अव्यवसायिक खगोलअभ्यासकांसाठी संधी

विवेक मराठी    11-Apr-2025
Total Views |
@अर्चित गोखले
 
astronomy
खगोलशास्त्राची आवड असलेल्या प्रत्येकानी विशेषतः तरुणांनी खगोलशास्त्राची  विद्या आत्मसात करून, त्याचा अभ्यास करून भारताचं प्रतिनिधित्व करणारी अनेक निरीक्षणं घेऊन ती जगभरात कार्यरत असलेल्या संस्थांना पाठवली पाहिजेत. खगोलशास्त्रातील महत्त्वपूर्ण शोध लावण्यासाठी, अवकाश तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी अनेक तरुण खगोलशास्त्राकडे व्यवसाय म्हणून जसे बघत आहेत त्याचप्रकारे ज्यांनी हा मार्ग व्यवसाय म्हणून निवडला नाही त्यांना जगभरातील अनेक ठिकाणांहून येणार्‍या अशा निरीक्षणांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी निरीक्षणं पाठवण्यासाठी, खगोलशास्त्राला महत्त्वाचं योगदान देण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.
खगोलशास्त्र ही व्यापक संकल्पना असून त्याचे अनेक पैलू आहेत. खगोलभौतिकशास्त्र म्हणजे ऍस्ट्रोफिजिक्समध्ये खगोलीय वस्तूंचा अभ्यास भौतिकशास्त्रातील संकल्पनांच्या आधारे केला जातो. त्याचबरोबर अवकाश तंत्रज्ञान म्हणजेच स्पेस टेक्नॉलॉजी ह्यामध्ये अभियांत्रिकीचा वापर करून अवकाशयान तयार करून विविध खगोलीय वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी ते यान प्रत्यक्ष अवकाशात पाठवलं जातं. अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भौतिकशास्त्रज्ञ, खगोलभौतिकशास्त्रात पदवीप्राप्त शास्त्रज्ञ आणि अभियंते काम करतात. तसेच खगोलभौतिकशास्त्रात विविध खगोलीय वस्तूंबाबत महत्त्वपूर्ण शोध लावण्यासाठी किंवा त्यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक पदवीप्राप्त शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. अशा पदवीप्राप्त शास्त्रज्ञांना प्रोफेशनल ऍस्ट्रॉनॉमर्स म्हटलं जातं. खगोलशास्त्राचा प्रसार आणि प्रचार करणारे अनेक खगोलअभ्यासक जगभरात आहेत. खगोलशास्त्रात पदवीप्राप्त नसलेल्या खगोलअभ्यासकांना अमॅच्युअर ऍस्ट्रॉनॉमर्स असं म्हणतात.
 
 
अमॅच्युअर ऍस्ट्रॉनॉमर्स म्हणत असले, त्यांच्याकडे कुठल्या विद्यापीठाची त्या क्षेत्रातली पदवी नसली तरी त्यांना चांगलं ज्ञान असतं. भारतात खगोलशास्त्राची परंपरा खूप थोर आहे. त्यामुळे त्यावर असंख्य साहित्य उपलब्ध आहे, तसेच अनेक जाणकार, माहितगार आणि अभ्यासू व्यक्ती ह्या क्षेत्रात आहेत. तसेच काही उत्तम संस्था खगोलशास्त्रात कार्यरत आहेत. त्यांच्यातर्फे खगोलशास्त्राचे वर्ग, कार्यशाळा, प्रत्यक्ष आकाशदर्शन असे अनेक उपक्रम चालतात. तिकडे तुम्हाला उत्तम ज्ञान मिळू शकतं. त्यामुळे विद्या असणे आणि पदवी असणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
 
 
खगोलशास्त्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं, त्यासाठी लेखन, व्याख्यानं, आकाश दर्शन कार्यक्रम आयोजित करणारे अनेक खगोलअभ्यासक किंवा खगोलप्रेमी संस्था आपल्या माहितीच्या असतील. परंतु ह्या अमॅच्युअर ऍस्ट्रॉनॉमर्सचं काम एवढ्यावर मर्यादित नसतं. व्यावसायिक खगोलशास्त्रज्ञांना पुढील अभ्यासासाठी उपयुक्त आणि परिपक्व असा डेटा पुरवण्याचं काम हे खगोलअभ्यासक करत असतात. दुर्बिणीचा आणि विविध उपकरणांचा वापर करून एखाद्या खगोलीय घटनेचं प्रत्यक्ष निरीक्षण करून, घेतलेल्या निरीक्षणांवर अभ्यास करून त्यातून पुढील अभ्यासासाठी उपयुक्त माहिती निवडून, व्यावसायिक खगोलअभ्यासकांना पुढील कामासाठी वापर करता येईल अशा स्वरूपात ती निरीक्षणं आणण्याचं महत्वपूर्ण काम जगभरातील खगोलअभ्यासक करत असतात. ह्या पातळीवरदेखील विविध खगोलीय घटनांचा आणि घटकांचा अभ्यास करता येतो. हा अभ्यास स्वान्तसुखाय न ठेवता तो विविध खगोल संस्थांपर्यंत पोहोचवला जाऊ शकतो आणि त्यातून खगोलशास्त्रातील महत्वपूर्ण गुपितं उलगडण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. उल्कावर्षाव, सौरमालेतील लघुग्रह, रूपविकारी तारे, जोडतारे अशा अनेक रंजक खगोलीय घटनांचा अभ्यास ह्या पातळीवर केला जातो.

astronomy 
 
अवकाशातील लहान खडक जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रचंड वेगाने प्रवेश करतात तेव्हा निर्माण होणार्‍या उष्णतेमुळे ते चमकतात. त्याला आपण उल्का असं म्हणतो. अशा अनेक उल्का जेव्हा आपल्याला एकाच दिवशी, आकाशातील एकाच ठिकाणाहून उत्सर्जित होताना दिसतात तेव्हा त्याला उल्कावर्षाव असं म्हणतात. वर्षभर असे अनेक उल्कावर्षाव आपल्याला पहायला मिळतात. हे दृश्य अगदी रंजक असतं. परंतु केवळ त्यावर मर्यादित न राहता उल्कावर्षावाचं निरीक्षण करून, त्याचा अभ्यास करून मिळवलेली माहिती जागतिक पातळीवर उल्कावर्षावाचा अभ्यास करणारी संस्था इंटरनॅशनल मिटीऑर ऑर्गनायझेशन (IMO) येथे पाठवली जाऊ शकतात. मुख्य म्हणजे उल्कावर्षावाचं निरीक्षण करण्यासाठी दुर्बीण, कॅमेरा अशा कुठल्याही उपकरणांची आवश्यकता नसते. साध्या डोळ्यांनी निरीक्षणं घेता येतात. अर्थात त्या संबंधित खगोलीय संकल्पना, उल्कावर्षावाविषयी माहिती आणि अत्यंत संयम असणं आवश्यक आहे. परंतु आपण संबंधित संकल्पनांचा अभ्यास करून ही निरीक्षणं कशी घ्यायची हे शिकून घेतलं तर कुठलीही खगोलशास्त्रातील पदवी आपल्याकडे नसली तरी आपण जागतिक पातळीवर खगोलशास्त्राला महत्त्वाचं योगदान देऊ शकतो. एखादी उल्का दिसली की ती आकाशातील कुठल्या भागातून उत्सर्जित होऊन कुठल्या दिशेला गेली, त्याची प्रत (तेज) किती होती, तासाला किती उल्का दिसल्या, एखादी उल्का किती वाजता दिसली ह्याची अतिशय काळजीपूर्वक आणि अचूक नोंद घेऊन ह्या नोंदी IMOकडे पाठवता येतात. जगभरातून आलेल्या नोंदींचं संकलन करून पुढील अभ्यासासाठी ही माहिती व्यावसायिक खगोलशास्त्रज्ञांना आणि खगोलअभ्यासकांना पुरवली जाते.
 
 
सूर्य आणि चंद्राच्या ग्रहणांविषयी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचप्रकारे आपल्या सौरमालेतील लघुग्रह, मुख्य ग्रहांचे उपग्रह किंवा आपला चंद्र जेव्हा एखाद्या दूरवरच्या तार्‍याच्या आणि पृथ्वीच्या मधून जातात तेव्हा त्या तार्‍याला ग्रहण लागतं. परंतु ह्या घटनेला ग्रहण असं न म्हणता पिधान असं म्हंटलं जातं. अशा पिधानांची निरीक्षणं दुर्बिणीच्या आणि कॅमेराच्या मदतीने घेतली जातात. अर्थात ह्यामध्ये वापरल्या जाणार्‍या दुर्बिणी ह्या व्यावसायिक दुर्बिणींसारख्या नसून मध्यम पातळीवरच्या असतात. एखाद्या तार्‍याचं पिधान होणार असेल त्याच्या काही मिनिटं आधीपासून निरीक्षण घेणं सुरू होतं. तार्‍यापासून येणारा प्रकाश आणि वेळ ह्याची अचूक नोंद खगोलअभ्यासक घेत असतात. जेव्हा पिधान होतं तेव्हा तार्‍यापासून येणारा प्रकाश कमी होतो किंवा काही वेळा पूर्ण नाहीसा होतो आणि पिधान संपलं की तार्‍याचा प्रकाश पुन्हा दिसू लागतो. अशी निरीक्षणं घेऊन त्यावर अभ्यास करून, सॉफ्टवेअरच्या मदतीने लाईट कर्व्ह काढला जातो. हा लाईट कर्व्ह आणि निरीक्षणं जागतिक पातळीवर पिधानांचा अभ्यास करणार्‍या आणि निरीक्षणं संकलित करणार्‍या इंटरनॅशनल ऑकलटेशन टाईमिंग असोसिएशन ( IOTA -) ह्या संस्थेकडे पाठवली जातात. त्यातून ज्या लघुग्रहाने पिधान केलं आहे त्याचा आकार कसा आहे, त्याची कक्षा कशी आहे, किंवा उपग्रहांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यावरील वातावरणाची वैशिष्ट्य ह्याचा अभ्यास प्रत्यक्ष तिथे न जाता पृथ्वीवर बसून केला जातो. ज्या तार्‍याचं पिधान झालं आहे त्याबद्दल देखील महत्त्वाचं संशोधन केलं जाऊ शकतं. अर्थात ही निरीक्षणं घेण्यासाठी संबंधित खगोलीय संकल्पनांचा, दुर्बिणींचा, कॅमेरा आणि इतर उपकरणं, सॉफ्टवेअर ह्याचा प्रचंड अभ्यास असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर चिकाटी आणि संयम असणं आवश्यक आहे. परंतु अशी निरीक्षणं पाठवून खगोलशास्त्राला महत्त्वाचं योगदान देण्यासाठी व्यावसायिक पदवी असण्याचं बंधन नाही.
 
 
आकाशात आपल्याला अनेक तारे दिसतात. परंतु आपण त्यांचं सूक्ष्म निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की काही तार्‍यांची चमक काळाच्या ओघात आपल्याला कमी-जास्त होताना दिसते. अशा तार्‍यांना रूपविकारी तारे असं म्हणतात. ह्या तार्‍यांचे तेज कमी जास्त होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. काही तार्‍यांची त्रिज्या आणि त्यांच्या तापमानात बदल होतात, काही तार्‍यांमधील ऊर्जेचा उद्रेक होऊन ते नोव्हा किंवा सुपरनोव्हा होऊ शकतात तर काही तारे जोडतारे असल्यामुळे तार्‍याच्या जोडीदाराने तार्‍याला ग्रहण लावल्याने तारा कमी तेजस्वी दिसतो. फोटोमेट्रीमध्ये तार्‍यांपासून येणार्‍या प्रकाशाच्या तीव्रतेचं (फ्लक्स) मोजमापन केलं जातं. सातत्याने असं मोजमापन केल्यावर तार्‍याकडून येणार्‍या प्रकाशाचा लाईट कर्व्ह तयार केला जातो. ह्या लाईट कर्व्हमध्ये तार्‍याची प्रत आणि छायाचित्रणाची वेळ ह्याचे तपशील असतात. त्यामुळे तारा कमी तेजस्वी नेमका कोणत्या कालावधीत दिसत आहे हे आपल्याला कळू शकतं. त्याचबरोबर अशाप्रकारचा अभ्यास करताना त्या छायाचित्रात असलेल्या इतर स्थिर प्रतीच्या तार्‍याचा लाईट कर्व्ह काढला जातो. अर्थात त्यात काहीच बदल दिसत नाहीत. अशा तार्‍याला रेफरन्स स्टार म्हंटलं जातं. अशा अभ्यासातून रूपविकारी तारे शोधले जातात किंवा एखाद्या माहितीच्या रूपविकारी तार्‍याचा पुढील अभ्यास किंवा तो तारा कमी-जास्त तेजस्वी असण्याचा अचूक कालावधी निश्चित केला जाऊ शकतो. अशाप्रकारचा अभ्यास जगभरातील अव्यावसायिक खगोलअभ्यासकांकडून मोठ्या प्रमाणावर केला जातो. जगभरातून घेतलेली रूपविकारी तार्‍यांची निरीक्षणं अमेरिकन असोसीएशन ऑफ व्हेरीएबल स्टार ऑबसर्व्हर्स (AAVSO) येथे संकलित करून त्यावर पुढे संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञांपर्यंत तसेच इतर खगोलअभ्यासकांपर्यंत पोहोचवली जातात. अवकाशातील काही तारे जोडतारे असतात. अशा तार्‍यांची निरीक्षणं घेऊन दोन्ही तार्‍यांमधलं अंशात्मक अंतर तसेच एखाद्या तार्‍याचा जोडीदार त्यातील प्रमुख तार्‍याच्या सापेक्ष कुठल्या स्थानी आहे (पोजिशन अँगल) अशी महत्त्वाची माहिती आपण जर्नल ऑफ डबल स्टार ऑबजर्वेशन्स (JDSO) येथे पाठवू शकतो.
 
 
अशाप्रकारे विज्ञानाला अतिशय मोलाचं योगदान खगोलअभ्यासक देत असतात. आकाशमित्र मंडळ, कल्याण ह्या संस्थेतील चमूने अशी अनेक निरीक्षणं पाठवून त्यावर देशविदेशातील प्रख्यात विज्ञान जर्नल्समध्ये शोधनिबंधदेखील लिहिले आहेत. भारतातील अनेक नामांकित अव्यावसायिक खगोलअभ्यासक संस्था अशी कामगिरी बजावत आहेत. खगोलशास्त्राची आवड असलेल्या प्रत्येकानी विशेषतः तरुणांनी ही विद्या आत्मसात करून, त्याचा अभ्यास करून भारताचं प्रतिनिधित्व करणारी अशी अनेक निरीक्षणं घेऊन ती जगभरात कार्यरत असलेल्या संस्थांना पाठवली पाहिजेत. खगोलशास्त्रातील महत्त्वपूर्ण शोध लावण्यासाठी, अवकाश तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी अनेक तरुण खगोलशास्त्राकडे व्यवसाय म्हणून जसे बघत आहेत त्याचप्रकारे ज्यांनी हा मार्ग व्यवसाय म्हणून निवडला नाही त्यांना जगभरातील अनेक ठिकाणांहून येणार्‍या अशा निरीक्षणांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी निरीक्षणं पाठवण्यासाठी, खगोलशास्त्राला महत्त्वाचं योगदान देण्यासाठी अशा अनेक संधी उपलब्ध आहेत.
 
खगोलाविषयी कुतूहल, एखादं काम अचूकतेने पूर्ण करण्याचा दृढनिश्चय आणि नवीन संकल्पना आणि तंत्रज्ञान शिकण्याची आवड असलेल्या प्रत्येकानी जास्तीत जास्त प्रमाणात ह्याचा अभ्यास करून खगोलशास्त्राला जास्तीत जास्त योगदान देण्याचे प्रयत्न करायला हवेत.