@अर्चित गोखले
देशासाठी एक समान दिनदर्शिका निर्माण करण्यासाठी 1952 साली सीएसआयआरतर्फे कॅलेंडर रिफॉर्म समिती नेमून या समितीने भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका तयार केली. अतिशय अचूक, वैज्ञानिक आणि खगोलीय आधारावर असलेली ही सर्वोत्तम दिनदर्शिका आहे. मात्र भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका अस्तित्वात आहे ही गोष्ट अजून बर्याच भारतीयांसाठीदेखील नवीन आहे. या भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेचे महत्त्व आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.
30 मार्च रोजी आपण मोठ्या उत्साहाने गुढीपाडवा आणि नूतनवर्षाची सुरुवात साजरी केली. परंतु त्याच्या काहीच दिवस आधी म्हणजेच 22 मार्च रोजी भारताचं अधिकृत नववर्ष सुरू झालं, अर्थात भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाणे! भारताचा राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी या गोष्टी अगदी लहान वयातच मुलांना शिकवल्या जातात आणि त्या वयापासूनच आपल्या प्रत्येकाला त्या माहीत असतात. परंतु भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका अस्तित्वात आहे ही गोष्ट अजून बर्याच भारतीयांसाठीदेखील नवीन आहे. भारतीय दिनदर्शिका म्हंटलं की अनेकांना पटकन डोळ्यासमोर येतं ते म्हणजे पंचांग किंवा तिथी आणि चांद्र महिने! पण भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका चांद्र वर्षावर आधारित नसून ती सौर वर्षावर आधारित आहे.
आपण दैनंदिन जीवनात जी दिनदर्शिका वापरतो त्याला ग्रेगोरियन कॅलेंडर असं म्हणतात. जानेवारी ते डिसेंबर असे महिने असलेली ही दिनदर्शिकादेखील सौर वर्षावर आधारित आहे. सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला लागणारा काळ म्हणजे एक सौर वर्ष. जे अर्थातच 365 दिवसांचं असतं. प्रतिपदा ते पौर्णिमा या पंधरा तिथी व प्रतिपदा ते अमावस्या या पंधरा तिथी मिळून या 30 तिथींच्या कालावधीला एक चांद्र महिना म्हणतात. परंतु एक तिथीचा कालावधी हा 24 तासांच्या दिवसासारखा निश्चित नसून तो 19 ते 26 तास या मर्यादेत बदलत राहतो. परिणामी, 30 तिथीचा एक चांद्र महिना पूर्ण होण्यासाठी 30 दिवस न लागता 29.5 दिवस लागतात. 29.5 दिवसांचे चैत्र ते फाल्गुन असे 12 चांद्र महिने विचारात घेतले तर आपल्याला 354 दिवसांचा कालावधी मिळतो. हा कालावधी म्हणजे चांद्र वर्ष. सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यातील दिवसांच्या संख्येत तफावत असल्याने दर वर्षी आपले सण सुमारे 11 दिवस मागे सरकतात. आपल्या संस्कृतीतील सगळे सण तिथीवर आधारित असल्याने ते चांद्र वर्षाप्रमाणे साजरे होतात. परंतु दैनंदिन जीवनात वापरला जाणारा दिनांक सौर वर्षाप्रमाणे असल्याने दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक असतो. उदा: आपण नुकताच 30 मार्च रोजी गुढीपाडवा साजरा केला. 2024 मध्ये गुढीपाडवा 9 एप्रिल रोजी साजरा झाला होता. ऋतूंचा कारक सूर्य असल्याने जर सण आणि ऋतूंचा मेळ बसवायचा असेल तर चांद्र वर्ष आणि सौर वर्षामध्ये समायोजन करणं गरजेचं आहे. अधिक मास हे असंच एक समायोजन आहे. ऋतूंशी मेळ बसण्यासाठी सौर वर्षावर आधारित दिनदर्शिकेचा वापर करणं अनिवार्य असतं.

ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये एका महिन्यात 31 तर पुढच्या महिन्यात 30 आणि फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात. त्याचबरोबर नववर्ष 1 जानेवारी रोजी साजरं होतं. या दोन्ही गोष्टींना कुठलाही ठोस वैज्ञानिक आधार किंवा निरीक्षणात्मक महत्त्व नाही. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेनुसार वर्षाची सुरुवात आणि महिन्यातील दिवस याला खगोलशास्त्रीय आधार आहे. म्हणूनच भारतीय दिनदर्शिका खगोलीय किंवा वैज्ञानिकदृष्ट्या सर्वात अचूक दिनदर्शिका आहे. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असली तरी पृथ्वीसापेक्ष निरीक्षण करताना सूर्य आपल्याला एका राशीतून दुसर्या राशीत त्याचं स्थान बदलताना दिसतो. सूर्याच्या या भासमान मार्गाला आयनिक वृत्त (एक्लिप्टिक) म्हणतात. उत्तर आणि दक्षिण गोलार्धात पृथ्वीचं समान विभाजन करणारं वर्तुळ म्हणजेच विषुववृत्त त्याचप्रकारे आकाशगोलाचं समान विभाजन करणारं वर्तुळ म्हणजे वैषुविकवृत्त. वैषुविकवृत्त आणि आयनिक वृत्त यांच्यामध्ये 23.5 अंशाचा कोन असल्याने ही दोन्ही वर्तुळं एकमेकांना एकमेकांपासून बरोबर विरुद्ध दिशेला असलेल्या दोन बिंदूंवर छेदतात. या छेदबिंदूंवर सूर्य असतो तेव्हा आपल्याला समान दिवस आणि समान रात्र अनुभवता येते. म्हणून यांना संपात बिंदू असं म्हणतात.
एक संपात दिवस वसंत ऋतूत असतो तर दुसरा शरद ऋतूमध्ये. सुमारे 21 मार्च रोजी सूर्य वसंत संपात बिंदूवर असतो व सुमारे 23 सप्टेंबर रोजी शरद संपात बिंदूवर. त्याचबरोबर वैषुविकवृत्ताच्या सर्वात उत्तरेला आणि सगळ्यात दक्षिणेला असलेल्या बिंदूंचा विचार केला तर आपल्याला सूर्यमार्गावर चार महत्त्वाचे बिंदू मिळतात. यातील उत्तरेकडचा बिंदू म्हणजे उत्तर गोलार्धातील लोकांसाठी सगळ्यात मोठा दिवस. अर्थात 21 जून. या दिवशी दक्षिणायन सुरू होतं. दक्षिणेचा बिंदू म्हणजे उत्तर गोलार्धातील लोकांसाठी सगळ्यात लहान दिवस. 22 डिसेंबर. या दिवशी उत्तरायण सुरू होतं. ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे हे दिवस महिन्यांमधील मधलेच दिवस असले तरी भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाणे या चारही बिंदूंवर सूर्य असताना नवीन महिन्याचा प्रारंभ होतो व सूर्य वसंत संपात बिंदूवर असताना वर्षाची सुरुवात होते. 22 मार्च म्हणजे भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाणे सौर चैत्र 1! या हिशोबाने दक्षिणायनची सुरुवात सौर आषाढ 1 रोजी होते, सूर्य शरद संपात बिंदूवर सौर अश्विन 1 रोजी असतो तर उत्तरायण सुरुवात सौर पौष 1 रोजी होते. या महिन्यांची नावं जरी चैत्र, वैशाख अशी असली तरी हे चांद्र महिने नाहीत. हे 30 तिथींचे महिने नसून हे 30 किंवा 31 दिवसांचे सौर महिने आहेत! इतर महिन्यांची नावं चांद्र महिन्यांसारखी असली तरी मार्गशीर्ष या महिन्याचं नाव अग्रहायण असं आहे. अशाप्रकारे सूर्याच्या भासमान मार्गावरील सूर्याच्या स्थानावर आणि त्यावरील महत्त्वाच्या बिंदूंवर आधारित महिन्यांची रचना भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेमध्ये आहे.
पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करते. परिणामी पृथ्वी कधी सूर्याच्या जवळ (उपसूर्य बिंदू) तर कधी लांब (अपसूर्य बिंदू)असते. एखादी गोष्ट लांब असली की त्याची गती आपल्याला कमी असल्याचं भासतं. याच सिद्धांतावर आधारित सूर्य जेव्हा पृथ्वीपेक्षा लांब असतो तेव्हा त्याचं आकाशातील विस्थापन कमी गतीने होतं व सूर्य जेव्हा जवळ असतो तेव्हा त्याचं विस्थापन लवकर होतं. अशा स्थितीत जेव्हा सूर्य पृथ्वीच्या जवळ आहे त्या कालावधीतील महिने कमी दिवसांचे तर सूर्य लांब असतानाच्या कालावधीतील महिने जास्त दिवसांचे असले तर ते शास्त्रीयदृष्ट्या योग्य ठरेल. अशाच प्रकारे दिवसांची रचना भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेमध्ये आहे. 4 जुलै रोजी (भारतीय राष्ट्रीय दिनांक सौर आषाढ 13) सूर्य सगळ्यात लांब असतो. त्या कालावधीतील महिने म्हणजेच वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद हे 31 दिवसीय महिने आहेत. 4 जानेवारी रोजी (भारतीय राष्ट्रीय दिनांक सौर पौष 14) सूर्य सगळ्यात जवळ असतो. म्हणून अश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ, फाल्गुन हे महिने 30 दिवसीय आहेत. लीप वर्षी चैत्र महिन्यात 31 दिवस असतात व इतर वर्षी चैत्र 30 दिवसांचा असतो. लीप वर्षी भारतीय नवीन वर्ष 21 मार्च रोजी सुरू होतं. अशाप्रकारे भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाणे दिवसांच्या रचनेला खगोलशास्त्रीय आधार आहे. वर्ष गणनेसाठी शक वर्षाचा वापर केला जातो.
देशातील विविध दिनदर्शिकेचे परीक्षण करण्यासाठी तसेच संपूर्ण देशासाठी एक समान दिनदर्शिका निर्माण करण्यासाठी 1952 साली सीएसआयआरतर्फे कॅलेंडर रिफॉर्म समिती नेमण्यात आली. डॉ. मेघनाद सहा हे त्याचे अध्यक्ष होते. या समितीने भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका तयार केली व 22 मार्च, 1957 म्हणजेच सौर चैत्र 1, 1879 रोजी भारत सरकारने लोकसभेत ही दिनदर्शिका भारताची अधिकृत दिनदर्शिका म्हणून स्वीकारली. ही भारताची अधिकृत दिनदर्शिका असल्याने आरबीआयच्या आदेशानुसार धनादेशावर भारतीय राष्ट्रीय दिनांक लिहिणं अधिकृत आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया रेडिओ, सरकारी पत्र आणि गॅझेट ऑफ इंडिया भारतीय राष्ट्रीय दिनांक नमूद करतात. अतिशय अचूक, वैज्ञानिक आणि खगोलीय आधारावर असलेली सर्वोत्तम दिनदर्शिका आपण सगळ्यांनी समजून घेऊन त्यानुसार दिनांक लिहिला पाहिजे. जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत आणि जगभर ही दिनदर्शिका पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवं.