गेल्या लेखांकात आपण पाहिले की, संघशाखेवर जमलेल्या दोनशे तरुणांना काश्मीरच्या संस्थानी सैन्याने बंदूक हाताळण्याचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. काश्मीर मधल्या सामाजिक स्थितीचा आढावा या लेखात पूर्ण करून आपण पुन्हा समरांगणाकडे जाऊया.
श्रीनगरच्या आर्यसमाज मंदिर शाखेवरून संस्थानी सैन्याचे लष्करी ट्रक्स दोनशे तरुणांना घेऊन बदामी बागेकडे निघाले, बदामी बाग कॅन्टोन्मेंट हे जम्मू-काश्मीर सैन्यदलाचे मुख्यालय होते. या तरुणांना त्वरित बंदुका हाताळण्याचे प्राथमिक शिक्षण देण्यात आले. संस्थानी सैन्याबरोबर राहून खुद्द श्रीनगरचे संरक्षण करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली.
तिकडे शेख अब्दुला आपल्या कुटुंबासह श्रीनगरमधून पळून गेला. महाराजा हरिसिंहांनी अखेर 24 ऑक्टोबरला सामीलनाम्यावर सही केली. सही केलेला, पण तारीख न टाकलेल्या सामीलनामा आणि आक्रमकांपासून काश्मीरचा बचाव करण्याचे महाराजांचे विनंतीपत्र घेऊन पंतप्रधान मेहेरचंद महाजन हे 24 ऑक्टोबर 1947 लाच दिल्लीत दाखल झाले. पण त्यांना देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू आणि देशाचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांनी दोन दिवस झुलवत ठेवले. सामीलनामा स्वीकारायला नकार दिला. त्यांची अट अशी होती की, महाराजांनी संस्थानचा संपूर्ण कारभार शेख अब्दुला यांच्या हवाली करावा आणि ताबडतोब श्रीनगर सोडावे. असे सांगितले जाते की, पंडित नेहरू आणि माउंटबॅटन यांच्याशी मेहेरचंद महाजन यांच्या या वाटाघाटी सुरू असताना, श्रीनगरमधून पळून गेलेले शेख अब्दुला त्यांच्या बाजूच्याच कक्षात बसलेले होते.
अखेर निरुपायाने मेहेरचंद महाजनांनी संमती दिली. सामीलनामा 26 ऑक्टोबर 1947 रोजी स्वीकारण्यात आला, असे नोंदवण्यात आले. इकडे श्रीनगरमध्ये सेनाधिकारी वेगळ्याच चिंतेमध्ये होते. भारतीय सैन्य मदतीला येणार कसे? श्रीनगरची एकमेव धावपट्टी नादुरुस्त होती. पुन्हा एकदा सेनापतींना संघाची आठवण झाली. प्रांत प्रचारक बलराज मधोक आणि प्रांत संघचालक प्रेमनाथजी डोगरा यांना पाचारण करण्यात आले. संघाच्या संपर्क यंत्रणेची खरोखरच धन्य आहे! एका निरोपासरशी शेकडो स्वयंसेवक जमा झाले. लष्कराच्या इंजिनिअर लोकांच्या मार्गदर्शनानुसार यांनी धावपट्टी दुरुस्त करायला सुरुवात केली. हे संघस्वयंसेवक मेहनत मजुरी करण्याची सवय असणारे श्रमजीवी नव्हते, तर सर्वसामान्य पांढरपेशे लोक होते. पण काम करायचे आहे म्हटल्यावर ते वाघासारखे कामाला भिडले. या कामासाठी लागणारी फावडी, कुदळी, घमेली, पहारी इत्यादी साधनेसुद्धा त्यांनीच गावभर हिंडून जमा केली.
हिंदू समाजाची मानसिकता मोठी गंमतीदार आहे. तो स्वत:हून काहीही करायला तयार नसतो. पण कुणीतरी पुढाकार घेतलाय, कुणीतरी पुढाकार घेऊन नेतृत्व करतोय आणि ते काम प्रामाणिकपणे चालू आहे, असे दिसले की, हाच हिंदू समाज एकदम उत्साहित होतो आणि नेत्यामागे पूर्ण शक्तीने उभा राहतो, तसेच झाले. संघस्वयंसेवक कसलीही अपेक्षा न ठेवता, धावपट्टी उभारण्यासाठी कुदळी-फावडी गोळा करतायत म्हटल्यावर श्रीनगरमधला सर्वसामान्य हिंदू समाज आणि थोड्या प्रमाणात मुसलमान समाजसुद्धा पुढे झाला. या सर्वांनीच सतत 36 तास काम करून श्रीनगरची धावपट्टी विमान उतरण्यायोग्य बनवली. याचीच पुनरावृती जम्मू आणि पूंछ या शहरांमधेही झाली.
अशा प्रकारे 26 ऑक्टोबरला सामीलनाम्याचा स्वीकार झाल्यावर 27 ऑक्टोबरला पहिले भारतीय विमान श्रीनगरच्या धावपट्टीवर उतरु शकले, त्यामागे या अनाम वीरांचा कुदळी-फावड्यांनी केलेला पराक्रम होता.
27 ऑक्टोबरला भारतीय सैन्याची पहिली तुकडी ’1 सिख’ ही श्रीनगर विमानतळावर उतरली. तिथपासून भराभर एक-एक तुकडी उतरु लागली. 31 ऑक्टोबरला मेजर सोमनाथ शर्मा यांची ’4 कुमाऊं’ ही पलटण उतरली. तिने बडगामकडे कूच केली. मेजर सोमनाथ शर्मा आणि शिपाई दीवानसिंह हे पराक्रम गाजवून धारातीर्थी पडले. त्याबद्दल त्यांना अनुक्रमे परमवीर चक्र आणि महावीर चक्र हे पुरस्कार मिळाले. ती विलक्षण पराक्रमगाथा आपण प्रस्तुत लेखमालेतल्या ’बडगामची लढाई’ या लेखात वाचलेली आहे. भारतीय सैन्याच्या इतिहासात ती सगळीच कथा सुर्वणाक्षरांनी नोंदवली गेली आहे. हे अगदी रास्तच आहे. पण इथे आपण या कहाणीमागची कहाणी बघणार आहोत. ’1 सिख’ बटालियनचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल रणजीत राय हे घुसखोरांच्या अचानक हल्ल्यात मारले गेल्यामुळे त्यांच्या बटालियनने थोडी माघार घेतली आणि पट्टण या ठिकाणी मोर्चा बांधला. मेजर सोमनाथ शर्माच्या ’4 कुमाऊं’ पलटणीला बडगामच्या दिशेने पुढे सरकण्याचा आदेश मिळाला. याप्रमाणे ते कूच करत असताना त्यांना दिसले की, कुणीतरी लाल रंगाचा रुमाल दाखवून आपल्याला थांबण्याचा इशारा देत आहे. बघतात तर तो एक दहा वर्षे वयाचा पोरगा होता. तो यांना म्हणाला, ‘मी तुम्हाला घुसखोरांची ठिकाणं दाखवतो’, मेजर शर्मा थोडे बिचकले. या छोट्या मुलावर एकदम कसा विश्वास ठेवावा? हे ओळखून तो पोरगा म्हणाला, ‘माझं नाव कौशिक धर. मी स्थानिक आहे आणि संघस्वयंसेवक आहे. तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा.’ मेजर शर्माची खात्री पटली. ते कौशिकला घेऊन पुढे निघाले. कौशिकने यांना घुसखोरांच्या हालचालींची इत्थंभूत माहिती दिली.
बलिदान झालेल्या सैनिकांमध्ये हा दहा वर्षांचा बिनलढाऊ सैनिकही होता - कौशिक धर - संघस्वयंसेवक!
3 नोव्हेंबर 1947 रोजी जेव्हा 700 घुसखोरांनी मेजर शर्मांच्या 100 जणांच्या पलटणीवर हल्ला केला, तेव्हा कौशिक हा एकमेव बिनलढाऊ पोरगा त्यांच्यासोबत होता. ’4 कुमाउं’ पलटणीचे सगळेच सैनिक दातओठ खाऊन लढत होते. मेजर सोमनाथ शर्मा ठार झाले, शिपाई दीवानसिंह या धुमश्चक्रीतही आपल्या बाजूला बसलेल्या कौशिक धरला म्हणाला, ‘पोरा, आम्ही सगळेच आता कदाचित मारले जाऊ. पण आमच्या कुटुंबाला पेन्शन मिळेल. आमची रेजिमेंट आमचा गौरव करेल. तुला काय मिळणार रे?’ कौशिकने यावर काय उत्तर दिले, हे इतिहासात नमूद नाही. दहा वर्षांच्या पोराला पेन्शन, रेजिमेंटचा गौरव म्हणजे काय, हे तरी माहीत असेल का? यानंतर दीवानसिंह खवळून उठले व त्यांनी खटाखट किमान 30 घुसखोर उडवले आणि शत्रूच्या एका गोळीने ते स्वत:ही ठार झाले, सोबत हातात कोणतेही शस्त्र नसलेला कौशिक धरही ठार झाला.
स्वतंत्र भारताच्या सैन्याने आक्रमक शत्रूशी समोरासमोर लढलेली पहिली लढाई म्हणजे ही बडगामची लढाई. तिच्यात बलिदान झालेल्या सैनिकांमध्ये हा दहा वर्षांचा बिनलढाऊ सैनिकही होता - कौशिक धर - संघस्वयंसेवक!
अशीच घटना कोटली या ठिकाणची. राजौरी जिल्हयात पूंछ नदीवर असलेले कोटली हे एक निसर्गरम्य गाव आहे. नदीच्या पलिकडच्या बाजूपर्यंत घुसखोर येऊन धडकले. अलिकडच्या तीरावर आपल्या सैन्याने पक्के मोर्चे उभारले होते. जोरदार गोळीबार चालू होता. आपली विमाने रात्रीच्या अंधारात रसद आणि दारुगोळ्याची पाकिटे, खोकी फेकून जात होती.
एका रात्री घोटाळा झाला. वैमानिकाने आठ खोकी नजरचुकीने नदीच्या पलिकडे फेकली. सूर्य उगवल्यावर आपल्या कमांडरच्या हे लक्षात आले. आठही खोकी दारुगोळ्याची होती. गंमत म्हणजे घुमखोरांच्या हे लक्षातच आले नव्हते. आपल्या कमांडरला दुर्बिणीतून नदीपलिकडची ती खोकी दिसत होती, पण मिळवणार कशी? समोरच्या टेकडीवर घुसखोरांनी उभारलेल्या मशिनगनच्या मोर्च्यांच्या सरळ मार्यातच ती खोकी येत होती. लष्करातले जवान पाठवावेत, तर आपल्या सैन्यातली तेवढी संख्या घटणार, काय करावे? कोटली गावात एक बँक होती. तिचा मॅनेजर चंद्रप्रकाश हा एक 25 वर्षांचा तरुण होता. गावातल्या संघशाखेचा मुख्य शिक्षकही तोच होता. कमांडर त्याला भेटला. त्याला कामाचे स्वरूप सांगितले. आपल्याला या कामासाठी आठ निधड्या छातीचे तरुण हवेत आणि ते आजच रात्री हवेत, हे ही सांगितले.
शाखेवर 30 तरुण उपस्थित होते. मुख्य शिक्षक चंद्रप्रकाशने, आज आपल्याला कोणते काम करायचे आहे, त्यासाठी किती तरुण हवेत, हे सांगितल्यावर तीसच्या तीस जण उभे राहिले आणि ’आम्ही येणार’ म्हणू लागले.
संध्याकाळ झाली. नेहमी प्रमाणे सायम् शाखा लागली. शाखेवर 30 तरुण उपस्थित होते. मुख्य शिक्षक चंद्रप्रकाशने, आज आपल्याला कोणते काम करायचे आहे, त्यासाठी किती तरुण हवेत, हे सांगितल्यावर तीसच्या तीस जण उभे राहिले आणि ’आम्ही येणार’ म्हणू लागले. चंद्रप्रकाश सगळ्यांना घेऊन कमांडरकडे गेला. कमांडर म्हणाला, असे चालणार नाही. मला आठ म्हणजे आठ माणसे हवीत. कोणी यायचं ते तुम्ही ठरवा. आता चंद्रप्रकाशने आपला मुख्य शिक्षकाचा अधिकार वापरला, स्वतःसह त्याने आणखी सात जण निवडले आणि उरलेल्या बावीस जणांना घरी जायला सांगितले.
ही कामगिरी इतकी जोखमीची होती की, यात मरण येण्याची जवळपास पूर्ण खात्रीच होती. तरीही सर्वच्या सर्व तरुण ताबडतोब तयार झाले. इतकेच नव्हे, तर नंतर ज्या बावीस जणांना चंद्रप्रकाशने मुख्य शिक्षकाची आज्ञा म्हणून परतवून लावले, ते मनात नाराज झाले. पाहा, संघशाखेच्या मुशीतून अशी माणसे घडतात.
चंद्रप्रकाश आणि त्याचे सात साथीदार रात्रीच्या अंधारात नदी पार करून विवक्षित ठिकाणी पोचले. त्यांनी ती खोकी खांद्यांवर घेतली आणि पाठी येऊन त्यांनी नदीत उड्या घेतल्या. पाठीवरच्या ओझ्यांमुळे त्यांच्या पोहण्याचा आवाज होऊन शत्रू सावध झाला. त्यांच्या मशीनगन्स अंधारात आवाजाच्या रोखाने आग ओकू लागल्या, तशाही स्थितीत या बहाद्दरांनी आपल्या बाजूचा नदीकाठ तर गाठला. पण आता उभे राहून चालणे धोक्याचे होते. तेव्हा यांनी पाठीवर खोकी घेतलेल्या स्थितीत सरपटत जायला सुरुवात केली.
या सगळ्या धुमश्चक्रीत चार जण जखमी होऊन पडले. तेव्हा उरलेल्या चौघांनी खोकी आणि जखमी साथीदार या सगळ्यांसकट तसाच सरपटत प्रवास चालू ठेवला. अखेर ते शत्रूच्या मार्याच्याबाहेर पोचले. आपल्या सैन्याला अन्नधान्याइतकीच महत्त्वाची दारुगोळ्याची आठ खोकी पूर्ण सुरक्षित स्थितीत मिळाली. घायाळ झालेले चारही जण मात्र मरण पावले. दुसर्या दिवशी सकाळी संपूर्ण कोटली गावाने आणि कमांडरने लष्करी इतमामात चार वीरांना अग्नी दिला. या चौघांपैकी चंद्रप्रकाश आणि वेदप्रकाश ही दोनच नावे माहिती आहेत. उरलेले दोघे बलिदानी आणि जिवंत राहिलेले इतर यांची तर नावेही माहीत नाहीत. ’अर्पित कर दो तन-मन-धन, मांग रहा बलिदान वतन’ या संघगीताच्या ओळी त्यांनी जीवनात जगून दाखवल्या.