तहव्वुर राणाचे होणार काय ?

विवेक मराठी    15-Apr-2025   
Total Views |
Tahawwur Rana
तहव्वुर राणाचे काय होणार, याची चिंता पाकिस्तानला असेल तर त्यात नवल नाही, पण ती काही निवडक राजकारण्यांना लागून राहिली आहे हे जास्त चिंताजनक आहे. त्यातही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तहव्वुरचा खटला योग्यरित्या चालावा अशी मागणी केली आहे, इतकेच नव्हे तर त्याला सर्वोच्च न्यायालयापर्यंत अपील करायची संधी मिळाली पाहिजे, असे त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पृथ्वीराज यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द अन्य काँग्रेसी मुख्यमंत्र्यांपेक्षा बरीच वेगळी होती, असे असता त्यांनी ही मागणी करावी हे अंमळ धक्कादायक आहे.
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा एक सूत्रधार तहव्वुर राणा याला मुसक्या आवळून भारतात आणण्यात आलेले यश महत्त्वाचे आहे. त्याला अमेरिकेतून भारतात आणण्यात आल्याबरोबर पहिली प्रतिक्रिया आली ती पाकिस्तानातून. त्यांच्या परराष्ट्र खात्याच्या वतीने सांगण्यात आले की, तो पाकिस्तानी नाहीच, तो कॅनडाचा उद्योजक आहे आणि तो अमेरिकेत राहतो, ही पाकिस्तानची ही ‘उत्स्फूर्त’ प्रतिक्रिया हास्यास्पद आहे. तो जन्माने आणि कर्माने पाकिस्तानीच आहे. अशा या तहव्वुर राणाचे होणार काय, याची चिंता केवळ पाकिस्तान्यांनाच आहे असे नाही. त्यांच्या या चिंतातूर जंतूंचे काय व्हायचे ते होवो, पण भारतातही त्याचे काही काळजीवाहू हितचिंतक आहेत. त्यांचे मात्र धाबे दणाणले आहे. दहशतवादी हल्ला घडला तेव्हा या दहशतवाद्यांना भारतात साह्य करणारे कोणीही नव्हते, असे तेव्हाच्या सरकारच्या वतीने वारंवार सांगितले गेले, पण ते जे कुणीतरी, कुठेतरी बिळात दडलेले असतील ते तहव्वुरच्या जबानीतून बाहेर पडतील आणि मग त्यांना पाठीशी घालणारे कोण, कुठले, तेही तपासले जाईल. तहव्वुर हा मुंबईवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी भारतात येऊन गेला, एकदा नव्हे तर अनेकदा तो आला. तो त्या हल्ल्याच्या ‘नियोजना’साठी आला होता हे उघड आहे. तो तेव्हा मुंबई, दिल्ली, हरिद्वार, आग्रा, हापूर, अहमदाबाद आणि कोची या शहरांना भेट देत राहिला. तो काही तेव्हा तिथले हवामान पाहायला गेलेला नव्हता. या भेटीत तो कोणाकोणाला भेटला त्याचा शोध घ्यावा लागेल. तो कोचीला गेला आणि नौदलाच्या अखत्यारित असलेल्या भागातल्या एका हॉटेलात उतरला. तो तिथे काही मासे मारायला वा खायला गेलेला नसणार. मग त्याला तिथे कोणकोण भेटले हे महत्त्वाचे आहे.
 
 
तो दुबईला गेला. तो ज्या गूढ व्यक्तीला भेटला ती भारतीय होती, की पाकिस्तानी, हा प्रश्न महत्त्वाचाच आहे. दुबईला तो ज्या व्यक्तीला भेटला, तिने त्याला भारतात तू जाऊ (किंवा येऊ) नकोस असे सांगितले. (त्याला सल्ला देणारा कदाचित भारतीय असेल म्हणून येथे येऊ असा पर्यायी उल्लेख केला आहे.) त्याने आतापर्यंत माहीत नाही, आठवत नाही, इतकी वर्षे झाली त्या गोष्टीला, ती आता कशी आठवणार, असे थातूरमातूर उत्तर दिले असेलही, पण गुन्हेगारांकडून योग्य उत्तरे कशी मिळवायची याचे एक तंत्र आहे आणि ते तपास यंत्रणेलाच चांगले आत्मसात असते. त्यातून सदानंद दाते हे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे असे प्रमुख आहेत की, ज्यांनी स्वत:च 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत कामा हॉस्पिटलपाशी दहशतवाद्यांशी झुंज दिली आणि त्यात ते गोळी लागून जखमीही झाले. त्यांच्या दिशेने कसाबने बाँबही फेकला होता, त्यात त्यांना अनेक जखमा झाल्या. तथापि त्यांनी कामा हॉस्पिटलची ती खिंड लढवली आणि कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईल यांना कामातल्या रुग्णांपर्यंत पोहोचू दिले नाही. त्यासाठी दाते यांना विशेष शौर्य पारितोषिकही देण्यात आले होते.
 
 
अमेरिकेच्या ताब्यातून आपल्या सुरक्षा व्यवस्थेच्या ताब्यात राणाला देण्यात आले तेव्हा अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या टॉमी ब्रुस म्हणाल्या की, ‘अमेरिका आणि भारत यांनी संयुक्तपणे जागतिक पातळीवरचा दहशतवाद संपवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे ठरवले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही तहव्वुर राणाला भारताच्या स्वाधीन करत आहोत.’ याचा अर्थ यापुढल्या काळातही हे दोन्ही देश दहशतवाद संपविण्यासाठी आपले प्रयत्न चालूच ठेवणार आहेत असा होतो.
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या चर्चेनंतरच ट्रम्प यांनी तहव्वुरला भारताच्या स्वाधीन करण्यास परवानगी दिली आणि त्यानंतरच या झटपट हालचाली होऊन तहव्वुरला भारतात आणण्यात आले.
 अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या चर्चेनंतरच ट्रम्प यांनी तहव्वुरला भारताच्या स्वाधीन करण्यास परवानगी दिली आणि त्यानंतरच या झटपट हालचाली होऊन तहव्वुरला भारतात आणण्यात आले. राणाचे प्रत्यार्पण होण्यात जसे पंतप्रधानांचे व्यक्तीगत प्रयत्न आहेत, तसे ते अजमल कसाब विरुद्धच्या खटल्यातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचेही आहेत. राणाला भारतात आणून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे त्याला सोपवावे यासाठी जे अपील तयार करावे लागते ते निकम यांनी केले होते, हेही महत्त्वाचे आहे. उज्ज्वल निकम यांना अमेरिकेत जाण्यास राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सांगितले. उज्ज्वल निकम यांनी पोलीस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांच्यासह वॉशिंग्टन आणि शिकागो या ठिकाणांना भेटी दिल्या. त्यांनी डेव्हिड हेडलीची जबानी घेतली तेव्हा त्याने राणा आणि हेडली यांच्यातल्या संवादाची माहिती त्यांना दिली. हेडलीने राणाची जी एक दैनंदिनी त्यांना दाखवली, त्यात काही लष्करी अधिकार्‍यांचे फोन नंबर मिळाले. राणा आणि हेडली यांच्यातला इमेल पत्रव्यवहारही निकम यांनी पाहिला आहे. हे लष्करी अधिकारी कोण, असा प्रश्न निकम यांनी केला असता हेडलीने ते पाकिस्तानी ‘आयएसआय’चे अधिकारी असल्याचे सांगितले. ते लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर या पदांवरचे अधिकारी असल्याचे सांगितले. त्यावर तेव्हाचे आपले परराष्ट्र सचिव (आणि आताचे परराष्ट्रमंत्री) एस. जयशंकर यांनी पाकिस्तानकडे त्यासंबंधीची विचारणा केली, पण पाकिस्तानने त्यावर काहीही प्रतिसाद दिला नाही. हेडलीच्या सांगण्यावरून राणा भारतात अनेक ठिकाणी भेट देत राहिला आणि हेडलीच्या सांगण्यावरून राणा पुणे आणि दिल्लीलाही भेट देऊन गेला. या सर्व माहितीचा तपशील आता राणाकडून गोळा करावा लागेल.
 
 
Tahawwur Rana
 
कसाबला फाशी दिल्यानंतर राणाविषयी आता कारवाई सुरू करणे गरजेचे आहे, असे वाटल्याने सर्व पुराव्यांसह उज्ज्वल निकम आणि काही अधिकारी पाकिस्तानला जाऊन आले. तिथे इस्लामाबादेत त्यांनी काही पाकिस्तानी अधिकार्‍यांशी या विषयावर चर्चा केली. पाकिस्तानी गृह खात्याच्या अधिकार्‍यांबरोबरही त्यांची चर्चा झाली. मुंबई हल्ल्याबाबत त्यांनी गोळा केलेले काही पुरावे त्यांनी तपासले. निकम यांनी पाकिस्तानी अधिकार्‍यांना तुम्ही हाफिज सईद आणि झाकिऊर रेहमान लख्वी यांच्यावर खटला का भरत नाही, असे विचारले. त्यावर त्यांनी ’तुम्ही आम्हाला काही पुरावेच सादर केलेले नाहीत’, असे सांगितले. तरीही ‘काही गुन्हेगारांवर आम्ही खटले भरले आहेत’ असे त्यांनी सांगितले. त्यावर निकम यांनी त्या अर्थाने कमी प्रतीच्या गुन्हेगारांवर खटले भरले, पण लख्वी आणि हाफिज सईद मोकळेच फिरत आहेत’, असे त्यांना सुनावले. त्यावर एका अधिकार्‍याने, ‘तुम्ही पुरावे द्या, आम्ही खटले चालवू’ असे म्हटले. तेव्हा निकम यांनी,‘गुन्हे जर तुमच्या भूमीवर घडलेले आहेत, तर इथले पुरावे गोळा करण्याची जबाबदारीही तुमचीच आहे’, असे त्यांना बजावले. पुढे काहीच घडले नाही.
 
 
राणा भारताच्या हाती आला, यात विशेष काही नाही, पण डेव्हिड कोलमन हेडली तथा दाऊद गिलानी मुंबई हल्ल्याच्या मुळाशी असताना त्याला का नाही भारतात आणले, असा प्रश्न काहीजणांनी केला आहे. त्यांची बौद्धिक कुवतच तेवढी असावी, अन्यथा डेव्हिड हेडली याला अमेरिकन न्यायसंस्थेने माफीचा साक्षीदार केले होते, हे त्यांच्या वाचनात आले असते. त्याने त्या एकाच अटीवर आपण मुंबई हल्ल्याच्या प्रकरणात नेमके काय घडले ते शब्द अन शब्द सांगायला तयार आहोत, असे म्हटलेले होते. ते तिथल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मान्य केल्यावरच तो माफीचा साक्षीदार बनला. मी जे सांगेन ते सगळे सत्य असेल, पण ते सांगितल्यावर मला भारताच्या ताब्यात देऊ नये अशी त्याने अट ठेवली होती. ती मान्य झाल्यावरच त्याला शिक्षा देण्यात आली. तहव्वुर राणा हा शिकागोहून पाकिस्तानकडे चालला असताना तिथल्या ओहियो विमानतळावर त्याने डेव्हिड हेडलीशी संपर्क साधला आणि त्यांचे हे बोलणे पोलिसांनी मध्येच ऐकले. त्यानंतरच त्यांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. आपल्या देशात जर असे बोलणे ऐकले गेले असते तर त्याचाच बागूलबोवा अधिक झाला असता. डेव्हिड हेडली आणि तहव्वुर राणा यांनी पाकिस्तानला त्याआधी एकत्र आणि स्वतंत्रपणे भेट दिली होती. हे दोघेही मूळचे पाकिस्तानी आहेत आणि लष्कर ए तैयबाशी संबंधित आहेत. म्हणजेच या दोघांचाही लष्कर ए तैयबाचा प्रमुख दहशतवादी हाफिज सईद याच्याशी थेट संबंध आहे. डेव्हिड हेडली हा मादक पदार्थांच्या व्यवसायात असल्याने या व्यवसायाचा कणा मोडून काढण्यासाठी अमेरिकेला त्याची आवश्यकता आहे. मुंबईवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या कटात तसेच डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेनला जिलँद्स पोस्तेन या वृत्तपत्रावर हल्ला करण्याच्या कटात सहभागी असल्याबद्दल डेव्हिड हेडलीला 35 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे.
 
 
मुंबईत हे हल्ले घडवायचे असतील तर त्या आधी भारतात जाऊन येणे धोक्याचे आहे, असा सल्ला राणाला दुबईमध्ये स्थायिक असलेल्या एका व्यक्तीने दिलेला होता. ही व्यक्ती दुसरीतिसरी कोणी नसून भारताला हवा असणारा आणि मुंबईत 1993 मध्ये बाँबस्फोट घडवून फरारी झालेला दाऊद इब्राहिम हाच असला पाहिजे, असा अंदाज आहे. दुबईतल्या या भेटीगाठीनंतर आणि पुरेशी माहिती मिळाल्यावरही तो भारतात अनेक ठिकाणी जात राहिला आणि त्याने या काळात हल्ल्याचे नियोजन केले. तो डेव्हिड हेडलीच्या सल्ल्यानेही काम करत होता. त्याला पाकिस्तानच्या ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ या लष्करी गुप्तचर संघटनेने बरेच ‘मार्गदर्शन’ केले होते. त्याच विषयावर आता भारतीय तपास यंत्रणेला अधिक माहिती मिळवायची आहे. पाकिस्तानला चिंता आहे ती याची. डेव्हिड हेडली आणि तहव्वुर राणा यांच्यात लहानमोठे असे कोणी नव्हते. दोघेही या कटाचे प्रमुख सूत्रधार होते आणि त्यांना पाकिस्तानातून महत्त्वाचे निरोप पोहोचवले जात होते. ते नेमके कोणाच्या माध्यमातून दिले गेले हे तपास यंत्रणेला माहिती करून घ्यायचे आहे.
 
 
तहव्वुर राणाने मुंबई हल्ल्यापूर्वी मुंबईत अनेकदा येऊन महत्त्वाच्या सर्व ठिकाणांना भेट दिलेली होती. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताजमहाल पॅलेस हॉटेल, ओबेरॉय ट्रायडंट, छाबाद हाऊस, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाऊस, टॉवर हॉटेल, टाइम्स ऑफ इंडिया इमारतीचा परिसर, माझगाव डॉकयार्ड, मेट्रो सिनेमा, कामा हॉस्पिटल आणि सेंट झेविअर्स कॉलेज या ठिकाणांना भेट दिली होती. तिथे भेट देण्याचा त्याचा नेमका उद्देश काय होता हेही तपास यंत्रणेला माहीत करून घ्यायचे आहे. या सर्व ठिकाणांना भेट देत असताना त्याला स्थानिक व्यक्तीची मदत घेतल्याशिवाय पुढे जाता येणेच अशक्य होते. 26 नोव्हेंबरला जेव्हा मुंबईवर हल्ला झाला तेव्हाही मुंबईच्या एखाददुसर्‍या व्यक्तीशिवाय एवढ्या सगळ्या ठिकाणांना कोणत्याही दहशतवाद्याला ठिकाणांची इतकी अचूक माहिती मिळू शकणार नाही, असे तेव्हाही म्हटले गेले होते. ती तिसरी व्यक्ती कोण आणि एकापेक्षा अधिक व्यक्तींचे मार्गदर्शन झाले असेल तर त्या व्यक्ती कोण तेही या यंत्रणेला तपासून पाहावे लागणार आहे.
 
 
मुळात तहव्वुरला दुबईला जाऊन संबंधित व्यक्तीला भेटण्यास कोणी सांगितले होते तेही माहीत करून घ्यावे लागेल. तो दक्षिणेत कोचीला का गेला होता, त्यामागे त्याचा उद्देश काय होता आणि त्याला तिथे जाण्यास कोणी सांगितले होते तेही तपासावे लागेल. कोचीला तो नेव्हल डॉकयार्डच्या समोरच्या एका हॉटेलात उतरला होता. ते कशासाठी, तिथे त्याने काही छायाचित्रे टिपली किंवा काय तेही पाहावे लागेल. कोचीचे हे भारतीय नौदल केंद्र पश्चिम किनारपट्टीच्या संरक्षणाचे महत्त्वाचे मानले जाते. तिथे त्याचा कोणाकोणाशी संपर्क झाला किंवा त्याचे तिथले खबरे कोण होते, ते तपासावे लागेल. आतापर्यंत या पाकिस्तानी हल्लेखोरांचे इथे कोणीच हस्तक नव्हते, असे तेव्हाच्या केंद्र सरकारने सांगितले होते. त्या आधीच्या 2 मार्च 1993च्या मुंबई बाँबस्फोटांच्या मालिकेत एकूण बारा बाँबस्फोट झालेले असताना तेव्हाच्या एका नेत्याने तेरावा बाँबस्फोटही कुठेतरी झाल्याचे विधान केले होते. ते नेमके मुस्लीम बहुसंख्य असलेल्या भागात झाले असल्याचे त्या नेत्याला सांगायचे होते. त्याच्या मते त्याने ते विधान मुद्दामच केले, त्यातून ती दंगल अन्यत्र भरकटू नये यासाठी आपण तसे म्हटले असे त्यानेच एका मुलाखतीत सांगितले होते.
 
 
 
तहव्वुर राणा भारतात येऊन गेल्यावर त्याने पाकिस्तानमध्ये लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा नेता हाफिज सईद, इल्यास काश्मिरी, झाकिऊर रेहमान लख्वी यांच्यासह आणखी कोणाकोणाशी चर्चा केली, हे तपासावे लागेल. त्याचबरोबर पाकिस्तानातून आलेल्या सर्वच्या सर्व दहशतवाद्यांच्या हातात केशरी गंडा बांधायचा सल्ला कोणी दिला होता की तो ‘आयएसआय’च्या सल्ल्याने देण्यात आला होता हेही तपास यंत्रणेला माहिती करून घ्यावे लागेल. भारतात तेव्हा ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काही राजकारण्यांनी रुढ करायचा प्रयत्न केला होता, त्याचाच एक भाग म्हणून हे गंडाबंधन होते किंवा काय तेही पाहावे लागेल. मुंबई पोलिसांचे अत्यंत कर्तव्यदक्ष असे पोलीस अधिकारी तुकाराम ओंबळे यांनी गोळ्या छातीवर झेलूनही कसाबला घट्ट मिठी मारून धरून ठेवले म्हणून तो हाती जिवंत सापडला, अन्यथा हे गंडाबंधन भगव्या दहशतवादाचा भाग म्हणूनच सांगितले गेले असते. तसा प्रचार करू इच्छिणार्‍यांचे दुर्दैव म्हणजे मुंबईचे पोलीस राजकारण्यांशी जोडले गेलेले नव्हते. आजही ते तसे नाहीत, म्हणून तर जगातली निष्पक्ष अशी ही पोलीस यंत्रणा मानली जाते.
 
vivek 
 राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख संचालक सदानंद दाते
 
या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख संचालक सदानंद दाते आहेत आणि जे बारा अधिकारी राणाच्या तपासासाठी नियुक्त करण्यात आले आहेत, त्यात जया रॉय आणि आशिष बात्रा यांचा समावेश आहे. जया रॉय पश्चिम बंगालमध्ये जन्मलेल्या, पण मूळच्या झारखंडच्या पोलीस उपमहानिरीक्षक आहेत. त्या जामतारा या ठिकाणच्या सायबर गुन्हेगारीवर नांगर फिरवणार्‍या पहिल्या पोलीस अधिकारी आहेत. याच नावाच्या सायबर गुन्हेगारीच्या दूरचित्रमालिकेने प्रकाशात आल्या. त्या एमबीबीएस आहेत आणि 2011 मध्ये झारखंडमध्ये त्या पोलीस सेवेत दाखल झाल्या. तसेच दुसरे आशिष बात्रा हे झारखंडच्या नक्षलवादी घुसखोरीविरूद्धच्या पथकाचे जग्वारमध्ये पोलीस महानिरीक्षक होते.
 
 
तहव्वुर राणाचे काय होणार, याची चिंता पाकिस्तानला असेल तर त्यात नवल नाही, पण ती काही निवडक राजकारण्यांना लागून राहिली आहे हे जास्त चिंताजनक आहे. त्यातही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्या खात्यात काम केले आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी तहव्वुरचा खटला योग्यरित्या चालावा अशी मागणी केली आहे, इतकेच नव्हे तर त्याला सर्वोच्च न्यायालयापर्यंत अपील करायची संधी मिळाली पाहिजे, असे त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द अन्य काँग्रेसी मुख्यमंत्र्यांपेक्षा बरीच वेगळी होती, असे असता त्यांनी ही मागणी करावी हे अंमळ धक्कादायक आहे. अशी मागणी करणार्‍यात कन्हैयाकुमार आहे, तसे उदित राज आहेत. आम्ही सत्याला धरून खटला चालवतो हे सिद्ध व्हायला हवे, असे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते आणि सध्या तृणमूल काँग्रेस पक्षात असलेले माजिद मेमन यांनी म्हटले आहे. ते स्वत: कायदेतज्ज्ञ आहेत. उदित राज हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनीही योग्य खटला चालावा, अशी अपेक्षा व्यक्त करून सध्याच्या न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अजून तरी राहुल गांधी किंवा त्यांचे सध्याचे सर्वोच्च नेते मल्लिकार्जुन खर्गे काही बोललेले नाहीत. ते बोलतील आणि मगच आपल्याला काहीबाही बोलता येईल, अशी अनेक काँग्रेसजनांची अपेक्षा असू शकते. अनेकांचा तहव्वुरसाठी आताच मातम चालू आहे, ही खरेतर आपल्या देशाची शोकांतिका आहे. त्यांना त्याच्यापेक्षा इथल्या त्याच्या समर्थकांचे काय होईल, याची चिंता लागून राहिलेली आहे असे दिसते. तहव्वुरला एकदा नव्हे तर ज्या 166 जणांना मारण्याच्या कटात तो सहभागी होता, तेवढ्या वेळा फाशी दिले तरी ती कमीच म्हणावी लागेल. अर्थात हा निर्णय आपल्या न्यायसंस्थेने घ्यायचा आहे. मातम करणार्‍यांना तो मेल्यावर तशी संधी पुन्हा एकदा मिळणारच आहे. तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे हे उत्तम.