@ वर्षा पवार-तावडे
गुंतवणूक विषयातील अनास्थेचा विचार सी.ए. रचना रानडे हिच्या मनात बरेच दिवस घोळत होता. प्रत्येक भारतीयाने आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हावं हे रचनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. यातूनच तिने ‘हर घर इन्व्हेस्टर’ मोहिमेची सुरुवात केली.
घरात आई किंवा ताई कितीही शिकलेल्या असल्या तरी शेअर्स, इन्शुरन्स घेण्यासाठी एकेकाळी वडिलांकडे किंवा दादाकडे सल्ला मागितला जात होता. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या गुंतवणूक क्षेत्रात आज सी.ए. रचना रानडे ही एक यशस्वी FinTuber आहे. सी.ए. रचना रानडे हे शिक्षिका, इंफ्ल्युएंसर आणि उद्योजिका म्हणून प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्त्व सर्वांच्याच परिचयाचं आहे.‘सी.ए. रचना रानडे’चे शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंटचे व्हिडिओज बरेचजण पाहात असतात. रचना सर्व वयातल्या लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत फायनान्सच्या गोष्टीत मार्गदर्शन करते. अतिशय प्रभावी वक्तृत्त्व शैली हे तिचं खास वैशिष्ट्य आहे.
भविष्यासाठी नुसती बचत नव्हे तर गुंतवणूक महत्त्वाची
रचनाच्या इंग्रजी यूट्यूब चॅनलचे आज 52 लाख आणि मराठीचे जवळजवळ 12 लाख सबस्क्राईबर्स आहेत. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामवरही लाखो फॉलोअर्स आहेत. रचनाला ‘इन्व्हेस्टमेंट आणि शेअर मार्केटच्या दुनियेतील राणी’ म्हंटलं जातं.
असं असलं तरीही भारताच्या लोकसंख्येच्या मानानं आपण अजूनही फारच कमी लोकांपर्यंत पोहोचू शकलो आहोत, असं तिला वाटतं. सर्व स्तरांतल्या लोकांनी ‘भविष्यासाठी नुसती बचत नव्हे तर गुंतवणूक केली पाहिजे आणि त्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे, या ध्येयानं ती भारलेली आहे.
गुंतवणुकीच्या संकल्पना सोप्या करून सांगणं गरजेचं
रचना स्वतः 2006पासून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत होती. 2013 मध्ये SEBI ट्रेनर बनण्यासाठीचा तिने एक अभ्यासक्रम पूर्ण केला. मग रचना बनली SEBIची रिसोर्सपर्सन. त्यावेळी प्रत्येक टार्गेट ग्रुपसाठी एक कार्यक्रम करणं बंधनकारक होतं. त्या काळात प्रत्यक्ष भेटी देणं, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी, निवृत्त लोक, उद्योजक अशा प्रत्येक वर्गाच्या फायनांशीअल अवेअरनेससाठी 100 पेक्षा जास्त कार्यक्रम तिने केले. त्यासाठी तिने भरपूर फिल्डवर्क केलं. हे करताना तिच्याकडे माहिती गोळा होत गेली. नोकरी करणारे, न करणारे, गृहिणी किंवा अगदी कॉर्पोरेटमधल्या व्यक्ती या सर्वांमध्येच तिला आर्थिक साक्षरतेचा अभाव आढळला. त्यातून तिला वाटलं की, जर ती पोकळी भरून काढायची असेल तर गुंतवणुकीच्या संकल्पना सोप्या करून सांगणं आवश्यक आहे.
प्रत्येेेकाला कळेल अशा पद्धतीने शिकवता येणं गरजेचं
रचनाला लहानपणापासूनच शिक्षिका व्हायचं होतं. पहिल्याच प्रयत्नात सी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तिच्या बरोबरीच्या मित्रमैत्रिणींनी मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर स्वीकारल्या. तिने मात्र सी.ए.च्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. कालांंतराने तिने एम.बी.ए. च्या विद्यार्थ्यांनाही शिकवायला सुरुवात केली. 10 वर्षं ती क्लासमध्ये शिकवत होती. इंजिनिअरींगच्या मुलानांही तिचं शिकवणं कळत होतं, आवडत होतं. शेवटच्या बाकावरच्या मुलाला कळेल अशा भाषेत शिकवता आलं पाहिजे, हा तिचा आग्रह असतो. तोच तिचा USP सुद्धा आहे. आजच्या काळात शेअर मार्केट, इन्व्हेस्टमेंट यामध्ये तरुण पिढीला आवड निर्माण होऊ लागली आहे. म्युच्युअल फंड, SIPमध्ये अनेक तरुण-तरुणी गुंतवणूक करू लागले आहेत. यातले बरेचजण रचनाचे चहाते आहेत. तिची शिकवण्याची पद्धत त्यांना खूप आवडते.
वेगळं करून दाखवण्याची इच्छा
तिच्या काही विद्यार्थ्यांनी तिला एखादा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा सल्ला दिला. त्यात सहभागी होण्याची इच्छाही दर्शवली. म्हणून रचनाला वेगळं काहीतरी करून दाखवण्याची इच्छा निर्माण झाली. मग तिने विचार केला की, ‘मला ज्या गोष्टींचं ज्ञान आहे त्यातच मी पुढे का जाऊ नये’. स्टॉक मार्केट याच विषयात आपण काहीतरी का करू नये, हाही विचार तिच्या मनात आला. रचनाने शेअर मार्केटवर तिचा पहिला दीड तासांचा युट्यूब व्हिडीओ बनवला होता. कोणतीही तयारी न करता रचनानं तो व्हिडीओ उत्स्फूर्त पद्धतीनं बनवला होता. फेब्रुवारी 2019 नंतर, जेव्हा तिने पहिल्यांदा व्हिडिओ अपलोड केला. सुरुवातीच्या प्रतिसादानंतर तिचा आत्मविश्वास वाढला. यासाठी ती युट्यूबला खूप धन्यवाद देते.
हे पण वाचा... -----------------------------------------
मराठी माणसाच्या आर्थिक साक्षरतेसाठी मराठी चॅनेल
2019 साली ‘आर्थिक साक्षरता आणि शेअर मार्केटचा अभ्यास’ यासाठी "CA Rachana Ranade' हे इंग्रजी भाषेतून युट्यूब चॅनेल चालू केलं. इंग्रजी भाषेमधून आर्थिक व्यवस्थापनाचे आणि शेअरमार्केटचे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केले. आजपर्यंत हजारो विद्यार्थी या अभ्यासक्रमामधून शिकले आहेत. मराठी माणूस आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हावा त्यासाठी तिने मराठी भाषेमधूनदेखील आर्थिक व्यवस्थापनाचे आणि शेअर मार्केटचे ऑनलाईन अभ्यासक्रम जानेवारी 2023मध्ये चालू केले. मराठी माणसासाठी शेअर मार्केटचं गणित सोपं केलं. सी.ए.रचना रानडेमुळे आर्थिक साक्षर झालेले लोक आज जगभरात आढळतात.
आर्थिक साक्षरतेबाबत 2019 मधील चिंताजनक स्थिती
देशभरात किती जणांची बँक खाती आहेत, बँकेत बचत करण्याची किती जणांना सवय आहे, आरोग्य विमा किती जणाकडे आहे, याबद्दल 2019 मध्ये ‘नॅशनल सेंटर फॉर फायनांशीयल एज्युकेशन’ (एन.सी.एफ.इ.) तर्फे एक सर्वेक्षण करण्यात आलं. त्या सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती चिंताजनक होती. (एन.सी.एफ.इ. हा सर्व वित्तीय क्षेत्रातील नियामकांचा म्हणजेच आरबीआय, सेबी, आयआरडीएआय आणि पीएफआरडीएचा एक संयुक्त उपक्रम आहे. जो राष्ट्रीय आर्थिक शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करतो ).
‘बँकेत आपलं खातं नाही कारण कधी तशी गरजच वाटली नाही’, असं 44% लोकांनी म्हटलं होतं. आरोग्यासाठी शहरी भागात 17% लोकांकडेच विमा होता तर ग्रामीण भागात 11% लोकांकडे विमा होता. त्यापैकी 34% लोकांनी ‘याबद्दल आपल्याला माहितीच नव्हती’ असं सांगितलं. 47% लोकांकडून ‘विम्याची कधी गरज लक्षात आली नाही’ अशी माहिती मिळाली. शहरी भागात 7 % लोकांकडे तर ग्रामीण भागात 5 % लोकांकडे म्युच्युअल फंड होते. शेअरमार्केट व स्टॉकमार्केटमध्येही शहरी आणि ग्रामीण लोकांची अनुक्रमे 4% व 2% लोकांचीच गुंतवणूक होती. पश्चिम भारताचा विचार करता या सर्वेक्षणानुसार 53% लोकांमध्ये आर्थिक विषयांचे खूप अज्ञान दिसून आलं. ही आकडेवारी बघून रचना अस्वस्थ झाली.
भारतीयांच्या आर्थिक साक्षरतेसाठी ‘हर घर इन्व्हेस्टर’
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी पंतप्रधानांनी ‘हर घर तिरंगा’ लावण्याचं आवाहन भारतवासीयांना केलं होतं. ही संकल्पना तिला खूप आवडली. देशभरातल्या गुंतवणूक विषयातील अनास्थेचा विचार तिच्या मनात बरेच दिवस घोळतच होता. एकदा ती कार्यालयात एडीटिंग टीमबरोबर चर्चा करत असताना अचानक ‘हर घर इन्व्हेस्टर’ ही टॅगलाईन तिला सुचली. सर्वांनाच ती एकदम आवडली. प्रत्येक भारतीयाने आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हावं हे रचनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यातून ‘हर घर इन्व्हेस्टर’ या मोहिमेची सुरुवात झाली.
आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय घेण्यात स्त्रिया मागे
महिला घर सांभाळतात, घराचे आर्थिक नियोजन करतात, बचत करतात. दूरदृष्टी ठेवून सोन्यात गुंतवणूक करतात. तर मग त्या आर्थिक गुंतवणुकीचे इतर निर्णय घेण्यात का मागे पडतात? यावर त्यांच्याशी चर्चा करताना तिच्या असं लक्षात आलं की, ‘स्त्रियांकडे माहितीचा अभाव असतो आणि बाहेरच्या आर्थिक जगाशी त्यांची कमी ओळख असते. तसेच स्त्री बर्याचदा ‘आपल्या आर्थिक निर्णयाच्या परिणामांची जबाबदारी घ्यायला कचरते’. म्हणून ती मागे पडते. रचनाने स्त्रियांना गुंतवणुकीसाठी तयार करत तिच्या कार्यक्रमातून आवाहन करायला सुरुवात केली. त्याचा सकारात्मक परिणाम झाला.
‘हर घर इन्व्हेस्टर’ ही कल्पना पुढे चालवण्यासाठी तिनं विनामूल्य व्याख्याने घ्यायला सुरुवात केली. पेड लाइव्ह इव्हेंटही सुरू केले. पुण्यामधल्या तिच्या कार्यक्रमाला ‘बुक माय शो’अॅपवरून 300-500 रुपयांची तिकिटं काढून लोक आले होते. या सर्वात विशेष बाब म्हणजे तिथे स्त्री आणि पुरुषांची संख्या समप्रमाणात होती. त्यातल्या अनेक जणी नेमाने तिचे व्हिडीओ पाहणार्या होत्या. तर काही जणी नवर्याच्या आग्रहाखातरही आल्या होत्या. हे बदलते चित्र सुखावणारे होते. हळूहळू जिथे जिथे स्त्रिया भेटतील त्यांच्याशी गुंतवणुकीच्या सजगतेचा संवाद सुरू केला.
महिलांचा सहभाग वाढू लागला
एक बाई एकदा रचनाला रस्त्यात भेटली. ती म्हणाली, “मी खूप शिकले नाही. फार कमावत नाही. अजून गुंतवणूकही करत नाही; पण तुमचे व्हिडीओ नेहमी बघते. आता मला त्यातल्या चार गोष्टी कळायला लागल्या. त्यामुळे मी माझी मतं चारचौघांत मांडू शकते. आता रचना रानडेचा आवाज ओळखून माझे 4-5 महिन्याचे बाळही लगेच टीव्हीकडे वळून बघते.” तिचा हा अनुभव रचनासाठीही उत्साहवर्धक होता.
‘आनंदवन’च्या 75 वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात रचनाला एक स्री भेटली. प्रसूतीच्या पूर्वी ‘वर्कफ्रॉम होम’ करत असताना उरलेल्या वेळात तिने रचनाचे युट्यूब कोर्सेस केले. त्यातून शिक्षण घेऊन आपले बाळ जन्माला येण्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाच्या दृष्टीने नियोजन करून SIP प्लॅन केले. हे रचनाला सांगताना तिचे डोळे अभिमानाने भरून आले होते.
असंच एकदा रचना उपहारगृहात गेली असताना तिला दोन मुली भेटल्या. त्या रचनाचे व्हिडीओ नियमित पाहणार्या होत्या. त्या दोघीही एकाच कंपनीत पण वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करत होत्या. एकदा सहज गप्पा मारताना आपण दोघीही रचना रानडेचे इन्वेस्टमेंट रील पाहत असल्याचे त्यांना समजले. आणि त्यानंतर गुंतवणूक विषयावर त्या दोघींचं मस्त नातं जुळलं. आता त्या दोघीही पूर्वीपेक्षा जास्त छान मैत्रिणी झाल्या आहेत. हा अनुभवही रचनाला खास वाटतो.
रचनाच्या मराठी चॅनेलमुळे काही घरातील मदतनीस मावशीनींही बँक खातं काढलं ही तिच्यादृष्टीने समाधानाची बाब आहे. लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचं योग्य नियोजन करण्यासाठी रचनानं केलेलं मार्गदर्शन त्यांना खूप महत्त्वाचं वाटतं आहे.
अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे
रचना रानडेला ‘नास समिट 2022’साठी दुबईमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. 200 ते 250 पेक्षा अधिक प्रेक्षकवर्ग उपस्थित होता आणि 20 पेक्षा जास्त देशांतून लोक सहभागी झाले होते. त्यात अमेरिका, सिंगापूर, पाकिस्तान, दुबई अशा अनेक देशांचा समावेश होता. ‘हर घर इन्व्हेस्टर’ला एक वर्षं पूर्ण झालं. आता रचनाला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पोहोचून मराठीतून आर्थिक गुंतवणुकीच्या जनजागृतीचे मोफत कार्यक्रम करायचे आहेत. त्यासाठी ती ट्रॅव्हल पार्टनर, वेन्यू पार्टनर यांच्या शोधात आहे. हजार लोक बसतील एवढे मोठे सभागृह मिळावे अशी तिची अपेक्षा आहे. विद्यापीठांच्या पाठ्यक्रमामध्ये 2-3 क्रेडिटचा कोर्स सुरू करण्याचाही तिचा विचार आहे.
रचना रानडे बीकॉम, पीजीडीएम, एमबीएस आणि सीए आहे. हे सर्व करत असतानादेखील तिने आपली गायनाची आवड जोपासली आहे. संगीत विशारद पदवीसुद्धा मिळवली आहे. रचनाचे पती सी.ए. अक्षय रानडे यांनी खाजगी मल्टीनॅशनल कंपनीतील नोकरी सोडून तिच्या या प्रवासात तिला उत्तम साथ देत आहेत. त्या दोघांचं टीमवर्क आजच्या पिढीसाठी उत्तम रोलमॉडेल आहे.
विवाहेच्छुक जोडप्यांनी ‘कॉफी डेट’ सारखं ‘फायनांशीयल डेट’ वरही जावं असं रचनाचं मत आहे. एकमेकांच्या आर्थिक सवयी समजून घ्याव्यात. बचतीच्या सवयी, खर्चाच्या सवयी, घरातली परिस्थिती, घरावर कर्ज असेल तर कर्जाची माहिती, हप्ते किती जातात इ. माहिती एकमेकांना असावी. स्त्री व पुरुषाने कमावलेला पैसा घरात कसा खर्च होणार? हे कोण ठरवणार? अशा छोट्या -मोठ्या गोष्टींवर दोघांत चर्चा व्हायला हवी या बाबतीत रचना रानडे जागृती करत असते. भावी काळात स्त्री असो वा पुरुष पण घराघरांतून आर्थिक गुंतवणूकदार वाढत जातील यावर सी.ए. रचना रानडेचा पूर्ण विश्वास आहे.
लेखिका भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या राष्ट्रीय सचिव आहेत.