@डॉ. भूषण भावे
डॉ. दत्ता नाईक सरांनी कधीही बडेजाव केला नाही. ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ असे जीवन ते जगले व शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा व विश्वास दिला. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला जीवनाचा मंत्र दिला. त्यांच्या स्मृतीस अभिवादन!
गोव्याच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व तत्त्वज्ञान क्षेत्रातील एक अग्रगण्य विचारवंत प्रा. दत्ता भि. नाईक यांचे 12 मार्च रोजी अल्प-आजाराने दुःखद निधन झाले. गेली सुमारे 40-50 वर्षे नाईक सरांनी गोव्यात व राष्ट्रीय स्तरावर दिलेल्या बौद्धिक योगदानाबद्दल इतिहासात त्यांचे नाव कोरले जाईल.
शिक्षणाची दुर्दम्य इच्छा
प्रत्येक जण आपल्या नावासमोर शिक्षण व आपल्या पदव्या लिहितोच. नाईक सरांच्या नावासमोर एम.ए., एम.फील., डी.एच.इ., डी.सी.इ.,जे.सी.एच.आर. अशी पदव्यांची लांबलचक मालिका पाहायला मिळते. वयाच्या 17व्या वर्षी सरांनी हिमाचल प्रदेशातील विद्यापीठातून एम.ए. (हिंदू तत्त्वज्ञान) ही पदवी मिळवली, एवढेच नव्हे तर, ते त्या परिक्षेत प्रथम आले. त्यासाठी अनेक वेळा हिमाचलच्या त्या विद्यापीठात स्वखर्चाने प्रवास करून ते गेले. दीक्षांत समारंभाला पोचण्यासाठी सरांनी वयाच्या 72 व्या वर्षी चार वेळा विमान बदलले. शिक्षणाबद्दलची आत्यंतिक ओढ व निष्ठा याचे हे समर्पक उदाहरण आहे.
विद्वत्ता व व्यासंग
प्रा. दत्ता भि. नाईक हे धेंपो वाणिज्य महाविद्यालय, आल्तिनो, पणजी येथून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. इतिहास, राज्यशास्त्र व तत्त्वज्ञान हे सरांचे अभ्यासाचे, चिंतनाचे आणि शिकविण्याचे विषय. या तीनही विषयांत त्यांनी भरपूर वाचन व चिंतन केलेले. प्रत्येक विषयात त्यांचे आपले मत तयार असायचे. प्रचंड व्यासंग व तीव्र स्मरणशक्ती ही त्यांची बलस्थाने होती.
एकदा रिवणच्या विमलेश्वर मंदिरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची तीनदिवसीय बैठक चालली होती. एके संध्याकाळी मंदिराचे एक पदाधिकारी येऊन नाईकसरांना भेटले व म्हणाले, ‘आज श्रीशंकराचार्य जयंती आहे. सायंकाळी मंदिरात छोटासा कार्यक्रम आहे. त्यात आपण आम्हांला शंकराचार्यांबद्दल काही सांगावे’. आपल्या स्वभावाप्रमाणे नाईकसरांनी आमंत्रण स्वीकारले. दोन-तीन तासांतच कार्यक्रम होता. जवळपास पुस्तके किंवा संदर्भाचे कोणतेही साधन नव्हते. तरी सरांनी आपल्या वाचन व मनन स्मृतीवर आधारून तासभर शंकराचार्यांचे जीवन व तत्त्वज्ञान या विषयावर भाषण केले. त्यांनी मांडलेले मुद्दे व श्लोक ऐकून जमलेला श्रोतृवर्ग थक्क व तृप्त झाला. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
बहुविद्याशाखीय ज्ञान
नाईक सरांचा अभ्यास बहुविद्याशाखीय होता. विज्ञान-तंत्रज्ञानापासून कर्मकांडांपर्यंत, तत्त्वज्ञानापासून फेमिनिजम, एक्झिसस्टेंशियलिझम’पर्यंत कोणत्याही विषयावर बोलायची त्यांची तयारी होती. म्हणून विद्यार्थिदशेत कोणताही प्रश्न आला की आम्ही हक्काने सरांकडे जायचो. पुढे पुढे समजले की आम्हीच नव्हे तर राज्य व राष्ट्रीय स्तरावरीलसुद्धा अनेक मंडळी आपापले प्रश्न घेऊन सरांकडेच यायची. त्यात मुख्यमंत्री, आमदार यांपासून सामाजिक जीवनातील नेत्यांचाही समावेश असायचा. देशभरात कुठलीही बैठक, अभ्यासवर्गाला गेले असता, दोन सत्रांच्या मध्ये किंवा रात्री सरांभोवती तरुणांचा घोळका जमा व्हायचा. तासनतास चर्चा चालयच्या. सर आपल्या खास शैलीत प्रश्नाच्या मुळाकडे जायचे. वयाची साठी ओलांडलेला एक प्राध्यापक 20-22 वर्षांच्या तरुणांशी कनेक्ट व्हायचा, याचे कारण केवळ विद्वत्ता नव्हते तर सरांचे मूलभूत चिंतन व सर्वांना न्याय व आदर देण्याची त्यांची वृत्ती हे होते. सरांच्या स्वभावातील मिश्किलपणा व नर्म विनोद यांमुळेही या गप्पा रंगायच्या.
एखाद्या विषयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून काय भूमिका काय असावी ते ठरवायचे असे, त्यावेळी ‘नाईक सरांना विचारा, हेच उत्तर यायचे. ’ताचें कितें आसा मरे’ असे म्हणत आपल्या कपाळावरील केसांना वळण देत सर मग त्या समस्येचे निराकरण करायचे.
सामाजिक समरसतेचा ध्यास
एकदा चोपडे गावात जातीभेदाचा प्रश्न निर्माण झाला. आम्ही सरांबरोबर गावात गेलो. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील सक्रिय नागरिकांची भेट घेतली. सरांनी सर्वांना वेद, उपनिषदांपासून स्वामी विवेकानंदांपर्यंत सर्वांचे विचार सांगून समजावले. एका मनुष्याच्या मरणानंतर जातीभेदाच्या भावनेतून एक प्रश्न निर्माण झाला. तेव्हा जातींना आपल्या धर्ममतात कोणतेही स्थान नाही व मरणानंतर तर त्याला कोणताही तार्किक आधार नाही, हे सरांनी शांताराम सरज्योतिषी, नीळकंठ भावे इ. पौरोहित्य करणार्या व शास्त्रांची माहिती असलेल्या ब्राह्मणांकडून निवेदन लिहून घेऊन वर्तमानपत्रातून छापून आणले. सामाजिक समरसता हा सरांचा आग्रहाचा बिंदू होता.
सामाजिक कार्य
गोवा प्रदेश अ.भा.वि.प. चा संस्थापक कार्यकर्ता ते या राष्ट्रव्यापी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशी जबाबदारी स्वीकारून सरांनी काम केले. देशभरातील अनेक प्रांतांमध्ये बैठका, आंदोलने, परिसंवाद इत्यादींमध्ये सरांनी हिरिरीने सहभाग घेतला.
गेली काही वर्षे सरांनी गोव्यात कल्याण आश्रम या संघटनेचे काम सुरू करून समाजातील वंचित व मागास विद्यार्थ्यांसाठी आपल्या निवृत्तीचा तपभराचा काळ वेचला. 1986 साली पर्वरी पठारावर प्रबोधन शिक्षण सोसायटी ही आज नावलौकिकाला आलेली संस्था स्थापन करण्यामध्ये सरांचा महत्त्वाचा वाटा होता. ते या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. आज ही संस्था संपूर्ण गोवा राज्यात एक महत्त्वाची शिक्षण संस्था मानली जाते. याचप्रमाणे डॉ. केशव बळीराम हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यातही सरांनी पुढाकार घेतला होता.
ऐन तारुण्यात सरांनी, इंदिरा गांधींनी 1975 साली जबरदस्तीने लादलेल्या आणीबाणीविरूद्धच्या चळवळीत भाग घेतला व आग्वादच्या केंद्रीय कारागृहात 18 महिने तुरुंगवासही भोगला. देशभरात लागू झालेल्या आणीबाणीत म्हणजे जणू देशाच्या दुसर्या स्वातंत्र्ययुद्धात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या लोकतंत्र सेनानी संस्थेचे ते राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य होते. काश्मीरचा सत्याग्रह, आसाम सत्याग्रह, किशनगंज अशा अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आंदोलनांत सरांनी सक्रिय भाग घेतला. या बाबतीतला त्यांचा उत्साह खूप दांडगा होता.
गोवा विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे तसेच गोव्याच्या राज्य नियोजन मंडळाचे ते सदस्य होते. विद्यार्थी निधी गोवा या संस्थेचे ते 1986 सालच्या स्थापनेपासून कार्यवाह होते. समरसता साहित्य परिषदेच्या गोवा प्रदेशाचे ते निमंत्रक होते.
गोव्यातील विद्यार्थी चळवळ
नाईक सरांच्या विद्वत्तेचा व ज्ञानाचा लाभ व मार्गदर्शन गोव्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी घेतले आहे. सरांचे संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित होते. गोव्यात असा गाव नसेल, ज्या गावात नाईक सर कुठल्या ना कुठल्या सामाजिक, धार्मिक कार्यात वक्ता म्हणून बोलले नसतील. आपली टू-व्हीलर घेऊन उन्हातान्हात सरांनी गोव्यात विद्यार्थी चळवळ उभी केली. केवळ गोव्यातच नव्हे तर शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सरांनी प्रवास केला.
काही आग्रहाचे विषय
वास्को शहराचे जे मूळ नाव होते, त्याचे मुरगांव व्हावे अशी सरांची प्रखर इच्छा होती. या बाबतीत त्यांचे स्वतःचे प्रयत्न चालूच होते. परंतु पोर्तुगीजांची शेवटची निशाणी मिटवण्याचा हा विषय खुद्द मुरगांवात राहणार्या कुणी नागरिकाने हाती घ्यावा, अशी त्यांची मनोमन इच्छा होती.
जगातील विविध देशांतील ख्रिस्तपूर्व व इस्लामपूर्व सभ्यता व उपासना पंथ हा सरांच्या अभ्यासाचा एक आवडता विषय होता. या सभ्यतांचे हिंदू सभ्यता व संस्कृतीमधले दुवे, संपर्क व साम्यस्थळे यांवर ते अधिकारवाणीने बोलत.
लेखनसिद्धता
आपले विचार नाईक सरांनी वर्तमानपत्रांतून मांडायला सुरुवात केली. अशा लेखांची पुढे अनेक पुस्तके प्रकाशित झाली. साम्यवाद व भांडवलशाही यांवर नाईक सरांनी कडाडून हल्ला केला. अनेक देशांतील राजकीय घडामोडींवर व सामाजिक आंदोलनांवर सरांनी भाष्य केले आहे. स्वामी विवेकानंद, भगवान बुद्ध, डॉ. आंबेडकर यांचे विचार मांडले आहेत. सरांनी लिहिलेले स्वामी विवेकानंदांचे मराठी व हिंदी चरित्र प्रत्येकाने वाचावे. चरित्र कसे लिहिले जावे याचा तो वस्तुपाठच होता. नाईक सर उत्कृष्ट कवी व गीतकारही होते. वृत्त, छंद, गण, मात्रा यांचा सरांचा अस्सल अभ्यास होता. संस्कृतचे स्वत:हून मिळवलेले ज्ञान व मराठीच्या काव्यपरंपरेचा सखोल परिचय यांमुळे सरांना अनेक छंद व वृत्ते त्यांच्या उदाहरणासकट तोंडपाठ होते. सरांनी स्वामी विवेकानंदांवर अनेक कविता रचल्या, गीते रचली व त्यांना चालीही दिल्या. संस्कृत भाषा व साहित्य यांचा सरांचा गाढा अभ्यास होता. अनेक उदाहरणे ते मूळ संस्कृत श्लोकाचा संदर्भ देत मांडत. सरांचा स्वतःचा सहस्रग्रंथसंग्रह आहे, त्यात संस्कृत, इंग्रजी, हिंदी व मराठी पुस्तकांचा समावेश आहे.
विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाने गेल्या वर्षी ‘श्रीराम साहित्य’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला देशभरातून संस्कृत तज्ज्ञ, संस्कृतचे प्राध्यापक इ. मंडळी आली होती. नाईक सरांचेही एक सत्र होते. बहुधा सरांचे ते शेवटचे मंचीय वक्तव्य असावे. सरांचे रामायण काळाविषयीचे मूलभूत चिंतन ऐकून सर्वांनाच आश्चर्य झाले होते.
त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण झाले
प्रचंड विद्वत्ता, लेखन व चिंतन असूनही सरांकडे डॉक्टरेट पदवी नव्हती. केवळ त्यांच्या सामाजिक व्यग्रतेमुळे ते पीएच.डी. करू शकले नाही. याचे सरांनाही वाईट वाटत असे. परंतु दीड-दोन महिन्यांपूर्वीच सरांना त्यांच्या वैचारिक व सामाजिक योगदानाबद्दल आंध्रप्रदेशच्या केंद्रीय विद्यापीठाने डॉक्टरेट बहाल केली. गोव्याचे मा. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते सरांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुढील पिढ्यांना सरांचे विचार कळावेत म्हणून पर्वरी येथील प्रबोधन शिक्षण संस्थेने सरांच्या आवाजातील (सुमारे पाच तासांची) दृकश्राव्य डीव्हीडी प्रकाशित केली आहे.
प्रकाशित पुस्तके
वसंत (कवितासंग्रह), नमो मातृभूमी (कवितासंग्रह), ऐतिहासिक भौतिकवादाचा ऐतिहासिक पराभव (साम्यवादाच्या पराभवावर आधारित पुस्तक) (लेखसंग्रह), राष्ट्रपुरुष विवेकानंद (हिंदी) (चरित्र व विचार), युवा प्रेरणा (मराठी)(स्वामी विवेकानंद चरित्र व विचार), स्थानिक दैनिकांतून वैचारिक व ललित लेखांचे प्रकाशन, खासकरून दैनिक नवप्रभामधून स्तंभलेखन, गीत नरेंद्र (स्वामी विवेकानंदांच्या जीवन व विचारावर आधारित मराठी गीते व प्रसंग व त्या गीतांमागची पार्श्वभूमी घटना किंवा निवेदनातून व्यक्त) याच गीतांवर आधारित पुढे बाळकृष्ण मराठी यांनी ‘गीत नरेंद्रायण’ या नावे काढलेली सी.डी., व हल्लीच गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या हस्ते प्रकाशित त्यांचा ‘विचार विमर्श’ हा जागतिक घडामोडींचा परामर्श घेणारा ग्रंथ. सरांचे अजून सुमारे 800 पानांचे वैचारिक साहित्य प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
नाईक सरांचे घर म्हणजे एक कार्यालय होते. कुठल्याही वेळी गेलो तरी तिथे चार-दोन व्यक्ती असणारच. बहुतेक जण सरांना निमंत्रण द्यायला किंवा त्यांच्याकडे एखाद्या विषयावर बोलायला आलेले असत. सर व त्यांची पत्नी मीनलवहिनी यांचे आदरातिथ्य त्यांच्या घरी आलेले कुणीही विसरू शकणार नाही. वहिनींच्या अकाली मृत्यूनंतर त्यांचे पुत्र व सुना प्रसन्न चेहर्याने कधीही न कंटाळता सर्वांना चहा देत, जेवण वाढतील, असेच चित्र. सरांनी कधीही बडेजाव केला नाही. ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ असे जीवन ते जगले व शेकडो समाज कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा व विश्वास दिला. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला जीवनाचा मंत्र दिला. त्यांच्या स्मृतीस अभिवादन!
लेखक प्राचार्य, विद्या प्रबोधिनी महाविद्यालय, पर्वरी,
गोवा येथे कार्यरत