पंतप्रधानांचा नागपूर दौरा - फेक नॅरेटिव्हला चपराक

विवेक मराठी    08-Apr-2025   
Total Views |

Narendra Modi
सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या उभयतांचे गुढीपाडव्याच्या दिवशी एकत्र येणे आणि डॉ. हेडगेवार व डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळाला भेट देणे यात गहन अर्थ दडलेला आहे. या भेटीने एक गोष्ट केली ती म्हणजे सोशल मिडिया आणि वृत्त माध्यमांनी जे फेक नॅरेटिव्ह पसविले होते, ते गुंडाळण्याचे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा यांच्यात सुसंवाद नाही. भाजपा केंद्रात स्वबळावर बहुमत मिळू शकला नाही याला संघाने हात आखडता घेण्याची वृत्तीच कारणीभूत आहे, या सर्व नॅरेटिव्हला तद्दन चुकीचा ठरविणारा असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा होता. या दौर्‍यात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्मृतिमंदिरात गेले. त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधीला व पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली, द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी यांच्या समाधिरूपी यज्ञवेदीला पुष्पांजली अर्पण केली. आणि त्या ठिकाणी त्यांचे स्वागत करायला स्वतः सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित होते. डॉ. हेडगेवार स्मारक समितीचे अध्यक्ष भैयाजी जोशी ही स्वागताला होते.
 
 
 
पंतप्रधान झाल्यावर अकरा वर्षांनी नरेंद्र मोदी स्मृतिभवनात आले होते. त्याच्यापूर्वी ऑगस्ट 2000 ला पंतप्रधानपदावर असताना अटलबिहारी वाजपेयी स्मृतिमंदिरात आले होते त्यावेळी पूर्वनियोजित प्रवास कार्यक्रमामुळे सरसंघचालक त्यावेळी उपस्थित नव्हते. वास्तविक बघता पूर्व प्रचारक असणार्‍या या दोन्ही पंतप्रधानांना स्मृतिमंदिर नवीन नव्हते, पण त्यांचे पंतप्रधान पदावर असताना त्या ठिकाणी येणे महत्त्वाचे होते. ऑगस्ट 2000 मध्ये भाजपाचे अधिवेशन नागपूरला झाले होते त्यावेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी स्मृतिमंदिरात गेले होते त्यावेळी त्यांच्याबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व तत्कालिन भाजप नेते प्रमोद महाजन हेही होते.
 
 
राजशिष्टाचाराच्या बंधनामुळे पंतप्रधान सहजतेने संघ कार्यालय वा स्मृतिमंदिर किंवा दिल्लीचे झंडेवाला कार्यालय या ठिकाणी वारंवार येऊ शकत नाही. त्यामुळे सरकारी कार्यक्रम नसताना व खाजगी कार्यक्रमाला आले तरच त्यांना असे स्वातंत्र्य घेता येते. अकरा वर्षात प्रथमच पंतप्रधान मोदी माधव नेत्रालयाच्या निमित्ताने नागपुरात आले. याआधी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदीजी दिवंगत सरसंघचालक सुदर्शनजी यांना श्रद्धांजली अर्पण करायला स्मृतीभवन परिसरात आले होते. ऑगस्ट 2007 ला श्रीगुरुजी जन्मशताब्दी सांगता समारंभाला अटलजी रेशीमबागवर आले होते. पण त्यावेळी ते पंतप्रधान नव्हते. त्यांना विस्मरणाचा त्रास सुरू झाला होता.असा तो कालखंड होता. व्यासपीठावरून बोलता बोलता अटलजींना त्यावेळी आपल्याच कवितेचे विस्मरण झाले. अर्धवट कविता म्हटल्यानंतर ते थांबले होते त्यावेळी प्रेक्षकांनी आणि व्यासपीठावरील कुणीतरी ती कविता पूर्ण केली होती.
वास्तविक या दोन्ही पंतप्रधानांना संघकार्यालय, स्मृतीभवन हे नवीन नव्हते. महाल कार्यालयाचा विस्तार होण्यापूर्वी संघ कार्यालयातील वृक्षाच्या तळाशी, जिना चढताना जो पार होता त्या पारावर बसून प्रचारक असताना नरेंद्र मोदी भरपूर गप्पा मारत आहेत आणि चिंतन करीत आहेत हा अनुभव अनेकांनी घेतला आहे, पण आता मोदीजींना नियतीने देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. ते शरीराने परिसरात नसले तरी मनाने मात्र सदैव संघ परिसरात असतात.
 
 
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचेही संघवय साधारणपणे एकसारखेच असावे. दोघेही एकमेकांना छान परिचित आहेत. बेरकीपणाने त्याला असेही म्हणता येईल की, एकमेकांना ओळखून आहेत. 2024 च्या निवडणुकीपूर्वी एक वातावरण असे होते की, भाजपाला 2004 सारखा फटका यावेळी बसणार. तेव्हा सरसंघचालकांशी बोलण्याची एक संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांना हा प्रश्न विचारला असताना ते म्हणाले होते की, 2004 सारखे आता होणार नाही. तेव्हा अनेक संघटना कार्यस्तब्ध होत्या, आता सर्व संघटना या कार्यरत आहेत.
 
 
मोदीजी संघटनेला सोबत घेऊन चालत नाहीत असे बोलले जाते त्यावेळी सरसंघचालक म्हणाले होते, असू शकतात व काही लोकांमध्ये अंगभूत गुणदोष असतातच. त्यांचा सहज स्वीकार करावा लागतो मात्र त्यांच्या राष्ट्र आणि संघनिष्ठेवर कुणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. त्यामुळेच अकरा वर्षाच्या पंतप्रधान पदाच्या कालावधीत पहिल्यांदा स्मृतिभवनात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मनमोकळे वाटत होते. त्यांच्या चेहर्‍यावर एक नैसर्गिक आनंद विलसत होता. त्यांनी यापूर्वीही बघितलेले स्मृती भवन आता ते नव्याने बघत होते आणि काय काय बदल झाले हे टिपत होते. भवनाच्या अभिप्राय नोंदवहीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमूद केले आहे की, हे सर्व स्वयंसेवकांचे ऊर्जाकेंद्र आहे. त्यांचा सविस्तर अभिप्राय असा आहे की, डॉक्टर हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांना शतशत नमन. हे स्मृतिमंदिर भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटनशक्ती या मूल्यांना समर्पित आहे. ते आपल्याला सतत राष्ट्रसेवेसाठी पुढे जाण्याची प्रेरणा देत राहाते. या दोन महापुरुषांच्या स्मृती जागविणारे हे स्थळ देशसेवेला समर्पित लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जाकेंद्र आहे आमच्या प्रयत्नामुळेच माँ भारतीचा गौरव सदैव वाढत राहो.
 

Narendra Modi  
 
या भेटीदरम्यान त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. डॉक्टर हेडगेवार स्मारक समितीचे अध्यक्ष भैयाजी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्मृतिमंदिराची देखणी प्रतिकृती भेट दिली, त्यांचे स्वागत केले. डॉ. मोहनजी तर स्वागत करण्यात होतेच, स्मृतिभवनाची जबाबदारी असणारे विकास तेलंग हे सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. उभयतांचा आणि उपस्थितांचा संवाद सुरू झाला होता. तो करीत असतानाच आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिन असताना वर्षप्रतिपदेला तेही स्मृतिमंदिरात भेट झाली हे आणखीनच वैशिष्ट्य होते. ही भेट तशी 15 मिनिटे चालली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी गेले. त्या ठिकाणी परिक्रमा केल्यानंतर तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन करून बुद्ध वंदना केली व त्या ठिकाणीही त्यांनी अभिप्राय पुस्तिकेत आपला अभिप्राय लिहिला.
 
 
मोदी यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले आणि बुद्ध वंदना केली त्यावेळी त्यांच्यासमवेत दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससई होते. त्यांनीच पंतप्रधानांचे स्वागत व सत्कारही केला. दीक्षाभूमीवर आल्यावर गरीब, वंचित आणि गरजू लोकांसाठी समान अधिकार व न्यायाची व्यवस्था उभी करून मार्गक्रमण करण्याची प्रेरणा मिळते, असे सांगून पंतप्रधान यावेळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालूनच त्यांच्या मूल्यांची अंमलबजावणी करूनच देश विकासाचे नवे शिखर गाठेल, हा मला विश्वास आहे. यावेळी दीक्षाभूमीचे सचिव डॉ राजेंद्र गवई, विलास गजघाटे, डॉ. डी. जे. दाभाडे, एन.आर. सुटे व आनंद इ. मान्यवर उपस्थित होते.
 
 
माधव नेत्रालयाचा कार्यक्रम दहा वाजता होता. बरोबर 9 नऊ वाजून 59 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वामी गोविंद देव गिरी महाराज व स्वामी अवधेशानंद गिरी महाराज व्यासपीठावर पोहोचले. एवढे सगळेजण व्यासपीठावर असताना यापैकी कोण आधी बोलणार व कोण नंतर याचे कुतूहल होते. सुरुवातीला माधव नेत्रालयाचे सचिव डॉ. अविनाश चंद्र अग्निहोत्री यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष निखिल मुंडले यांनी सर्वांचे स्वागत केले. शरद अग्निहोत्री लिखित पुस्तकाचे विमोचन झाले.
 
 
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छोटेखानी व अतिशय प्रभावी भाषण झाले. सामान्यतः कुठलाही कार्यक्रम असला आणि त्यात सरसंघचालक उपस्थित असले, तर त्यांचे भाषण सगळ्यात शेवटी असते. पण यावेळी देशाचे पंतप्रधान उपस्थित असल्याने त्यांनीच शेवटी बोलावे असे ठरले होते. त्यामुळे मोहनजी आधी बोलले. ते आपल्या भाषणाचा शेवट करता करता म्हणाले की, पंतप्रधानांचे भाषण ऐकायला मीही उत्सुक आहे.
 
 
या ठिकाणी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला भारतमातेचा त्रिवार जयजयकार केला आणि जनतेकडूनही करवून घेतला. त्यानंतर अतिशय शुद्ध मराठीत त्यांनी सर्वांना वर्षप्रतिपदा गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला. गुढीपाडव्याचे महत्त्व सांगतानाच पुढील महिन्यात 14 तारखेला संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही जन्मदिवस आहे याचे स्मरण करून देत पंतप्रधान मोदी यांनी सामाजिक समरसतेचा एक अनुभव सर्वांना दिला. मोदी या ठिकाणी 39 मिनिटे बोलले. त्यातील अर्धा वेळ ते संघ, संघाचे सेवाकार्य आणि परिवारातील माधव नेत्रालय याबाबतच बोलत होते. अमर भारतीय संस्कृतीचा अक्षयवट या शब्दात त्यांनी संघकार्याचा गौरव केला. डॉ. हेडगेवार व श्रीगुरुजींच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत असताना विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मार्गदर्शनाचाही त्यांनी तितकाच गौरवपूर्ण उल्लेख केला. डॉ. मोहन भागवत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्नेहबंधात अजून एक गौरवपूर्ण आयाम आहे तो म्हणजे दोघांनी उभयतांचा सन्मान करण्याचा.
 
 
2002 मध्ये गोधरा हत्याकांड झाल्यानंतर अहमदाबादच्या संघ कार्यालयात देशभरातील संपादकांची एक बैठक झाली होती. तीन दिवसाच्या या बैठकीत अन्य विषय तर होतेच पण एक सत्र गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमवेत चर्चेचे होते. त्यावेळी मोदी संघ कार्यालयात कुठल्याही सुरक्षा ताफ्याशिवाय किंवा सरकारी पीए वगैरे यंत्रणेविना आले होते. या सर्वांना स्पष्टपणे मोदींनी सांगितले होते, कुणीही कार्यालयात यायचे नाही. मोदींचे आगमन झाल्यावर चहापानानंतर सत्र सुरू झाले तेव्हा सरकार्यवाह डॉ. मोहनजी भागवत व सरसंघचालक सुदर्शनजी यांच्यासमवेत मोदी किंचित उंच असणार्‍या व्यासपीठावर बसले होते. सत्र सुरू झाले आणि पहिलाच प्रश्न आला, गोधरा येथील जळितकांडात रामसेवकांना वाचवू शकलो नाही याबद्दल आपल्याला काय वाटते. प्रश्न पूर्ण होण्याच्या आधीच मोदींच्या डोळ्यात पाणी तरळून गेले. काही क्षणातच डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कंठ रुद्ध झाला आणि हुंदके सुरू झाले आणि बघता बघता नरेंद्र मोदी यांचा संयमाचा बांध तुटला आणि त्यांचे रुदन सुरू झाले. सुरुवातीला संयमीच असणारे मोदींचे भान हरपले, दबलेले दुःख संधी मिळतात उफाळून बाहेर पडले. बाजूला बसलेल्या मोहनजींनी पाण्याचा ग्लास मोदींच्या समोर केला. त्यांच्या पाठीवरून हात फिरवणे सुरू केले. जवळजवळ आठ-दहा मिनिटे मोदीजींचे मोकळे होणे सुरू होते. सुदर्शनजींनी मोहनजींना काहीतरी खूण केली आणि हे सत्र अर्धा तासपर्यंत स्थगित केले. या कालावधीत मोदीजी, मोहनजी आणि सुदर्शनजी एका कक्षात बसले होते. अर्धा तासाने पुन्हा सत्र सुरू झाले तोवर मोदी खूप सावरले होते. ते सुरुवातीलाच म्हणाले, संयमाचा बांध फुटला याबद्दल क्षमा मागतो आणि मग पुढे बोलू लागले. त्यानंतर त्यांनी प्रेससाठी चांगली कॉपी दिली. जवळजवळ चार-पाच तास मोदी कार्यालयातच होते, पण ही घटना जेव्हा जेव्हा आठवते त्यावेळी रुदन करणारे मोदी व त्यांना शांत करण्यासाठी पाठीवरून हात फिरविणारे मोहनजी डोळ्यासमोर उभे राहतात. आणि मनाला प्रश्न पडतो की, खरंच मोहनजी आणि मोदीजी यांच्यात परस्परांवर मात करण्याचे डाव रचले तरी जाऊ शकतात काय आणि उत्तर मिळते नाही, नाही, ते कधी शक्य नाही. त्या उभयतांचे गुढीपाडव्याच्या दिवशी एकत्र येणे आणि संवादासाठी यातून मी शोधलेल्या उत्तरावर शिक्कामोर्तब होऊन जाते, पण पत्रकार हे चित भी मेरी पट भी मेरी या तंत्रात. बाकी आता कार्यक्रम संपल्यावर सुरू झाले की मोदींनी भागवतांसमोर शरणागती पत्करली. आता नवीन पर्व सुरू झाले आहे हे खरे, पण जुना नॅरेटिव्ह मात्र पार निकाली निघाला आहे हे सत्य आहे.