****अश्विनी मयेकर****
यंदाचे शांतिस्वरुप भटनागर पुरस्कार अलिकडेच जाहीर झाले, आणि त्यातल्या एका मानकऱ्याला भेटण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा टि.आय.एफ. आर.मध्ये जाणं झालं. संशोधनकार्यात गढून गेलेल्या संशोधकांना या पुरस्काराचं मोल अनन्यसाधारण आहे. त्यांच्यासाठी या क्षेत्रातल्या जाणत्या बुजुर्गांनी पाठीवर दिलेली ती शाबासकीची थाप असते. मुळात या पुरस्कारामागचा हेतूही तोच आहे. देशातल्या तरुण संशोधकांना प्रोत्साहन मिळावं, या हेतूने, वयाने 45 वर्षाच्या आतल्या संशोधकांना हा पुरस्कार दिला जातो.
विज्ञानाच्या विविध शाखांशी संबंधित 11 संशोधक यंदाच्या पुरस्काराचे मानकरी आहेत. भारतभरातल्या विविध संस्थांतून ते कार्यरत आहेत. त्यापैकी 3 जणांचा परिचय या अंकातून करून दिला आहे.
या 11 जणांमध्ये एक स्त्री संशोधक आहे -डॉ. विदिता वैद्य. टि.आय.एफ.आर.च्या जीवशास्त्र विभागात असोसिएट प्रोफेसर- सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करतात. माणसाच्या मेंदूत विविध भावना कशा प्रकारे नियंत्रित होतात याचा अभ्यास त्या आणि त्यांचा चमू करतो आहे. याच कामाबद्दल त्यांना आरोग्य विज्ञान शाखेतील भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे.
विस्तृत गप्पांमधून त्यांच्यातल्या संशोधकाबरोबरच, एका शिक्षकाचं, एका समाजचिंतकाचं, आणि एका प्रगल्भ नागरिकाचं दर्शन घडलं...या भेटीचं हे थोडक्यात शब्दांकन. 'संशोधक तो, असतो कसा आननी' सांगणारं...
डॉ. विदिता जन्मापासून मुंबईकर. आई-वडील दोघेही एम.डी., पी.एचडी., दोघेही वैद्यकीय व्यावसायिक. त्या काळच्या गोरेगावच्या निसर्गरम्य, हिरव्यागार परिसरात आईवडील, आजी-आजोबांच्या प्रेमळ, मार्गदर्शक सहवासात विदिता यांचं बालपण गेलं. आजोबा स्व. बाबूभाई वैद्य हे स्वातंत्र्यसैनिक होते.
शाळेत जाणाऱ्या विदिताला साधारण 8वी/9वी च्या उंबरठयावर जाणीव झाली की, आपल्याला विज्ञान विषयात रुची असली तरी वैद्यकीय व्यवसायापेक्षा मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रात काम करायला आवडेल. विज्ञानातल्या विशेषत: जीवशास्त्रातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात - त्याचा तळ गाठण्यात आपल्याला रस आहे.
स्वत:च्या करिअरची, तीही इतक्या लहान वयात लख्ख जाणीव व्हायला कारण घडलं ते अमेरिकेत राहणाऱ्या काकांनी दिलेलं, मेंदूची सचित्र आणि तपशीलवार माहिती देणारं पुस्तक. हे पुस्तक वाचताना मेंदूविषयी जे कुतूहल निर्माण झालं, जी कोडी पडली त्यांची उकल करत या वाटेवरून त्यांचा प्रवास चालू आहे. या पुस्तकाची आठवण आजही त्यांना उत्तेजित करते...
'प्राणीवर्तनावर भाष्य करणारं ते पुस्तक होतं. प्राण्यांचे वेगवेगळया वस्तूंशी भावनिक बंध निर्माण होण्यामागाची कारणं त्यात दिली होती. आनंद, दु:ख, निराशा या भावभावना निर्माण होण्यास मेंदू कारणीभूत असतो, असं त्यात म्हटलं होतं. माणसात वा प्राण्यात असलेल्या या गुंतागुंतीच्या भावना त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या निदर्शक असतात. आईला आपल्या मुलाविषयी वाटणारं वात्सल्य, त्याच्या भल्यासाठी सर्वस्वाचा होम करण्याची तिच्या ठायी असणारी भावना...या सगळयांचा उगम मेंदू नावाच्या शरीरातल्या महत्त्वाच्या यंत्रात आहे, याची जाणीव त्या पुस्तकाने करून दिली.
'आपल्या अन्य प्रमुख अवयवांच्या पेशी सतत बदलत असतात. त्वचापेशी मृत होतात, नव्या पेशी त्यांची जागा घेतात. यकृत, किडनी, हृदय सगळया अवयवांमध्ये ही प्रक्रिया चालू असते. फक्त मेंदूच्या पेशी त्याला अपवाद आहेत. मेंदूच्या पेशी जन्मापासून मृत्यूपर्यंत आपली सोबत करतात. हे त्याचं सर्व अवयवांपासून वेगळेपण आहे. you are born with them and they grow with you. Most of them stay with you for a life-long period. So, your neurons are your true constant companions. त्या पुस्तकातून मिळालेल्या मेंदूविषयीच्या माहितीने मला झपाटून टाकलं जणू! आणि त्याच वेळी बहुदा करिअर म्हणून संशोधनक्षेत्र आणि त्यातही मेंदूचा अभ्यास करायचा, हे नक्की झालं...'
शाळेत असतानाच करिअरची दिशा ठरली. घरून करिअर निवडीचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. त्यामुळे 11 वी, 12 वी रुईया कॉलेजमध्ये केल्यावर विदितांनी झेवियर्स कॉलेजमधून 'लाईफ सायन्स आणि बायोकेमिस्ट्री' या विषयात बी.एससी. केलं. पदवीचा अभ्यास करत असतानाच, आवडत्या संशोधनविषयात काम करण्यासाठी कुठे जायचं याचा शोध चालू होता. त्यांच्या इच्छेप्रमाणे, अमेरिकेत येल युनिव्हर्सिटीत 'न्यूरोसायन्स' या विषयात डॉक्टरेट करण्यासाठी प्रवेश मिळाला. त्या वेळी पदवीनंतर थेट पी.एचडी. साठी सहज प्रवेश मिळत असे. त्यामुळे वयाच्या 21 व्या वर्षीच विदितांची संशोधक म्हणून वाटचाल सुरू झाली. त्यात 'येल युनिव्हर्सिटी'चं योगदान मोलाचं आहे. 5 वर्षं तिथे काम केल्याने त्यांचं या विद्यानगरीशी विशेष नातं आहे.
'येलमधली संशोधनाची 5 वर्षं निव्वळ अविस्मरणीय, विलक्षण आनंद देणारी होती. प्रोफेसर रोनाल्ड डयूमन हे अतिशय चांगले मार्गदर्शक मला लाभले. तरुण वयातला उत्साह, उर्जा तर होतीच. शिवाय काही नवं करायची उर्मीही मनात होती. त्या काळातलं माझ्या भवतालचं वातावरण या सगळयाला पूरक होतं. मला त्याचा चांगला लाभ झाला.'
येलमधील संशोधन पूर्ण झाल्यानंतर प्रोफेसरचा जॉब मिळण्यासाठी विशिष्ट प्रशिक्षणाची गरज होती, त्यासाठी डॉ. विदिता कॅरोलिन्स्का इन्स्टिटयूट, स्वीडन इथे गेल्या. पण त्या आधी त्यांच्या आयुष्यात एक महत्त्वाची घटना घडली होती, ती म्हणजे लग्न. पी.एचडी. च्या शेवटच्या वर्षात त्यांनी अजित महादेवन यांच्याशी लग्न केलं. अजित एम.बी.ए. करण्यासाठी अमेरिकेत आले होते. 3 वर्षांच्या ओळखीनंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांची कार्यक्षेत्रं भिन्न होती पण दोघांनाही स्वत:ची करिअर घडवायची होती. त्यासाठी काही काळ विरह अटळ असणार याचीही परस्परांना पूर्ण कल्पना होती आणि मन:पूर्वक मान्यताही. त्यामुळे अमेरिकेतील शिक्षण संपवून अजित भारतात परतले, तर डॉ. विदिता पुढच्या शिक्षणासाठी स्वीडनला रवाना झाल्या. लग्नानंतर संसार खऱ्या अर्थाने सुरू झाला तो, 2 वर्षांनी इंग्लंडमध्ये. दोघेही काही काळ आपापल्या विषयातल्या शिक्षणासाठी तिथे आले होते. त्यानंतर दोघेही भारतात-मुंबईत परतले. विद्यार्थीदशा संपून विदिता यांची नवी 'इनिंग' चालू झाली टि.आय.एफ.आर.मध्ये. इतकं शिक्षण घेतल्यावर आणि परदेशात संशोधनाला अधिक पोषक वातावरण असताना, परतावंसं वाटणं हे ही विशेषच...त्यावर विदिता म्हणतात,
'अभ्यास झाला की भारतात, नव्हे मुंबईतच परतायचं हे जातानाच नक्की होतं. मी जन्मापासून मुंबईकर आणि या चैतन्याने भारलेल्या विलक्षण शहराच्या कायमची प्रेमात असलेली. त्यामुळे मुंबई सोडून कुठे जाणं शक्यच नव्हतं. त्यामुळे द्विधा मन:स्थिती वगैरे काही प्रकार नव्हताच. इथून जिथे कुठे आतापर्यंत गेले ते अभ्यासासाठी किंवा कामासाठी, थोडया दिवसांची पाहुणी म्हणूनच.'
वयाच्या 29 व्या वर्षी डॉ. विदिता यांनी टि.आय.एफ.आर. मध्ये प्रवेश केला. या गोष्टीला आता 15 वर्षं झाली. विज्ञानातल्या संशोधनकार्याला वाहिलेली देशातली अग्रगण्य संस्था. अशा ठिकाणी काम करायची संधी मिळणं म्हणजे संशोधकांसाठी पर्वणीच. शिवाय वास्तव्यही त्याच परिसरात असल्याने टि.आय.एफ.आर. हे दुसरं घरच आहे, इतकी आत्मीयता या संस्थेविषयी त्यांच्या मनात आहे. तो आत्मीय भाव त्यांच्या बोलण्यातून पोचतो...
'इथल्या खूप चांगल्या अनुभवांची पोतडी माझ्यापाशी आहे. एका उज्ज्वल ध्येयासाठी अद्वितीय अशा होमी भाभा, जे.आर.डी. टाटा आणि पंडित नेहरू या तिघांनी स्थापन केलेली ही अद्वितीय संस्था आहे. तिघेही आपापल्या क्षेत्रातले दिग्गज...द्रष्टे आणि ध्येयाने झपाटलेले होते. स्वातंत्र्यानंतर भारतीय चेहरा असलेल्या संशोधनक्षेत्राची उभारणी करायला हवी, या विचारातून तिघे एकत्र आले. वास्तविक तो काळ पायाभूत सुविधांमध्ये जास्तीत जास्त आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज असणारा होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी संशोधनासारख्या- दीर्घकाळाने फळाची शक्यता असणाऱ्या क्षेत्रात, जाणीवपूर्वक केलेली आर्थिक आणि योग्य मनुष्यशक्तीची गुंतवणूक त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देणारी आहे. या संस्थेत त्यांनी संशोधन संस्कृती रुजवली.'
'इथे असणाऱ्या प्रत्येक संशोधकांत विज्ञानाविषयी अत्यंत आस्था आणि एक प्रकारचं झपाटलेपण आहे. ते कोणाच्याही सहज लक्षात येईल इतकं ठळकपणे जाणवतं. अशा वातावरणात काम करायची संधी ही सच्च्या संशोधकांसाठी सुवर्णसंधी असते. प्रोफेसर व्हेरोनिका, प्रोफेसर कृष्णन यासारख्या माझ्या विभागातल्या वरिष्ठांनी माझ्यातल्या संशोधकाला आकार दिला. अशा लोकांच्या सहवासात असताना, अडचणींचे डोंगर पार करायचं बळ येतं. त्यांची प्रोत्साहक थाप काम करायला प्रेरणा देते. माझा तरुण वयातला उत्साह आणि वरिष्ठांचं प्रोत्साहन यातून कामातली गती वाढली.'
'माझ्या विभागातले माझे सहकारी, विद्यार्थी, कर्मचारी या सगळयांची मिळून एक संशोधन संस्कृती तयार झाली आहे. आमच्यात आपपर भाव नाही, हेवा नाही. आपण सगळे मिळून एकाच दिशेने चाललेले सहप्रवासी आहोत ही भावना निर्माण झाली की सगळे भेद गळून पडतात. हे माझं, हे तुझं असं काही नाहीच. आहे ते सगळयांचं...म्हणूनच, एकमेकांच्या यशात सगळे आनंदाने सहभागी होतात. सहकारी संशोधकांना मिळालेला पुरस्कार म्हणजे जणू काही आपल्यालाच पुरस्कार मिळाला आहे या भावनेने आनंदोत्सव साजरा होतो. ती सगळयांसाठी गौरवास्पद घटना असते. आपल्याकडचं ज्ञान दुसऱ्यांना देणं इथे रूजलं आहे. हे या संस्थेचं अनोखं वैशिष्टय आहे.'
माणसाच्या मेंदूत विविध भावना कशा प्रकारे नियंत्रित होतात याचा अभ्यास विदिता आणि त्यांचा चमू करतो आहे. भटनागर पुरस्काराचं मिळण्याचं कारणही हेच संशोधन. त्यासाठी टि.आय.एफ.आर. परिसरात स्वतंत्र प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेच्या आवारात एक उग्र गंध जाणवतो. याचं कारण अष्टौप्रहर उंदरांचं तिथे असलेलं वास्तव्य. उंदिर हा डॉ. विदिता यांच्या संशोधनातला अनन्यसाधारण घटक आहे.
'मेंदूचे विविध भाग आपल्या भावना कशा प्रकारे नियंत्रित करतात हे समजून घेणं, हा माझा संशोधनाचा विषय आहे. हे प्रयोग आधी उंदरांवर करतो. कारण माणसाचा मेंदू आणि उंदराचा मेंदू यात बरंच साम्य आहे. भले उंदराचा मेंदू आकाराने लहान असेल पण, त्यातील भाग आणि कार्यपध्दती, माणसाच्या मेंदूशी साधर्म्य दर्शवतात. दोघांच्या मेंदूमधल्या'सर्किटस्'मध्ये साम्य आहे. भले त्यांचं जग भले माणसाच्या जगापेक्षा वेगळं असेल. पण कोणत्याही ताणामुळे माणसाच्या मेंदूचे जे भाग कार्यान्वित होतात, उंदरांच्या मेंदूमधलेही तेच भाग कार्यान्वित होतात. अन्न मिळालं नाही किंवारात्रीच्या अंधारात अचानक प्रखर उजेड डोळयांवर आला तर अशा ताणांमध्ये त्यांच्या मेंदूमधले जे भाग कार्यान्वित होतात, तसेच कोणत्याही प्रकारच्या ताणात माणसाच्या मेंदूत कार्य घडतं. म्हणूनच डिप्रेशन, ऍंग्झायटी तसंच स्किझोफ्रेनिया या विकारांमागची कारणं शोधायला अशाप्रकारे अभ्यास चालू आहे.'
या निमित्ताने, प्रामुख्याने 2 प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. माणसाच्या लहान वयातले अनुभव त्याच्या मोठेपणीच्या वर्तनपध्दतीवर कसा प्रभाव टाकतात, हा त्यातला एक प्रश्न. प्रत्येक व्यक्ती आयुष्य ज्या प्रकारे जगतो त्या जगण्याचा परिणाम त्याच्या मेंदूवर होत असतो. तुम्ही जो अनुभव घेता तो तुमच्या मेंदूवर परिणाम करत असतो. मेंदूतील न्यूरॉन्सची संरचना, 2 न्यूरॉनमधल्या जोडण्या, या जोडण्यांमधली ताकद या सगळयावर हे अनुभव परिणाम करत असतात.'
मेंदूविषयी ऐकत असताना, एक प्रश्न मनात आला. भावभावनांचा उगम जर मेंदूमधे असेल तर, 'मन' या न दिसणाऱ्या पण जाणवणाऱ्या गोष्टीचं नेमकं काम काय?...याचं निरसनही त्यांनी केलं...त्या म्हणाल्या,
'Mind is an output of the brain and thoughts are an output of neurocircuits. These questions approached from psychology, neuroscience or philosophy are interconnected fundamental questions'
माणसाच्या आयुष्यातली पहिली 10 वर्षं त्याच्या घडणीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात. या 10 वर्षात मेंदूची वाढ आणि विकास झपाटयाने होतो. मोठेपणी एखादं मूल कसं वागेल, त्याचा स्वभाव कसा होईल याचा अंदाज, पहिल्या 10 वर्षांत त्याचं संगोपन कसं झालं आहे यावरून बांधता येतो, असं डॉ. विदिता यांचं मत. हा कालखंड मेंदूवर विलक्षण परिणाम करणारा आणि म्हणूनच अतिशय महत्त्वपूर्ण असा असतो, त्या म्हणाल्या...
"This window called critical plasticity, in which life experiance has more powerful effects on brain than any other time in life. मेंदूच्या घडणीचा हा अतिशय महत्त्वपूर्ण काळ. या काळात मातृभाषेव्यतिरिक्त दुसऱ्या भाषा मुलांना शिकवायचा प्रयत्न केला तर ते पटकन शिकतात. याचं कारण या काळात मेंदूची संस्कार करून घेण्याची क्षमता आणि ग्रहणशक्ती अफाट असते.'
'डिप्रेशन, ऍंग्झायटी वा स्किझोफ्रेनिया असे आजार होण्यामागे आनुवंशिकता हे एक संभाव्य कारण असू शकतं. पण नेहमी तेच असतं असं नाही. तुमचं बालपण कसं होतं यावर तुमचं मोठेपणीचं व्यक्तिमत्त्व अवलंबून असतं. लहानपण जर अतिशय सुरक्षित वातावरणात गेलं असेल, संगोपन उत्कृष्ट झालं असेल तर अशी व्यक्ती मोठेपणी येणाऱ्या ताणतणावांचा चांगला सामना करू शकते. त्यांच्यामधे डिप्रेशन वा ऍंग्झायटीचं प्रमाण कमी दिसतं. म्हणून बालवयात संगोपन कसं होतं याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय कुटुंबव्यवस्थेत तर संगोपन करणारी एकच व्यक्ती नसते. आईवडिलांबरोबरच घरातली अन्य वडिलधारी मंडळी एवढेच नव्हे तर अन्य नातेवाईक, शेजारीही त्यात अप्रत्यक्ष सहभागी असतात. अशा समाजात वाढताना माणसांमधे होणाऱ्या 'इंटरऍक्शनस्' माणसांमध्ये बदल घडवतात, म्हणजेच त्याच्या मेंदूतही बदल घडतो.'
'मात्र याचा काही एकच एक ठरलेला नियम नाही, हे ही आमच्या लक्षात आलं. असं असं घडलं होतं...पण त्यानंतर आयुष्यात काही बदल घडतात, घडू शकतात. there is always possibility of repair. and that we have also seen in real life. So many examples are there. आयुष्यात एखादी संधी अशी येते की त्याने गोष्टी बदलून जातात.'
डिप्रेशनसारख्या आजारावर आज बाजारात जी 'ऍंटी-डिप्रेसंट' औषधं उपलब्ध आहेत ती कितपत परिणामकारक आहेत, त्यांची परिणामकारकता तपासणं हा डॉ. विदिता यांच्या अभ्यासाचा एक भाग होता. या औषधांच्या परिणामांची गती संथ आहे. ज्यांचं डिप्रेशन तीव्र स्वरूपाचं आहे त्यांना या औषधांचा फायदा होण्यासाठी किमान 6 आठवडे औषध घ्यावं लागतं, त्यानंतर त्याचे अपेक्षित परिणाम दिसण्याची शक्यता असते. त्याचा अभ्यास करताना डॉ. विदिता यांच्या लक्षात आलं....
'50-60 च्या दशकात जगाला या औषधांचा शोध लागला. ती काही किरकोळ बदल वगळता आजही तशीच आहेत. आणि अतिशय संथगतीने परिणाम करणारी आहेत. आत्महत्या करायच्या मन:स्थितीत असलेला एखादा डिप्रेस्ड पेशंट डॉक्टरकडे गेल्यावर त्याला हीच औषधं दिली जातात. त्यांचा परिणाम कळायला 6 आठवडयांचा कालावधी लागतो. अगदी प्राण्यांमध्येही या ऍंटी-डिप्रेसंटचे परिणाम दिसायला 3/4 आठवडे लागतात. आमच्या लॅबने, हा परिणाम 1 आठवडयांतच कसा दिसू लागेल ते शोधून काढलं.'
'या औषधाचे शरीरावर चांगले आणि वाईट परिणाम एकाच वेळी होत असतात आणि त्यामुळे अपेक्षित परिणाम होत नाही हे आमच्या लक्षात आलं. औषधातले लाभदायक घटक कोणते, हानिकारक कोणते हे कळल्याने त्यातल्या चांगल्याची गती वाढवणं, वाईटाचा परिणाम कमीकमी करत नेणं हे करू शकलो. त्यामुळे उपलब्ध औषध योग्य पध्दतीने डिझाईन करून तयार करून त्याची परिणामकारकता वाढवता येते हे आम्ही दाखवून दिलं. आमच्या या कामाकडे जगभरातल्या संशोधकांचं लक्ष वेधलं गेलं, त्याची संशोधनविषयक नियतकालिकांतून प्रशंसा झाली.'
औषधोपचार हा एक उपाय झाला. त्याला पूरक उपचारांची जोड मिळाली तर त्याचा आजारी माणसाला फायदा होतो. जसे की योगोपचार, व्यायाम वगैरे...यासंदर्भात बोलताना विदिता म्हणाल्या,
'नियमित योग केल्याने काही अपाय होत नाही हे नक्की. पण या आजारात फक्त योग करून किती उपयोग होईल हे पहावं लागेल. मात्र श्वसनावर नियंत्रण मिळवणारे प्राणायामासारखे जे प्रकार आहेत ते करण्याने खूप फायदा होतो हे नक्की.श्वसनावर नियंत्रण मिळवल्याने डिप्रेशनसारख्या आजारात जे 'मूड स्विंगस्' असतात त्याला अटकाव होऊ शकतो. योगापेक्षाही नियमित व्यायाम केल्याचा अशा व्यक्तींना लाभ होतो. ज्यांना सौम्य प्रमाणात डिप्रेशनचा त्रास होतो त्यांच्यासाठी व्यायाम 'ऍंटी-डिप्रेसंट' औषधासारखा काम करतो.'
मुळात हे डिप्रेशन येतं कशामुळे आणि कोणाला? याची काही विशिष्ट कारणं नाहीत. स्ट्रेस हे डिप्रेशनचं एक मुख्य कारण. त्यात आनुवंशिकतेचा भाग थोडा पण आजूबाजूच्या परिस्थितीमुळेही 'स्ट्रेस' निर्माण होतो. म्हणूनच त्या व्यक्तीची पहिल्या 10 वर्षातली घडण समजून घेण्याला विदिता जास्त महत्त्व देतात.
'मुळात आपल्याकडे डिप्रेशन झालेल्या व्यक्तीकडे बघायची नजर बदलायला हवी. तो आजार आहे, त्यातून त्या व्यक्तीला बाहेर यायला मदत करायची आहे याचं भान सर्वसामान्यांनी ठेवायला हवं. त्यांचा त्रास समजून घेण्यासाठी सहसंवेदना असायला हवी. औषधापचार हा उपचाराचा एक भाग झाला, पण परिस्थिती-इतरांच्या प्रतिक्रियाही परिणाम करत असतात हे लक्षात घेऊन इतरांनी आपलं वर्तन ठेवायला हवं.'
सध्या विदिता यांच्या प्रयोगशाळेत अतिशय उत्साहपूर्ण वातावरण आहे. त्यांचं संशोधन एका निर्णायक वळणावर येऊन पोचलं आहे, त्या म्हणाल्या...
'मेंदूतली अशी कोणती सर्किटस् आहेत, जी व्यक्तीत वर्तनबदल घडवून आणतात हे शोधणं ही आमच्या संशोधनाची पुढची पायरी आहे. यात आम्ही खूप महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोचलो आहोत, त्यामुळे लॅबमध्ये सध्या अतिशय 'एक्साइटमेंट' आहे.'
विदिता यांच्याबरोबर काम करणाऱ्या टीममध्ये तरुणांचा सहभाग जाणवण्याजोगा असला तरी आपल्याकडे अजूनही म्हणावं तितकं संशोधनाला महत्त्व दिलं जात नाही. करिअर म्हणून इकडे वळणारे आजही कमी असतात, ही वस्तुस्थिती आहे. यावर बोलताना त्यांनी सांगितलं,
'मला वाटतं की संशोधनाला लागणारा दीर्घ काळ हे त्यातलं एक मुख्य कारण असावं. तसं आर्थिक लाभाचा विचारही त्याच्याशी जोडलेला आहे.'
'नव्याने काही शोध लागल्यावर मिळणारं समाधान हे अत्युच्च कोटीतलं असतं. ज्ञानाची साधना करणाऱ्यांचं हे क्षेत्र आहे. आपल्याकडे ज्ञानी व्यक्तींचा आदर करण्याची परंपरा होती. आज आपण व्यावसायिक फायद्याचा निकष सगळयाला लावायला शिकलोय. हा दृष्टीकोन बदलला तर तरुण पिढी या क्षेत्राकडे वळेल. आज परिस्थिती बदलली आहे. आज आपल्या देशातही संशोधनक्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. पण आजही दुर्दैवाने इकडे येणाऱ्यांमधे मुलींचं प्रमाण कमी आहे. कारण उघड आहे. इथे करावे लागणारे अपार कष्ट, द्यावा लागणारा वेळ आणि घर-संसार यांची सांगड घालता येत नाही.'
'मुलींच्या बाबतीत बोलायचं तर प्रश्न त्यांच्या क्षमतेचा नाही तर त्यांना उपलब्ध असलेल्या संधीचा आहे, प्रोत्साहक वातावरणाच्या अभावाचा आहे. मला जे वातावरण माझ्या माहेरी, सासरी लाभलं, जे प्रोत्साहन माझ्या यजमानांकडून मिळालं ते अजूनही दुर्मीळ समजलं जातं. म्हणून इच्छा असूनही फारशा मुली इकडे वळत नाहीत.'
'आजही अनेक घरांतून मुलांना वाढवणं ही फक्त आणि फक्त आईची जबाबदारी आहे असं मानलं जातं. वास्तविक तसं असता कामा नये. ती आई वडिलांची दोघांची जबाबदारी असायला हवी. तसं असेल तर मुलाची वाढ अधिक गुणवत्तापूर्ण होऊ शकते. आणि ते पालक पित्यासाठीही महत्त्वाचं आहे. पालकपणाच्या प्रक्रियेतून त्याच्या व्यक्तिमत्त्वालाही एक नवा आयाम प्राप्त होत असतो. तान्ह्या मुलाच्या संगोपनासाठी आईवडिलांना सारखीच रजा स्वीडनमध्ये मिळते. अशी संधी आणि असं वातावरण आजच्या तरुणीला मिळालं तर ती मुलाइतकीच प्रगती करू शकेल यात मला तरी काही शंका नाही.'
संशोधन हे माणसाचं जगणं अधिकाधिक गुणवत्तापूर्ण करणारं, समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारं असतं. इतकं महत्त्वाचं योगदान देणारे संशोधक मात्र समाजापासून खूप अलिप्त असतात. त्यांच्या कामाच्या वेळी ही अलिप्तता समजू शकते, पण इतर वेळीही सर्वसामान्यांपासून ते लांबच असतात, यामागचं कारण सांगाताना विदिता म्हणाल्या,
'संशोधक हा ही तुमच्यासारखा मानवी भावभावना असलेला माणूस असतो. त्यालाही संशोधनापलिकडचं जग असतं..त्याचे म्हणून काही विरंगुळयाचे विषय असतात. त्यात रमून तो पुन्हा कामासाठी एनर्जी मिळवतो.'
'पण आम्ही आणि अन्य यांच्यात एक अदृश्य भिंत आहे खरी. आमच्याबद्दल एक प्रतिमा लोकांच्या मनात आहे. ती दूर व्हायला हवी. त्यासाठी दोघांनी प्रयत्न करायला हवेत. आम्हीही आमच्या भोवताली असलेलं कवच भेदून लोकांमध्ये मिसळायला हवं. शेवटी आमचं काम हे समाजासाठीच तर चालू असतं. प्रयोगशाळेत दिवस दिवस, वर्ष वर्ष स्वत:ला कोंडून घेऊन आम्ही जे काम करतो त्या संशोधनाचा अंतिम लाभार्थी समाजच तर असतो. आणि अशा संस्थांच्या माध्यमातून आम्ही जे काम करतो आहोत त्यासाठी लागणारा नेता लोकांनी भरलेल्या करांमधूनच उभा राहिला आहे, याचं भानही असायला हवं.'
'लोकांमध्ये विशेषत: आजच्या किशोरवयीन मुलांमध्ये संशोधनामध्ये रुची निर्माण होण्यासाठी त्यांना योग्य वयात अशा संस्था, तिथलं वातावरण दाखवायला हवं. टि.आय.एफ. आर.मध्ये वर्षातले 2 दिवस नववी/दहावीच्या मुलांना संस्था, त्यातले विविध विभाग दाखवण्यासाठी ठेवले जातात. त्यातून ही दरी कमी होईल, पण तेवढंच पुरेसं नाही, हे खरंय..'
संशोधक आणि सर्वसामान्यांमधला संवाद वाढण्यासाठी, अंतर कमी होण्यासाठी संवादाचा पूल उभारायचं काम प्रसारमाध्यमांनी करायला हवं. यातली आपली जबाबदारी ओळखून वाटा उचलायला हवा, अशी अपेक्षा डॉ.विदिता यांनी भेट संपवताना व्यक्त केली.
शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार 2015चे मानकरी
9594961865