पाकिस्तानच्या विघटनाची नांदी

विवेक मराठी    15-Mar-2025
Total Views |
@दिवाकर देशपांडे
 
Balochistan Train 
बलोच, तालिबान व टीटीपी यांची संयुक्त बंडखोरी थांबवायची असेल तर पाकिस्तानी लष्कराला कंबर कसून रणमैदानात उतरावे लागेल. हातघाईचे युद्ध करावे लागेल. ते केले तरच पाकिस्तानचे अस्तित्व टिकेल अन्यथा जाफर एक्सप्रेसचे अपहरण ही पाकिस्तानच्या फुटीची नांदी ठरेल.
 
 
पाकिस्तानातील अशांत प्रांत बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथून दुसरा एक अशांत प्रांत खैबर पख्तुनवाची राजधानी पेशावरला जाणारी जाफर एक्सप्रेस ही रेल्वेगाडी अडवून जवळपास अडीचशे पाकिस्तानी सुरक्षा कर्मचार्‍यांना बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी ओलीस धरण्याची 11 मार्चची घटना ही पाकिस्तानच्या विघटनाची नांदी ठरण्याची शक्यता आहे.
 
 
ही घटना म्हणजे बलोची बंडखोरांनी अचानक केलेला घात नाही तर हे एक नियोजनपूर्वक व पूर्ण तयारीनिशी पाकिस्तान सरकारला दिलेले आव्हान आहे. या रेल्वेगाडीचा मार्ग आणि तिच्या प्रवासाची वेळ ठरलेली असली तरी या गाडीतून जवळपास अडीचशे पाकिस्तानी लष्करी जवान प्रवास करणार आहेत, याची गुप्तखबर बलोची बंडखोरांना आधीच लागलेली होती. त्यामुळे ही गाडी कुठे अडवायची, ओलीस सैनिकांना कुठे ठेवायचे, पाकिस्तानी लष्कराने ओलिसांच्या सुटकेसाठी कारवाई केली तर त्यांना कुठे लपवायचे, याचे अत्यंत चोख नियोजन बंडखोरांनी केलेले दिसून आले आहे.
 
 
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, बंडखोरांनी ही गाडी क्वेट्टा ते सिबी या स्टेशनांदरम्यान मशकॉफ बोगद्याच्या बाहेर पडत असताना बॉम्बचा स्फोट घडवून अडवली. गाडी थांबताच बंडखोरांनी गाडीच्या चालकाला ठार करून गाडी पुढे जाऊ शकणार नाही, अशी व्यवस्था केली. नंतर सर्व प्रवाशांना गाडीतून खाली उतरवून स्त्रिया, मुले व पुरुष यांना वेगळे केले. सर्वांची ओळख तपासल्यानंतर सर्व पाकिस्तानी सुरक्षा कर्मचार्‍यांचे पाच गट केले व त्यांना डोंगराळ भागातील वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले व त्यांच्यासोबत आत्मघाती बंडखोर ठेवले, जेणेकरून पाकिस्तानी लष्कराने हल्ला केलाच तर स्वत:सह ओलीस सुरक्षा कर्मचार्‍यांनाही उडवून देता येईल. बंडखोरांनी अन्य प्रवासी, स्त्रिया व मुलांना सोडून दिले. बंडखोरांनी नंतर या ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असलेल्या जवळपास एक हजार बलोची बंडखोरांच्या सुटकेची मागणी केली व त्यासाठी 48 तासांचा अवधी दिला. (हा लेख लिहीत असताना हा अवधी संपण्यास तीन तास बाकी होते.) त्यामुळे तीन तासांनंतर पाकिस्तानी लष्कर ओलिसांच्या बदल्यात बलोची बंडखोरांची सुटका करणार की गाडी रोखणार्‍या बलोची बंडखोरांवर कारवाई करणार हे स्पष्ट झालेले नाही, पण हा लेख प्रसिद्ध होईल तेव्हा चित्र स्पष्ट झालेले असेल.
 
 
Balochistan
 
बंडखोरांनी जाफर एक्सप्रेस ज्या भूभागात अडवली तो भूभाग बंडखोरांनी काळजीपूर्व निवडला होता. या ठिकाणापासून जवळपास 20 किलोमीटर परिघात कोणतीही सडक नाही असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे पाकिस्तानी सैनिक वाहनाने नेण्याची कोणतीही सोय नव्हती. 20 किलोमीटरपर्यंत वाहनाने सैन्य आणून मग ते पायी चालत घटनास्थळापर्यंत न्यायचे म्हटले तर हा सर्व परिसर वैराण, कोरडा व डोंगराळ आहे. त्यामुळे लष्कराच्या वेगवान हालचाली शक्य नव्हत्या. या भागात विमान उतरण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे हेलिकॉप्टरनेच सैन्य व शस्त्रसामुग्रीची वाहतूक शक्य होती. पण पाकिस्तानी लष्कराला किमान पाच ते दहा हजार सैनिक या भागात आणावे लागणार होते, ते हेलिकॉप्टरने शक्य नव्हते. त्यामुळे काही लष्करी हेलिकॉप्टरने या भागात घिरट्या घातल्या पण त्यांना काहीच करता आले नाही. पाकिस्तानी सैन्याने जवळपास 40 तासानंतर एक पत्रक काढून काही नागरिकांची सुटका केल्याचे तसेच काही बलोची बंडखोरांना ठार मारल्याची माहिती दिली. पण या भागात एकही पाकिस्तानी सैनिक उतरणे शक्य नसल्याने ही कारवाई कशी केली हे कळू शकले नाही. नंतर सुटका झालेल्या प्रवाशांनी आपल्याला बलोची बंडखोरांनी सोडले व कोणत्याही मदतीविना पायी चालत आपण जवळच्या स्टेशनापर्यंत पोहोचल्याचे टीव्ही पत्रकारांना सांगितले.
 
 
या सर्व प्रकारात बलोची बंडखोर व पाकिस्तानी लष्कर दोघांनीही आपापली बाजू सांगणारी माहिती दिली आहे; पण पाकिस्तानी लष्कराने आपल्या माहितीच्या पुष्टर्थ कोणताही पुरावा दिला नाही. उलट बलोची बंडखोरांनी जाफर एक्सप्रेस अडवण्याच्या घटनांचे व्हिडिओ माध्यमांना पाठवले. तसेच माध्यमांनी सुटका झालेल्या प्रवाशांच्या प्रत्यक्ष मुलाखती दाखवल्या. त्यावरून परिस्थितीवर पूर्णपणे बलोच बंडखोरांचे नियंत्रण होते. परिणामी लष्कराला घटनास्थळापर्यंत पोहोचताही आले नाही, हे स्पष्ट होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वेट्टा स्टेशनवर रेल्वेगाडीत अनेक रिकाम्या शवपेट्या चढविण्यात येत असल्याचे व्हिडिओ प्रसारमाध्यमांनी दाखवले. याचा अर्थ प्रशासन बलोच बंडखोरांशी लढण्याऐवजी घटनास्थळावरून मृतदेह आणण्याची तयारी करीत होते, असे दिसते.
 
 
बलोच बंडखोरांच्या तीन प्रमुख संघटना आहेत. 1. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी 2. बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट 3. बलोच लिबरेशन गार्ड या तिन्ही संघटनांनी एकत्र येऊन ‘बलोच राजी अजोइ संगर’ ही संघटना स्थापन केली व तिच्या मार्फत जाफर एक्सप्रेस अडवली. या संघटनेला सिंधमधील ‘सिंधुदेश रिवोल्युशनरी आर्मी’ व ‘ग्वादर को हक दो तहरीक’ या मौलाना हिदायतूर हक रहमान यांच्या संघटनेचाही पाठिंबा आहे. ‘ग्वादर को हक दो’ ही संघटना ग्वादर बंदरानजीक राहणार्‍या मच्छिमारांची व तेथील रहिवाशांची संघटना आहे. या संघटनेचा ग्वादर बंदर विकासाला तसेच तेथे असलेल्या चिनी बंदर विकासकांना विरोध आहे. त्यामुळे सध्या ग्वादर बंदर तसेच चीनने बांधलेला ग्वादरचा विमानतळ पूर्णपणे रिकामा आहे व तेथून कोठलीच वाहतूक होत नाही. ग्वादर विमानतळ बंडखोरांमुळे इतका असुरक्षित बनला आहे की, या बंदराचे उद्घाटन चिनी व पाकिस्तानी पंतप्रधानांनी ग्वादर येथे येऊन करण्याऐवजी इस्लामाबाद येथे बसून केले.
 
 
जाफर एक्सप्रेसच्या घटनेवर बलोच बंडखोरांचे पूर्ण नियंत्रण आहेच; पण जवळपास संपूर्ण बलुचिस्तान प्रांतामध्ये बलोची बंडखोरांची सत्ता आहे असे पाकिस्तानातील एक राजकीय नेते मौलाना फाजलूर रहमान यांनी पाकिस्तानी संसदेत भाषण करताना सांगितले. ते म्हणाले की, बलुचिस्तानातील अनेक शहरांतील पोलीस ठाणी सोडून पोलीस पळून गेले आहेत व लष्कराचीही उपस्थिती अत्यंत कमी झाली आहे. कारण बलोच बंडखोर पोलिस व लष्करी ठाण्यांवर अचानक हल्ले करून पोलीस व सैनिकांना ठार करीत आहेत. कराचीहून क्वेट्ट्याकडे जाणार्‍या महामार्गावर बलोच बंडखोरांचे पूर्ण नियंत्रण आहे. गेल्या दोन वर्षांपासून बलोच बंडखोरांच्या लष्करावरील तसेच चिनी कर्मचार्‍यांवरील हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. बंडखोरांनी ‘मजीद ब्रिगेड’ या नावाचे एक आत्मघाती पथक स्थापन केले आहे. त्या पथकातील बंडखोरांनी पाकिस्तानात अनेक आत्मघाती हल्ले घडवून आणले आहेत. 26एप्रिल 2022 या दिवशी एका बलोच महिला आत्मघाती बंडखोरामार्फत कराची विद्यापीठावर हल्ला केला. त्यानंतर 13 ऑगस्ट 2023 या दिवशी बलोच लिबरेशन आर्मीने चिनी इंजीनियरांच्या एका पथकावर हल्ला करून चार चिनी इंजीनियरांना आणि नऊ पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. 6 ऑक्टोबर 2024 या दिवशी बलोच लिबरेशन आर्मीने ग्वादर विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्यावर हल्ला करून दोन चिनी नागरिक व अन्य दहाजणांना ठार केले. क्वेट्टा रेल्वे स्टेशनवर 9 नोव्हेंबर 2024 रोजी आत्मघाती हल्ला करून 32 लोकांना ठार केले तर 55 लोकांना जखमी केले.
 
 
बलोची बंडखोर पाकिस्तानी लष्कराला दाद न देता इतके हल्ले कसे करू शकतात, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर या विषयातील तज्ज्ञांना असे आढळून आले आहे की, बंडखोरांजवळ आधुनिक शस्त्रास्त्रे व संपर्क उपकरणे आहेत. ही उपकरणे अमेरिकन बनावटीची असल्याचे सांगण्यात येते. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानात सोडलेली ही लष्करी सामुग्री असावी असा अंदाज आहे. याचा अर्थ बलोची बंडखोरांना अफगाण तालिबान व तहरीके तालिबान पाकिस्तात यांची मदत मिळत असावी असा आहे.
 
 
बलोच बंडखोरांना भारताची मदत आहे, भारताची गुप्तचर संघटना रॉ त्यांना मदत करते, असा आरोप पाकिस्तान नेहमी करीत असते. पण त्याचे पुरावे पाकिस्तानला देता आलेले नाहीत. थोडक्यात आजवर सुरक्षित व निर्धोक मानली जात असलेली पाकिस्तानची पश्चिम सीमा आता निर्धोक राहिलेली नाही तर ती पूर्व सीमेपेक्षाही अधिक धोकादायक झाली आहे. पूर्व सीमेवर पाकिस्तानने दहशतवादी हल्ले करण्याचे आक्रमक धोरण अनेक वर्षांपासून अवलंबले आहे; पण पश्चिम सीमेवर मात्र पाकिस्तानला बचावात्मक धोरण स्वीकारणेही अवघड झाले आहे. या भागात चीनची मोठी गुंतवणूक आहे. चीनचा आर्थिक महामार्ग (सीपेक) या भागातून जातो; पण बलोच बंडखोरांनी हा मार्ग अनेकदा बंद पाडला आहे. पाकिस्तानी लष्कर या महामार्गाचे रक्षण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे चीनने हा महामार्ग व चीनच्या अन्य आस्थापनांच्या संरक्षणासाठी चिनी सैन्य पाकिस्तानात पाठविण्याची तयारी दाखवली आहे. पण पाकिस्तानच्या रक्षणासाठी चिनी सैन्य येणे म्हणजे पाकिस्तानी लष्कराची नाचक्की आहे. त्यामुळे इच्छा असूनही पाक सरकार चिनी लष्कराला आपल्या देशात येण्याची परवानगी देऊ शकत नाही.
 
 
बलोच बंडखोरांचा नि:पात करण्यात पाकिस्तानी लष्कराला अपयश येणे साहजिक आहे. कारण पाकिस्तानी लष्कर हे देशाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्याऐवजी देशाच्या राजकारणात पूर्णपणे गुंतलेले आहे. कोणत्या पक्षाला अथवा राजकीय नेत्याला सत्तेवर आणायचे अथवा कोणाला सत्तेवरून घालवायचे याचे डावपेच खेळण्यात पाकिस्तानी लष्कर मग्न आहे. पाकिस्तानी लष्कराने नुकतेच सरकारच्या प्रत्येक खात्यात सेवेत असलेल्या लष्करी अधिकार्‍याला नेमण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ आता आपल्या खात्याचे निर्णय मंत्र्याऐवजी लष्करी अधिकारी घेणार आहेत. या शिवाय देशातले अनेक कारखाने, व्यापारी संस्था व शेती एवढेच नव्हे तर किराणा दुकांनांवरही लष्कराचे पूर्ण नियंत्रण आहे. या सर्व गोष्टींमुळे लष्कराला देशविरोधी शक्तींशी लढायला वेळच नाही. त्यातच अमेरिकेला आता पाकिस्तानी लष्कराच्या मदतीची गरज उरलेली नाही. त्यामुळे अमेरिकेकडून होणारा शस्त्र व अर्थ पुरवठा थांबला आहे. पाकिस्तानी लष्कराचे सर्व वरिष्ठ अधिकारी सेवेत असताना ऐशोआरामात राहतात व निवृत्तीनंतरच्या ऐशोआरामाची व्यवस्था करून परदेशात स्थायिक होतात. त्यामुळे लढाईचे काम साध्या शिपायांना करावे लागते. या परिस्थितीमुळे पाकिस्तानी सैनिकांचे मनोबल फारसे उच्च राहिलेले नाही. बलुचिस्तानमधून अनेक पोलीस व सैनिकांनी काढता पाय घेतला आहे, याचे कारण हेच आहे.
 
 
बलोच, तालिबान व टीटीपी यांची संयुक्त बंडखोरी थांबवायची असेल तर पाकिस्तानी लष्कराला कंबर कसून रणमैदानात उतरावे लागेल. हातघाईचे युद्ध करावे लागेल. ते केले तरच पाकिस्तानचे अस्तित्व टिकेल. अन्यथा जाफर एक्सप्रेसचे अपहरण ही पाकिस्तानच्या फुटीची नांदी ठरेल.
 
 
लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत.