‘पंक्चरवाले’ विपर्यास आणि अर्थ

विवेक मराठी    16-Apr-2025
Total Views |
@अ‍ॅड. सिराज कुरेशी
musalim 
पंतप्रधान मोदी यांच्या ‘पंक्चरवाले’ या विधानावरून निर्माण केलेला वादंग केवळ राजकीय तमाशा आहे. वास्तविक ते भारतीय मुस्लिमांच्या मेहनती, झुंजार आणि संघर्षशील प्रतिमेला समोर आणणारे विधान आहे. तेव्हा आता मुस्लिम समाजाने आपली खरी ओळख समजून घेत तिचा अभिमानाने स्वीकार करावा आणि पंक्चरच्या कामापासून पुढे जात राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात आपले योगदान देण्यासाठी सज्ज व्हावे.
अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय मुस्लिमांच्या बद्दल केलेले पंक्चरवाले ही विशेषण राजकीय आखाड्यात चर्चेचा मोठा विषय झाले आहे. विरोधी पक्षाचे नेते मंडळी आरोप करीत आहेत की पंतप्रधानांचे हे विशेषण आणि ते वापरून केलेले विधान मुस्लिम समाजासाठी सांप्रदायिक आणि अपमानजनक आहे. पण डोळसपणे आणि तटस्थतेने विचार केल्यास या विधानातून एका सामाजिक वास्तवाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. तेव्हा त्यामागचे तथ्य समजून घेणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदींच्या या विधानाचे समर्थन करीत त्यामागच्या कारणांचे आणि परिस्थितीचे विश्लेषण करण्याचा एक प्रयत्न या लेखामधून केला आहे.
 
 
सामाजिक व आर्थिक स्थितीकडे निर्देश
 
पंतप्रधानांनी वापरलेले पंक्चरवाले हे विशेषण जाती किंवा धर्म यावर आधारित वा तिरस्काराने प्रेरित नसून भारतीय मुस्लीम समाजाच्या एक मोठ्या वर्गाकडे निर्देश करणारे आहे. जो वर्ग कित्येक दशकांपासून विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर परंपरागत रोजगाराच्या मर्यादेत जीवन कंठत आला आहे.
 
सच्चर समिती (2006) आणि नसिमुद्दीन समितीच्या अहवालावरून हे स्पष्ट होते की, शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात मुसलमानांचा एक मोठा वर्ग असंघटित क्षेत्रात लहान व्यवसायात जसे की मोटर दुरुस्ती, पंक्चर काढणे, शिंपीकाम अशा व्यवसायातून रोजीरोटी कमावतो. यापैकी अधिकांश व्यवसाय हे सन्मानजनक असले तरी त्यातून आर्थिक स्थैर्य मिळत नाही.
 
 
समस्येचे मूळ कारण
 
एखाद्या विशेष समुदायाचा अपमान करणे हा पंतप्रधानांच्या विधानाचा मुळीच हेतू नाही. त्यांना हे दाखवून द्यायचे आहे की तथाकथित सेक्युलर सरकारांनी मुस्लीम समुदायाला केवळ त्यांची मतपेढी म्हणून वापरून घेतले पण त्यांना आधुनिक शिक्षण, कौशल्य विकास आणि मुख्य आर्थिक प्रवाहापासून दूरच ठेवले.
 
 
केवळ 2.3 टक्के मुस्लीम उच्च शिक्षणात पुढे आहेत. सरकारी नोकर्‍यांमध्ये मुसलमानांचे प्रमाण 5% पेक्षाही कमी आहे, आणि त्यांना बँकेतून कर्ज मिळण्याचे प्रमाणही खूपच कमी आहे. त्यामुळे स्वयंरोजगार किंवा व्यवसाय या क्षेत्रातही ते पिछाडीवर आहेत.
पंक्चरवाला ही प्रतीकात्मक शब्दयोजना आहे, ज्यात कामापेक्षा त्या संपूर्ण व्यवस्थेेच्या अपयशाकडे पंतप्रधान निर्देश करू इच्छितात. ज्यांनी मुस्लीम समाजाला प्रगती करू दिली नाही अशी ती व्यवस्था आहे. म्हणून पंतप्रधानांनी मुस्लीम समाजाला आवाहन केले की आता पंक्चरवाला ही ओळख पुसून टाकण्याची वेळ आली आहे. त्यासाठी मुस्लीम समाजाने डिजिटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया आणि स्किल इंडिया या माध्यमातून स्वत:ची नवी ओळख निर्माण करावी. यातून सध्या कसेबसे पोटापुरते मिळवणार्‍या मुस्लीम समाजाला आता गौरवपूर्ण उपजीविका उपलब्ध होणार आहे.
 
 
मुस्लिमांसाठी योजना
 
मोदी सरकारने मुस्लीम समाजाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी काहीचा येथे उल्लेख उल्लेख करायला हवा.
 
नई मंजिल योजना : अल्पसंख्याक युवकांना कौशल्य आणि शिक्षण या सोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी.
प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम : मुस्लीमबहुल क्षेत्रात आधारभूत सोयीसुविधा, शिक्षण, आणि स्वास्थ्य सेवांचा विकास
स्टार्ट अप इंडियात : मुस्लीम युवकांची टक्केवारी वाढविण्यास प्रोत्साहन देणे. मुस्लिमांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देणे.
 
पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा असे विधान केले तेव्हा त्यांचा अभिप्रेत अर्थ असा होता की, मुस्लीम समुदायाची पूर्वीच्या राजकारण्यांनी जी स्थिती त्यांच्यासाठी ‘नॉर्मल’ करून ठेवली होती, तिच्यावर मात करण्याची वेळ आली आहे. पंक्चर काढणे आणि वाहन दुरूस्त करणे ही वाईट गोष्ट नाही पण तेच अंतिम लक्ष्य असू नये. तसे झाले तर समाजासाठी तो एक गंभीर इशारा ठरेल.
 
पंतप्रधान मोदी यांनी केलेले हे विधान गेल्या अनेक दशकांतील धोरण आणि नीती याकडे निर्देश करणारे आहे. ज्यामुळे मुस्लीम समाजाला काही मर्यादित संधीच आजवर उपलब्ध होऊ शकल्या. हे विधान नाकारणे म्हणजे सत्यापासून पलायन करण्यासारखे आहे. आता वेळ आली आहे ती मुस्लीम समाजाने अशा ओळखीतून स्वतःला बाहेर काढत आधुनिक भारताच्या उभारणीत सक्रिय आणि सहभाग घेण्याची.
 
तेव्हा पंतप्रधान मोदी यांच्या ‘पंक्चरवाले’ या विधानावरून निर्माण केलेले वादंग केवळ राजकीय तमाशा आहे. वास्तविक ते भारतीय मुस्लिमांच्या मेहनती, झुंजार आणि संघर्षशील प्रतिमेला समोर आणणारे विधान आहे. इस्लाममध्येही याच प्रतिमेला सन्मानाच्या नजरेने गौरविले आहे. मेहनत आणि कौशल्य याला कुराण शरीफमध्ये गौरविण्यात आले आहे.
 
तेव्हा आता मुस्लीम समाजाने आपली खरी ओळख समजून घेत तिचा अभिमानाने स्वीकार करावा आणि पंक्चरच्या कामापासून पुढे जात ते राष्ट्र निर्माणाच्या कार्यात आपले योगदान द्यावे.
 
(सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता आणि मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या ‘भारत फर्स्ट’चे राष्ट्रीय संयोजक सिराज कुरेशी यांच्या मूळ हिंदी लेखाचा विराग पाचपोर यांनी केलेला अनुवाद.)