‘महाभारत ते भारत @ 2025 ’हे पुस्तक कोशात्मक असून पुस्तक वाचताना एका जिवंत, सशक्त राष्ट्राची स्पंदनेच नव्हे, तर पिढ्यानपिढ्यांचे शहाणपणही जाणवते. लेखकाने पानोपानी असा सुंदर गोफ विणला आहे की या भूमीचा अलौकिक इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म जिवंत होऊन डोळ्यांसमोर उभे राहते.
माधव जोशी लिखित ‘महाभारत ते भारत 2025’ हे कोशात्मक पुस्तक मराठी आणि इंग्रजीत प्रकाशित झाले. एकेकाळी सुवर्णभूमी म्हणून आणि नंतर गारुडी आणि जादूगारांचा देश अशी आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण झालेला; पण आता उत्पादन क्षेत्रात जगात दुसरा क्रमांक पटकावणारा, आर्थिक महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला, आणि चांद्रयानामुळे अंतराळात आणि संशोधन क्षेत्रात आपले मानाचे स्थान निर्माण करणारा असा हा भारत देश. या भारताच्या इतिहास, राजकारण, कला, साहित्य, आर्थिक क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि समाजकारण अशा पन्नासेक क्षेत्रांमधील पुनरुत्थानाच्या अलौकिक प्रवासाचा व्यापक आणि गुंतागुंतीचा साडेतीन हजार वर्षांचा पट लेखकाने समर्थपणे या पुस्तकात उलगडला आहे. भारतासंबंधी कोणताही संदर्भ पाहिजे असेल तर तो या पुस्तकात मिळेल. पुस्तकातील विषय आणि काळ यांचा आवाका केवळ अफाट आहे. प्राचीन इतिहासापासून आधुनिक काळातील विषयांपर्यंतच्या तार्किकतेत आणि नैसर्गिकतेत सुसूत्रता असावी, यासाठी लेखकाने या पुस्तकातील 57 प्रकरणांची पाच भागांमध्ये गुंफण केली आहे.
पहिला भाग आहे, ‘इतिहास आणि पाया’. या भागात भारताची उत्पत्ती, प्राचीन संस्कृती, स्वातंत्र्य लढा, फाळणीचे दुःख ,सीमा, लढाया, प्राचीन ऐतिहासिक घटना आणि सण आणि खाद्यपदार्थ यांचा समावेश आहे, ज्यातून उर्वरित पुस्तकाची पार्श्वभूमी तयार होते.
दुसरा भाग आहे, ‘राष्ट्र निर्मिती आणि संस्कृती’. हा भाग भारताच्या एक राष्ट्र म्हणून झालेल्या विकासावर लक्ष केंद्रित करतो. भगवद्गीतेची शिकवण, संविधान, साहित्य, संगीत, नृत्य, नाटक, सिनेमा, सिनेसंगीत, क्रिकेट, इतर खेळ यांविषयीच्या प्रकरणांचा समावेश केल्याने ऐतिहासिक घटनांपासून सांस्कृतिक यशाकडे जाण्यास मदत होते.
पुस्तकाचे नाव : महाभारत ते भारत @ 2025
लेखक : माधव जोशी
प्रकाशक : हेडविग मीडिया
पृष्ठे : 488
मूल्य : रु 600
तिसरा भाग आहे, ‘अर्थव्यवस्था आणि उद्योग’. शेती, कामगार चळवळ, उद्योग, परराष्ट्र व्यापार, बँकिंग, इन्शुरन्स, शेअर आणि कमोडीटी एक्स्चेंज, आय.टी., दूरसंचार क्षेत्र, बौद्धिक संपदा, व्यवसाय सुलभता यांच्या विवेचनातून हा विभाग राष्ट्रनिर्मितीनंतरच्या भारताच्या आर्थिक उत्क्रांतीबद्दल माहिती देतो.
चौथा भाग आहे, ‘पायाभूत सुविधा आणि सेवा’. अर्थव्यवस्थेनंतर आरोग्यसेवा, शिक्षण, ऊर्जा, रेल्वे, रस्ते, बंदरे, विमानसेवा यांसारख्या सार्वजनिक सेवा तसेच पर्यटन आणि पर्यावरण यांचे विवेचन आहे. हा विभाग आर्थिक क्षेत्रापासून आधारभूत सेवा सुविधांपर्यंत सहजतेने संक्रमण करतो.
पाचवा अंतिम भाग आहे, ‘समाज आणि शासन’. हा भाग सामाजिक रचना-विविधतेत एकता, समाजसुधारक आणि संतांचे योगदान आणि राजकारण यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करतो. भविष्यातील आकांक्षा आणि विकसित भारताच्या संकल्पनेवर, सवोर्र्र्त्तमाच्या ध्यासावर पुस्तकाचा शेवट होतो. ‘हिंदू धर्म हा केवळ एक धर्म नसून तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे,’ ही संकल्पना देखील पुस्तकात विशद केली आहे.
हजारो वर्षांचा संपन्न ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारी भारतभूमी नवकल्पनांचीही पंढरी आहे. ’विकसित भारत’ ही संकल्पना जशी एक समृद्ध आणि विकसित राष्ट्राच्या आकांक्षांचे द्योतक आहे. तशीच ती सांस्कृतिक वारशाचे जतन आणि त्याचा सन्मान याच्याशीही घट्टपणे जोडलेली आहे. ‘आधुनिकतेची आणि परंपरेची कास धरत गुंतागुंतीची वाटचाल करताना आपल्या पूर्वजांनी दिलेल्या मूल्यांचा सन्मान राखत, सांस्कृतिक वारशाचे जतन करत, सर्वार्थांनी प्रगती साध्य करता येईल. आधुनिक तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या साहाय्याने आपण सर्व मिळून एक नवीन भारत घडवू शकतो, असा रास्त विश्वास जागृत करणे हीच जाणीव या पुस्तकात सर्वत्र अनुभवायला मिळते.
दीडशे वर्षे भारताच्या प्रगतीचा अविभाज्य भाग असलेला ‘टाटा समूह’, ‘टाटा ट्रस्ट’ आणि ज्यांच्याबरोबर दीर्घकाळ काम करायची लेखकाला संधी मिळाली त्या आदरणीय कै. रतन टाटा यांना हे पुस्तक लेखकाने आदरपूर्वक अर्पण केले आहे.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वकील अॅड. हरीश साळवे यांच्या नितांत सुंदर प्रस्तावना हे या पुस्तकाचे एक आकर्षण आहे.
डॉ. माशेलकर प्रस्तावनेत लिहितात : ’महाभारत ते भारत 2025’ या उल्लेखनीय पुस्तकाचा प्रवास ‘इंडिया’ या नावाने जगाला ओळख असलेल्या या प्राचीन, चिरंतन आणि विकसनशील राष्ट्राप्रती असलेल्या श्रद्धेने उलगडतो. लेखकाने पानोपानी असा सुंदर गोफ विणला आहे की या भूमीचा अलौकिक इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म जिवंत होऊन डोळ्यांसमोर उभे राहते. हे पुस्तक कोशात्मक आहे. हे पुस्तक वाचताना तुम्हाला एका जिवंत, सशक्त राष्ट्राची स्पंदनेच नव्हे, तर पिढ्यान्पिढ्यांचे शहाणपणही जाणवेल.’
अॅड. हरीश साळवे प्रस्तावनेत लिहितात: ‘मी या ग्रंथाच्या हस्तलिखिताचा अभ्यास करण्यास सुरुवात केली, तेव्हा माझ्या मनात ‘भारत म्हणजे निश्चित काय? या विचारांचे न संपणारे आवर्त निर्माण झाले. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हे पुस्तक एक चांगला आरंभ बिंदू आहे. हे पुस्तक आपल्या महान देशाचे वैभव, यशापयश, आणि चढउतारांचा प्रवास नेमकेपणाने मांडते.’
हे पुस्तक वाचून भारताविषयीच्या अभिमानाने वाचकांची मान ताठ होईल हे निश्चित!