आपल्या परंपरेचा अभिमान असलेला भारत आज एक नवी ऊर्जा घेऊन पुढे चालला आहे. महाकुंभमेळा युगपरिवर्तनाचा शंखनाद आहे. देशाचे नवे भविष्य लिहिले जात आहे. हिंदू बांधव कात टाकून नव्या परिवेशात जगाला सामोरे जात आहेत. या महाकुंभात समाजातील प्रत्येक घटकातील आणि प्रत्येक क्षेत्रातील लोक एकत्र आले. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा हा अविस्मरणीय देखावा, येत्या शेकडो वर्षांसाठी करोडो देशवासीयांच्या आत्मविश्वासाचा, धर्मप्रेमाचा महान मानांक ठरला आहे.
प्रयागराज महाकुंभामुळे सनातन जीवनपद्धतीत अंतर्निहित अशा भव्यता आणि दिव्यतेचे सुस्पष्ट प्रकटीकरण झाले. सुरक्षा, स्वच्छता आणि सुव्यवस्थेचे नवे मानक, केवळ भारतभूमीसाठीच नव्हे, तर अत्याधुनिक म्हणवल्या जाणार्या सगळ्या जगासाठी निर्माण करून ठेवले गेले आहेत. सनातन हिंदू अर्थव्यवस्थेची भव्य झलक आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळाली.
गेल्या 45 दिवसांत कित्येक संतसज्जनांसह 66 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र त्रिवेणीसंगमावर स्नान करून जीवन धन्य झाल्याचा अनुभव घेतला. ही संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या दुप्पट, पाकिस्तानच्या अडीच पट तर जपानच्या पाच पट आहे. जगातील 100 देशांच्या एकूण लोकसंख्येइतकी ही संख्या आहे. प्रयागराज इथे हे जे तात्पुरते शहर निर्माण झाले होते त्यातील एकूण रहिवासी संख्या, जगातील तिसर्या क्रमांकाच्या सर्वाधिक लोकसंख्या असणार्या देशाच्या लोकसंख्येइतकी होती. हे सगळे अकल्पनीय वास्तव केवळ आणि केवळ हिंदुत्वाच्या हुंकाराचे प्रत्यक्ष प्रकटीकरण आहे.
हे सगळे लोक केवळ कौटुंबिक सहल करण्यासाठी प्रयागराजला जमले नव्हते. तर त्यामागे गेली हजारो वर्षे, पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या, भारतीय समाजाच्या रक्तात भिनलेल्या धार्मिक संकल्पना आहेत. हे सगळे सश्रद्ध हिंदू आध्यात्मिक, धार्मिक उन्नतीच्या ओढीने इतका प्रवास करून, वेळ, पैसा खर्च करून आले होते. जगातील हिंदूंची एकूण लोकसंख्या 15% म्हणजेच 1.2 अब्ज इतकी आहे. म्हणजेच निम्म्या हिंदू लोकसंख्येने महाकुंभादरम्यान त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले असे म्हणता येईल. जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असणार्या भारतदेशातील अर्ध्या जनतेने या दीड महिन्यांत संगमावर स्नानाचे पुण्य कमावले आहे. जे प्रत्यक्ष पोहोचू शकले नाहीत, त्यापैकी बहुतांश लोकांनी त्रिवेणी संगमाचे पवित्र जल मिळवण्याचा काही न काही पर्याय शोधला आहे.
संपूर्ण जगाला ‘केवळ मानवजातच नाही तर जगातील सर्व प्राणिमात्र, नद्या, डोंगर, समुद्र, निसर्गाचे प्रत्येक स्वरूप शिवसमान म्हणजेच एकस्वरूप आहे’ असा अमृत संदेश देणारा हा मानवतेचा उत्सव ’वसुधैव कुटुंबकम्’ या एकात्म भावाने अवघ्या जगाला सनातन एकतेच्या सूत्रात बांधण्यात अपेक्षेपेक्षाही अधिक यशस्वी झाला आहे, असे आपण अत्यंत समाधानाने आणि अभिमानाने म्हणू शकतो. हे झाले एकात्मतेचे आध्यात्मिक स्वरूप. पण महाकुंभाने केवळ आध्यात्मिकच नाही तर सामाजिक, राष्ट्रीय, धार्मिक, जातीय, आर्थिक एकात्मतेचे सूत्रही जगाला शिकवले आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींनी ज्या संगमस्थानी स्नान करून स्वतःला अभिभूत समजले, त्याच त्रिवेणीसंगमावर, त्याच पाण्यात करोडोंच्या संख्येने झाडून सर्व प्रकारच्या आर्थिक, सामाजिक स्तरातील लोकांनी येऊन अर्घ्यदान केले, स्नान केले. आपल्या शेजारी कोण व्यक्ती स्नान करीत आहे, याचे कोणालाही कसलेही आकर्षण नव्हते वा अवघडलेपणाही नव्हता. उच्चनीच हा भेद तर कोणाच्या मनात क्षणभरासाठीही आला नाही. सनातन हिंदू धर्माचे खरे मूलस्वरूप आपल्या महाप्रचंड, अतिप्रचंड अशा पूर्ण स्वरूपात दर्शन देत होते. आणि ते दर्शन मिळावे म्हणून अवघा जनसागर जगभरातून प्रयागराज येथे अक्षरशः करोडोंच्या संख्येने लोटत होता.
या महाकुंभानिमित्ताने लक्षात आलेली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बाब म्हणजे हिंदू समाजाचा महिलांच्या प्रति असणारा आदरभाव. इथे आलेल्या महिलांसाठी वेगळी व्यवस्था नव्हती. परंतु कोणत्याही स्त्रीला कुंभस्थानी पाण्यात उतरण्यात कसलाही धोका वा संकोच वाटला नाही. काळे बुरखे घातल्याशिवाय पुरुषांच्या वखवखलेल्या नजरेपासून स्त्रीशरीर वाचवता येत नाही, या अपमानास्पद विमर्शाला समस्त भारतीय पुरुषांनी आणि त्यांच्यावर हिंदू संस्कार करणार्या त्यांच्या कुटुंबांनी महाकुंभाच्या निमित्ताने पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले. इथे कोणत्याही स्त्री संदर्भात कोणताही अपप्रकार घडला नाही. अगदी कोणा महिलेची छेड काढल्याचीही नोंद नाही. तर कोणीही हिंदू स्त्री शरीरप्रदर्शनाच्या हव्यासाचे ओंगळ प्रदर्शन करताना दिसली नाही. हजारो लाखो तरुण हिंदू मुली एकट्या-दुकट्याच महाकुंभाला गेल्या असल्याच्या कित्येक पोस्ट्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्या या पोस्ट्समध्ये विविध शासकीय संस्था जसे की पोलीस, कुंभव्यवस्था, स्वच्छता, राहण्याच्या सोयी, धार्मिक उपक्रम, साधुसंत यांच्याविषयी अत्यंत कौतुक, अभिमान आणि कृतज्ञतेची भावना मांडलेली वाचायला मिळते आहे.
गेली अनेक दशके हिंदू समाजाबाबत अनेक खोट्यानाट्या गोष्टी मांडून हिंदूंच्या आत्मसन्मानाचे विविध प्रकारे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भारतविरोधी घटकांकडून केला जातो आहे. भारतात स्त्रियांना कस्पटासमान किंवा केवळ भोगवस्तू म्हणून चुकीची वागणूक दिली जाते, हिंदू समाज हा ब्राह्मणवादी, पुरुषवर्चस्ववादी आहे, इत्यादी कित्येक थोतांडाना एक अक्षरही न बोलता केवळ आपल्या सद्वर्तनातून, सत्शील चारित्र्यातून हिंदू समाजाने ठोस उत्तर दिले आहे.
आता एकदा हे आकडे पाहू. सुमारे 45,000 संप्रदाय असणारा, एकच ग्रंथ आणि ट्रिनिटीवर विश्वास ठेवणारा पंथ म्हणजे ख्रिश्चानिटी. जगाची सुमारे 32% लोकसंख्या ख्रिश्चन आहे. सुमारे 7 दशलक्ष लोक, (बहुतेक ख्रिश्चन) दरवर्षी व्हॅटिकन सिटीला भेट देतात. केवळ 2000 वर्षांचे वय असणारा तरुण असा हा पंथ आहे.
त्याचप्रमाणे 25.8% म्हणजे 1.8 अब्ज लोकसंख्या असणारा, 73 प्रमुख पंथांचा, पवित्र कुराणवर विश्वास असणारा मुस्लीम समाज. यापैकी सुमारे 20 ते 30 लाख मुस्लीम हज यात्रा करतात. हजची यात्रा करण्यासाठी त्या व्यक्तीचे मुस्लीम असणे अत्यावश्यक असते. या पंथाचे वयोमान केवळ 1400 वर्षे.
सनातन काळापासून चालत आलेल्या, पुरातन परंपरा असणार्या महाकुंभात मात्र जगातील बहुतेक सर्व जातीधर्माचे लोक मोठ्या आपुलकीने आणि श्रद्धेने आले होते. महाकुंभात येण्यासाठी केवळ व्यक्तीची आध्यात्मिक ओढ, सनातन संस्कृतीशी भावनिक गुंतवणूक इतक्याच गोष्टी महत्त्वाच्या होत्या. असे असूनही हिंदू समाज संकुचित, कोत्या मनोवृत्तीचा आहे, असे सिद्ध करण्याचा आटापिटा केला जातो.
या महाकुंभामुळे ‘हिंदू सारा एक’ ही भावना इतकी प्रबळ झाली आहे, की दलित-सवर्ण, बौद्ध, जैन, शीख, जनजातीय बांधव असे छोटे-मोठे झाडून सर्व भेद भारतीयांना जातीपातीत विभागतात, हा खोटा विमर्श उद्ध्वस्त झाला आहे. सनातनी संस्कृती अभिमानाने मिरवणारे सर्व समाज एकत्र एका छत्राखाली आले. 50 लाखांहूनही अधिक परदेशी नागरिक महाकुंभाला येऊन गेले. हिंदुत्वाच्या या विराट रूपामुळे जगभरातील अनेक देशांतील लोक नव्याने आपापल्या मूळ संस्कृतींचा पुनश्च शोध घेऊ लागले आहेत, याचे प्रत्यक्ष प्रमाण सिद्ध झाले. अब्राहमीक पंथांच्या आधी जे तत्त्वज्ञान जगाला दिशा दाखवत होते, त्यातील लवचिकता, टिकाऊपणा, नैसर्गिकता लोकांना समजून येऊ लागली आहे.
या महाकुंभातही जागोजागी अन्नपाणी वाया जाऊ नये, स्वच्छता राहावी, प्लास्टिकचा वापर टाळला जावा, आपल्याकडून निसर्गाचे आणि प्रयागराजच्या पवित्र भूमीचे कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठी लोक प्रयत्नशील आहेत, हे स्पष्टच लक्षात येत होते. सरकारी अधिकारीच नाही, तर जनसामान्यही अगदी सौजन्याने वागताना दिसत होते. जणू हे आपल्या घरचे कार्य असावे, तितक्या आपुलकी, बंधुत्वाच्या भावनेने भारलेले वातावरण होते. समस्त भाविकांची मने प्रेमभक्तीरसाने, राष्ट्रबंधुत्वाच्या भावनेने ओथंबून गेली आहेत, याचे प्रत्यंतर सर्वांनाच येत होते.
हा डोळे विस्फारून टाकणारा भाविकांचा आकडा कसा गाठला गेला?
हिंदू धार्मिक श्रद्धेमुळे हा चमत्कार घडला हे तर खरेच; परंतु ज्या प्रकारे, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारांनी गेल्या दहा वर्षांत भारतीय समाजाला सुरक्षा प्रदान केली आहे, त्यामुळे एक सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हिंदू भावनांचा आदर करण्याच्या नीतीचा लोकांच्या मनावर सखोल प्रभाव आहे. आज पृथ्वीच्या माहीत असलेल्या इतिहासात जगाची एकूण लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यात भारत हा हिंदुबहुल देश, जगातला सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे. अशा वेळी महाकुंभस्नानाची ही संधी आणि पवित्र अनुभूती कुणालाच चुकवायची नव्हती.
भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक
सरकारने ज्या महाकाय स्वरूपात, अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या, त्यामुळे लोकांची हिंमत वाढली. कुटुंबासह प्रवास करणे सुलभ झाले. परिणामी या 45 दिवसांत विरोधक आणि हिंदुद्वेष्ट्यांनी कितीही द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला, तरी लोकांचा ओघ कधीच कमी झाला नाही. चेंगराचेंगरी आणि आगीच्या दुर्दैवी अपघातांनंतरही लोक सरकारवर पूर्ण विश्वास ठेवून, अध्यात्माच्या ओढीने महाकुंभाला येत राहिले. त्यांची सरकारे त्यांना सुरक्षित ठेवतील, हा 130 कोटी लोकांचा अतूट विश्वास थक्क करणारा आहे. आपण अशा सरकारच्या काळात जीवनाचा आनंद घेऊ शकत आहोत, हे आपले महत्भाग्यच आहे.
आपल्या परंपरेचा अभिमान असलेला भारत आज एक नवी ऊर्जा घेऊन पुढे चालला आहे. महाकुंभमेळा युगपरिवर्तनाचा शंखनाद आहे. देशाचे नवे भविष्य लिहिले जात आहे. हिंदू बांधव कात टाकून नव्या परिवेशात जगाला सामोरे जात आहेत. या महाकुंभात समाजातील प्रत्येक घटकातील आणि प्रत्येक क्षेत्रातील लोक एकत्र आले. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा हा अविस्मरणीय देखावा, येत्या शेकडो वर्षांसाठी करोडो देशवासीयांच्या आत्मविश्वासाचा, धर्मप्रेमाचा महान मानांक ठरला आहे. एकतेचा हा महाकुंभ यशस्वी करण्यासाठी देशवासीयांचे कष्ट, परिश्रम आणि जिद्द विस्मयचकित करणारी आहे.
महाकुंभात इतक्या मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणे, हा केवळ आजच्या पिढीचा विक्रम नाही. आपली समृद्ध संस्कृती आणि वारसा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक शतके, आधीच्या कित्येक पिढ्यांनी भक्कम पायाभरणी केली आहे. करोडो धर्माभिमान्यांनी दिलेल्या बलिदानाच्या पुण्यावर हा कळस आज रचला गेला आहे, याचे भान प्रत्येक हिंदूने ठेवणे, हे या मंगलसमयी आपले कर्तव्य आहे.