प. बंगालमध्ये रामनवमीची क्रांती

विवेक मराठी    11-Apr-2025   
Total Views |

rammandir
प. बंगालच्या 23 जिल्ह्यांमध्ये दीड कोटीच्या आसपास नागरीक रामनवमीच्या मिरवणुकीत सामील झाले. रस्त्यांवर ठिकठिकाणी भगव्या पताका, भगवे ध्वज दिसण्याचे अतिशय उत्साहाचे आणि आश्वासक चित्र रा. स्व. संघ, भाजपा आणि विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने बंगालमध्ये प्रथमच दिसत होते. ममता सरकारच्या गुंडांच्या दहशतीला न जुमानता मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येण्याचे धैर्य तेथील हिंदूंनी दाखवले. या रामनवमीच्या क्रांतीने बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसलादेखील यू-टर्न घ्यायला भाग पाडले.
तमिळनाडूमध्ये हिंदूंच्या श्रद्धांचे सार्वजनिक प्रकटीकरण ज्याप्रमाणे हेतूपूर्वकपणे दडपून ठेवले गेले, तसाच प्रकार बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने आरंभला आहे. रामनवमी हा हिंदूंसाठी श्रद्धेचा दिवस असतो. मात्र ‘हिंदी बोलणार्‍या श्रीरामापेक्षा आम्हाला बांग्ला बोलणारी कालीमाता किंवा दुर्गा अधिक जवळची आहे,‘ असे कथ्य तृणमूल काँग्रेसकडून तिकडे पसरवले जात आहे. तमिळनाडूमध्ये सनातन धर्माबद्दल विकृतपणाने बोलले जात असल्याचे आपल्या परिचयाचे आहे.
 
रामाला परका समजण्याचे कथित बुद्धिवंतांचे षडयंत्र
 
‘जय श्रीराम’ही घोषणा आणि रामनवमी उत्सव साजरा करणे हे दोन्ही बंगालच्या संस्कृतीसाठी नवे आहे आणि या घोषणेचा वापर तर लोकांना मारहाण करण्यासाठी केला जातो असे संकुचित आणि धक्कादायक विधान प्रख्यात अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी केले होते. जो बंगाल प्रांत आधी कम्युनिस्ट आणि नंतर ममता बॅनर्जी यांच्या जंगलराजमध्ये मागास राहिला, जेथे औद्योगिक संस्कृती मूळ धरू शकली नाही, त्याबद्दल न बोलणारे हे महाशय जगात अर्थतज्ज्ञ म्हणून मिरवत असतात. तेथील दहशतराजबद्दल चकार शब्द न काढणारे हे महाशय श्रीरामावरून अशासारखे तुच्छतादर्शक उद्गार काढायला तयार असतात. रामनवमीचे एकवेळ सोडा; बंगालमध्ये पारंपरिकपणे साजरा केला जात असलेल्या नवरात्रानंतर दुर्गामूर्तीच्या विसर्जनादिवशी मोहरमदेखील आल्यास विसर्जनावर बंदी घालण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या अचाट पराक्रमाबद्दल ते बोलल्याचेही कधी दिसले नाही. ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये मांडलेल्या उच्छादाचा निषेध करणे दूरच; शांतिनिकेतनमध्ये जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी आपल्याला पाठिंबा दिला म्हणून बॅनर्जी यांचे आभार मानण्याचे कर्तृत्व मात्र त्यांनी गाजवले. असा बोटचेपेपणा करणारे सेन हे एकटे नाहीत. देशातील स्वत:ला बुद्धीवादी म्हणवणार्‍या फार मोठ्या वर्गाने ममता बॅनर्जी यांच्या जंगलराजकडे साफ दुर्लक्ष केले असल्याचे दिसेल. तेथील हिंदूंमध्ये जागृती आणण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना ते त्यामुळेच संकुचित वृत्ती असे संबोधत असतात.
 
 
jay shree ram
 
या निमित्ताने बंगालमधील एका आगळ्यावेगळ्या वास्तवाचा परिचय करून द्यावासा वाटतो. देशात साडेतीन हजारांपेक्षा अधिक गावांची नावे श्रीरामावरून ठेवलेली असल्याचे 2011च्या जनगणनेवरून स्पष्ट झाले होते. बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील रामपाडा हे पर्वतराजीतील एक गाव असे आहे की तेथील प्रत्येकाच्या नावात ‘राम’ असतोच असतो. प्रत्यक्षात श्रीराम तेथे गेल्याची नोंद नसूनही शेकडो वर्षांपासून ही प्रथा तेथे चालू आहे.
 
 
ममतांचे कांगावे आणि दडपशाहीची हद्द
 
यावेळच्या रामनवमीच्या वेळीदेखील ममता सरकारने मिरवणुकांवर बंदी आणली होती. ‘रामनवमीची शोभायात्रा म्हणजे भाजपाकडून दंगली घडवण्याचे षडयंत्र’ असे विकृत समीकरण ममता बॅनर्जी यांनी जाहीरपणे मांडलेले आहे. तसे तुणतुणे त्या नेहमी वाजवत असतात. दंगलीचा कांगावा करण्यासाठी त्यांना काहीही निमित्त पुरते. मागच्या वर्षी तृणमूलसमर्थक देशघातकी शक्ती कच्च्या बाँबची निर्मिती करत असताना स्फोट होऊन तिघेजण मृत्युमुखी पडण्याच्या घटनेनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक बंगालला भेट देणार होते. तेव्हाही मुख्यमंत्र्यांनी हाच कांगावा करत आपल्याला या घटनेचे कसलेही गांभीर्य नसल्याचे दाखवले होते.स्वत:ची लहर फिरेल तेव्हा एकट्या भाजपाला लक्ष्य करायचे नसेल, तेव्हा ‘बाम (वाम-डावे-कम्युनिस्ट) आणि राम (हिंदुत्ववादी - भाजपा) हे अमुक घटनेला जबाबदार आहेत,‘ असे विधानदेखील त्या करत असतात. त्या श्रीरामाचे केवढे अवमूल्यन करतात हे यावरून कळू शकते. मुस्लिम मतांची बेगमी करता यावी, म्हणून त्या कम्युनिस्टांना भाजपाची बी-टीम म्हणत असतात. ‘द वायर’ या दुष्प्रचारी नियतकालिकाने रामनवमीच्या आधी ‘रामनवमीच्या निमित्ताने दंगलींच्या मौसमाचे आयोजन कसे करावे?’ या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध करून याकामी आपला रतीब टाकला. मिरवणुकांना परवानगी मिळू नये, या हेतुने यावेळीदेखील पोलिसांनी अतिशय जाचक अटी घातल्या होत्या. दोनशेपेक्षा अधिक लोक मिरवणुकीत नसावेत, भगवा ध्वज फडकवण्यासाठीदेखील लाठ्यांचा वापर करू नये, मशीद किंवा मुस्लिमांची वस्ती असलेल्या मार्गावरून मिरवणूक नेऊ नये, पुढे जाऊन विविध मिरवणुका एकत्र आणू नयेत, भक्तिगीतेदेखील लावली जाऊ नयेत, भजने म्हणू नयेत, अशा आशयाच्या या अटी असतात. आणि भारतासारख्या देशात हिंदूंवर या अटी लादल्या जातात हे विशेष. राज्याच्या मुख्यमंत्रीच अशी हिंदूघातकी भूमिका घेत असल्याचे पाहून आजही त्यांच्या या दडपशाहीविरोधात बंगालमधील हिंदूंना वारंवार न्यायालयाचे दरवाजे खटखटवावे लागतात. बंगालमध्ये मिरवणुकीला परवानगी द्यायची की नाही हे तेथील पोलीस यंत्रणा नव्हे; तर तृणमूल काँग्रेसचे गुंड ठरवत असतात. त्यामुळे राज्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांना न्यायालयात जावे लागते, हे वास्तव खुद्द पंतप्रधान मोदींनी मागच्या वर्षी घालण्यात आलेल्या बंदीच्या निमित्ताने दाखवले होते.
 
jay shree ram 
 
रामनवमीची क्रांती आणि तृणमूल काँग्रेसचा यू-टर्न
 
मुर्शिदाबाद, हावडा, माल्दा, शिवपुर, रिषडा, हुगळी ही व आणखी काही शहरे रामनवमीच्या निमित्ताने हिंसाचाराची केंद्रे बनल्याचे आजवर दिसत होते. तृणमूलसमर्थक गुंडांना आवर घालण्याऐवजी भाजपाला दोष देण्याची तृणमूलची पद्धत नित्य परिचयाची झाली होती. यावेळी मात्र भाजपा, रा. स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषद या सर्वांच्या पुढाकारामुळे हिंदू निर्भयपणे पुढे आले आणि एकट्या कोलकात्यामध्ये ऐंशीपेक्षा अधिक मिरवणुका काढण्यात आल्या. बंगालच्या तेवीस जिल्ह्यांमध्ये दीड कोटी नागरीक मिरवणुकांच्या निमित्ताने रस्त्यावर येतील, असे उद्दिष्ट राज्य भाजपाने ठेवले होते. रस्त्यांवर ठिकठिकाणी भगव्या पताका आणि भगवे ध्वज दिसण्याचे अतिशय उत्साहाचे आणि आश्वासक चित्र बंगालमध्ये प्रथमच दिसत होते. ममता सरकारच्या गुंडांच्या दहशतीला न जुमानता मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येण्याचे धैर्य तेथील हिंदूंनी दाखवले. अशा प्रकारे मोठीच क्रांती बंगालमध्ये घडली आहे. या क्रांतीची धग तृणमूल काँग्रेसला एवढ्या तीव्रतेने जाणवली की आपण रामनवमी शोभायात्रांना विरोध करत आलो आहोत, हे विसरून त्यांनी स्वत:च भगवी वस्त्रे लेवून मिरवणुका काढल्या. एका मिरवणुकीत तर त्यांनी श्रीरामाला चक्क अयोध्येच्या रामलल्लाच्या स्वरूपात दाखवले. ‘मिरवणुका काढण्यात तृणमूल काँग्रेसने भाजपाशी स्पर्धा केली’ अशा मथळ्याची बातमी ‘द हिंदू’ने दिली. अर्थात बंगालचे हिंदू आता असे वेषधारी बगुलाभक्त नीट ओळखतीलच. सर्वांवर कडी केली ती ‘रामनवमी शोभायात्रा म्हणजे भाजपाचे दंगलीचे षडयंत्र’ असे म्हणणार्‍या ममता यांनी. सर्व मिरवणुका शांततेत पार पाडल्याबद्दल बंगालच्या जनतेचे अभिनंदन करणारी पोस्ट त्यांनी ‘एक्स’वर केली. वर ‘रामनवमी साजरी करणे ही भाजपाची मक्तेदारी नाही’, अशी मखलाशी त्यांच्या पक्षाला करावी लागली. एवढे करून खुद्द मुख्यमंत्री या उत्सवात सामील झाल्याच नाहीत.
 
 
जादवपूर विद्यापीठात इफ्तारचे आयोजन तर केले जाते; मात्र रामनवमी साजरी करण्यासाठी मागितलेली परवानगी ऐनवेळी नाकारण्यात आल्यावर तेथील विद्यार्थ्यांनी ती केलीच. देशविरोधी कारवायांचे समर्थन करण्याचे प्रकार वारंवार होत असलेल्या आणि डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या जादवपूर विद्यापीठात रामनवमी साजरी केली जाणे, हे तेथील दहशत संपुष्टात आल्याचे चिन्ह आहे.
 
jay shree ram 
 
राज्य भाजपाची एकजूट
 
भाजपामध्ये आलेले विविध नेते मागच्या वेळी केवळ ममता बॅनर्जी यांच्या दहशतीमुळे त्यांच्या पक्षात परत गेले. बाबुल सुप्रियो हे त्याचे प्रमुख उदाहरण. यावेळी मात्र बंगाल भाजपाचे अध्यक्ष सुकांतो मजुमदार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी, माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि खासदार लॉकेट चटर्जी हे सर्व नेते पाय भक्कमपणे रोवून उभे राहिल्यामुळे हा बदल शक्य झाला. अंजनीपुत्र सेना या संघटनेनेदेखील उच्च न्यायालयात जाऊन मिरवणुकीला परवानगी मिळवली होती. नंदीग्राम हा एके काळी ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला समजला जात असे. तेथे त्यांना सुवेंदु अधिकारी यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत पराभूत होण्याची नामुष्की पत्करावी लागली होती. आता या रामनवमीच्या निमित्ताने तेथेच अयोध्येच्या धर्तीवरील श्रीराममंदिराचा पायाभरणी समारंभ सुवेंदु अधिकारी यांनी आयोजित केला. उत्तर मालदा मतदारसंघात यापूर्वी रामनवमीच्या निमित्ताने हिंसाचार घडला होता. यावेळी मात्र तेथील भाजपाचे खासदार खगेन मुर्मू यांना वेगळा अनुभव आला. तेथील मुस्लिमांकडून रामनवमी मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मागच्या वेळी उच्च न्यायालयाने काही ठिकाणी मिरवणुकांना परवानगी देताना केवळ दोनशे लोकांच्या उपस्थितीची परवानगी दिली होती. लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मागच्या वर्षीच ती अट पाळता आली नव्हती. यावेळचा प्रतिसाद तर त्यापेक्षाही फार मोठा होता. यावेळचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले होते. यावेळी काही ठिकाणी मिरवणुकांवर झालेली दडपशाही आजवरच्या मानाने किरकोळ म्हणावी अशी होती.
 
 
jay shree ram
 
रामनवमीच्या शोभायात्रांमधील मोठ्या सहभागाचे महत्त्व
 
बंगालमधील रामनवमीच्या निमित्ताने शोभायात्रांचे फार विशेष ते काय, असा प्रश्न काही जणांना पडणे साहजिक आहे. बंगालच्या काही प्रांतांमध्ये हिंदूंना आजच्या पाकिस्तान आणि बांगलादेशप्रमाणे तृणमूल काँग्रेसचे अभय असलेल्या मुस्लिमांच्या दहशतीत जगावे लागते हे वस्तुस्थिती त्यांना माहीत नसते. अशा प्रांतांमध्ये सोडा; खुद्द कोलकात्यामध्येदेखील अशा दहशतीची धग जाणवते. हिंदूंसाठी सुरक्षित असलेल्या महाराष्ट्रात बसून भाजपाच्या बंगालमधील मर्यादित राजकीय यशाची टिंगल करणार्‍या आणि मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बंगालमध्ये भाजपाची पीछेहाट झाल्याचा आनंद व्यक्त करणार्‍या स्वत:ला पुरोगामी म्हणवणार्‍या टाळक्यांना तेथील वास्तव सहन न होता ते त्वरेने महाराष्ट्रात पळून येतील अशी दारूण स्थिती तेथे आहे. आज बांगलादेशात धर्मांधांचे राज्य आल्यापासून तेथील हिंदूंची ससेहोलपट होत असल्यामुळे आपल्याला त्यांची काळजी वाटते. ममतांच्या राज्यात पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये हिंदूंची स्थिती नेमकी तशीच आहे याची आपल्याला जाणीव नसते. मागच्या वर्षी उघड झालेले संदेशखालीमधील अत्याचार हे केवळ हिमनगाचे टोक आहे हेदेखील आपल्या गावी नसते. हे सारे पाहता तेथील हिंदू जागृत होणे ही तेथील जंगलराज संपवण्याच्या दिशेने फार मोठी घटना आहे.
 
 
ममतांची तडफड
 
वक्फ सुधारणा कायदा संसदेने नुकताच मंजूर केल्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये त्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही अशी दर्पोक्ती केली आहे. मुस्लिमांचा अनुनय यापेक्षा त्याचे वेगळे कारण नाही. शिक्षकभरती घोटाळ्यातील सुमारे तब्बल पंचवीस हजार शिक्षकांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयानेही रद्द ठरवली आहे. तरीदेखील त्यांची नियुक्ती रद्द केली जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी रामनवमीच्या निमित्ताने झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर उच्च न्यायालय, मानवाधिकार आयोग, प्रशासन सेवा, पोलिस प्रशासन, राष्ट्रीय महिला आयोग या संस्थांच्या माजी अधिकार्‍यांचे पथक तेथेे वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी गेले होते. तृणमूलचे गुंड त्या हिंसाचारात सामील असल्याचा त्यांनी दिलेला अहवाल मुख्यमंत्र्यांनी साफ नाकारला होता. हा अहवाल सर्वोच्च न्यायालयाचा आहे का, असा प्रश्न त्यांनी त्यावेळी विचारला होता. आता त्या संसदेने केलेला कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकालदेखील मानण्यास तयार नाहीत हे दिसते. अशा प्रकारे त्यांची मनमानी चालू आहे. कोलकात्यातील वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात झालेल्या भयानक प्रकारानंतर त्यांची प्रतिमा भरपूर डागाळली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील एका महाविद्यालयात ‘बालके, महिला व वंचित वर्गाचा सामाजिक विकास’ या विषयावर बोलण्यासाठी त्या गेल्या असता स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या डाव्यांच्या संघटनेने भ्रष्टाचार आणि निवडणुकीतील हिंसाचार या मुद्द्यांवरून ‘ममता चले जाव’च्या घोषणा देऊन त्यांची नाचक्की केली. भारताच्या विविध भागांमध्ये गेलेल्या रोहिंग्यांकडील कागदपत्रे तपासली असता त्यातील बव्हंशी बंगालच्या विशिष्ट भागातून बनवली गेल्याचे उघड झाले आहे. या देशद्रोही कृत्यात बंगाल सरकारचा आणि ममतांच्या पक्षाचा त्यात सक्रिय सहभाग असल्याखेरीज हे होणे शक्य नाही हे स्पष्ट आहे. पुढील विधानसभा निवडणुकीस एक वर्षही उरलेले नसताना ही संकटे समोर उभी ठाकलेली असल्यामुळे ममता हवालदिल झालेल्या असणे साहजिक आहे. त्यावेळी श्रीराम तर नाहीच; पण दुर्गा तरी त्यांच्या मदतीस येईल, अशी आशा त्यांनी करू नये.