Ruchira Sawant
विज्ञान-अंतराळविषयक लेखन, भरतनाट्यम आणि कराटेचा छंदा जोपासणं, संशोधन, शिक्षणविषयक मार्गदर्शन, विज्ञानविषयक प्रकल्पांत सहभाग, माहितीपटांचे लेखनमु, स्पेस एज्युकेशन अशा विविध क्षेत्रांत अगदी लहान वयात कमालीची मुशाफिरी करणारी तरुणी म्हणजे रुचिरा सावंत. इतकंच नव्हे तर, ‘मेकशिफ्ट’ या आपल्या स्टार्टअपच्या माध्यमातून ‘डिझाईन थिंकिंग’सारख्या कार्यपद्धतीची मुळं लहान मुलांमध्ये रुजवण्याचं काम ती करत आहे. ‘इस्रो’,‘नासा’सारख्या अग्रगण्य संस्थांमधील अनेक ज्येष्ठ वैज्ञानिकांना आज रुचिरा सावंत हिच्या कामाचं, बुद्धिमत्तेचं कौतुक आहे. तिच्या या रोमहर्षक प्रवासात मोलाचा वाटा आहे तो तिच्या आगळ्यावेगळ्या जडणघडणीचा आणि मूळच्या जिज्ञासू वृत्तीचा. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने या जगावेगळ्या मुलीचा हा परिचय.
मुंबईसारख्या शहरातलं सर्वसाधारण सुशिक्षित घरातलं मूल वयाच्या अठराव्या वर्षी काय करतं? साधारणपणे बारावी पूर्ण करून अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात त्याने प्रवेश केलेला असतो. महाविद्यालयात शिकणं, मित्रमैत्रिणींसोबत धमालमस्ती करणं, आवडीनिवडी-छंद जोपासणं, ‘पदवीनंतर पुढे काय?’ याचं प्लानिंग करणं, हे एवढंच त्याचं विश्व असतं. याच वयाची एक प्रचंड धडपडी मुलगी एका अंतराळविषयक प्रकल्पाचा भाग होते... पुढच्या चार-पाच वर्षांत विज्ञानविषयक-अंतराळविषयक लेखनात स्वतःचा वेगळा वाचकवर्ग निर्माण करते... ‘डिझाईन थिंकिंग’ आणि ’इनोव्हेशन’ या विषयांची मार्गदर्शक होते... विज्ञानविषयक तसेच पर्यावरणविषयक प्रकल्पांत सहभागीदेखील होते... आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत देशाचं प्रतिनिधित्वही करते... तिचा हा प्रवास एखाद्याला अविश्वसनीय वाटू शकेल. पण रुचिरा सावंत हिने हे करून दाखवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे जन्मजात कुतुहलाची भावना आणि मनातील अल्लड बाल्य जपत हे सारं तिने केलं आहे.
आंतरराष्ट्रीय इनोव्हेशन प्रकल्पात सहभाग
विज्ञान-तंत्रज्ञानविषयक वाचनात विशेष रुची असणारी रुचिरा पुढे थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका प्रकल्पाशी अचानकपणे जोडली गेली. आशियातील पहिल्या ‘सॅटनॉग्ज ओपन सोर्स ग्राऊंड स्टेशन’च्या निर्मितीत तिचा मोलाचा वाटा होता. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या वेळेस ती ‘अवघी वय वर्ष अठराची’ होती, म्हणजे बीएस्सीच्या प्रथम वर्षात शिकत होती. या महत्त्वाच्या प्रकल्पात सहभाग घेण्याच्या प्रवासाबद्दल ती सांगते, “मला लहानपणापासूनच एका वेळेस अनेक गोष्टी करण्याची सवय होती. सकाळी कॉलेज आणि उरलेला वेळ आईच्या क्लासमध्ये जाणं... या रुटिनला मी कंटाळले होते. काहीतरी नवीन करावं म्हणून कुठे इनोव्हेशन सुरू आहेत का? याचा गुगलवर शोध घेत गेले. मुंबईच्या उपनगरातील मरोळमधील ‘मेकर्स असायलम’चा शोध लागला. ‘मेकर्स मुव्हमेण्ट’ नावाची चळवळ जागतिक पातळीवर सुरू झाली होती. या चळवळी अंतर्गत वेगवेगळ्या संशोधकीय विचारांचे लोक एकत्र येऊन नाविन्यपूर्ण प्रकल्पांवर काम करत होते. इनोव्हेशन्स करत होते. 2014-15मध्ये भारतात ‘इनोव्हेशन इकोसिस्टिम’ बाळसं धरत होती. त्याच विचारांनी सुरू झालेल्या ‘मेकर्स असायलम’मध्ये इनोव्हेशनसाठी लागणारं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर होतं आणि तिथे येऊन अनेक समविचारी लोक वेगवेगळे प्रयोग, इनोव्हेशन करत असत. तिथे ‘ओपन सोर्स ग्राऊंड स्टेशन’च्या ‘सॅटनॉग्ज’ (SatNOGs) नावाच्या प्रोजेक्टवर काम सुरू होणार होतं. ग्राऊंड स्टेशनद्वारे आपल्याला सॅटेलाईटशी संपर्क साधता येतो. ‘ओपन सोर्स ग्राऊंड स्टेशन‘ म्हणजे ओपन सोर्स कृत्रिम उपग्रहांशी संपर्क साधण्याची जागा. ‘सॅटनॉग्ज‘ अंतर्गत भारतात नव्यानेच हा प्रयोग होत होता. प्रोजेक्टच्या प्रमुखांना मी फोन केला. शिकण्याची व सहभागी होण्याची तयारी या तत्त्वावर त्या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाले. खरं तर मी वयाने आणि अनुभवाने फार लहान होते. पण तिथे मला प्रकल्पाच्या अँटेना विभागाचं नेतृत्व करायची संधी मिळाली. या प्रकल्पाची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी या प्रकल्पाला प्रसिद्धी दिली.”
डिसेंबर 2015 मध्ये नेहरू तारांगण येथे ‘वेव्ह’ नावाच्या प्रदर्शनात सॅटनॉग्जचा प्रकल्प मांडण्यात आला होता. ज्येष्ठ अवकाशविज्ञान पत्रकार/लेखक श्रीनिवास लक्ष्मण हे या प्रकल्पासाठी मुलाखत घेण्यासाठी येणार होते. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करणार्या रुचिराला पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. ‘तरुण मुलांनी अंतराळ क्षेत्रात काम केलं पाहिजे हे स्वर्गीय ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं स्वप्न होतं. तुम्ही मुलं त्यांचं स्वप्न पूर्ण करत आहात’, हेही त्यांनी आवर्जून नमूद केलं. श्रीनिवास लक्ष्मण यांच्याशी रुचिराचा झालेला हा संवाद तिथेच संपला नाही. तर श्रीनिवास यांच्यासोबत अनेक टेकफेस्टना, नासा-इस्रोशी संबंधित व्यक्तींच्या, संशोधकांच्या भेटींना जाण्याचीही संधी तिला मिळाली. पुढे रुचिरा आणि श्रीनिवास यांनी ‘स्पेस हॅण्डशेक’ नावाचा एक अवकाशविज्ञानावर तज्ज्ञांसोबत गप्पा करण्यासाठीचा मंचही सुरू केला.
शिक्षणक्षेत्राशी जडले नाते
नीती आयोगाच्या पुढाकाराने शालेयस्तरावर इनोव्हेशनचं महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी ‘अटल टिंकरिंग लॅब्ज’ या कार्यशाळेचा प्रारंभ शाळाशाळांमध्ये झाला. त्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून काही प्रकल्प निवडले गेले, ज्यात रुचिराचा सहभाग असलेला उपरोक्त प्रकल्प निवडला गेला. याच काळात गोदरेजने ‘डिझाईन थिंकिंग हॅकेथॉन’ हा कार्यक्रम ‘मेकर्स असायलम’मध्ये आयोजित केला होता. यातही सहभागी होण्याची संधी तिला मिळाली. डिझाईन थिंकिंगचा उपयोग एखाद्या प्रकल्पाच्या कार्यवाहीत केला जातो हे पाहिलं होतं; पण शिक्षणक्षेत्रातही त्याचा उपयोग होऊ शकतो हे या हॅकेथॉनमध्ये लक्षात आल्याचं ती आवर्जून नमूद करते. ती सांगते, ‘डिझाईन थिंकिंग‘ ही समस्या निराकरणाची एक शास्त्रोक्त पद्धत आहे. ज्याला इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड म्हणतात. ती जर बालवयातच रुजवली तर त्याचा उपयोग आयुष्यभर होऊ शकतो. फक्त प्रोजेक्ट डेव्हलपर म्हणूनच नव्हे तर एकूण व्यक्तिमत्त्व विकासासाठीसुद्धा डिझाईन थिंकिंगचा चांगला उपयोग होऊ शकतो हे मला जाणवलं. आईचा क्लास ही या दृष्टीने माझ्यासाठी प्रयोगशाळा ठरली. डिझाईन थिंकिंगची काही प्रारूपं तयार केली. तिथे येणार्या मुलांसोबत प्रयोग करायला सुरुवात केली. मुलांनी त्याला अतिशय छान प्रतिसाद दिला. या मुलांचा प्रतिसाद बघून मी आजूबाजूंच्या शाळांमध्ये हाच प्रयोग केला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात मुलांच्या अनुषंगाने वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. लेखन, वाचन, नृत्य-नाट्य अशा सादरीकरणाच्या कलांचा उपयोग कसा करता येईल याचा विचार त्यात केला. पण याचा करिअर म्हणून विचार करण्याचं तेव्हा माझ्या डोक्यातही नव्हतं.”
मेकशिफ्टचा प्रवास
मध्यंतरीच्या काळात रुचिराने ‘ड्रीम ऑन इंडिया’ नावाचा प्रोजेक्ट आपल्या मित्रासह सुरू केला. तरुणांमधील कल्पनाशक्तीला चालना देणारा हा प्रकल्प होता. पुढील पाच ते दहा वर्षांनंतर भारत देश तुम्हाला कसा अभिप्रेत आहे आणि त्यासाठी तुमचं काय योगदान असेल हे चित्रं काढण्याचं आणि ते चित्रं समजावून सांगणारं पत्र राष्ट्रपतींना उद्देशून लिहिण्याचं आवाहन या अंतर्गत मुलांना करण्यात आलं होतं. देशभरातून तब्बल दहा हजार पत्रं त्यांच्याकडे आली होती. त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की, तरुण मुलं विचार करतात. त्यांना भविष्याबाबत आशा आहे. फक्त गरज आहे चांगल्या मार्गदर्शनाची, उत्तम वातावरणाची. यातच रुचिराच्या ‘मेकशिफ्ट’ची वैचारिक मुहूर्तमेढ रोवली गेली, असं म्हणता येईल.
‘मेकशिफ्ट’ या आपल्या स्टार्टअप बद्दल ती सांगते, “मी आणि माझी बिझनेस पार्टनर शर्वरी कुलकर्णी ‘मेकर्स असायलम’मध्ये एकत्र होतो. मध्यंतरीच्या काळात आमचा संपर्क तुटला; पण ‘ड्रीम ऑन इंडिया‘च्या वेळेस आम्ही पुन्हा संपर्कात आलो. मी आणि शर्वरीने डिझाईन थिकिंगवर TISSसारख्या संस्था, कार्यालयं, कॉलेजेस, इंटरनॅशनल शाळांमध्ये वेगवेगळ्या वयोगटांसाठी अनेक कार्यशाळा घेतल्या होत्या. पण हळूहळू लक्षात आलं की, आपल्याला डिझाईन थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग रुजवायचं असेल तर अगदी तळागाळापर्यंत आणि बालवयातच त्याची सुरुवात झाली पाहिजे. ‘डिझाईन थिंकिंग’ हा विषय तोपर्यंत लोकांपर्यंत फारसा पोहोचलेला नव्हता. परंतु, कोविडच्या आधी बंगळुरूला गेले असताना मी ज्येष्ठ वैज्ञानिक, इस्रोचे माजी प्रमुख आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020(एनईपी) समितीचे प्रमुख डॉ. कस्तुरीरंगन यांना भेटले. ते म्हणाले, ‘एनईपीमध्ये अशा विषयांना आम्ही प्राधान्य देणार आहोत. त्यासाठी सरकारी संस्थांप्रमाणेच खासगी संस्थांनीही हा विषय पुढे नेण्याची गरज भासेल, त्यामुळे तुझं काम असंच सुरू ठेव.’ याच विचारातून आम्ही 2020 मध्ये ‘मेकशिफ्ट’ हा नोंदणीकृत स्टार्टअप सुरू केला. ‘डिझाईन थिंकिंग’च्या माध्यमातून विद्यार्थीदशेतच नेतृत्वगुण, इनोव्हेशन आणि उद्योजकता रुजवण्यासाठी त्यांच्या कल्पकतेला चालना देण्याचं काम आज एनईपीप्रणित ‘मेकशिफ्ट’ ही संस्था करत आहे. यात विद्यार्थ्यांप्रमाणेच, त्यांच्या विकासात मोलाची भूमिका बजावणार्या शिक्षकांनाही याचं प्रशिक्षण दिलं जातं. सरकारच्या, सीएसआरच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणार्या प्रशिक्षणाशी मेकशिफ्ट ही संस्था जोडली गेली आहे. त्याचप्रमाणे अनेक खासगी संस्थांसोबतही मेकशिफ्टचं काम चालतं. ‘संशोधन द्वारा तयार केलेला अभ्यासक्रम‘, ‘प्रकल्पाधारित शिक्षण’ आणि आनंददायी शिक्षण ही मेकशिफ्टची प्रमुख वैशिष्ट्य आहेत.”
रुचिरा सावंत आणि शर्वरी कुलकर्णी यांची ‘मेकशिफ्ट‘ ही संस्था आज तीन राज्यांमधील 250हून अधिक संस्थांपर्यंत पोहोचली असून सुमारे 7,500 शिक्षक, 50,000 शालेय विद्यार्थी व 10,000 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे यातील शाळा केवळ शहरी नाहीत. गावभागातील मुलांच्या विकासासाठीही ‘मेकशिफ्ट’च्या माध्यमातून प्रकल्पांची आखणी केली जाते.
वैज्ञानिक लेखनाकडे ओढा
नियतकालिकांमधील विज्ञानविषयक लेखनामुळे रुचिरा सावंत हे नाव आज परिचित आहे. ती आपल्या लेखन प्रवासाबाबत सांगते, “मला खरं तर लेखनाचा अतिशय कंटाळा होता. पण अगदी शाळेत होते तेव्हापासूनच एखादं पुस्तक किंवा लेख आवडला की, मी लेखकाला पत्र किंवा मेल लिहायचे. 2016मध्ये मी अच्युत गोडबोलेंना एक पुस्तक वाचून मेल केला होता. त्यांनी मला भेटायला बोलावलं. त्या भेटीत तुझा एखादा लेख पाठव असंही आवर्जून सांगितलं. मी लेख वगैरे लिहित नसले तरी एखादा विषय आवडला की त्याबद्दल भरपूर संदर्भ शोधून वाचायचे आणि त्यावर स्वतःची नोट लिहायची ही माझी सवय होती. असाच तयार केलेला एक लेख मी अच्युतकाकांना पाठवला. त्यांना लेख आवडला आणि नियमित लिहीत जा असं सांगितलं. राजेश मंडलिक, श्रीनिवास लक्ष्मणदेखील वेळोवेळी मला लिहिण्यासाठी प्रोत्साहन देत होते. त्यानंतर प्रसिद्ध वृत्तपत्रातील एका लेखमालेवर एक दीर्घ प्रतिक्रिया मी लिहिली व पाठवली. त्यांनी ती स्वतंत्र लेख म्हणून छापली. अपरिचित पुरुषांकडून स्त्रीला मिळणारी सन्मानाची वागणूक असा त्याचा विषय होता. तो लेख वाचून, त्या विषयाचं स्वागत करणारे जवळपास पाचेकशे मेल मला आले. त्यादिवशी मला प्रसारमाध्यमातील लेखणीची ताकद समजली. त्यानंतर मात्र मी गंभीरपणे लेखनाचा विचार करायला लागले. फक्त आजवर ज्यावर फार लिहिलं गेलं नाहीये आणि काही वेगळेपण असेल अशा माणसांवर, विषयांवर अधिक लिहायचं ठरवलं. मध्यंतरीच्या काळात अंतराळविषयक, विज्ञानविषयक लेखन प्रासंगिक रूपात सुरू होतं. एका वृत्तपत्रात वर्षभर विज्ञानविषयक लेखमाला लिहिण्याची संधी मिळाली. या लेखमालेमुळे गावागावांतील मुलांना, ज्या माणसांचा विज्ञानाशी संबंध नाही अशांनाही विज्ञानविषयक लेख वाचण्यात रस वाटू लागला. अनेक घरांमध्ये या लेखमालेमुळे विज्ञान, संशोधन यावर चर्चा होऊ लागल्या. काही घरांमध्ये मुलींना पुढे शिकण्याची परवानगी मिळाली, हे मला समजलं. आपल्या लेखनामुळे समाजात बदल होत आहेत याचा मला आनंद झाला.”
“आजही विज्ञानविषयक लेखांना, व्यक्तिचित्रणांना असाच सकारात्मक प्रतिसाद असतो. विज्ञान लोकांपर्यंत न्यायचं असेल तर आधी लोकांना विज्ञानापर्यंत आणावं लागेल, त्यासाठी त्यांना समजेल अशा रंजक भाषेत वैज्ञानिकांची माहिती, संशोधन-विज्ञानविषयक लेखन हा उत्तम मार्ग आहे’‘, असंही रुचिरा नमूद करते. मुळातच मराठीमधून विज्ञानविषयक लेखन खूप कमी केलं जातं. अशा वेळेस रुचिरासारख्या संशोधकीय वृत्तीच्या मुलीने स्वतःहून या क्षेत्रात येणं आणि स्वतःचा वेगळा वाचकवर्ग तयार करणं हे निश्चितच कौतुकास पात्र आहे.
रुचिराने लिहिलेला ‘मी’ची गोष्ट‘ या शीर्षकाचा लेख कमालीचा गाजला होता. अनेक ठिकाणी त्याचं सामूहिक वाचन झालं. परिणामी हा लेख अनेक वाचकांपर्यंत पोहोचला. तिला मुंबई दूरदर्शनच्या ‘सह्याद्री वाहिनी‘वर मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं. त्यानंतर एक दिवस तिला थेट अमेरिकन दूतावासातून फोन आला. पुढे तिथल्या माणसांशी तिचे चांगले स्नेहबंध तयार झाले. अमेरिकन दूतावासातील अनेक कार्यक्रमांसाठी तिला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. त्यांच्या ग्रंथालयाचं मानद सभासदत्व दिलं गेलं. तिथल्या माणसांनी आपल्यावर अमाप प्रेम केल्याचं ती आवर्जून सांगते. दूतावासाने सॅटेलाईट कम्युनिकेशनवर एक कार्यक्रम ठेवला होता, त्यात तिला पॅनलिस्ट म्हणून बोलावण्यात आलं. ‘काही वर्षांसाठी दूतावास हे माझं दुसरं घरच झालं होतं,‘ हे ती अतिशय कौतुकाने सांगते.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील लक्षवेधी सहभाग
वर्ल्ड इकोनॉमिक फोरम(WEF)ची ‘ग्लोबल शेपर्स’ ही 30 वर्षांखालील तरुणांसाठी असणारी स्वतंत्र शाखा आहे. 150 देशांमधील 456 शहरांत(हब) ग्लोबल शेपर्स पसरलेले आहे. समस्या निराकरण, धोरणनिश्चिती आणि परिवर्तन घडवण्याची इच्छा तरुणांमध्ये असते. अशा नेतृत्वगुण असणार्या, समाजासाठी काही करणार्या तरुणांना प्रेरित करणं, त्यांना प्रशिक्षण देणं यासाठी ‘ग्लोबल शेपर्स’ कार्यरत आहे. ठाण्याच्या ‘ग्लोबल शेपर्स चॅप्टर’मध्ये रुचिराने 2022मध्ये स्वतःचं नाव नोंदवलं होतं व तिथे टॉप लिंक या नेटवर्कचा अॅक्सेसही मिळाला. तो मिळाल्यावरच तुम्ही ‘ग्लोबल शेपर’ म्हणून गणले जाता. जिनिव्हाला ‘ग्लोबल शेपर्स’ची आंतरराष्ट्रीय परिषद होते व दरवर्षी प्रत्येक हबचं प्रतिनिधित्व करणार्या एका शेपरला त्यासाठी आमंत्रण असतं. 2023मध्ये ठाणे हबचं प्रतिनिधित्व करण्याची संधी रुचिराला मिळाली.
याच दौर्यात ‘युरोपियन ऑर्गनायझेशन ऑफ अॅटॉमिक रिसर्च‘ अर्थात ‘सर्न’ला भेट देण्याची संधीही तिला मिळाली. “ ‘सर्न‘मध्ये जावं ही अनेक वर्षांची माझी इच्छा होती. मला केवळ दोन दिवस उपस्थित राहण्याची नव्हे तर तिथे प्रेझेंटेशन देण्याचीही संधी मिळाली. सध्याचा काळ हा स्थानिक भाषांमधील कंटेंट निर्मितीचा, लेखनाचा आहे. ‘सर्न’मधील या भेटीत अनेक शास्त्रज्ञांनी बोलताना स्थानिक भाषांमध्ये विज्ञान प्रसाराची गरज अधोरेखित केली आणि आपण योग्य मार्गावर आहोत याची माझ्या मनाला खात्री पटली,” रुचिरा सांगते.
सध्या ‘ग्लोबल शेपर्स’अंतर्गत रुचिरा ‘नेक्स्ट जेन पाथ फाईंडर्स’ आणि ‘इम्पॅक्ट सर्कल’ अशा दोन प्रकल्पांवर काम करते आहे. ‘इम्पॅक्ट सर्कल’ हा प्रकल्प भिंती उभ्या राहिलेल्या पिढ्यांना जोडण्याचं काम करतो. या प्रकल्पांतर्गत समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत, विविध वयोगटांच्या एकाच परिसरात राहणार्या अनेक माणसांना एका ठिकाणी आणून त्यांची एक कम्युनिटी किंवा सामाजिक इकोसिस्टीम तयार करता येईल का, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी स्क्रीनपासून दूर आठवड्याचे दोन तास ते एकत्र जमतात.
त्यांच्यासाठी काही अॅक्टिव्हिटीज तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये लेखन, वाचन, परिसंवाद अशा बहुआयामी घटकांचा समावेश आहे. पुढे जाऊन ही कम्युनिटी आपले सामाजिक प्रश्न स्वतःच सोडवण्यासाठी सक्षम करणं हे उद्दिष्ट आहे. सध्या हा उपक्रम दोन ठिकाणी चालतो. लवकरच आणखी पाच ठिकाणी तो सुरू होणार आहे. या उपक्रमांचा फायदा होत असल्याचं दिसून आल्याचं ती आवर्जून सांगते.
इट टेक्स अ व्हिलेज टू रेझ अ किड
रुचिराच्या संपूर्ण विकासात मोलाची भूमिका बजावली आहे, ती जडणघडणीने आणि संस्कारांनी. मुलांची जडणघडण पालकांच्या संस्काराप्रमाणेच त्यांची शाळा, आजूबाजूचा परिसर, अनुभवी माणसांचा संपर्क यामुळेही होत असते. आपल्या बालपणाबद्दल रुचिरा सांगते, “माझ्यासाठी पालक ही एक व्यापक संकल्पना आहे. माझ्या आईवडिलांच्या जोडीने मी माझ्या ज्या मावशीजवळ वाढले ती पुष्पा आई आणि रूपा ताईसुद्धा माझे पालक आहेत. आम्ही मराठी माध्यमात शिकलो. घरात अभ्यासाला पर्याय कधीच नव्हता; पण अमूक मार्क मिळालेच पाहिजेत अशी अटही नव्हती. घरात अनेक वृत्तपत्रे पूर्वीपासून येतात आणि ती वाचलीच पाहिजेत अशी अट असते. यामुळे फार लहान वयात विविध विषय विस्ताराने समजत गेले. मराठीसह इंग्रजीचंही आकलन चांगलं झालं. सुट्टीत संध्याकाळी खेळायला जायचं असेल तर ठरावीक वेळ वाचन करावं लागायचं. आजही सगळेजण घरात असताना वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा केली जाते. त्यामुळे काय वाचायचं, त्यातलं काय नेमकं आवडलंय हे ठरवण्याची, सांगण्याची सवय लहानपणीच लागली. शाळेतल्या अभ्यासाबरोबरच भरतनाट्यम विशारद झाले, कराटे ब्लॅकबेल्ट झाले, अबॅकस शिकले. मला जे नवीन दिसेल ते शिकायची हुक्की येत असे. पण घरी सगळ्यांचंच सांगणं होतं की, वेगळं काही शिकायचं असेल तरी आधी सुरू असलेलं मध्येच सोडायचं नाही. हातात घेतलेली प्रत्येक गोष्ट अभ्यासासह पूर्ण करायची. मला वाटतं याचमुळे एकाच वेळेस अनेक कामं करण्याची सवय लागली. माझ्या पालकांनी केलेला आणखी एक संस्कार म्हणजे स्वतःच्या प्रत्येक कामाची जबाबदारी घेणं. मला आठवतं, पोपच्या ऐतिहासिक इलेक्शनचं सविस्तर वार्तांकन टीव्हीवर दाखवत होते, ते रात्रभर जागून पाहिलं आणि दुसर्या दिवशी पेपरला गेले. यावर घरचे काही बोलले नाही किंवा अभ्यासाचा बाऊही केला नाही. कारण, आपल्या अभ्यासाची, मार्कांची जबाबदारी आपल्यावर आहे हे त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं होतं.”
रुचिराची आई अनेक वर्षं स्वतःच्या क्लासमध्ये सेवा वस्त्यांमधील मुलांना शिकवते. ज्यांच्या घरात अभ्यासाला बसण्यासारखी जागा वा शांतता नाही अशी मुलं दिवसभर त्यांच्या क्लासमध्ये अभ्यास करत बसतात. त्यांच्या वक्तृत्त्व स्पर्धांची तयारी, त्यांचे वाढदिवस हे सारंही क्लासमध्ये होते. “आई आम्हाला अधूनमधून त्या वस्तीत घेऊन जायची. एखाद्या विद्यार्थ्याच्या घरी पूर्ण दिवस ठेवायची. आमच्या बाथरुमपेक्षाही छोट्या घरात ती आठ-आठ माणसं कशी रहायची हे आम्ही अनुभवायचो. आम्ही जेव्हा बारावीनंतर पदवी कॉलेजात जाणार होतो तेव्हा दोघींना बाबांनी आवर्जून सांगितलं की, इथपर्यंत तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये वाढलात. पण आता तुमचा परीघ विस्तारेल. पालक म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी असूच. पण सगळीकडे पोहचता येईल असं नाही. जेव्हा कधी योग्यअयोग्याचा निर्णय घेण्याची, निवड करण्याची वेळ येईल तेव्हा तुम्हाला आपले आजवरचे संस्कार आठवून जबाबदारीने निर्णय घ्यावा लागेल. आमचं आजवरचं आयुष्य या सगळ्या माणसांच्या संस्कारातूनच घडलं आहे,” असं रुचिरा सांगते.
विलक्षण तल्लख आणि मनस्वी अशा या मुलीच्या संगोपनात शिक्षकांचं योगदान खरोखरच उल्लेखनीय. शाळेवर नितांत प्रेम असणार्या रुचिराला ‘तोत्तोचान’ वाचून अचानक शाळा आवडेनाशी झाली आणि हे तिने बाईंना सांगितलं. यावर न चिडता, ‘बरं, आता वर्गात बस. आपण तुला शाळा आवडेल असं पाहू’ असं शांत उत्तर मिळालं. तिला हवं तेव्हा लॅबमध्ये प्रयोग करून बघण्याची, अवांतर वाचनाचीही परवानगी मिळाली; पण अभ्यासावर परिणाम होऊ देणार नाही आणि वर्गातली एकाग्रता कमी होणार नाही या अटीवर. आपलं वर्तन कसं असावं याचे तिला शाळेतून धडे मिळाले. याबाबत ती सांगते, “एकदा बेंचवर फारच गलिच्छ भाषेत माझ्याबद्दल लिहिलं होतं. ते वाचल्याावर माझा पारा चढला. तेव्हा बाई म्हणाल्या, हत्ती चालताना कुत्रे यथेच्छ भुंकतात. मात्र हत्ती चिडत नाही की मागे वळून कोण भुंकतंय हेही पाहत नाही. स्वतः हत्ती होत असताना इतरांच्या भूमिका ठरवण्याचा हक्क मला नाही हेही त्यांनी फार सहज मला सांगितलं. आपल्यामागे बोलणार्यांबद्दल इतका स्वच्छ भाव मनात हवा. केवळ शाळेतील बाईच नव्हे तर कराटे, भरतनाट्यम आणि अबॅकसचे गुरुजन या सगळ्यांनीच आम्हाला कायम काही ना काही दिलं आहे. रुचिरा तल्लख असली तरी वयाने, अनुभवाने लहान आहे. पण संशोधन, इनोव्हेशन, डिझाईन थिंकिंग, लेखन अशा अनेक बाबतीत तिला वेळोवेळी अनेकांकडून मार्गदर्शन लाभलंय. ‘केवळ थेट परिचित नव्हे तर मेलच्या, पत्रांच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या अनेकांनी आपल्याला मार्गदर्शन केल्याचं’ ती सांगते. “त्या मार्गदर्शकांमध्ये अनेक प्राध्यापक होते, संशोधकही होते. मेल कसा लिहावा, त्याला संदर्भ कसे जोडावे, तो कधी पाठवावा हे असो किंवा एखाद्या विषयावर संदर्भ शोधणं असो वा संदर्भांवर चर्चा करणं असो. मी फार लहान होते तेव्हा संशोधन किंवा इनोव्हेशन क्षेत्रात आले आणि कदाचित अनेकांना याचंच अप्रूप होतं. मी पहिल्या वर्षात शिकत असताना एका चर्चासत्रात माझ्यासोबत एक संशोधक सहभागी झाले होते. त्यांनी माझा नंबर घेतला. ते दर महिन्याच्या अखेरीस फोन करायचे आणि या महिन्यात तू अभ्यासातल्या विषयांव्यतिरिक्त नवीन काय शिकलीस असं विचारायचे. हे मी तृतीय वर्षात जाईपर्यंत त्यांनी अथकपणे केलं. यामुळे मला ‘सेल्फ अॅनालिसिस’ करायची, दर महिन्यात काही तरी नवं शिकण्याची सवय लागली.‘इट टेक्स अ व्हिलेज टू रेझ अ किड’ हे माझ्याबाबत अगदी खरं होतं,” रुचिरा कृतज्ञ भावनेने सांगत होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 मध्ये भारत एक विकसित राष्ट्र असेल असं म्हटलं आहे. रुचिरा सावंतसारख्या देशाच्या वैचारिक, साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं काम करणार्या मुलीकडे पाहिलं की, हे ध्येय लवकरच साध्य होईल याची मनोमन खात्री पटते. पुढील प्रवासासाठी रुचिराला मनःपूर्वक शुभेच्छा!