची तिथल्या कर्मचाऱ्यांना कोण अपूर्वाई वाटत होती! साध्यासुध्या मंत्र्याला नव्हे, तर ते थेट मुख्यमंत्र्याला इतक्या जवळून, सुरक्षारक्षकांच्या वेढयाशिवाय पाहण्याची संधी, त्याचं साधेपण निरखण्याची संधी त्यांना मिळाली होती...! मुलाच्या तब्येतीची डोळयात दाटलेली काळजी कोणाला दिसणार नाही याची खबरदारी घेत, पर्रिकर आलेल्या माणसांशी गप्पा मारत होते. एवढंच नव्हे तर, त्यांचा निरोप घ्यायला अगत्याने लिफ्टपर्यंत जात होते. त्यांच्या वागण्यातली ही सभ्यता, ही आदब मनातली त्यांची प्रतिमा अधिकच उजळत होती...

उत्पलच्या काही वैद्यकीय चाचण्यांचे रिपोर्ट्स येईपर्यंत बऱ्यापैकी तणावात असणारे पर्रिकर, त्या चाचण्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह येताच तणावमुक्त झाले. आणि मग आपल्या मोजक्या जवळच्या मित्रांसह त्यांनी त्याचं सेलिब्रेशन केलं... तेही दादरच्या अस्सल मराठमोळया, साध्यासुध्या प्रकाश हॉटेलात, मिसळ खाऊन!

***

ते इकडे मुलाजवळ हिंदुजात असताना, तिकडे गोव्यात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र पर्रिकरांशिवाय विधानसभाही निस्तेज झाल्यासारखी भासत होती. लाडक्या मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या तब्येतीची काळजी राज्यातल्या जनतेच्या मुखावरही पसरली होती. प्रत्येकानेच आपल्या उपास्य देवतेला 'देवा ताको बरो कर...आमच्या भाईच्या दोनुय पुतांचे रक्षण कर' अशी प्रार्थना केली. अनेक नवस बोलले गेले. जनतेच्या या अकृत्रिम आणि निःस्वार्थी प्रेमाने पर्रिकरही गहिवरले. म्हणूनच मुलाच्या प्रकृतीला असलेला धोका टळल्यावर ते जेव्हा पहिल्यांदा सभागृहात आले तेव्हा, त्यांनी आपल्या भाषणातून राज्यातल्या जनतेचे जाहीर आभार मानले.

***

असे हे पर्रिकर... जनतेच्या प्रेमाचे धनी! अल्पावधीत आपल्या कामाच्या बळावर जनतेच्या गळयातला ताईत बनलेले. त्यातही मागची 5 वर्षं तर ते विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीत होते. तरीही, 'सत्ताधाऱ्यांपेक्षाही हा आपल्या कामाचा माणूस आहे', हा विश्वास लोकांच्या मनात निर्माण करण्यात ते यशस्वी झाले.

***

मात्र, ज्या राजकारणात ते अल्पावधीत स्थिरावले, ते त्यांच्या आयुष्यात अपघातानेच आलं... जाहीर मुलाखतीत आपल्या राजकारण प्रवेशाबद्दल बोलताना पर्रिकर आवर्जून एक गोष्ट सांगतात. पुराच्या पाण्यात बुडत असलेल्या मुलाला वाचवणाऱ्या माणसाची. अतुलनीय धाडसाबद्दल नंतर त्याचा जेव्हा गावात सत्कार होतो तेव्हा तो माणूस म्हणतो, 'पहिले मला हे सांगा की या पुरात मला ढकललं कोणी?' ही गोष्ट सांगून संपते तेव्हा पर्रिकर त्याच्यापुढे एकच वाक्य जोडतात, 'माझीही अवस्था त्या माणसासारखीच आहे. मला राजकारणात ढकलणाऱ्या त्या माणसाला मी अजूनही शोधतोच आहे.' या वाक्यासरशी टाळयांचा प्रचंड कडकडाट होतो आणि हास्याची कारंजी उसळतात...

पण या कथेवरचं विनोदाचं आवरण दूर केलं तर त्यामागे एक तथ्य लपलेलं आहे... पर्रिकर राजकारणात स्वेच्छेने आले नाहीत हे खरं, पण त्यांना या क्षेत्रात आणणारी कुणी 'व्यक्ती' नव्हती तर 'परिस्थिती' होती, 'नियती' होती. गोव्याची नियती, तिथली राजकीय परिस्थिती... योग्य नेत्याच्या शोधात गटांगळया खाणारी राजकीय परिस्थिती... 'मनोहर पर्रिकर' हा 'त्या परिस्थितीला' लागलेला शोध आहे.

तेव्हा परिस्थितीच अशी निर्माण झाली की म्हापसा शहर संघचालक म्हणून मोठया धडाक्यात काम करणाऱ्या मनोहर पर्रिकरांना संघाचा आदेश म्हणून, भाजपाचं गोव्यात बस्तान बसवण्यासाठी राजकारणाच्या आखाडयात उतरावं लागलं. उपजतच नेतृत्वगुण असूनही राजकारण प्रवेशाची इच्छाही तोवर त्यांच्या मनात निर्माण झाली नव्हती. पण एकदा एखादी जबाबदारी स्वीकारली की ती तन-मन-धन वेचून पार पाडायची, हा स्वभाव... त्यामुळेच त्यांनी श्रीपाद नाईक, राजेंद्र आर्लेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, सतीश धोंड, संजीव देसाई अशा आपल्या मित्रांसोबत (पूर्वीच्या संघ स्वयंसेवकांसोबत) गोव्यात भाजपा रुजवला, वाढवला... आणि आज ऐतिहासिक विजय मिळवून गोव्यातील सत्ता हस्तगत केली.

***

...कसा होता इथवरचा प्रवास? सहजसोप्पा तर नक्कीच नाही. बंडखोर प्रकृतीच्या पर्रिकरांना सरळसाधा प्रवास मानवलाही नसताच म्हणा...! पण आव्हानं घ्यायची हौस भागेल इतकी आव्हानं समोर उभी ठाकली... तेही तितक्याच तडफेने आव्हानांवर स्वार झाले. दर वेळी प्राक्तनात विजय लिहिलेला नसतो, याची जाणीव असल्याने पराभवालाही मोठया धैर्याने सामोरे गेले. 'हे सगळे संघाचे संस्कार. शाखेत लहानपणापासून गेलो, त्यामुळे मी असा घडलो.' आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीला संघ कारणीभूत आहे, याविषयीची कृतज्ञता कायमच त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होते. सार्वजनिक कार्यक्रमात तर अगदी आवर्जून... ''जेव्हा मी संघाचा आहे असं आवर्जून सांगतो, तेव्हा संघात व्यक्तिमत्त्वाची घडण चांगली होते, हा संदेश मला पोहोचवायचा असतो. चांगल्या चारित्र्याची, इंटिग्रिटी असलेली माणसं संघात तयार होतात हे लोकांना कळायला हवं, म्हणून मी तसं जाणीवपूर्वक सांगतो. आणि असं सांगितल्याचा परिणाम विपरीत होत नाही, असा माझा अनुभव आहे. मला मिळणाऱ्या अल्पसंख्याकांच्या मतावर याचा काही परिणाम झालेला नाही. उलट असं सांगितल्याने त्यांचे संघाबद्दलचे गैरसमज, भीती दूर होईल असं मला वाटतं,'' ही त्यांची त्यामागची भूमिका...

पर्रिकरांना संघानं घडवलं हे खरंच, पण मातीच्या गोळयापासून सुंदर मूर्ती घडवणं हे जेवढं एखाद्या प्रतिभावंत मूर्तिकारावर अवलंबून असतं, तेवढंच त्या मातीच्या गुणवत्तेवरही! घरच्यांनीही या मुलातलं वेगळेपण लहानपणीच जाणलं होतं. भावंडात मधले असलेले पर्रिकर पहिल्यापासून अभ्यास आणि मस्ती, दोन्हीत पुढे... मस्तीवरून ओरडा खावा लागला तरी 'हा पुढे नाव काढणार' याची खात्री घरच्यांना होती. मधूनमधून ती त्यांच्या बोलण्यातून व्यक्तही होत होती.

***

मोठया भावाच्या मागोमाग धाकटया मनोहरलाही शाखेत पाठवण्यात आलं तेव्हा तो खूप लहान होता. शाखेत भरपूर समवयस्क मुलं, त्यामुळे मस्तीला भरपूर वाव... या वातावरणात तो न रमता तरच नवल!

मुलांच्या खोडया काढणे हा मनोहरचा मैदानावरचा आवडता उद्योग. साहजिकच शिक्षकांपर्यंत तक्रार पोहोचायची. या मस्तीवर एकच उपाय ठरलेला, तो म्हणजे चोप देणे. पण शिक्षकांपर्यंत तक्रार पोहोचण्याची खात्रीच असणारा मनोहर, ते येईपर्यंत एखाद्या उंचच उंच झाडावर चढून बसायचा. तो खाली येण्याची वाट पाहत, तिष्ठत उभ्या असलेल्या शिक्षकांचा पेशन्स कधीतरी संपायचा, ते निघून जायचे. मग ही स्वारी झाडावरून उतरून घरचा रस्ता धरायची.

त्यांचे परममित्र संजय वालावलकर. एकमेकांचे 'बहिश्चर' प्राण असावेत इतके सख्खे मित्र! त्यांच्या मैत्रीने पन्नाशी ओलांडली आहे. शाखेतही दोघं एकत्रच जायला लागले. त्यांच्याकडे तर लहान मनोहरच्या दंगामस्तीच्या किश्शांचा खजिनाच आहे.

ते सांगत होते...''एकदा आमची सहल जायची होती. पण त्याच वेळी याने प्रचंड मस्ती केली, म्हणून आईने खोलीत कोंडून ठेवलं होतं आणि बाहेरून कडी लावली होती. 'तुका सहलीक वचूक दिऊचे ना' अशी वरून ताकीदही दिली. आईने याला शिक्षा केली आहे याचा मला पत्ताच नाही. मी त्याच्या घरासमोर सहलीला जायच्या तयारीने जोरजोरात सायकलची घंटा वाजवत उभा... मला आलेला पाहून तर त्याचा 'आई दार उघड'चा जप आणखीनच वाढला. तरी त्याच्या आईवर काही परिणाम होईना. मग याने काय करावं...? हाताच्या मुठीचा जोरदार प्रहार करून त्या खोलीतल्या खिडकीची काच फोडली. खळळकन् आवाज होऊन काच फुटली आणि याच्या हातालाही जखम झाली. रक्त वाहू लागलं. तेव्हा आईसमोर दार उघडण्याशिवाय काही पर्याय नव्हता. घाबरून जाऊन त्यांनी दार उघडलं तर त्याचा फायदा घेत, रक्तबंबाळ झालेला हात धुवून मनोहर सायकलवर टांग टाकत सहलीसाठी माझ्याबरोबर निघालाही.'' ('एखादी गोष्ट ठरवली की ती करायचीच', ही त्यांची जिद्द पुढे आयुष्यभर वेगवेगळया प्रसंगातून दिसत राहिली. पर्रिकरांची ती एक ओळख बनली.)

काही वर्षांनी संघाच्या शाखेत पर्रिकरांच्या मोठया भावाकडे मुख्य शिक्षक म्हणून जबाबदारी आली. तो खूप शिस्तीचा, मनोहरला आणि त्याच्या मित्रमंडळाला तीच शिस्त लावण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. मात्र या शिस्तीला कंटाळून त्या सगळयांनी एक दिवस बंड केलं.शिस्तीचा बडगा नसणारी आणि मनसोक्त खेळायला मिळेल अशी दुसरी शाखा लावायला सुरुवात केली. त्या बंडाची लीडरशिप अर्थातच मनोहरकडे होती.

या मस्तीखोर स्वभावामुळे शाळेत असताना मनोहरची रवानगी   एक वर्ष मामाकडे मडगावला झाली होती. पण मामाही मस्तीला कंटाळला. वर्षभरातच त्याने या भाच्याला त्याच्या घरी पाठवून दिलं.

***

पर्रिकरांची आई अतिशय शिस्तीची आणि करारी होती. ''आई खूप शिस्तीची खरी, पण प्रेमळही होती. मात्र व्रात्य स्वभावामुळे मी तिच्या हातचा खूप मार खाल्ला आहे. माझ्या मस्तीला वैतागली की लाटण्याने मारायची... मला आठवतंय, एकदा ती अशी मारत असताना तिच्या हातातल्या बांगडया फोडून बोचकारलं होतं मी तिला...'' सांगता सांगता पर्रिकर त्या आठवणीत हरवतात... आईच्या आठवणीने, तिला दिलेल्या त्रासाच्या आठवणीने स्वर हळवा होतो.

''आमच्या वडिलांचा स्वभाव अगदी शांत होता. अतिशय देशभक्त होते ते. म्हणतात ना, देशाबद्दलचा जाज्ज्वल्य अभिमान... तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भरून राहिला होता. आईही देशप्रेमी होतीच, पण या बाबतीत वडील तिच्यापेक्षा कांकणभर सरसच होते. माझ्यात त्या दोघांच्या गुणांचं मिश्रण आहे असं मला वाटतं. धमक आणि निर्णयक्षमता ही आईकडून, तर उत्कट देशप्रेम-इंटिग्रिटी वडिलांकडून.''

***

आणि अशा या आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या व्रात्य-बंडखोर मनोहरवर संघात संस्कार झाले ते दुर्गानंद नाडकर्णींचे. दुर्गानंद नाडकर्णी हा पर्रिकरांच्या आयुष्यातला स्वतंत्र आणि खूप महत्त्वाचा अध्याय आहे. त्यांच्यातल्या ओसंडून वाहणाऱ्या ऊर्जेला, कमालीच्या जिद्दी स्वभावाला विधायक वळण देणारा शिक्षक... खऱ्या अर्थाने गुरूच! तेव्हा ते गोव्यात प्रांत प्रचारक होते. आपल्या व्यक्तिमत्त्वावर नाडकर्णींनी केलेले संस्कार खूप मोलाचे आहेत, हे पर्रिकर आवर्जून सांगतात. ''त्यांनी माझ्यावर प्रखर राष्ट्रवादाचे संस्कार केले. राष्ट्रावादासंदर्भातला कुठलाही विचार अत्यंत शांत चित्ताने पण प्रभावीपणे कसा मांडायचा, हे मी त्यांच्याकडून शिकलो. आजच्या रोजच्या जगण्यातलं साधं उदाहरण देतो मी. मी मुख्यमंत्री असलो तरी, इथून निघताना मी स्वतः या खोलीतले दिवे-पंखे बंद करून बाहेर पडतो. त्याचं कारण, हा पैसा सरकारचा आहे आणि त्याचा अपव्यय होता कामा नये, याची मिळालेली शिकवण. सरकारी तिजोरीतील पैशाचा अपव्यय होऊ न देणं हा विचार मला वाटतं राष्ट्रवादाशी निगडित विषय आहे. त्याचा इतका बारकाईने विचार करून तो कृतीत उतरवायला मी नाडकर्णींकडून शिकलो.

लहानपणापासून संघाच्या शाखेत गेल्यामुळे राष्ट्राकरताही काही करायचं असतं असे संस्कार माझ्यावर झाले. इंटर सायन्ससारख्या महत्त्वाच्या वर्षाला असताना मी मुख्य शिक्षक व्हावं, असा नाडकर्णींचा आग्रह होता. वर्ष महत्त्वाचं होतं, शिवाय आय.आय.टी.ला जाण्याचं माझं स्वप्न होतं. त्याचा अभ्यासही माझा मलाच करायचा होता. म्हणून मी नाही म्हटलं तर, त्यावर त्यांनी मला फक्त इतकंच विचारलं की ''त्याग फक्त शिवाजी महाराजांनीच करावा का? बाकी कोणी करूच नये?'' अनुत्तरित करणाऱ्या त्यांच्या या प्रश्नानंतर मी मुख्य शिक्षक व्हायला तयार झालो आणि इंटर सायन्सचा अभ्यास सांभाळून ती जबाबदारी व्यवस्थित पारही पाडली.'

***

त्यानंतर आय.आय.टी.-मुंबई प्रवेशामुळे पर्रिकर काही वर्षं गोव्यापासून दूर गेले, मात्र संघापासून नाही. तिथेही वेगळया प्रकारचं संघकार्य चालूच होतं. तो अणीबाणीचा कालखंड होता. सर्व देशातलं वातावरणच ढवळून निघालं होतं. पर्रिकर त्यापासून दूरकसे राहू शकले असते? पवईला हॉस्टेलवर असताना ते संघाच्या दृष्टीने हॉस्टेलचे प्रमुख होते. अशा वेगवेगळया जबाबदाऱ्यांतून संघाशी असलेले बंध केवळ टिकूनच राहिले नाहीत, तर दृढ होत गेले.

आय.आय.टी.तलं शिक्षण संपल्यावर पर्रिकर गोव्यात परतले ते, सोबत नवपरिणित वधूला-मेधाला घेऊनच... मनोहर पर्रिकरांचा आणि प्रेमविवाह! गोवेकरांसाठी हीच मोठी बातमी होती. गोव्यात परतल्यावर काही काळातच त्यांच्यावर म्हापशाचे शहर संघचालक म्हणून जबाबदारी आली. त्या वेळी त्यांचं वय होतं जेमतेम 26/27. आख्ख्या प्रांतातच नव्हे तर देशभरातल्या संघरचनेत एवढया तरुण वयात संघचालक होणारे मनोहर पर्रिकर पहिलेच होते. 'पांढरे केस झाल्याशिवाय संघचालक नाही', अशी संघातली एक अलिखित प्रथा असल्याने सर्व संबंधितांना हा धक्काच होता. त्या वेळचा एक किस्सा सुभाष वेलिंगकर यांनी सांगितला...

''तो संघचालक झाल्यानंतरची गोष्ट. पहिल्यांदाच प्रांतीय बैठकीला गेला, तेव्हा स्टेजवर गाद्या वगैरे घालून सर्व संघचालकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याला गाद्यांवर बसण्याची सवय नाही. आम्ही अक्षरश: बळजबरीने त्याला स्टेजवर पाठवून खाली येऊन बसलो तर, वरचे कोणी घेईचनात त्याला बसायला. 'ही संघचालकांची बसायची जागा आहे.' असं त्याला सांगितलं. कारण इतक्या लहान वयाचा संघचालक असतो हे कधी बघितलेलंच नाही ना! म्हणून हा गोंधळ!''

संघाने टाकलेली ही मोठी जबाबदारी पार पाडत असतानाच, त्याच काळात त्यांनी स्वतःच्या व्यवसायावरही लक्ष केंद्रित केलं. पहिली 5/6 वर्षं संघ आणि व्यवसाय या दोन्ही आघाडया सांभाळल्या आणि व्यवसायात एकदा स्थैर्य आल्यावर, त्याला नेमकी दिशा प्राप्त झाल्यावर मात्र 1985 ते 1991 या कालखंडात पर्रिकरांनी संघाच्या कामाला अधिक धडाक्यात सुरुवात केली. त्या काळात गंगा यात्रा, शिलापूजन, रामजन्मभूमी आंदोलन अशा वेगवेगळया आंदोलनात त्यांनी उत्तर गोव्याचं नेतृत्व केलं... रामजन्मभूमी आंदोलनात तर त्यांच्या आईचाही सक्रिय सहभाग होता. कारसेवेच्या काळात आईला लाठीमारही सहन करावा लागला होता.

या काळात पर्रिकरांना मिळालेल्या व्यावसायिक यशामुळे त्यांच्या बऱ्याच मोठया उद्योजकांशी ओळखी झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, संघाचा गोव्यातील संपर्क प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकावी असा संघातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा (जे त्यांचे निकटचे स्नेहीही होते, त्यांचा) विचार होता. पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. म्हणूनच ज्यांनी संपर्क प्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी द्यायचं योजलं, त्यांनीच भाजपाच्या गोव्याच्या राजकारणात आता मनोहरने उतरावं, असा आदेश दिला.

***

तोपर्यंत, आपण राजकारणात शिरावं असं पर्रिकरांच्या मनातही आलं नव्हतं. संघ जबाबदारीतून मुक्त झाले ते संघानेच दिलेली नवीन जबाबदारी पेलायला... कर्णाच्या कवचकुंडलाप्रमाणे बुध्दिमत्ता आणि नेतृत्वगुण यांची जन्मजात भेट मिळालेल्या पर्रिकरांच्या आयुष्यातला नवीन अध्याय सुरू झाला. संघनिष्ठ पर्रिकर संघाज्ञा म्हणून राजकारणात शिरले असले तरी त्यांचे परममित्र वालावलकर यांच्या मते मात्र,  कॉलेजमध्ये असल्यापासून जनसंघातील अटलजींचं आणि अडवाणींचं पर्रिकरांना प्रचंड आकर्षण होतं. वालावलकर म्हणाले, ''राजकीय विषयातलं वाचनही तो खूप करत असे. त्या संदर्भात आमच्या एका मित्राशी त्याचे फार वादही होत असत. खरं तर वाद घालण्यात त्याचा हात आजही कोणी धरणार नाही. अर्थात, त्याची राजकारणाची आवड मला स्पष्ट दिसत असली तरीही तो संघातून बाहेर पडेल असं त्या वेळी मनातही आलं नाही.''

***

मात्र गोव्यात त्या वेळी राजकीय परिस्थितीच अशी निर्माण झाली की, भाजपाने या राज्यात प्रवेश करणं ही तिथली राजकीय अपरिहार्यता बनली. त्या वेळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला गोव्यातल्या सर्व हिंदुत्ववाद्यांचा पाठिंबा होता. खुद्द संघविचारांच्या मंडळींनाही गोव्यात जनसंघ/भाजपाची गरज आहे असं तोपर्यंत कधी वाटलं नव्हतं. म्हणून संघाची मंडळीही कायम मगोपला पाठिंबा देत राहिली. इतकेच नव्हे तर संघरचनेत महत्त्वाचं पद भूषविणारे लक्ष्मीकांत पार्सेकरांसारखे कार्यकर्तेही मगोपचं काम करत होते. हे वातावरण बदललं आणि भाजपाचा गोव्यातला प्रवेश अपरिहार्य बनला तो मगोपच्या बदलत गेलेल्या कार्यपध्दतीमुळे, बदललेल्या धोरणामुळे आणि त्यातूनच बदलत गेलेल्या त्यांच्या जनमानसातील प्रतिमेमुळे.

***

भाजपाच्या गोवा प्रवेशामागचं कारण रत्नाकर लेलेंनी सांगितलं, ''89 साली गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला चर्चिल आलेमाव काही काळासाठी गोव्याचा मुख्यमंत्री झाला. त्याला असलेल्या या पार्श्वभूमीमुळे त्याची मुख्यमंत्रीपदी लागलेली वर्णी सगळयांनाच अस्वस्थ करून गेली. सत्तेत प्रवेश मिळण्याच्या लोभापायी मगोपनेही त्याला पाठिंबा दिला. त्याला पाठिंबा देणाऱ्या मगोच्या नेत्यांना तेव्हा आम्ही जाऊन भेटलो. 'चर्चिलला तुम्ही मुख्यमंत्री कसा केलात?' असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. खरं तर त्या आधी इथे भाजपाचं काम सुरू करणं म्हणजे हिंदू मतांचं विभाजन करणं, अशी आमचीही समजूत होती. कारण भाजप जे देशभर करू इच्छितोय, तेच गोव्यात मगोप करतोय, अशी आमची धारणा होती. पण 84 ते 89 या 5 वर्षांच्या काळात मगोपच्या तिकिटावर निवडून यायचं आणि मग काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा, अशी इथे प्रथाच पडून गेली होती. त्यातूनच 'मगो म्हणजे काँग्रेसला आमदार पुरवणारा पक्ष' अशी त्याची प्रतिमा तयार झाली आणि इथे भाजपाची गरज आम्हाला जाणवू लागली. या सगळयाचं टोक म्हणजे चर्चिलसारखा माणूस मुख्यमंत्रिपदावर येणं. तेव्हा आता हे थांबवलं पाहिजे, असं संघासहित सर्व हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांना वाटायला लागलं. या पार्श्वभूमीवर इथल्या संघात जे विचारमंथन झालं, त्यातून इथे आता अधिकृतरीत्या भाजपाचं बस्तान बसवायला हवं, या निष्कर्षाप्रत आम्ही आलो.''

***

गोव्यात भाजपाचं बस्तान बसवायचं तर त्यातले पहिल्या फळीचे कार्यकर्ते हे संघाची पार्श्वभूमी असणारेच असणार, हे स्वाभाविक होतं. म्हणूनच सुरुवातीला संघाने धडपडया वृत्तीच्या आणि विचारांची बैठक पक्की असलेल्या आपल्या काही कार्यकर्त्यांवर ही जबाबदारी सोपवली. पक्षाचं बस्तान बसवायच्या त्या काळातल्या आठवणी सांगताना सुभाष वेलिंगकर म्हणाले, ''मगोपशी वाटाघाटी करून त्यांनी दोन जागा भाजपासाठी सोडाव्यात, अशी चर्चा चालू होती. पण ते एकही जागा सोडायला तयार होईनात. म्हणून त्या वेळी 7/8 मतदारसंघातून आपले उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने विचार, प्रयत्न सुरू झाले. भाजपाच्या उमेदवारांच्या त्या पहिल्या फळीत श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर वगैरे संघातून गेलेली मंडळी होती. पक्ष नवा असल्याने सगळीकडे डिपॉझिट जप्त होणार, याची कल्पना होती. तरीही भाजपाचं अस्तित्व दाखवण्यासाठी ही निवडणूक लढवायची गरज होती.


तेव्हा लक्ष्मीकांत पार्सेकर (आत्ताचे आरोग्यमंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष) मांद्रे मतदारसंघातून रमाकांत खलप यांच्या विरोधात उभे राहिले. मांद्रे हा मगोचा बालेकिल्ला आणि खलपांचा पारंपरिक मतदारसंघ. लक्ष्मीकांतचे काका हे तिथले मगोचे खंदे कार्यकर्ते आणि लक्ष्मीकांतही संघाचा स्वयंसेवक (तालुका कार्यवाह) असला तरी मगोचाही कार्यकर्ता होता. पण मगोने असा विश्वासघात केल्याने आम्ही तिथून लक्ष्मीकांतला उभं केलं. उमेदवारी मागे घ्यावी म्हणून लक्ष्मीकांतवर सगळीकडून दडपण यायला लागलं. मात्र आम्ही ठरवलं की, काही झालं तरी उमेदवारी मागे घ्यायची नाही. तेव्हा आमच्याकडे प्रचारासाठी पुरेशी माणसंही नव्हती. मनोहरचा कारखाना त्या वेळी म्हापशाला होता. तो संध्याकाळी 7 वाजता कारखान्यातून घरी यायचा आणि जेवण झालं की त्याच्या मारुती गाडीमध्ये जमेल तितक्या माणसांना अक्षरश: कोंबून लक्ष्मीकांतच्या प्रचारासाठी बाहेर पडायचा. पोस्टर्स चिकटवायची, बोर्ड पेंट करायचे ही कामं मनोहरसहित ही सगळी मंडळीच करायची. पण मगो पक्षाची यंत्रणा मजबूत होती. यांनी पोस्टर लावलं की त्यांनी ते काढून टाकायचं हा रोजचाच उद्योग... एक पोस्टर काढून टाकायला मगोकडून आठ आणे दिले जायचे. मोठा बॅनर काढून टाकला की 1-2 रुपये दिले जायचे. त्यामुळे आदल्या रात्री आम्ही लावलेलं सगळं प्रचार साहित्य दुसऱ्या दिवशी सकाळी नाहीसं व्हायचं. मग पुन्हा आमचे लोक जाऊन पोस्टर्स लावायचे, असं जवळजवळ महिनाभर चालू होतं. त्या वेळी एखाद्या गोष्टीसाठी मनोहरची कष्ट करण्याची पध्दत, त्याच्यात असलेला कामाचा दांडगा उरक, चिकाटी कार्यकर्त्यांनी जवळून बघितली होती. अपेक्षेप्रमाणे आमच्या आठही उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. पण या निवडणुकीमुळे मनोहरचा राजकारणातला वावर सुरू झाला. त्याच्या पुढच्या रीतसर प्रवेशाची हीच नांदी ठरली.''

***

राजकारणात नव्याने प्रवेश केलेल्या या मंडळींच्या पदरात या निवडणुकीने अपयश टाकलं तरी या निवडणुकीमुळे गोव्यात भाजपाच्या नावाची चर्चा सुरू झाली, एवढं मात्र नक्की! त्यामुळे त्यांच्यापैकी कोणी नाउमेद तर झालं नाहीच; उलट या धडयातून शहाणं होत, पुढची पावलं कशी टाकायची, याचा विचार करू लागले.

त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका जरी 5 वर्षांनी असल्या तरी लोकसभेच्या निवडणुकीतही आपला उमेदवार उभा करून अस्तित्व दाखवून द्यायचं, हा विचार भाजपात नक्की झाला होता.

अशा या पार्श्वभूमीवर मनोहर पर्रिकरांचा गोवा भाजपामध्ये प्रवेश झाला. ''त्याचं झालं असं,'' ... सुभाष वेलिंगकर सांगत होते, ''मगोचे सुरेंद्र शिरसाट हे वजनदार राजकीय नेते, त्या वेळी ते विधानसभेचे सभापती होते. त्यांच्यासमोर लोकसभेसाठी मनोहरला उभं केलं तर ते भाजपाला गांभीर्याने घेतील, असं वाटलं. कारण मनोहर संघातला तडफदार युवा कार्यकर्ता होता. तसंच, संघाच्या काही आंदोलनांचं त्याने नेतृत्व केलं होतं, त्यामुळे त्याचं नाव सर्वांपर्यंत पोहोचलेलं होतं.

त्या वेळी मनोहर बोडगेश्वर मैदानात ठरलेल्या एका कार्यक्रमाचा व्यवस्थाप्रमुख होता. स्वयंसेवक कमी पडल्याने मैदानातल्या खर्ुच्या काढायचं काम करत होता. त्याचं ते काम चालू असतानाच मी पोहोचलो आणि याविषयीची कसलीही चर्चा चालू नसताना मी धाडकन त्याला संघाचा निर्णय सांगितला. 'तुला या निवडणुकीत फॉर्म भरायचा आहे. काय होतं ते नंतर बघू या आपण... कदाचित तो नंतर मागेही घेऊ, पण त्याची आधी वाच्यता करायची नाही आणि गांभीर्याने प्रचार करायचा.' त्यावर कोणताही प्रश्न न विचारता त्याने इतकंच म्हटलं, 'संघाने ठरवलं आहे ना मी निवडणूक लढवायची...मग ठीक आहे...मी लढवीन.' त्याने घरी जाऊन तसंच सांगितलं, 'संघाने मला शिरसाटांच्या विरोधात उभं राहायला सांगितलं आहे आणि मी ती निवडणूक लढवणार आहे.' आई-वडील आणि पत्नी तिघांनाही हा धक्काच होता. तिघांनीही भरपूर विरोध केला. 'राजकारण आपल्याला नकोच आहे', असं निक्षून सांगितलं. पत्नी तर खूपच चिडली. पण एकदा हा संघाचा आदेश आहे म्हटल्यावर त्याच्यावर कसलाच परिणाम होईना. 'माझ्यावर विश्वासून संघाने माझ्यावर एक जबाबदारी दिली आहे आणि मी ती पार पाडणार' असं त्याने त्या तिघांनाही निक्षून सांगितलं.  तेव्हा काँग्रेसविरोधी मतदान फक्त मगोलाच व्हायचं, ती मतं विभागू नयेत म्हणून आम्ही अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. पण त्याने ही गोष्ट घरातल्यांना आधी कळू दिली नाही. या प्रसंगानंतरही आपण आता संघापेक्षा भाजपाचं काम करावं असं मनोहरच्या मनात आलं नाही. कारण त्याच्यासाठी तो उमेदवारी अर्ज भरणं, प्रचार करणं हेदेखील एक प्रकारचं संघकार्यच होतं.

त्यानंतर मात्र निवडणूक लढण्यासाठी म्हणून उत्तर गोव्यातून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याविषयी मनोहरला संघाकडून सांगण्यात आलं. तेही गोपाळराव मयेकरांसारख्या दिग्गज नेत्याच्या समोर, त्यांना टक्कर देण्यासाठी... त्या वेळीही तो राजकारणात येण्यासाठी फार उत्सुक होता असं नाही, पण आपण राजकारणात असणं ही आवश्यकता आहे असं लक्षात आल्यावर त्याने या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि मूळ पिंड नसतानादेखील जे स्वीकारलं ते सफाईदारपणे करून दाखवलं.

त्याची कामाची गती, एकूण आवाका पाहून भाजपाचं काम वाढवण्यासाठी त्याला संघाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय झाला. आणि हळूहळू गोवा भाजपाच्या नेतृत्वाची जबाबदारी श्रीपाद नाईकच्या बरोबरीने मनोहरकडे आली.''

***

या लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण लोकसभा मतदारसंघातून श्रीपाद नाईक, तर उत्तर लोकसभा मतदारसंघातून मनोहर पर्रिकर यांना उभं करण्यात आलं. दोघं पराभूत झाले तरी दोघांना मिळून सुमारे 50,000 मतं मिळाली. 'गोवेकरांचा भाजपाला पाठिंबा मिळायला सुरुवात झाली आहे' हे मिळालेल्या मतांमुळे सिध्द झालं. लोकांकडून पक्षाच्या अस्तित्वाची दखल घेतली जाणं यालाच पक्षाच्या दृष्टीने महत्त्व होतं. तात्पर्य, जे अपेक्षित होतं ते या निवडणुकीने दिलं. त्यातून पुढच्या वाटचालीला बळ मिळालं. श्रीपाद नाईक, मनोहर पर्रिकर या संघाच्या स्वयंसेवकांना गोव्यात भाजपा रुजवण्यात यश येतं आहे, याचीच ही निवडणूक द्योतक होती.

***

त्यानंतर आल्या त्या 94च्या विधनासभा निवडणुका. या वेळी पुन्हा, मगोबरोबर आघाडी करायची किंवा कसं याची चर्चा सुरू झाली. मगोनंही भाजपाच्या अस्तित्वाची दखल घेतली होती. त्यामुळे आघाडीला त्यांचीही मान्यता होती. आघाडी झाली आणि भाजपातर्फे कोणाला उमेदवारी द्यायची याचा विचार सुरू झाला. पणजीत उमेदवार चांगला दिला तर भाजपाचा उमेदवार निवडून येऊ शकतो, असं तिथल्या जाणकारांचं मत होतं. लोकसभेच्या निवडणुकीपासून पर्रिकरांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यामुळे पणजी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. या निवडणुकीत भाजपाने आठ उमेदवार उभे केले, त्यातले चार जण निवडून आले. त्यापैकी एक मनोहर पर्रिकर... सत्ताकारणातलं हे त्यांचं पहिलं पाऊल!

आमदार म्हणून निवडून आल्यानंतर लोकांचं त्यांच्याकडे लक्ष अधिक गेलं. खरं तर त्या वेळी भाजपा हा काही विधानसभेतला प्रमुख विरोधी पक्ष नव्हता, पण तरीही काम करण्याच्या पर्रिकरांच्या पध्दतीमुळे त्यांनी गोव्याच्या जनतेचं लक्ष वेधून घेतलं. विधानसभेतल्या अभ्यासपूर्ण विवेचनामुळे ते राजकारणाकडे किती गंभीरपणे पाहत आहेत याची जाणीव झाली. विधानसभेतलं कामकाज, त्याची पध्दत, त्यातल्या खाचाखोचा त्यांनी खूप वेगाने समजून घेतल्या. त्यांच्या या वैशिष्टयामुळे, विरोधी पक्षनेतेपद नसतानाही खऱ्या अर्थाने विधानसभा गाजवली ती त्यांनीच...! फक्त चार आमदार असूनही भाजपाचं विधानसभेतलं अस्तित्व तेव्हापासून ठळकपणे जाणवायला लागलं, भाजपा हा गोव्यातला एक प्रमुख राजकीय पक्ष आहे, अशी त्याची दखल घ्यायला सुरुवात झाली.

94च्या निवडणुकीनंतर गोव्यात भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. तिचंही आयोजन मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्वाखाली झालं. अशा व्यवस्थात्मक कामांमध्ये पर्रिकरांना पहिल्यापासूनच विशेष रस. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या नेटक्या नियोजनामुळे पक्षपातळीवरही त्यांच्याकडे सर्वांचं अधिक लक्ष गेलं.

***

त्या 5 वर्षांत भाजपाच्या आमदारांनी मगोच्या कणाहीन धोरणाचा अनुभव घेतला. काँग्रेस आणि मगो या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे लक्षात आलं. त्यातूनच, 99 सालची निवडणूक मगोशी आघाडी न करता स्वतंत्रपणे लढवायची, असा निर्णय झाला.

...आणि मग श्रीपाद नाईक आणि मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली गोवा भाजपाने 22/23 जागांवर उमेदवार उभे केले. आणि प्रचाराच्या निमित्ताने संपूर्ण गोवा पिंजून काढला. 10 जागा जिंकत गोवा विधानसभेतला भाजपा हा प्रमुख विरोधी पक्ष ठरला. या निवडणुकीत दुर्दैवाने श्रीपाद नाईकांचा पराभव झाला आणि विरोधी पक्षनेतेपद मनोहर पर्रिकर यांच्याकडे अालं.

यामुळे एक झालं... 94 ते 99 या काळात जो 'अनधिकृत' विरोधी पक्षनेता होता, तो 'अधिकृत' विरोधी पक्षनेता झाला. जनतेने त्याच्या कामाची ही त्याला दिलेली पावती होती. अल्पावधीत भाजपाने घेतलेली झेप कौतुकास्पद होती... त्याचे शिल्पकार होते अर्थातच, मनोहर पर्रिकर आणि श्रीपाद नाईक. 'विधानसभेत योग्य विरोध कोण करणार? तर भाजपा करणार आणि भाजपा म्हणजेच पर्रिकर', असं समीकरण पुढल्या काळात दृढ झालं.

***

99 साली पर्रिकर विरोधी पक्षनेता झाले. त्यानंतर काही महिन्यातच, नोव्हेंबर 99मध्ये काँग्रेसच्या फालेरो सरकारला त्याच पक्षातल्या फ्रान्सिस सार्दिन यांनी बंड करून पहिला धक्का दिला. भाजपाच्या आमदारांना बरोबर घेऊन ते मुख्यमंत्री बनले. हे सख्य फार काळ टिकलं नाही आणि नाटयमय घटना घडत ऑक्टोबर 2000मध्ये मनोहर पर्रिकर प्रथम मुख्यमंत्री बनले. मात्र त्याच दरम्यान केंद्रात काँग्रेसचं सरकार आलं आणि पर्रिकरांचं हे मुख्यमंत्रिपद फार काळ टिकणार नाही, याचा अंदाज अनेक जाणकारांना आला. झालंही तसंच... फेब्रुवारी 2002मध्ये गोव्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर विधानसभा विसर्जित करण्यात आली. त्यामुळे पर्रिकरांचं हे पहिलंवहिलं मुख्यमंत्रिपद अल्पमुदतीचं ठरलं...पण मिळालेल्या कालावधीत काही चांगलं काम करून ते जनतेच्या मनात विश्वास निर्माण करू शकले, ही उपलब्धी म्हणता येईल. त्याची प्रचितीही लगेच आली. काही काळातच गोव्यात पुन्हा निवडणुका झाल्या.  भाजपाचे 17 आमदार, मगोचे 2 आणि अपक्ष यांची एकत्र मोट बांधत 29 जून 2002 रोजी पर्रिकरांचं सरकार पुन्हा सत्तेवर आलं. पक्षाला पूर्ण बहुमत जरी मिळालं नाही तरी, 94 सालच्या 4 आमदारांवरून फक्त 8 वर्षांत 17 आमदारांपर्यंत घेतलेली झेप ही त्यांच्या - पर्रिकरांच्या नेतृत्वगुणाची झलक दाखवणारी होती.  राज्याच्या राजकारणावर स्वत:चा आणि पक्षाचा ठसा उमटवण्यासाठी पर्रिकरांनी मुख्यमंत्रिपदाची ही टर्म कारणी लावली.

***

याच कालावधीत गोव्यात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. हा चित्रपट महोत्सव यशस्वी करण्यासाठी आणि या माध्यमातून गोव्याची प्रतिमा राष्ट्रीय, तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्यासाठी मुख्यमंत्री या नात्याने पर्रिकरांनी विशेष श्रम घेतले. प्रत्यक्ष महोत्सव होण्याआधी मिळालेल्या अल्प मुदतीचा उपयोग करत पणजी शहराचा कायापालट केला. त्यासाठी अतिशय वेगाने अद्ययावत थिएटर्स बांधली गेली. तो महोत्सवही खूप गाजला.

वयाची 60 वर्षं पूर्ण झालेल्या गरजू ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी 'दयानंद सामाजिक योजना' सुरू करण्यात आली. राज्यातल्या रखडलेल्या पुलांची कामं आणि नवीन पुलांची उभारणीही याच काळात झाली. दूध उत्पादकांसाठी कामधेनू योजना, दीनदयाळ स्टॉल्स् आणि प्रशासनात निर्माण केलेली शिस्त-बसवलेला वचक यामुळे अल्पावधीत ते लोकप्रिय झाले.  प्रशासनात झालेला गुणात्मक बदल, भ्रष्टाचाराविरोधात राबवण्यात आलेली मोहीम यामुळे जनतेला दिलासा मिळाला. 'Manohar Parrikar - The leadership which delivers' असा संदेश त्यांच्या कामातून लोकांपर्यंत पोहोचला. व्यक्तिगत आणि राजकीय अशा दोन्ही स्तरांवर पूर्णपणे नॉन-करप्ट आणि उत्कृष्ट चारित्र्याचा राजकारणी अशी त्यांची प्रतिमा लोकांच्या मनात खोलवर रुजत गेली.

***

मात्र असं असूनही, हाती आलेली सत्ता अडीच वर्षांतच गेली. कारण... भाजपाच्या 4 आमदारांनी पक्षत्याग केलाआणि पर्रिकरांचं सरकार अल्पमतात आलं. केंद्राने नियुक्त केलेले राज्यपाल एस.सी.जमीर यांनी या प्रकरणात फार मोठी (?) भूमिका बजावली. आपल्या पक्षपातीपणाचं दर्शन घडवत त्यांनी पर्रिकर सरकार बडतर्फ केलं. भाजपातील चौघांना लालूच दाखवून, त्यांना राजीनामा द्यायला लावून पोटनिवडणुका घेण्यात आल्या. त्यात विजय मिळवून मुख्यमंत्रिपदी आलेल्या राणे यांनी काँग्रेसचे 18, राष्ट्रवादीचे 2, तर मगो आणि अपक्षचा प्रत्येकी 1 असे आमदार जमवून सत्ता हस्तगत केली.

त्यानंतर, 2007 साली झालेल्या निवडणुकीत जनतेने पुन्हा काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या पारडयात आपलं मत टाकलं. मात्र आधीच्या दोन वर्षांच्या काळात राणेंनी केलेल्या नेतृत्वाबद्दल नाराजी असलेल्या गटाने रवी नाईक आणि दिगंबर कामत ही दोन नावं पुढे आणली. त्यात दिगंबर कामतांची सरशी झाली. आणि पुढच्या 5 वर्षांत त्यांनी राज्यकारभार कसा करू नये याचं दर्शन तमाम जनतेला घडवलं.

***

राणेंची 2 वर्षं आणि दिगंबर कामतांची 5 वर्षं, असा गेल्या एकूण 7 वर्षांतला काँग्रेसचा कारभार म्हणजे, 'एखादा पक्ष स्वतःच्या कर्माने स्वतःची कबर कशी खोदतो?' त्याचं मूर्तिमंत उदाहरण. 'एवढा अकार्यक्षम मुख्यमंत्री गोव्याने आजवर पाहिला नाही', असं प्रशस्तिपत्र काँग्रेसच्याच ज्येष्ठ नेत्याकडून मिळवणारं हे दिगंबर कामतांचं सरकार. सेझचा भूसंपादन घोटाळा, अबकारी घोटाळा, भू-रूपांतर घोटाळा आणि अलीकडचा खाणविस्तार घोटाळा... या सगळयात काँग्रेसची प्रतिमा मलिन होत गेली आणि पर्रिकरांमधला विरोधी पक्षनेता अधिकाधिक प्रभावी ठरत गेला. त्यांनी या विरोधात सरकारला सातत्याने धारेवर धरलं आणि सभागृहात भाजपाच्या अन्य आमदारांनीही त्यांना चांगली साथ दिली.

गेली 5 वर्षं काँग्रेसच्या राजवटीत गोव्यात भ्रष्टाचाराने कळस गाठला. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी अवस्था झाली. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा आपल्या सहकाऱ्यांवर अंकुश नव्हता. एकमेकांना जमेल तितकं साहाय्य करत सर्वच सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा कुपंथ धरला होता. विरोधी पक्षनेते या नात्याने पर्रिकर भरभक्कम पुराव्यांच्या आकडेवारीसह सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची एक-एक प्रकरणं तपशिलात बाहेर काढत होते... जनता दोन्ही गोष्टी उघडया डोळयाने पाहत होती. भ्रष्टाचाराने पोखरलेले सत्ताधारी आणि त्याविरोधात जनहिताचं व्यापक उद्दिष्ट समोर ठेवून निर्भीडपणे लढणारे पर्रिकर... दोघांच्याही पदरात त्यांच्या त्यांच्या करणीचं फळ जनतेने दिलं. काँग्रेसच्या उमेदवारांची संख्या एक आकडी ठेवा, असं आवाहन करत पर्रिकरांनी आपल्या सहकाऱ्यांसह या निवडणुकीचा झंझावाती दौरा केला. मतदार राजाला जागं केलं. ही निर्णायक वेळ आहे याची जाणीव करून दिली.

गोव्यातल्या केवळ हिंदू मतदारांनाच नाही तर ख्रिश्चन-मुस्लीम मतदारांनाही भाजपा आघाडीच्या बाजूने वळवण्यात यश आलं. भाजपाने केवळ हिंदूंची मतं मिळवणं असा संकुचित दृष्टिकोन ठेवू नये, ही निवडणूक म्हणजे ख्रिश्चन बांधवांना भाजपाच्या जवळ आणायची - त्यांच्या मनातले भाजपाविषयीचे गैरसमज दूर करण्याची सुवर्णसंधी आहे, हे पर्रिकरांनी ओळखलं. आणि त्यानुसार सर्व व्यूहरचना केली. जनतेकडे मतांचा जोगवा मागितला नाही, तर 5 वर्षांत विरोधी पक्षनेता म्हणून प्रभावी काम केल्यानंतर हक्काने मतांचं आवाहन केलं. 

या निवडणुकीत गोव्यात चार मुद्दे विशेष गाजले. भ्रष्टाचार, बेकायदा खाणविस्तार - त्यातून कोटयवधींची झालेली बेकायदा खनिजनिर्यात, प्राथमिक स्तरावरील शिक्षणाचे माध्यम आणि प्रादेशिक आराखडा 2021. या चार मुद्दयांच्या बरोबरीनेच अलीकडच्या काळात आणखी एक मुद्दा पुढे आला, तो म्हणजे घराणेशाहीचा मुद्दा. काँग्रेस-राष्ट्रवादी या जोडीने पोसलेली घराणेशाही. या सगळयाच्या विरोधात भाजपा-मगो एकदिलाने या निवडणुकीत उतरले.

मगो आणि भाजपाने एकत्र येणं ही काही नवीन गोष्ट नव्हती. 1994 साली भाजपाच्या 4 जणांनी विधानसभेत प्रवेश मिळवला तो मगो बरोबर युती करूनच. मात्र भाजपा आमदारांची संख्या जशी वाढू लागली तसं मगोचं अस्तित्व धोक्यात आलं. मगोच्या पारंपरिक मतदारसंघावर भाजपाने आपली पकड बसवली आहे, ही भावना वाढीस लागली आणि मगोने काँग्रेसशी जवळीक करण्यात याची परिणती झाली. दिगंबर कामतांच्या मंत्रीमंडळात मगोच्या एका आमदाराला मंत्रिपद मिळालं, पण नंतर त्यांच्या डोक्यावर अपात्रतेची तलवार सतत टांगती ठेवून त्यांचा पाठिंबा कायम राखण्यात काँग्रेस पक्ष यशस्वी झाला. या कालावधीत काँग्रेसची जनमानसातली घसरलेली प्रतिमा लक्षात घेत, या निवडणुकीचं निमित्त साधून मगोने त्यांच्यापासून फारकत घेतली आणि पुन्हा भाजपाशी युती केली. मतविभाजनाचा फायदा काँग्रेसला मिळू नये असा विचार करत भाजपानेही या युतीला मान्यता दिली. अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला या युतीचा फटका बसला आणि सध्याच्या विधानसभेतली त्यांच्या आमदारांची संख्या रोडावत नऊवर जाऊन पोचली.

***

एकूणचही निवडणूक, पर्रिकरांच्या नेतृत्वगुणाचा कस जोखणारी ठरली. 'भाजपाला बहुमताने सत्तेवर आणायचं' हे त्यांचं स्वप्न होतं. या स्वप्नपूर्तीसाठी जशी समविचारी पक्षांची-कार्यकर्त्यांची साथ जरुरीची होती, तशी राज्यातल्या जनतेनेसुध्दा भाजपाला जवळ करण्याची गरज होती. तात्पर्य, राज्यातल्या केवळ हिंदू मतांवर आपण सत्तेवर येऊ अशा भ्रामक कल्पनेत न राहता, अन्य धर्मीय नागरिकांना भाजपाकडे कसं वळवता येईल, याचा अभ्यास आणि त्यानुसार पावलं उचलणं गरजेचं होतं. ते पर्रिकरांनी अतिशय नियोजनबध्द पध्दतीने केलं आणि ऐतिहासिक विजय मिळवत भाजपाला मानाने सत्तेवर आणलं.

गेल्या काही वर्षांत काँग्रेसच्या बनवेगिरीला विटलेल्या गोव्यातल्या ख्रिस्ती आणि मुस्लीम समाजाची 'काँग्रेस नको पण भाजपा चालेल', अशी मानसिकता बनत गेली. अशी स्पष्ट भूमिका एक-दोन नव्हे तर राज्यातल्या मुस्लीम संघटनांनी घेतली. कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता या लोकांनी यंदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पारडयात आपली मतं टाकली. आजवर मुस्लीम समाजाच्या विकासासाठी कोणतेही ठोस उपक्रम हाती न घेता, केवळ लांगूलचालनाच्या बळावर त्यांना आपल्या दावणीला बांधून ठेवणाऱ्या काँग्रेसला हा हादरा होता. ख्रिस्ती समाजाचीही तीच गत होती. 'भाजपा जातीयवादी आहे, तुम्ही त्यांच्या आश्रयाला जाऊ नका', अशी सतत भीती घालून ख्रिश्चनांना भाजपापासून दूर राखण्यात काँग्रेसला आजवर यश मिळालं होतं. मात्र ख्रिस्ती समाजातील तळमळीचे कार्यकर्ते मथानी साल्ढाणा यांनी भाजपात प्रवेश केला आणि या घटनेने गोव्यातल्या ख्रिस्ती बांधवांच्या मनातले भाजपाविषयीचे गैरसमज-पूर्वग्रह दूर होण्यास मोलाची मदत झाली. याचा परिणाम असा झाला की अनेक ख्रिस्तीबहुल मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराला भरघोस मतं मिळाली, तर भाजपाच्या तिकिटावरही ख्रिस्ती उमेदवार निवडून आले. पक्षाच्या वाटचालीची भविष्यातली दिशा स्पष्ट करणारं हे परिवर्तन होतं... नव्या आशा जागवणारं होतं.

केवळ ख्रिस्ती आणि मुस्लीम धर्मीयांच्या मनात भाजपाबद्दल एक नवा विश्वास जागवून पर्रिकर स्वस्थ बसले नाहीत...'हिंदू मतदार आपलाच आहे' या भ्रमात राहणंही विजयाच्या मार्गातली धोंड बनू शकतं, याची त्यांना कल्पना होती. कोणतीही जोखीम स्वीकारायची त्यांची इच्छा नव्हती. म्हणूनच भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार श्रीपाद नाईक यांच्यासह पर्रिकरांनी मतदारांशी परिश्रमपूर्वक संपर्क साधला, अक्षरश: गोवा पिंजून काढला. 'काँग्रेसच्या तावडीतून गोवा मुक्त करण्याची ही संधी आहे. गोव्याचं बरंवाईट हे मतदारराजा तुझ्या हातात आहे', असं भावनिक आवाहन त्यांनी गोव्यातल्या जनतेला केलं आणि त्याने जनतेच्या काळजाला हात घातला. आपला गोवा एका समर्थ, विचारी नेतृत्वाच्या हाती सोपवणं ही आपली जबाबदारी आहे, याची गोव्यातल्या जनतेला जाणीव झाली आणि म्हणूनच 82% इतकं विक्रमी मतदान करत जनतेनं आपलं कर्तव्य चोख बजावलं. मतदानाची टक्केवारी ऐकल्यानंतर पर्रिकरांची तर विजयाची खात्रीच पटली. 'इतके लोक मतदानासाठी बाहेर पडले, ते भ्रष्ट नेत्यांसाठी नक्कीच नाही', असे आत्मविश्वासपूर्ण उद्गार त्यांनी निकाल मतपेटीत बंद असतानाच काढले होते आणि ते तंतोतंत खरे ठरले. विधानसभेतल्या एकूण 40 जागांपैकी 21 जागांवर भाजपाचे आमदार निवडून आले. मगो आणि अपक्षांच्या मदतीने गोव्यात भाजपाचं राज्य आलं आणि काँग्रेस एक दुबळा विरोधी पक्ष बनून सामोरा आला. त्याची पार शानच निघून गेली. 20 वर्षांपूर्वी ज्या पक्षाचं अस्तित्वही राज्यात नव्हतं, त्या पक्षाकडून हा पराभव पत्करावा लागला होता. त्यांच्या पराभवाचे 'शिल्पकार' ते स्वत:च होते. आणि विजयी पक्षाचं नेतृत्व पर्रिकरांच्या हाती होतं. भाजपाचा धाक वाटावा असं पक्षाचं स्थान त्यांच्या कारकिर्दीत गोव्यात तयार झालं... जी जबाबदारी स्वीकारली त्यात स्वत:ला पूर्ण झोकून देऊन यश मिळवायचं म्हणजे काय, याचा वस्तुपाठच त्यांनी निर्माण केला. मग अशा या यशस्वी कप्तानाच्या हाती राज्याची धुरा सोपवणं हे ओघाने झालं. शिवाय, त्याआधीची विरोधी पक्षनेता म्हणून केलेली खणखणीत कामगिरी आणि त्याही आधी अल्पजीवी ठरलेल्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकालात केलेल्या लोकोपयोगी योजना, प्रशासनावर बसवलेली पकड... ही सगळी पूर्वपुण्याई होतीच. पर्रिकरांनी राज्याचा प्रमुख होण्याआधी लोकांच्या मनात स्थान मिळवलं आणि त्यांचा विश्वास संपादन करून मग मुख्यमंत्रिपदी आरूढ झाले.

या अपेक्षित अशा विजयाने ते हुरळून गेले नाहीत... कारण, हातात सत्ता मिळवल्यावर त्यांचं त्यापुढचं स्वप्न साकार होण्याची वाट पाहतं आहे. म्हणूनच विजयाचा उत्सव साजरा करायची ही वेळ नाही, तर 'सुखी-समाधानी' गोवा या स्वप्नपूर्तीच्या दिशेने सर्वांना बरोबर घेऊन पावलं टाकण्याची ही वेळ आहे, असं त्यांचं मत... मुख्यमंत्री पर्रिकर सध्या या स्वप्नाने झपाटलेले आहेत.

***

या स्वप्नपूर्तीसाठी गोवेकरांनी त्यांना पूर्ण 5 वर्षांचा कालावधी दिला आहे. पण म्हणून स्वस्थपणे, संथगतीने काम करणं हे त्यांच्या स्वभावातच नाही. सगळा गोवा, इतकंच काय त्यांचे सहकारीही 'सुशेगाद' या शब्दावर निष्ठा ठेवून काम करत असताना एकटया पर्रिकरांनाच काय ती कामं करण्याची, तीही ठरल्या वेळेत करण्याची विलक्षण घाई आहे, असं चित्र दिसतं. एकूणात वेग हाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. नुसतं त्यांच्याबरोबर चालायचं जरी म्हटलं तरी बरोबरच्या व्यक्तीची दमछाक होते.

5 वर्षं म्हणजे सर्वसामान्यांसाठी 60 महिने, पण ठरवलेलं काम जणू काही पुढच्या 6 महिन्यांतच पूर्ण करायचं आहे, अशा  पध्दतीने पर्रिकर कामाला लागले आणि त्यांच्या या सुपरफास्ट एक्स्प्रेसमुळे त्यांच्या सहकाऱ्यांची-प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची शब्दश: झोप उडाली. रात्रीचे 12 वाजले तरी साहेब सकाळच्याच उत्साहात कार्यालयात काम करताहेत आणि दिवस उजाडत नाही तोच पुन्हा नव्याने थाटलेल्या आपल्या कार्यालयात हजर होताहेत, असं दृश्य दिसू लागलं. सुरुवातीचे दोन महिने तर दिवसांतले फक्त 4/5 तास झोप, या गतीने काम चालू होतं. पण, 'इतका ताण घेऊ नका, आपली तब्येतही सांभाळा' असं त्यांना सांगण्याची हिम्मत संजय वालावलकर यांच्याशिवाय कोण  करू शकणार? साहजिकच ही गोष्ट संजय यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. आणि मुख्यमंत्री झालेल्या आपल्या मित्राला चार गोष्टी सुनवायला ते हजर झाले. अगदी परममित्र झाला म्हणून त्यांनी सांगताक्षणी ऐकणं हे पर्रिकरांच्या प्रकृतीला मानवणारं नाही. त्यांनी आधी आपण कामाचा इतका ताण घेतोय हे अमान्य केलं आणि मग मित्र अगदी ऐकत नाही हे लक्षात आल्यावर 'नॉर्मल' माणसासारखं काम करायचं मान्य केलं. यावरची वालावलकरांची टिपण्णी मोठी मार्मिक आहे. त्यांच्या मैत्रीवर प्रकाश टाकणारी. ते म्हणतात, ''त्याने एखादी गोष्ट केलीच पाहिजे असं जेव्हा आमचं मत असतं, तेव्हा आम्ही त्याला तसा आग्रह करतो. त्याच्याशी चर्चा करत नाही की त्याला विचारत बसत नाही. आणि तोही त्याच्या स्वभावानुसार लगेच आमचं ऐकत नाही, पण काही दिवसांतच त्याने कामाचे तास कमी केले हे कानावर आलं आणि मला हवा तो मेसेज मिळाला.''

***

मुख्यमंत्री पर्रिकरांची दोन कार्यालयं आहेत... एक शासनाने त्यांना दिलेलं आणि दुसरं त्यांनी नव्याने 'तयार' केलेलं... गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान असलेला, अतिशय देखणा 'महालक्ष्मी' बंगला म्हणजे पर्रिकरांचं दुसरं कार्यालय. (मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी राहतं घर बदललं नाही. ते आजही स्वत:च्या घरात राहतात!) लोकांची कामं मार्गी लावण्यासाठी हे सरकारी पैशातून उभं राहिलेलं निवासस्थान उपयोगात यावं, ही त्यांची त्यामागची भावना. त्यामुळे सकाळी कामाची सुरुवात 'महालक्ष्मी'तून होते आणि रात्री कामाची इतिश्रीही तिथेच होते.

मुख्यमंत्री म्हटला की तो सुरक्षा रक्षकांच्या वेढयात, हे चित्र आपल्या मनात अगदी पक्कं असतं. मात्र पर्रिकर त्यालाही अपवाद. मुख्यमंत्री झाल्याझाल्या त्यांनी पहिलं काम काय केलं तर, 125हून अधिक संख्येने खास मुख्यमंत्र्यासाठी तैनात असलेली सुरक्षा रक्षकांची फौज त्यांनी 17वर आणली. त्यातलेही 15 जण असतात महालक्ष्मीच्या राखणीला आणि फक्त दोन जण त्यांच्यासमवेत! हे सगळंच अविश्वसनीय वाटावं असं, पण प्रत्यक्षात घडतं आहे. 'सुरक्षा रक्षकांच्या वेढयात तुम्ही सुरक्षित राहाल याची शाश्वती कुठे असते? आणि ते बरोबर नसतील तर तुम्ही असुरक्षित होता, असं तरी कुठे होतं?' हा पर्रिकराचा त्यावरचा सवाल आपल्याला निरुत्तर करतो. असा सगळा लवाजमा बाळगणं म्हणजे सरकारी खजिन्यावर अकारण ताण देणं, असं त्यांचं मत.

तीच गोष्ट विमानप्रवासाच्या बाबतीत. 'विमानप्रवास ही माझ्या कामाची गरज आहे. पण तो एक्झिक्युटिव्ह क्लासमधून करणं ही गरज नाही. आणि राज्य आर्थिक विवंचनेत असताना तर ही चैन करूच नये', असा विचार करणारे पर्रिकर कायम इकॉनॉमी क्लासमधून विमानप्रवास करतात. ''मी माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या गेल्या कार्यकाळात जाहीर केलं होतं, की राज्य आर्थिक संकटात असल्याने मी इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करीन. आजही राज्यासमोर आर्थिक संकट आहेच, त्यामुळे माझ्या प्रवासाचा क्लास आजही बदललेला नाही. व्यक्तिश: मनोहर पर्रिकर यांना 'एक्झिक्युटिव्ह' क्लासमधून प्रवास करणं शक्य आहे, पण असं करणं म्हणजे जनतेला दिलेल्या शब्दाशी प्रतारणा करणं आहे,'' असं मानणारे पर्रिकर आहेत. आणि त्यांचं हे वेगळेपणच त्यांना वेगळया उंचीवर नेऊन ठेवतं.

आपली तत्त्वं रोजच्या जीवनात आचरणात आणायची, तीही सहजपणे, कसलाही गाजावाजा न करता, अशी त्यांची वृत्ती आहे. पण नेमकी हीच गोष्ट राजकारणात अतिदुर्मीळ झाल्याने त्यांच्या अशा पराकोटीच्या साध्या राहणीलाच 'न्यूज व्हॅल्यू' प्राप्त होते. जुलै महिन्यातली गोष्ट. एका कार्यक्रमासाठी कोल्हापूरला गेलेले पर्रिकर गोव्याला परतत असताना एका अगदी साध्याशा (जिथे मुख्यमंत्री तर लांबच, एखादा मंत्रीही जाण्याची शक्यता नाही) अशा टपरीवजा हॉटेलात नाश्त्यासाठी थांबले. बरोबर होते संजय वालावलकर. सर्वसामान्य माणसाप्रमाणे तिथल्या बाकडयावर बसून नाश्ता करणाऱ्या पर्रिकरांना कोणीतरी पाहिलं आणि मोबाईलमधल्या कॅमेऱ्यात तो क्षण बंदिस्त केला. हा फोटो त्यानंतर काही दिवस फेसबुकवर फिरत होता. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या साधेपणाचं दर्शन घडवणाऱ्या या फोटोला असंख्य 'लाईक्स' मिळाले. मात्र या सोशल साईटस्शी काही संबंध नसणाऱ्या पर्रिकरांना त्याची गंधवार्ताही नव्हती.

असं हे त्यांचं अनोखं साधेपण... सर्वसामान्यालाही स्तिमित करणारं...एका राज्याचा प्रमुख इतका साधा कसा राहू शकतो, याचं राहून राहून आश्चर्य वाटत राहतं. माझ्या गोवा भेटीत मीही ते अनुभवलं. पर्रिकरांना मात्र त्यात फार काही कौतुकास्पद वाटत नाही. 'संघस्वयंसेवक असाच तर असायला हवा', असं त्यांचं यावर म्हणणं. आणि त्याच्या जोडीलाच या साध्या राहणीचं श्रेय ते घरच्यांना - त्यांच्या दिवंगत पत्नीला आणि उत्पल, अभिजात या दोन्ही मुलांना देतात. ''खरं तर मी असा साधा राहू शकलो याला कारण माझी पत्नी मेधा आणि दोन्ही मुलं. मेधा... माझी पत्नी खूप वेगळया नेचरची होती. अतिशय शांत, बुध्दिवादी आणि राजकारणाची फारशी आवड नसलेली. तिला छानछोकीचं आणि सरकारी सुविधा वापरून बडेजाव मिरवण्याचं कधीही आकर्षण नव्हतं. तिच्या अपेक्षा, मागण्याही अगदी कमी असायच्या. तीच गोष्ट मुलांचीही. माझी दोन्ही मुलं माझ्या राजकारणाच्या विषयांत जराही लक्ष घालणार नाहीत. त्यांनी माझी एक गोष्ट त्यांच्या लहानपणापासून पाहिली होती. ती म्हणजे, मी समाजाची कुठलीही गोष्ट माझ्या वैयक्तिक कामासाठी कधी वापरली नाही. शेवटी मुलांवर खरे संस्कार तुमच्या वागण्यातूनच तर होत असतात. वडील जेव्हा मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे कर्ज काढून उभे करतात, तेव्हा त्याचा अर्थ त्यांना कळतो. जेव्हा मी पहिल्यांदा कर्ज काढायला बँकेत गेलो, तेव्हा बँक मॅनेजरला आश्चर्य वाटलं आणि हसूही आलं. एखादा मुख्यमंत्री मुलाच्या शिक्षणाकरता कर्ज काढण्यासाठी आलेला तो पहिल्यांदाच पाहत होता. हे माझं कौतुक म्हणून सांगत नाही मी, पण माझी मुलं माझं असं वागणं बघतच मोठी झाली त्यामुळे ती खर्चीक झाली नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, माझ्या पत्नीने आणि मुलांनी मला अवघडल्यासारखं होईल अशी वेळ माझ्यावर कधी आणली नाही. त्यांना संरक्षण देण्याची, किंवा त्यांची बाजू घेण्याची वेळ माझ्यावर कधी आणली नाही. आजही माझी मुलं कधी सरकारी वाहनात दिसणार नाहीत. त्यांची अशी साथ आहे, म्हणूनच मी माझी तत्त्वं जपू शकतो.''

 त्यांच्या या साधेपणाविषयी त्यांचा मोठा मुलगा उत्पल जे बोलला, ते खरोखर महत्त्वाचं आहे. तो म्हणाला, ''बाहेरच्या लोकांसाठी ते मुख्यमंत्री असतील, पण त्यांच्यातल्या वडिलांवर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. घरी आले की ते बाकीच्या घरातल्या बाबांसारखे एक साधेसुधे बाबा असतात. राजकारणात गेल्याने त्यांची लाईफस्टाईल बदलली नाही, त्यामुळे आम्हालाही चुकीच्या सवयी लागल्या नाहीत. त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतो, पण आमच्या जगण्याकडे पाहण्याचा त्यांचा आणि आमचा दृष्टिकोन बदलत नाही.''

पर्रिकरांच्या कुटुंबाने घालून दिलेला हा वस्तुपाठ सर्वच राजकारण्यांच्या कुटुंबीयांनी गिरवला तर? हे सगळं ऐकताना हा प्रश्न राहूनराहून मनात येतो.

आणि हा साधेपणाच त्यांना गोवेकरांच्याही अधिक जवळ घेऊन जातो. 'हा आपला माणूस आहे' अशी भावना त्यांच्या मनात जागवतो. त्यामुळेच, मागेपुढे सुरक्षा वाहन नसलेली पर्रिकरांची लाल दिव्याची गाडी गोव्याच्या एखाद्या रस्त्यावरून सायरन वाजवत, वाट काढत जेव्हा पुढे जाते, तेव्हा लोक रस्त्याच्या बाजूला आपल्या या लाडक्या मुख्यमंत्र्याकडे कौतुकाने पाहत उभी राहतात, त्यांना हात उंचावून दाखवतात.

***

साधेपणाइतकीच आणखी एक लक्षवेधी गोष्ट पर्रिकरांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. ती म्हणजे, कामाचा असलेला प्रचंड उरक... कामाचं व्यसनच खरं तर! फायलीच्या वेढयात रमलेले पर्रिकर हे अगदी सर्रास दिसणारं चित्र. प्रत्येक खात्याच्या फायली तपासणं, त्यावर शेरे नोंदवणं आणि तेही शक्य तितक्या वेगात, हे त्यांचं वैशिष्टय. कोणत्याही खात्याच्या मंत्र्यापेक्षा पर्रिकरांना प्रत्येक खात्याची तपशिलात माहिती असते, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. मात्र एखाद्या सहकाऱ्याला ही ढवळाढवळही वाटू शकते. पण पर्रिकरांचा हे करण्यामागचा हेतू वेगळा आहे. ते म्हणतात, ''भ्र्रष्टाचारात बरबटलेल्या मागच्या सरकारचे वाभाडे काढत आणि स्वच्छ, पारदर्शी कारभाराची हमी देत आम्ही निवडणूक लढवली आहे. तेव्हा राज्यकारभाराची घडी नीट बसवणं हे सगळयात पहिलं काम आहे, आणि तेच मी करतो आहे. माझं हे काम म्हणजे एखाद्याच्या अधिकारात ढवळाढवळ करणं नाही, तर माझ्या सहकाऱ्यांना कामाची एक पध्दती घालून देणं आहे.''


पण, असं करण्यापेक्षा सहकाऱ्यांना आपला विचार पटवून देऊन त्यांच्याकडून कामे करवून घेणं हाही यावर एक पर्याय आहे, असाही एक युक्तिवाद या संदर्भात केला जातो. पण, ''माझं हे काम करणं म्हणजे कोणाच्या कामात दखल देणं नाही. मंत्रीमंडळातले काही मंत्री नवीन आहेत. अननुभवी किंवा अल्प अनुभवी आहेत. त्यामुळे त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल. या सहकाऱ्यांच्या प्रशिक्षणाकरता आधी वेळ देण्यापेक्षा आधी कामाची घडी बसवणं मला महत्त्वाचं वाटतं, कारण त्यातून त्रस्त जनतेला दिलासा तर मिळेलच आणि आमच्याबद्दल विश्वासही निर्माण होईल. सरकार स्थिर राहण्यासाठी त्याची गरज आहे.'' पर्रिकरांचा यामागे दृष्टिकोन आहे तो असा!

****

संवेदनशील, भावनाप्रधान पर्रिकरांना आपला हळवेपणा जाहीरपणे प्रकट करणं फारसं मानवत नाही. जेव्हा संसाराचा डाव अर्ध्यावर अकस्मात सोडून त्यांची प्रिय पत्नी या जगातून निघून गेली, त्या अवघड क्षणालाही ते मोठया धीराने सामोरे गेले. झालेलं दु:ख निमूट सहन करत पुढे चालत राहिले. आपल्या या दोस्ताच्या हळवेपणाविषयी बोलताना संजय वालावलकर म्हणाले, ''मनोहर तसा पटकन हलणारा माणूस नाही. हळवा आहे. पण काही निवडक लोकांनाच त्याचं हळवेपण दिसलं आहे. आपल्या हळवेपणाचं प्रदर्शन करणं त्याला बिलकूल आवडत नाही. मेधाचं असं तडकाफडकी आणि अकाली जाणंही त्याने ज्या धीरोदात्तपणे घेतलं, त्याला तोड नाही. आम्ही त्याला फणस म्हणतो. त्याच्या जवळ जाणाऱ्यांना आधी त्याचे काटेच लागणार. त्याची आई तर त्याला 'बेरड' म्हणायची.''

अशा या पर्रिकरांच्या डोळयांना रुमाल लागलेला लोकांनी प्रथम पाहिला तो त्यांचे सहकारी आणि मित्र मथानी साल्ढाणा यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर. आणि 'पर्रिकरांचे अश्रू' ही गोष्ट साल्ढाणा यांच्या आकस्मिक मृत्यूइतकीच बातमीचा विषय झाली.

ते फारसे शब्दांत व्यक्त करत नसले तरी जवळच्या माणसांच्या आवडीनिवडीची नोंद त्यांनी घेतलेली असते, हे त्यांच्या कृतीतून दिसून येतं आणि ती व्यक्ती सुखावते. उमा ही पर्रिकरांची मोठी सून. ''माझ्या वडिलांइतकंच प्रेम मला बाबांकडून मिळालं. मी खूप वेगळया वातावरणातून या घरात आले, पण त्यांच्या राजकारणातल्या इमेजचं मलाही कधी दडपण आलं नाही. या घरात मला कधी ते जाणवलंच नाही. ते खूप कमी वेळ घरात असतात, पण असतात तेव्हा फक्त घराचे असतात.'' तर उत्पल म्हणतो, ''बाहेरगावाहून येताना बाबा एकवेळ आमच्या दोघांसाठी काही आणायला विसरतील, पण उमाची आवडनिवड लक्षात ठेवून तिच्यासाठी ते नक्की छानसं गिफ्ट घेऊन येतात.''

***

राजकारणी म्हणून त्यांचा सगळयात मोठा गुण किंवा ऍसेट म्हणजे त्यांचं स्वच्छ आणि पारदर्शी राजकीय आणि व्यक्तिगत चारित्र्य. राजकीय विरोधक, अन्य पक्षीयांचंही यावर एकमत. 7/8 वर्षांपूर्वी जेव्हा पर्रिकर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हाची एक आठवण. त्या वेळी चर्चिल आलेमावसारखा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला, सर्वांवर दहशत बसवणारा राजकारणी जे बोललाय, ते पर्रिकरांच्या या वैशिष्टयावर प्रकाश टाकणारं आहे. त्यांची जाहीरपणे स्तुती करताना चर्चिलने म्हटलं होतं, ''कोणत्याही मुख्यमंत्र्यासमोर मी आजपर्यंत छाती पुढे काढून जात असे. पण हा वयाने लहान असतानाही मी याच्यासमोर नम्र होऊन येतो. ज्याला काम करण्यासाठी दारू, पैसा की अन्य कोणतंही आमिष लागत नाही, जो सतत कामात असतो आणि झोकून देऊन काम करतो, त्याच्यासमोर जाताना आमच्यासारख्या लोकांना मान खाली घालूनच जावं लागतं.''

या गुणामुळेच विरोधी पक्षांना त्यांचा प्रचंड धाक वाटतो.  राजकीय बदला वगैरे जसं कधी त्यांच्या मनात नसतं, तसं उगीचच कोणाला 'फेवर' करणंही नाही. सुभाष वेलिंगकर यांनी या संदर्भात एक आठवण सांगितली. ''मनोहर आमदार झाला तेव्हा माविन गुदिन्हो काँग्रेसचे मंत्री होते. (आता ते विरोधी पक्षातले आमदार आहेत.) त्या वेळी फॅक्टरीसाठी म्हणून इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये त्याला प्लॉटस् पाहिजे होते. पण ते नॉर्मल प्रोसिजरमध्ये मिळत नव्हते. मनोहर पहिल्यापासूनच विधानसभेतला चौकस आणि अभ्यासू आमदार म्हणून प्रसिध्द होता. विरोधी पक्षनेता नसतानाही तो एक लढवय्या आमदार होता. त्याच्याकडे आपले प्रश्न नेले तर ते सुटतील, या विश्वासाने लोक प्रश्न घेऊन यायला सुरुवात झाली होती. त्या वेळी माविनने त्याला मोक्याच्या जागी 2/3 इंडस्ट्रीयल प्लॉट्सची ऑफर दिली होती. खरं तर, ती मनोहरची गरजही होती. तरीही नियमानुसार काय ते मिळावं अशी त्याने भूमिका घेतली. त्यावर माविनने त्याला, ''राजकारणात असं असतं. असा राजकीय लाभ घ्यायचा असतो'', वगैरे सल्ला द्यायचा प्रयत्नही केला. पण त्याचा मनोहरवर काही परिणाम झाला नाही. मनोहरचं काम करून त्याला आपल्या उपकारांच्या ओझ्याखाली ठेवला की तो चार जणांच्या भानगडी उकरून काढणार नाही, त्यासाठी ही ऑफर होती. नंतर माविन वीज मंत्री असताना मनोहरने त्याची सगळी कुलंगडी बाहेर काढली, त्या वेळी सरकारच कोसळलं म्हणून त्याला अटक व्हायची वाचली. मात्र ते प्रकरण अजून चालू आहे. आणि माविनच्या डोक्यावर अटकेची तलवार आजही लटकतेच आहे.''

  ***

राजकारणात असूनही स्वत:चं सत्त्व आणि स्वत्व राखणारा असा हा मुलखावेगळा राजकारणी. गोव्यासारख्या छोटया राज्यात असूनही अन्य भारतीयांचं लक्ष वेधून घेणारा. समस्त गोवेकरांचा लाडका मनोहरभाई, विरोधी पक्षांवर आपल्या स्वच्छ, पारदर्शीकारभारातून जरब बसविणारा, आपल्या कामातून  राज्यकारभाराचे धडे घालून देणारा हा मुख्यमंत्री... आजच्या भारतीय राजकारणातलं एक भरवशाचं व्यक्तिमत्त्व. एक आशास्थान!

महाराष्ट्राच्या एका जिल्ह्याएवढा आकार असलेलं गोवा राज्य हे अशा कर्तृत्ववान व्यक्तीसाठी राजकीय कारकिर्दीची सुरुवात असू शकते. मात्र एकदा का इथल्या कारभाराची घडी बसली, त्या राज्यातलं भाजपाचं स्थान मजबूत झालं की त्यांनी गोव्याची वेस ओलांडून बाहेर पडायला हवं... कारण गोव्याइतकीच आज देशालाही अशा व्यक्तीची गरज आहे. शिवाय त्यांची कर्तबगारी पूर्ण रूपात प्रकट होण्यासाठीही त्यांना आता अधिक विस्तृत अवकाश मिळायला हवं, अशी बहुतेकांची इच्छा-अपेक्षा आहे. असं असताना स्वत: पर्रिकर मात्र त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल अलीकडे काही वेगळी-त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना बुचकळयात टाकणारी मांडणी करताहेत.

''या टर्मनंतर मी निवडणूक  लढवणार नाही'', असं पर्रिकर अलीकडे अनेक कार्यक्रमातून बोलतात. आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. असा माणूस राजकारणातून दूर झाला तर मग उरलं काय? अशी सर्वसामान्यांची प्रतिक्रिया होते. त्यांनी असं बोलू नये, असं अनेकांना वाटतं. पण हे बोलून दाखवायचा, त्याविषयी नाराजी व्यक्त करायचा अधिकार काही मोजक्या काही मित्रांचा. तो ते वापरतात, ''तू राजकारणात राहायचं की नाही हे ठरवायचा अधिकार आता तुझा नाही. तू तुझं मत मांडू शकतोस पण निर्णय नाही घेऊ शकत... हे राज्य, हा देश तो निर्णय घेईल'' अशी या मित्रमंडळींची भूमिका, जी पर्रिकरांपर्यंत पोहोचवली गेली आहे.

मात्र तरीही पर्रिकर सध्यातरी आपल्या विधानावर ठाम आहेत. या संदर्भात त्यांच्याकडे त्यांचं असं स्पष्टीकरण आहेच. त्यांचे काही वेगळे प्लॅन्स आहेत. ''तसा मी रूढार्थाने शेतकरी कुटुंबातला नाही. पण राजकारणातून बाहेर पडून मला शेतीतले प्रयोग करायचे आहेत. लहानपणी मला किचन गार्डनिंगची खूप आवड होती. घराच्या परसदारी मी माझी ही हौस भागवत असे. अगदी रोजच्या रोज होणाऱ्या रोपाच्या वाढीची मी सगळी निरीक्षणं करायचो. तुमच्या डोळयासमोर एका छोटया बीपासून झाड तयार होतं, हे पाहणं, अनुभवणं खूप इंटरेस्टिंग वाटतं मला. त्याच छंदातून माझ्यात शेतीची आवड रुजली असावी. म्हणूनच एखादं आयडीयल मॉडेल फार्म करून पाहायचं आहे...''

***

हे स्वप्न तर सुंदर आहेच पण मग त्यांच्या आत्ताच्या, 'सुखी, समाधानी' गोव्याच्या स्वप्नाचं काय? ते सत्यात उतरण्यासाठी हातात असलेली पुढची 5 वर्षं पुरेशी नाहीत. त्यांचं हे स्वप्न जेव्हा आणखी काही जणांचं स्वप्न होईल, तेव्हा ते प्रत्यक्षात येईल. आणि गोवा हे या देशातलं ते एक आदर्श - अनुकरणीय राज्य ठरेल. सध्याचं गोवा सरकार म्हणजे पर्रिकरांची 'वन मॅन आर्मी' आहे असं म्हटलं जातं. ही प्रतिमा पुसण्यासाठी पर्रिकरांनी त्यांच्या तोडीचे कार्यकर्ते-सहकारी तयार करणं, ही त्यांच्याकडून आजच्या घडीला केली जाणारी सगळयात मोठी अपेक्षा आहे. त्यांच्यात दडलेल्या जन्मजात 'माळया'साठी ते अवघडही नाही.

शिवाय, ज्या देशावर त्यांचं अनन्यसाधारण प्रेम आहे त्या देशालाही त्यांच्यासारख्या निःस्पृह, बुध्दिमान राजकारण्याची गरज आहेच. त्यांच्या सीमोल्लंघनाची वाट पाहणाऱ्या देशासाठी तरी त्यांनी आपल्या राजकीय कार्यकालाचा पुनर्विचार करायला हवा, इतकंच जाताजाता आग्रहाचं सांगणं!

-अश्विनी मयेकर

 

  

 

कविता (अश्विनी) मयेकर

https://twitter.com/AshwineeMayekarमुंबई तरुण भारतमध्ये रविवार पुरवणी संपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात. दूरदर्शन- सह्याद्री वाहिनीवर वृत्त विभागात काम. गेली काही वर्षं साप्ताहिक विवेकची कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी. भारतीय स्त्री शक्ती तसेच ज्ञान प्रबोधिनी या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय सहभाग.

राजकारण
लेख
संपादकीय