लक्ष्मीकान्त माळवदकर 9423774727
स्वयम् शिक्षण प्रयोग (एसएसपी) ही स्वयंसेवी संस्था महाराष्ट्रासह सात राज्यांत कृषी, जलस्वच्छता, ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आदी क्षेत्रांत भरीव कार्य करत आहे. विशेषतः ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना व्यवसाय व उद्योजकतेचे संस्कार दिले आहेत. या माध्यमातून असंख्य महिला स्वयंसिद्वा झाल्या आहेत.
ग्रामीण लोकांचे शहरी भागात होणारे स्थलांतर थांबावे, स्थिर व समाधानी आयुष्य जगावे यासाठी त्यांना शेतीपूरक व्यवसाय व उद्योगस्नेही बनविण्यासाठी दिवंगत प्रेमा गोपालन यांनी ‘स्वयम् शिक्षण प्रयोग‘ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, केरळ, गुजरात, आसाम व ओडीशा या राज्यात संस्थेचे कार्य सुरू आहे. महाराष्ट्र राज्यात गडचिरोली, वर्धा, अमरावती, नांदेड, धारशिव, लातूर, सोलापूर, पुणे आदी जिल्ह्यांतही संस्थेने जाळे पसरवले आहे. संस्थेच्या माध्यमातून आजतागायत कृषी, अकृषी व कृषी आधारित व्यवसाय-उद्योगांद्वारे सुमारे 95 लाख महिला या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. या महिलांना व्यवसाय व उद्योगाचे धडे मिळावे यासाठी संस्थेतर्फे दहा दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते. कृषी आधारित व्यवसायातल्या नव्या संधी मूल्यवर्धन व मूल्यसाखळी विकसित करण्यात संस्थेने महिलांना नेहमीच पाठबळ दिले आहे. ग्रामीण भागातील शुद्ध उत्पादने शहरी भागात कसे विकायचे याचे विक्रीतंत्र महिलांनी आता आत्मसात केले आहे. व्यावसायिक व उद्योजकीय पार्श्वभूमी नसलेल्या महिला आज शेतात पिकलेल्या मालावर प्रक्रिया करून जास्तीचा फायदाही कमवत आहेत. संगणक व मोबाईलच्या माध्यमातून विविध योजना मिळवून देण्यात व माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी या महिला सक्षम झाल्या आहेत. आज या महिला कृषी, उद्योग व ग्रामविकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
दुष्काळग्रस्त भागातील आयाबायांची गोष्ट
धाराशिव हा दुष्काळी व स्थलांतरासाठी ओळखला जातो. अशा या जिल्ह्यातील काही महिलांनी स्वयम् शिक्षण प्रयोगाच्या माध्यमातून शेती व पूरक व्यवसायात प्रगती घडवून आपला विकास साधला आहे. तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे राहणार्या गोदावरी डांगे यांची कहाणी ही अशीच एक आहे. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. पदरी दोन मुले असतानाच वयाच्या 20व्या वर्षी पती श्रीधर यांचे निधन झाले. तेव्हा प्रेमा गोपालन यांनी त्यांना स्वयम् शिक्षण प्रयोग संस्थेत आणले. याठिकाणी गोदावरी यांनी वक्तृत्व व नेतृत्व गुण संपादन केले. त्यानंतर त्यांनी एका बचतगटाची स्थापना करून ग्रामीण महिलांचे संघटन केले. पुढे सर्व महिलांना एकत्र आणून ग्रामीण भागातील पहिल्या महिला फेडरशेनची स्थापना केली. या अंतर्गत सुमारे 10 हजारांहून अधिक महिला संघटित झाल्या आहेत. अनेक गावातील महिला शेळीपालन, कुक्कुटपालन, सेंद्रिय शेती व इतर पूरक व्यवसाय सुरू करून स्थिर जीवन जगत आहेत. महिला सक्षमीकरणात योगदान देत त्यांनी गेल्या वीस वर्षात 20 पेक्षा जास्त देशांचा प्रवास केला आहे. विविध जागतिक व्यासपीठांवर महिलांच्या समस्या व उपाय मांडले. संयुक्त राष्ट्रसंघ, युएऩडीपी, जागतिक बँकेतही त्यांनी आपले विचार व अनुभव मांडले आहेत. ‘ग्रुटस् इंटरनॅशनल‘ या जागतिक संघटनेच्या त्या लीडर म्हणून कार्य करतात.
“माझ्यासारख्या अनेक महिलांतील स्व-जागे करून त्यांना देशपातळीवर न्यायचे आहे,“ असा त्यांचा उदात्त विचार आहे. गोदावरीताई आजही सतत क्रियाशील राहतात. अनेकींसाठी त्या प्रेरणास्त्रोतही बनल्या आहेत.
हिंगळजवाडी (ता.जि. धाराशिव)च्या कमल कुंभार वीस वर्षांपूर्वी संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. व्यावसायिक ते उद्योजक असा त्यांचा यशस्वी प्रवास सुरू आहे. 1999 साली त्यांनी संत गोरोबाकाका सखी बचतगटाची निर्मिती केली. प्रारंभी 100 महिलांना घेऊन त्यांनी बांगड्यांचा व्यवसाय सुरू केला. 2009 साली एम.एस.ई.बी.चं बिलवाटपाचे कंत्राट मिळवले. कुंभार यांनी प्रथम सुरू केलेल्या कुक्कुटपालन, शेळीपालन व ससेपालन सारख्या शेतीपूरक व्यवसायातून इतर महिलांना प्रोत्साहन मिळाले. यातून त्यांनी 2015 साली कमल पोल्ट्री व एकता सखी कंपनीची स्थापना करून परिसरातील पाच हजारांहून अधिक महिलांनाही या व्यवसायात सहभागी करून घेतले. या माध्यमातून कडकनाथ कोंबडीपालन, अंडी उबविणे, पिलांची विक्री करणे अशा कामांतून व्यवसायाचा विस्तार केला. याद्वारे महिलांची साखळी तयार केली. व्यवसायातील बारकावे शिकत त्यांनी बचतगटाचे एकता सखी कंपनीत रूपांतर केले. यामुळे निव्वळ शेतमालावर अवलंबून असणार्या महिलांना पूरक व्यवसायाची वेगळी वाट निर्माण करून दिली. जेव्हा अक्षय ऊर्जेशी संबंधित योजना परिसरात आली तेव्हा कमल कुंभार यांनी ‘ऊर्जा विशेषज्ञ’ म्हणून प्रशिक्षण घेतले. त्यांच्या पुढाकारातून सौर ऊर्जा व्यवसाय उभा राहिला. त्यातून धाराशिव जिल्ह्यातील सुमारे तीन हजारांपेक्षा अधिक घरे प्रकाशमय झाली आहेत. ग्रामीण महिलांमध्ये कृषी उद्योजकता निर्माण व्हावी यासाठी कुंभार यांनी 3 हजारांहून अधिक महिलांना प्रशिक्षण देऊन प्रोत्साहित केले आहे. या सर्व कामाची दखल घेत कमल कुंभार यांना नीती आयोगाने ‘वुमन ट्रान्सफार्म’ तर संयुक्त राष्ट्र संघाने ‘इक्वेटर’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

अनसुर्डा (ता. धाराशिव) येथील अर्चना माने या 2007 पासून संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. 2012 ते 2016 या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. तेव्हा माने यांनी ‘सेंद्रिय शेतीचे एक एकर मॉडेल‘ तयार केले होते. या एक एकरासाठी त्यांनी गोमूत्रापासून गोमूत्र अर्क, दशपर्णी अर्क, गांडूळखत याची निर्मिती आपल्या शेतातच सुरू केली. यातून त्यांनी भाजीपाला, कडधान्य, गहू, ज्वारी यासह विविध प्रकारची पिके घेतली. 2014 पासून त्या सेंद्रिय शेती करत असून त्यांना उत्कृष्ट सेंद्रिय शेतीसाठी 27 प्रकारची विविध पारितोषिक मिळाली आहेत. शिवाय शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी सुरू केलेला गांडूळखत उत्पादन व कुक्कुटपालनापासून मिळणार्या उत्पन्नामुळे त्यांच्या शेतीला मोठा आधार ठरला आहे. अर्चना माने यांनी केलेल्या कार्याची दखल घेत तत्कालीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते उत्कृष्ट कृषी उद्योजिकेचा पुरस्कार मिळाला आहे.
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उद्यमशीलतेचे विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबविले जात आहेत. गेल्या सहा-सात वर्षात शेतकरी महिलांच्या आठ सखी शेतकरी उत्पादक कंपन्या, 5800 महिला समभागधारक व कार्यकारी मंडळ निर्माण झाले आहे. या कृषी उत्पादक कंपन्या स्वतंत्ररित्या कार्यरत आहेत. विविध उत्पादने बाजारात विकत आहेत व फायदाही मिळवत आहेत. यासाठी स्वयम् शिक्षण प्रयोग संस्थेचे पाठबळ मिळत आहे.
लातूर येथील स्वयम् सखी शेतमाल उत्पादक कंपनीच्या संचालिका अंजली मसलकर सांगतात, “शेतमालाचे मूल्यवर्धन करून मालाची विक्री महिला करतात. आता आमच्या महिला दुग्धव्यवसायाकडे वळल्या आहेत. दररोज दहा हजार लिटरपेक्षा जास्त दुग्धवितरण होत असून महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे.“
सविता रूंजे या नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील संघाची वाडी या छोट्याशा गावच्या सखी. रूंजे यांनी ग्रामपंचायतीसोबत काम करून गावाला स्वच्छ व हागणदारीमुक्त केले आहे. शिवाय महिलांना सखी अन्नसुरक्षा शेतीच्या उपक्रमातून बियाणे, खते व कीटकनाशकात स्वयंपूर्ण केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शुभदा देशमुख यांचे कार्यदेखील प्रेरक आहे. आदिवासी महिला बचतगट व आरोग्य क्षेत्रात त्यांचे कार्य आहे. कमलताई, गोदावरीताई, अर्चनाताई, अंजलीताई यांच्यासारख्या किमान 20 हजार नेतृत्व करणार्या महिला हिच स्वयम् शिक्षण प्रयोगची संपत्ती आहे. आज या आयाबाया ग्रामीण महिलांच्या प्रेरणास्थान बनल्या आहेत.