जागतिक राजकारणात निर्णायक बदलाचे वारे

विवेक मराठी    07-Mar-2025
Total Views |
@ प्रसाद देशपांडे
 
 
trump
युक्रेनला लष्करी मदत थांबवणे, युरोप पर्यायाने नेटोला कानपिचक्या देणे, अमेरिकन करदात्यांच्या पैशांवर जगाच्या तमाशाचा फड ह्यापुढे चालणार नाही असे ठणकावून सांगणे, जगावर ट्रेड वॉर लादणे, कॅनडा-मेक्सिको-चीन ह्यांच्यावर जबर टॅरिफ लादणे, रशियाला निर्बंधातून सूट देण्याचा विचार करणे, रशियाच्यादृष्टीने फायदेशीर करार युक्रेनला करायला भाग पाडणे, युरोपला पर्यायाने नेटोला ‘तुमचा नेटोमधील आर्थिक आणि लष्करी वाट्यातील पैशांचा हिस्सा वाढावा अन्यथा तुम्ही तुमचं बघा’ अशा धमक्या देणे, अमेरिका क्रिप्टो करन्सीची स्वतःची गंगाजळी बनवणार म्हणत क्रिप्टो करन्सीला अचानक बूस्ट देणे असे असंख्य अतर्क्य वाटणारे पण जागतिक राजकारणाची आणि अर्थकारणाची घडी बदलू शकतील असे निर्णय ट्रम्प घेतायत! आगामी काळात जागतिक राजकारण कोणत्या दिशेने जाईल याचा आत्ता अंदाज लावणं अवघड असलं तरी ते खूप महत्त्वाचे बदल घडवून आणणारं असेल नक्की...
‘आंतरराष्ट्रीय राजकारण ही अनिश्चिततेची रंगभूमी आहे! इथे अनेक नाट्यमय प्रसंग घडतात, काही तर ’अभूतपूर्व’ असतात!’ असाच अभूतपूर्व प्रसंग वॉशिंग्टन डीसीमध्ये अलीकडेच घडला. अर्थात ज्यांना प्रत्यक्ष तो बघायला मिळाला त्यांचे भाग्य थोर म्हणायला हवे! झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यामधल्या त्या बहुचर्चित वादावादीनंतर जगभरातल्या पुरोगामींनी एका सुरात झेलेन्स्कीच्या बाजूने थयथयाट करायला सुरुवात केली नसती तरच नवल होते. अर्थात पुरोगामी मंडळींचा धर्मच थयथयाट करणे हा असतो आणि त्याची एक खास शैली असते, ’गिरे तो भी टांग उपर’ची! असो. तर ज्यांना बॉडी लँग्वेज म्हणजेच देहबोली ह्या प्रकाराची थोडी तरी समज आहे, त्यांना ती ओव्हल हाऊसमधील बैठक झेलेन्स्कीसाठी काय भयानक अनुभव होती हे कळेल. झेलेन्स्की यांची त्या दिवशीची देहबोली कमालीची अस्वस्थ होती! सतत हात चोळणे, 50 मिनिटांच्या पत्रकारपरिषदेमध्ये 4 वेळा आवंढा गिळणे, सबंध पत्रकार परिषदेत अगदी पहिल्या मिनिटांपासून तर पन्नासाव्या मिनिटापर्यंत उतरलेला, विमनस्क चेहेरा ठेवणे, किमान 6-7 वेळा भुवया उडवणे, 3-4 वेळा जिवणीला मुरडून नापसंती दर्शवणे, एकदा तर चक्क डोकं ‘नाही’ म्हणत हलवून ट्रम्पच्या ’व्यावसायिक करार’ मुद्द्याला थेट नापसंती दर्शवणे, हळूहळू खुर्चीच्या टोकावर येऊन अस्वस्थ पण तरीही ताठ कणा ठेवून बसणे, पत्रकाराच्या अतिशय फालतू अशा ’तुम्ही ब्लेजर सूट का घालत नाही’ ह्या चिथावणीखोर प्रश्नावर चिडणे, तुमची परिस्थिती विपरीत असतानाही जो मध्यस्थी करतोय त्याच मध्यस्थाच्या घरी जाऊन त्याला ’इतिहासात तुम्ही असा काय तीर मारलाय’ हे चारचौघांत एक बोट त्याच्याकडे दाखवत आव्हान देणे, अमेरिकन मीडियासमोर अमेरिकन नेतृत्वालाच त्यातही ट्रम्पसारख्या घमेंडी नेतृत्वाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करणे, त्यात ‘चेरी ऑन द टॉप’ म्हणजे ट्रम्पना थेट ’तुम्ही शांती प्रस्ताव देताय, त्याच्या बदल्यात आम्ही मिनरल डील करतोय; पण काय ग्यारेंटी? उद्या पुतिन तुमच्या शांती प्रस्तावाची सुरळी करून फेकणार नाही, ह्या आधी गेल्या दहा वर्षांत त्याने ती करून झालीय की!’ असला अतर्क्य प्रश्न अमेरिकन मीडियासमोर विचारणे हे निव्वळ आणि निव्वळ हेच दर्शवतात झेलेन्स्की तिथे अमेरिकेसोबत करार करायला आलेच नव्हते.
 
 
हा या नाटकाचा पूर्वार्ध झाला. त्या आधीही ट्रम्प ह्यांनी झेलेन्स्की, पर्यायाने युक्रेनला खाली दाखवण्याचा कुठलाही मुद्दा सोडला नाही. करार होईल पण तोही आमच्याच अटींवर, अन्यथा तुम्ही तुमचे मोकळे आहात! ह्यापुढे जाऊन ट्रम्प झेलेन्स्की ह्यांना थेट ‘हुकूमशहा’ देखील म्हणाले होते. ही भूमिका चिथावणीच्या स्वरूपाचीच होती. पण ट्रम्प किंवा एकूणच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा इतिहास बघितला तर हेच दिसेल.
 

trump 
 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय संयम राखून अत्यंत मुत्सद्दीपणे ट्रम्प यांच्याशी संबंध प्रस्थापित केले
 
इंदिरा गांधी, रिचर्ड निक्सन ह्यांच्यातील तणाव सर्वश्रुत आहे. फार मागे कशाला अलीकडची उदाहरणं घेऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीपूर्वी ट्रम्प ह्यांची वक्तव्यं वाचा. अगदी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना ट्रम्प यांच्या शपथविधीचं निमंत्रण होतं. पण मोदींना नव्हतं. अर्थात परराष्ट्रमंत्री जयशंकर भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. पण मोदींना नव्हतं! त्यानंतर मोदींच्या भेटीपूर्वी भारत कसा जगातला सगळ्यात मोठा ‘टॅरिफ एक्सप्लॉईटर’ (जकात करप्रणालीचा शोषणकर्ता) आहे, खूप झालं, तुम्ही जितका कर लावाल तितका आम्ही लावू, ही टेप ट्रम्प ह्यांनी लावली. संयुक्त पत्रकार परिषदेत, ’ओव्हल ऑफिस’ बैठकीतही ट्रम्प ह्यांनी त्यांच्या पहिल्या कारकीर्दीत मोदींबरोबर असलेला मोकळेपणा दाखवला नाही. कुठेतरी मोदींच्या सबंध अमेरिकावारीत तो जाणवला नाही. तरीही मोदींनी कुठेही संयम सोडला नाही, आततायीपणा केला नाही. कसलेल्या राजकारण्याप्रमाणे परिस्थितीला सांभाळून भारतहितासाठी जे जे आवश्यक (उदाहरणार्थ, बांगलादेश प्रश्नावर अमेरिकेकडून बाय ऑफ घेणे) होतं ते मिळवून घेतलं! मोदीच कशाला ब्रिटिश पंतप्रधान स्टारमर, फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन ह्यांच्याशीही राष्ट्रपती ट्रम्प, उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स फारसे मोकळे वागले नाहीत! पण तिघांनीही आपापल्या परीने ट्रम्प ह्यांना खूश करण्याचे उपाय प्रभावीपणे वापरले. मग ते भारताने अर्थसंकल्पात केलेल्या काही जकात करविषयक तरतुदी असतील, फ्रान्सनी एआय संदर्भात अमेरिकन गुंतवणुकीसंदर्भातले मुद्दे असो वा, ब्रिटिश राजे ह्यांनी ट्रम्पला दिलेलं ब्रिटन भेटीचं ऐतिहासिक निमंत्रण असेल. ट्रम्प नावाचा कठीण पेपर तिघांनी बर्‍यापैकी निभावला! पण युक्रेन याला अपवाद ठरला! संयुक्त पत्रकार परिषदेचा तमाशा रंगलाच, पण आता ट्रम्प ह्यांनी थेट युक्रेनला दिली जाणारी लष्करी मदत तातडीने गोठवण्याचं फर्मान काढलंय. ह्या आधी गेल्यावर्षी (मी चुकत नसेन तर) मार्च-एप्रिलमध्ये अमेरिकन काँग्रेसने ती काही महिन्यांसाठी गोठवली होती!
 

आता युक्रेन-रशिया आणि एकूणच जागतिक राजकारण कुठल्या वळणावर जाणार हा एक मोठा प्रश्न आहे. ट्रम्प ह्यांची भूमिका ’अमेरिका फर्स्ट’ असली तरीही त्या आडून ती बर्‍यापैकी प्रो-रशिया होऊ पाहतेय. काल परवाच एक माजी ’केजीबी एजंट’ ‘अल-नुर मुसैएव्ह’ याने दावा केलाय की ट्रम्प ह्यांना 1987च्या त्यांच्या रशिया दौर्‍यातच केजीबी (रशियन गुप्तहेर संस्था) ने ऑनबोर्ड केलं होतं, त्यांचं कोडनेम होतं ’क्रॉसनोव्ह’! ट्रम्प 2003मध्ये दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होते, रशियातून मिळालेल्या पैशांच्या जोरावर ते त्यातून बाहेर पडले हा दावा ट्रम्प ह्यांच्या मुलानेच केला होता. अर्थात असे दावे ह्या आधीही झाले होते! ते सिद्ध करणारे पुरावे आढळले नाहीत. आता दुसर्‍यांदा राष्ट्रपती झाल्यावर ट्रम्प काय करतायत? युक्रेनला लष्करी मदत थांबवणे, युरोप पर्यायाने नेटोला कानपिचक्या देणे, अमेरिकन करदात्यांच्या पैशांवर जगाच्या तमाशाचा फड ह्यापुढे चालणार नाही असे ठणकावून सांगणे, जगावर ट्रेड वॉर लादणे, कॅनडा-मेक्सिको-चीन ह्यांच्यावर जबर टॅरिफ लादणे, रशियाला निर्बंधातून सूट देण्याचा विचार करणे, रशियाच्यादृष्टीने फायदेशीर करार युक्रेनला करायला भाग पाडणे, युरोपला पर्यायाने नेटोला ‘तुमचा नेटोमधील आर्थिक आणि लष्करी वाट्यातील पैशांचा हिस्सा वाढावा अन्यथा तुम्ही तुमचं बघा’ अशा धमक्या देणे, अमेरिका क्रिप्टो करन्सीची स्वतःची गंगाजळी बनवणार म्हणत क्रिप्टो करन्सीला अचानक बूस्ट देणे असे असंख्य अतर्क्य वाटणारे पण जागतिक राजकारणाची आणि अर्थकारणाची घडी बदलू शकतील असे निर्णय ट्रम्प घेतायत!
 
trump 
 युरोप-अमेरिकेच्या बहकाव्यात येऊन त्यांनी तो धुडकावून लावला आणि त्यामुळे आतापर्यंत किमान दहा लाख लोक मृत्युमुखी पडलेत किंवा जखमी तरी झालेत, असंख्य देशोधडीला लागले. अर्थात आजही झेलेन्स्कीला त्याबाबत शल्य नाही, असतं तर त्यांचं वर्तन इतकं बेजबाबदार नसतं!
 
युरोप, युक्रेनने त्याचबरोबर नेटोने धडा घ्यावा अशा गोष्टी म्हणजे अमेरिकेवरील अवलंबत्व मग ते आर्थिक असो वा लष्करी कमी करणे त्यांना भाग आहे. युक्रेन सोडाच पण युरोपसुद्धा रशियाशी एकटा भिडू शकत नाही, हे सत्य आहे. त्याचबरोबर रशिया आपल्या मागच्या दरवाज्यावर अमेरिकन सैन्य मग ते नेटो, शांती सैन्य इत्यादी कुठल्याही स्वरूपात का असेनात उभं आहे ही कल्पनाच सहन करू शकत नाही. हा प्रश्न आताचा नाहीय, सोव्हिएत राष्ट्राचे तुकडे झाले तेव्हापासून म्हणजे जवळजवळ 30 वर्षांपासूनचा हा विषय आहे. एप्रिल 2022 ला रशिया-युक्रेन युद्धावर उत्तम तोडगा काढणारा शांती प्रस्ताव युक्रेनच्या समोर होता, पण मुळात व्यावसायिकदृष्ट्या नट असणार्‍या व्लादिमीर झेलेन्स्की ह्यांना तो प्रस्ताव आणि एकूणच युद्ध म्हणजे हॉलिवूड चित्रपट वाटला. तर युरोप-अमेरिकेच्या बहकाव्यात येऊन त्यांनी तो धुडकावून लावला आणि त्यामुळे आतापर्यंत किमान दहा लाख लोक मृत्युमुखी पडलेत किंवा जखमी तरी झालेत, असंख्य देशोधडीला लागले. अर्थात आजही झेलेन्स्कीला त्याबाबत शल्य नाही, असतं तर त्यांचं वर्तन इतकं बेजबाबदार नसतं!
 
 
‘अमेरिकन थिंक टँक’मधील एक बडी हस्ती हेन्री किसिंजर म्हणायचे ‘अमेरिकेचा मित्र असणे धोकादायक आहे; पण अमेरिकेचा शत्रू असणे हे घातक आहे.’ युरोप, नेटो, भारतासकट आशियाई देशांनी आणि त्यांच्या नेत्यांनी किसिंजर ह्यांचं हे वाक्य लक्षात ठेवावं. जगात बदलाचं वारं सुरू आहे. ट्रम्प ज्याप्रकारे ते रेटू बघतायत त्याअर्थी त्यांना पूर्ण कल्पना आहे की त्यांच्यापुढे हिमालयाइतकं काम वाढून ठेवलंय आणि वेळ फार कमी आहे. ट्रम्प भविष्यात कशा प्रकारे निर्णय घेतात आणि ते आपला कार्यकाळ कसा व कितपत पूर्ण करतात ह्यावर जागतिक राजकारणाची पुढील किमान 2-3 दशकाची घडी व्यवस्थित बसेल. ट्रम्प ’मुरलेले राजकारणी’ कमी आणि ‘बिझनेसमन’ जास्त आहेत. बिझनेसमध्ये ’पिव्होट’ (बदल) ला फार मोठी भूमिका असते! एक उत्तम पिव्होट जसा तुम्हाला चांगले फायद्याचे निकाल देऊ शकतो तसाच एक वाईट पिव्होट देशोधडीला देखील लावू शकतो. ट्रम्प ह्यांना हे पक्के माहीत आहे आणि त्यांचे निर्णय त्याच पिव्होटच्या अनुषंगाने येत आहेत.
 
 
सन 2000 च्या सुमारास तत्कालीन नवनिर्वाचित राष्ट्रपती पुतीन ह्यांनी राष्ट्राध्यक्ष क्लिटंन ह्यांच्यावर समोरासमोरील बैठकीत एक बॉम्ब टाकला होता...’रशियाची नेटोमध्ये समाविष्ट होण्याची कितपत शक्यता आहे?’ त्यानंतर क्लिटंन ह्यांनी दिलेलं उत्तर, त्यावरून झालेलं राजकारण सांगत बसत नाही; पण आज 25 वर्षांनी नेटो तरी कितपत राहणार आहे, हा प्रश्न विचारला जातोय. आंतरराष्ट्रीय राजकारणातील या महत्त्वाच्या बदलाच्या मानाने 25 वर्षं फार कमी कालावधी आहे, नाही?
 
 
सर बेंजामिन फ्रँकलिन सन 1783 म्हणून गेले त्याप्रमाणे 'There is no such thing as good war and alternatively there is no such thing as bad peace.' ट्रम्प यांचे अजब निर्णय आणि त्यामुळे होणारे बदल फ्रँकलीन यांचं वाक्य खरं करणारे असतील तर सोन्याहून पिवळं, नाही का? एक मात्र नक्की, येणारा काळ राजकारणाच्या विद्यार्थ्यांसाठी व अभ्यासकांसाठी खूप रोचक...अभ्यासण्याजोगा असणार आहे.