'भारत’प्रेमाचा चित्रपटीय आविष्कार!

विवेक मराठी    09-Apr-2025
Total Views |
@धनंजय कुरणे
ख्यातनाम अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व सिनेलेखक मनोजकुमार यांचे 4 एप्रिलला निधन झाले. त्यांची चिरकाल टिकणारी जी ओळख निर्माण झाली ती ’देशप्रेमाच्या भावनेनं ओतप्रोत भरलेल्या’ चित्रपटांमुळे! प्रसिद्ध निर्माते एस. मुखर्जी यांनी, ’शहीद’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांना दिलेलं ’भारतकुमार’ हे बिरुद अतिशय सार्थ होतं. मनोजकुमार यांच्या निधनामुळे भारतमातेने एक थोर सुपुत्र गमावला आहे.
manoj kumar
 
ख्यातनाम अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व सिनेलेखक मनोजकुमार यांनी नुकताच इहलोकाचा निरोप घेतला. सध्या पाकिस्तानात असलेल्या अबोटाबाद इथं 1937 साली एका हिंदू कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ’हरीकिशन गोस्वामी’ हे त्यांचं मूळ नाव. फाळणीच्या हिंसाचाराचा मोठा फटका त्यांच्या कुटुंबाला बसला. मनोजकुमार यांचे एक काका त्यात मृत्युमुखी पडले होते. दिल्लीत पळून आल्यावर काही दिवस त्यांचं कुटुंब निर्वासित शिबिरात रहात होतं. तिथं मनोजकुमार यांचा अवघा दोन महिन्यांचा भाऊ उपचाराअभावी दगावला. त्यावेळी मनोजकुमार यांचं म्हणजेच ’हरीकिशन’चं वय अवघं दहा वर्षांचं! या दुर्दैवी घटनांचा मोठा परिणाम त्याच्या बालमनावर झाला असणं स्वाभाविक आहे. पण तो ज्या प्रकारे झाला ते विलक्षणच म्हटलं पाहिजे. अशा दंगलीत जवळची एखादी व्यक्ती दगावली तर मनात एक कमालीचा कडवटपणा, कटुता, ’विरोधी बाजूबद्दल घृणा’ निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण, दोन प्रियजनांच्या मृत्यूचा आघात सहन करूनही छोट्या हरीकिशनच्या बाबतीत असं काही झालं नाही. उलट, वाढत्या वयाबरोबर त्याचं असं मत होत गेलं की, हा विनाश टाळण्यासाठी देशातील जनतेमध्ये एकतेची भावना निर्माण होणं अत्यावश्यक आहे. पुढे काही वर्षांनी, मनोजकुमार यांनी स्वतः जे चित्रपट निर्माण केले त्या सर्वांचं मुख्य सूत्र ’राष्ट्रीय एकात्मता’ हेच होतं.
 

manoj kumar 
 
मनोजकुमार यांच्या कारकीर्दीचं वर्गीकरण दोन ठळक भागात करता येईल. ’अभिनेता’ म्हणून त्यांनी केलेले चित्रपट आणि त्यांनी स्वतः निर्माण केलेले, दिग्दर्शित केलेले, लिहिलेले चित्रपट! नायक-अभिनेता म्हणून, ’हरियाली और रास्ता’, ’वो कौन थी?’ ’गुमनाम’, ’दो बदन’, ’नीलकमल’, ’पत्थर के सनम’ ’हिमालय की गोद में’ असे हिट सिनेमे त्यांच्या खात्यावर जमा आहेत. आघाडीच्या अनेक नायिकांसोबत त्यांनी भूमिका केल्या. अनेक सुश्राव्य गीतं त्यांच्या वाट्याला आली. पण चिरकाल टिकणारी जी ओळख त्यांना प्राप्त झाली ती, त्यांनी निर्माण केलेल्या, ’देशप्रेमाच्या भावनेनं ओतप्रोत भरलेल्या’ चित्रपटांमुळे!
 
सिनेसृष्टीत स्थिरस्थावर झाल्यावर मनोजकुमार यांनी दिग्दर्शन, लेखन, निर्मिती याकडे आपला मोर्चा वळवला.
 
 
'शहीद’ चित्रपट प्रदर्शित झाला ते दिवस भारत-पाक युद्धाचे होते. तरीही पंतप्रधान शास्त्री यांना चित्रपटाच्या प्रीमियरला येण्याचं आमंत्रण मनोजकुमार यांनी दिलं होतं. ’फक्त दहा मिनिटं थांबेन’ अशा अटीवर आलेले शास्त्रीजी चित्रपट पूर्ण होईपर्यंत थांबले होते. ’ते पूर्ण चित्रपट पाहणार’ हे समजल्यावर मनोज कुमारनी ’मध्यांतर’ रद्द करण्याच्या सूचना दिल्या आणि संपूर्ण सिनेमा सलग दाखवला. चित्रपट संपला तेव्हा शास्त्रीजी रडत होते.  1965 चा ’शहीद’ हा त्यांचा पहिला देशभक्तीपर चित्रपट! लहानपणी त्यांनी ’शहीद-ए-आझम भगतसिंग’ हा चित्रपट पाहिला होता. भगतसिंगांच्या व्यक्तित्वाने ते पूर्णपणे भारावून गेले होते. भगतसिंगांच्यावरची सुमारे दोनशे पुस्तकं/लेख मिळवून त्यांनी पारायणं केली होती. स्वतःला भावलेले भगतसिंग त्यांनी ’शब्दबद्ध’ करून ठेवले होते. ’शहीद’च्या निर्मितीवेळी या लिखाणाचा खूप उपयोग झाला. या सिनेमाचं दिग्दर्शन एस. राम शर्मा यांच्या नावावर असलं तरी प्रत्यक्षात मनोजकुमार यांनीच याचं ’घोस्ट डायरेक्शन’ केलं होतं. चित्रपट वास्तववादी होण्यासाठी मनोजकुमार व सहकारी दोन महिने ’लुधियाना जेल’मध्ये जाऊन कैद्यांसोबत राहिले होते. भगतसिंगांचे सहकारी बटुकेश्वर दत्त यांच्याकडून बरेच प्रसंग लिहून घेण्यात आले. मनोजकुमार, भगतसिंगांच्या आईला -छाजींना- जाऊन भेटले. या भूमिकेशी मनोजकुमार इतके समरस झाले होते की ते चक्क भगतसिंगांसारखे वागू लागले आणि छाजी त्यांना ’भगत’ म्हणून हाक मारू लागल्या. ’माझा भगत परत आला आहे’ असं त्या म्हणत असत. ’शहीद’ चित्रपट प्रदर्शित झाला ते दिवस भारत-पाक युद्धाचे होते. तरीही पंतप्रधान शास्त्री यांना चित्रपटाच्या प्रीमियरला येण्याचं आमंत्रण मनोजकुमार यांनी दिलं होतं. ’फक्त दहा मिनिटं थांबेन’ अशा अटीवर आलेले शास्त्रीजी चित्रपट पूर्ण होईपर्यंत थांबले होते. ’ते पूर्ण चित्रपट पाहणार’ हे समजल्यावर मनोज कुमारनी ’मध्यांतर’ रद्द करण्याच्या सूचना दिल्या आणि संपूर्ण सिनेमा सलग दाखवला. चित्रपट संपला तेव्हा शास्त्रीजी रडत होते. यानंतर शास्त्रीजींनी सर्वांसमोर जाऊन त्यांनी वीस मिनिटं भाषण केलं. त्याच रात्री दोन वाजता शास्त्रीजीनी मनोजकुमारना फोन केला आणि म्हणाले ’तुमचा सिनेमा पाहून माझी झोप उडाली आहे. तुम्ही मला उद्या येऊन भेटा.’
 
 
भेटीदरम्यान शास्त्रीजींनी, ’जय जवान, जय किसान’ या घोषणेवर आधारित चित्रपट बनवायची सूचना केली. मनोजकुमार यांनी त्याच रात्री दिल्लीहून मुंबईला येताना रेल्वेत, या घोषवाक्यावर आधारित असलेल्या ’उपकार’ सिनेमाची बरीचशी कथा लिहून काढली. हा चित्रपट सुपरहिट झाला. ’पूरब और पश्चिम’ या सिनेमात पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीतल्या विरोधाभासावर भाष्य होतं. हा सिनेमा लंडनमध्ये विक्रमी 50 आठवडे चालला.
 
 
’मनोजकुमार म्हणजे देशभक्तीविषयक चित्रपट’ हे समीकरण इतकं दृढ झालं होतं की आणीबाणीच्या सुरुवातीला सरकारनं ’नया भारत’ नामक सिनेमा तयार करण्याची सूचना मनोजजींना केली. पण आणीबाणीतले गैरप्रकार उघड झाल्यावर त्यांनी त्यातून अंग काढून घेतलं.
 
 
manoj kumar
मनोजकुमार यांचं देशप्रेम हा केवळ लोकप्रियतेसाठी अथवा पैशासाठी जाणीवपूर्वक घेतलेला ’स्टान्स’ नव्हता हे सिद्ध करणारे अनेक प्रसंग आहेत. ’शहीद’साठी त्यांना ’नॅशनल अवॉर्ड’ घोषित झालं होतं. पारितोषिक वितरण समारंभाआधी त्यांनी आपल्या वडिलांना भगतसिंगांच्या गावी पाठवलं आणि ’छाजींना’ दिल्लीला घेऊन येण्यास सांगितलं. राष्ट्रपती भवनात त्यांनी आपल्या शेजारी भगतसिंगांच्या मातोश्रीना बसवलं. मनोजजींचं नाव पुकारलं गेल्यावर पुढे जाऊन त्यांनी ’छाजींना’ही स्टेजवर पाचारण केलं. अत्यंत सध्या वेशातली ही वीरमाता जेव्हा पुढे जाऊ लागली तेव्हा संपूर्ण सभागृह उठून उभं राहिलं आणि सलग पाच मिनिटं टाळ्यांचा कडकडाट झाला. पहिल्या रांगेत बसलेल्या पंतप्रधान इंदिराजी झटकन पुढे झाल्या आणि त्यांनी ’छाजींना’ वाकून वंदन केलं आणि आलिंगन दिलं. मनोजकुमार यांनी पुरस्काराची संपूर्ण रक्कम भगतसिंगांच्या कुटुंबाला देऊन टाकली. काही वर्षांनी ’छाजी’ चंदीगडच्या एका रुग्णालयात गंभीर आजारामुळे दाखल झाल्या. त्यांनी औषधोपचार घ्यायला नकार दिला. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी मनोजकुमारना मुंबईहून बोलावलं. मनोजजींच्या आग्रहामुळे शेवटी त्या मातेने औषध सेवन केलं.
 
 
गेली अनेक वर्षं मनोजजी आजारी होते. पण ’पॅट्रीयॉटस्’ नावाचा एक चित्रपट बनवायची त्यांची इच्छा होती. 4 एप्रिलला त्यांचं निधन झाल्यावर एका नवोदित गीतकारानं एक हृद्य फोटो शेअर केला होता. या ’भावी सिनेमासाठी’ लिहिलेलं एक गीत वाचून दाखवल्यावर अंथरुणाला खिळलेल्या मनोजकुमारनी या कवीला प्रेमानं जवळ घेतल्याचं या फोटोत दिसत होतं. जाज्वल्य देशप्रेमाची ज्योत त्यांच्या हृदयात अखंड तेवत होती हे अधोरेखित करणारं हे छायाचित्र! प्रसिद्ध निर्माते एस. मुखर्जी यांनी, ’शहीद’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांना दिलेलं ’भारतकुमार’ हे बिरुद अतिशय सार्थ होतं. मनोजकुमार यांच्या निधनामुळे भारतमातेने एक थोर सुपुत्र गमावला आहे.
 
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो!