पुण्याजवळची DBS पॅकेजिंग प्रा. लि. गेल्या दशकभरापासून विविध उद्योजकांसाठी कॉरुगेटेड पॅकेजिंग सोल्यूशन्स उपलब्ध करून देत आहे. DBS पॅकेजिंग कंपनीचे संस्थापक संचालक निर्मल सदगिर या तरुण उद्योजकाशी त्यांच्या या यशस्वी व्यवसायाबद्दल केलेला सविस्तर विशेष संवाद...
पुण्याजवळची DBS पॅकेजिंग प्रा. लि. गेल्या दशकभरापासून ऑटोमोबाईलपासून सौंदर्यप्रसाधनांपर्यंत आणि ई-कॉमर्स, अप्लायनसेस, फूड, FMCG, फार्मा इंडस्ट्री, रिटेल मार्केट, वस्त्र उद्योग आणि इतर कितीतरी ब्रँण्डसाठी अप्रतिम पॅकेजिंग बॉक्स तयार करणार्या या कंपनीने अल्पावधीत यशस्वी भरारी घेतली आहे. विविध
उद्योजकांसाठी कॉरुगेटेड पॅकेजिंग सोल्यूशन्स उपलब्ध करून देत आहे. नाविन्यपूर्ण आकर्षक पॅकेजिंगची ही रेंज, कस्टमाइज्ड असून यामध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार किफायतशीर दरात कॉरुगेटेड बॉक्समध्ये प्रिंटेड पॅकेजिंग उपलब्ध करून देण्यात येते.
DBS कंपनीचे पॅकेजिंग क्षेत्रात अगदी अल्पावधीत फार मोठी भरारी घेतलेली दिसते. अनेक नामवंत ब्रॅण्ड आज तुमचे ग्राहक आहेत. भांडवल, स्वतःची जागा, यंत्रसामग्री ही जुळवाजुळव करून उत्पादनाबरोबरच उत्तम मार्केटींग व्यवस्थापन यामुळे यशस्वी उद्योजक अशी तुमची ओळख निर्माण झाली आहे. यशाचा हा संपूर्ण प्रवास नेमका कसा सुरू झाला आणि व्यवसायासाठी पॅकेजिंग हेच क्षेत्र कसे निवडले?
आमच्या घरात इन्व्हेस्टमेंट कन्सल्टींगचा छोटासा व्यवसाय पहिल्यापासूनच होता. एलआयसीची एजन्सी, पोस्टाचे सेव्हिंग्ज, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अशा कामांत आईवडिलांना मी मदत करीत होतो. मनमाड हे आमचं गाव पण कन्सल्टींगच्या या व्यवसायाच्या प्रगतीसाठी मी नाशिकला स्थलांतर केले. पुढे याच व्यवसायात पुण्यात जास्त स्कोप आहे, हे लक्षात आल्यावर मी पुण्यात पण काम सुरू केलं. पण ही छोटीमोठी कामं करता करता मी स्वतःच्या हिंमतीवर काहीतरी मोठा स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा, असे माझ्या आईवडिलांचे स्वप्नं होते. त्यादृष्टीने माझे काही प्रयत्नही सुरू होते. अशातच एकदा मित्रांबरोबर दिल्लीच्या एका मोठ्या व्यावसायिक प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला. तिथे एका स्टॉलवर कॉरुगेटेड बॉक्स बनवण्याची यंत्रसामग्री यांबाबतची माहिती होती. त्यात एक जुना प्रोजेक्ट रिपोर्ट होता. अधिक माहितीसाठी तो विक्रीला उपलब्ध होता. मी तो लगेच विकत घेतला. ती माहिती मला खूपच आवडली आणि हाच व्यवसाय सुरू करावा असं ठरवूनच टाकलं! लगेच तसं बिझनेस प्रपोजल तयार करून सबमिट केले. त्यानंतर भांडवलाची जमवाजमव, जागेचा शोध, कामगारांची निवड अशी सगळी जुळवाजुळव झाली.
व्यवसायाला सुरूवात नेमकी कधी झाली?
2011 साली एका छोट्याशा भाड्याच्या जागेत सुरूवात केली. पहिल्यांदा 10 कामगार, 1-2 मदतनीस, काही लाख भांडवल आणि अखंड मेहनत, असं सतत काम करीत राहिलो. हळूहळू यश मिळत गेले. आता सध्या पुण्याजवळ सणसवाडीला आमचे स्वत:चे युनिट कार्यरत आहे. 2022 पासून आमचे हे मोठे युनिट सुरू झाले. यात सध्या 140 कामगारांसह ऑफीस मदतनीस, मार्केटींग सिस्टीम, माल पोहोचवण्याची वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध काम करते. 28 कोटींच्यावर आमची उलाढाल आहे.
‘ग्राहककेंद्री सेवा’ हे मी माझं बिझनेस प्रिन्सीपलच ठरवलं आहे. त्याचा मला खूप फायदा झाला. ग्राहकाला जे हवं..ते द्यावं, या तत्त्वाने व्यवहार केल्यामुळे कोरोनाच्या कठीण काळातही आमची कंपनी टिकून राहिली. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सेवा ग्राहकाला देणे याला दुसरा पर्याय असूच शकत नाही. तशी समाधानकारक सेवा उपलब्ध करून दिल्यामुळेच मोठे नामवंत ब्रॅण्डस आज आमचे ग्राहक आहेत. असा हा यशाचा प्रवास झपाटून टाकणारा आहे.
संपर्क :DBS Packging Pvt. Ltd.
संस्थापक, संचालक - निर्मल सदगिर
संपर्क क्रमांक - 982293932
nirmal@dbspackaging.com /
https://dbspackaging.com/
ग्राहकाच्या पसंतीला उतरेल अशी उत्कृष्ट उत्पादने निर्मिती करताना उत्पादनाचा दर्जा राखण्यासाठी तुम्ही काही खास प्रशिक्षण घेतले होते का?
खास औपचारिक असे प्रशिक्षण घेतले नाही; पण कामानिमित्त पॅकेजिंग प्रॉडक्टसच्या विविध फॅक्टरींना भेटी दिल्या. कामाची पद्धत, आवश्यक मशिनरी, ग्राहकांच्या अपेक्षा, त्यानुसार पुरवठा या गोष्टी प्रत्यक्ष प्रॅक्टीकली जाणून घेतल्या. यातले बारकावे समजून घेतले आणि थेट कामाला लागलो. नशिबाने सोबत काम करणारी सगळी टीम उत्तम मिळाली. माझ्यासोबत उत्साही आणि ऊर्जावान अशा तरुणांची टीम आहे. त्यांना कामात पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांच्या कल्पकतेला वाव दिला जातो. कुणाच्या काही उपयुक्त सूचना असतील तर त्या स्वीकारल्या जातात. म्हणूनच प्रत्यक्ष कार्यानुभवातून एक चांगलं काम करणारी टीम उभी राहू शकली. आणि त्याचे चांगले परिणामही मिळत गेले.
मजबूत पॅकेजिंग बरोबरच आकर्षक वेष्टणाला सध्याच्या काळात जास्त महत्व आहे. तुम्ही ही दोन्ही वैशिष्ट्ये कशी जपता? नाजूक सौंदर्य प्रसाधनापासून तर जड ऑटोमोबाईलपर्यंत विविध उत्पादनासाठी ग्राहकांच्या मागणीनुसार सेवा उपलब्ध करून देताना वैविध्य राखण्यासाठी काय विशेष मेहनत घ्यावी लागते?
मजबूती आणि सुंदरता जपण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. आमचा खास भर असतो, तो ग्राहकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर. ज्या उत्पादनाचे पॅकेजिंग करायचे आहे ते उत्पादन, त्याचं मटेरिअल, आकारमान, वजन, ते जिथे पोहोचवायचे आहे ते अंतर या सगळ्या गोष्टींवरून पुढचे डिझाईन ठरते. त्यानुसार कुठल्या प्रकारच्या पेपरचा वापर, त्यावरचं प्रिटींग, रंगरूप इ. गोष्टी नक्की होतात.
नाजूक वस्तूच्या पॅकींगसाठी छोटे बॉक्सेस आणि जड वस्तूंचे मोठे बॉक्सेस यासाठी दोन स्वतंत्र डिव्हिजन आहेत. स्मॉल प्रॉडक्ट युनिटमध्ये सर्व महिला कामगार काम करतात. मोठ्या युनिटचे हेवी वर्क कुशल कामगारांकडून करून घेण्यात येते. हे सर्व नियोजन आधीच नीट प्लॅन केलेले असल्याने आकर्षक, सुंदर आणि मजबूत असे पॅकेजिंग आम्ही सहज करून देऊ शकतो.
पॅकेजिंगसाठी वापरावे लागणारे मटेरिअल तुम्ही आवर्जून पर्यावरणपूरक असावे, याची काळजी घेता. याशिवायही ग्रीन इंडियाशी निगडीत काही पैलू आपल्या व्यवसायाला जोडले आहेत. यामागे नेमका हेतू काय, याचे कोणते फायदे आहेत?
याचे खूपच फायदे आहेत. कॉरुगेटेड बॉक्स हे मुळातच पर्यावरणपूरक उत्पादन आहे. त्यासाठी ना झाडं कापावी लागतात, ना पाण्याचा वापर करावा लागतो, ना पर्यावरणाला हानी पोहोचवायची कुठलीच गरज पडते. कारण हे मटेरिअल रिसायकलींग प्रक्रियेतून येते. त्याची बॅकस्टोरी अशी आहे की, अमेरिकासारख्या देशातील क्राफ्ट पेपर, वापरलेले बॉक्स फार मोठ्या प्रमाणात पूर्ण आशियात रद्दी स्वरूपात विक्रीला येतात. त्यावर रिसायकलिंग प्रक्रिया करून क्राफ्ट पेपर बनवला जातो. विशेष म्हणजे यातून फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण आशियाची कॉरुगेटेड बॉक्सची इंडस्ट्री सध्या चालली आहे. अशा तर्हेने जो पाश्चात्य श्रीमंत देशांसाठी टाकाऊ पदार्थ आहे, तो आपण उपयोगात आणतो. टाकाऊतून टिकाऊ या भारतीय काटकसरी जीवनपद्धतीचाच हा एक भाग आहे. आपण आपल्या साधनसंपत्तीचा वापर जपून करायला हवा.
याशिवाय आमच्या पॅकेजिंग कंपनीतून कोणत्याही प्रकारचे हानीकारक द्रव्ये बाहेर टाकण्याचा प्रश्नच येत नाही. कारण कुठेही रसायनांचा वापर करावा लागत नाही. त्यामुळे नदीत टाकाऊ पदार्थ सोडून नदी प्रदूषित करणे असे प्रकार होण्याचाही प्रश्न नाही. म्हणून आमची कंपनी ग्रीन इंडिया मूव्हमेंटला मदत करणारी आहे.
कुठल्याही व्यवसायात स्पर्धा ही असतेच. या व्यवसायात किती स्पर्धा आहे? स्पर्धेत टिकून राहण्याचे हे आव्हान कसे पेलता?
या व्यवसायातही प्रचंड स्पर्धा आहेच. एकट्या पुणे शहरात पॅकेजिंगच्या 300 ते 400 पर्यंत कंपन्या आहेत. पण स्पर्धेला तोंड देण्यातच खरी मजा आहे. कारण स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपण आपोआप खूप मेहनत घेतो. कल्पकतेचा आणि नाविन्याचा वापर करतो. इतरांपेक्षा वेगळे काही देण्याचा प्रयत्न करताना हातून चांगल्या गोष्टी घडतात. ग्राहकहिताची जास्त काळजी घेतली जाते. स्पर्धेकडे संधी म्हणून पाहिले की स्पर्धेचे भय वाटत नाही उलट पुढे जाता येते.
विश्वासार्हता हा कुठल्याही व्यवसायाचा पाया असतो. ग्राहकांच्या मनात विश्वासाचे हे नाते कसे निर्माण केले?
आपण म्हणताय ते अगदी खरंय! कितीही उत्तम दर्जेदार उत्पादनाचे दावे केले तरी खरा व्यापार हा विश्वासावरच चालतो. हा विश्वास संवादातून वाढतो. कुठलीही ऑर्डर घेताना आधी आम्ही ग्राहकाशी संवाद साधतो. त्यांची गरज आणि इच्छा लक्षात घेऊन त्यांच्या मनासारखे काम करून देतो.
सचोटीने व्यवसाय करणारा प्रत्येक व्यावसायिक आपल्या ग्राहकाच्या मनात विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी धडपडत असतो. आम्हाला मात्र यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागले नाहीत. कारण माझ्या वडिलांची शिकवण अशी आहे की, व्यवसायात नम्रता व प्रामाणिकपणा जपणे, हे यशाचे खरे गमक आहे. जीवन निर्वाहासाठी आपण व्यवसाय करतो, त्यात चुकूनही ग्राहकाची फसवणूक होता कामा नये. उलट आपण जास्तीत जास्त प्रामाणिकपणे उत्तम सेवा दिली तर व्यवसायाची भरभराटच होते. आमच्या कन्सल्टींगच्या व्यवसायात वडिलांनी हेच तत्त्व तंतोतंत पाळलेले मी बघितले आहे. त्यामुळे मीही तेच माझ्या व्यवसायाचे नैतिक आधिष्ठान कायम ठेवले. उत्तमातली उत्तम सेवा ग्राहकांना पुरवताना मला आंतरिक समाधान मिळते. त्याचा परिणाम म्हणून असेल, माझ्या कंपनीच्या पहिल्या ऑर्डरपासूनच ग्राहकांच्या रिपीट ऑर्डर सुरू झाल्या. कारण अशा तर्हेने सुरुवातीलाच ग्राहकांशी आमचे विश्वासाचे नाते तयार झाले.
कुठल्याही व्यावसायिकाला यशस्वी झाल्यावर बिझनेस एक्सपान्शनचे वेध लागतात. आपले व्यवसायविस्ताराचे काय नियोजन?
निश्चितच एक्सपान्शन करणार आहोत. ग्रीन मूव्हमेंटशी निगडीतच ते असेल. पुष्कळ लोक एक व्यवसाय यशस्वी झाला की दुसर्या एखाद्या वेगळ्या सेक्टरमध्ये नशीब आजमावतात. पण आम्ही मात्र पॅकेजिंग याच व्यवसायात आत्याधुनिक आणि मोठे युनिट सुरू करणार आहोत. कारण सध्या याच व्यवसायात खूप मागणी वाढते आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्याचा विडा आम्हीच उचलू. आधुनिक मोठ्या मशिन्सचे बजेट मोठे आहे पण त्याचे रिझल्टही ट्रीमेंडस आहेत. त्यामुळे अगदी अल्पावधीत आम्ही ग्राहकांची कितीही मोठी ऑर्डर पूर्ण करून देऊ शकू.
तुमची जिद्द खरोखर सलाम करावा, अशीच आहे. आज बिझनेस मॅनजमेंटचं तंत्र खूप आधुनिक झालंय. व्यवसायाचा एवढा मोठा व्याप सांभाळताना तुम्ही चोख व्यवस्थापन कसे करता आणि... जाता जाता... तरूण व्यावसायिकांना तुमच्या यशाचं गमक काय सांगाल?
यशाचं गमक सांगण्याइतका यशस्वी मी अजून आहे की नाही, हे मला माहीत नाही. पण मी आमच्या कंपनी व्यवस्थापनाबद्दल थोडक्यात सांगतो की, व्यवसाय छोटा असो की मोठा, त्याचं स्ट्रक्चर एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसारखं ठेवायला हवं! म्हणजे कुशल मनुष्यबळ, टीम स्पीरीट, हसतखेळतं कुठल्याही दबावाशिवाय मोकळ्या वातावरणात कामकाज, कामगारांचे हितांचे आणि आरोग्याचे रक्षण, हेल्दी वर्कींग कल्चर, टीमला क्षमतेनुसार जबाबदारींचे वाटप, कामाचे तास आणि रिझल्ट यांचा योग्य मेळ हे सर्व आम्ही आमच्या कंपनीत कार्यान्वित केलेलं आहे. प्रामाणिक सहकारी टीमची मला साथ आहे. गुंतवणुकीचे नियोजन पक्के करून कंपनीची बिझनेस ग्रोथ गेल्या पाच वर्षापासून 40 टक्के याप्रमाणे दर वर्षी होत गेली आहे. यातले आमचे नियोजन आजवर कधी चुकले नाही. कंपनी लॉ नुसार सर्व नियमांचे पालन आणि चोख बॅलन्सशीट याची मी काळजी घेतो.
एकूणच सर्व क्षेत्रांसाठी सर्वोत्तम आणि नाविन्यपूर्ण पॅकेजिंग बॉक्सचा सर्वात विश्वासार्ह पुरवठादार ही आमची ओळख आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आमचे उद्दिष्ट पक्के असून या मिशनमध्ये ग्राहक समाधान आणि हरित चळवळीला योगदान देण्याचा हेतू स्पष्ट आहे. उच्च गुणवत्तेच्या कॉरुगेटेड पॅकेजिंगचे उत्पादन आणि सेवा पुरवण्याचे एक उत्तम ठिकाण म्हणून ग्राहक आमचीच निवड करतील, याची मला खात्री आहे. आम्ही वेळेत ऑर्डर पूर्ण करण्यास वचनबद्ध आहोत. त्यासाठी गुणवत्ता आणि प्रक्रिया-केंद्रित कार्यप्रणाली ही मुख्य उद्दिष्ट ठेवून आम्ही आमचे ध्येय नक्की साध्य करतो.
तरूणांना मी विवेकानंदाचं एक वाक्य सांगू इच्छितो, युवका झेप घे...दिशा तुला शरण येतील.
तुमच्या यशाचा हा चढता आलेख पाहून तुमच्या आईवडिलांना धन्य वाटत असेल. तुम्ही त्यांचे स्वप्नं पूर्ण केले आहे. आपल्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा!
मुलाखतकार- अमृता खाकुर्डीकर