@प्रणव पाटील
'सेवांकुर भारत’ हे वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक भान जागृत करणारं कार्य मराठवाड्यात उभं राहिलं आहे. या अंकुराचा वटवृक्ष आता विस्तारत आहे. हा उपक्रम नक्की काय आहे आणि त्याचं काम कसं चालतं याचा धांडोळा या लेखात घेतला आहे. लेख दीर्घ असल्याने दोन भागांत विभागला आहे.
डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या माध्यमातून चालू झालेल्या ’सेवांकुर’ या उपक्रमाला 25 वर्षे झाली. या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने उपक्रमाचा आढावा घ्यावा, त्यातून झालेली दृश्य-अदृश्य स्वरूपातील उपलब्धी नोंदवली जावी आणि त्याचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोचावे यासाठी हा विषय विवेक पाठ्यवृत्तीच्या माध्यमातून अभ्यासण्याचे ठरले. संबंधित व्यक्तींना भेटून तसेच संस्थाभेट करून प्रणव पाटील यांनी ’सेवांकुर’ समजून घेतले. दोन भागांत विभागलेला हा लेख म्हणजे त्याची लिखित नोंद. या माध्यमातून ‘सेवांकुर’ अनेकांपर्यंत पोहोचेल आणि प्रेरणा जागरणही करेल.
’सेवांकुर’ या साध्यासोप्या नावातच सेवा विषयातील काही तरी उपक्रम असावा असं लक्षात येतं. एरवी हॉस्पिटलची पायरी चढायला घाबरणार्या सर्वसामान्य माणसाला त्याच्या आरोग्यापेक्षा बाकी काही जाणून घेण्यात रस नसतो. कोविडच्या महामारीनंतर लोकांचं हॉस्पिटल आणि डॉक्टर यांच्या विषयीचं मत बदलत चाललं आहे. दुसरीकडे ‘आरोग्य’ हे सेवा क्षेत्रातून उद्योग क्षेत्रात केव्हाच गेलं आहे. अलीकडच्या एका आकडेवारीनुसार भारतात दर वर्षी पाच कोटी मध्यमवर्गीय हे आरोग्यावरील खर्चामुळे गरिबी रेषेखाली जात आहेत. त्यामुळे एखादा सेवाप्रकल्प वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असेल, यावर पटकन विश्वास बसत नाही. वैयक्तिक स्तरावर आपलं आयुष्य समाजसेवेला वाहिलेले काही डॉक्टर आपल्याला माहीत असतात. परंतु ’सेवांकुर’ या प्रकल्पातून डॉक्टरांची एक मोठी फळी असं काम करते हे ऐकून नवल वाटल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच या उपक्रमाचं उद्दिष्ट काय आहे आणि प्रत्यक्ष काम कसं चालतं, यासाठी छत्रपती संभाजीनगर गाठलं.
मुक्काम पोस्ट छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरच्या बस स्टँडला उतरून ’हेडगेवार हॉस्पिटल’ला पोहोचलो; त्यावेळी कल्पनेहूनी भव्य अशीच भावना हॉस्पिटल पाहताना झाली. खरं तर वैद्यकीय क्षेत्राचा आणि माझा फारसा संबंध आलेला नव्हता. त्यामुळे ’सेवांकुर प्रकल्प’ समजून घ्यायला जायचं म्हटल्यावर मला या क्षेत्रातली प्रत्येक गोष्ट नवीन असणार होती. त्यामुळे प्रत्येक गोष्ट नीट समजवून घ्यायची, असं ठरवलं होतं. या विषयासाठी हेडगेवार हॉस्पिटलचे भूलतज्ज्ञ डॉ. प्रशांत गायकवाड मार्गदर्शक म्हणून असणार होते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी त्यांच्याशी ऑनलाईन मोडवर थोडीफार चर्चा केली होती. त्यावेळी ’या विषयासाठी गरज पडेल त्या त्या वेळी फोन करा’, अशी सूचना त्यांनी दिली होती.
’हेडगेवार हॉस्पिटल’ला पोहोचेपर्यंत ’कुठंपर्यंत आलात’, अशी विचारणा करणारे त्यांचे दोन फोन आले होते. सतत ऑपरेशनमध्ये व्यग्र असणारा भूलतज्ज्ञ तुम्हाला फोन करतो हा अनुभव माझ्यासाठी धक्कादायक होता. जगातल्या नोबेल प्रोफेशनमध्ये डॉक्टरचा नंबर सर्वांत वरचा लागतो. त्यात आपल्याकडे डॉक्टरी पेशाची माणसं सर्वसामान्य माणसांशी सहज गप्पा मारतात हे दृश्य अतिदुर्मीळ आहे. त्यामुळे काही शंका, थोडी भीती आणि उत्सुकता घेऊन ’हेडगेवार हॉस्पिटल’च्या दारात उभा राहिलो.
’हेडगेवार हॉस्पिटल’ हे जवळपास सहाशे बेडचं भलं मोठं आरोग्यकेंद्र आहे. शेकडो डॉक्टर, नर्स, कर्मचारी आणि हजारो लोकांनी गजबजलेलं ते वातावरण दडपण आणणारं होतं. डॉ. प्रशांत गायकवाड मला घ्यायला कुणाला तरी पाठवणार होते. तेवढ्यात मी हॉस्पिटलचा जो माणूस सापडेल त्याच्याकडून माहिती गोळा करायला सुरुवात केली. ‘हेडगेवार हॉस्पिटल’मध्ये सतत झाडलोट करून स्वच्छता राखणं सुरू असते, असं दिसलं. म्हणून एका स्टाफला विचारलं, ”या दवाखान्यात अंदाजे किती स्वछता कर्मचारी काम करत असावेत?” त्यावर त्यांनी विचार करून सांगितलं, ‘सगळे मिळून 250 तरी असतील’. हे ऐकून आपण लेख लिहायला आलोय की पुस्तक? असा प्रश्न पडायला लागला. त्यात ’सेवांकुर’ हा हेडगेवार हॉस्पिटलचा उपक्रम आहे की ’सेवांकुर’चा ’हेडगेवार हॉस्पिटल प्रकल्प’आहे असा गोंधळ होता. तेवढ्यात मेडिकलचा विद्यार्थी असणारा ओंकार वानखेडे मला शोधत आला. पोहोचायला दुपार झाल्यामुळे त्या दिवशी फक्त हॉस्पिटल बघायचं आणि संध्याकाळी काही विद्यार्थ्यांना भेटायचं असं ठरवलं.
मध्यभागी भगवान धन्वंतरी यांची दगडात घडवलेली सुबक मूर्ती आणि त्याच्याभोवती पसरलेलं भलं मोठं पाचमजली हेडगेवार हॉस्पिटल. हॉस्पिटलचे वेगवेगळे विभाग दाखवताना ओंकार सांगत होता, “बाहेरच्या खाजगी हॉस्पिटलपेक्षा उपचार आणि बाकीच्या सोयी स्वस्त आहेत. हा फरक जवळपास 60 टक्क्यांचा आहे. इथले डॉक्टर बाहेर चांगल्या पगाराच्या नोकरी सोडून त्यापेक्षा कमी पगारावर काम करतात”. ’सेवांकुर’च्या माध्यमातून जोडला गेलेला ओंकार कॉलेजनंतर काही वेळ ‘हेडगेवार हॉस्पिटल’मध्ये येऊन काम करत होता. ’बाह्यरुग्ण विभाग’, ’प्रसूती केंद्र’, असे सगळे विभाग बघत असताना या प्रकल्पाची माहिती देणारे पोस्टर दिसले. त्यानुसार ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान’च्या अंतर्गत ’हेडगेवार हॉस्पिटल’, ’श्रीगुरुजी रुग्णालय, नाशिक’, ’सेवांकुर भारत’ आणि इतर प्रकल्प होते. ’सेवांकुर भारत’ प्रकल्पाविषयी असलेल्या पोस्टर मध्ये ेपश ुशशज्ञ षेी परींळेप या उपक्रमाची माहिती होती. त्यामुळे ’हा काय उपक्रम आहे’ हे विचारताच ओंकारने हॉस्पिटलमधल्या दामूअण्णा प्रेक्षागृहात नेलं. तिथं असलेल्या मोठ्या स्क्रीनवर आम्ही ’वन वीक फॉर नेशन’चे काही व्हिडोओ पहिले. वैद्यकीय शिक्षण घेणार्या मुलांसाठी ’सेवांकुर भारत’चा ’ेपश ुशशज्ञ षेी परींळेप’ हा उपक्रम आहे, हे लक्षात आलं. त्यामुळे काही विद्यार्थ्यांशी बोलता येईल का आणि त्यांच्या आयुष्यावर या उपक्रमाचा नक्की काय परिणाम झालाय हे पाहायचं ठरवलं.
सेवांकुर भवन नावाचं मोहोळ
संध्याकाळी गप्पांसाठी ‘हेडगेवार हॉस्पिटल’मध्ये आलेले काही विद्यार्थी घेऊन जितेंद्र खंडाळकर आले होते. खंडाळकर हे ’सेवांकुर भारत’चं पूर्णवेळ काम पाहणारे कार्यकर्ते होते. ‘सेवांकुर भारत’ या उपक्रमाची स्वतःची अशी एक रचना असल्याचं एव्हाना लक्षात येत होतं. त्यामुळे या उपक्रमात असणारा प्रत्येक जण कोणत्या विभागात अथवा झोनमध्ये काम करत असतो. त्या झोनमध्येही अनेक जबाबदार्या वाटून दिलेल्या आहेत. नवीन माणसाला हे किचकट वाटलं तरी पुढच्या काही दिवसांत ही रचना समजून घ्यायचा मला प्रयत्न करायचा होता. या उपक्रमाच्या केंद्रीय समितीत असणार्या नऊ लोकांपैकी खंडाळकर हे एक होते. काही वेळाने महादेव पडवळ हे आणखी एक कोकण विभागात पूर्णवेळ काम करणारे कार्यकर्ते आम्हाला येऊन मिळाले. आमच्या गप्पांमध्ये सहभागी झालेले सगळे विद्यार्थी एकमेकांचे चांगले वर्गमित्र आहेत, असं वाटत होतं. यात मुलं आणि मुलीही होत्या. काही वेळाने लक्षात आलं की, ही सगळी मुलं वेगवेगळ्या कॉलेजमधली आहेत. एवढंच नाही तर काही जण तर आयुर्वेदिक, होमियोपॅथीचे विद्यार्थी आहेत. ’सेवांकुर भारत’च्या उपक्रमांमध्ये भेटलेली ही मुलं एकमेकांचे घट्ट मित्र झाले होते. बघता बघता गप्पांच्या ओघात संध्याकाळच्या या आमच्या भेटीचं रूपांतर रात्रीच्या जेवणाच्या पार्टीत झालं.
या गप्पांमधून काही गोष्टी लक्षात आल्या. दोन्ही पूर्णवेळ कार्यकर्ते हे त्यांच्या पदाचा मोठेपणा किंवा जबाबदारीचं दडपण न आणता मुलांच्यात सहज मिसळून गेले होते. त्यांच्या गप्पांचे विषय एक प्रकारे म्हणजे एक प्रकारे ’सेवांकुर भारत’च्या कामाभोवतीच फिरत होते. दोन्ही कार्यकर्त्यांना बहुतेक सगळ्या कॉलेजमध्ये असणार्या या उपक्रमाशी संबंधित मुलं नावासकट माहीत होते. एकमेकांची आणि इतर मुलांचीही ते वैयक्तिक अडीअडचणींसह चौकशी करत होते. या गप्पा गंभीरपणे न होता हसतखेळत मध्येच विनोद करत चालल्या होत्या. त्या गप्पांच्यात one week for nation या उपक्रमाचे अनेक किस्से सतत येत होते. या अनौपचारिक गप्पा एक प्रकारे एक आढावा बैठकच होती. ’सेवांकुर भारत’ या उपक्रमाचं काम जरी महत्त्वाचं असलं तरी कार्यकर्ते हसतखेळत ते पार पडतात हे लक्षात आलं होतं. उलट हे काम नसून त्यांच्या रोजच्या जीवनाचा ’सेवांकुर भारत’ हा भाग झाला होता. एवढ्या मोकळेपणाने हसतखेळत गप्पा मारणारे वैद्यकीय क्षेत्रातले विद्यार्थी मी पहिल्यांदाच बघत होतो.
रात्री माझा मुक्काम ’सेवांकुर भवन’ या ’हेडगेवार हॉस्पिटल’पासून काही अंतरावर असणार्या एका तीन मजली इमारतीत होता. ’सेवांकुर भवन’ ही ’सेवांकुर भारत’शी संबंधित विद्यार्थी आणि कार्यकर्ते यांचं एक मोहोळ आहे, असं म्हणायला हवं. इथे सतत कुणी ना कुणी शहरातले आणि बाहेरगावचे विद्यार्थी आणि कार्यकर्ते येतजात असतात. इथेही काही विद्यार्थी मला भेटणार होते. दिवसभरच्या प्रवासामुळे मी प्रचंड थकलो होतो. परंतु भेटायला आलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळं रात्रीही त्यांच्याशी गप्पा मारायला सज्ज झालो. एका अर्थी दगदगीमुळं मी आजारी पडलोच तर आजूबाजूला अनेक डॉक्टर आहेतच हा आधार होताच. आधार ही मुळी भावनाच वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात फार महत्त्वाची आहे. याचा प्रत्यय डॉ. केतकी नीला या विद्यार्थिनीचे अनुभव ऐकल्यानंतर आला. डॉ केतकी ही ’सेवांकुर प्रकल्पा’त कॉलेज जीवनापासूनच सक्रीय असलेली विद्यार्थिनी होती. MBBS ला असतानाच परीक्षेच्या आधीच तिचे बाबा वारले. त्यानंतर मानसिकदृष्ट्या कोलमडून गेलेल्या केतकीला ’सेवांकुर’मुळे ओळखीच्या झालेल्या डॉक्टरांनी आधार दिला. हा अनुभव सांगताना डॉ. केतकी या भावुक होऊन म्हणाल्या, “सेवांकुरच्या डॉक्टरांनी घरच्या मुलीसारखी माझी काळजी घेतली.”

आमच्या गप्पांमध्ये सामील झालेल्या सुदेश तळणकर या विद्यार्थ्याने त्याचे अनुभव सांगताना महत्त्वाची माहिती दिली. त्यानुसार ’सेवांकुर भारत’च्या उपक्रमामुळे प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ’सेवांकुर’ची ’टीम’ बनली आहे. या टीममध्ये प्रत्येकाला काही तरी जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. त्यामुळे सेवांकुरशी निगडीत प्रत्येक जण एका नव्या उत्साहाने आणि जबाबदारीची जाणीव असल्यासारखा वागताना दिसतो. ही गोष्ट झाली मला भेटायला आलेल्या विद्यार्थ्यांची. प्रत्यक्षात ’सेवांकुर’चं काम वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कितपत पोहोचलं आहे, याचा अंदाज येत नव्हता. म्हणून प्रत्यक्ष एखाद्या कॉलेजला जाऊन पाहावं असं ठरलं.
वैद्यकीय महाविद्यालयात...
दुसर्या दिवशी पूर्णवेळ कार्यकर्ते असलेले कार्यकर्ते जितेंद्र खंडाळकर दिवसभर माझ्याबरोबर होते. त्यांचा रोजचा कुठल्या ना कुठल्या वैद्यकीय कॉलेजला भेट देण्याचा दिनक्रम आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर छ. संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट द्यायचं ठरवलं. नुकतीच परीक्षा सुरू होती. खंडाळकरांना बहुतेक मुलं ओळखत असल्यामुळे त्यांचे चेहेरे फुलले होते. कुणी तरी घरचं भेटायला आल्यासारखी त्यांची भावना होती. आमच्याबरोबर फिजिओथेरपीला शिकणारी मुलंही आली होती. त्यामुळं फिजिओथेरपी कॉलेजमध्येही ’सेवांकुर’चं काम चालतं हे मला त्यावेळी नव्यानेच समजलं. आमच्याभोवती गोलाकार बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःची थोडक्यात ओळख करून द्यायला सुरुवात केली. बहुतेक मुलं बाहेरच्या जिल्ह्यातली आणि हॉस्टेलवर राहणारी होती. प्रत्येक जण आपलं नाव, गाव आणि सेवांकुरशी कसा संबंध आला हे सांगत होता.
त्यातले बहुतेक जण सिनियर मुलांच्या आणि मित्राच्या सांगण्यावरून या उपक्रमात सहभागी झाले होते. त्यातल्या काहींनी one week for nation हा कॅम्प केलेला होता. या कॅम्पला गेलेल्या मुलांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता. प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात सेवांकुर भारतमुळे काय फरक पडला असं विचारताच प्रत्येक जण भरभरून बोलत होता. त्यात बुजरी असणारी मुलं म्हणाली, “आम्हाला सगळ्यांसमोर बोलायचं म्हंटलं तरी घाम फुटायचा आणि रडायला यायचं, पण ’सेवांकुर’मुळे आमची भीती गेली आणि आम्ही बोलायला लागलो.” तर मुलींनी त्यांचे एका बंजारा तांड्यावरचे अनुभव सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या या मुलांच्या टीमने चिमणपूर वाडीच्या तांड्यावर काम सुरू केलं आहे. छ. संभाजीनगर शहरापासून साधारण 15 किलोमीटरवरच्या या तांड्यावर ही मुलं महिन्यातून एकदा जातात. त्यावेळी या मुलांच्याबरोबर हेडगेवार हॉस्पिटलचे काही डॉक्टरही असतात. पहिल्यांदा मुलं तांड्यावर जाऊन स्थानिकांशी गप्पा मारतात. त्यांची ओळख करून घेतात आणि कुणाला काही आरोग्याच्या समस्या आहेत का, याचा शोध घेतात. त्या गप्पांमधून तांड्यावरच्या मुलींवर पाळी आल्यानंतर अनेक निर्बंध लादल्याचं लक्षात आलं. त्याकाळात या मुली घराच्या बाहेर पडत नाहीत, कुणाशीही बोलत नाहीत असं मुलांच्या लक्षात आलं.

आमच्याशी गप्पा मारणार्या मुलींमधील एक मुलगी सांगू लागली, “मी मूळची जालन्याची असून बंजारा समाजातीलच आहे. आमच्याकडे आमचा समाज बर्यापैकी सुधारलेला आहे. परंतु इथल्या तांड्यांवर इतक्या अंधश्रद्धा आहेत हे बघून मला धक्का बसला. मला या लोकांसाठी काम करायची प्रेरणा ’सेवांकुर भारत’च्या उपक्रमामुळे मिळाली. ज्या मुलांना स्वतःहून बोलायला भीती वाटत होती, तीच मुलं आज बाहेर जाऊन समाजात सेवा प्रकल्प राबवत आहेत. लोकांशी कसं बोलायचं, हे या मुलांना कॉलेजच्या पहिल्या दुसर्या वर्षीच शिकायला मिळत आहे. काही जणांनी सांगितलं, आम्ही पहिल्यांदा रक्त तपासणी करायला शिकलो.”
वैद्यकीय शिक्षणासाठी सुखवस्तू घरातून आलेली ही मुलं जेव्हा तांड्यावरचे अनुभव घेतात तेव्हा ती अंतर्बाह्य बदलतात. मुलांना आरक्षण या विषयावर त्यांची मतं विचारली त्यावर मुलं मुक्तपणे बोलली. मुलामुलांमध्ये एकाच वर्गात आरक्षण आणि त्यामुळं अन्य जातीच्या मुलांना मिळणारे फायदे यावरून मनभेद तयार होतो, असा अनुभव आहे. त्यावर मुलं म्हणाली, “आधी आम्हाला आरक्षणाविषयी चुकीची माहिती होती, ’सेवांकुर’मुळे समरसता या विषयावर तज्ज्ञांना ऐकता आलं आणि आमचे प्रश्नही विचारता आले.”
शिक्षणासाठी लांबून या अनोळखी शहरात आलेल्या या मुलांचा ’सेवांकुर भारत’शी कसा संपर्क झाला हे जाणून घेण्यात माझी उत्सुकता होती. याविषयी बहुतेकांनी one week for nation या शिबिराविषयी भरभरून माहिती सांगितली. एक आठवडा देशासाठी ही संकल्पना घेऊन हा उपक्रम राबवला जातो. यात वेगवेगळ्या भागातील वैद्यकीय महाविद्यालयातील 300 विद्यार्थी आणि 50 डॉक्टर हे देशाच्या एका दुर्गम भागात जातात. तिथे चालत असलेले ’सेवाप्रकल्प’ पाहतात. स्थानिक लोकांमध्ये मिसळतात. दोन दिवस मेडिकल कॅम्प लावतात. त्या शिवाय त्या भागातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देतात. या सगळ्यांमध्ये या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण व्हावी, असे वेगवेगळे उपक्रमही असतात. यात काही व्याख्याने, खेळ, व्यायाम, गटाने करायची सादरीकरणे, स्पर्धा असे भरगच्च कार्यक्रम असतात.
या शिबिराची माहिती मुलांना त्यांच्या मित्रांकडून किंवा कॉलेजच्या सिनियर मुलांकडून मिळते. आठवडाभर फिरायला मिळेल आणि मजा करता येईल या उद्देशाने अनेक जण शिबिरासाठी नोंदणी करतात. एकूण या उपक्रमाचा मुख्य उद्देश हा देशासाठी आपण काही तरी देणं लागतो ही भावना रुजावी हा आहे. त्याचबरोबर मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण व्हावी अशा प्रकारचे उपक्रम या शिबिरात घेतले जातात. त्यामुळे या शिबिराला जाऊन आलेला प्रत्येक जण आम्हाला त्यांचे अनुभव सांगत होता. मागच्या वर्षी हे शिबीर ’धर्मावाला’ या हरिद्वारच्या जवळ असणार्या पर्वतीय भागात झालं होतं. या भागात मुलांना स्थानिक लोकांच्यात जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे झालेले डोळ्यांचे आजार दिसून आले. स्थानिक लोकांनी त्यांना खूप वर्षांनी आम्ही आमच्या गावात डॉक्टर पाहिले असं सांगितलं. दोन दिवस आयोजित केलेल्या मेडिकल कॅम्पसाठी प्रत्येक गटाला गावं वाटून दिलेली होती. त्यातल्या एका गावात एका माणसाकडे राहायला गेलेल्या मुलांनी अनुभव सांगितला, “आम्ही ज्या गावकर्याकडे राहणार होतो. त्याला अचानक दुसर्या गावात जावं लागणार होतं. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून सगळं घरच आमच्या ताब्यात दिलं. स्थानिकांनी मुलांवर दाखवलेला हा विश्वास डॉक्टरी पेशावर लोकांचा असलेला भरवसा टिकून असल्याचा सांगणारा होता.” असे नाना अनुभव घेऊन मजा कार्याला आलेली मुलं स्तब्ध होतात. मोबाईलमध्ये अडकलेली मान बाजूला वळवून बाजूला खेड्यांचा असलेला आपला देश पाहतात. दुर्गम भागातली माणसं, त्यांचे राहणं, त्यांचे विश्वास आणि श्रद्धा, त्यांच्या समस्या, बघून त्यांना आपला भोवताल समजून घ्यायला मदत होते. कमीत कमी गरजांच्या आधारे जगणारी आनंदी माणसं मुलं पाहतात तेव्हा आपोआपच अंतर्मुख होतात.
म्हैसूरच्या जवळ सरगूर या ठिकाणी गेलेल्या एका शिबिरार्थी मुलाने सांगितलं, “आम्ही ज्या घरात जेवायला गेलो तिथे स्वयंपाक करायलाही पुरेशी भांडी नव्हती. तरीही गावकर्यांनी आम्हाला नाचणीच्या भाकरी वाढल्या.” अशा अनुभवांमुळे मुलांमध्ये ’देशातली ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काही तरी केलं पाहिजे’, असा भाव तयार नाही झाला तरी जाणीव निर्माण होतेच. या जाणिवेमुळे मुलांच्या वागण्यात फरक पडतो. अनेकांनी मला सांगितलं, “आम्ही पूर्वी अभ्यास करायला टाळाटाळ करायचो. सेवांकुरमुळे आम्ही आमच्या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहू लागलो आहोत.” हा अनुभव ज्या शिबिरामुळे आला त्या one week for nation च्या शेवटच्या दिवशी मुलं एकमेकांच्या गळ्यात पडून रडतात. याला डॉक्टरही अपवाद नाहीत. ’सेवांकुर’च्या या आठवड्याभराच्या काळात मुलांचा एकमेकांशी एक बंध तयार होतो. त्यातून पुढे या व्यसनाधीनता कमी होणे, रॅगिंग बंद होणे, आरक्षणावरून होणारी शेरेबाजी बंद होणे असे नाना परिणाम मुलांच्यात झालेले दिसतात. मुलांचे अनुभव ऐकून ’सेवांकुर’ भारताच्या कामाचं प्रत्यक्ष दर्शन झालं होतं. आता वेळ आली होती या उपक्रमात सहभागी असलेल्या डॉक्टरांच्या भेटीची.

डॉक्टरांच्या गाठीभेटी
सकाळी साधारण 8 वाजता हेडगेवार हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये डॉ. राम मुरकुट माझी वाट बघत बसले होते. एक डॉक्टर माझी गप्पा मारायला वाट बघत बसले आहेत, या विचारानेच मी अवघडलो होतो. हाच अवघडलेपणा पुढे वारंवार येणार होता. डॉ. राम हे ’सेवांकुर भारत’च्या देवगिरी प्रांताचे संपर्क प्रमुख आहेत. ’सेवांकुर भारत’ या उपक्रमाचं काम नक्की कोणत्या रचनेने होतं हे मला समजून घ्यायचं होतं. ही रचना डॉ. राम सांगताना म्हणाले, “’सेवांकुर भारत’ची कार्य रचना कॉलेज स्तरापासून आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये एक प्रमुख (संयोजक) आणि सहप्रमुख असतो, त्या शिवाय बौद्धिक प्रमुख आणि त्याला सह बौद्धिक प्रमुख असतो. जो कॉलेजमध्ये बौद्धिक चर्चा, व्याख्यान, कार्यक्रम यांचं नियोजन, निरोप, सूचना देतो. त्यानंतर उपक्रम प्रमुख आणि सह उपक्रम प्रमुख असतात. कॉलेजमध्ये वेगवेगळे उपक्रम घेणं उदा. चिमणपूर वाडीसारखा उपक्रम, कोजागिरीचा कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमाचं नियोजन त्याच्याकडे असतं. संपर्क प्रमुख आणि सह संपर्कप्रमुख हे आपल्या कॉलेजमधल्या मुलांशी संपर्क करून त्यांचा सहभाग कसा वाढेल, त्यांना विविध बैठक, कार्यक्रम यांचा निरोप देणं हे काम करतात. छ. संभाजीनगर विभागांत 13 पैकी 9 कॉलेजमध्ये अशी ’सेवांकुर’ची टीम आहे. कॉलेजसारखीच रचना विभागाची (जिल्हा) आहे.
डॉ. राम मुरकुट हे देवगिरी प्रांताचे संपर्क प्रमुख म्हणून काम पाहतात. रोजच्या हॉस्पिटलमधल्या सगळ्या कामा व्यतिरिक्त असलेलं हे काम सगळे डॉक्टर आनंदाने करतात. प्रत्येक विभागाच्यावर ’सेवांकुर’च्या कामाची रचना प्रांत स्वरूपाची आहे. देवगिरी प्रांतात छ. संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, जालना, नंदुरबार, जळगाव आणि धुळे हे जिल्हे समाविष्ट आहेत. महाराष्ट्रात देवगिरी प्रांत, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि कोकण प्रांत अशा तीन प्रांतात काम चालते. या प्रांतांच्यावर सेंट्रल टीम आहे. या सगळ्या रचनेवरून एकंदर कामाची विभागणी लक्षात आली होती. परंतु प्रत्येक विभागात पालक नावाचं पद अथवा एक जबाबदारी आहे. ती जबाबदारी नेमकी कशा संदर्भात आहे हे समजून घ्यायचं होतं. म्हणून दुसरी भेट डॉ. अश्विनी अष्टपुत्रे याना भेटायचं ठरवलं.
डॉ. अश्विनी आणि त्यांचे पती डॉ. यतींद्र अष्टपुत्रे हे सेवांकुरच्या कार्यात आनंदाने सहभागी होणारं जोडपं होतं. हेडगेवार रुग्णालयात डॉ. यतींद्र यांच्या केबिनमध्ये आम्ही भेटायचं ठरवलं. ’सेवांकुर’च्या कुठल्याही विद्यार्थ्याला डॉ. यतींद्र यांचं केबिन नेहमी खुलं असतं. डॉ. अश्विनी गेल्या वर्षीच्या one week for nation च्या भोजनप्रमुख होत्या. त्यामुळे आमच्या गप्पा पुन्हा या शिबिराविषयी झाल्या. त्यातून या सगळ्यामागे किती काटेकोर नियोजन असतं, याचा खुलासा झाला. साधारण जुलै महिन्यात ’सेवांकुर’ची चिंतन बैठक होते. त्यात one week for nation शिबिराचा एक प्रमुख आणि दोन सहप्रमुख ठरतात. शिवाय मेडिकल प्रमुख, भोजन प्रमुखही ठरतो. त्या सर्व प्रमुखांची एक वेगळी टीम तयार केली जाते. त्यासाठी सहा महिन्यांआधीपासून तयारी सुरू होते. शिबीर प्रमुख ज्या ठिकाणी हे शिबीर जाणार आहे, त्या ठिकाणी जाऊन व्यवस्था बघून येतात. त्यानंतर दर आठवड्याला नियोजनाची बैठक होते. भोजन प्रमुखाला सात दिवसांच्या जेवण नाष्ट्यासह सगळ्या गोष्टींची तयारी करावी लागते. यात रेल्वेने प्रवास असल्यामुळे मधल्या टप्प्यांमध्ये जेवणाची पार्सल्स कशी येतील, त्यासाठी कुणी प्रायोजक मिळेल का, रेल्वे गाडी थांबल्यानंतर मर्यादित वेळेत ती पार्सल्स रेल्वेत चढवणं इतकं बारीक-सारीक नियोजन करावं लागतं. असंच नियोजन मेडिकल टीमही करते. शिबिराला जाणार्या मुलांचे गट तयार करून प्रत्येक गटाला गटनायक नेमले जातात. त्या गटनायकांचं एक दिवस प्रशिक्षण घेतलं जातं. शिबिरात मुलं आणि मुलींची संख्या सामान असते.
ही सगळी माहिती जाणून घेतल्यावर डॉ अश्विनी यांनी त्यांच्या ’पालक’ या जबाबदारीबद्दल सांगितलं. “छ. संभाजीनगर विभागातल्या ’सेवांकुर’मधल्या विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण आली तर मुलं मला संपर्क करतात. इकडे आम्ही हॉस्टेलला राहणार्या मुलांसाठी ‘दिवाळी फराळ’ हा उपक्रम घेतला. या उपक्रमात साधारण 350 मुलं वेगवेगळ्या 70 डॉक्टरांच्या घरी फराळ करायला गेली. त्यातून डॉक्टर आणि मुलांचा संवाद वाढतो. शिवाय ’सेवांकुर’ हे कुटुंब असल्याचा भाव तयार होतो.”
डॉ. यतींद्र यांनी हे उपक्रम कसे सुरू झाले, याची पार्श्वभूमी सांगितली. ती अशी - “2003 साली आम्ही MGM कॉलेजला असताना डॉ. तुपकरी सर आम्हाला भेटायला यायचे. डॉ. तुपकरी सरांच्या कल्पनेतूनच ’सेवांकुर भारत’ हा उपक्रम सुरू झाला आहे. परंतु त्यावेळी या उपक्रमाला नाव नव्हतं. सरांच्या घरी आम्ही मुलं गप्पा मारायला जमायचो. त्यात आमचं खाणं, गप्पा, चर्चा व्हायची. मेसला कंटाळलेली मुलं आज काही तरी वेगळं खायला मिळेल म्हणून यायची. प्रत्येक जण प्रत्येक वेळी नवीन मित्र घेऊन यायचा. आपण नुसतंच जमतोय; पण यातून काही होतं नाहीये. म्हणून आपण काहीतरी करायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटायला लागलं. त्यावेळी आमची 20 जणांची टीम होती. ती टीम म्हणजेच सेवांकुर होतं. 2006 साली आम्ही आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण (MBBS) घ्यायला गेलेल्या मित्रांना एकत्र करायचं ठरवलं. आमच्यातले 12 जण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जाऊन या उपक्रमातल्या जुन्या मित्रांना भेटून आले. त्यानंतर छ. संभाजीनगरला आम्ही दोन दिवसांचं एकत्रीकरण ठेवलं. या एकत्रीकरणाला 270 विद्यार्थी जमले. त्या दोन दिवसांत काही कार्यक्रम झाले. त्यात सिंधुताई सपकाळ यांच्यासारख्या मान्यवर लोकांना आम्ही मार्गदर्शक म्हणून बोलवलं होतं. या कार्यक्रमाची योजना करत असताना या उपक्रमाला ‘सेवांकुर’ हे नाव द्यावं असं ठरलं. पुढे 2014-15 मध्येही मोठं एकत्रिकरण झालं. त्यावेळी आपण एक हजार वैद्यकीय क्षेत्रातल्या मुलांना नॉर्थ ईस्टला घेऊन जायचं ठरवलं. परंतु जेव्हा याचं नियोजन करायला घेतलं तेव्हा हे शक्य नसल्याचं लक्षात आलं. त्यामुळे जशपूर या ठिकाणी तीनशे विद्यार्थ्यांचा पहिला कँप घेण्यात आला आणि त्यातून ेपश ुशशज्ञ षेी परींळेप या शिबिराच्या उपक्रमाची सुरुवात झाली.” आज डॉ. यतींद्र हे ’सेवांकुर’च्या कोर टीमचे सदस्य आहेत. डॉ. अश्विनी आणि डॉ. यतींद्र हे जोडपं खाजगी क्षेत्रात अनेक चांगल्या संधी असूनही हेडगेवार हॉस्पिटलमध्ये तुलनेने कमी पगारावर प्रॅक्टिस आणि सेवांकुरचं काम नेटाने करत आहेत. यावर त्या दोघांचं मत होतं - ‘हेडगेवार हॉस्पिटल’सारखी संधी आम्हाला कुठेही मिळणार नाही; कारण आयुष्यात समाधानही तेवढंच महत्त्वाचं आहे.
’सेवांकुर’चे उपक्रम त्यांची तयारी कशी होते, हे कळल्यानंतर ’सेवांकुर भारत’ला संस्थात्मक स्वरूप कसं मिळालं, हे जाणून घायचं होतं. हे समजून घ्यायला डॉ. प्रशांत गायकवाड यांची भेट घ्याचं ठरवलं. ऑपरेशन थिएटरमधून काम करताना मध्येच काही वेळासाठी आलेले डॉ. प्रशांत आम्हाला त्यांच्या केबिनमध्ये भेटले. ’सेवांकुर’च्या कोर टीमपैकी एक असलेले डॉ. प्रशांत सांगतात सेवांकुरचं काम खूप वर्षांपासून चालू आहे. हे काम फुलत असतानाच मध्ये कोरोना आला. त्यावेळी सेवांकुरच्या टीमने हेडगेवार हॉस्पिटलच्या मदतीने प्रचंड काम केलं त्यातून जवळपास सहा लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. कोविडमध्ये मिळालेल्या फावलेपणाचा उपयोग आम्ही सेवांकुरला संस्थात्मक रूप कसं देता येईल, याचा विचार करण्यासाठी केला. यासाठी पुण्याहून या विषयातील तज्ज्ञ माणिकताई दामले यांची मदत घेतली. त्यासाठी काही बैठका घेतल्या, अनेकांचे सल्ले घेऊन चर्चा करत पुढे गेलो. कोरोनानंतर या संस्थात्मक कामाला अमेरिकास्थित ‘सेवा इंटरनॅशनल’ या संस्थेने आर्थिक मदत करायचं ठरवलं. त्यातून हे काम इतकं पुढे गेलं की आम्ही नियोजन केलेल्या कामापेक्षा तिप्पट काम होत आहे. one week for nation प्रमाणेच आम्ही PDC (PERSONALITY DEVELOPMENT CAMP) हाही उपक्रम घेतो. या सात दिवसांच्या कॅम्प अथवा शिबिरात ज्या कॉलेजमध्ये ’सेवांकुर’ची टीम आहे, त्या टीमच्या निवडक विद्यार्थ्यंना घेतलं जातं. त्या सात दिवसात अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक येतात. त्यात रमेश पांडव, डॉ. प्रसन्न पाटील यांचं समरसता या विषयावर सत्र ठेवलं जातं. मुलांच्या मनात आरक्षण, जात वास्तव, समाज या विषयांवर प्रश्न असतात ते या स्तरांमधून विचारले जातात. या कॅम्पचं ठिकाण छ. संभाजीनगरमध्येच ठरलेलं आहे. आठवडाभर मुलांच्या नेतृत्वाचा विकास होईल याप्रकारे काही उपक्रम असतात. त्याशिवाय योग, विविध खेळ शाररिक उपक्रमही असतात. काही वर्षांपूर्वी एका one week for nationचं आयोजन सरगूर येथे केलं असता तिथे पंतप्रधान मोदींच्या टीममधील आर. बालू सर आले होते. त्यांनी ’सेवांकुरचं काम फक्त one week for nation पुरतं मर्यादित न राहता देशभर पसरलं पाहिजे’, असं सांगितलं. त्यानंतर महाराष्ट्रापुरतं असलेल्या ’सेवांकुर’चं ’सेवांकुर भारत’मध्ये रूपांतर झालं. देशभर हे काम पोहोचवण्यासाठी सहा मेडिकलचे विद्यार्थी ज्यात एक मुलगीही होती, ते एक वर्ष पूर्णवेळ वेगवेगळ्या ठिकाणी गेले. त्यांनी वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन ’सेवांकुर’ची टीम तयार केली. या वर्षी एक आठवड्याच्या शिबिरासारखंच three days for nation कॅम्प सहा ठिकाणी आयोजित केला गेला. पंढरपूरच्या वारीत ठीकठिकाणी ’सेवांकुर’च्या टीमने मेडिकल कॅम्प लावले. असं एक एक काम वाढत चाललं आहे.
आम्ही सुरुवात लहान युनिटपासून केली. त्यात झालेल्या चुकांमधून शिकत शिकत आम्ही पुढे गेलो. अलीकडे आम्ही एक प्रयोग करून पहिला. तो असा - एका नियोजित कार्यक्रमाचं पोस्टर न बनवता, कुठलीही जाहिरात न करता, कुठलाही कार्यक्रमाचा मेसेज न फिरवता वैयक्तिक स्तरावर संपर्क केला. तरी त्या कार्यक्रमाला 160 विद्यार्थी आले होते. या सगळ्या कार्यक्रमांचं वृत्त तयार होतं. यात किती मुलं आणि डॉक्टर किती वेळ सहभागी झाले होते याची नोंद ठेवली जाते. हे बोलणं सुरू असतानाच डॉ. प्रशांत याना मध्येच ऑपरेशनसाठी जावं लागलं. त्यामुळे पुढच्या गप्पा या आणखी एका डॉक्टरांशी करायचं ठरवून त्यांचा निरोप घेतला.
डॉ. श्रीराम पत्की हे आयसीयूमध्ये जाण्याच्या तयारीनेच आले होते. त्यामुळे त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधायचं ठरवलं होतं. 2018 पासून ’सेवांकुर’च्या कार्यात आलेल्या डॉ. श्रीराम यांनी 2018 सालच्या सेवांकुरच्या नेतृत्व प्रशिक्षण वर्गाचं तीन-चार पानांचं पत्रक दाखवायला आणलं होतं. त्या पत्रकात ’सेवांकुर’ नेमकं काय आहे, त्यात कोणते उपक्रम होतात, याची थोडक्यात माहिती होती. एकप्रकारे तो दस्तावेजच होता. डॉ. श्रीराम यांच्या मते ’डॉक्टरी पेशा’ हा समाजातल्या लोकांशी रोज संबंध येणारा व्यवसाय आहे. त्यामुळे समाजात नेमकं काय चाललंय, समाज काय विचार करतोय हे डॉक्टरांना लवकर समजतं. त्यामुळे डॉक्टरांच्या वर्गाला बुद्धिवादी म्हणून समाजात एक प्रतिष्ठा आहे. डॉक्टर काय म्हणतात याकडे समाज गांभीर्याने पाहतो. त्यामुळे डॉक्टरांमध्ये सामाजिक बांधिलकी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वाचाही विकास व्हायला हव. त्यांच्यात संवादकौशल्य आणि नेतृत्वक्षमताही निर्माण व्हायला हवी म्हणून ’सेवांकुर’सारखा उपक्रम गरजेचा आहे. त्याचबरोबर अलीकडे समाजात लोक कोणता डॉक्टर कसा उपचार करतोय त्यापेक्षाही आपलं हॉस्पिटलचं बिल किती येणार आहे, याचा विचार करतो असं ही मत डॉ. श्रीराम यांनी मांडलं. एका चित्रपटात एक भूमिका केलेले डॉ. श्रीराम त्यांच्या डॉक्टरी पेशाबरोबर साहित्य व कला क्षेत्रातही जमेल तसा सहभाग घेतात.
या सगळ्या भेटी या ’हेडगेवार हॉस्पिटल’मध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या झाल्या. परंतु बाहेर खाजगी प्रॅक्टिस करणार्या ’सेवांकुर’च्या काही डॉक्टरांना भेटायचं ठरवून निघालो. छ.संभाजीनगरमध्येच पॅथॉलॉजी लॅब असणार्या डॉ. मयूर भोसले यांना भेटायला निघालो. लॅबमध्ये गर्दी असतानाही डॉ. मयूर यांनी काही वेळ दिला. डॉ. मयूर हे ’सेवांकुर’च्या सुरुवातीपासून असलेल्या टीममध्ये होते. ’सेवांकुर’च्या उपक्रमांचा तुमच्या आयुष्यात काय बदल झाला या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ’“सेवांकुर’मुळे आम्ही ज्या भारतीयांना प्रतिज्ञेत आमचे बांधव म्हणतो त्याच्याशी आम्ही खरंच बांधवांप्रमाणे वागतो का, याची समज आली. ’सेवांकुर’मुळे आपल्या समाजात दुर्गम भागातल्या लोकांचं आयुष्य पाहायला मिळालं. त्यामुळे रोजच्या कामात आम्हाला सतत सामाजिक बांधिलकीची जाणीव राहते. आमच्याकडे जेव्हा गरीब पेशंट येतात तेव्हा आम्ही त्यांची फी अर्धीच घेतो. एकदा एक नवराबायको बाहेरगावाहून त्यांच्या लहान मुलाला घेऊन लॅबमध्ये काही तपासणी करायला आले होते. त्यावेळी त्यांचा लहान मुलगा सतत रडत होता म्हणून त्यांना मुलाला काहीतरी खायला आणा म्हणजे शांत बसेल असं सांगितलं. उपाशी असणारे ते नवरा-बायको कुठेच जाताना दिसेनात. म्हणून चौकशी केल्यावर कळालं की, त्यांच्याकडे घरी जाण्यापुरतेच पैसे आहेत. त्यावेळी आम्ही त्याची त्याक्षणी दखल घेऊन त्यांना फीचे अर्धे पैसे परत दिले. असे प्रसंग खाजगी प्रॅक्टिस करणार्या डॉक्टरांच्या आयुष्यात येतात; परंतु सेवांकुरशी संबंध आलेल्या डॉक्टरांची संवेदनशीलता नेहमी जागी राहते.” डॉ. मयूर यांनी त्यांच्या विद्यार्थीदशेतले सेवांकुरशी संबंधित अनेक प्रसंग सांगितले होते.
त्या सगळ्या गप्पांमधून सेवेचं बीज रुजवणारा ’सेवांकुर’चा नावाचा उपक्रम समाजात किती महत्त्वाचा आहे, हे लक्षात आलं. या सगळ्या डॉक्टरांच्या भेटी घेऊन संध्याकाळ झाली तरी गप्पांमधून मुलाखतीवजा माहिती गोळा करण्याचा सिलसिला थांबला नव्हता. होमीयोपॅथीचा विद्यार्थी असणारा शिवशंकर हा माझ्या बरोबर सगळीकडे दिवसभर फिरत होता. त्याने ’आज रात्री आपण एका डॉक्टरांकडे जेवायला जाणार आहोत’ असं पुढचं नियोजन सांगितलं.
एखाद्या डॉक्टरची वेळ मिळावी म्हणून ताटकळणारे आपण जेव्हा डॉक्टरांकडे जेवायला जायची संधी मिळते, तेव्हा काहीच सुचत नाही. शहराच्या एका टोकाला असणार्या डॉ. विशाल ढाकरे यांच्या घरी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्यांचा पाहुणचार बघून अजून अवाक व्हायला झालं. गेली अनेक वर्ष छ. संभाजीनगरमध्ये खाजगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर हे ’सेवांकुर भारत’च्या कोर टीममध्ये आहेत. कॉलेज जीवनापासून अनुभव सांगताना ते म्हणाले, “मी या शहरात ग्रामीण भागातून शिकायला आलेल्यांपैकी एक होतो. त्यावेळी 1997 पासून डॉ. तुपकरी सर आमच्या कॉलेजमध्ये भेटायला यायचे. आम्ही 99 साली या शहरात आलो तेव्हा आमचं कुणी तरी आहे, या विश्वासाने सरांकडे पाहायचो. त्यावेळी आम्हाला जात-पात, पक्ष, विचारधारा माहीत नव्हती. त्यावेळी महाविद्यालयात वेगवेगळ्या जातींच्या वेगवेगळ्या मेस होत्या. आम्ही मात्र कुठल्याच जातींच्या मेसला न जाता ’आदर्श’ नावाच्या सगळे जाऊ शकतील अशाच मेसला जायचो. या मेसला खाऊन कंटाळलेलो आम्ही सरांच्याकडे काही तरी वेगळं खायला मिळेल म्हणून जायचो. उन्हाळ्यात आमची सरांच्या घरी आमरस पार्टी व्हायची. सरांकडे पुस्तकांचा मोठा संग्रह होता. त्या काळात मोबाईल नव्हता. त्यामुळे पुस्तकं वाचायला आम्ही सरांकडे जायचो. त्यावेळी सर आमच्यासाठी एन्सायक्लोपीडिया होते. वेगवेगळे विषय आम्हाला कळायचे. कॉलेजनंतर माझा ’सेवांकुर’शी संपर्क तुटला. परंतु ’सेवांकुर’चं काम सुरू झालं, त्यावेळी माझ्याशी संपर्क झाला आणि मी पुन्हा जोडला गेलो. माझी खाजगी प्रॅक्टिस असलीतरी दरवर्षी ेपश ुशशज्ञ षेी परींळेप कॅम्पला माझा दवाखाना बंद ठेवून मी सहभागी होतो. ’सेवांकुर’मुळे मी कधीही व्यसनाकडे वळलो नाही. चुकीच्या मार्गाने लवकर पैसे मिळवण्याच्या मागे लागलो नाही. माझ्या कुटुंबाबरोबर समाधानाने जगतोय हे माझ्यासाठी पैशात न मोजता येण्यासारखं सुख आहे.” हे सगळं ऐकताना जेवणाच्या टेबलवर डॉ. विशाल यांच्या कुटुंबाने चालवलेला जेवणाचा आग्रह त्यांच्या सुखी आयुष्याची पावती होती. नेहमीपेक्षा चार घास जास्त खाल्यानंतरही त्यांचा आग्रह कायम होता. ‘सेवांकुर’च्या सामाजिक बांधिलकीचं बीज हे फक्त डॉ. विशाल ढाकरे यांच्यातच नाही, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबात रुजल्याचं पाहणारा त्या दिवशी मी साक्षीदार होतो.
’सेवांकुर’च्या बहरत्या वृक्ष छायेत...
’सेवांकुर’ भारतचे संयोजक असलेले डॉ. नितीन गादेवाड हे जालन्याला असतात. त्यामुळे जालन्याला जाऊन त्यांची भेट घेणं गरजेचं होतं. ती संधी जितेंद्र खंडाळकर यांच्यामुळे मिळाली. छ. संभाजीनगरवरून बस पकडून आम्ही एका तासात जालन्याला पोहचलो. जालन्यातील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजची काही मुलं ’सेवांकुर भारत’ समजून घ्यायला येणार होती. या भेटीचं नियोजन एका हॉटेलमध्ये गप्पा आणि नाश्ता अशी केली होती. त्याच हॉटेलमध्ये डॉ. नितीन आमची वाट बघत होते. ’सेवांकुर’च्या उपक्रमांमध्ये सक्रीय असणार्या सिनियर विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्युनियर मित्रांना हे निमंत्रण दिलं होतं. एका छोटेखानी हॉटेलमध्ये एक पडदा लावून प्रोजेक्टरची सोय केली होती. साधारण पंधरा-वीस मुलं आल्या नंतर सगळ्यांची ओळख करून झाली. प्रोजेक्टरवर हेडगेवार हॉस्पिटलची उभारणी कशी झाली, ’सेवांकुर’ म्हणजे नक्की काय, one week for nationचे व्हिडिओ आणि उपक्रमांची माहिती देऊन सादरीकरण झालं. त्यानंतर मुलांशी डॉ. नितीन यांनी काही गप्पा मारल्या. त्यात मुलंच बोलती झाली. मुलांनी त्यांचे ग्रामीण भागातले, रोजच्या आयुष्यातले काही प्रसंग सांगितले, त्याशिवाय प्रत्येकाने त्याच्या आवडीनिवडी सांगितल्या. साधारण तास-दोन तासात सगळे आधीपासून ओळखीचे असल्यासारखे गप्पा मारायला लागले. शेवटी डॉ. नितीन यांनी त्या सर्वांना हेडगेवार हॉस्पिटल पाहायला यायचं निमंत्रण दिलं. अतिशय सहजपणे, खाणं-पिणं, हसणं-खिदळणं होऊन ’सेवांकुरशी’ ती मुलं जोडली गेली. डॉ. नितीन गादेवाड हे माणसं कशी जोडतात हे त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिलं. पण डॉ. नितीन यांच्यासारखे अनेक जण जोडून सेवांकुरचं रोपटं लावणार्या डॉ. अश्विनी तुपकरींना भेटायचं होतं. त्यांनी दुसर्या दिवशीची सकाळची वेळ दिल्यामुळे त्या भेटीची उत्सुकता होती.
लौकिकापुरती नव्हे माझी सेवा...
अनेक वर्ष अनुभव असणारे डॉक्टर जसे दिसतात तसंच डॉ. अश्विनी तुपकरी यांना पाहताना वाटतं. डॉ. तुपकरींची केबिनही अतिशय वेगळी आहे. एखाद्या रेकॉर्ड रुममध्ये जशा फाईल्स, अहवाल यांची पद्धतशीर रचना लावलेली असते; तशीच मांडणी त्या केबिनमध्ये होती. ’सेवांकुर भारत’चे तीन आणि सहा महिन्यांचे अहवालही त्याच केबिनमध्ये ठेवलेले होते. आपल्या कामातून वेळ काढून डॉक्टरांनी मला न्याहाळत विचारपूस केली. कुठल्या प्रश्नाने कशी सुरुवात करावी या गोंधळात मी असताना डॉक्टरांनी त्यांच्या संगणकामध्ये एक ppt उघडून त्यातील मुदद्यांच्या आधारे माहिती सांगायला सुरुवात केली. आधी मला वाटलं ’सेवांकुर’ची माहिती विचारायला येणार्या लोकांना ’सेवांकुर’विषयीचं नेहमीचं काहीतरी प्रेझेंटेशन असणार... परंतु मी काही तरी नवीनच ऐकत होतो. डॉक्टर सांगत होते, व्यक्तीच्या वृत्तीमध्ये बदल होणं आणि भावात्मक जागरण होणं गरजेचं आहे. परंतु वृत्ती बदलण्यासाठी बरंच काम करावं लागतं. आपल्याकडे अडचण ही आहे की, वृत्ती तपासण्याची उपाययोजना नाही. ज्या माणसाचा IQ (बुध्यांक) चांगला तो माणूस हुशार असं समजलं जातं. हा IQ वयाच्या 6 व्या वर्षा पर्यंतच वाढतो. त्या नंतर तो एकसमानच असतो. पुढे त्यात फार फार तर 3 ते 5 % एवढीच वाढ होऊ शकते. आपल्याकडे पहिल्या 6 वर्षात मुलांचा IQ वाढावा यासाठी काहीच प्रयत्न केले जात नाहीत. परंतु जगातील हजारो लोकांचा अभ्यास झाल्यानंतर शास्त्रज्ञांच्या समोर काही अनपेक्षित गोष्टी समोर आल्या. या अभ्यासात ज्या यशस्वी लोकांच्या गुणांचा अभ्यास झाला ते शाळेत सर्वसामान्य विद्यार्थी होते. या मुलांचा बुध्यांक IQ ही साधारणच होता; परंतु त्यांचं संवादकौशल्य चांगलं होतं. नेमक्या शब्दात त्यांना बोलता येत होतं. इतरांचं बोलणं त्यांना शांतपणे ऐकून घेता येत होतं. स्वतःच्या आणि इतरांच्या भावना त्यांना ओळखता यायच्या, रागावर त्यांचं नियंत्रण होतं. या शिवाय इतर लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष न देता जणढ OUT OFF THE BOX विचार करण्याची त्यांच्यात क्षमता होती. हे सगळे गुण त्यांचा Effective Emotional Quotient (EQ) चांगला असण्याची लक्षणं होती. पुढे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की व्यक्तीच्या यशस्वी होण्यात IQ चा वाटा हा फक्त 20% एवढाच आहे, तर EQ चा वाटा हा 80% असतो.
पुढे ते ’सेवांकुर भारत’विषयी सांगताना म्हणाले की,’सेवांकुर’मध्ये Effective Emotional Quotient (EQ) वर प्रामुख्याने काम केलं जातं. यात प्रामुख्याने सहा गोष्टी आहेत.
1) Communication - यात मेडिकलचे विद्यार्थी समाजातील वेगवेगळ्या लोकांशी बोलतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेतात. या शिवाय त्यांच्यासाठी बौद्धिक सत्रे घेतली जातात.
2) Critical thinking - यात मुलांना समस्येवर मार्ग कसा काढावा हे शिकता येतं, सेवांकुरच्या कॅम्पमध्ये समस्येवर कसं उत्तर शोधायचं याचं प्रशिक्षण आपोआपच मिळतं.
3) Collaboration - यात आम्ही अनेकदा वेगवेगळे गट, वेगवेगळ्या संस्था एकत्र येऊन काम करतो यातून मुलांना शिकायला मिळतं.
4) Commitment - हा गुण मुलांना जेव्हा आम्ही वेगवेगळ्या जबाबदार्या देतो. त्यातून हळूहळू विकसित होतो.
या जबाबदार्या सतत बदलत राहतात त्यामुळे अनेक गोष्टी त्यातून शिकायला मिळतात. उदाहरणार्थ, कॅम्प आयोजित करताना, दरवेळी नवीन टीम असते.
5) Creativity - ’सेवांकुर’मध्ये प्रत्येकाला मोकळीक आहे. त्यामुळे क्रीएटीव्हिटीला वावच वाव आहे.
6) Compassion - मुलं जेव्हा वनवासी भागात, सेवावस्तीत जातात; तेव्हा त्यांच्यातील सामाजिक संवेदनशीलता जागी होते. त्यामुळे ’सेवांकुर’ कुणाला बोलवून काही शिकवण्यासाठी नाही तर सहज भेटा आणि काम करा असं साधं आहे. अशा प्रकारे एकंदर काम चालतं.”
असं बोलून डॉक्टर जेव्हा थांबले तेव्हा, ‘तुम्ही हे सगळं आधी ठरवून ’सेवांकुर’ची रचना केली की नंतर बदल करत गेलात,’ असं मी त्यांना विचारलं.
त्यावर हसून डॉक्टर म्हणाले याची सुरुवात कशी झाली सांगतो, “हेडगेवारचे आम्ही डॉक्टर दर तीन महिन्यांनी बैठक घ्यायचो, त्यात आम्हाला एका फिजिशियनची म्हणजे एमडी मेडिसिन डॉक्टरची गरज होती. आमच्याकडे त्यावेळी दोघेच होते आणि दुसरा डॉक्टर मिळत नव्हता. त्यावेळी सगळ्यांचं म्हणणं पडलं सगळे डॉक्टर पैशाच्या मागे आहेत आणि कोणीही आपल्यासारखं ध्येयाने प्रेरित नाही त्यामुळे आपण पैसे वाढवून दिले पाहिजेत. शेवटी बोलायची पाळी माझी होती. त्यावेळी मी म्हणालो, “मला हे मान्य नाही.” कारण इतिहासात पाहिलं तर बलाढ्य शत्रूपुढे मूठभर चांगले लोकच जिंकले आहेत. त्यामुळे चांगले लोक सदासर्वकाळ असतात फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाहीत. त्यावेळी मी सर्वांना विचारलं, ’‘आपण या प्रकल्पात सहभागी का झालो?” तर त्यावर दोन-तीन उत्तरं आली. कुणी म्हंटलं संघाचे विभाग कार्यवाह असलेले नवले नाना आपल्याला भेटायला यायचे, चर्चा करायचे, त्यांनी काही पुस्तकं वाचायला दिली, काही सामाजिक प्रकल्प दाखवले त्याचा आपल्यावर परिणाम झाला. त्यावर मी म्हणालो की, आपणही नवले नानासारखं करूयात, त्यांना आपण सात डॉक्टर मिळाले तर आपल्याला एकतरी डॉक्टर मिळेलच. त्यावर बाकीचे म्हणाले आपण काही नवले नानासारखे दूरदृष्टी असलेले हुशार नाही आहोत. असा वादाला वाद झाला. मग आमच्या बैठकीच्या नियमाप्रमाणे सगळे मला म्हणाले तूच कल्पना मांडली आहेस तर तूच हे काम कर. पण मी पळवाट म्हणून म्हणालो की, मी नागपूरवरून आलेलो आहे माझी इथे काही ओळख नाही. तुम्हीच इथलेच आहात. त्यामुळे तुम्हीच हे काम करा. त्यावर सगळे म्हणाले आम्ही तुला मदत करू पण तुलाच हे करावं लागेल.”
काही दिवस विचार करून मी सगळ्यांना म्हणालो की, ’आपण हे डॉक्टर मिळावा या स्वार्थी हेतूने काम केलं तर यश मिळणार नाही. तर सगळीकडे सेवाभावी डॉक्टर उपलब्ध होतील यासाठी काम करूया. म्हणजे आपल्या संपर्कात आलेला मुलगा त्याने आपल्याकडेच काम केलं पाहिजे हा निकष राहणार नाही. त्याने दुसरीकडे जाऊन चांगलं काम केलं तर आपली चळवळ यशस्वी झाली असं म्हणू या. नाहीतर मी एक लेबर कॉन्ट्रॅक्टरसारखा वाटून लोक म्हणतील हा आला आता डॉक्टर पकडायला आणि घेऊन जायला. त्यावर सगळ्यांनी मान्यता दिली. त्याकाळात माझं आध्यात्मिक वाचन बरचं झालं होतं त्यामुळे मला वाटायला लागलं की या कामात आपण जितके नि:स्वार्थी होऊ तितकं जास्त यश मला मिळेल. त्यामुळे माझा मी जिथे तिथे कमी केला. त्यामुळे मी विद्यार्थांना भेटायला जायचो हे न सांगता हेडगेवार हॉस्पिटलचे डॉक्टर भेटायला जात होते असंच सांगतो. ज्यावेळी आम्हाला पहिल्यांदा पुरस्कार मिळला त्यावेळी आयोजकांना माझ्याऐवजी डॉ. नितीन गादेवाड येतील असं सांगितलं. त्यामुळे या कामात व्यक्तिमहात्म्य वाढणार नाही असंच आम्ही पाहिलं आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या उपक्रमात प्रमुख बदलले जातात. पुढे विद्यार्थ्यांनी केलेल्या कामामुळे या उपक्रमाला नवीन धुमारे फुटले. यात कोणत्याही व्यक्तीचं विशेष असं काही योगदान नाही. असं म्हणून डॉक्टरांशी चाललेल्या तासभराच्या गप्पा संपल्या. ’सेवांकुर’च्या अंकुराला लावून त्याची काळजी घेऊन जेव्हा त्याचा वटवृक्ष बहरत आहे त्यावेळी डॉक्टर तुपकरी, ‘माझं त्यांत काही विशेष योगदान नाही’ असं म्हणतात त्यावेळी तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवला
लौकिकापुरती नव्हे माझी सेवा ।
अनन्य केशवा दास तुझा ॥1॥
म्हणऊनि करीं पायांसवें आळी ।
आणीक वेगळी नेणें परी ॥
एकविध आम्ही स्वामिसेवेसाठी।
वरी तोचि पोटीं एकभाव ॥2॥
तुका म्हणे करीं सांगितलें काम ।
तुम्हां धर्माधर्म ठावे देवा ॥
‘सेवांकुर भारत’ उपक्रम समजून त्यावर लिहायला आलेल्या माझ्यातही त्या पाच-सहा दिवसांतच नकळत अनेक बदल झाल्याचं जाणवतं होतं. इतकी नि:स्वार्थी भावना ठेवून जोडीला प्रपंचही नेटका निभावत काम करणारी माणसं असू शकतात यावर विश्वास बसत नाही. लोकांच्या बिघडलेल्या स्वास्थासाठी म्हणून काम करणारी ‘सेवांकुर’ची माणसं नकळत समाजाच्या बिघडलेल्या सामाजिक स्वास्थ्यावरही काम करत आहेत. या कामाचा जवळून अनुभव घेतल्यानंतर लेखातून हे सगळं मांडताना तुकाराम महाराजांचाच आणखी एक अभंग आठवला -
अनुभवे आलें अंगा । तें या जगा देतसे ॥1॥
नव्हती हाततुके बोल । मूळ ओल अंतरिंची ॥
उतरूनि दिसे कशीं । शुद्धरसीं सरे तें ॥2॥
तुका म्हणे दुसरें नाहीं । ऐसी ग्वाही गुजरली ॥3॥