इतिहासाचा मागोवा

दिव्य देसम्

विवेक मराठी    22-Mar-2025   
Total Views |

Divya Desam
मागच्या दोन भागांत आपण दिव्य देसम्, बारा आळ्वार, पेरूमाळची 108 मंदिरे, त्यांचे भौगोलिक भाग, मंदिरांतील मूर्ती, पूजापद्धती यांबाबत माहिती घेतली. मला नेहमी असे वाटते की दिव्य देसम् ही एक अनुभूती आहे. जितके जास्त तुम्ही या अंतरंगात शिरता, तितके अधिकाधिक आत खेचले जाता. याचा प्रत्यय भूतकाळात अनेकांना आलाय. आज आपण ही महान परंपरा कशी सुरू झाली ते पाहू.
बारा आळ्वारांनी मिळून रचलेला 4000 श्लोक किंवा पासुरामी यांमध्ये शब्दबद्ध केलेला ’नालयिरा दिव्य प्रबंधम्’ हा ग्रंथ म्हणजे दिव्य देसम्चा गाभा आहे. या पासुरामी रचण्याची सुरुवात कशी झाली याची एक गोष्ट सांगितली जाते. पाचव्या शतकातील तामिळनाडूच्या ’थिरूकोव्विळूर’ गावात घडलेली ही अतिप्राचीन दंतकथा आहे. एके दिवशी, पोईगाई आळ्वार मुसळधार पावसातून वाचण्यासाठी एका अंधार्‍या-बंदिस्त जागेचा आश्रय घेतात. त्याचवेळी भूतळ्वार आळ्वारसुद्धा पावसाच्या मार्‍याला चुकवत तिथे येतात. याआधी एका माणसाला झोपायला तिथे जागा असते तर आता दोन माणसे तिथे बसू शकतात. थोड्या वेळाने पेयळ्वार आळ्वार तिथेच आश्रयाला येतात. आता जेमतेम तिघांना उभे रहायला जागा असते. त्या अंधार्‍या-बंदिस्त जागेत कोणीच एकमेकांना दिसत नसतात, मात्र उभं असताना तिघांना तिथे अजून दुसर्‍या कोणाचे तरी दैवी अस्तित्व आहे याची जाणीव होते. हे अस्तित्व प्रत्यक्ष ’नारायणाचे’ आहे याची त्यांना अनुभूती होते. पोईगाई आळ्वारांना नारायणाचे दिव्य दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होते. नारायणाच्या चेहेर्‍याभोवती अपार तेजोनिधीचे वलय असते. भार हरपून, भक्तिभावाने पोईगाईंच्या मुखातून श्रीविष्णु स्तुतीरूपी पासुरामी निघतात. या पासुरामींची संख्या शंभर असते. तर भूतळ्वार आणि पेयळ्वार आळ्वारसुद्धा नारायणाची स्तुती करायला लागतात. दोघेही शंभर पासुरामी रचतात. या स्तुतीरूपी पासुरामी म्हणजेच नालयिरा दिव्य प्रबंधम् ग्रंथाची, दिव्य देसम्ची आणि भक्ती संप्रदायाचीही सुरुवात आहे.
 
Divya Desam
 
 
आपल्या भारतात भक्ती संप्रदायाची सुरुवात दक्षिणेत झाली आणि उत्तरेकडे प्रसार झाला. पोईगाई, भूतळ्वार व पेयळ्वार आळ्वार हे तीन आद्य आळ्वार आहेत. या आळ्वार परंपरेत पुढे अजून काही आळ्वारांची भर पडली. अशा बारा आळ्वारांनी मिळून पवित्र अशी 106 मंदिरे शोधली. त्यासाठी सहाव्या- सातव्या शतकात अत्यंत अवघड असा प्रवास केला. शेवटच्या दोन मंदिरांचा मान क्षीरसागराला आणि वैकुंठाला दिला. या 108 मंदिरांमधल्या पेरुमाळची स्तुती केली. सर्व मंदिरांची मोट पासुरामीरूपी बंधाने बांधली. अशा एकूण चार हजार पासुरामी रचल्या गेल्या. श्रीरंगम्च्या श्रीरंगनाथाचे मंदिर फार फार प्राचीन काळापासून अत्यंत महत्त्वपूर्ण होते. आळ्वारांनी पहिल्या दिव्य देसम् मंदिराचा मान अर्थातच श्रीरंगम्ला दिला. प्रत्येक आळ्वारांनी श्रीरंगम्वर पासुरामी रचली आहे. सांप्रत काळात श्रीरंगम् हे भक्ती संप्रदायाचे फार मोठे केंद्र झाले. आळ्वारांचा हा प्रवास तीन शतके चालू होता. आश्चर्य असे की, प्रत्येक मंदिरातील पेरूमाळची मूर्ती ही वेगवेगळी आहे. प्रत्येक स्थानाचे एक महात्म्य आहे. त्यानुसार मंदिराच्या गर्भगृहात मूर्ती आहेत. कोणी बरं बांधली असतील ही गर्भगृहे? कोणी स्थानमहात्माच्या अनुषंगाने गर्भगृहात मूर्ती निर्मिल्या? पेरूमाळच्या शयन अवस्थेतील, बसलेल्या आणि उभ्या स्थितीतील मूर्ती पाहून आपल्या मनात अपार भक्तिभाव जागृत होतो. विशेषतः तामिळनाडूतील पेरूमाळ मूर्तींचे दर्शन घेताना आपले भान हरपून जाते... डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात. गर्भगृहातील स्पंदने आपल्याभोवती जणू काही संरक्षक कवच निर्माण करतात. तामिळनाडूमध्ये चोळ, पल्लव, पांडय, विजयनगर अशा कितीतरी राजघराण्यांनी मंदिरे बांधली. प्रत्येक घराण्यातील राजांनी मंदिरांचा विस्तार केलाय. पण मूळच्या गर्भगृहांबद्दल माझ्या मनात अपार कुतूहल आहे.
 
Divya Desam
 
 
बारा आळ्वार त्यांच्या जीवनकाळात ज्या भागात गेले, ज्या मंदिरांचे त्यांनी दर्शन घेतले त्या मंदिरांवर पासुरामी रचल्या गेल्या. त्यामुळे एकेका मंदिरावर एकापेक्षा जास्त आळ्वारांनी पासुरामी रचल्यात. तसेच प्रत्येक आळ्वारांनी, आपल्या आधी होऊन गेलेल्या आळ्वारांनी रचलेल्या पासुरामीची परंपरा पुढे नेली.
 
 
माझ्या तामिळनाडूच्या सहलीमध्ये मी थिरुकोव्विळूर मंदिराला भेट दिली आहे. या मंदिराचे राजगोपुरम तामिळनाडूतील, तिसरे सर्वात उंच म्हणजे 194 फुटी आहे. हे मंदिर दिव्य देसम्च्या ’नाडू नाडू’ भागात येते. ज्या बंदिस्त आणि अंधार्‍या जागेत तीन आद्य आळ्वरांना नारायणाच्या रूपाचा साक्षात्कार झाला तीच अंधारी जागा म्हणजे या मंदिराचे गर्भगृह आहे. श्रीविष्णुची नारायणरूपी मूर्ती त्रिविक्रम स्थितीतील आहे. हे मंदिर श्रीविष्णुच्या वामन अवताराशी निगडीत आहे. बळीला पाताळात धाडण्यासाठी मूर्तीचा उजवा पाय उंचावलेला आहे. इथल्या मूर्तीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती नेहमीसारखी काळ्या रंगाची नसून हिरव्या रंगाची आहे. तसेच मूर्ती 35 फूट उंच आहे. इथल्या पेरुमाळचे नाव उळगरंथा पेरुमाळ आहे तर थायरचे म्हणजेच लक्ष्मीचे नाव ’पुंगोथई नच्चियार’ आहे. गर्भगृहात आद्य आळ्वारांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर तामिळनाडूच्या ’पंच नारायण’ क्षेत्रांपैकी एक आहे. या पंचनारायण समूहातील दुसरी चार मंदिरे चोळ नाडूत म्हणजेच आजच्या तंजावूर जवळ आहेत. मंदिरातील भव्य पेरूमाळची मूर्ती बघून आपण अगदी अवाक् होऊन जातो.
 
 
Divya Desam
 
या बारा आळ्वारांमध्ये आंडाळ, थिरूमंगई व नम्माळवर यांना अपार महत्त्व आहे. थिरूमंगई आळ्वारांनी एकूण 88 मंदिरांना भेटी दिल्या. रामायणातल्या वाल्या कोळ्यासारखीच थिरूमंगई आळ्वारांची कहाणी आहे. तर एकमेव स्त्री आळ्वार, आंडाळ तर प्रत्यक्ष भूलक्ष्मीचे रूप. आंडाळने स्वतःला राधा किंवा गोपी समजून पेरूमाळवर पासुरामी रचल्यात. पांडय नाडूमध्ये ’श्रीविळीपुत्थर’ येथे आंडाळचे मंदिर आहे. तसेच नम्माळवर आळ्वारांची महती फार मोठी आहे. आज नालयिरा दिव्य प्रबंधम ग्रंथ अस्तित्वात आहे तो फक्त नम्माळवर यांच्यामुळे. कलियुगात, वैकुंठाचे दरवाजे पहिल्यांदा नम्माळवर यांच्यासाठी उघडले गेले अशी वैष्णवांमध्ये श्रद्धा आहे. श्रीरंगम्च्या देवळात, वैकुंठ एकादशीला नम्माळवरांना वैकुंठ प्राप्त झाल्यानिमित्ताने ’अरैयर सेवा’ सोहळा संपन्न होतो. तामिळनाडूच्या दक्षिणतम भागात, तिरुनेलवेली जवळ तंबिरनी नदीकाठी ’नव तिरुपती’ नामक दिव्य देसम् मंदिरांचा समूह आहे. ही मंदिरे वैष्णव नवग्रह म्हणूनही ओळखली जातात. त्यांपैकी गुरु ग्रहाचे प्रतिनिधित्व करणारे ’आळ्वारथिरूनागरी’ गाव म्हणजेच नम्माळवारांचे जन्मठिकाण होत. अनेक विद्वानांनी नम्माळवर हे सातव्या शतकात होऊन गेलेत असा अंदाज वर्तवलाय. या मंदिरात एक चिंचेचा वृक्ष आहे. वैष्णव संप्रदायामध्ये या चिंचेच्या वृक्षाचे खूप महत्त्व आहे. नम्माळवर आळ्वार काहीही न खाता- पिता, मौन व्रतात सतत या चिंचेच्या झाडाखाली बसून ध्यान करत असत. असं म्हणतात की, उत्तर भारतात तीर्थाटनाला गेलेल्या मधुराकवींना सुदूर दक्षिणेकडे एक प्रकाश दिसला. त्या प्रकाशाचा मागोवा घेत मधुराकवी आळ्वारथिरूनागरी गावाकडे आले. त्यावेळी नम्माळवरानी, मौन व्रत सोडून मधुराकवींशी संवाद साधला. काही प्रश्नोत्तरातच नम्माळवरांच्या वैचारिक बुद्धिमत्तेने मधुराकवी दिपून गेले आणि त्यांनी नम्माळवरांचे शिष्यत्व पत्करले. नम्माळवरांनी एकूण 1296 पासुरामी रचल्या. पुढे भक्ती संप्रदायाचे प्रथम आचार्य नाथमुनी यांनी नम्माळवरांच्या मदतीने दिव्य देसम्ची परंपरा कशी पुढे नेली हे आपण पुढच्या भागात पाहू.

अनुष्का आशिष

 इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीरिंगमधे शिक्षण झाले असून, IT क्षेत्रात कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्र व साप्ताहिकात पुस्तक परीक्षण प्रसिद्ध झाले आहेत. प्रवासाची अतिशय आवड व त्यासंबंधित लेखन. देशभरातील प्राचीन मंदिरे पाहण्याची व त्यांचा अभ्यास करण्याची आवड आहे.