शिवजयंतीची कृतार्थता

विवेक मराठी    24-Mar-2025   
Total Views |

Shiv Shrusti Dervan
डेरवण येथील शिवसृष्टीच्या कार्यामागील आध्यात्मिक ऊर्जा आणि छ. शिवाजी महाराजांची प्रेरणा ही दोन बलस्थाने या वास्तूत पाहायला मिळतात. छ.शिवाजी महाराजांचे चैतन्य समाजात रूजावे म्हणून श्रीसहजानंद सरस्वती स्वामी यांनी शिवसृष्टीची स्थापना केली. त्यांचा हा वारसा त्यांचे शिष्य भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर यांनी पुढे चालवलाच, आता त्यांचे सुपुत्र विकासराव वालावलकर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीयही हा वारसा समर्थपणे चालवीत आहेत.
 
डेरवण येथील श्रीसंत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेतर्फे शिवजयंती उत्सावाचे निमंत्रण मला आलं, ते निमंत्रण मी स्वीकारलं. डेरवण आणि तेथील शिवसृष्टी याबद्दल मला ऐकून माहीत होतं. प्रत्यक्ष तिथे जाण्याचा योग कधी आला नव्हता. या शिवसृष्टीची मूळ संकल्पना विठ्ठल गणेश जोशी तथा दिंगबरदास महाराज तथा श्रीसहजानंद सरस्वती स्वामी यांची. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी शिवसृष्टीचे स्वप्न पाहिले आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली काही जमीन विकून आणि शिष्य भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर यांच्या साहाय्याने 1984 साली डेरवण येथे शिवसृष्टीचे स्वप्न साकारले. छ.शिवाजी महाराजांचे चैतन्य समाजात रूजावे म्हणून श्रीसहजानंद सरस्वती स्वामी यांनी शिवसृष्टीची स्थापना केली.
 
आपल्या मनात नेहमी न पाहिलेल्या वास्तूसंबंधी काही प्रतिमा उभ्या राहतात, तशा त्या माझ्या मनातही होत्या. कुठेही भाषण करायला जाणं, हे माझं नावडतं काम असतं. परंतु पद्मश्री प्राप्त झाल्यानंतर सगळ्याच भाषणांची निमंत्रण नाकारता येत नाहीत, कार्यक्रमाला जाणे सामाजिक कर्तव्य ठरतं, म्हणून मी सप्तनीक डेरवणला गेलो.
 
तेथे मी केलेल्या भाषणाने श्रोत्यांचे किती प्रबोधन झाले असेल मला माहीत नाही, परंतु मी स्वतः मात्र पुण्यपावन झालो. शिवजयंती म्हटली की, उत्साह, ढोलताशांची मिरवणूक, छ. शिवाजी महाराजांवरील गाणी, थोडं नृत्य असतं. सकाळी आठच्या सुमारास मी स्वामी सहजानंद सरस्वती वास्तूत पोहोचलो. काका महाराज तेथे स्वागताला होते. मुख्य वक्त्या सायली गोडबोले-जोशी, प्रा. कानेटकर, माजी मंत्री शशिकांत सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. टापटीप, रेखीवपणा, कसलाही गडबड गोंधळ नाही, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वक्तशीरपणा याची सुरूवातच न्याहारीपासून झाली. यानंतर मान्यवरांना फेटे बांधण्याचा कार्यक्रम सुरू झाला.
 
फेटे बांधून झाल्यावर बरोबर साडे आठ वाजता वास्तूतच उभ्या केलेल्या शिवसमर्थ गडाच्या प्रतिकृतीकडे ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरूवात झाली. छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि समर्थ रामदास स्वामींची आणि तुकोबांची पूर्णाकृती असलेल्या मंदिरात जाऊन महाराष्ट्राच्या तिन्ही दैवतांची पूजा केली. प्रमुख अतिथी मी असल्यामुळे हा माझा सन्मान होता. त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालून ध्वजस्तंभाकडे आलो. भगव्या ध्वजाचे वेदमंत्रानी पूजन झाले. ध्वजारोहण झाले आणि श्रीसहजानंद सरस्वती स्वामीजीरचित ध्वजप्रार्थना ‘स्वराष्ट्र-धर्म-रक्षणाय देहि शौर्यमुत्तमम्। बलं यशःसुख-प्रदं स्वदेश-भक्ति-संयुतम्। त्वदीयमान-रक्षणार्थमर्पितामिमां तनुम्। सदैव वन्दनं करोमि नित्यमिच्छितुं जयम्’ (ध्वजप्रार्थनेच्या काही ओळी) या गीताचे सामूहिक गायन झाले. यानंतर सगळे मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न झाले. पूर्वनियोजित वेळेप्रमाणे नऊ वाजता कार्यक्रम सुरू झाला. मी धरून चार वक्तयांची भाषणे झाली. निवेदिकेकडे निवेदनाबरोबरच प्रास्ताविकेचे काम असल्यामुळे पाच जणांची भाषणे झाली असे म्हणायला पाहिजे. प्रत्येकाचे भाषण आखीव आणि रेखीव.
 
 
Shiv Shrusti Dervan
सायली गोडबोले-जोशी यांनी जिजाऊंचे थोरपण अनेक ऐतिहासिक दाखले देऊन मांडले. प्रा. कानेटकरांनी सावरकरांच्या जीवनातील शिवाजीपण मांडले. डॉ. सुवर्णा पाटील यांनी श्री विठ्ठराव जोशी चॅरिटीज ट्रस्टतर्फे चालणार्‍या अनेक उपक्रमांची माहिती दिली. या सर्व उपक्रमांचे पूर्वदर्शन मी आदल्या दिवशी घेतले होते. प्रशस्त रूग्णालय, कॅन्सर हॉस्पिटल, पूर्व प्राथमिक ते महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण, प्रयोगशाळा, विज्ञानकक्ष, अवकाश कक्ष, महिला सक्षमीकरणाचे वेगवेगळे उपक्रम, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकुल, आदी सर्व पाहून झालेले होते.
 
 
छ. शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि या उपक्रमाचा संबंध काय? असा प्रश्न कुणाच्याही मनात येईल. परंतु उपक्रम सुरू करणार्‍यांची मूलभूत प्रेरणा छ. शिवाजी महाराजांचे जीवनकार्य ही आहे. छ. शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात तळागळातील माणसाला सुखी करण्यावर भर दिला. प्रथम त्याला मुसलमानी दास्यातून मुक्त केले. दुसरी गोष्ट केली ती, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण केला. तिसरी गोष्ट केली, ती त्याला सक्षम केले. चौथी गोष्ट केली, ती त्याला धर्माभिमानी आणि जीवनमूल्यांभिमानी बनविले.
 
डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट या संस्थेच्या कामाची अध्यात्मिक प्रेरणा दत्त संप्रदयाचे स्वामी समर्थ आहेत. त्याची एक शिष्य परंपरा आहे. आणि या शिष्य परंपरेने अध्यात्म म्हणजे स्वस्थ बसून ध्यानधारणा करीत राहणे किंवा भजनसंकिर्तन करीत राहणे आणि सद्वर्तनाची प्रवचने देणे एवढेच मानले नाही तर समाजाला दुःख मुक्त केले पाहिजे. समाजाची दुःख जाणून घेतली पाहिजे आणि त्यावर उपाययोजना केली पाहिजे. यालाच त्यांनी अध्यात्म जगणं आणि शिवाजी जगणं अस मानलं.
 

Shiv Shrusti Dervan 
गुरुमहाराजांची आज्ञा प्रमाण मानून काका महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य न्यासाला समर्पित केले
 
डेरवणला मी काय पाहिलं, शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा पाहिला, मावळ्यांची शिल्पे पाहिली, जीवनप्रसंग पाहिले, परंतु यापेक्षादेखील आजच्या काळात छ. शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या ध्येयवादाला जगताना पाहिले. हे अद्भूत दर्शन होते. हा सर्व पसारा सांभाळणारे अशोक रघुनाथ जोशी तथा काका महाराज हे उच्चविद्याविभूषित (बी.ई. सिव्हिल इंजिनियर) आहेत, पण चांगली सरकारी नोकरी सोडून गुरूमहाराजांची आज्ञा प्रमाण मानून आपले जीवन त्यांनी गुरूसेवेला म्हणजेच श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट या न्यासाला समर्पित केले आहे. माझा मुक्काम सर्व वास्तूमध्ये 26 ते 28 तास असेल. आणि या काळात संस्थेतील जेवढे मान्यवर भेटले, ते सर्व अतिउच्च विद्याविभूषित पण समर्पित आणि सेवाभावी, अतिशय नम्र असे. माझ्यापुढे सर्वांनी नम्र व्हावे असे काही माझे कतृत्त्व नाही, परंतु त्यांची ही विनम्रता या कार्यामागील आध्यात्मिक ऊर्जा आणि छ. शिवाजी महाराजांची प्रेरणा त्यांच्यापुढे होती. सेवकाने नम्र असावे हे महावाक्य ते जगत होते.
वालावलकर मेडिकल कॉलेज आणि त्यासंबंधी आरोग्यसेवा कोकणातील अत्यंत गरीब माणसांसाठी आहेत. सहा पदरी हायवेवरून चारचाकी गाडीने जाताना हायवेवरील उत्तम हॉटेलात या दारिद्—याचे दर्शन होत नाही. शिवजयंतीनिमित्त प्रतिवर्षी अत्यंत गरीब महिलांना साडी वाटप केले जाते. 940 महिला आजूबाजूच्या खेड्यातून आल्या होत्या. एका दृष्टिक्षेपामध्ये उन्हाने होरपळलेले, दारिद्—याने गांजलेले, अकाली वार्धक्याने मलीन झालेले ते सर्व चेहरे छ. शिवरायांचे जीवनकार्य किती अपूरे राहिले आहे याची जाणीव करून देणारे होते. त्यांना बोलावून सन्मानाने साडी देवून, प्रसाद म्हणून भोजन देऊन मातृशक्तीचा हा सन्मान करणे म्हणजे छ. शिवाजी महाराज जगणे होय असे मला वाटले. महाराजांनी आपल्या जीवनामध्ये असंख्य मातांना साडीचोळी इनाम देऊन गौरविले आहे, ही परंपरा इथे जिवंत आहे हे जाणविले.
शेवटी एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख केल्याशिवाय हे कथन पूर्ण होऊ शकणार नाही. हा एक चॅरिटेबल ट्रस्ट असला तरी या संपूर्ण ट्रस्ट, रूग्णालय, शिवसमर्थ गड आणि मंदिर आदींचा खर्च वालावलकर कुटुंबीय एकहाती चालवतात. डेरवण येथे हे जे प्रचंड कार्य पाच दशके सुरू आहे ते श्रीसहजानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे शिष्य भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर यांनी त्याचा संपूर्ण भार आपल्या खांद्यांवर तोलून धरल्यामुळे साकार होऊ शकले आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव विकासराव वालावलकर आणि त्यांचे कुटुंबीय यांनी हे व्रत पुढे तेवढ्याच समर्थपणे अंगिकारलेले आहे. ही शिवसृष्टी पाहण्यासाठी दरवर्षी लाखभराहून अधिक पर्यटक या शिवतीर्थाला भेट देतात, तेही निःशुक्ल.
ते स्थान सोडताना संघात पाठ केलेले गीत मनात घोळत राहिले,
‘छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार, त्रिवार जयजयकार’
धर्माचा अभिमानी राजा,
देशाचा संरक्षक राजा,
चारित्र्याचा पालक राजा,
सदा विजयी होणार.’
डेरवण येथे शिवरायांचा हा जीवनमंत्र प्रत्यक्ष जगणारे सेवक अनभवून मी सर्वार्थाने कृतार्थ झालो.
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ. सुवर्णा पाटील - 9921251695

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.