संघाला राष्ट्रबांधणीचे काम करावयाचे आहे

विवेक मराठी    26-Mar-2025
Total Views |

rss
राष्ट्रीयत्वाचा अभाव व संघटनेचे दौर्बल्य या दोन गोष्टींमुळे भारतभूमी पारतंत्र्यात असण्याच्या काळात संघसंस्थापक परमपूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून राष्ट्रबांधणीचे कार्य केले. त्या रा.स्व.संघाचे यंदाचे वर्ष हे शताब्दी वर्ष आहे. शंभर वर्षाच्या वाटचालीत संघ नित्यवर्धिष्णू राहिला आहे आणि सर्वस्पर्शी झाला आहे. आज समाजाच्या सर्व स्तरात संघकार्याविषयी कुतूहल आहे आणि जोडले जाण्याची इच्छाही. 1937 साली केलेल्या भाषणात परमपूजनीय डॉक्टरांनी संघाच्या स्वरूपाविषयी, संघ स्वयंसेवकांविषयी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. हे विचार आजही समजून घेण्याजोगे, आत्मसात करण्याजोगे आहेत.
आपण या ठिकाणी सर्व कार्यक्रम बैठकीच्या स्वरूपात चालवला असल्यामुळे मी स्वतःचे विचार बसूनच सांगतो. ही काही परिषद नाही; परंतु चर्चा व विचारविनिमय करण्याची बैठक आहे. आपण सर्व या ठिकाणी आस्थापूर्वक आलात व संघनिष्ठा व्यक्त केली. आपल्या जवळून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसून केवळ अंतःकरणाची अपेक्षा आहे.
 
 
मला आपणासमोर ’संघस्थापनेचा’ इतिहास सांगावा अशी सूचना आली आहे. जे कार्य प्रत्यक्ष आपल्यासमोर चालले आहे व आपण अनुभवीत आहात ते कार्य आपल्याला पटलेले असले म्हणजे झाले. मग त्याचा इतिहास कळणे न कळणे माझ्या मते विशेष महत्त्वाचे नाही.
 
 
’राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची स्थापना 1925 साली झाली. तेव्हा त्याच्या पूर्वपीठिकेचा काळ कितीतरी मागे नेता येईल. कारण 1914 साली मी विद्यार्थिदशेतच होतो. याच वर्षी मी डॉक्टरीची परीक्षा पास झालो. यापूर्वी कितीतरी वर्षांपासून हे विचार मला त्रास देत होते. मला इतिहासाचा फार नाद होता आणि त्यामुळेच मला संघाची कल्पना आली. हिंदुस्थानच्या इतिहासावरून हिंदुस्थान हिंदूंचा देश आहे हे कोणाच्याही लक्षात आल्यावाचून राहणार नाही. हिंदुस्थानात हिंदू केव्हापासूनच मालकीच्या नात्याने नांदत आहेत. मुसलमान व ख्रिश्चन या देशात केव्हा व कसे आले? सध्या ख्रिश्चन व मुसलमान इत्यादिकांची संख्या किती? त्यांची भरभराट कशी झाली? व हिंदुस्थानची राज्यपद्धती कशी? इत्यादींची सर्व माहिती कुणालाही इतिहासावरून होते.
 
 
vivek
 
मला इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानात आहे याचा बरेच वर्षांपर्यंत भास होत नसे. कारण तो नागपूरकर भोसल्यांचा वैभवाचा काळ होता. जेव्हा ते बाहेर पडत, तेव्हा त्यांचा लवाजमा, सरदार इत्यादीसहित ते बाहेर पडत तेव्हा ’सरकारस्वारी फिरावयास निघाली’ या शब्दप्रयोगाचा प्रघात पडला होता. त्याचप्रमाणे सध्याच्या राजवाड्याला ’सरकारवाडा’ व कोठीला ’सरकारकोठी’ हे शब्दप्रयोग होते. वरील पूर्वीच्या प्रघातामुळे नागपूरवर भोसल्यांचे राज्य हे भासत होते. परंतु काही काळानंतर हे बुद्धिबळातील राजे करण्यात आले. तेव्हा हा अन्याय काढून टाकला पाहिजे अशी प्रथम आकांक्षा माझ्या मनात उत्पन्न झाली. लहान मंडळीत हे विचार बोलून बरेचदा त्यांच्यात रममाण व्हावे परंतु त्यांच्यात हे विचार टिकत नसत. त्यानंतर मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना मी सर्वांच्याकडे जाऊन बरीच चर्चा करावी, परंतु यावे तसे यश त्याला आले नाही. काही लोकांच्याकडून शाब्दिक सहानुभूती मिळत असे शेवटी स्वतःच्या कल्पना स्वतः डॉक्टर होऊनच लोकांच्यासमोर मांडाव्यात अशा इष्टमित्रांच्या सल्ल्यामुळे तूर्त काही काळ मला स्तब्ध राहावे लागले.
 

rss 
 
विजयादशमीच्या सुमुहूर्तावर मूर्त स्वरूप आले
 
इ. स. 1914 चा हिंदुस्थानचा काळ! त्या वेळी इंग्लंड व जर्मनी यांचे तुमुल युद्ध सुरू होते. अशा वेळी देशात नवीन कार्य सुरू करण्यासारखी परिस्थिती मुळीच नव्हती. इ. स. 1918 साली महात्मा गांधींचा काळ सुरू झाला. देशात त्यांचे राज्य सुरू झाले व 1920 साली त्याचे परिणामही दिसू लागले. अशा सर्व अडचणीत मला त्रास देत असलेले विचार सत्यकृतीत उतरवणे शक्य झाले नाही. कलकत्त्याहून नागपूरला आल्यानंतर एक स्वयंसेवक संघ काढावा हे निश्चित ठरले व शेवटी 1925 साली विजयादशमीच्या सुमुहूर्तावर याला मूर्त स्वरूप आले. कल्पना हीच की ऐतिहासिक काळातसुद्धा अखिल भारतीय संघटनेचे प्रयत्न झाले नाहीत, ते फक्त शिवरायांशिवाय कोणी केले नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या हातून घडलेल्या चुका इतिहासकाळी व वर्तमानकाळी पुन्हा होऊ न देण्याचा मनाशी निश्चित विचार करून शत्रूमध्ये वसत असलेल्या गुणांचे अनुकरण करून अखिल भारतीय संघटनेचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने स्वयंसेवक संघ काढला. शत्रूमध्ये वसत असलेल्या गुणांचे अनुकरण करण्यात मला मुळीच कमीपणा नाही आणि म्हणूनच ईश्वराने इंग्रजासारखा शत्रू आपल्या देशाच्या सहवासात पाठवला असे मला वाटत असे.
 
 
इंग्रज हिंदुस्थानात राज्य कमावण्याच्या दृष्टीने मुळीच आले नव्हते. मुसलमानांनी हिंदूंवर राज्य केले. परंतु इंग्रजांनी राज्यतृष्णेच्या हेतूने कंपनी काढली असे मी म्हणावयास तयार नाही. हिंदुस्थानात काही काळ घालवल्यानंतर ज्या वेळी येथील राजकारणाचा त्यांनी अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की येथील स्थानिक राज्यकर्ते आपापसातच राज्य स्थापनेकरता लढत आहेत. राष्ट्रीयत्वाचा अभाव व संघटनेचे दौर्बल्य या दोन गोष्टींनीच आपला घात केला. हिंदुस्थानच्या इतिहासाला काय म्हणावे हेच समजत नाही. दुकानदारी सोडून संपूर्ण हिंदुस्थान पादाक्रांत करू असे राजकारणात हात घातल्यावर इंग्रजांना वाटले.
 
 
अशा परिस्थितीत आपण पूर्वी होतो. आजही आपल्यात हिंदुत्वाचा अभाव व सांघिक शक्तीचे दौर्बल्य तीव्रतेने भासत आहे. आपल्याला या गोष्टी दूर करण्याकरता दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी पिऊन चालणार नाही.
 
 
सुरवातीला आपल्या संघटनेत वीस माणसे घेतली. त्रिविध पद्धती जी सर्वत्र शाखेत चालू आहे; तीच ठरवून कार्य चालू ठेवले. सुरवातीला घटना व नियम करण्याच्या भानगडीत पडू नये असे वाटले व नैसर्गिक तर्कशुद्ध वागणुकीने कार्य चालवले. जोपर्यंत नावे इत्यादी लक्षात ठेवणे शक्य होते तोपर्यंत तसेच कार्य चालू ठेवले व जेव्हा ती गोष्ट स्मरणशक्तीच्या बाहेरची असे वाटावयास लागले तेव्हा लिखाण सुरू केले.
 
संघाचे नामकरण
 
विजयादशमीनंतर सहा महिन्यांनी या स्वयंसेवक संघाचा नामकरण विधी करावा असे वाटले व तो ‘गुढीपाडवा’ वर्षप्रतिपदेला सुखरूप पार पडला. नाव ठेवण्याची आवश्यकता का भासली? सहा महिने संघ कार्य केल्यानंतर आपण व्यवस्था कशी करू शकतो हे ओळखण्याकरता व अनुभवण्याकरता वर्षप्रतिपदेला रामटेकच्या यात्रेस जाण्याचे ठरले. तेव्हा साहजिकच लोकांनी असा प्रश्न विचारणे नैसर्गिक होते की; हे लोक कोण? कुठले? याचे नाव, गाव इ. काय? म्हणून नाव ठेवण्याविषयी आम्ही बरीच चर्चा केली. सर्व लोकांचा भर याचे नाव ’महाराष्ट्र स्वयंसेवक संघ’ ठेवावे यावर पडला. परंतु आपली संघटना ही संपूर्ण हिंदुस्थानव्यापी करावयाची होती, म्हणून ते सार्थ वाटेना ! आपले कार्य व्यापक आहे. व आपले नाव त्याच्या व्यापकतेच्या आड येऊ नये म्हणून ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ हे नाव धारण करून आम्ही रामटेकच्या यात्रेला गेलो.
 
 
त्यानंतर ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ नाव का असावे? ’हिंदू स्वयंसेवक संघ’ का असू नये? हा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा मी त्याचे असे समर्थन केले की, रशियात एखादी हिंदूंची ’कॉलनी’ असली व तिच्या संरक्षणार्थ एखादे स्वयंसेवक दल निर्माण करण्याची आवश्यकता भासली असती तर त्या दलाला हिंदू स्वयंसेवक संघ हे नाव योग्य होईल. परंतु हा आपला देश हिंदूंचा असल्यामुळे येथील हिंदू हा राष्ट्रीय आहे व त्याच्या हितार्थ होणारी कोणतीही चळवळ ही राष्ट्रीयच. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
 
संघ निर्माण करणे क्रमप्राप्तच होते
 
हिंदुस्थानच्या संरक्षणाकरता स्वयंसेवक संघ. त्यात मुसलमान, ख्रिश्चन, इंग्रज किंवा इतर परदेशीय, परधर्मीय लोक असते किंवा नसते तरी आपल्या हिंदू समाजाला असा संघ निर्माण करणे क्रमप्राप्तच होते.
 
त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा व राजकारणाचा काही संबंध आहे काय? असे विचारले असता त्याला उत्तर हेच की संघ त्यात भाग घेत नसला तरी राजकारणाचा, समाजकारणाचा, धर्मकारणाचा ही संघटना अभ्यास मात्र करेल.
 
 
जर आपल्या हिंदुस्थानच्या कल्याणाच्या कोणत्याही कल्पना या संघटनेच्या मनात आल्या तरी आपली संघटना कोती आहे, दुर्बल आहे म्हणून ती करू शकत नाही अशी पाळी येऊ नये, एवढीच पवित्र, स्वाभिमानी, उज्ज्वल व तेजस्वी भावना हृदयाशी बाळगून ही संघटना जास्तीत जास्त प्रबल, प्रभावी, रंगविरहीत कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्याकडे या हिंदुराष्ट्राकरता या ऐहिक जगात स्वाभिमानाने मर्दासारखे उजळ माथ्याने जगण्याकरता जे जे काही करावे लागेल ते ते सर्व करण्याचे या संघटनेने ठरवले आहे. हे कार्य किती मोठे आहे? आणि याच्याकरता किती झटले पाहिजे हे आता मी सांगावयास नको. सूज्ञ, विचारी, बुद्धिप्रधान, हिंदू तरुण या कार्यार्थ स्वतःला वाहून घेईल असा माझा आत्मविश्वास आहे.
 
 
स्वातंत्र्याचे प्रश्न एका पिढीत सुटत नसतात. पिढ्यान् पिढ्या याकरता प्रयत्न करावे लागतात किंवा वर्ष-सहा महिन्यांत हे सुटतात अशा दोनही लोकांचा व माझा मतभेद आहे. मला तिसर्‍या प्रकारचे लोक पाहिजे आहेत. ’याचि देही, याचि डोळा’ मी ही संघटना प्रभावी झालेली पाहीन, अशी प्रतिज्ञा करून तिच्याकरता अहर्निश तनमनधनपूर्वक झटणारे लोक मला प्रिय आहेत. तेव्हा पिढ्यान् पिढ्या हे करावे लागतात असे माझे मत नाही किंवा हे आपण चुटकीसरशी सोडवू असे मी प्रतिपादन करत नाही, हे आपण विसरू नये. संघटनेचे कार्य ज्या जोमाने सुरू झाले आहे तो जोम आम्ही टिकवू व पार पाडू या निश्चयाने कार्य करा.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्राच्या बांधणीचे काम करायचे आहे. याकरता प्रत्येक हिंदू तरुण पुढे आला पाहिजे. प्रत्येक तरुणाने हे कार्य निःस्वार्थ बुद्धीने करावे. ही संघटना राष्ट्राला समर्थ बनवण्याकरता आहे. आपल्याला राष्ट्र सामर्थ्यवान करण्याचे मोठे कार्य करण्याचे आहे. संघ मुळाशी जाऊन कार्य करत आहे हे कार्य केल्याने बाकीचे सर्व प्रश्न सहज सुटतील. परंतु आपण कार्य समजावून घेतले पाहिजे. संघाला कोणत्याही कार्यक्षेत्रात उतरायचे नाही. To live and let live हे आपले धोरण असल्यामुळे यापासून कुणालाही डर नाही.
 
स्वयंसेवकाची वागणूक अत्यंत सुंदर पाहिजे
 
संघाच्या स्वयंसेवकाची वागणूक अत्यंत सुंदर पाहिजे. तो लोकांच्या नजरेत भरला पाहिजे. तो कार्य करत असताना त्याची लोकांवर छाप पडली पाहिजे. संघात भाग घेताना सरकारी नोकर भितात. संघावर एकंदर दोन ’सर्क्युलर्स’ (13 डिसेंबर 1932, 20 डिसेंबर 1933) निघाली.
 
1) संघ जातीय आहे म्हणून सरकारी नोकर निःपक्षपातीपणाने कार्य करणार नाहीत. म्हणून सरकारी नोकरांनी यात भाग घेऊ नये.
 
 
2) वरील कारणास्तव म्युनिसिपल, डिस्ट्रिक्ट कौन्सिलच्या लोकांनी यात भाग घेऊ नये. परंतु त्यावर कौन्सिलमध्ये वाद होऊन प्रश्नोत्तरे झाली व आता त्या सर्क्युलर्सना A Dead letters शिवाय काहीही किंमत नाही. ते कोणताही दोष दाखवू शकले नाहीत.
 
 
आपण ज्या परिस्थितीत जगत आहोत, तीत व इतर परकीय देश यात बराच फरक आहे. म्हणून संघटनेचे कार्यसुद्धा निराळ्या पद्धतीने व काळजीपूर्वक Colourless केले पाहिजे. परकीय देश स्वयंशासित आहेत. आपण पारतंत्र्यात आहोत. हे जागरूकपणे ध्यानात ठेवून कार्य शक्य तितक्या अल्पावधीत केले पाहिजे. आपल्या असंघटितपणावर व दौर्बल्यावर राजसत्ता नेहमी टिकत असते. यावरून केवळ संघटनेत काय सामर्थ्य आहे, हे आपण ओळखले पाहिजे. म्हणून हे संघटन अत्यंत सुरक्षित पार पाडण्यात आपणा सर्वांचे कौशल्य आहे. आपण संघटना कितीही कायद्यात Colourless केली तरी हिने समाज सामर्थ्यवान होतो; हे राजसत्ता कधीही विसरत नाही. आपण संघटना कितीही सोवळी केली तरी ती राजसत्तेला आवडणार नाही. संघटनेवर या लोकांना हात चालवता येऊ नये इतके काळजीपूर्वक आपण काम केले पाहिजे. वरिष्ठ हिंदू सरकारी अधिकार्‍यांना ती कशी वाटते? ते अंतःकरणापासून हिच्यावर प्रेम करत असतात. परंतु त्यांना ते व्यक्त करता येत नाही. इंग्रज अधिकार्‍यांनाही स्थिती कळते. म्हणूनच ते आपल्या हाताखालच्या अधिकार्‍यांजवळ तिची प्रशंसा करतात. परंतु ती दिखाऊ असते. ज्या वेळी एखाद्या इंग्रज अधिकार्‍याने हिची प्रशंसा केली त्या वेळी त्यापासून मी हिची जास्त काळजी घेण्याचा बोध घेतो. माझ्या एका हिंदू सरकारी अधिकार्‍याने हिच्या संरक्षणार्थ दोन गोष्टी सुचवल्या -
 
1) स्वयंसेवकाने राजनिष्ठेची शपथ घ्यावी.
 
2) इंग्रज अधिकार्‍यास भेट देण्यास बोलवावे. परंतु काही वेळ विचार केल्यानंतर त्याच गृहस्थाने, चालली आहे हीच स्थिती उत्तम आहे कारण या दोन्ही गोष्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ध्येयाला व तेजस्वी बाण्याला शोभत नाहीत, असे सांगितले.
 
 
संघाच्या स्वयंसेवकाने व्यक्तिशःसुद्धा चूक होऊ देऊ नये. नेहमी वाट फुंकून पाऊल टाकावे. आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण करून बोलावे. प्रत्येकाने स्वतःला संघटनेशी पूर्ण तादात्म्य करून घ्यावे.
 
त्याग, कुणी कुणाकरता व का करावयाचा?
 
यानंतर शेवटी मला त्यागासंबंधी दोन शब्द सांगायचे आहेत. प्रत्येक स्वयंसेवकाची त्यागासंबंधी काहीतरी विचित्र कल्पना असते. प्रथम त्याग, कुणी कुणाकरता व का करावयाचा? कुटुंबाकरता कुटुंबाच्या घटकांनी एखादी गोष्ट केल्यास त्याला आपण त्याग म्हणू काय? ते त्याचे कर्तव्य ठरेल. ते त्यानेच केले पाहिजे. मी संघाच्या कार्याला शक्य ती मदत करीन, हे संघाच्या विचारसरणीत बसत नाही. यावरून हे कार्य आपले स्वतःचे नसून आपण दुसर्‍याला मदत करतो असे आपण दर्शवतो - हे वाक्य आत्मीयपणाचे राहू शकत नाही. संघ व्यक्ती यांची एकात्मता व तन्मयता व्हावयास पाहिजे.
 
त्याचप्रमाणे कार्य करत असताना सर्व गोष्टींचा सारासार विचार केला पाहिजे. स्वयंसेवकाला सर्व व्यवहाराची आवश्यकता आहे. म्हणून संघकार्य करत असताना हे शरीर कार्यक्षेत्र कसे होईल - याहीकडे लक्ष पुरवले पाहिजे - संघाचा स्वयंसेवक असला तरी त्याला अन्नवस्त्राची आवश्यकता ही आहेच.
 
तात्पर्य, स्वयंसेवकाने सर्व गोष्टी व्यवहारचातुर्याने पार पाडून उत्तरोत्तर संघकार्य करण्याकडे लक्ष पुरवले पाहिजे.
 
पूर्वप्रकाशित - ’ईस्टर कँप’, अकोला, येथे दि. 28 मार्च 1937 साली झालेले संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांचे भाषण