@आनंद हर्डीकर
श्रीमद्भगवद्गीतेची एक शुद्ध आणि निर्दोष प्रत छापण्याच्या ध्यासापोटी 1923 साली सुरू झालेल्या आणि गेल्या शंभरांहून अधिक वर्षांच्या वाटचालीत केवळ गीतेच्याच नव्हेत, तर इतरही हिंदू धर्मग्रंथांच्या तब्बल 92 कोटी प्रती विकण्याचा विक्रम नोंदवणार्या ‘गीता प्रेस, गोरखपूर’ची यशोगाथा सर्व हिंदुत्वप्रेमी वाचकांनी मुळातूनच वाचायला आणि तपशीलवार समजून घ्यायला हवी आहे.

कलकत्त्यासारख्या महानगरात आपापले उद्योगधंदे सांभाळून, संध्याकाळी दुकाने बंद झाल्यावर चकाट्या पिटत वेळ वाया घालवण्याऐवजी सत्संगासाठी एकत्र येणारी राजस्थानी धनिक मंडळी जयदयालजी गोयंका नाम एका सत्त्वशील माणसाची गीता प्रवचने ऐकत असत. त्या प्रवचनांचा प्रभाव आणि जयदयालजींबद्दलची श्रद्धा यामुळे त्या सर्वांना ‘श्रीमद्भगवद्गीता’ आपल्याजवळ, आपल्या घरांमध्ये ठेवण्यासाठी हवीशी वाटू लागली. त्या सर्व मित्रांची मागणी पूर्ण करता यावी म्हणून जयदयालजींनी कलकत्त्यामधील एका प्रसिद्ध मुद्रणालयाकडे गीतेच्या प्रती छापून देण्याची जबाबदारी सोपवली; तथापि त्या मुद्रणालयाकडून छापल्या गेलेल्या प्रतींमध्ये असंख्य मुद्रणदोष तसेच राहून गेल्याचे जयदयालजींच्या लक्षात आले. त्यांनी त्या अशुद्ध प्रती वितरित करण्याचे नाकारले. ‘वणिक प्रेस’ला पुन्हा एकदा सर्वच्या सर्व दुरुस्त्या करून निर्दोष गीता छापायला सांगितले. दुर्दैवाने त्या मुद्रणालयाने दुसर्यांदा छापून तयार केलेल्या आवृत्तीमध्येही जयदयालजींना असंख्य चुका आढळल्या. कधीही कुणावर न रागावणारे जयदयालजी त्यानंतर मात्र चांगलेच संतापले. त्यांनी ‘वणिक प्रेस’च्या मालकांना बोलावून घेतले आणि त्यांची कानउघाडणी केली.
“श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रतींची छपाई म्हणजे एखाद्या सामान्य पुस्तकाची छपाई नाही, ती भगवंताच्या मुखातून प्रकटलेल्या ईश्वरी वाणीची छपाई आहे. ती पूर्णतः निर्दोषच असायला हवी. तुम्हाला दोनदा संधी देऊनही तुम्ही ही जबाबदारी नीट पार पाडू शकला नाहीत. तुमच्याकडे सोपवलेल्या कामात अक्षम्य दुर्लक्ष करून तुम्ही मोठी चूकच नव्हे, तर पाप केले आहे,” असे सात्त्विक संतापाने जयदयालजी गोयंका ‘वणिक प्रेस’च्या त्या मालकांना म्हणाले. गीताछपाईची दोनदा संधी मिळूनही जयदयालजींना हवी होती, तशी अगदी निर्दोष छपाई करता न आल्यामुळे ते मालक काहीसे खजील तर झाले होतेच; पण त्या तशा प्रसंगातही मुद्रणदोष राहिल्याबद्दल त्यांनी वेगवेगळ्या सबबीसुद्धा सांगितल्या. श्रीमद्भगवद्गीतेची पूर्णतः निर्दोष प्रत छापणे अत्यंत कठीण, किंबहुना अशक्यच असल्याच्या थाटात ते महाशय जयदयालजींना म्हणाले, “तुम्हाला हवी आहे, तशी अगदी निर्दोष आणि शुद्ध गीता जर छापायचीच असेल, तर मग तुम्ही स्वतःचाच छापखाना सुरू करणे योग्य ठरेल!”
‘वणिक प्रेस’चे मालक असे बोलून गेले खरे; पण त्यांच्या त्या आव्हानात्मक बोलण्यामुळे जयदयालजींचे विचारचक्र सुरू झाले. मग त्या अकल्पित आव्हानाशी दोन हात करण्याची इच्छा त्यांनी लगेच संध्याकाळी त्यांचे प्रवचन ऐकायला ईडन गार्डनजवळच्या किल्ल्यामागील मैदानात जमलेल्या सत्संगी व्यापार्यांसमोर व्यक्तही केली. आश्चर्य म्हणजे त्या सर्वांनी ती इच्छा शिरोधार्य मानून खरोखरच एक मुद्रणालय सुरू करण्यास अनुकूलता दर्शवली आणि घनश्यामदासजी जालान यांच्यासारख्या एका धर्मपरायण सेवाभावी सहकार्याने गीतेची निर्दोष छपाई करू शकेल, असे मुद्रणालय सुरू करण्याची जबाबदारी स्वीकारलीसुद्धा. सारे काही ईश्वरी संकेतानुसार घडले!
श्रीमद्भगवद्गीतेची एक शुद्ध आणि निर्दोष प्रत छापण्याच्या ध्यासापोटी 1923 साली सुरू झालेल्या आणि गेल्या शंभरांहून अधिक वर्षांच्या वाटचालीत केवळ गीतेच्याच नव्हेत, तर इतरही हिंदू धर्मग्रंथांच्या तब्बल 92 कोटी प्रती विकण्याचा विक्रम नोंदवणार्या ‘गीता प्रेस, गोरखपूर’ची यशोगाथा सर्व हिंदुत्वप्रेमी वाचकांनी मुळातूनच वाचायला आणि तपशीलवार समजून घ्यायला हवी आहे. शताब्दी साजरी केलेल्या या आगळ्या प्रकाशन संस्थेच्या यशस्वी वाटचालीने विद्याधरजींनी अंतरीच्या आत्मीयतेने केलेले विवेचन अनेक बारकावे नोंदवणारे आहे. गीता प्रेसच्या सांस्कृतिक कार्याचे विविध पैलू थोडक्यात, पण उत्कंठावर्धक शैलीत स्पष्ट करणारे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदुत्ववादी साहित्यात मोलाची भर घालणारे आहे!
आज भारतातल्या बहुसंख्य घरांमध्ये ‘गीता’ आणि ‘रामचरितमानस’सारखेच अन्य हिंदू धर्मग्रंथ सन्मानपूर्वक विराजमान झालेले दिसतात, याचे श्रेय प्रामुख्याने ज्या दर्जेदार प्रकाशन संस्थेला दिले पाहिजे, तिची यशोगाथा प्रकाशझोतात आणून लेखकांनी आणि प्रकाशकांनीही एक प्रकारे त्या संस्थचे ऋण फेडण्याचाच मनोभावे प्रयत्न केलेला आहे. विद्याधर ताठे यांनी पुस्तकाची रचना आठ सुटसुटीत प्रकरणांमध्ये केली असून दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरील परिशिष्टांची जोडही दिली आहे. पुस्तकाच्या अखेरीस त्यांनी संदर्भ ग्रंथांची व अन्य आधुनिक माध्यमांतील आधारसाहित्याची दिलेली सूची पाहिली म्हणजे त्यांनी घेतलेल्या अफाट परिश्रमाची कल्पना येते. त्यांना दाद द्यावीशी वाटते.
‘गीतेच्या महाद्वारी’ या पहिल्या प्रकरणात त्यांनी भारतीय वैदिक वाङ्मयाच्या विशाल सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आत्मविलोपी वृत्तीने गीताप्रचाराच्या कार्याला वाहून घेतलेल्या या संस्थेचे कार्य हिंदुत्वाच्या नवजागरणाला कसे पूरक आणि पोषक ठरले याचे थोडक्यात वर्णन केले आहे आणि 2023 साली संस्थेला जाहीर झालेला गांधी शांती पुरस्कार अत्यंत उचित असूनही काही विघ्नसंतोषी मंडळींनी कसा विवादग्रस्त बनवला, हेही सांगितले आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे दिला जाणारा हा पुरस्कार संस्थेने केवळ तत्त्वतः स्वीकारला, सन्मानचिन्ह तेवढे स्वीकारले; पण तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम मात्र नाकारली, हा वैशिष्ट्यपूर्ण तपशील आवर्जून नोंदवला आहे.
दुसर्या प्रकरणात लेखकांनी ‘गीता प्रेस गोरखपूरची जन्मकथा’ तर सांगितली आहेच; पण तेवढ्यावरच न थांबता गोरखपूरच्या सांस्कृतिक-आध्यात्मिक स्थानमाहात्म्यापासून गीता प्रेसच्या मातृसंस्थेसह परिवारसंस्थांमार्फत विस्तारलेल्या कार्यापर्यंत अनेक बाबतींतली माहिती संकलित स्वरूपात वाचकांसमोर ठेवली आहे. गीता प्रेसचे कार्य हे जेवढे श्रद्धायुक्त भक्तिप्रचाराचे आहे, तितकेच ते ज्ञानाधिष्ठित प्रबोधनाचेदेखील आहे, हे अनेक उदाहरणांद्वारे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तिसर्या प्रकरणात ‘कल्याण’ या हिंदी मासिकाची, तर चौथ्या प्रकरणात ‘कल्याण कल्पतरू’ या इंग्रजी मासिकाची जन्मकथा सांगण्यात आली आहे. घनश्यामदास बिर्ला हे प्रसिद्ध उद्योगपती ‘कल्याण’ मासिकाच्या जन्माला कसे कारणीभूत ठरले, अखिल भारतीय मारवाडी अग्रवाल महासभेच्या एका वार्षिक अधिवेशनातील विचारमंथनातून निघालेल्या कल्पनेवर रेल्वेप्रवासात चर्चा कशी रंगली आणि नियोजित संपादक हनुमानप्रसाद पोद्दार यांनी मंत्रभारल्या मानसिक अवस्थेत उच्चारलेला ‘कल्याण’ हा शब्दच पुढे मासिकाचे नामकरण होताना निर्णायक कसा ठरला, याबद्दलची माहिती मोठी रंजक आहे, त्याचप्रमाणे मुंबईहून निघू लागलेल्या मासिकाचे गोरखपूरला स्थलांतर का करावे लागले, अंकाचे स्वरूप आशयसंपन्न व नेत्रसुखद ठरावे म्हणून कोणकोणते प्रयत्न केले गेले, कोणकोणत्या नामांकित लेखकांचे साहित्य ‘कल्याण’मधून आवर्जून प्रसिद्ध होत आले, वार्षिक विशेषांकांची लक्षणीय परंपरा कशी निर्माण झाली, याबद्दलची माहिती या क्षेत्राशी संबंधित असणार्या सर्वांसाठी विशेषत्वाने उद्बोधक आहे. चौथ्या लहानशा प्रकरणात ‘कल्याण कल्पतरू’ या इंग्रजी मासिकाच्या निमित्ताने हनुमानप्रसाद पोद्दार यांचे ख्रिस्ती व इस्लामी धर्मप्रचारकांशीही कसे मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित झाले होते, याबद्दलचा तपशील मिळतो. संचालकांच्या सहिष्णुतेची त्यातून साक्ष पटते. ते इंग्रजी मासिक कागदटंचाईमुळे व ब्रिटिश सरकारच्या धोरणांमुळे 1945 साली स्थगित ठेवावे लागले होते, वर्षभराने ते पूर्ववत सुरू झाले, एवढीच माहिती लेखकांनी दिली आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील त्या मासिकाच्या स्थितीबद्दल मात्र काहीच समजत नाही. प्रकरण काहीसे अधांतरीच राहिलेले वाटते.
पुढील तीन प्रकरणे म्हणजे तीन कर्तबगार व्यक्तींची छोटेखानी चरित्रेच आहेत. ज्या जयदयालजी गोयंका (शेठजी) यांच्या विशुद्ध गीताछपाईच्या पराकोटीच्या आग्रहातून गीता प्रेस, गोरखपूर या संस्थेचा जन्म झाला, त्यांच्या ग्रंथसंपदेचा, त्यातील विविधतेचा, त्यांच्या आध्यात्मिक साधनेच्या दूरवर पसरलेल्या प्रभावाचा अत्यंत प्रत्ययकारी भाषेत विद्याधरजींनी करून दिलेला परिचय पाचव्या प्रकरणात आहे. जयदयालजींनी रचलेली 40 शेरांमधली ‘गझलगीता’ संपूर्णपणे उद्धृत करून तर त्यांच्या कर्तृत्वाचा एक वेगळाच पैलू वाचकांसमोर त्यांनी मांडला आहे आणि ‘हंस अकेला उड जायेगा’ या उपशीर्षकाखाली त्यांनी महापुरुषाच्या महानिर्वाणाचे रेखाटलेले शब्दचित्र म्हणजे तर संपूर्ण पुस्तकाचा गाभाच आहे, असे म्हटल्यास मुळीच वावगे ठरणार नाही.
पुस्तकाचे नाव : यशोगाथा-गीता प्रेस गोरखपूरची
लेखक : विद्याधर ताठे
प्रकाशक : परम मित्र पब्लिकेशन्स
पृष्ठे : 240
मूल्य : रु. 400
सहाव्या प्रकरणात गीता प्रेसच्या संचालनाची जबाबदारी ज्यांनी वर्षानुवर्षे नुसती सांभाळलीच नाही, तर यशस्वीपणे पार पाडली त्या ‘सेवामूर्ती’ घनश्यामदासजी जालान यांच्या जीवनाबद्दलची उपलब्ध माहिती संकलित स्वरूपात आपल्याला वाचायला मिळते. गीता प्रेस या प्रकाशन संस्थेचे जमिनीचे व्यवहार किंवा वाढत्या क्षमतेच्या व गुणवत्तेच्या मुद्रणयंत्रांच्या खरेदीचे व्यवहार घनश्यामदासजींनी कसे कौशल्याने हाताळले, तेही समजते आणि जयदयालजी गोयंका व हनुमानप्रसाद पोद्दार या अन्य दोघा महानुभावांशी त्यांचे किती जिव्हाळ्याचे संबंध होते, तेही लक्षात यते.
सातवे प्रकरण म्हणजे ‘कल्याण’ मासिकाचे आद्य संपादक आणि थोर तत्त्वचिंतक हनुमानप्रसाद पोद्दार ऊर्फ भाईजी यांची कर्तृत्वगाथा आहे. त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबरोबरच राजकीय, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रांतील प्रभावी कार्याचाही परिचय विद्याधर ताठे यांनी करून दिला आहे. बिपिनचंद्र पाल यांच्या क्रांतिकारक संघटनेशी हनुमानप्रसादांचा असणारा अप्रत्यक्ष संबंध, कलकत्त्यातील सांप्रदायिक दंगलींच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश पोलिसांनी त्यांना केलेली अटक व नंतर ठोठावलेली नजरकैदेची शिक्षा, त्या काळातील त्यांची नामसाधना व ग्रंथनिर्मिती, अल्पावधीत होमिओपॅथीसारख्या परक्या उपचार पद्धतीचा अभ्यास करून त्याद्वारे रुग्णसेवा करण्याचा पार पाडलेला उपक्रम वगैरे वगैरे भाईजींबद्दलच्या अल्पज्ञान बाबींचाही लेखकांनी आपल्या विवेचनात समावेश केला आहे, त्यामुळे या प्रकरणाची वाचनीयता वाढली आहे आणि भाईजींच्या संपादनाची वैशिष्ट्ये, त्यांची मोठी ग्रंथसंपदा याबद्दलच्या विवेचनामुळे प्रकरणाचे संदर्भमूल्यही कमालीचे वाढले आहे.
आठव्या समारोपाच्या प्रकरणात विद्याधरजींनी संस्थेच्या कार्याची थोरवी स्पष्ट करता करता आक्षेपकांचे मुद्दे खोडून काढण्याचेही काम चोखपणे बजावले आहे. एवढेच नव्हे, तर ‘गीता प्रेस बदनामीचे षड्यंत्र’ असे स्वतंत्र परिशिष्ट लिहून अक्षय मुकुल नामक पत्रकाराने ‘गीता प्रेस अॅण्ड द मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ या शीर्षकाच्या इंग्रजी पुस्तकात जे पूर्वग्रहदूषित व निराधार आक्षेप नोंदवले आहेत त्यांचा यथोचित परखड शब्दांत प्रतिवादही केला आहे.
अशा या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकाला रा. स्व. संघाचे माजी सरकार्यवाह मा. सुरेश तथा भय्याजी जोशी यांची छोटीशीच, पण समर्पक प्रस्तावना लाभली आहे. त्यांनी लेखकांचे आणि प्रकाशकांचे केलेले अभिनंदन सर्वार्थाने रास्त असल्याचा अनुभव संपूर्ण पुस्तक वाचणार्यांनाही आल्याशिवाय राहत नाही, राहणार नाही, हे निश्चित!
अखेरीस या पुस्तकाबद्दल जाणवणारे दोन मुद्दे अत्यंत संक्षेपाने इथे फक्त नोंदवतो. या पुस्तकाच्या संहितेवर संपादकीय संस्कार झाले असते, तर ती अधिक गोळीबंद झाली असती व अधिक प्रभावी ठरली असती, असे जाणवल्याशिवाय राहात नाही. संस्थेच्या इतिहासातील काही घटनांची तिन्ही शिल्पकारांवरील प्रकरणांमध्ये झालेली पुनरुक्ती टाळता आली असती. व्यक्तींची नावे व घटनांचे सन यांच्या संदर्भातले ठळक मुद्रणदोष वेळीच सुधारता आले असते. हनुमानप्रसाद पोद्दार तथा भाईजी यांना ‘भारतरत्न’ देण्याचा प्रस्ताव भारत सरकारने गोविंद वल्लभ पंतांमार्फत त्यांच्याकडे पाठवला होता. डॉ. राजेंद्रप्रसादांपासून पं. जवाहरलाल नेहरूंपर्यंत सर्व वरिष्ठ नेत्यांची त्या प्रस्तावाला संमती असतानाही भाईजींनी विनम्रपणे तो बहुमान नाकारला होता... यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या बाबींचाही समावेश पुस्तकात होऊ शकला असता! असो. या काही त्रुटी जाणवल्या, तरीही त्यामुळे या पुस्तकाचे मोल मुळीच कमी होत नाही.