एक कट्टर स्वयंसेवक, निष्ठावान कार्यकर्ता, सहृदय मित्र आणि कुटुंबप्रेमी भीमसेन नावाचा माणूस 7 एप्रिल 2025 रोजी काळाच्या पडद्याआड गेला. देशासाठी, समाजासाठी जीवन अर्पण करणारा एक सहृदय मित्र हरपला.
सकाळी 8ची वेळ. फोनची बेल वाजली आणि सुदर्शनचे नाव पाहून शंकेची पाल चुकचुकली. सुदर्शन ओक्साबोक्शी रडत होता. बाबा हालचाल करीत नाहीत असे उद्गार काढत त्याने ती दु:खद बातमी सांगितली. भीमसेन सदानंद राणे हा गेली 3-4 वर्षे अंथरूणावर खिळलेले त्याचे शरीर अतिशय कृश होऊन गेले होते. मुलगा, पत्नी व मुलींच्या अथक प्रयत्नाने त्याची मृत्यृशी जी झुंज सुरू होती, ती आता संपली. एक कट्टर स्वयंसेवक, निष्ठावान कार्यकर्ता, सहृदय मित्र आणि कुटुंबप्रेमी भीमसेन नावाचा माणूस 7 एप्रिल 2025 रोजी काळाच्या पडद्याआड गेला. आमची मैत्री ऐहिक अर्थाने संपुष्टात आली.
मागे पत्नी विजया, मुलगा सुदर्शन, दोन मुली प्रज्ञा आणि प्राजक्ता व परिवार.
संपला परिचय?? अजिबात नाही.
भीमसेन आणि माझी ओळख, मैत्री 50 वर्षांपेक्षा अधिक काळाची. ठेंगणी पण मजबूत शरीरयष्टी, परखड बोलणे, साहसी वृत्ती, गडगडणारे हास्य आणि मुख्य म्हणजे विलक्षण उत्साह असे त्याचे लोभस व्यक्तिमत्त्व होते. तसे रावराणे हे कुटुंब वैभववाडी तालुक्यातील लोरे गावाचे रहिवासी. वडील हिंदू महासभेचे सक्रीय कार्यकर्ते! त्यामुळे घरातूनच हिंदुत्वाचे बाळकडू मिळालेले. आई पण कर्तृत्ववान व दानशूर होती. रामायण महाभारत तिला तोंडपाठ होते. तेही संस्कार भीमसेनला मिळाले. पण मस्ती, मारामार्या यात तो सतत पुढे असे!
गावातील शाळा 7 वी पर्यंतच असल्याने सातवी झाल्यावर वडिलांनी शिक्षण सोडून शेती पहायला सांगितले. पण रघुवीर काका मदतीला धावला आणि पुढील शिक्षणासाठी भीमसेनची रवानगी मुंबईत झाली. हा काका आणि भीमसेन म्हणजे एकमेकांचे जीव की प्राण होते.
कष्टाचे दिवस होते ते. लालबागच्या दगडी चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत राहणारे भीमसेन चुलतभावांबरोबर रात्री झोपायला मैदानात जायचे, रात्रशाळेत शिकायचे आणि दिवसा हॅाटेलमधे नोकरी करायचे. इथेच त्यांचा संघप्रवेश झाला. संभाजीबाबाने संघात आणले. तेव्हापासून सुरू झालेले संघमय जीवन मरेपर्यंत चालू राहिले.
किर्ती कॉलेजात डिए बीएड करून भीमसेनने काही काळ बोरीवलीच्या गोखले एज्युकेशन सोसायटीत शिक्षकाची नोकरी केली. तिथे संस्कृत, इंग्रजी, विज्ञान असे गणित सोडून सर्व विषय ते शिकवत. याच वेळी प्रचारक होण्याचा त्यांचा निर्णय झाला. काका मात्र प्रचंड संतापले. पण शेवटी त्यांनी परवानगी दिली आणि 1973 पासून चार वर्षे भीमसेनने गिरगाव, शिरूर, पंढरपूर आणि रत्नागिरीत पूर्णवेळ संघाचे काम केले. याच काळात पूजनीय गुरुजी रुग्णालयात होते आणि एक पूर्ण दिवस भीमसेन श्रीगुरुजींच्या सेवेत होते, अशी आठवण ते भावुक होऊन सांगत असत.
याच काळात देशात आणीबाणी लागू झाली. संघाच्या वरिष्ठ नेत्यांच्या येण्याजाण्याच्या नियोजनात त्यांना जबाबदारी दिली गेली. त्यांनी केवळ वेषच नव्हे तर आपले नावही बदलले. भीमसेन सदानंद राणेचा बाळकृष्ण वासुदेव यादव झाला! सोपवलेले कामही चोख पार पाडले. पण कुठेतरी गफलत झाली आणि हे महाशय पोलिसांच्या तावडीत सापडले. रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृह.
इकडे मीही सत्याग्रह आयोजित करत होतो आणि 26 जानेवारीच्या शेवटच्या सत्याग्रहात सहभागी झालो होतो. 15 दिवस आर्थर रोडच्या तुरुंगात काढून घरी आलो तेव्हा दुसर्याच दिवशी मला मिसामध्ये अटक होऊन माझीही रवानगी ठाणे तुरुंगात झाली. आत प्रवेश करताच धावत येऊन भीमसेनने मला घट्ट मिठी मारली आणि पुढचे 15 महिने दिवसरात्र आम्ही एकत्र राहिलो, अनेक कार्यक्रम केले, ज्येष्ठांना सांभाळले. तुरुंगवास असला तरी ही एक सुवर्णसंधी बनली. वाचन, लेखन, व्यायाम, खेळ, पाठांतर, व्याख्यानमाला, अनेक उपक्रम आयोजित करण्यात ज्या आम्हा तरुणांचा पुढाकार होता, त्यात भीमसेन आघाडीवर असे. त्या मंतरलेल्या दिवसांचे वर्णन करण्यासाठी वेगळा लेख लिहावा लागेल.
प्रचारक जीवनानंतर भीमसेनने गृहस्थाश्रम स्वीकारला, विवाह केला आणि नोकरीच्या भानगडीत न पडता टेम्पो वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे प्रचंड मेहनत घेऊन यशस्वी केलेला हा उद्योग टिकू शकला नाही.
पुढे आमच्या वन्दे मातरम् संस्थेत त्यांनी अनेक वर्षे काम केले. विशेषत: म्युनिसिपल शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खूप काम केले. वर्ग घेतले, शिबिरे घेतली, स्पर्धा घेतल्या. कन्यारत्न योजनेत घरोघरी जाऊन सेवा दिली. काम कोणतेही असो, पूर्ण झोकून देऊन करणार म्हणजे करणार. मूळ स्वभाव तापट असला तरी सच्च्या कार्यकर्त्याप्रमाणे त्यांनी त्याला मुरड घालून संघशरण वृत्ती जोपासली. हातात घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय सोडायचे नाही हा बाणा होता. याचे एक उदाहरण सांगण्यासारखे आहे. टेम्पो चालवत असताना एकदा बोरीवलीच्या फाटकाजवळ इतर वाहनांनी रस्ता जाम केला आणि पश्चिम रेल्वे काही तास बंद पडली. यात भीमसेनची काहीच चूक नव्हती, ते केव्हाच फाटकातून बाहेर पडले होते. पण महिनाअखेर पोलीस आले आणि त्यांनी केस केली, लायसन्स जप्त केले. कोर्टात उभे राहिल्यावर न्यायाधीशांनी गुन्हा मान्य आहे का असे विचारल्यावर मी जो गुन्हा केलाच नाही तो मान्य आहे का असे कसे विचारतां असा उलट प्रश्न केला. दंड फक्त 300 रूपये होता पण तो न भरता भीमसेनने ही केस 10 वर्ष लढवली आणि शेवटी जिंकून दाखवली.
त्यांच्या टेम्पोवर गर्व से कहो, हम हिन्दु है, भारत माता की जय असे ठसठशीत लिहिलेले असे. एकदा हा टेम्पो भेंडीबाजार भागात गेला असता तेथील मुसलमान गुंडांनी टेम्पोवर हल्ला केला. पण न डगमगता भीमसेनने गाडीतील मोठ्या स्क्रू ड्रायव्हरने प्रतिहल्ला करून गाडी बाहेर काढली. मार के मरूंगा ही आरोळी ठोकून त्यांनी मुकाबला केला.
असे अनेक प्रसंग असतील. शेवटी मात्र ते शारीरिक त्रासाने खचले. सुदैव हे की त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची दिवसरात्र सेवा केली, जशी त्यांनी स्वत:च्या आईची केली होती. इतके वैविध्यपूर्ण आयुष्य फार कमी लोकांना लाभते. देशासाठी, समाजासाठी जीवन अर्पण करणारे भीमसेन शेवटी मात्र उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिले. नातेवाईक, इमारतीतील शेजारी आणि काही स्थानिक स्वयंसेवक यांनी मूकपणे त्यांना अंतिम निरोप दिला. ईश्वर त्यांना सद्गती देवो आणि घरातील लोकांना धैर्य देवो, ही प्रार्थना.
सतीश सिन्नरकर
लेखक महानगरी वार्ताहरचे संपादक आहेत.