अयोध्येची सायकलवारी

विवेक मराठी    04-Mar-2025   
Total Views |
Cycling
एखादी गोष्ट मनापासून ठरवली असेल, तर ‘सत्य संकल्पाचा दाता नारायण’ या उक्तीचा प्रत्यय येतोच. चिपळूणमधल्या सायकलपटूंना अलीकडेच त्याचा प्रत्यय आला. राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दुसर्‍या दिवशी या चौघींनी अयोध्येपर्यंत सायकलने जायचं सहज ठरवलं आणि त्यांची ती मनोकामना अवघ्या सात महिन्यांत सुफळ संपूर्ण झाली. महिला दिनाच्या निमित्ताने चौघींच्या अयोध्यावारीची सुरस कथा. 
Cycling
 
आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या शारीरिक व्याधींवर सायकलिंग हा उत्तम उपाय आहे, हे लक्षात आल्यावर पुन्हा एकदा सायकलीला चांगले दिवस आले आहेत. स्वास्थ्यासाठी सायकलिंग करणार्‍यांची संख्या इतकी वाढली की, बघता बघता सायकलिंगची चळवळच निर्माण झाली. त्यातून ठिकठिकाणी सायकलिंग क्लब निघाले. विविध स्पर्धा सुरू झाल्या.
 
 
रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सायकलिंग क्लब आहेत. त्यातीलच चिपळूण सायकलिंग क्लब हा एक. यातील डॉ. अश्विनी गणपत्ये या चिपळूणमध्ये माजी सैनिकांसाठी असलेल्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 2016 सालापासून सायकलिंग सुरू केले आणि टप्प्याटप्प्याने सायकलिंगमधील विविध स्पर्धा प्रकारांमध्ये भाग घेतला. अयोध्यावारीत त्यांच्याबरोबर असणार्‍या धनश्री श्रीनिवास गोखले, ज्योती परांजपे आणि रमा करमरकर या तिघीही त्याच सायकल क्लबच्या सदस्या. गृहिणी असलेल्या धनश्री गोखले यांनी 2018 सालापासून सायकलिंग सुरू केले आणि 200 ते 600 किलोमीटरच्या सायकल स्पर्धा पूर्ण केल्या. चिपळूणमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या रमा प्रसाद करमरकर यांनी पाच वर्षांपूर्वी सायकलिंग सुरू केले. त्यांनीही दोन वर्षांपूर्वी सायकलने पंढरपूरची वारी केली. निवृत्तीनंतर गृहिणी असलेल्या ज्योती विनायक परांजपे यांनी वयाच्या साठीत पदार्पण केले असून त्यांनी आतापर्यंत लहानमोठ्या 335 सायकलवार्‍या केल्या आहेत.
 
 
2024च्या जानेवारीत अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी संपूर्ण देश राममय झाला होता. त्यावेळी या चौघी गोव्यातील सायकल प्रवासाच्या परतीला असतानाच पुढचा दौरा अयोध्येला करू असे एकमुखाने ठरले. “अयोध्येतील रामलल्लाचे प्रत्यक्ष दर्शन होण्याच्या प्रत्येक टप्प्यावर जणू रामानेच वाट दाखवली, मदत केली आणि साथ दिली, ” अशा या चौघींच्या भावना आहेत.
22 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2024 या काळात त्यांची अयोध्यावारी पार पडली. या चौघींपैकी रमा करमरकर या नोकरी करणार्‍या आहेत. तर अन्य तिघी गृहिणी किंवा व्यावसायिक असल्यामुळे त्यांच्या रजेचा प्रश्न नव्हता. पोलीस खात्यात असलेल्या करमरकर यांची सलग वीस दिवसांची रजा मंजूर झाली. एवढी रजा मंजूर झाली हाच अयोध्येची वारी पूर्ण होणार असल्याचा संकेत होता. चिपळूणहून पुण्यापर्यंत मोठ्या वाहनातून त्यांनी सायकलींसह प्रवास केला. पुण्यातून अयोध्येपर्यंतचा 1,340 किलोमीटरचा प्रवास त्या चौघींनी मजल दरमजल करत सायकलने पूर्ण केला. या दरम्यान महेश्वर, ओंकारेश्वर, रावेरखेडी, इंदूर, उज्जैन, झाशी, यमुना अशा अनेक महत्त्वपूर्ण व पवित्र स्थळांना भेटी देता आल्या. विश्व हिंदू परिषदेमुळे राहण्याची सोय झाली. रामलल्लाची शयन आरती आणि सुगम दर्शन लाभल्यानंतर त्यांच्या अयोध्या सायकलवारीची सांगता झाली.
 

Cycling 
 
सायकलिंगद्वारे झालेला त्या चारचौघींचा अयोध्या प्रवास रोचक होता. महाराष्ट्रातला प्रवास त्यांनी तीन टप्प्यांत करायचे ठरविले होते. मात्र दुसर्‍याच दिवशी मालेगावला जाताना आलेल्या अडचणींमुळे सायकली टेम्पोत टाकून जावे लागले. त्यावेळेस ‘आपण सहजपणे जाऊ शकतो,’ या गर्वाचे हरण झाल्याचे त्यांनी प्रभू रामाला स्मरून सांगितले. वारीच्या अखेरच्या टप्प्यात असताना आपण एवढे अंतर सायकलने पूर्ण करणार असल्याचा अहंकार पुन्हा डोकावू लागला; पण वाराणसीमध्ये काशी कोतवालला जाताना चौघींना सायकल रिक्षात बसून जावे लागले. “त्या रिक्षावाल्याच्या डोक्यात टोपी नाही, डोळ्यांना गॉगल नाही, गिअरची सायकल नाही, पॅडेड शॉर्ट नाही, जेल नाही की इलेक्ट्रोलाईट नाही अशा अवस्थेत सीटवर न बसता उभ्याने पॅडल मारून ग्राइंडिंग करत सायकलवाला भर उन्हात चढ चढून गेल्याचे अनुभवले आणि सगळी घमेंड क्षणात जिरल्याचा अनुभवही आला,” असे त्या सांगतात.
 
 
अयोध्यावारीची सुरुवात पुण्यापासून करायचे नक्की झाले. सोबत मदत करणारे वाहन (सपोर्ट गाडी) घ्यावे की नाही, याबाबत संभ्रम होता. पण महाराष्ट्राबाहेर जायचे असल्याने नात्यातील जयंत केळकर आणि वसंत जोशी त्यांच्या इको गाडीसह सहभागी होणार, हेही निश्चित झाले. कोणत्या शहरात राहायचे आणि कोठे साधारण कशी व्यवस्था होईल, यावर चर्चा झाली. त्यातून विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला मिळाला. चिपळूणमधील विहिंपचे उदयकाका चितळे यांच्या संपर्कामुळे महाराष्ट्रबाहेर सगळी सोय होण्याची खात्री मिळाली. विहिंप असो, संघ असो किंवा बजरंग दल असो, त्यांची सोय म्हणजे सुरक्षिततेची हमी असल्याची खात्रीही पटली आणि प्रवास सुरू झाला.
 

Cycling 
 
पुण्याला जाताना चाफळच्या श्रीराम मंदिरात थांबून प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद घेतले. मोहिमेच्या पहिल्या दिवशी सकाळी तुळशीबागेतील श्रीरामाच्या देवळात नमस्कार करून सायकलवारीला प्रत्यक्ष सुरुवात झाली. तुळशीबागेतला राम ते अयोध्येतला राम असा हा प्रवास झाला. पहिल्या दिवशी 21 सप्टेंबरला पुणे ते संगमनेर हा टप्पा ठरला होता. सुरुवातीला हा टप्पा सोपा वाटला, तरी नंतर त्यातील अवघडलेपण लक्षात आले. चाकणच्या नंतर हळूहळू चढ लागायला सुरूवात झाली. ऊन चढायला लागले. डोक्यावर पाणी ओतत, एकीकडे पाणी पीत प्रवास चालू होता. जीपीएसवर सरळ दिसणारा रस्ता प्रत्यक्षात खूपच चढउतारांचा होता. संगमनेर साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसमध्ये पहिल्या दिवशीचा विश्रांतीचा टप्पा होता.
 
 
 
दुसर्‍या दिवशी संगमनेर ते मालेगावच्या 135 किलोमीटरच्या टप्प्यासाठी मोहीम सुरू झाली. सुरुवातीलाच सायकल पंक्चर होणे, चेन सटकणे, टायर फुटणे असे प्रकार घडले. मात्र त्या दुरुस्तीत दोन तास गेले. परिणामी अखेरच्या 30-35 किलोमीटरसाठी ट्रकची मदत घ्यावी लागली. मालेगावला पोहोचल्यानंतर मालेगाव सायकलिंग क्लबचे सदस्य भेटायला आले. त्यांनी बरोबर आणलेल्या मेकॅनिकने सायकलच्या किरकोळ दुरुस्त्या विनामोबदला करून दिल्या.
 
 
 हे पण वाचा...
 
तिसर्‍या दिवशी मालेगाव ते शिरपूर हे 110 किलोमीटरचे अंतर कापायचे ठरले होते. शिरपूर म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या हद्दीजवळचे गाव. या गावातील डॉ. अश्विनी गणपत्ये यांच्या परिचितांनी अगदी आठवणीत राहील असे आदरातिथ्य केले. शिवाय पुढच्या शिरपूर ते महेश्वर या 140 किलोमीटर अंतराच्या टप्प्याचा प्रारंभ करून द्यायलाही ते आले. त्या दिवशी मध्यप्रदेशच्या हद्दीत प्रवेश झाल्यावर खराब रस्त्यांमुळे सायकलचे हॅण्डल घट्ट पकडून हाताला त्रास होत होता. पुढे बिजासिनी घाट लागला. तिथे बेशिस्त वाहतुकीचा अनुभव घ्यावा लागला. रस्त्याच्या शक्य तेवढ्या कडेने जाऊनही त्याच्याही आणखी डाव्या बाजूने रस्त्याच्या खाली उतरून दुचाकीचालक जात होते. घाट संपून काही अंतर कापल्यानंतर ‘मां अहिल्या की नगरी में आपका स्वागत है’ हा फलक दिसला. अहिल्याबाई होळकर यांच्या महेश्वर गावी सायकलवारी पोहोचली. तेथे बजरंग दलाने व्यवस्था केली होती. अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा सहा वाजता बंद होत असल्याने आधी राजवाडा बघून यायचे ठरले. राजवाड्यात जाताना नर्मदा नदीचे सुंदर दृश्य पाहून नंतर राजगादीचे दर्शन घेतले. तिथून खाली महेश्वराचे देऊळ आहे. अहिल्यादेवी रोज सकाळी सगळा घाट उतरून नर्मदेत स्नान आणि नंतर महेश्वराची पूजा करीत असत. नर्मदा नदीचे वाचलेले, ऐकलेले महात्म्य, सुंदर घाट, संध्याकाळची वेळ आणि दीपदान आणि सोबतच बोटिंगचा आनंदही घेता आला. अहिल्यादेवींनी वसवलेल्या छोट्या छोट्या मंदिरांचे दर्शन घेतले. नर्मदा परिक्रमेला येणारे यात्री जेथे विसावा घेतात, तो भागही पाहता आला. तेथे अनेक छोटे मोठे आश्रम होते. कोण, कुठले, कुठल्या जातीचे वगैरे काहीही न विचारता राहायचा आग्रह केला जात होता. नर्मदा नदी काही कमी पडू देत नाही. परिक्रमा करणार्‍यांची कशी सोय करते, त्याची प्रचीती आली.
 

Cycling 
 
पुढच्या दिवशी विश्रांती घेऊन गाडीने ओंकारेश्वरचे दर्शन घ्यायचे ठरविले. त्या रस्त्यावर आश्रम असलेल्या सियाराम बाबांबद्दल बरेच काही ऐकले होते. जाताना नर्मदा नदी नावेतून पार करून पलीकडे आश्रम होता. आश्रमात फार गर्दी नव्हती. 111 वर्षांचे बाबा अजूनही बर्‍यापैकी कार्यरत दिसत होते. कोणी त्यांची सेवा करीत होते. कोणी काही विचारत होते. कोणी समोर पैसे ठेवले, तर बाबा फक्त दहा रुपये घेतात आणि बाकीचे परत करतात. तरीही त्यांच्याजवळ एवढे पैसे जमले होते त्यातून त्यांनी नर्मदा तीरावर काही घाट बांधून घेतले. बाबा हनुमानभक्त म्हणून ओळखले जातात. अजूनही बिनचष्म्याचे दिवसाला 20-20 तास रामायण वाचतात. नंतर ओंकारेश्वरला पोहोचल्यावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने व्यवस्था केली. तिथे शेगाव संस्थानचे गजानन महाराजांचे देऊळ पाहून प्रसन्न वाटले. ओंकारेश्वराचे दर्शनही सुलभपणे झाले. पुढे रावेरखेडी येथे अजिंक्य योद्धे पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी पाहून मुक्कामी परतले.
 
 
वारीच्या सहाव्या दिवशी 83 किलोमीटर अंतर पार करून इंदूरला लोकसभेच्या माजी सभापती सुमित्राताई महाजन यांची भेट हे त्या दिवसाचे प्रमुख आकर्षण होते. सुमित्राताईंचे माहेर चिपळूणला. चिपळूणहून इंदूरला गेलेला कोणताही माणूस त्यांना भेटल्याशिवाय येत नाही. त्याही माहेरच्या माणसाचे अगदी प्रेमाने स्वागत करतात. चौघींनाही त्याचेच प्रत्यंतर आले. वाटेतील काही जणांनी इंदूरला कोणाला भेटायला जाणार अशी विचारणा केली. सुमित्राताईंना भेटणार, असे म्हटल्यावर लोकांनी खूपच आदरपूर्वक,‘अच्छा, ताई से मिलने आए हैं. ताई की बात ही कुछ और हैं. ताई सबसे मिलती है,‘ सांगितले. सुमित्राताईंविषयी सामान्य लोकांत असलेली अशी कीर्ती, असा आदर सुखावून गेला. इंदूरमध्ये माधवनाथ स्वामींचे मंदिर आहे. त्यांनी नाथ संप्रदायाचा प्रसार केला. योग आणि नामस्मरण यांचे महत्त्व त्यांनी लोकांना पटवून दिले. याच मंदिरात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सुमित्राताई तेथेच या सर्वांना भेटायला आल्या. अतिशय मोकळेपणाने संवाद साधत सगळ्यांची चौकशी केली. प्रवासात कोठे अडचण आली तरी निःशंकपणे फोन करण्याची सूचना केली.‘सायकलने प्रवास करताय. एखाद्या वेळी जमत नाही, असं वाटलं तर उगाच त्रास करून घेऊ नका. लोक काय म्हणतील, याचा विचार करू नका. त्रास झाला तर लोक नाही येणार सहन करायला. तेव्हा जमणार नसेल तर बिनधास्त असेल तिथे थांबा. वाटल्यास मला फोन करा’, असा प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला.
 
 
सातव्या दिवशी इंदूर ते उज्जयिनी हा 55 किलोमीटरचा टप्पा पार करायचा होता. तो दुपारी बारापर्यंतच पार झाला. दुपारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जेवण आणून दिले आणि संध्याकाळी उज्जैनच्या महाकालचे दर्शन घ्यायचे ठरविले. मात्र पाऊस सुरू झाला. रिक्षातून मंदिरात जायला सायंकाळ झाली. तेथे आतली इलेक्ट्रिक गाडी आली. नवीन झालेला सगळा एकदम सुंदर महाकाल कॉरिडॉर बघता आला. उज्जयिनी ते ब्योरा हा आठव्या दिवसाचा टप्पा भरपूर पावसात सुरू झाला. वाटेत दोनच दिवसांपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगा झाल्यामुळे संचारबंदी लागू असलेले मक्सी गाव लागले. तेथील भयाण शांतता वेगळेच काही सांगून गेली. पाऊस मात्र पाठ सोडत नव्हता. सायकल चालवणे अत्यंत त्रासदायक ठरत होते. त्यामुळे पुढे ब्योराला गाडीने जायचे ठरविले. ब्योरा गावात उतरून पुढे पुन्हा बीनागंजपर्यंत सायकलने प्रवास झाला. दुसर्‍या दिवशी बीनागंज ते बदरवास हा टप्पा पार करायचा होता. आदल्या दिवशीच्या पावसामुळे चिखलाने सायकली माखल्या होत्या. त्या साफ केल्यानंतर प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात झाली. बदरवास येथे संघाच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्था केली होती. बदरवास हे ‘मोदी जॅकेट‘साठी प्रसिद्ध असल्याची माहिती मिळाली. तेथे घराघरांत मोदी जॅकेट शिवली जातात.
 
 
दहाव्या दिवशी बदरवास ते झाशी हा टप्पा पार करायचा होता. झाशी म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर. त्यामुळे उत्सुकता खूप होती. झाशीचा किल्ला पाच वाजता बंद होतो. त्यामुळे त्याआधी पोहोचायचे ठरवले. मध्यप्रदेशच्या सीमा पार करून उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश केला. तेथील सीमेवर पोलिसांनी अडवले. सायकलवरून चार बायका दिसल्यावर कडेला उभे करून चौकशी केली. थोडे थांबायला सांगितले. पण नंतर समजले की, त्यांनी चहा प्यायला थांबवले होते. हाही वेगळा अनुभव होता. झाशीमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क झाला होता. त्यांनी झाशीच्या किल्ल्यावर जायची व्यवस्था करून दिली. चक्क सायकलने किल्ला सर केला.
 

Cycling 
 
एका ऐतिहासिक वास्तूची ही सफर अगदीच आठवणीत राहणारी होती. राणी लक्ष्मीबाईंनी ज्या तटावरून घोडा फेकला, त्या ठिकाणाला भेट दिली. त्या तटावर आता रोज तिरंगा लावला जातो. संध्याकाळी तो खाली उतरवला जातो. राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी अभिमान वाटत होता. गड उतरून आल्यावर तेथेच बिजली तोफ ठेवली आहे. ती तोफ एकदाच धडाडली. नंतर त्यात दुसरा गोळा अडकून राहिला तो अजूनपर्यंत तसाच आहे. बाजूला ‘खूब लडी मर्दानी थी वो, झाशीवाली रानी थी’ ही पूर्ण कविता वाचायला मिळाली. ही एक अविस्मरणीय आठवण होती.
 
 
अकराव्या दिवशी झाशी ते काल्पी हे सुमारे 150 किलोमीटरचे अंतर पार करायचे नियोजन होते. सायंकाळी साडेपाच वाजता काल्पी गाव लागले. तेथे बजरंग दलाचे कार्यकर्ते वेशीवर येऊन थांबलेले होते. त्यांनी गळ्यात हार घालून जोरदार स्वागत केले. काल्पी गाव वेदव्यास यांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. झाशीची राणी लक्ष्मीबाई शेवटच्या दिवसात इथेच होत्या. त्यांचा पुतळा गावाबाहेर आहे. गाव लहान असले तरी ऐतिहासिकदृष्ट्या गावाला महत्त्व होते. गावात वेदव्यास यांचे तसेच इतर अनेक मंदिरे होती. गाव यमुना नदीच्या तीरावर वसलेले आहे.
 
 
बाराव्या दिवशी काल्पी ते कानपूर मार्गे लखनौ हा टप्पा सर करायचा होता. ऊन प्रचंड होते. कानपूर-लखनौ रस्ता खूप खराब आहे. त्यासाठी सायकलसह गाडीतून प्रवास करण्याची वेळ आली. त्या गाडीतूनही रस्ताभर अंग ठेचकाळत होते. लखनौला पोहोचायला सायंकाळचे सात वाजले. लखनौ ते अयोध्या हा अखेरचा टप्पा 4 ऑक्टोबर रोजी होता. सकाळी साडेपाचला सुरुवात झाली. सरळ सपाट रस्ता होता. घरांच्या, इमारतींच्या भिंतींवर रामायणातील चित्रे काढलेली दिसत होती. अयोध्यानगरी जवळ आल्याची ती खूण होती. अखेर एकदाची अयोध्या प्रवेशाची धनुष्याकृती कमान दिसली. आणि थोड्याच वेळात मंदिराच्या प्रवेशद्वार दिसले. लता मंगेशकर चौकात असलेल्या वीणेसमोर सायकलींसोबत फोटो काढले. खूप आनंद झाला होता. इतके दिवस घेतलेली मेहनत फळाला आली होती. रात्री नऊच्या शयन आरतीचे बुकिंग मिळाले होते. गर्भगृहात जायला वेळ लागला. रांग होती. जरा लांबूनच प्रभू रामाची मूर्ती जेमतेम दिसत होती. आरती चालू असताना मध्येच टाचा उंचावून मुखदर्शन घेतले. दोन बाजूला मोठ्या स्क्रीनवर प्रभू रामाचे दर्शन होत राहिले. आरती संपल्यावर परतताना प्रभू रामाचे बालरूप पाहायला मिळाले. निःशब्द झाले. थोडा वेळ तेथे रेंगाळावेसे वाटले. पण सिक्युरिटी गार्डनी लगेच सर्वांना बाहेर जाण्याची विनंती केली. तो परिसर सोडून जायची इच्छा होत नव्हती. पण नाईलाज होता. अजूनही मनात रामरायाची मूर्ती रेंगाळत होती.
 
 
दुसर्‍या दिवशी सकाळी विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांच्या भेटीची वेळ मिळाली. संपूर्ण प्रवासात विश्व हिंदू परिषदेची चांगलीच मदत झाली होती. चंपत राय हे 1991 सालापासून अयोध्येत आहेत आणि राम मंदिर निर्माणामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. वयाच्या 80 व्या वर्षीसुद्धा त्यांची स्मृती तल्लख आहे हे गप्पांमधून लक्षात आले.
 
 
सायकलने अयोध्येपर्यंत प्रवास केल्याबद्दल त्यांना कौतुक वाटले. त्यांनी गजानन वाघ यांना विशिष्ट दर्शन पास द्यायला सांगितल्याने परत एकदा दर्शन घ्यायची इच्छा पूर्ण झाली. प्रथेनुसार हनुमान गढीवर जाऊन हनुमानाचे दर्शन घेतले. नंतर मुख्य मंदिरात विशिष्ट दर्शन पासमुळे जेथे पोहोचता आले, तेथे गेल्यावर समजले की रामलल्लाच्या मूर्तीच्या सगळ्यात जवळ जाता येईल अशा ठिकाणी ती व्यवस्था होती. फक्त पुजारी बाबा एका बाजूला होते. त्यामुळे अगदी कोणताही अडथळा न येता अप्रतिम दर्शन झाले. एवढ्या जवळून असे दर्शन अजिबातच अपेक्षित नव्हते. ते लोभसवाणे रूप पाहताना डोळे आपसूक भरून आले.
 
 
एवढ्या सगळ्या प्रवासात कुठेही काही अडचण आली नव्हती. कुठेही राहण्याचे आणि खाण्यापिण्याचे हाल झाले नाहीत. सुरक्षितता तर होतीच. कोणाला कसला त्रास झाला नाही. चौघींची ही सायकलवारी कोणताही अपघात न होता सुखरूप पार पडून रामलल्लाचे मनोहर दर्शन झाले. यात्रा सफल होईतोवर रामलल्ला कोणा ना कोणाच्या रूपात सतत भेटतच होता. म्हणूनच त्यांना वाटले की, रामलल्लानेच ही अयोध्येची सायकलवारी घडवून आणली आहे.

प्रमोद कोनकर

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार आहेत...