जंगलात जाऊन ऑर्किड शोधून त्यांची जगात कुठे कुठे आणि केव्हा नोंद झालीये याचा शोध घेणे आणि या सगळ्या नोंदी शास्त्रीय पद्धतीने सातत्याने करत राहणे. त्यांनी तब्बल 850 हून अधिक ऑर्किडस्ची बाग घरात फुलवली - जोपासली आहे. ऑर्किड विषयात 200 हून अधिक शोधनिबंध लिहिणार्या या ऑर्किडवेड्या माणसाचे नाव ख्यानजीत गोगई. आज त्यांना आसाममध्ये orchid man of Assam अशी ओळख मिळाली आहे.
ईशान्येचे आख्यान ही लेखमाला म्हणजे या भूमीतील काही निवडक माणसांच्या, त्यांच्या जगण्याच्या, त्यांच्या गावी असलेल्या गूढ आणि गोड गोष्टींच्या मागं धावणारा एक प्रवास आहे. या आख्यानात तुम्हाला भेटतील काही गावे, जे नकाशावर नसतील पण मनात ठसतील; काही माणसं, जी प्रसिद्ध नसतील पण स्मरणात राहतील. कधी माणसं तर कधी त्यांची संस्कृती, कधी निसर्ग तर कधी तिथले प्रश्न - या ना त्या कारणाने मनात घर करून राहिलेला आपला ईशान्य भारत!! हे लिखाण म्हणजे एका अनुभवाचं जतन आहे - जिथे शब्दांनी त्या भूमीची हवा, गंध, आणि आवाज पकडण्याचा एक प्रयत्न आहे. या आख्यानात दर लेखात एक नवा क्षण पकडलेला असेल. चला, आपण एकत्र निघू या - ईशान्येच्या अनवट वाटांवर
मला फुटीरतावाद्यांनी जंगलात पकडून ठेवलं तीन दिवस!! आणि माझं ऑर्किडवेड पाहून सोडून दिलं!! असं सहज गप्पा मारताना ख्यानजीत म्हणाले आणि मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं. खरेतर सुरुवातीला त्यांचे आसामी शैलीतील आणि वनस्पती शास्त्रातील अनाकलनीय उच्चार ऐकून मी त्यांचे बोलणे ऐकण्यापेक्षा त्या अतिशय मोहक ऑर्किड्सचे फोटो काढण्यात गुंतलो होतो. गेला तासभर ते आमच्या मुलांना घरातली ऑर्किडची बाग दाखवत होते. त्यांच्या त्या वाक्याने मी अचंबित झालो आणि जास्त लक्षपूर्वक त्यांना ऐकू लागलो.
या माणसाने साधीसुधी नाही; तब्बल 850 हून अधिक ऑर्किडस्ची बाग घरात फुलवली - जोपासली आहे. जगातील सर्वात मोठे आणि सर्वात लहान अशी ऑर्किड्स त्यांच्या बागेत आहेत. कीटकभक्षी वनस्पती पाहून तर आम्ही सारेच अचंबित झालो.
जंगलात जाऊन ऑर्किड शोधायचे, त्यांची जगात कुठे कुठे आणि केव्हा नोंद झालीये याचा शोध घ्यायचा आणि या सगळ्या नोंदी शास्त्रीय पद्धतीने करत राहायचे. मोहक ऑर्किडचे फोटो काढण्याइतकी ही सोपी गोष्ट नव्हती. ऑर्किड विषयात 200 हून अधिक शोधनिबंध लिहिणार्या या ऑर्किडवेड्या माणसाचे नाव ख्यानजीत गोगई. दुमदुमा या आसाममधल्या एका टुमदार गावातल्या या तरुणाने ज्या काळात ऑर्किडचा शोध घ्यायला सुरुवात केली तो काळ आसामचा काहीसा काळवंडलेला कालखंड!
फुटीरतावाद्यांनी उच्छाद मांडून ठेवलेला, इंटरनेटचे जाळे वगैरे सोडाच, दळणवळणाची साधी साधनेही पुरेशी नसलेला हा 1994-95 चा काळ होता. याच काळात ख्यानजीत ऑर्किडच्या प्रेमात पडले.
हर्बेरियम म्हणजे एखाद्या वनस्पतीच्या पान-फूल-देठ इत्यादींसह जतन केलेल्या शास्त्रीय नोंदींचा कागद!! काही शे हर्बेरियम तयार करून ठेवलेल्या नोंदींचा खजिना आम्हाला त्यांनी दाखवायला सुरुवात केली. ऑर्किड्सच्या अकरा नवीन जाती शोधून त्याचे नामकरण ख्यानजीतजींनी केले आहे. अनेकविध नोंदी करताना नोंद करण्याची उत्तम पद्धत म्हणजे पेन्सिलने समोर दिसलेल्या वनस्पतीच्या सर्व सूक्ष्म नोंदी चित्रात उतरविणे !! हे चित्र काढण्याचे जे शास्त्र आहे त्याला टॅक्सोनॉमी ड्रॉईंग म्हणतात.
हर्बेरियमचे काही कागद दाखवून झाल्यावर ख्यानजीतजींनी आत जाऊन दुसरा गठ्ठा हातात आणला. त्या गठ्ठ्यातून त्यांनी काढलेली टॅक्सोनॉमी ड्रॉईंग पाहून आम्ही सारे थक्क झालो. पेन्सिलने चित्रात उतरवलेले ऑर्किड्स खर्या ऑर्किड्ससारखेच मोहक दिसत होते. या सगळ्या माहितीच्या साठ्याचे ज्ञानात रूपांतर झाले आहे ते ख्यानजीतजींनी स्वतः लिहिलेल्या वेगवेगळ्या सात पुस्तकांमध्ये !! दिब्रुगड विद्यापीठाने त्यातले एक पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून प्रकाशित केले आहे. आज त्यांना आसाममध्ये orchid man of Assam अशी ओळख मिळाली आहे.
ख्यानजीतजींच्या शेजारी उभं राहून त्यांना बोलतं करण्याचा शैलेन सर प्रयत्न करत होते. शैलेन सर आणि ख्यानजीत हे जिगरी दोस्त आहेत. आपल्या ऑर्किडवेड्या दोस्ताचे पुस्तक छापले गेले पाहिजे हा शैलेन सरांचा आग्रह होता. पण 12/15 वर्षांपूर्वी पुस्तक छापायला पैसे कुठून आणणार? स्वतःच्या लग्नात मिळालेल्या पाकीटातील सुमारे 20 सहस्त्र आणि जास्तीच्या शिकवण्या घेऊन, कुणाकडून उधार घेऊन जमवलेले 30 सहस्त्र असे पैसे जमवले आणि या आधुनिक सुदाम्याने मैत्रीची पुरचुंडी भरून टाकली !!
ऑर्किड्सवर संशोधन करणार्यांना, अभ्यास करणार्यांना ख्यानजीतजींनी स्वतःचा वेळ विनामोबदला उपलब्ध करून ठेवलाय. स्वतःच्या घरात अशा संशोधकांना तो प्रसंगी राहायलाही बोलवतो. कुटुंबाची विशेष साथ ख्यानजीतजींना मिळते आहे. सुमारे 40 जणांना आग्रहाने चहा देताना त्यांच्या आईबाबांच्या सुरकुतलेल्या चेहर्यावर आतिथ्याच्या समाधानाची लकेर स्पष्ट दिसत होती. निघताना ख्यानजीतजींनी दारातल्या झाडावरच्या तुती स्वतः काढून माझ्या हातात ठेवली आणि म्हणाला, ‘पुनार अको अहिबा.’आम्हीसुद्धा पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत हातावर तुतीचा रंग घेऊन तर मनात ख्यानजीतजींच्या ऑर्किडप्रेमाचे किस्से आठवत परतीचा प्रवास सुरू केला. तुम्ही केव्हा जाणार ऑर्किडवेड्या दोस्ताला भेटायला?
लेखक ज्ञान प्रबोधिनी, निगडी येथे
केंद्र व्यवस्थापक आहेत.