सरदार पटेल यांच्या वारशावर दावा करताना काँग्रेसला केवळ त्यांच्या प्रतिमा मिरविण्याचीच हौस आहे की, त्यांचा आदर्श स्वीकारून त्यांच्या मार्गावरून पुढे वाटचाल करण्याची प्रामाणिक इच्छा आहे हाच यातील कळीचा मुद्दा समजला पाहिजे. जर काँग्रेसला आता सरदार पटेल यांच्या मार्गावरून पुढील वाटचाल करण्याची इच्छा झाली असेल तर त्या गोष्टीचे ’देर आए पर दुरुस्त आए’ अशा प्रकारे स्वागतच केले पाहिजे.
महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यावर काँग्रेस पक्षाचाच हक्क आहे, असा दावा पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अहमदाबाद येथे सरदार पटेल यांच्या स्मारकस्थळी पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने केला आहे. एका अर्थाने काँग्रेसची ही भूमिका अनाकलनीय म्हणावी लागेल कारण देशात भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यानंतर व त्याच्या कारभाराला अकरा वर्षांहून अधिक काळ लोटल्यावर काँग्रेसला ही बुद्धी सुचलेली आहे. पण काँग्रेसच्या या भूमिकेला वेगवेगळे पदर आहेत आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या नेमक्या हेतूंबाबत प्रश्न उपस्थित होतात.
खर्गे यांचे म्हणणे असे आहे की, राष्ट्रीय महापुरुषांबाबत एक सोयीस्कर षड्यंत्र रचले जात आहे. पं. नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात मतभेद असल्याचे गैरसमज संघ आणि भाजपाकडून पसरविले जात आहेत. लोकांना गांधीजींचा चष्मा, काठी चोरता येऊ शकते पण ते त्यांच्या आदर्शांवर चालू शकत नाहीत.
जेव्हा काँग्रेस महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांची गणना राष्ट्रीय महापुरुषांमध्ये करते तेव्हा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, राष्ट्रीय महापुरुष ही केवळ एका कुटुंबाची अथवा एका पक्षाची पैतृक मालमत्ता होऊ शकत नाही. राष्ट्रातील सर्व नागरिकांचा या राष्ट्रीय महापुरुषांवर समान अधिकार असतो. पण सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या महापुरुषांना आपली मालमत्ता म्हणून घोषित करायचे की त्यांचा वैचारिक वारसा स्वीकारून त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून वाटचाल करायची. त्यामुळे काँग्रेसने सर्वप्रथम सरदार पटेल यांचा वैचारिक वारसा कोणता आहे याची नीट माहिती करून घेतली पाहिजे. सरदार पटेल यांचा वारसा आहे सांस्कृतिक राष्ट्रवादाचा. आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या अखंडित ठेवण्यासाठी त्यांनी अपरिमित प्रयास केले व भारताला ’भारत’ म्हणून ओळख मिळवून दिली. ही केवळ राजकीय ओळखच नव्हती तर भारताला आपली पुरातन सांस्कृतिक ओळख मिळवून देण्यासाठीही सरदार पटेल यांनी कंबर कसली होती आणि त्यामुळे आपले पुरातन सांस्कृतिक वैभव आणि वारसा जतन करण्यासाठी त्यांनी सोमनाथ मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. शिवाय या खटाटोपाला पं. नेहरू यांचा किती विरोध आहे हे सर्व भारतीयांना माहीत आहे. दुसरे उदाहरण सांगायचे तर, हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी पं. नेहरू लष्करी कारवाईच्या बाजूने नव्हते, कारण त्यांना आपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेची काळजी होती. पण ते मंजुरी देणार नाहीत हे माहीत असल्यामुळे नेहरूंच्या विदेशवारीची संधी साधून पटेल यांनी ही कारवाई केली होती, असाच इतिहास सर्वांना ठाऊक आहे. तसेच जम्मू-काश्मीर प्रकरणातही या दोघांची वेगळी व टोकाची मते होती हेसुद्धा जनता जाणते. आता राहिला सरदार पटेल यांचा रा. स्व. संघाला विरोध असल्याबाबतचे खर्गे यांचे काँग्रेसी मत. त्याचे वास्तव जाणून घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांच्या हत्येत संघाचा सहभाग असल्याचे कुंभांड नेहमी काँग्रेस चालविते, पण महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर एकोणतिसाव्या दिवशी पटेल यांनी नेहरूंना पत्र लिहून असे स्पष्टपणे कळविले होते की, ’मिठाई वाटली, आनंदोत्सव साजरा केला इत्यादी गोष्टी चौकशी केल्यानंतर खोट्या असल्याचे आढळून आले...या कटात रा. स्व. संघाचा कोणत्याही प्रकारे सहभाग नव्हता हे सिद्ध होते.’ हे पत्र पटेल-नेहरू पत्रव्यवहार संकलनाच्या सहाव्या खंडात पृष्ठ क्रमांक 56-57 वर उपलब्ध आहे. संघबंदी उठल्यावर मुंबईला बिर्ला हाउस येथे श्रीगुरुजी व सरदार पटेल यांची भेट झाली होती. त्यांच्यात मनमोकळा संवाद झाला होता व सरदार पटेल यांचे निधन होईपर्यंत त्यांच्याशी गुरुजींचे मधुर संबंध होते. संघावर जेव्हा बंदी घातली गेली तेव्हा नेहरू पंतप्रधान आणि पटेल गृहमंत्री होते. पण नेहरू जेथे संघाला चिरडून टाकण्याची भाषा बोलत होते तेथे श्रीगुरुजी यांना लिहिलेल्या पत्रात सरदार पटेल यांनी रा. स्व. संघाला काँग्रेसमध्ये सामावून घेण्याचा विचार मांडताना असे म्हटले होते की, ’काँग्रेसमध्ये विलीन होउनच संघकार्यकर्ते देशसेवा करू शकतील.’ त्यामुळे संघाला चिरडू पाहणारा आणि संघाला आपल्यासोबत घेऊ पाहणारा अशा दोघांच्या भूमिका एक असूच शकत नाहीत. मग पं. नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात मतभेद असल्याचे गैरसमज संघ आणि भाजपाकडून पसरविले जात आहेत, असे आरोप करून विनाकारण ’साप, साप’ म्हणून भुई धोपटण्यात किती हशील आहे ते खर्गे यांनीच ठरवावे. कदाचित ही सर्व माहिती असलेली पिढी आता नावापुरती उरलेली आहे हे लक्षात घेऊन सध्याच्या वातावरणात जनतेची दिशाभूल करण्यासाठीच खर्गे यांनी ही सर्व उठाठेव आरंभली आहे.
मात्र सरदार पटेल यांच्या वारशावर दावा करताना काँग्रेसला केवळ त्यांच्या प्रतिमा मिरविण्याचीच हौस आहे की, त्यांचा आदर्श स्वीकारून त्यांच्या मार्गावरून पुढे वाटचाल करण्याची प्रामाणिक इच्छा आहे हाच यातील कळीचा मुद्दा समजला पाहिजे. जर काँग्रेसला आता सरदार पटेल यांच्या मार्गावरून पुढील वाटचाल करण्याची इच्छा झाली असेल तर त्या गोष्टीचे ’देर आए पर दुरुस्त आए’ अशा प्रकारे स्वागतच केले पाहिजे. या ठिकाणी हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे की, जर काँग्रेसने याच मार्गावरून स्वातंत्र्योत्तर काळात वाटचाल केली असती तर आज जी काँग्रेसची दुरवस्था झालेली दिसते ती मुळीच झालेली नसती. पण सत्तासुंदरीच्या मोहात सापडून भारतीय संस्कृती व जीवनमूल्यांचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांचा वारसा काँग्रेसने पुढे नेण्याचा कधीच विचार केला नाही. राष्ट्रपुरुषांचा वारसा सर्वसामायिक असतो आणि जर भाजपा तो वारसा पुढे नेत असेल तर मग काँग्रेसचा तिळपापड होण्याचे कारणच काय. मात्र जाणीवपूर्वक अशा वैचारिक वारशाकडे कानाडोळा करायचा आणि त्याबाबत अनास्था कायम ठेवायची, पण त्या मार्गावरून पुढे जात असल्यामुळे अन्य कुणाची प्रगती होत आहे असे दिसून आल्यावर मग त्याला अपशकुन करण्यासाठी आमचा वारसा ’हायजॅक’ झाला हो, असे म्हणून गळा काढायचा यालाच खरा दुटप्पीपणा म्हटला पाहिजे व या दुटप्पीपणाला निगरगट्टपणाचीही किनार आहे, हे स्पष्ट आहे.