@माधवी भट
मोरोपंतांची साहित्यसंपदा विपुल आहे. रामायणावर त्यांचं चिंतन, लेखन मोठं आहे. त्यांचं आर्याभारत एकदा तरी वाचावं असंच आहे. अशा या मोरोपंतांनी दिनांक 15 एप्रिल 1794 म्हणजेच चैत्र पौर्णिमेला त्यांनी रामाच्या चरणी देह ठेवला. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ही आदरांजली.
कविवर्य मोरोपंतांची ओळख अनेकांना होते तशी मलाही शाळेत असतानाच झाली. प्राथमिक शाळेत असताना प्रार्थना झाली की वर्गात पाढे म्हणायच्या आधी ‘सुसंगति सदा घडो ..’ म्हणायचो . तेव्हा आमच्या बाईंनी वर्गात म्हणायला म्हणून केवळ शिकवलेली प्रार्थना होती ती. त्यानंतर हळूहळू कवितांमधला रस वाढला. याला कारण अर्थातच शाळेतल्या कविता आणि त्या चालीत शिकवणारे तमाम शिक्षक आहेत. अभ्यासक्रमात वृत्त आणि अलंकार आले. तेव्हापासूनच वृत्तबद्ध कविता माझ्या लाडक्या झाल्या. वृत्त सोडवण्याचा प्रश्न आवडता झाला. तेव्हा कधीतरी पृथ्वी वृत्तात हेच उदाहरण पुन्हा समोर आलं. ‘सुसंगति सदा घडो...’ हे पृथ्वी वृत्त आहे तर आणि रचनाकार आहेत मोरोपंत! मोरोपंत पराडकर .
मोरोपंतांची केकावली प्रसिद्ध आहे असं पाठ्यपुस्तकात लिहून येत असे. काही गोष्टी डोक्यात किती कायमच्या बसतात आणि त्या आयुष्यभर सोबतही असतात. शालेय जीवनापासून मोरोपंत आणि केकावली हा सहसंबंध मेंदूत इतका घट्ट झाला की हा शब्द शब्दकोड्यात देखील नियमित भेटतो- ‘मोराची हाक, मोरोपंतांचे काव्य’! उत्तर असतं - केका किंवा केकावली.
हा गमतीचा भाग वगळला तरी, आजकाल पाहिलं तर संत, पंत आणि तंत कविता हे जुने काव्यप्रकार मागेच पडलेत. ओवी अभंग, किंवा तंत काव्यातल्या भवानी, मदन तलवार वृत्तात लेखन दिसतं तरी काहीवेळा. पण पंत कविता रचायला अवघड. त्यासाठी शब्दसंग्रह लागतो, लय आकळली पाहिजे आणि वृत्तालंकरांचा अभ्यासही लागतो. मात्र एकदा का त्याची गोडी लागली की त्याचं महत्त्व देखील कळतं.
मोरोपंतांच्या रचना आर्या आणि पृथ्वी या वृत्तांत सर्वाधिक आहेत. आर्या म्हणजे मोरोपंतच! हे तर सर्वमान्य आहे. आपल्यालाही माहित आहेच की -
‘सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची,
ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंतांची!’
मोरोपंत असे अधून मधून भेटत गेले. मात्र त्यांच्या आर्याभारत, रामायणे इत्यादी रचना मी कधी वाचल्या नव्हत्या. ते अचानक भेटले ते गेल्या काही वर्षात, जेव्हा एका अभ्यासविषयासाठी मी संदर्भ शोधत होते. रामायणातले काही प्रसंग आठवताना अचानक रूपक अलंकाराच्या ओळी आठवल्या ,
‘बाई काय सांगो, स्वामींची ती दृष्टी,
अमृताची वृष्टी, मज होय...’ आणि मी आनंदाने उसळलेच. वनवासात राम, लक्ष्मण आणि सीता जंगलातली अवघड वाट चालत असताना सीतेला काही त्रास तर होत नाहीय ना म्हणून राम तिच्याकडे मागे वळून वळून काळजीने बघतो आहे. ही वेडी मुलगी, राजकन्या! आत्ता कुठे आमचं लग्न झालं आणि लगेच माझ्यासोबत वनात आली. या तिच्या प्रेमाची रामाला होणारी जाणीव आणि त्याचं तिच्यावरचं प्रेम त्या एका कृतीतून दिसतं. सीता अशावेळी काय म्हणेल मनातून ? तर अगदी हेच .
‘मोरोपंतांची स्त्री-गीते’ या पुस्तकात मला ही सीतेची, रुक्मिणीची आणि सावित्रीची गाणी वाचायला मिळाली. माझा मूळ अभ्यास विषय होता रामायण, त्यात सीतेसह या दोन स्त्रिया बोनस म्हणूनच लाभल्या.
या तीनही स्त्रियांच्या गीतातून मोरोपंतांनी, रूपक, उत्प्रेक्षा, श्लेष, अनुप्रास अशा अलंकारांची नुसती उधळण केली आहे.
कोजागरीला आटवलेलं दूध पितांना दातांना कधी एखादा बेदाणा किंवा काजू लागल्यावर जसा आनंद होतो अगदी तसंच वाटतं गीतांत अलंकार आला की!
या गीतांचं वैशिष्ट्य हे की ती वाचतांना त्यांचा कर्ता पुरुष आहे असं अजिबात वाटत नाही. इतकी ती देहमनाने स्त्रीची आहेत.
लंकाविजयानंतर पुष्पक विमानात बसून सगळे अयोध्येला निघाले. रामाने सीतेला आपल्या मांडीवर बसवलं. सीतेचं अपहरण, रावणाशी युद्ध, लंकाविजय या संपूर्ण काळातली तिच्या मनाची अवस्था, विरह या सगळ्या घटनांची पार्श्वभूमी त्या एका प्रसंगाला आहे. त्यामुळे तिच्यासाठी रामाचं निकट असणं ही सर्वोच्च समाधानाची गोष्ट! राम सावळा आहे, हे आपण जाणतोच. या प्रसंगासाठी पंत लिहितात -
‘मांडीवरी मज घेतले स्वामींनी, घनी सौदामिनी जना वाटे.’
जलाने तुडुंब भरलेला सावळा मेघ तसा सीतेवरच्या प्रेमाने भारलेला राजा राम आणि त्याच्यासोबत उजळून निघालेली विजेची रेघ जशी शोभावी तशी ती.
रामरक्षेत आपण श्रीराम राम, रघुनंदन राम राम.. असा श्लोक म्हणतो तसंच एक स्तवन मोरोपंतानी सीतेला दिलं आहे.
संतती-संपत्ती वाढे, होय हीत, प्रेमे गाता गीत श्रीरामाचे
न बाधे पर्जन्य,वात,उष्ण,शीत, प्रेमे गाता गीत श्रीरामाचे
धन्य धन्य होई संसारी जीवित, प्रेमे गाता गीत श्रीरामाचे
काळापासूनीहि नव्हे चित्त भीत, प्रेमे गाता गीत श्रीरामाचे.
मोरोपंतानी सावित्री गीतात ‘यम आणि सावित्रीची’ प्रश्नोत्तरे देखील अतिशय सुंदर रचली आहेत.
सावित्रीने आपल्या वडिलांना शंभर पुत्र लाभावे असा तिसरा वर यमाला मागितला. पतीचे प्राण सोडून इतर काहीही माग असं म्हटल्यावर सावित्रीने बुद्धीने जे जे मागितलं आणि यमाने तिच्या कुशाग्र बुद्धीचं कौतुक केलं हे या गीतातून व्यक्त होतं. यातच मोरोपंत अतिशय तरलतेने श्लेष करत जातात -
सती म्हणे ‘ताता, दे औरस शत, पुत्र धर्मरत, वंशकर.’
यम म्हणे ,’शुचि - व्रतारंभरते, भ्राते शंभर ते,पहाशील .
स्वस्थाना जा शीघ्र, दूर तू आलीस, श्रमी का झालीस, वाढवेळ . साध्वी म्हणे,’आहे. पतिसंनिधान (पतीच्या जवळ असणे)
अति सन्निधान (उत्तम ठेवा)सुखाचे हे.
सावित्रीची कथा भारतीय कुटुंबातून युगानुयुगं सांगितली जात आहे. मात्र जेव्हा ती अशी काव्याच्या माध्यमातून सुंदर शब्दांच्या माध्यमातून आपल्यापुढे येते तेव्हा तिचा प्रभाव वेगळा पडतो. तीच कथा रुक्मिणीची. रुक्मिणीला कृष्णाशी लग्न करायचं होतं, शिशुपालाशी नाही. मात्र तिच्या लग्नाचे विधी सुरू झाले. ही कृष्णासाठी व्याकुळ झालीय. तिच्या डोळ्यात सारखं पाणी येतंय. तिला मैत्रिणी विचारतात,‘का गं डोळा पाणी?’ मग ती खोटंच उत्तर देते, ‘छे बाई, डोळ्यात तेल गेलंय म्हणून पाणी येतंय.
(पुसता मी सांगे, अश्रूहुत तेल, उत्तरी गुंतेल नव्हे कधी. )
तिला हळद लागली. मात्र कृष्णाच्या आठवाने कातर झालेल्या रुक्मिणीला हळदही हलाहल वाटू लागली आहे.
माय दे लावूनी, देहाला हळद, हे हालाहलद, न तो पाप!
आता मात्र हे तिला सोसत नाही. तिने कृष्णाला निरोप पाठवला -‘लग्नपूर्वदिनी, वृष्णीबळपूर्ण (यादवसैन्ययुक्त होऊन)
होऊनी या तूर्ण, हरावया ...’
ऐसे जे लिहोनी पाठविले होते, आठविले हो ते शतदा म्या.
न आले त्या दिशी, मध्ये रात्री मात्र, चिंताज्वरे गात्र, तापविले...!
कृष्णाचा निरोप नाही, तो आला नाही. यामुळे तिला काळजीने तापच आला.
पुढची कथा आपण सारे जाणतोच. मुख्य म्हणजे ही कथा रुक्मिणी द्रौपदीला सांगते आहे. गीताच्या सुरुवातीलाच द्रौपदी तिला विचारते,‘कसं घडून आलं सारं?’ तर त्यावरचं उत्तर म्हणजे हे गीत.
सीतेच्या गीताची सुरुवातही अशीच आहे. लंकाविजयानंतर सीतेच्या तीन बहिणी ज्या तिच्या जावादेखील आहेत, त्या तिला वनवास कथा विचारतात आणि त्यांना उत्तर म्हणून सीता गाणे गाते आपली कथा सांगते. त्या ओळी अशा -
चवघी बहिणी भाग्ये झाल्या जावा,
त्यांचा गीती गावा सुसंवाद.
सीता म्हणे ऐका, वनवास कथा
परि मनी व्यथा न धरावी -
रामाच्या स्तवनाप्रमाणेच रुक्मिणी स्वयंवर कथा वाचल्याने काय होईल? याबद्दल गीताच्या अखेरीस मोरोपंत लिहितात -
नाशी कामक्रोध, लोभ पापव्यथा, स्वयंवरकथा रुक्मिणीची.
लावी धर्मन्याय, भक्तिज्ञानपथा, स्वयंवरकथा, रुक्मिणीची .
भेटवी देऊनी प्रेम पक्षीरथा (विष्णूला), स्वयंवर कथा रुक्मिणीची.
मोरोपंतांची साहित्यसंपदा विपुल आहे. रामायणावर त्यांचं चिंतन, लेखन मोठं आहे. त्यांचं आर्याभारत एकदा तरी वाचावं असंच आहे. उदाहरणार्थ - विराटपर्वात कीचकवधाच्या वेळची एक आर्या आहे. किती अर्थपूर्ण आहे बघा -
दावी दुरूनि नरकग्रामाची भीम कीचका वेस,
कलिमाजि लघुत्वप्रद शक्तीस तसेची नीच कावेस.
भीमाने कीचकाला दुरून नरकग्रामाची वेस दाखवली. भीम कृष्णभक्त असूनही त्याने कीचकाला मोक्षपदास न नेता नरकग्रामाकडे पाठवलं. ही गोष्ट वस्तुत: भीमाला लघुत्वप्रद म्हणजे कमीपणा आणणारी आहे. तथापि नीचांच्या संसर्गाने सज्जनालाही लघुत्व पत्करावे लागते.
(संदर्भ -मोरोपंत-चरित्र आणि काव्यविवेचन. संपादक - ल. रा. पांगारकर )
मोरोपंतांच्या विपुल ग्रंथ भांडारातून वेचून काढलेल्या त्यांच्या स्त्रीगीतातल्या या काही ओळी आहेत फक्त. पण त्यामुळे त्यांच्या साहित्याकडे खेचून घ्यायला त्या पर्याप्त नक्कीच आहेत.
दिनांक 15 एप्रिल 1794 म्हणजेच चैत्र पौर्णिमेला त्यांनी रामाच्या चरणी देह ठेवला. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ही आदरांजली.
- माधवी भट