संघ काल, आज आणि उद्या

विवेक मराठी    28-Mar-2025
Total Views |
100 years of rashtriya swayamsevak sangh
 
@मनमोहन वैद्य
यंदाचे वर्ष हे संघशताब्दी वर्ष. संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत समाजातील सर्व घटकांना स्पर्श करण्याचे कार्य संघस्वयंसेवकांनी केले आहे. समाजात संघकार्याचे कौतुक होतानाच कुतूहल आणि संघाशी जोडण्याची इच्छा प्रबळ होत आहे. याचे श्रेय पू. डॉ. हेडगेवारांच्या आकलन आणि अमोघ कार्यपद्धतीस जाते. राजकीय सत्तेवर अवलंबून न राहता समाजाधारित रचना उभ्या करण्याच्या आग्रहामुळे समाजाचे हे परिवर्तन शाश्वत परिणामात परावर्तित होताना दिसत आहे.

rss
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या स्थापनेच्या शताब्दी वर्षात प्रवेश केलेला आहे. स्थापनेनंतरच्या वर्षांत संघाचा सतत होणारा विस्तार, त्याची क्रयशक्ती आणि वाढत्या प्रभावामुळे लोकांमध्ये संघकार्य जाणून व समजून घेण्याची उत्सुकता वाढत आहे. संघाला समजून घ्यायचे असेल तर आद्य सरसंघचालक पू. डॉ. हेडगेवार यांना समजून घेणे आवश्यक आहे. जन्मापासूनच डॉ. हेडगेवार प्रखर देशभक्त होते. इंग्रजांच्या गुलामीची त्यांना प्रचंड चीड यायची. मनात आक्रोश होता. त्यांच्या बाल्यावस्थेत अनेक रूपांतून तो प्रकटही होत होता. परंतु त्यांना असे वाटायचे की, फक्त स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणे म्हणजे निव्वळ रोगावर उपचार करण्यासारखे आहे. यासाठी प्रथम यावर विचार झाला पाहिजे की, इतक्या विशाल, समृद्ध आणि संपन्न भारतीय समाजाला गुलामी पत्करण्याची वेळ का यावी? यासाठी मूळ रोगावर उपचार व्हावा म्हणून समाजाला आत्मजागृती, स्वाभिमान, एकता, परस्परसौहार्द, अनुशासन आणि राष्ट्रीय चारित्र्यसंपन्नतेच्या मुलभूत उद्देशाने स्वातंत्र्यप्राप्तीच्या सर्व प्रयत्नांना सक्रीय करत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ऑक्टोबर 1925 मध्ये विजयादशमीच्या दिवशी स्थापना केली.
 
संपूर्ण भारताची ओळख ज्यामुळे आहे, त्या अध्यात्मावर आधारीत एकात्म आणि सर्वांगीण जीवनदृष्टी, ज्यास जग हिंदुत्व किंवा हिंदू जीवन पद्धतीच्या माध्यमातून ओळखते, त्या हिंदुत्वास जागृत करून संपूर्ण समाजजीवनास एका सूत्रात बांधून निर्दोष आणि गुणवान हिंदू समाजाचे संघटन यासाठी संघकार्य सुरू झाले. अशा प्रकारे त्याकाळी सुद्धा डॉ. हेडगेवार यांची दृष्टी अद्वितीय, व्यापक, सर्वसमावेशक आणि दूरगामी होती. त्या कालखंडात भारतात अनेक आध्यात्मिक, सामाजिक संघटना कार्य करत होत्या आणि भारताला आकार देण्यात त्यांचे श्रेष्ठ योगदान आहे. त्याचप्रमाणे हिंदू समाजात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ नावाचे आणखी एक संघटन उभे राहाणे अस्वाभाविक नव्हते. परंतु पहिल्या दिवसापासून हे स्पष्ट होते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजांतर्गत एक संघटन किंवा परिसंस्था म्हणून नाही तर संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन बनून कार्य करेल. एका ज्येष्ठ चिंतकाने म्हटले आहे की, परिकल्पनेच्या दृष्टीने संघ आणि हिंदू समाज समव्याप्त आणि मनोवैज्ञानिक दृष्टीने संघ आणि हिंदू समाज एकात्म आहेत. यासाठीच डॉ. हेडगेवार यांनी वादविवादात न पडता संपूर्ण हिंदू समाजास एकत्र करण्याचा संकल्प केला. वर्तमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी त्यांच्या एका वक्तव्यात सांगितले होते की, भले त्यांनी आमचा विरोध करण्याचे ठरवले असो, आम्हाला विरोधी कोणीच नाही. त्यांच्या संघविरोधाने संघाचे नुकसान होऊ नये ही सावधानता बाळगून आम्ही त्यांना आत्मीयतेने भेटायला जाऊ. 
 
rss
 
व्यक्तिनिर्माण किंवा समाजसंघटनेचे हे कार्य सदासर्वदा परिस्थतीनुरूप ‘नित्य’कार्य म्हणून अविरत चालणार आहेच तसेच वेळोवेळी परिस्थतीनुसार समाजात उभ्या राहणार्‍या अन्य आवाहनांना तोंड देण्यासाठी ‘अनित्य’ कार्यातसुद्धा स्वयंसेवक आपली सक्रीय भूमिका निभावतील. हा वस्तुपाठ डॉ. हेडगेवार यांनी आपल्या आचरणातून शिकवला. संघस्थापनेअगोदर 1921मध्ये महात्मा गांधीजींच्या आवाहनाने झालेल्या असहयोग आंदोलनात डॉ. हेडगेवार सहभागी झाले होते. त्यांना यासाठी एक वर्ष तुरुंगवासही सहन करावा लागला. संघस्थापनेनंतर महात्मा गांधीजींच्या सविनय कायदेभंग आंदोलनांतर्गत 1930च्या सत्याग्रहात स्वयंसेवक म्हणून त्यांच्या इतर अनुयायांसोबत डॉ. हेडगेवार सहभागी झाले आणि त्यांना नऊ महिने कारावासही झाला.
 
 
याचसोबत संघाचे ‘नित्य’ कार्य अविरत चालू राहावे यासाठी त्यांनी सरसंघचालकाचे दायित्व आपले सहयोगी डॉ. लक्ष्मण वासुदेव परांजपे यांना सोपवले होते. हा ‘नित्यानित्यविवेक’ डॉ. हेडगेवार यांची विशेषता होती, जी महत्त्वपूर्ण तर होतीच परंतु संघकार्याच्या पुढील प्रवासास दिशादर्शक होती. 
 
 
समाजातून धन घेऊन समाजहिताचे कार्य करण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून चालू आहे, आजही ती परंपरा आहे. परंतु संघकार्य हे देशकार्य आहे, माझे कार्य आहे आणि समाजातून धन घेऊन नाही तर गुरुदक्षिणेच्या रूपाने प्राप्त समर्पित धनराशीतूनच चालू राहील, हा अनोखा विचार डॉ. हेडगेवारांनी मांडला, राबवला आणि आजही तो पुढे नेला जात आहे. श्रेष्ठ व्यक्तीस गुरू मानण्याची परंपरा भारतात अनेक शतके चालू आहे, आजही प्रचलित आहे. परंतु समाजाचे संघटन असूनही संघात कोणतीही व्यक्ती गुरुपदी नाही. हिंदू समाज जितका प्राचीन आहे, त्याचा गुरू आणि हिंदू समाज प्रतिनिधी या नात्याने तितकेच प्राचीन प्रतीक असू शकते, हा विचार करून भगवा ध्वज गुरू या नात्याने संघात स्थापित झाला. 1927 या संघस्थापना वर्षापासून गुरू या नात्याने हा ध्वज आहे. या भगव्या ध्वजावर कोणतेच चिन्ह अंकित नाही कारण संघ समाजांतर्गत एक संस्था किंवा संघटना नाही तर संपूर्ण समाजाचे संघटन आहे, ही मूळ संकल्पना आहे.
 
1927 या संघस्थापना वर्षापासून गुरू या नात्याने हा ध्वज आहे. या भगव्या ध्वजावर कोणतेच चिन्ह अंकित नाही कारण संघ समाजांतर्गत एक संस्था किंवा संघटना नाही तर संपूर्ण समाजाचे संघटन आहे, ही मूळ संकल्पना आहे. 
 
राष्ट्रीय चारित्र्य निर्माण आणि सामूहिक गुणांची साधना व्हावी तसेच आपल्या ध्येयाचे नित्य स्मरण व्हावे या हेतूने दैनंदिन शाखा नावाची कार्यपद्धती संघात विकसित झाली. दररोज एक तास चालणार्‍या या शाखांत हा भाव जागवला जातो की, भारताचा संपूर्ण समाज एक आहे, समान आहे आणि सगळे स्वकीय आहेत. यासोबतच उद्यम, साहस, धैर्य, शक्ती, बुद्धी आणि पराक्रम यांसारख्या गुणांचा विकास करण्यासाठी खेळ, इत्यादी उपक्रम संघात राबविले गेले. अनुशासन, एकता, वीरत्व आणि सामूहिकता निर्माण होण्यासाठी परेड, बँडच्या तालावर पथसंचलन आणि योग, व्यायाम यांसारखे कार्यक्रम शाखेत होऊ लागले आणि आजतागायत होत आहेत. वास्तवात शाखा ही सामूहिक गुणांची उपासना आणि व्यक्तीगत गुणांच्या सामूहिक अभ्यासाचा एक भाग आहे, साधन आहे. समाजास आपले मानून त्यासाठी काहीतरी योगदान देण्याचा अर्थात परतफेड करण्याचा संस्कार याच शाखेतून प्राप्त होतो. याच विचाराला व्रतस्वरूप देऊन आजन्म त्याचे पालन करण्याचा संकल्प घेऊन जगणार्‍या कार्यकर्त्याना पाहून, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन हजारो-लाखो कार्यकर्त्याद्वारे आनंदाने हा समर्पण यज्ञ अविरत चालू आहे.
 

vivek 
 
आज संपूर्ण भारतात एकूण 924 जिल्ह्यांपैकी 98.3% जिल्ह्यांमध्ये संघशाखा चालू आहेत. एकूण 6,618 खंडांपैकी 92.3% खंड (तालुका), एकूण 58,939 मंडलांपैकी (मंडल म्हणजे 10 ते 12 गावांचा एक समूह) 52.2% मंडलात, 51,710 स्थानांवर 83,129 दैनिक शाखा तसेच अन्य 21,936 स्थानांवर 22,866 साप्ताहिक मिलन केंद्रांच्या माध्यामातून संघ कार्याचा देशव्यापी विस्तार झाला आहे, जो दिवसेंदिवस अधिकाधिक व्याप्त स्वरूप घेत आहे. या 83,129 दैनिक शाखांपैकी 59% शाखा या छात्रशाखा तर उर्वरीत 41% व्यवसायी शाखांपैकी 11% शाखा प्रौढ (40 वर्षांवरील वयोगट) स्वयंसेवकांच्या आहेत.
 
 
खेळ इत्यादी माध्यमातून व्यक्तिनिर्माणाचे जे कार्य संघ शाखांद्वारे चालविले जाते, त्यात केवळ पुरुष आहेत. या कार्यहेतूने महिलांसाठी राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून शाखा घेतल्या जातात. स्वयंसेवकांद्वारे प्रचार विभाग, संपर्क विभाग तसेच सेवा विभागाच्या माध्यमातून जी समाजजागरणाची कार्ये चालू आहेत त्यातही महिलांचा सहभाग आहे. हा सहभाग अधिकाधिक वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच प्रकारे समाजपरिवर्तनाच्या कार्यात धर्मजागरण समन्वय, ग्रामविकास, कुटुंबप्रबोधन, सामाजिक समरसता, गौ-संवर्धन, पर्यावरणसंरक्षण, भटके आणि विमुक्त यांसाठी कार्य तसेच समाज सद्भावासाठी जिथे जिथे स्वयंसेवक सक्रीय आहेत त्यांच्या बरोबर मातृशक्ती आणि सज्जनशक्तीसुद्धा सक्रीय आहेत. त्यांचा सहभाग आणखीन वाढावा यासाठी संघ आग्रही आणि प्रयत्नशील आहे. एका राष्ट्रीय विचारास धरून समाजजीवनाच्या विविध क्षेत्र परिवर्तनासाठी कामगार, शेतकरी, विद्यार्थी, विद्यालये, धार्मिक संत, राजकारण, कलाकार, अधिवक्ता, लघुउद्योजक, वनवासी बंधू, खेळाडू इत्यादी 35 विविध क्षेत्रांच्या माध्यमातून स्वयंसेवक सामाजिक जीवनात सक्रीय आहेत. ही सर्व कार्ये ज्यात स्वयंसेवक सक्रीय आहेत ती स्वतंत्र आणि स्वायत्त आहेत. हीच संघाची संकल्पना आणि कार्यपद्धती आहे.
 
 संघाची 100 वर्षांची लक्षणीय वाटचाल सोपी नाही. प्रथम उपेक्षा नंतर उपहास यानंतर आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक स्तरावर सर्वप्रकारचा विरोध सहन करावा लागला.
 
संघाची 100 वर्षांची लक्षणीय वाटचाल सोपी नाही. प्रथम उपेक्षा नंतर उपहास यानंतर आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक स्तरावर सर्वप्रकारचा विरोध सहन करावा लागला. काही ठिकाणी तर संघर्षसुद्धा झाले. परंतु राष्ट्रनिर्माणाची ही यात्रा अविरत चालू राहिली. कार्यकर्त्यांचे परिश्रम, त्याग, बलिदान, समाजाचे सहकार्य तसेच ईश्वरी आशीर्वादाच्या बळावर संघविस्तार होत आहे. आज संघकार्यात समाजाचे समर्थन आणि सहकार्य वाढत आहे. वेळोवेळी समान मुद्द्यांच्या आधारावर समाज सहकार्य करत आहे. या कारणानेच संघाची शक्ती, प्रभाव यासोबत समाजाच्या मानसिकतेत बदल होताना दिसत आहे.
 
 
संघकार्यकर्त्यांचा विजयादशमी 2025पर्यंत संघकार्याची गती वाढवून त्याला व्यापक स्वरूप देण्यावर जोर राहणार आहे जेणेकरून अधिकाधिक लोक थेट संघाच्या संपर्कात येऊन संघाला समजून घेतील आणि संघाशी जोडले जातील. 2025च्या विजयादशमीनंतर स्वयंसेवक अधिकाधिक लोकांना त्यांच्या रुचीनुसार समाजपरिवर्तनाच्या पाच विशिष्ट क्षेत्रांत सहयोगी बनविण्यासाठी सक्रीय होतील. पंच परिवर्तनाचे पाच बिंदू आहेत-कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरणसंरक्षण आणि संवर्धन, स्वदेशी जीवनशैली आणि लोक कर्तव्य बोध.
 
 
संघाची ही यशस्वी यात्रा पाहून लोक आश्चर्यचकीत होतात, स्तब्ध होतात, कौतुक करतात. या सगळ्या यशस्वितेचे श्रेय संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांचे व्यक्तिमत्व, आकलन आणि अमोघ कार्यपद्धतीस जाते. राजकीय सत्तेवर अवलंबून न राहता समाजाधारित रचना उभ्या करण्याच्या आग्रहामुळे समाजाचे हे परिवर्तन शाश्वत परिणामात परावर्तित होताना दिसत आहे. जर संपूर्ण समाजास जागृत, संस्कारित, गुणवान आणि संघटित करायचे असेल तर केवळ शाखाविस्तार करून ते साध्य होणार नाही. यासाठी समाजाच्या स्वाभाविक व्यवस्था जसे परिवार, विद्यालय, महाविद्यालय तसेच जनसमाजाद्वारे असे संस्कार देण्याची व्यवस्था केली पाहिजे. जेव्हा सर्व ठिकाणी आणि सर्व स्तरांवर अशी अनुकरणीय उदाहरणे दिसतील तेव्हाच ते पाहून समाजातील सर्व लोक (युवावर्ग) या प्राचीन आणि विशिष्ट राष्ट्राच्या वास्तविक अवधारणेस समजून त्यानुरूप आचरण आणि व्यवहार करतील, तेव्हाच संपूर्ण समाजात परिवर्तनशील सकारात्मक शक्तीची निर्मिती होईल. तेव्हाच समृद्ध, सशक्त आणि सक्रीय भारत आपली सर्वसमावेशक, एकात्म आणि सर्वांगीण सांस्कृतिक ओळख बनवून एका दीपस्तंभासारखा मानवतेस मार्गदर्शक स्थितीत येईल आणि आपले वैश्विक दायित्व निभविण्यासाठी सक्षम आणि तत्पर असेल. संघशाखांच्या माध्यमातून आणि संघस्वयंसेवकांच्या आचरणातून जे राष्ट्रनिर्माणाचे कार्य प्रगतिपथावर आहे ते समाजाच्या स्वाभाविक व्यवस्थांच्या माध्यामातून सुरू होईल. विजयशाली संघटित समाजाची निर्मिती होईल, होत राहील आणि संपूर्ण समाजाचे कार्य म्हणून संघकार्य अविरत सुरू राहील.
 
 
अनुवाद - कौमुदी परांजपे