******दिलीप करंबेळकर******
आपली जीवशास्त्रीय व जनुकीय घटकांची साधनसामग्री घेऊन माणूस समाजरचनेच्या जंजाळात आपली जागा, अवकाश, सुख आणि ओळख शोधत असतो. त्याच्याभोवती धर्म, परंपरा, कायदा, सभ्यासभ्यतेच्या कल्पना आदी जे समाजनिर्मित महाजाल पसरलेले आहे, त्याचा अर्थ लावत, त्यानुसार आपल्या निसर्गनिर्मित गुणांना वळण देत, त्यातील अनुकूल घटकांचा उपयोग करून घेत, त्यातील प्रतिकूल घटकांवर मात करत किंवा त्यापुढे शरणागती पत्करत त्याचा जीवनप्रवाह सुरू राहतो...मानवजात वयात आली, तेव्हापासून 'मी कोण? माझा समाजाशी संबंध काय? माझा व समाजाचा विराट विश्वाशी संबंध काय? या सर्वांच्या अस्तित्वाचे कारण काय?' आदी प्रश्न त्याच्यापुढे पडले व त्या-त्या वेळच्या आपल्या मगदुराप्रमाणे माणसाने त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला...जीवनाचा अर्थ लावण्याच्या विविधतेमुळे निर्माण झालेले हे विविध मार्गच माणसाच्या सुखाऐवजी दु:खाला कारणीभूत होतात, असा अनुभव येत आहे. त्यामुळे सुख नावाचा हा मायावी मृग कसा शोधायचा व पकडायचा हा आपल्यापुढचा कूटप्रश्न आहे.
तो सापडला नाही, तरी जे माणसाभोवती समाजाने जे मायाजाल उत्पन्न केले आहे, त्याची बाळबोध कारणमीमांसा तरी करता येते का? ते पाहण्याचा प्रयत्न करू.
माणसाला जेव्हा 'मलाही स्वत:ची मते आहेत' असे वाटू लागते, तेव्हा त्याची बाल्यावस्था संपून तो वयात आला असे समजायला हरकत नाही. स्वत:ची मते याचा अर्थ तो या जगात आपल्या सुखाचा रस्ता शोधायला सुरुवात करतो. हे सुख म्हणजे काय हे त्याला स्पष्टपणे समजले नसले, तरी सुख नावाची संकल्पना त्याला मोहवीत असते व त्याच्या शोधात तो आपली पावले टाकायला लागतो. मानवी प्रकृतीचे तीन प्रमुख घटक असतात. पहिला जीवशास्त्रीय. आहार, निद्रा, भय, मैथुन आदी जीवशास्त्रीय घटकाचे भाग असतात. माणसाच्या शारीरिक ठेवणीपासून व्यक्तीगुणांपर्यंतची वैशिष्टये ही जनुकीय घटकातून येतात. या पलीकडे व्यक्तीची जी जडणघडण होते, ती समाजशास्त्रीय घटकाचा भाग असते. पहिले दोन घटक हे नैसर्गिक असतात. तिसरा घटक मात्र मानवनिर्मित आहे. याच घटकामुळे माणसामध्ये क्रोध, लोभ, मोह, काम, मत्सर आदी स्वभाववैशिष्टयांना शस्त्ररूप देणारी साधने मिळतात, संपत्ती, सत्ता, प्रसिध्दी आदी आकांक्षासाठी विविध व्यासपीठे उपलब्ध होतात, आपल्या भावना, इच्छा, आकांक्षा यांच्या अभिव्यक्तीसाठी भाषा तयार होते, ललित, संगीत, चित्र आदी कलांची निर्मिती होते, अहिंसा, सत्य, अपरिग्रह, परोपकार, मानवता, समानता आदी जीवनमूल्ये तयार होतात. आपली जीवशास्त्रीय व जनुकीय घटकांची साधनसामग्री घेऊन माणूस समाजरचनेच्या जंजाळात आपली जागा, अवकाश, सुख आणि ओळख शोधत असतो. त्याच्याभोवती धर्म, परंपरा, कायदा, सभ्यासभ्यतेच्या कल्पना आदी जे समाजनिर्मित महाजाल पसरलेले आहे, त्याचा अर्थ लावत, त्यानुसार आपल्या निसर्गनिर्मित गुणांना वळण देत, त्यातील अनुकूल घटकांचा उपयोग करून घेत, त्यातील प्रतिकूल घटकांवर मात करत किंवा त्यापुढे शरणागती पत्करत त्याचा जीवनप्रवाह सुरू राहतो. जीवनातील मानवी सुखदु:खाच्या बहुसंख्य कल्पना सामाजिक प्रतिसादाशी निगडित असतात. मानवजात वयात आली, तेव्हापासून 'मी कोण? माझा समाजाशी संबंध काय? माझा व समाजाचा विराट विश्वाशी संबंध काय? या सर्वांच्या अस्तित्वाचे कारण काय?' आदी प्रश्न त्याच्यापुढे पडले व त्या-त्या वेळच्या आपल्या मगदुराप्रमाणे माणसाने त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. भाषेच्या शोधामुळे त्याला सामूहिकता आली आणि एका पिढीचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत जाण्याची सोय झाली. त्यामुळे समग्र मानवजातीचे असे अनुभव संचित निर्माण झाले. या जीवनविषयक अर्थ लावण्याच्याच सर्व प्रयत्नांना आपण 'तत्त्वज्ञान' म्हणतो. या सर्व तत्त्वज्ञानांचा अभ्यास करून जीवन जगायचे, म्हणजे क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करण्यामुळे परीक्षा द्यायलाही वेळ झाला नाही अशी स्थिती निर्माण होते. म्हणून जीवनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी धर्म, संप्रदाय, कायदे, परंपरा, रूढी, आप्तजन, ज्ञानी लोकांची मते आदीचा आश्रय सामान्य लोक घेतात व त्यात आपली सुरक्षितता शोधतात. परंतु जीवनाचा अर्थ लावण्याच्या विविधतेमुळे निर्माण झालेले हे विविध मार्गच माणसाच्या सुखाऐवजी दु:खाला कारणीभूत होतात, असा अनुभव येत आहे. त्यामुळे सुख नावाचा हा मायावी मृग कसा शोधायचा व पकडायचा हा आपल्यापुढचा कूटप्रश्न आहे. तो सापडला नाही, तरी जे माणसाभोवती समाजाने जे मायाजाल उत्पन्न केले आहे, त्याची बाळबोध कारणमीमांसा तरी करता येते का? ते पाहण्याचा प्रयत्न करू.
यातून पहिला प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे व्यक्तीभोवती जे समाजाचे महाजाल निर्माण झाले आहे, त्याची खरोखरच अपरिहार्यता आहे काय? माणूस सोडून अन्य प्राणी बहुधा त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मानुसार सुखदु:खाचा अनुभव घेत असावेत. त्यात ते असुरक्षित असले व त्यांना प्राक्तनभोग भोगावे लागले, तरी मानवनिर्मित संस्कृतीतील सुखदु:खाप्रमाणे त्यांना स्वनिर्मित भोगांना सामोरे जावे लागत नाही. माणसाने समाज निर्माण करून आपल्या सुरक्षिततेची सोय केली, पण त्याकरिता त्याला समाजनिर्मित सुखदु:खाची किंमत द्यावी लागली. हा प्रवास कसा झाला, त्याचा अर्थ लावण्याचा हा प्रयत्न.
*****
वस्तुत: इतर अनेक प्राण्यांच्या तुलनेत माणूस हा दुबळा प्राणी. त्याला समाजनिर्मितीची कळ सापडली, म्हणून तो जीवनसंघर्षातून वाचला; एवढेच नव्हे, तर त्याने आपला एवढा प्रभाव निर्माण केला की आज इतर प्राणीजीव आपल्या अस्तित्वासाठी त्याच्या मर्जीवर अवलंबून आहेत. मग इतर प्राण्यात नसलेली समाजनिर्मितीची प्रेरणा माणसात आली कुठून? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या तीन प्रमुख वाटा तयार झाल्या. यापैकी एक वाट ईश्वरी श्रध्देच्या मार्गाने जाते. 'हे जग ईश्वरनिर्मित आहे, माणूस ही त्याची सर्वाधिक आवडती निर्मिती आहे. त्याने माणसात समाजनिर्मितीची प्रेरणा निर्माण केली. मानवाला समाजनिर्मितीचा संदेश देण्याकरिता व त्याचे नियम समजावून सांगण्याकरिता त्याने आपले दूत मानवजातीत पाठविले. त्यांनी आपल्या उपदेशातून समाजनिर्मितीची सूत्रे लोकांना सांगितली. त्याने जग का निर्माण केले हे सीमित मानवी बुध्दीला कधीच कळणार नाही, त्या सूत्रांचे श्रध्दापूर्वक पालन करणे हेच जीवनाचे उद्दिष्ट असले पाहिजे', असे हा मार्ग सांगतो. 'ईश्वरी दूतांनी जी सूत्रे सांगितली, तीच नीतितत्त्वे असून त्यानुसार आपल्या जीवशास्त्रीय व जनुकीय प्रेरणांना वळण लावणे हाच सुखाचा मार्ग आहे. त्यामुळेच माणूस स्वर्गाकडे, म्हणजेच अंतिम सुखाकडे जातो. या सूत्रांचे स्पष्टीकरण करण्याचा अधिकार केवळ धार्मिक नेत्यांचा आहे. इतरांनी या नीतिविषयक सूत्रांविषयी संशय निर्माण करणे किंवा त्यांच्या सत्यतेविषयी किंवा उपयुक्ततेविषयी प्रश्न उपस्थित करणे हा गुन्हा आहे' असे हे तत्त्वज्ञान सांगते. याचा परिणाम लोकांनी आपली बुध्दी बाजूला ठेवून धार्मिक नोकरशाहीचे गुलाम बनण्यात झाला. जगभरात असे अनेक दूत आल्याने व त्यांच्या शिष्यांनी त्यांचेच सांगणे प्रमाण मानल्याने व त्यामुळेच जगाचा उध्दार होणार या श्रध्देने त्याचा प्रचार केल्याने होणारे धार्मिक कलह हा आजचा फार मोठा जागतिक प्रश्न बनला आहे. आपल्या सुखासाठी ईश्वरावर ठेवलेला भरवसा त्याच्या भक्ताच्या बौध्दिक गुलामगिरीला व त्या पंथाबाहेरच्या लोकांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणारा झाला आहे.
****
या शोधाची दुसरी वाट अध्यात्मशास्त्राकडे जाते. आपण एकाच चैतन्यतत्त्वाचे अंश आहोत, ही जाणीव माणसात असते व ही जाणीवच व्यक्तीला समाजनिर्मिती करण्यास प्रवृत्त करते असे अध्यात्मशास्त्र सांगते. प्रत्येक जीवमान वस्तू ही चैतन्याने जडाचा अनुभव घेण्यासाठी मांडलेला खेळ आहे. मानवी जीवनातली सुखदु:खे ही या खेळाचाच एक भाग आहेत. आपण चैतन्याचाच एक भाग आहोत व लवकरात लवकर हा खेळ संपवून आपल्याला चैतन्यतत्त्वाकडे परत जायचे आहे हा भाव जागृत असेल तर या सुखदु:खाच्या खेळाकडे तटस्थतेने पाहता येते. त्यामुळे लवकरात लवकर हा खेळ संपवून चैतन्याकडे परत जाणे हा जीवनाचा उद्देश असला पाहिजे, असे हे तत्त्वज्ञान सांगते. पण या साध्या वाटणाऱ्या उद्देशातून गुंतागुंतीचे समाजशास्त्र व मानसशास्त्र तयार झाले आहे. माणसाला जगण्यासाठी कोणते ना कोणते कर्म करावेच लागते. परंतु प्रत्येक कर्माच्या क्रिया-प्रतिक्रियांची एक साखळी निर्माण होते व ती माणसाला या जगाशी जखडून ठेवते. प्रत्येक व्यक्ती विशिष्ट प्रवृत्ती, गुणवैशिष्टये घेऊन जन्मलेली असते. तोच त्या व्यक्तीचा स्वधर्म. त्या प्रवृत्तीनुसार कर्म केले तर ते 'कमीत कमी' बंधनकारक होते. ही कर्मेही तीन प्रकारची असतात. सात्त्वि, राजस व तामस. यात सात्त्वि कर्मे उच्चतर, तर तामसी घातक. प्रत्येक कर्माचे फळ भोगावे लागतेच. तो भोग या जन्मात भोगून पुरा झाला नाही, तर तो पुढच्या जन्मी भोगावा लागतो. त्यामुळे माणसाला मिळालेला जन्म हा गेल्या जन्मातील त्याच्या कर्माचे फळ म्हणून असतो. याचा परिणाम गुणकर्मावर आधारित समाजव्यवस्थेचे रूपांतर अपरिवर्तनीय अशा उच्च-नीच जातींच्या उतरंडीत झाला. कर्माच्या परिणामाच्या या नियमामुळे माणसाला आपल्या जीवनात असलेल्या वंशपरंपरागत सामाजिक स्थानापेक्षा वेगळे स्थान मिळणे अशक्य झाले. व्यक्तीचे कौशल्य व कर्तृत्व जातीच्या बंधनात गोठून गेले. विशिष्ट जातीत जन्म मिळाला हे आपले गेल्या जन्मातील कर्मातून मिळालेले प्रारब्ध आहे व ते भोगूनच संपवले पाहिजे व तीच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे, या विचाराच्या प्रभावाने समाजातील उपक्रमशीलता समाप्त झाली व व्यक्तिगत व समाजाचे सामूहिक कर्तृत्व गोठून गेले. व्यक्तिगत मोक्षवादामुळे सामाजिक बांधिलकी कमकुवत झाली. अशा समाजावर ईश्वरी धर्मप्रसाराच्या प्रेरणेने प्रेरित झालेल्या आक्रमकांनी आक्रमण करावे व त्या समाजाला गुलाम बनविण्याचा प्रयत्न करावा हे स्वाभाविक म्हटले पाहिजे. सुखाच्या शोधाचा हा दुसरा मार्ग जवळजवळ एक हजार वर्षांच्या अत्याचारी राजवटींचा बळी ठरला. या सर्व कालखंडात शिवाजी महाराजांसारखा एखादा अपवाद वगळता या समाजाची सर्वांगीण सामूहिक कर्तृत्वशक्ती जागविणारा नेता मिळाला नाही. आधुनिक काळात आपल्या क्षमतांना न्याय देईल असे कर्तृत्व आध्यात्मिक संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या समाजाला दाखविता आले नाही.
*****
माणसातील समाजनिर्मितीच्या प्रेरणेचा शोध घेणारा तिसरा मार्ग 'जग ही ईश्वराची करणी आहे' असे मानत नाही, की 'माणूस हा वैश्विक चैतन्याचा एक अंश आहे' असेही मानत नाही; तर प्राणिजीवनातील अस्तित्वाच्या संघर्षातील उत्क्रांतिपर्वात इतर प्राण्यावर मात करण्यासाठी विकसित केलेला गुण आहे असे मानतो. वानरे एका नेत्याच्या नेतृत्वाखाली टोळी करून राहतात, त्याचेच अनुकरण करून एका शक्तिशाली नेत्याच्या नेतृत्वाखाली असलेली राजसत्तेची संस्था माणसाने विकसित केली. समाजात व्यक्तीने कसे वागायचे हा राजसत्ता कायद्याद्वारे निश्चित करू लागली. कायदा हे समाजनियमनाचे साधन बनला. जसजसा मानवी संस्कृतीचा विकास होऊ लागला, तसतसा हा कायदे बनविण्याचा अधिकार केवळ शक्तिशाली किंवा पराक्रमी लष्करप्रमुखाच्या ताब्यात न राहता लोकशाहीत लोकमान्यता असलेल्या लोकप्रतिनिधींच्या ताब्यात गेला. राजसत्तेची सूत्रे लष्करी सत्तेकडून नागरी सत्तेकडे जाण्याचा जो प्रवास आहे, तो म्हणजे इहवादाचा विकास.
जर समाजनियमन कायद्याच्या आधारे करायचे असेल, तर कायद्यावर व तो कायदा करणाऱ्या शासनसंस्थेवर लोकांची निष्ठा पाहिजे. केवळ पाशवी शक्तीच्या बळावर उभ्या राहिलेल्या शासनसंस्थेशी निष्ठा ठेवावी असे कसे म्हणता येईल? त्यासाठी ती लोकांनी निवडून दिली असेल, तर तिच्याशी निष्ठा असली पाहिजे या संकल्पनेला नैतिक मूल्य येऊ शकते. या विचारातून निर्माण झालेल्या आजच्या लोकशाहीची पाळेमुळे प्राचीन ग्रीसमधल्या गणराज्यात सापडतात. परंतु अशा प्रकारच्या लोकशाहीत लोकांना जर प्रगल्भ बौध्दिक नेतृत्व मिळाले नाही, तर केवळ संख्याधिक्याच्या बळावर चाललेली शासनसंस्था समाजाला न्याय कशी देऊ शकेल? केवळ संख्याधिक्यामुळे शहाणपण येते हा अंधविश्वास झाला. एकटयाने चांगला वागणारा माणूसही समूहात गेल्यावर मूर्ख व बेफाम बनतो. त्यामुळे लोकशाही शासनसंस्था यशस्वी व्हायची असेल, तर शहाण्या लोकांनी लोकांचे नेतृत्व केले पाहिजे. पण हे शहाणपण कोठून येणार? त्याकरिता ईश्वराकडे जाण्याची गरज नाही. माणसाला आपल्या वागण्याच्या बऱ्या-वाईट परिणामांच्या आधारावर विचार करून स्वतंत्रपणे नीतिशास्त्र निर्माण करता येणार नाही काय? असा विचार करून ग्रीक विचारवंतांनी अनुभवावर आधारित शास्त्रीय तर्कशास्त्राची निर्मिती केली. समाजासमोरील प्रश्न व मानवी गरजा, प्रवृत्ती व वर्तणूक व तिचे परिणाम यांचे विश्लेषण करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत यांना निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान असले पाहिजे, असे प्रतिपादन केले. या विविध घटकांच्या परस्पर संबंधांची चर्चा करण्याची सूत्रे शोधून सॉक्रेटिस, प्लेटो, ऑॅरिस्टॉटल यांनी आजच्या आधुनिक बुध्दिवादाचा पाया घातला. शासन समाजासाठी कायदे करीत असताना ते व्यक्तीच्या आंतरिक विकासाशी संवादी असले पाहिजेत हा विचार त्यांनी मांडला. ग्रीकांचा प्रभाव जसा लुप्त झाला, तसे हे विचारधनही लुप्त झाले. पण जेव्हा युरोपमध्ये प्रबोधन पर्व सुरू झाले व ईश्वर या संकल्पनेला वगळून समाज बांधणीचा विचार कसा करता येईल याचा विचार सुरू झाला, तेव्हा ग्रीक तत्त्वज्ञांच्या मांडणीने त्याला वैचारिक आधार पुरविला.
समाजविकासाच्या प्राथमिक अवस्थेत सभोवतालचा निसर्ग व त्याच्या घटना या माणसाच्या आकलनक्षमतेच्या बाहेरच्या होत्या. त्यामुळे ईश्वराची संकल्पना करून तो प्रश्न त्याने सोडवून टाकला. परंतु एकामागोमाग एक वैज्ञानिक शोध जसे लागू लागले, तशी निसर्गाची कोडी सुटायला लागली. काही नियमांनुसार निसर्ग चालतो व हे नियम मानवी बुध्दीच्या आकलनाच्या कक्षेत येऊ शकतात, असा बौध्दिक आत्मविश्वास त्याला आला. त्यातून जीवनातील कोणतीही गोष्ट वा संकल्पना गूढ नसून त्या प्रयोगसिध्द असल्या पाहिजेत व त्या प्रयोगसिध्द नसतील तर तो भ्रम आहे, असा विचार प्रभावी बनला. श्रध्देच्या बळावर ईश्वरी सत्ता उभी होती. परंतु प्रत्येक विधान किंवा संकल्पना यावर सर्व प्रकारचे संशय घेतले पाहिजेत व त्या सर्व संशयांचे निराकरण झाल्यावरच ते विधान किंवा संकल्पना सत्य मानली पाहिजे, असा विज्ञानवादी विचार निर्माण झाला. यातून शोधक बुध्दीला उत्तेजन मिळाले व जीवनाच्या सर्व क्षेत्रात ती प्रत्यक्ष प्रमाण किंवा तर्क प्रमाण शोधू लागली. यातून ईश्वराधिष्ठित धार्मिक सत्ता किंवा राजा हा ईश्वरी अंश आहे या संकल्पनांना आव्हान मिळाले. त्यातून दोन प्रश्न निर्माण झाले. पहिला प्रश्न - 'प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा उद्देश काय? त्याच्या वर्तणुकीचे नियम कोणत्या आधारावर बनवायचे? त्याच्या नीतिशास्त्राचा पाया कोणता?' असा व्यक्तीसंबंधात होता; तर 'एकदा ईश्वराचे अधिष्ठान काढून टाकल्यावर समाजधारणेचा आधार कोणता?' हा दुसरा प्रश्न होता.
मानवी प्रेरणांचा पूर्ण क्षमतेने आविष्कार घडविणे हा व्यक्तीच्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे व तसा आविष्कार घडेल असे समाजनियमन असले पाहिजे, असा आदर्श निर्माण केला गेला. हा आदर्श सांगणे सोपे होते, पण मानवी प्रेरणांचे स्वरूप काय? त्यातील विविध घटकांचे स्वरूप कसे ठरवायचे? त्यातील समाजहितकारक कोणत्या व समाजघातकी कोणत्या? व्यक्तिगत स्वातंत्र्याची कक्षा कुठे सुरू होते व समाजाचे नियंत्रण कुठे सुरू होते? प्रेरणांचे स्वातंत्र्य व मानवी मूल्ये यांचा परस्पर संबंध कोणता? असे अनेक प्रकारचे प्रश्न यातून उभे राहिले व त्यांचा धांडोळा घेताना अनेक तत्त्वज्ञाने निर्माण झाली, मानवी अंतरंगाचा अनेक वाटांनी धांडोळा घेतला गेला. त्यातून मानवी बुध्दीची व मनाची अनेक कवाडे खुली झाली. ही प्रबोधनाची प्रक्रिया प्रामुख्याने पश्चिम युरोपीय देशात घडली. त्यामुळे त्या देशांचे, विशेषत: इंग्लंडचे कर्तृत्व झळाळून उठले. जपानसारखे काही अपवाद वगळता युरोपीय देशांनी सर्व जग पादाक्रांत केले.
'व्यक्तीच्या वागण्याची गणितीय पध्दतीने मांडणी करणे शक्य आहे' यापासून 'प्रत्येक व्यक्ती ही निसर्गनिर्मित वेगवेगळी कलाकृती आहे' इथपर्यंत अनेक विचारधारा यातून निर्माण झाल्या. 'व्यक्तीच्या सहजप्रेरणांना योग्य विचारांनी वळण लावणे आवश्यक आहे या विचारापासून विचार माणसाला भ्रष्ट करतो, त्यामुळे त्याला विचारापासून बाजूला ठेवून मूळ नैसर्गिक प्रेरणांनी वागू द्या', इथपर्यंतची तत्त्वज्ञाने तयार झाली.
'समाजातल्या सर्व व्यक्ती सारख्या आहेत' यापासून 'समाजनियंत्रणासाठी महापुरुषांची, महामानवांची गरज असते, जर समाजाची सूत्रे सामान्य माणसांच्या हाती आली तर समाजाचा अध:पात होतो' असे सांगणाऱ्या नित्सेपर्यंत अनेकांनी सामाजिक व राजकीय उलथापालथी घडविल्या. मानवी सहजप्रेरणा, मन, बुध्दी, इंद्रिये आदी सर्वांचे अनुभव व त्यांचे परस्पर संबंध यांचा कीस पाडला गेला. या सर्वातून मानवी आकलनाचा प्रवाह विशाल होत गेला.
आधुनिक राष्ट्राची संकल्पना ही युरोपियन प्रबोधन परर््वाचीच देणगी आहे. प्रत्येक समाजाचे एक सामूहिक आत्मतत्त्व असते. हे आत्मतत्त्वच समाजाला एकत्र राहण्यास प्रवृत्त करते. इतिहासाच्या प्रवाहातून हे आंतरिक बंध तयार होतात. हे आंतरिक बंधच शासनसंस्थेच्या अस्तित्वाचे व स्थैर्याचे कारण बनतात. अशा सामूहिक बंधनातून तयार झालेल्या शासनसंस्थेवर निष्ठा ठेवणे हे त्या देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य ठरते. अशा शासनसंस्थेने केलेल्या कायद्याचे पालन करणे हे देशभक्तीचे लक्षण ठरते. याला अमेरिकेचा मात्र अपवाद आहे. तो देश विविध राज्यांमध्ये करार होऊन बनला. मात्र त्यानंतर अमेरिकेची सामूहिक मानसिकता बनली. अमेरिकन यादवी युध्दाच्या प्रसंगी या सामूहिक मानसिकतेचा कस लागला.
राष्ट्रवादाच्या या संकल्पनेला छेद देण्याचा मोठा प्रयत्न कम्युनिझमने केला. 'जगाचा इतिहास हा शोषकांनी केलेल्या शोषणाचा इतिहास असून प्रत्येक काळात शोषणाची साधने व संकल्पना बदललेल्या आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर 'राष्ट्र' ही संकल्पना शोषणासाठी वापरली गेली. आपल्या फायद्यासाठी भांडवलदारांनी शासनाचा उपयोग करून साम्राज्यविस्तार केला, त्यातून आपल्या कारखान्यासाठी स्वस्त कच्चा माल आणि उत्पादनांसाठी हुकमी बाजारपेठ मिळविली. आपल्या देशात मात्र राष्ट्रभक्तीच्या नावाखाली कामगारांचे शोषण केले. त्यामुळे जगातील कामगारांनी एकत्र येऊन सामूहिकपणे शोषकांची सत्ता झुगारून दिली पाहिजे व कामगारांचे राज्य स्थापन केले पाहिजे' असे माक्र्सने प्रतिपादन केले.
एकोणिसावे शतक हे राष्ट्रनिर्मितीच्या जडणघडणीचे शतक होते, त्याचा परिणाम विसाव्या शतकातील दोन महायुध्दात झाला. या युध्दात अपरिमित जीवित व वित्तहानी झाली. अणूबाँबसारख्या महाविनाशकारी अस्त्राचा उपयोग करण्यात आला. या युध्दानंतर राष्ट्रीय संघर्षाची जागा विचारसरणीच्या संघर्षाने घेतली. त्यातून निर्माण झालेल्या शीतयुध्दाने जग अनेक वेळा सर्वसंहारक ठरणाऱ्या तिसऱ्या महायुध्दाच्या टोकावर येऊन पोहोचले. परंतु शोषणमुक्तीची हमी देणाऱ्या विचारसरणींचे युग विसाव्या शतकातच संपले. राष्ट्रवादाच्या मर्यादाही स्पष्ट झाल्याने ज्या युरोपमध्ये प्रथम राष्ट्रवादाचा विकास झाला, तिथेच राष्ट्रीय सार्वभौमत्वाला मर्यादित करणाऱ्या युरोपीय महासंघाची स्थापना झाली. आता एकविसावे शतक आपल्यापुढे नवे प्रश्न घेऊन उभे आहे.
*****
व्यक्ती समाजाशिवाय राहू शकत नाही व व्यक्तीचा समाजाशी संबंध आला की त्याचा जीवनमार्ग समाज ठरवितो व तोच त्याच्या सुखदु:खाला कारणीभूत ठरतो. विविध मार्गांनी समाजाचे एवढे प्रकार विकसित होऊनही व संपर्क तंत्रज्ञानात प्रचंड क्रांती होऊनही मने जुळवायला ती असमर्थ ठरली आहे. काही हजार वर्षांपूर्वी ॠषिमुनींना माणसात सुप्तावस्थेत असलेल्या चैतन्यतत्त्वाचा शोध लागला. माणसात विकसित झालेले चैतन्यतत्त्व व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीशी, व्यक्ती-व्यक्तींना समाजाशी, समाजाला समष्टीशी बांधणारा धागा बनू शकते याची त्यांना जाणीव झाली. या जाणिवेतून देशभर समाजव्यवस्थापनाची साखळी निर्माण केली. कोणतीही केंद्रीय राजसत्ता किंवा धर्मपीठ नसताना व्यक्ती-व्यक्तीच्या आंतरिक विश्वाला स्पर्श करणारा एकात्मभाव निर्माण केला. ज्ञान, भक्ती, कर्म, राजयोग आदी विविध मार्गांनी तो समाजात प्रवाहित केला. तो प्रवाहित करणाऱ्या हजारो साधुसंतांची पिढयानपिढयांची परंपरा निर्माण झाली. पण तो समाज नंतर केवळ आपल्या जातीपुरता मर्यादित, समाजनिष्ठेपेक्षा आत्मनिष्ठ मोक्षवादावर भर देणारा, दैववादी झाला. स्वत:हून कोणताही भव्य आकार घेण्यास किंवा देण्यास अक्षम असलेल्या वाळूच्या महासागरासारखा तो निर्हेतुक व निर्विकारपणे फक्त पसरला होता. त्यामुळे धार्मिक विस्तारवादाच्या प्रेरणेने संघटित झालेल्या आक्रमकांसमोर त्याचा निभाव लागला नाही. अक्षरश: एखाद्या लहान मुलाने आपल्या लाथेने वाळूचे किल्ले उद्ध्वस्त करावेत, तशा इथल्या राजसत्ता कोसळल्या. विजयनगरचे साम्राज्य प्रबळ होते, पण त्याने भारतमुक्त करण्याची अखिल भारतीय आकांक्षा जागृत केली नाही. शिवाजी महाराजांनी ती मराठी लोकांत जागृत केली, पण नंतरच्या मराठी नेतृत्वाला ती अन्य प्रांतात संक्रमित करता आली नाही. त्यामुळे मराठी सत्तेने मुस्लीम सत्तेवर अखेरचा घाव घातला, पण स्वत:ची सत्ता दृढ करण्याचे आंतरिक सामर्थ्य तिच्यात उरले नव्हते. यास सुमारास युरोपियन प्रबोधन परर््वाने जागृत झालेल्या, स्वकर्तृत्वाच्या आत्मविश्वासाने भारलेल्या, वैज्ञानिक क्रांतीमुळे सर्वांगीण क्षमता वाढलेल्या, नव्या संस्कृतीची दिशा दाखविणाऱ्या इंग्रजी सत्तेने प्रवेश केला. आपल्या धार्मिक श्रध्देने मुस्लिमांनी नव्या ज्ञानाचे दरवाजे आपल्या हाताने बंद करून घेतले होते. मराठी सत्तेची ऊब संपल्यावर हिंदू समाज पुन्हा एकदा थंड गोळा होऊन पडला होता. 1857च्या पराभवानंतर त्या थंड गोळयात जीव भरायला इंग्रजी शिक्षणाने जगाचे भान आलेला नवतरुणांचा वर्ग उभा राहिला.
जसजशी इंग्रजी राजवट स्थिरावली, तशी लढाईची धामधूम व अस्थिरता संपून प्रशासकीय स्थिरता आली. कायद्याचे राज्य म्हणजे काय याचा भारतीयांना परिचय होऊ लागला. बौध्दिक चर्चेचे नवे क्षेत्र त्यांच्यासाठी खुले झाले. सामाजिक परिवर्तनातील विचारांचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले. इंग्रजी संस्कृतीतील प्रेरणा, मूल्ये, संस्थाजीवन, विज्ञान, तंत्रज्ञान, राजकीय व प्रशासकीय ढाचा आत्मसात केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही हे त्यांच्या लक्षात आले. पण त्याचबरोबर काही हजार वर्षे खर्चून भारतात जे संस्थाजीवन उभे राहिले होते, त्याचे महत्त्वही ते जाणून होते. त्यामुळे ऐहिकाकांक्षी, इहवादी, बुध्दिवादी, प्रयत्नवादी, प्रयोगशील, उपयुक्ततेला अधिक महत्त्व देणाऱ्या, कायद्यासमोर सर्व समान मानणाऱ्या संस्कृतीचा व कर्तृत्वशक्ती गोठलेल्या, आपल्या जातीपुरताच संकुचित सामाजिक भाव असलेल्या, दैववादी, मोक्षवादी, प्रयोगशीलतेची धमक नसलेल्या संस्कृतीशी समन्वय कसा करायचा? हा कूटप्रश्न होता. इथल्या सांस्कृतिक जीवनस्रोताचा जिवंतपणा कायम ठेवून हे परिवर्तन कसे घडवायचे? यावर अनेक विचारप्रवाह निर्माण झाले. परंतु ही प्रक्रिया स्वातंत्र्यानंतर थांबली. स्वत:ला पुरोगामी म्हणविणाऱ्या विचारवंतांनी सर्व बौध्दिक क्षेत्राचा ताबा घेतला. कोणत्याही विषयात खोलवर जाऊन सत्य शोधण्याची या विचारवंतांची इच्छा नव्हती. आपल्या पूर्वग्रहांची आकर्षक शब्दात मांडणी करणे म्हणजे विचारवंत बनणे असा त्यांचा विचारवंत या शब्दाचा अर्थ होता. त्यामुळे या क्षेत्रात सुमारांची गर्दी झाली आहे. हिंदू संस्कृतीचा जो जीवनस्रोत आहे त्याबद्दल एकतर ते अज्ञानी आहेत किंवा त्यांच्या मनात त्याबद्दल तुच्छतागंड आहे. ईश्वरी दूतामार्फत आलेले संदेश हा मानवी संस्कृतीच्या प्रगतीतला अखेरचा शब्द अशी श्रध्दा असलेले धर्मनिष्ठ समाज मानवी संस्कृतीच्या प्रगतीला किती बाधक ठरू शकतात, याचा विचार करण्याची त्यांची इच्छा नाही. 'इहवाद' हा फॅशनेबल शब्द त्यांना माहीत आहे, पण इहवादाचे सामर्थ्य व मर्यादा यावर विविध पैलूंतून विचारमंथन होऊन पाश्चात्त्य विचारवंतांमध्ये जो बौध्दिक आत्मविश्वास तयार झाला आहे, त्याच्या पासंगालाही ते पुरत नाहीत. राजकीय परिवर्तनापाठोपाठ जर समाजाचे बौध्दिक व मानसिक परिवर्तन झाले नाही, तर निर्माण झालेला प्रगतीचा बुडबुडा पुन्हा आहे त्याच पाण्यात व हवेत विरून जाईल.
********
माणसाच्या मनात समाजनिर्मितीची प्रेरणा कशी आली असावी व त्यातून जे तीन मार्ग निष्पन्न झाले, त्याचा अत्यंत थोडक्यात व बाळबोध आढावा आपण घेतला. आपल्या देशाने या तिन्ही मार्गांचा अनुभव घेतला आहे. आपल्या देशाचा मूळ स्वभाव, समाजनिर्मिती, व्यक्तिमानस व समाजमानस हे अध्यात्माधिष्ठित मार्गाने घडले आहे व त्याचे चांगले व वाईट परिणामही आपण अनुभवले आहेत. इस्लामच्या आक्रमणाने ईश्वराधिष्ठित संस्कृतीचाही आपण अनुभव घेतला आहे. ब्रिटिश सत्तेबरोबर त्यांची संस्कृती, संस्थाजीवन, राज्यपध्दती, विचारपध्दती आपल्याकडे आली व स्वातंत्र्यानंतरही त्याच ढाचावर आपण गुजराण करतो आहोत. त्यामुळे
ढोबळपणे म्हणायचे असेल तर आपले समाजमानस त्रिभागले गेले आहे. या त्रिभागलेल्या लोकमानसामुळे राष्ट्रीय जीवनाचा पायाच पुरेसा मजबूत नसल्याने त्यावर विकासाची इमारत उभी राहू शकलेली नाही. त्यामुळे या तिन्ही मार्गातील चांगल्या गोष्टींचा समावेश केल्याशिवाय नवा समृध्द प्रवाह निर्माण होणार नाही. त्यामुळे या तिन्ही मार्गातील शक्तिस्थळे कोणती व दोष कोणते व त्यांचे निराकरण कसे करता येईल याचा विचार करू.
प्रथम ईश्वराधिष्ठित समाजांतील काही चांगल्या पैलूंचा विचार करू. 'आपण परमेश्वराने निवडलेली जमात आहोत व आज जिथे इस्रायल आहे ती आपणाला ईश्वराने दिलेली जमीन आहे' अशी ज्यू लोकांची श्रध्दा आहे. या श्रध्देमुळेच गेली शेकडो वर्षे देशोधडीला लागलेल्या व अनेक तऱ्हेचे अत्याचार सहन केलेल्या ज्यू समाजातील 'आपण एकाच समाजाचे घटक आहोत व आपणाला कधी ना कधी परत इस्रायलला जाऊन तिथे आपला देश स्थापन करायचा आहे' ही भावना व निर्धार कमी झाला नाही. या निर्धारानेच त्यांनी पंधराशे वर्षांनी आपला देश पुन्हा स्थापन केला व त्याच कडवेपणाने त्याचे रक्षण करीत आहेत. ख्रिश्चन धर्माने धर्मप्रसाराची प्रेरणा एवढया तीव्रपणे जागृत केली की अनेक मिशनरी आपली घरेदारे सोडून अगदी आफ्रिकेतील नरभक्षक लोकांच्या टोळयांतही जाऊन राहिले. पुण्यात प्लेग आल्यावर प्रत्येक जण बाहेर पळून जाऊ लागला. टिळक तेव्हा प्लेगनिवारणार्थ पुण्यात अनेक प्रकारची कामे करीत होते. आपल्या समाजाची ही अवस्था पाहून टिळक व्यथित झाले. त्यांनी केसरीत लिहिले, 'इंग्रजी सोजीर व इंग्रजी मिशनरी स्त्रिया यांना प्लेगच्या भरवस्तीत जाऊन लोकांना मदत करण्याइतकी हिंमत आहे व ते मदत करतात, ती आम्ही डोळयांनी पाहत असता आपल्या गरीब लोकांस सोजिरांच्या ताब्यात देऊन भराभर आपल्या जिवाच्या संरक्षणार्थ निघून जातो, तेव्हा आपल्या राष्ट्राचे नशीबच उघडण्याची अद्याप वेळ आली नाही म्हणून एक प्रकारच्या तीव्र निराशेने स्वस्थ बसावे लागते.'
इंग्रजी सोजीर ठीक आहे, कारण जसा हुकूम असेल तसे काम करण्याची त्यांना सवयच असते. पण अगदी मृत्यू समोर दिसत असतानाही सेवेसारखे काम करायला जे धैर्य लागते, ते ख्रिश्चन धर्माने पुरविले. एकेकाळी अरबस्थान अनेक टोळयामध्ये विभाजित होता. पण इस्लामने त्यांच्यात सामूहिक पराक्रमाची भावना जागृत केली व पाहता पाहता त्यांनी जवळजवळ निम्मे जग पादाक्रांत केले. आजही इस्लामचे तत्त्वज्ञान जगातील सर्व देशातील लोकांना जागतिक जिहादसाठी प्रवृत्त करीत आहे.
ईश्वराधिष्ठित तत्त्वज्ञान, एक समाज म्हणून जगण्यासाठी आंतरिक दृढता, पराकोटीच्या धैर्याची व त्यागाची भावना, समूह चेतना निर्माण करीत असले, तरी त्यामुळे मानवजातीसमोर अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत. यातून निर्माण झालेल्या धार्मिक साम्राज्यवादाने जग असुरक्षित बनले आहे, तर धर्मग्रंथावरील श्रध्दा हा अखेरचा शब्द मानल्याने समाजाची सांस्कृतिक वाढ खुंटली आहे. यात ज्यू धर्माचा धर्मांतरावर विश्वास नसल्याने तो विस्तारवादी धर्म झाला नाही व त्याचबरोबर नवे विचार व विज्ञान यांच्याकडे खुलेपणाने पाहिल्याने ज्यू जमात संख्येने अल्प असूनही त्यांच्यात कितीतरी वैज्ञानिक, विचारवंत होऊन गेले. अमेरिकन अर्थव्यवस्थेवर ज्यू लोकांचाच पगडा आहे. युरोपियन प्रबोधन परर््वाने युरोपियन ख्रिश्चन धर्मीयातील धार्मिक विस्तारवादाचा कडवेपणा संपवला नसला तरी कमी केला व लोकशाही, इहवादी, विज्ञानवादी संकल्पनांचे सहअस्तित्व मान्य केले. इस्लाम मात्र अशा सुधारणावादापासून कितीतरी मैल लांब आहे. हे सर्व अनुभव लक्षात घेऊन 'ईश्वरी धर्मातील आंतरिक दृढता, आपल्या तत्त्वांसाठी पराकोटीच्या धैर्याची व त्यागाची भावना, त्यातून निर्माण होणारी सामूहिक चेतना आणि ती पिढयामागून पिढया नेण्याची व्यवस्था', या गोष्टी आत्मसात करून त्यातील दोष टाळता आले, तर या गुणांच्या अभावाने आपल्या समाजात जे दोष शिरले आहेत, त्यांचे निराकरण होईल.
युरोपियन प्रबोधन परर््वाने मानवाच्या शोधक बुध्दीला नवनवी क्षितिजे मोकळी करून दिली. यामुळे ती सर्व क्षेत्रात मुक्तपणे संचार करू लागली व त्याचा परिणाम नवनव्या शोधांमधून मानवी जीवनस्तर उंचावण्यात झाला. मानवी सौख्याच्या दृष्टीने आत्यंतिक कार्यक्षम यंत्रणांची निर्मिती या नव्या पैलूने मानवी सांस्कृतिक विकासाची दिशाच बदलून टाकली. ज्या गोष्टी काही वर्षांपूर्वी स्वप्नातही अशक्यप्राय वाटत होत्या, त्या प्रत्यक्षात आल्या. मानवी जीवन अधिक गतिमान, सुरक्षित, आरोग्यपूर्ण, सुविधाजनक, प्रयत्नवादी, प्रयोगशील, ऐहिकाकांक्षी झाले. समानता, उदारमतवाद, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, सामाजिक न्यायाची संकल्पना, व्यक्तीचा जीवनस्तर एका किमान पातळीवर असणे ही सामूहिक जबाबदारी आदी नवी जीवनमूल्ये तयार झाली. परंतु यामुळे माणूस अधिक सुखी झाला का? याचे होकारार्थी उत्तर मात्र देता येणार नाही. संपर्क तंत्रज्ञानातील प्रगती व जागतिकीकरणाची प्रक्रिया म्हणून जग जवळ आले असले, तरी सर्व जगाला कवेत घेणारी सर्वसमावेशक चौकट अजून तयार झालेली नाही. जागतिकीकरणातून केवळ व्यवस्थात्मक यंत्रणा उभ्या राहिलेल्या आहेत. परंतु व्यक्ती, समाज व व्यवस्था यांना जोडणारा मानसिक, बौध्दिक किंवा श्रध्दात्मक धागा तयार झालेला नाही. त्यामुळे जगातील कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधण्याची सहज, सुलभ व परवडणारी साधने सर्वसामान्य व्यक्तीच्या कक्षेत आली असताना माणूस कधीही नव्हता एवढा एकाकीपणाचा सामना करीत आहे. हा एकाकीपणाच मानवी दु:खाचे, रोगाचे, अनैतिकतेचे, भ्रष्टाचाराचे, गुन्ह्याचे कारण बनला आहे. या एकाकीपणातून बाहेर पडण्याकरिता लोक पुन्हा एकदा मध्ययुगीन श्रध्दांचा आश्रय घेऊ लागले आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सर्व पाश्चात्त्य विचारमंथनात 'आत्मा' या घटकाचा विचार केलेला नाही. आता तो योगाभ्यासाच्या स्तरावर जीवनोपयोगी साधन म्हणून रूढ झाला आहे. पण तो एक जीवनमार्ग म्हणून सर्वंकष चर्चेचा विषय झालेला नाही. युनोमधील आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला त्याचीच आठवण करून दिली आहे. योगाभ्यासाचा वापर तसा जोवर होत नाही, तोवर या कोंडीतून बाहेर पडता येणार नाही.
जर भारत आपला मूळ आध्यात्मिक संस्कृतीचा प्रवाह कायम ठेवून या दोन्ही प्रवाहातील चांगल्या गोष्टी आत्मसात करू शकला, तर ही सांस्कृतिक कोंडी फोडू शकतो. यासाठी ईश्वरी धर्मातील आंतरिक दृढता व विश्वास आणि त्यासाठी पराकोटीचे धैर्य व त्यागभावना आत्मसात करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यातील धार्मिक विस्तारवादाचा दोष शिरू नये, म्हणून 'सर्व देव नमस्कार: केशवं प्रतिगच्छती' हा संस्कार कायम ठेवावा लागेल. त्याचबरोबर पाश्चात्य इहवादातून निर्माण झालेली बौध्दिक, तंत्रज्ञानात्मक ऊर्जा पचवायची असेल, तर ज्या काळी आपली निर्मितिक्षमता अत्युच्च शिखरावर होती तेव्हाच्या बौध्दिक चर्चेच्या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करावे लागेल.
युरोपियन प्रबोधन परर््वापर्यंत भारत व चीन यांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर प्रभाव होता. त्यानंतर युरोप व अमेरिका पुढे निघून गेले. चीन आपल्या पध्दतीने पाश्चात्त्य संस्कृतीतील काही घटकांचा स्वीकार करून पुढे जात आहे. आपल्या संस्कृतीविषयी न्यूनगंड न बाळगता पण अन्य संस्कृतीतील चांगल्या गुणांचा मोकळेपणानी स्वीकार करणारी विचारधारा किंवा नेतृत्वच ही कोंडी फोडण्याचे काम करू शकते. सुदैवाने आजचे नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व अशा प्रकारचे असल्याने ही कोंडी फुटण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.
kdilip54@gmail.com