भारतीय कालगणनेची पद्धत ‘भारतीय ज्ञानप्रणाली’ म्हणजेच Indian Knowledge Systemचे फलित आहे. ह्या नववर्षाला ‘हिंदू नववर्ष’ म्हटले जाते. ‘हिंदू’ म्हणजेच ''Indic'’ म्हणजेच ‘भारतीय’. ‘हिंदू’ मध्ये जैन, बौद्ध, शीख आदि सर्व संप्रदायांचा समावेश होतो. त्यामुळे या वर्षी भारतीय ज्ञानपरंपरा जाणून घेण्याची गुढी प्रत्येकाने उभी करायचा संकल्प सोडावा!
चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे - शुक्ल प्रतिपदेला, अर्थात पाडव्याला आपले नवीन वर्ष सुरू होते. हा सण महाराष्ट्रात पाडवा, कर्नाटक आणि आंध्रात युगादी, सिंधमध्ये चेत्ती चांद आदी नावांनी साजरा होतो. उंच गुढी उभी करून, सजवून, इंद्रध्वज म्हणून, तिची पूजा केली जाते. नवीन वर्षात आपल्या राष्ट्राचे रक्षण करावे, वेळेवर पाऊस यावा अशी प्रार्थना इंद्रदेवाला केली जाते. ह्या परंपरेचा उल्लेख महाभारतात उपरीचर राजाच्या कथेत आला आहे. ह्या उत्सवाचे वर्णन ‘गाथा सप्तशती’ ह्या इसवी सनाच्या पहिल्या शतकातील महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतील काव्यसंग्रहातही आले आहे.
वर्षगणनेच्या मागे आकाशाचे निरीक्षण, नक्षत्रप्रणाली, ऋतूंचा अभ्यास, त्यांच्या नोंदी, गणित, भूमिती असे मोठे विज्ञान आहे. त्यामधून वर्षाचा कालावधी, त्यातील महिने, महिन्यांचा कालावधी, दिवसांची नावे ठरवली गेली. वर्षाची सुरुवात एका ठरावीक दिवसापासून केली गेली. आपण ती चैत्र पाडव्याला (आणि काही गणनेत दिवाळीतील पाडव्याला) करतो.
येत्या पाडव्याला शालिवाहन शके 1947 अथवा युगाब्द 5126 सुरू होत आहे. वर्ष मोजण्याची युगाब्द गणनेची सुरुवात कलियुगाच्या आरंभापासून केली आहेे. ज्या दिवशी अनेक ग्रह एका ठरावीक ठिकाणी एकत्र आले होते, तिथपासून कलियुगाची सुरुवात मानली गेली. त्या आधीची वर्षे द्वापारयुगातील होती. त्याच्या आधीची वर्षे त्रेतायुगातील होती. त्याही आधीची वर्षे सत्ययुगातील होती. अशा पद्धतीने गणना केल्याने एखाद्या वर्षाला - कलियुगपूर्व 5वे वर्ष, कलियुगपूर्व 53वे वर्ष असे म्हणावे लागत नाही! त्याला स्वत:चे नाव असते.
त्याही पलीकडे जाता, सत्ययुगाच्या आधीची वर्षे - त्या पूर्वीच्या महायुगाच्या कलियुगाची म्हणून गणली जातात. ह्या पद्धतीने जवळपास 8 अब्ज वर्षे मोजता येतात. सध्या ब्रह्माच्या 51व्या वर्षाच्या, श्वेतवराह कल्पातील, वैवस्वत मन्वंतरातले, 28व्या महायुगातील कलियुग चालू आहे.
ढोबळमानाने सांगायचे तर, या कालगणना पद्धतीत - सूर्य - चंद्रातील अंशानुसार तिथी, चंद्राच्या कलेनुसार शुक्ल वा कृष्ण पक्ष, 30 तिथींचा एक महिना, 12 महिने /12 पौर्णिमांचे एक वर्ष. सौर वर्षाशी हे गणित जोडायला दोन-अडीच वर्षांनी एक अधिक मास येतो. प्रत्येक तिथीचे नाव चंद्रकलेवरून, प्रत्येक वाराचे नाव ग्रहतार्यावरून, प्रत्येक महिन्याचे नाव नक्षत्रावरून ठेवण्यात आले आहे. ते कोणत्याही व्यक्तीचे नाव नाही. वर्षगणना सुद्धा कोणत्याही व्यक्तीपासून नाही. काल्पनिक घटनेवर युगाची सुरुवात नाही. भारतीय ऋतुमानाला अनुसरून असलेली ही कालगणना आपल्यासाठी ‘सहज’ आहे.
भारतीय कालगणनेची पद्धत ‘भारतीय ज्ञानप्रणाली’ म्हणजेच Indian Knowledge Systemचे फलित आहे. ह्या नववर्षाला ‘हिंदू नववर्ष’ म्हटले जाते. ‘हिंदू’ म्हणजेच ‘Indic’ म्हणजेच ‘भारतीय’. ‘हिंदू’ मध्ये जैन, बौद्ध, शीख आदि सर्व संप्रदायांचा समावेश होतो. म्हणूनच रामनवमी असो, कृष्णाष्टमी असो, महावीर जयंती असो, बुद्धपौर्णिमा असो अथवा गुरुनानक जयंती असो त्या सर्व तिथी भारतीय कालगणनेनुसार साजर्या केल्या जातात. ही ‘हिंदू / Indic / भारतीय’ कालगणना अत्यंत वैज्ञानिक आणि नैसर्गिक आहे.
ह्याची वैज्ञानिकता समजण्यासाठी आपण ग्रेगोरियन किंवा इंग्रजी कॅलेंडर पाहू - युरोपच्या रोमन साम्राज्यात ‘रोमन कॅलेंडर’ वापरले जात होते. त्याची सुरुवात सम्राट रोम्युलसने इ.स.पूर्व 8व्या शतकात केली. या कॅलेंडरच्या एका वर्षात 10 महिने होते. 10 महिन्यांचे मिळून 304 दिवस आणि थंडीतले 61 निनावी दिवस असे 365 दिवसांचे वर्ष होते. वर्षाची सुरुवात वसंत ऋतूने मार्च महिन्यात आणि शेवट थंडीच्या आधी डिसेंबर महिन्यात. पुढे थंडीच्या मोसमात बरीचशी कामे ठप्प असल्याने, थंडीच्या महिन्यांना नावे द्यायची गरज पडली नसावी.
यातील महिन्यांची नावे होती - मार्च (मार्स / मंगळवरून), एप्रिल (अफ्रोदाईट / शुक्रवरून), मे (कृत्तिका नक्षत्रावरून), जून (जुनो या गुरु ग्रहाच्या बायकोवरून) नावे दिली गेली होती. पुढचे महिने - Quintilis (पाचवा), Sextilis (सहावा), September (सप्त / सातवा), October (अष्ट / आठवा), November (नवम् / नववा) आणि December (दशम् / दहावा) अशी होती. इ.स.पूर्व दुसर्या शतकात या कॅलेंडरमध्ये सुधारणा करून Janus आणि Februa या देवांवरून जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन नवीन महिने घातले. पुढे हे महिने वर्षाचे पहिले दोन महिने झाल्याने-पूर्वी सातवा असलेला सप्टेंबर महिना नववा झाला, आठवा असलेला ऑक्टोबर दहावा झाला, नववा असलेला नोव्हेंबर अकरावा झाला आणि दहावा असलेला डिसेंबर बारावा झाला!
रोमन सम्राट जुलियस सीझरने इ.स.पूर्व 48च्या दरम्यान इजिप्तवर आक्रमण केले. इजिप्तचे अचूक सौर कॅलेंडर पाहून त्याने रोमन कॅलेंडरमध्ये सुधारणा करवून घेतल्या. त्यातून 365 दिवसांचे वर्ष तयार झाले. सगळ्या दुरुस्त्या नीट करायला, त्या वर्षात 400 हून अधिक दिवस घ्यावे लागले होते. ज्युलियन कॅलेंडरमध्ये दर चार वर्षांनी एका अधिक दिवसाचा समावेश केला गेला.
या कॅलेंडरमध्ये, वर्षाचा कालावधी 365.25 धरला होता. पण या रोमन लोकांची अंक पद्धती, गणना आणि गणित मागासलेले असल्याने त्यांना - अपूर्णांक (fractions) कळत नसत. मग हा वर्षातला वरचा ‘पाव दिवस’ कसा कळणार? म्हणून त्या इजिप्शियन सुधारकाने सांगितले की, दर चार वर्षांनी 1 दिवस अधिक घ्या.
आता ह्या रोमन लोकांचे मोजणे पण गमतीशीर असल्याने त्यांनी चार वर्षांच्या ऐवजी दर तीन वर्षांनी एक दिवस वाढवला. मग सम्राट ऑगस्टस्ने काही दशके एकही लीप दिवस घेतला नाही आणि कॅलेंडर दुरुस्त केले. पुढे Julius आणि Augustus ह्या दोन्ही सम्राटांच्या नावावरून पाचव्या आणि सहाव्या महिन्याचे नाव July आणि August अशी ठेवण्यात आली. आता जुलैमध्ये 31 आणि ऑगस्ट महिन्यात 30 दिवस होते, पण ऑगस्टस् काही जुलियसपेक्षा कमी नव्हता... मग ऑगस्ट महिना सुद्धा 31 दिवसांचा केला!
4थ्या शतकात पहिली ख्रिश्चन कौन्सिल नायसीया येथे रोमन सम्राट कॉन्स्टन्टाईनच्या अध्यक्षतेत झाली. आतापर्यंत ख्रिश्चन लोक ज्यू कॅलेंडर वापरत होते. त्यांना ते सोडायचे असल्याने त्यांनी रोमन कॅलेंडर निवडले. त्यांची एकच गरज होती - वसंत विषुवच्या नंतरच्या पौर्णिमेनंतर येणार्या पहिल्या रविवारी Easter सण साजरा करता येणे.
आता रोमन कॅलेंडर - ख्रिश्चन कॅलेंडर झाले. रोमन कॅलेंडरची सुरुवात रोमन सम्राट रोम्युलसपासून होती. ख्रिश्चन कॅलेंडरची सुरुवात येशूच्या जन्माशी जोडली गेली. येशूचे जन्मवर्ष कोणते हे कोणी लिहिले नव्हते. पण सहाव्या शतकात डीयोनिसियस (Dionysius Exiguus) नावाचा रोमानिया येथील चर्चमधील अललेीं Abbot (Father) होता. त्याने मांडले की, त्या वर्षी येशूच्या जन्मापासून 532 वर्ष लोटली होती. म्हणून ते वर्ष त्याने ‘532 Anno Domini' म्हणजे ‘येशूचे 532वे वर्ष’ होते असे सांगितले. ख्रिस्ताचे जन्म वर्ष ठरले - इसवी सन 1. त्याचा जन्मदिवसही कोणी लिहून ठेवला नव्हता. 4थ्या शतकाच्या आसपास, रोमन लोक 25 डिसेंबरला सूर्याचा जन्मदिवस थाटात साजरा करत असल्याने तोच येशूचा जन्मदिवस ठरवला गेला. अशा प्रकारे रोमन लोकांच्या बरोबर त्यांच्या कॅलेंडरचे आणि त्यांच्या उत्सवाचे पण धर्मांतर केले गेले!
इथे अजून भारतीय अंक पोचले नसल्याने या लोकांना शून्य माहीत नव्हता. त्यामुळे इसवी सन 1च्या आधीचे वर्ष ‘शून्य’ वर्ष नव्हते, ते होते - इ.स.पूर्व 1! बरं, त्यांना ऋण संख्याही माहीत नव्हत्या. त्यामुळे -1 (उणे 1), -500 (उणे 500) असे नामकरण न करता- इ.स.पूर्व 1, इ.स.पूर्व 500 अशी नावे दिली गेली.
अवैज्ञानिक, कल्पनेवर आधारलेले, महिन्यांना काहीही नावे असलेले, 28 ते 31 कितीही दिवस असलेल्या महिन्यांचे, वर्षाला ठरावीक सुरुवात नसलेले, वारंवार सुधारणा कराव्या लागलेले कॅलेंडर इंग्रजांच्या बरोबर भारतात आले आणि आपण आपले वैज्ञानिक, आकाशातील ग्रहांच्या स्थानावर आधारलेले, महिन्यांना नक्षत्रांची नावे असलेले, प्रत्येक महिन्यात 30 तिथी असलेले, वर्षाची ठरलेली सुरवात असलेले अशी पद्धत सोडून इंग्रजी पद्धत अंगिकारली.
ज्युलियन कॅलेंडरमध्ये एक चूक होती - वर्ष 365.242 ऐवजी 365.25 असे धरले होते. त्यामुळे इस्टरची तारीख जुळेना. 16व्या शतकात पोप ग्रेगोरीने ज्युलियन कॅलेंडरमध्ये एक सुधारणा केली - दर 400 वर्षांमधले तीन लीप ईयर कमी केले. या कॅलेंडरमध्ये वर्षाची लांबी 365.241 धरली आहे. ह्या सुधारणेने मागे पडणारे कॅलेंडर बरोबर चालू लागले. आत्तापर्यंत झालेली तफावत भरून काढण्यासाठी कॅलेंडर मधून 10 दिवस कमी केले.
विविध देशांनी वेगवेगळ्या काळात हे कॅलेंडर स्वीकारले. उदा. ब्रिटनने 1752 मध्ये ग्रेगोरीयन कॅलेंडर स्वीकारले. तेव्हा त्यांना सप्टेंबरमधील 11 दिवस कमी करावे लागले. यामुळे भारतातील ब्रिटिश दस्तऐवजसुद्धा 1752 च्या आधी ज्युलियन कॅलेंडरप्रमाणे आहेत तर नंतरचे ग्रेगोरियन प्रमाणे.
युरोपमध्ये ठिकठिकाणी वर्षाची सुरुवात वेगवेगळी मानली जात असे. रोममधील वर्ष 1 जानेवारीला सुरू होत असे, कुठे 1 मार्चला सुरू होत असे, इंग्लंडमधील वर्ष 25 मार्चला सुरू होत असे, कुठे 25 डिसेंबरला, रशियाचे वर्ष सप्टेंबरमध्ये, तर आणखी कुणाचे ऑक्टोबरमध्ये सुरू होत असे. पोप ग्रेगोरीने वर्षाची सुरुवात 1 जानेवारी ठरवली. इटली, स्पेन, फ्रांस आदि कॅथोलिक ख्रिश्चन देशांनी हे लगेच स्वीकारले. प्रोटेस्टंट व ओर्थोडोक्स ख्रिश्चन देशांनी काही शतकांनी हे स्वीकारले.
एकूण हे अवैज्ञानिक, कल्पनेवर आधारलेले, महिन्यांना काहीही नावे असलेले, 28 ते 31 कितीही दिवस असलेल्या महिन्यांचे, वर्षाला ठरावीक सुरुवात नसलेले, वारंवार सुधारणा कराव्या लागलेले कॅलेंडर इंग्रजांच्या बरोबर भारतात आले आणि आपण आपले वैज्ञानिक, आकाशातील ग्रहांच्या स्थानावर आधारलेले, महिन्यांना नक्षत्रांची नावे असलेले, प्रत्येक महिन्यात 30 तिथी असलेले, वर्षाची ठरलेली सुरवात असलेले अशी पद्धत सोडून इंग्रजी पद्धत अंगिकारली.
ह्यामुळे काय नुकसान होते? आपण आपली सांस्कृतिक ओळख विसरतो. आपला ज्ञानाचा ठेवा हरवतो. आपला स्वाभिमान घालवून बसतो. आपला आत्मविश्वास कमी होतो. आपल्या पूर्वजांचा पराक्रम विसरून आपण त्यांना कमी लेखतो. जो आपल्या पितरांना कमी लेखतो, तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही. असा समाज सुद्धा अधोगतीला जातो. असा समाज बाहेरच्यांचे विचार सहज आत्मसात करतो. त्याची शहानिशा न करता, नवीन विचार / नवीन पद्धती / नवीन ज्ञान कमी प्रतीचे असले तरीसुद्धा आपल्याजवळचा हिरा टाकून काचेचा खडा मिरवतो. हे होऊ नये म्हणून आपण आपल्या ज्ञानपरंपरांची ओळख करून घेणे आवश्यक आहे.
मग कॅलेंडरच्या बाबतीत, भारतीय ज्ञानपरंपरा रोजच्या जीवनात कशी आणू शकतो?
मला वाटते खालील काही उपाय करू शकतो -
अ) पाडव्यासारखे आपले सगळे सण तर भारतीय कालगणनेनुसारच चालतात. पण आपल्याला चतुर्थी कधी आहे, एकादशी कधी आहे, पौर्णिमा कधी झाली, अमावस्या कधी आहे, कोणता चांद्रमास चालू आहे याचे भान राहिले नाही. त्यासाठी रोज सकाळी उठून त्या दिवसाचे पंचांग पाहावे आणि घरातल्यांना सांगावे. ती पाच अंगे आहेत - वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण. पाडव्याला नवीन पंचांग घेण्याची पद्धत आहे, ते अनुसरून हा उपक्रम हाती घेता येऊ शकतो.
क) घरातील वाढदिवस, महत्त्वाचे दिवस तिथीनुसार साजरे करू शकतो.
च) तिथीनुसार काही नेम धरू शकतो.
ट) सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय आणि चंद्रास्त ह्यांच्या वेळांची जाणीव ठेवू शकतो.
त) दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचे विषयी जाणून घेऊ शकतो.
य)drik panchang सारखे apps तिथी, वार, मुहूर्त इत्यादी जाणण्यासाठी उपयोगी ठरतात.
ह्याशिवाय इतरही काही उपाय असू शकतात. तुम्ही काय करता ते अवश्य कळवा!
गुढीपाडव्याला येणारे नवीन वर्ष तुम्हां सर्वार्ंना सुखासमाधानाचे, समृद्धीचे आणि आरोग्यपूर्ण जावो! या वर्षी भारतीय ज्ञानपरंपरा जाणून घेण्याची गुढी प्रत्येकाने उभी करायचा संकल्प सोडावा!