Beekeeping
@डॉ. क. कृ. क्षीरसागर
9422080865
मधमाशा हे पृथ्वीवरील परागीकरणाचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. फळधारणेसाठी मधमाशीपालन अत्यंत उपयोगी आहे. वनस्पतींची जैवविविधता टिकवून ठेवण्यातही मधमाशांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे शेतीचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर मधमाशीपालन हा एक समर्थ पर्याय आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. पण इथवरची वाटचाल बिकट होती. हा आपला अनुभव आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील त्रुटी भरून काढून समृद्धी साधणे अत्यंत कष्टदायक होते. सुदैवाने आता ती वाट काही प्रमाणात सुकर झाली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी खाद्यान्नाच्या बाबतीत भारत परावलंबी होता. अमेरिकेतून ’पी.एल. 480’ योजनेमुळे निकृष्ट लाल ज्वारी व गहू यांनी भरलेल्या बोटींची प्रतीक्षा करावी लागत होती. परंतु काही भारतीय शास्त्रज्ञांच्या प्रयोगातून व लोकसहभागातून पहिली हरितक्रांती यशस्वी झाली. नंतर आपल्याला धान्याची कोठारे अपुरी पडू लागली. आपण अन्नधान्याची निर्यातही करू लागलो. मात्र या प्रयत्नात रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा अविवेकी वापर करावा लागला आणि आपण जमिनीची सुपीकता मोठ्या प्रमाणात गमावून बसलो. त्याबरोबरच अनेक शारीरिक व्याधींना आमंत्रण दिले. यातून मार्ग काढण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळणे एवढाच पर्याय उरला. सेंद्रिय खते, नैसर्गिक खते, सुरक्षित कीटक व रोगप्रतिबंधक पद्धती यांचा वापर सुरू झाला. प्राथमिक काळात दोन-तीन वर्षे प्रयोगासाठी वापरणे आवश्यक ठरले. मात्र नव्या कृषी पद्धतीची घडी नीट बसून कृषिऋतुचक्र नियमित झाल्यावर उत्पादनवाढ आणि उत्पादनांचे आरोग्यपूरक गुणसंवर्धनाने प्रत्ययाला येऊ लागले. सुदैवाने आता शेतकरी आणि कृषिशास्त्रज्ञांची मानसिकता अशा प्रगतीसाठी अनुकूल होत आहे.
मधमाशा - एक शेतीपूरक घटक
सेंद्रिय शेतीसाठी गो-आधारित शेती, गांडूळ खत, हरित खत आणि निसर्गानुकूल सुरक्षित रोग व कीटकनाशकांचा वापर आणि स्थानिक कृषी वाणांची निर्मिती यावर भर दिला जाऊ लागला. या सर्व घटकांमध्ये भर घालावी लागेल ती परागीकरण करणार्या माध्यमांच्या संवर्धनाची. काही पक्षी, प्राणी आणि कीटक यांच्या परागीकरणाद्वारा गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादनाची होणारी लक्षणीय वाढ अधोरेखित करावी लागते. अशा परागीकरण करणार्या सर्व माध्यमांमध्ये तुलनेने मधमाशांचा वापर सर्वश्रेष्ठ ठरतो. मधमाशांच्या एका मोहोळातील हजारो कामकरी मधमाशा कृषिदूतांची भूमिका प्रभावीपणे यशस्वीरितीने बजावतात. फुलपाखरे व अन्य एकांडे कीटक उपयुक्त असले तरी मोहोळातील असंख्य कामकरी मधमाशा एकमताने व एकजुटीने परागीकरण प्रभावाने करतात. एका एकरात पीकानुसार मधमाशांच्या मोहोळांच्या पाच पेट्या पुरेशा होतात. विविध धान्ये, गळीत पिके, फळे, भाज्या आणि चारा गवत यांच्या गुणवत्तापूर्वक निर्मितीसाठी मधमाशा या सजीव माध्यमाचा एक शेतीपूरक घटक म्हणून उपयोग अत्यावश्यक ठरतो.
मधमाशांची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी केंद्रीय मधमाशा संशोधन संस्थेत दीर्घकाळ नियोजनपूर्वक प्रयोग केले गेले. त्यासाठी विविध धान्ये, गळीत पिके, फळे, भाज्या आणि चारा गवतांचे प्रकार यांचा समावेश केला गेला. प्रयोगाचे निष्कर्ष प्रसिद्ध करून ते कृषिशास्त्रज्ञ, शेतकरी आणि ग्राहक यांच्यापर्यंत पोहोचविले गेले. त्यासाठी प्रात्यक्षिके, प्रदर्शने, कार्यशाळा यांचे आयोजन केले गेले. चित्रफिती, मुद्रित साहित्य यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला आणि सुदैवाने आता विषयाचे महत्त्व पंतप्रधान, कृषिशास्त्रज्ञ, व्यापारी आणि ग्राहक यांना पटल्यामुळे मधमाशापालन व्यवसाय वाढीसाठी विविध योजनांची नियोजनपूर्वक अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यासाठी कृषी महाविद्यालयाचे आणि कृषी विद्यापीठांचा सहभाग वाढीस लागला आहे.
1966-72 च्या सुमारास झालेल्या पहिल्या हरितक्रांतीमुळे आपण एक टप्पा ओलांडला, परंतु त्यातील त्रुटी दूर करून आता दुसर्या हरितक्रांतीची वाटचाल करणे गरजेचे आहे. पहिल्या हरितक्रांतीमुळे तृणधान्य निर्मिती वाढली परंतु तेलबिया, डाळी यांच्या उत्पादनात अपेक्षित वाढ झाली नाही हे सत्य आहे. यासाठी केंद्र शासनाने 1985 मध्ये तेलबिया मिशन आणि 1990 मध्ये डाळी मिशन ही अभियाने सुरू केली, असे असले तरी 35-40 वर्षे झाल्यानंतरही तेलबिया व डाळींचे हेक्टरी उत्पादन अपेक्षेप्रमाणे वाढले नाही. खाद्यतेल आणि डाळी यांची आयात अजूनही करावी लागते. त्यासाठी आपले परकीय चलन मोठ्या प्रमाणात वापरावे लागते. 40 ते 50 हजार कोटी रुपये त्यासाठी प्रतिवर्षी खर्ची पडतात. ते वाचवण्यासाठी नेटाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी शास्त्रोक्त तंत्रज्ञान वापरून मधमाशांचा उपयोग करणे ही काळाची गरज आहे. हे तंत्रज्ञान समजावून घेणे आवश्यक आहे. त्यामागचे शास्त्र समजले पाहिजे. यासाठी वनस्पतीचा फुलोरा आणि मधमाशांसारखे कीटक यांचे नातेसंबंध जाणून घ्यायला हवेत. यशस्वी मधमाशा पालनासाठी तीन सजीव घटकांचे परस्पर संबंध ध्यानात घेतले पाहिजेत, ते म्हणजे मधुवनस्पती, मधमाशी, मधमाशापालक माणूस. मधमाशा आणि फुलांचे परस्परावलंबी नातेसंबंध प्राचीन काळापासून जुळत गेले. बीज किंवा फळधारणेसाठी कीटकांवर अवलंबून राहणार्या सपुष्प वनस्पतींना कीटकावलंबी (एपीेोंहिळर्श्रेीी) वनस्पती तर फुलांवर मकरंदरुपी आणि परागकणरुपी अन्नासाठी अवलंबून असणार्या कीटकांना पुष्पावलंबी (अपींहेहिळर्श्रेीी) कीटक म्हणतात. सपुष्प वनस्पती आणि मधमाशा व त्यांचे आप्त कीटक यांचा विकास सुमारे 12 कोटी वर्षांपासून हातात हात घालून झाला. अशा कीटकांचा शारीरिक वैशिष्ट्यांच्या विकासासाठी, विशेषतः त्यांच्या ज्ञानेंद्रियांच्या विकासासाठी सपुष्प वनस्पतींची मदत झाली. परागीकरणासाठी उपयोगी पडावी अशी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण शरीररचना विकसित होत गेली. हेच फुलांच्या गंध, रचना, रंग या बाबत म्हणता येईल. कीटकांच्या माध्यमातून परागीभवन यशस्वी व्हावे अशा रीतीने फुलांची शारीरिक रचना विकसित होत गेली. मधमाशांचे संपूर्ण जीवन, त्यांची वाढ व आरोग्य फुलांच्या मकरंदावर आणि पौष्टिक परागकणांवर अवलंबून असते. परागकण फुलांच्या नरभागातील केसरतंतूच्या टोकावरील परागकोशात निर्माण होतात. ते पक्वावस्थेत उमलतात व असंख्य परागकण मुक्त होतात. फुलांच्या स्त्रीलिंगी भागाला स्त्रीकेसर मंडळ म्हणतात. त्याच्या तळाशी बीजांडकोश किंवा किंजपुट (र्जींरीू) असते. किंजपुटातून पोकळ किंजल नलिका निघते व वर जाते. तिच्या टोकाला किंजल्क नावाचा भाग असतो. परागकणांचे सिंचन याच भागावर होते व ते नलिकेद्वारा खाली उतरून बीजांडाशी त्यांचा संयोग होते. बीजधारणा वा फलधारणा त्यामुळे होते.
वनस्पतींच्या प्रकारानुसार फुलोर्याचा हंगाम असतो. याच काळात कीटकांच्या माध्यमातून पराग सिंचन शक्य होते. काही फुल एक लिंगी तर काही उभयलिंगी असतात.
परागीभवन यशस्वी व्हावे म्हणून नैसर्गिकरित्या असंख्य परागकणांची निर्मिती होते. मकरंद व परागकण संकलित करताना फुलभेटीच्या वेळी मधमाशांच्या केसाळ शरीरावर त्याच पखरण होते. ते परागकण मोहोळात साठविण्यासाठी पायावरचे परागजीव गोळी रूपाने एकत्रित केले जातात. पण या हालचालीत बरेच कणांवर फुलांवर सिंचन होऊन परागीकरणासाठी उपयुक्त ठरतात. फुले आणि मधमाशा या दोन्ही घटकांच्या गरजा अशा रीतीने भागतात. असे परागीकरण यशस्वीरित्या घडवून आणण्यासाठी मोहोळांचे शेतात योग्य असे तंत्रशुद्ध व्यवस्थापन करावे लागते. मधमाशापालन तंत्र शिकताना ते हस्तगत करता येणे त्यासाठी प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे.
आधुनिक मधमाशा पालन तंत्रज्ञानाची गरज
शेती उत्पन्न वाढविण्यात मधमाशापालनाचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून विकसित देशांमध्ये मधमाशापालन व्यवसाय शेतीचा एक अविभाज्य घटक बनला आहे. तेथील फळ बागायतदार आणि शेतकरी आपल्या बागांमध्ये आणि शेतांमध्ये फुलोर्याच्या काळात मधमाशापालकांकडून मोठ्या संख्येत मधमाशांचा वसाहती मिळवून तेथे हंगाम संपेपर्यंत पूर्ण वेळ ठेवतात. त्यामुळे मधमाशा पालकांना त्याचे भाडे मिळते आणि शेतकर्यांना काही पटींनी उत्पादन वाढीचा फायदा होतो. फलोत्पादक कॅलिफोर्नियात काही कारणाने मधमाशांच्या वसाहती नष्ट झाल्याने ओढवलेल्या संकटावर मात करण्यासाठी ऑस्ट्रेलिया व अन्य देशातून हजारो वसाहती विमानातून आयात केल्या गेल्या. इस्रायल देशाचे कृषी उत्पादन केवळ मधमाशांवरच अवलंबून आहे.
भारतीय शेतकर्यालाही मधमाशांचे महत्त्व पटत आहे. ज्या भागात शेतीक्षेत्र आणि वनक्षेत्र परस्परांजवळ आहे तेथे पीकांच्या हंगामातील फुलोरा उपयोगी पडतो. तर एरव्ही वनातील जंगली वनस्पतींच्या फुलोर्याचा उपयोग करून घेता येतो. त्यासाठी त्या त्या हंगामात वसाहतींचे स्थलांतर करावे लागते. त्यामुळे वसाहती सशक्त राहतात, मधोत्पादन वाढते आणि कृषी उत्पादनही वाढते. वर्षभर फुलोरा मिळवण्यासाठी शेती बागायती क्षेत्रात मधमाशांना उपयुक्त वनस्पतींची लागवड आवश्यक ठरते. बांधावर शिकेकाई, ब्राझील बुश, सागरगोटे, शेवगा अशी झाडे लावता येतात. पडीक जमिनीत बोर, हादगा, चिंच, कवठ सुबाभूळ, जांभूळ, हिरडा, निलगिरी, शमी. कडुनिंब, गुलमोहोर, अगस्त अशी झाडे लावता येतात. त्याचप्रमाणे कोथिंबीर, मका, सूर्यफूल, कारळा, लसूणघास, करडई, तीळ, फळभाज्या, वेलभाज्या इत्यादींचे उत्पन्न घेता येते. ते मधमाशापालनासाठी आवश्यक असते. मकरंद किंवा परागकण अथवा दोन्हींचा पुरवठा करणार्या पाचशेहून अधिक मधु वनस्पतींची यादी त्यांच्या फुलोर्याचा हंगाम लागवडीची पद्धत अशी विविध माहिती देण्यासाठी केंद्रीय मधमाशा संशोधन संस्थेने संकलित स्वरूपात उपलब्ध उपलब्ध करून दिली आहे. शेतकर्यांना ती बनवता येईल.
भारतात आणि महाराष्ट्रात पिकवाढीसाठी मधमाशापालन व्यवसायाचे महत्त्व ओळखून डॉ. स्वामीनाथन यांच्या कृषी समितीने संख्यात्मक मांडणी करून मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार भारताने किमान 2 कोटी वसाहतींचे पालन केले पाहिजे असे दिसते. जागतिक परिस्थतीचा विचार केला तर जगात आज सुमारे पाच ते सहा कोटी मोहोळांचे पालन केले जाते. त्यामध्ये चीन अग्रस्थानी असून तेथे एक कोटीवर वसाहती पाळल्या जातात. शिवाय त्यात भर घालण्यासाठी पुढील पंचवीस वर्षांचा आराखडा त्यांनी तयार केला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युक्रेन, ब्राझील, अर्जेंटिना या देशांचा क्रमही पहिल्या दहात लागतो. वास्तविक भारतीय भूखंड मधमाशांचे मूळ उत्पत्ती स्थान आहे. त्याच प्राचीनत्व खूप दूरपर्यंत पोहोचले हे आपले प्राचीन ग्रंथ आणि पुष्पशास्त्र यांच्या साहाय्याने सांगता येते. परंतु आधुनिक मधमाशा पालन तंत्रज्ञान भारताने फार उशिरा अंगिकारले. मात्र आता आपल्याला द्रुतगतीने प्रगती करायला हवी. सुदैवाने प्रचलित शासनाने त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. गरज आहे जागृत लोकसहभागाची.
लेखक केंद्रीय मधमाशा संशोधन संस्था, पुणे
येथील निवृत्त वरिष्ठ संशोधन अधिकारी आहेत.