सध्याच्या वैचारिक कोलाहलात लेखाचे शीर्षक वाचून काही लोकांना प्रश्न पडू शकतात. श्रद्धास्थानांचा गौरव म्हणजे काय, तर हा गौरवाचा भाव प्रत्येकाच्या मनात असतोच आणि हे श्रद्धास्थाने माणसाला जीवनात सर्वच दृष्टीने त्याचे उन्नयन होण्यासाठी प्रेरणा देत असतात आणि त्याच्या मनात आत्मगौरवाचा भाव जागृत करीत असतात. प्रेरणादायक स्मृतिस्थाने देखील कमीअधिक प्रमाणात हेच कार्य करीत असतात, मात्र हे प्रमाण अधिक वाढण्यासाठी त्या स्मृतिस्थानांचे काळजीपूर्वक योग्य प्रकारे उचित संवर्धन करण्याची गरज असते. असे झाले तरच ती स्मृतिस्थाने समाजजीवनावर इष्ट परिणाम घडवतात. जी स्मृतिस्थाने दुःखद अथवा शोकात्म इतिहासाशी निगडित असतात त्यांच्याकडे तर अधिक दक्षतेने लक्ष पुरविणे आवश्यक असते, अन्यथा त्या स्मृतिस्थानांवर विकृत मानसिकता असलेल्या समाजविघातक तत्त्वांचा कब्जा निर्माण होऊन अनुचित गोष्टींचेही महिमामंडन होण्याची शक्यताच अधिक असते. ज्यांच्याकडे समाजाचे सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक नेतृत्व करण्याची जबाबदारी असते अशांनी या मुद्द्याकडे पुरेशा गांभीर्याने पाहण्याची गरज वर्तमान काळात अधोरेखित झालेली आहे.

मुघल शासक औरंगजेब याची कबर संरक्षित ठेवायची का उखडून टाकायची या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे आणि या धगीचे चटके नागपूर महानगराने भोगलेले आहेत. सध्या नागपुरातील वातावरण निवळलेले आहे, तरीसुद्धा हा विषय संपलेला नाही. कोणताही विषय जेव्हा तात्त्विक शेवटाकडे नेला जातो, तेव्हा तो संपला आहे असे नक्की सांगता येते. मात्र हा विषय केवळ एका औरंगजेबाच्या कबरीपुरता मर्यादित नाही. त्यामुळे याची योग्य ती दखल घेणे भाग आहे. आपला भारत देश जेव्हा गुलामगिरीतून स्वतंत्र झाला तेव्हा त्या गुलामगिरीचा बोध आणि बोच कायम ठेवणारी अनेक प्रतिके देशात होती. ही प्रतीके तशीच ठेवावी की मिटवून टाकावी, असा प्रश्न तेव्हा ऐरणीवर आला नाही. यामुळे त्याबाबत काही निश्चित धोरण सरकारी पातळीवर अंगीकारले गेले असल्याचे दिसत नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बर्याच वर्षांंनी श्रीरामजन्मभूमी मंदिराचा प्रश्न एका अर्थाने सुटला. या ठिकाणी जो बाबरी ढांचा उभा होता तो यापूर्वीच पाडला गेला होता व आज त्याच जागेवर मंदिर उभे आहे, ढांचा उभा राहण्यापूर्वीही तेथे मंदिरच होते ही वस्तुस्थिती आहे. मात्र कृष्णजन्मभूमीचा प्रश्न आणि काशीविश्वनाथमंदिराचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. त्यातच औरंगजेबाच्या कबरीचा वाद उफाळून वर आला आहे. यामध्ये कबर संरक्षित ठेवावी आणि कबर उखडावी अशा दोन्ही बाजूच्या मंडळींना आपापली भूमिका रास्त वाटत असली तरी या भूमिकेवर धोरणात्मक विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण हे लोण केवळ एका कबरीबरोबर संपणार नाही व ते पुढे वाढत जाण्याची शक्यता आहे.
धोरणात्मक भूमिका ही वस्तुस्थितीला धरून असते. या प्रकरणात धोरणात्मक भूमिका घेत असताना आपण प्रतिकांचा तीन प्रकारे विचार करू शकतो. आपली श्रद्धास्थाने, आपली स्मृतिस्थाने आणि आपली गौरवस्थाने हे ते तीन प्रकार ढोबळमानाने सांगता येतील. आपल्या श्रद्धास्थानांचा विचार करताना यामध्ये श्रीरामजन्मभूमी, श्रीकृष्णजन्मभूमी आणि काशीविश्वनाथ यांसारख्या ठिकाणांचा समावेश होतो. अशा ठिकाणी असलेली म्हणजे काळाच्या ओघात उभी राहिलेली अनावश्यक बांधकामे हटवून तेथे आपल्या श्रद्धास्थानांचा गौरव वाढविणारे प्रेरणादायक नूतन बांधकाम करणे हे अत्यावश्यक कार्यच समजले पाहिजे.
स्मृतिस्थानांचा विचार करताना मात्र सर्व स्मृती या सुखदच असतात असे होत नाही, तर इतिहासातील काही स्मृती दु:खद तर काही अगदी ठसठसणार्या वा भळभळणार्या जखमांप्रमाणे असू शकतात. या संदर्भात विचार करताना राजकवी भा. रा. तांबे यांची ती उत्कृष्ट कवितासुद्धा आठवते -
हे हिंदबांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी
ती पराक्रमाची ज्योत मावळे येथे झाशीवाली
या ठिकाणी आपण लक्षात घेतले पाहिजे की जेथे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी आपला देह ठेवला ती जागा सर्व भारतीयांसाठी अखंड चिरप्रेरणेचा झरा आहे. या ठिकाणी आपण जेव्हा झाशीच्या राणीला नमन करतो आणि आदरांजली अर्पण करतो तेव्हा अनेक पवित्र भावनांचा आपल्या मनात कल्लोळ उसळतो. आपल्या देशासाठी बलिदान करण्याची आणि आपल्या समाजासाठी तनमनधन समर्पित करण्याची भावना मनात जागृत होते. मात्र औरंगजेबाच्या कबरीबाबत असे काही म्हणता येत नाही. पण हा मुद्दा तापण्याचे कारण म्हणजे सध्याच्या काळात तेथे चालू असलेला प्रकार. आपल्या भारतदेशावर आक्रमण करणार्या तुर्कांचा एक वंशज म्हणजे औरंगजेब होय आणि त्या काळात संपूर्ण देश आणि येथील रयत सुलतानी अत्याचारांनी ग्रस्त असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना खरे रयतेचे राज्य असलेल्या स्वराज्याची निर्मिती करावी लागली, हे ऐतिहासिक सत्य आणि वास्तव असतानाही या जनतेच्या राज्याचा म्हणजेच स्वराज्याचा शत्रू असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी आपल्याला विसंगती दिसून येते.
काय आहे ही विसंगती? तर या कबरीची पूजा केली जाते. तिच्यावर चादर चढविली जाते. कबरीवर गुलाबाची फुले वाहिली जातात. ज्या औरंगजेबाची देशशत्रूमध्ये गणना केली जावी तेथेच देशातील नागरिकांनी आपला माथा टेकवावा आणि या कबरीचे पर्यायाने औरंगजेबाचे महिमामंडन करावे, हीच खरी विसंगती आहे. ही विसंगती दूर झाल्यावाचून या कबरीची समस्या सुटणार नाही.
ही विसंगती कशी दूर होणार? औरंगजेबाचे नेमके व्यक्तिमत्त्व कसे होते, यावर आजही वादविवाद होतात. याचे मुख्य कारण आजच्या पिढीत आपल्या इतिहासाबाबत असलेले अज्ञान होय. जर हे अज्ञान एवढ्या मोठ्या प्रमाणात नसते तर तथाकथित नेत्यांना आणि स्वयंघोषित इतिहास तज्ञांना उलटसुलट विधाने करून कोलांटउड्या मारता आल्या नसत्या. मुळात आपल्या इतिहासाबाबत नव्या पिढीत संभ्रमच कायम राहिला पाहिजे, अशी राजकारणाची दुकाने थाटून बसलेल्या सत्तापिपासू लोकांचे मत आहे. असे केल्याने एकगठ्ठा मते मिळविण्याचे काम सुकर होते. कारण लोकांना खरा औरंगजेब कळणे हे यांच्या दृष्टीने सोयीचे ठरणार नाही. कारण तेव्हा मुद्दा म्हणून ही गोष्ट निकालातच निघणार आहे. पण सरकारला कधीतरी या तथाकथित संवेदनशील मुद्द्याला हात घालावाच लागणार आहे आणि जेव्हा ज्यांना राष्ट्रहित सर्वोपरि वाटते अशा विचारधारेची मंडळी सत्तेवर असताना हे काम होणे उचित समजावे लागेल. त्यामुळे औरंगजेबाचे महिमामंडन रोखण्यासाठी तेथे आपले जे खरोखर आदर्श आहेत त्यांची स्मारके उभारणे आवश्यक ठरणार आहे. कदाचित लोक म्हणतात त्याप्रमाणे छावा चित्रपट आल्यामुळे आज या कबरीचा विषय ऐरणीवर आला आहे. ते बरोबरही असावे, कारण औरंगजेबाचे क्रौर्य पडद्यावर दाखविण्यासाठी आतापर्यंत कोणी धजावलेच नव्हते. या चित्रपटाने ते क्रौर्य काही प्रमाणात का होईना पण चित्रित केले आणि लोक इतिहासाचा हा पैलू समोर आल्यामुळे भावनिक झाले. मात्र हे क्रौर्यच अधोरेखित करणे हा आपल्या मांडणीचा मुख्य उद्देश नसून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि धर्मासाठी बलिदान हाच मुद्दा समोर आणला गेला पाहिजे. त्याचबरोबर मराठेशाहीच्या नि:पाताचा विडा उचलून दक्षिणेत ठाण मांडणारा शत्रू कडव्या प्रतिकारामुळे नामोहरम होऊन येथील मातीतच गाडला गेला, हा इतिहासही कबर उखडून पुसून टाकणे संयुक्तिक नाही. अशा प्रकारे इतिहासातून बर्याचशा गोष्टी गाळून टाकाव्या लागतील व इतिहासाच्या समग्रतेलाच गालबोट लागेल. त्यामुळे इतिहासाशी आजवरच्या सत्ताधार्यांनी केलेली प्रतारणा निकालात काढून खरा इतिहास देशाच्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविला गेला की त्या इतिहासाबाबत भ्रामक विधाने करणार्यांचा पाया कमकुवत होऊन त्यांच्या पायाखालची वाळू आपोआपच सरकून जाईल व त्यांचे फोल दावे आपोआपच उघडे पडतील. ते तसे उघडे पडावेत, याच हेतूने या ठिकाणी योग्य आदर्शांची स्मारकशिल्पे उभी राहणे गरजेचे झाले आहे. कोणाला या मांडणीत हिंदू-मुसलमान असाही पैलू जाणवेल, पण सर्वच बाबतीत असा मापदंड लावणे उचित होणार नाही.
या ठिकाणी औरंगजेब हा हिंदू होता की मुसलमान होता म्हणजे नेमक्या कोणत्या धर्माचा होता यापेक्षाही तो या देशाचा शत्रू होता आणि देशशत्रू हा भारताचा कधीही आदर्श होऊ शकत नाही. त्यामुळेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे औरंगजेबाची कबर हे काही या देशातील नागरिकांचे श्रद्धास्थान म्हणता येणार नाही, किंवा काही विशिष्ट जनसमूहाचेही श्रद्धास्थान म्हणता येणार नाही. श्रद्धास्थाने ही एखाद्या धार्मिक समूहाच्या आस्थेशी निगडित असतात, पण स्मृतिस्थानाबाबत असे म्हणता येत नाही. जर कोणी असा दावा करीत असेल की औरंगजेबाची कबर म्हणजे या देशातील एखाद्या समूहाचे आस्थेचे ठिकाण अथवा श्रद्धास्थान आहे तर तो दावा खोडून काढायलाच हवा.

कारण एक विदेशी आक्रमक आणि मूर्तिमंत क्रौर्याचे प्रतीक असलेला हा असहिष्णु मुगल सम्राट ज्याच्या क्रौर्याच्या तडाख्यातून प्रत्यक्ष त्याचा जन्मदाता, त्याच्या रक्ताचा भाऊ व अन्य नातेवाईक यांचीसुद्धा सुटका झाली नाही तो कुणाच्याही आस्थेचे प्रतीक बनू शकत नाही आणि जर तसा कोणाचा भ्रम असेल तर तो भ्रमही दूर करायला हवा. पण हा भ्रम औरंगजेबाची कबर उखडून फेकल्याने दूर होणार नाही. अशी कृती करणे हे या गंभीर प्रश्नाचे हे अत्यंत साधे किंवा बाळबोध उत्तर म्हणावे लागेल. मग या प्रश्नाचे समर्थक उत्तर काय असेल तर या प्रश्नाचे समर्थक उत्तर हेच होऊ शकते की औरंगजेब नक्की कसा होता. हे त्या कबरीच्या ठिकाणी स्पष्टपणे दर्शविले पाहिजे. जेणेकरून त्याला आदर्श मानण्याची कोणीच गल्लत करणार नाही. त्याचबरोबर येथे खरेखुरे आदर्श उभे करून समाजाला योग्य दिशा देण्याची सुद्धा आवश्यकता आहे. जर आपला आदर्श औरंगजेब नसेल तर मग कोण आहे याचे उत्तर जेव्हा देशातील नागरिकांना त्या ठिकाणी मिळेल तेव्हाच त्यांना वास्तवाचा बोध होईल आणि सध्या दिसून येणारी विसंगती टिकून राहणार नाही. ती हद्दपार होईल अशी अपेक्षा आपण करू शकतो आणि हे ज्या या समस्येवरचे सकारात्मक आणि विधायक उत्तर म्हणावे लागेल. मग देशभरात अशी जी-जी स्मृतिस्थाने असतील त्या सर्वच ठिकाणी हाच मापदंड लावून कायमस्वरूपी स्मारकांची उभारणी करावी लागणार आहे. आपल्या देशाच्या तरुणांमध्ये मग कोणत्याही धर्माचे का असेनात आपल्या देशाला महासत्ता बनवण्यासाठी आवश्यक असणारी खूप मोठी ऊर्जा दडलेली आहे. आज खरी गरज आहे ती या ऊर्जेला योग्य सकारात्मक दिशा देण्याची. असे घडून आले तर या देशामध्ये अस्थिरता माजविणे, त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण करणे, गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण करणे आणि या देशाला पुन्हा एकदा विघटनाच्या दिशेने फाटाफुटीच्या उंबरठ्यावर नेऊन पोहोचवणे हे कोणत्याही देशांतर्गत अथवा देशबाह्य अशा राष्ट्रविघातक शक्तीच्या दृष्टीने केवळ अशक्यच नव्हे तर असंभव गोष्ट ठरली पाहिजे. हे सर्व या स्मृतिस्थानांचे योग्य प्रकारे संवर्धन केल्यानेच शक्य होणार आहे.
शेवटी राहता राहिलेली गोष्ट म्हणजे देशाची गौरवस्थाने. आपण अनेक आदर्श पुरुष आणि स्त्रियांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देशातील महत्त्वाचे प्रकल्प अथवा संस्था यांना त्यांची नावे देत असतो. उदाहरणार्थ, पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अथवा झारखंड येथील भगवान बिरसा मुंडा विमानतळ इत्यादी. मात्र आपण एखाद्या विद्यापीठाला औरंगजेबाचे अथवा त्यासारख्या व्यक्तीचे नाव देऊ शकतो का; खरे तर आपण औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर असे नामांतर करून योग्य तो संदेश दिलेलाच आहे. पण हीच भूमिका सर्व ठिकाणी स्वीकारून समाजासाठी योग्य आदर्शांचा बोध जागृत करणे, ही विविध राजकीय पक्ष, सरकार आणि सामाजिक व सांस्कृतिक संस्था या सर्वांच्याच विषयसूचीवरील काम समजले पाहिजे व त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीनेच पुढे पावले टाकली पाहिजेत. तरच हा सर्व खटाटोप समाज जोडणारा विषय ठरेल आणि तसा तो ठरावा हेच आपल्या समाजाच्या व देशाच्याही हिताचे आहे.