पाकिस्तानी सैन्याची ’ऑपरेशन गुलमर्ग’ ही मोहीम कशी सुरू झाली? भारतीय सैन्य श्रीनगरच्या विमानतळावर कसे उतरले? बडगामची लढाई होऊन श्रीनगर कसे बचावले? इत्यादी लष्करी हालचाली आणि त्या मागच्या राजकीय हालचाली यांचा वेध आपण गेल्या दोन लेखांतून घेतला. आजच्या लेखात श्रीनगरच्या तेव्हाच्या सामाजिक स्थितीकडे पाहू या.
शेख मुहम्मद अब्दुल्ला किंवा वृत्तपत्रीय भाषेत ज्यांना शेख अब्दुल्ला म्हणतात, त्यांचा जन्म 1905 सालचा. यांचे वडील शेख मुहम्मद इब्राहिम. ते सुप्रसिद्ध काश्मिरी शाली बनवणारे कुशल कारागीर होते. शेख अब्दुल्ला 1930 मध्ये अलिगड मुस्लीम विद्यापीठातून रसायनशास्त्र या विषयांतून एम.एस.सी. पदवी प्राप्त करून काश्मीरमध्ये परतले. श्रीनगरच्या सरकारी शाळेत विज्ञान शिक्षक म्हणून काम करू लागले.
1931 साली अब्दुल कादिर नावाच्या एका इसमाने, महाराजा हरिसिंग यांच्या विरोधात सर्व मुसलमानांनी एकजूट झाले पाहिजे आणि काश्मीर स्वतंत्र केले पाहिजे, अशा आशयाचे अत्यंत भडक भाषण केले. दंगा झाला. गोळीबारात 21 माणसे ठार झाली. काश्मिरी मुसलमान जनतेत, हिंदू राजाबद्दल असंतोष निर्माण करणारी ही पहिली ठिणगी होती. या सगळ्या बनावाच्या मागे शेख अब्दुल्ला हा 26 वर्षांचा तरुण होता, हे इंग्रजांना कळले. इंग्रज सरकारला ‘संस्थानी सरकार’विरुद्ध वापरायला तरुण मुसलमान नेता मिळाला. काँग्रेस नेत्यानांही हे कळले. त्यांनाही आनंद झाला. कारण स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताचे शासन हे लोकशाही पद्धतीचे असेेल, असे काँग्रेसने ठरवले होते. यामुळे ’ब्रिटिश इंडिया’मध्ये काँग्रेसजन जशी इंग्रज सरकारविरोधी आंदोलने करीत असत; तशीच संस्थानी प्रदेशांमध्ये काँग्रेसजन तिथल्या अधिपतींविरुद्ध करत असे. यामुळे स्वातंत्र्यानंतर काश्मीर संस्थानचा नेता कोण, याचे उत्तर काँग्रेसने ठरवून टाकले.
कठीण समय येता...
1931-32च्या या कालखंडात स्वातंत्र्य दृष्टिपथातही नव्हते. कारण इंग्रजांची सत्ता जरी युरोपात थोडी क्षीण झाली असली, तरी भारतावर तिची पकड पूर्वीइतकीच मजबूत होती. इंग्रजांद्वारे भारतातले स्वातंत्र्य आंदोलन हिंदू-मुसलमानांत दुही माजवून दुर्बळ करून झालेच होते. आता हिंदूंमध्ये स्पृश्य-अस्पृश्य भेदांना उठाव देऊन ते अधिक दुर्बल करून सोडण्याची चाल इंग्रज खेळत होते. सप्टेंबर ते डिसेंबर 1931 या कालखंडात झालेल्या दुसर्या गोलमेज परिषदेत ’कॉम्युनल अॅवार्ड’ जाहीर करून इंग्रज सरकारने सगळ्याच अल्पसंख्य समुदायांना चुचकारले होते.
देशावर म्हणजे हिंदू समाजावर कोसळणारी ही संकटे समाजाला समजतच नव्हती. अशा स्थितीत जम्मू-काश्मीर या संस्थानात बलराज मधोक नावाच्या तरुणाने 1939 साली ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या राजकारणापासून अलिप्त राहून हिंदूचे संघटन करणार्या संस्थेच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. आजचे उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचलप्रदेश हे प्रांत त्यावेळी युनायटेड प्रॉव्हिन्स-यू.पी. या नावाने ओळखले जात होते. संघाचे काम तिथेच चांगलेच रूजले होते. बॅरिस्टर नरेंद्रजितसिंह हे अतिशय प्रतिष्ठित गृहस्थ उत्तरप्रदेशचे प्रांत संघचालक होते. तसेच आजचे पंजाब, हरयाणा हे प्रांत मिळून एकच पंजाब प्रांत होता. तिथेही संघकार्याने चांगलेच मूळ धरले होते. रामबहादूर बद्रिदास हे अतिशय मान्यवर नेते पंजाबचे प्रांत संघचालक होते. काश्मीरला लागून असलेल्या या दोन्ही प्रांतांच्या अनुकूलतेमुळे आणि बलराज मधोक यांच्या धडाडीमुळे काश्मीर संस्थानातही संघ भराभर वाढू लागला. काश्मीरमध्ये ‘अब्रोल’ या आडनावाचे एक फार इतिहासप्रसिद्ध घराणे आहे. बलराजजींच्या संपर्कातून या घराण्यातील जगदीश अब्रोल नावाचा युवक संघात तर आलाच आणि लवकरच तो पूर्णवेळ प्रचारक बनला. तसेच पंडित प्रेमनाथ डोगरा हे अतिशय मान्यवर गृहस्थ संघात आले. काश्मीर प्रांत संघचालक पदाची जबाबदारी यांच्यावर सोपविण्यात आली.

पंडित प्रेमनाथ डोगरा व बलराज मधोक
पंडित प्रेमनाथ डोगरांमुळे बलराज मधोक यांचा महाराजा हरिसिंग यांच्याशी थेट संपर्क स्थापित झाला. बॅरिस्टर नरेंद्रजितसिंग, रायबहादूर बद्रिदास यांच्याही महाराजांशी भेटी झाल्या आणि सतत संपर्क चालू राहिला.
15 ऑगस्ट 1947
तिकडे शेख अब्दुल्लाच्या घातकी कारवाया सुरूच होत्या. त्याच्या ’नॅशनल कॉन्फरन्स’ या पक्षाने 10 मे 1946 या दिवशी ’काश्मीर छोडो’ आंदोलन पुकारले. ’नॅशनल कॉन्फरन्स’चा काश्मीर सोडण्याचा आदेश प्रत्यक्ष इंग्रजांना नसून तिथल्या हिंदू राजघराण्याला होता. पण इकडे ब्रिटिश इंडियात नेहरूंना शेख अब्दुल्लांच्या प्रेमाचा उमाळा आला. ते शेख अब्दुल्लांना पाठिंबा द्यायला धावून गेले. काश्मीरच्या महाराजांनी शेख अब्दुल्ला आणि नेहरू या दोघांनाही अटक केली. झाले! नेहरूंच्या अटकेमुळे काँग्रेस पक्ष आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य भारतीय लोक महाराजांच्या विरोधात गेले.
अशातच 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र होणार, मुसलमानांचा पाकिस्तान हा वेगळा देश बनणार आणि संस्थानांना स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळणार, अशा आशयाच्या बातम्या जाहीर झाल्या. सरदार पटेल, यांचे सहाय्यक व्ही. पी. मेनन हे राजनैतिक स्तरावरून तर बलराज मधोक आणि पंडित प्रेमनाथ डोगरा हे हितचिंतक म्हणून महाराजांना भारतात सामील होण्याचा सल्ला देत होते. महाराज भारताविरुद्ध नव्हते; पण भारतात सामील होणे म्हणजे नेहरूंच्या अंगठ्याखाली जाणे, हे त्या मानी राजाला मानवत नव्हते.
महाराजांचे पंतप्रधान रामचंद्र काक
आणखीही एक गोष्ट होती. कूट राजनीतीत स्त्री कशी उपयोगी येते पाहा. महाराजांचे पंतप्रधान रामचंद्र काक हे हिंदू काश्मिरी पंडित होते. ते महाराजांना पाकिस्तानात सामील होण्याचा सल्ला देत होते. काक हे विधूर होते. सत्तावीस वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आणि पाच मुलांना जन्म दिल्यावर त्यांची हिंदू पत्नी मरण पावली होती. मग स्वतःच्या वयाच्या 42 व्या वर्षी काक यांनी मार्गारेट मेरी नामक ब्रिटिश महिलेशी लग्न केले. कूट राजनीतीत प्रवीण असलेल्या लॉर्ड माऊंटबॅटनने या महिलेशी संपर्क स्थापित केला किंवा कदाचित ती आधीपासूनच इंग्रजी हेर खात्याची हस्तक असू शकेल. तर माऊंटबॅटनने या मार्गारेट मेरीद्वारे रामचंद्र काकवर दबाव आणून महाराजांना भारतात सामील होण्याचा निर्णय घेण्यापासून रोखले.
15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश इंडियात सर्वत्र तिरंगी झेंडे फडकत असताना, बदमाश शेख अब्दुल्लाने श्रीनगरमधल्या सर्व सरकारी इमारतींवर पाकिस्तानी झेंडे लावण्यास प्रारंभ केला. महाराजांचे अधिकारी काहीही करू शकले नाहीत. कारण काय करावे, याबद्दल यांना कोणत्याही सूचना मिळालेल्या नव्हत्या. स्वतः महाराजांचाच काही निर्णय होत नव्हता.
पण हे सगळे पाहिल्यावर बलराज मधोक आणि पंडित प्रेमनाथ डोगरा यांनी निर्णय घेतला. श्रीनगरमधल्या झेलम नदीवरचा अमिरा कदल पूल हे एक इतिहासप्रसिद्ध ठिकाण आहे. संघ कार्यालयातून निरोप गेले. तासाभरात एक हजार संघ स्वयंसेवक अमिरा कदल पुलावर जमले. ’भारतमाता की जय’चा जयघोष करत त्यांनी सर्वत्र फडकणारे हिरवे झेंडे खाली ओढून त्यांच्या जागी तिरंगी झेंडे फडकवायला सुरुवात केली. संघस्वयंसेवकांचे हे संघटित बल पाहून श्रीनगरमधल्या सर्वसामान्य हिंदू नागरिकांनाही उत्साह आला. तेदेखील स्वयंसेवकांबरोबर रस्तोरस्ती फिरून तिरंगे फडकावीत भारतमातेचा जयघोष करू लागले. शेख अब्दुल्ला आणि त्यांचे नॅशनल कॉन्फरन्सी गुंड मनगटे चावत स्वस्थ बसण्यापलिकडे काहीही करू शकले नाहीत. खुद्द महाराजांनाही हिंदूंची संघटित शक्ती काय असते, हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. म्हणून लगेच त्यांनी सामीलनाम्यावर सही केली नाही. पण 11 ऑगस्ट 1947 रोजीच त्यांनी एक चांगली गोष्ट केली होती. रामचंद्र काक यांना राजीनामा द्यायला लावून मेजर जनरल जनकसिंग यांना पंतप्रधान म्हणून नेमले.
15 ऑगस्टची ही घटना घडते न घडते तेवढ्यात बलराज मधोकांना हरीश भानोत आणि मंगल सेन या स्वयंसेवकांकडून फार भयंकर बातम्या मिळाल्या. काश्मीरवर हल्ला करण्याचा पाकिस्तानी सैन्याचा व्यूह पूर्णत्वाला गेलेला असून लवकरच त्याची कार्यवाही सुरू होईल. हे दोघे स्वयंसेवक मुसलमानी वेश धारण करून पाकिस्तानच्या छावणीत हेरगिरी करत होते. बलराजजींनी त्वरेने ही बातमी महाराजांना कळवली. महाराजांकडून रात्री 2 वाजता बलराजजींना निरोप आला की, ‘सकाळी 6 वाजता मला 200 माणसे हवीत.’ धन्य त्या संघाच्या संपर्क यंत्रणेची. एवढ्या अपरात्री यंत्रणेची सूत्रे वेगाने हलली. इंटरनेट, मोबाईल तर सोडाच, साधा टेलिफोनही त्याकाळी दुर्लभ होता. पण सकाळी ठीक 6 वाजता आर्यसमाज मंदिर शाखेवर 200 तरुण उपस्थित होते. शाखा लागली. तेवढ्यात काश्मीर संस्थानचे लष्करी ट्रक्स आले. या 200 तरुणांना रायफल हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली.
क्रमशः