@प्रा. डॉ. अशोक मोडक
पुस्तकाचे नाव - On The Mission of Human Evolution- Indian Culture- Challenges and Potentialities
प्रकाशक: विवेकानंद केंद्र प्रकाशन ट्रस्ट
लेखिका : निवेदिता रघुनाथ भिडे
पृष्ठसंख्या : 448
मूल्य : 350 रुपये/-
विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष निवेदिता भिडे यांनी लिहिलेले indian culture: challenge and potencialities या शीर्षकाचे अतिशय दर्जेदार पुस्तक मध्यंतरी वाचनात आले. मला या पुस्तकाच्या पहिल्याच वाचनाने खूप प्रभावित केले. खिलाफत आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला तेव्हापासूनच हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदुत्व या संकल्पनांवर आपल्याकडच्या तथाकथित पुरोगाम्यांनी आरोपाच्या तोफा डागल्या आहेत. सन 2014 मधल्या संसदीय निवडणुकीत या सर्व हल्ल्यांचा प्रतिकार करीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळवले. त्यानंतर गेली अकरा वर्षे नेमक्या या संकल्पनांनाच सुगीचे दिवस आले आहेत. क्रमाक्रमाने भारतवर्षात या संकल्पना चलनी नाण्यांप्रमाणे लोकप्रिय झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवेदिताताईंचे प्रस्तुत पुस्तक लाखमोलाचे ठरले आहे. कारण पुस्तकात उल्लेखिल्याप्रमाणे हिंदू संस्कृतीच्या म्हणा वा भारतीय संस्कृतीच्या म्हणा, अज्ञानामुळे तिच्याबाबतच्या गैरसमजामुळे आणि तिच्याविषयी जो जहरी विरोध भारतात जाणीवपूर्वक पसरविला गेला. त्यामुळे भल्याभल्या भारतीय नागरिकांना काही शंका काही प्रश्न संत्रस्त करतात. अशा प्रश्नांना आपल्या जीवनदर्शनावर अधिष्ठित समर्पक उत्तरे मिळणे अत्यावश्यक आहे. निवेदिताताईंनी हे पुस्तक-लेखन करून भरभक्कम प्रमाणांच्या आधारे तर्कशुद्ध मांडणी केली आहे.
निवेदिताताई भारतभर सदैव भ्रमण करत असतात. विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्याचे भाषणांमधून, संभाषणांमधून नेटके प्रबोधन करीत असतात. या पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणाच्या समाप्तीनंतर ज्या पुस्तकाची, लेखांची वाचकांना माहिती मिळते, ती थक्क करणारी आहे. या सप्रमाण लेखाचा कुणाच्याही मनावर चांगला प्रभाव पडतो यात शंका नाही.
लेखिकेने एकूण सहा भागांमधून या पुस्तकाला आकार दिला आहे. वाचकांना या भागांचे क्रमशः वाचन झाल्यानंतर progressive unfoldment of truth म्हणजे सनातन सत्याचे सहज उलगडत झालेले आविष्करण मनास भिडते.
पुस्तकाच्या पहिल्या भागात एकूण पुस्तकामध्ये वाचकांना कोणता आशय वाचण्यास मिळणार आहे? या प्रश्नाचे उत्तर ’पुस्तकाचे विहंगावलोकन’ या शीर्षकाखाली देण्यात आले आहे. संस्कृती म्हणजे काय? हा प्रश्न उपस्थित करून निवेदिताताईंनी चपखल व्याख्याच शब्दबद्ध केली आहे. ती अशी ः- “जीवनदर्शन तसेच जीवनमूल्ये यांच्यामुळे प्रेरित झालेला जीवन जगण्याचा विशिष्ट मार्ग म्हणजे संस्कृती. जीव, जगत् आणि जगदीश यांच्यातल्या पारस्परिक संबंधांवर या जीवनमार्गामुळे प्रकाश पडतो.” (पान क्र. 38) वस्तुतः view of life हा मूळ शब्दप्रयोग आहे; पण ’जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन’ या शब्दप्रयोगाऐवजी निवेदिताताईंनी जाणीवपूर्वक जीवनदर्शन असे भाषांतर केले आहे आणि पान क्र. 41 वर, पंडित दीनदयाळजींनी भारताचे दर्शन एकात्म मानव दर्शन आहे, याची आठवण लेखिकेने जागविली आहे. भारतात आपण प्राचीन काळापासून केवळ समष्टी नव्हे तर सृष्टी आणि परमेष्टी यांच्यात एकात्मता आहे, अशी समजूत बाळगतो. पश्चिमेकडे मात्र विचार खंडशः केला जातो. तिथे मनुष्यमात्राने उपयोगितावादी दृष्टिकोनातून सृष्टीचे शोषण करावे ही भूमिका शिरोधार्य मानली जाते. आपला समग्र जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन ’एकात्म’ आहे. लेखिकेने जीवनमूल्यांची व जीवन व्यवस्थेची सुरेख चर्चा केली आहे. ’विविधतेच्या मुळाशी एकता’, ’सर्वांचा सन्मान’, ‘सगळीकडे चैतन्याचे प्रकटीकरण’, ‘स्त्रीचा गौरव’, ’सर्वसमावेशकता’ ’कर्मसिद्धान्त’ वगैरे बारा मूल्यांचे पुस्तकात झालेले विवेचन नक्कीच सुबोध आहे.
जीवनव्यवस्थेचेही पुस्तकातले विवेचन मुळातूनच वाचावे अशा योग्यतेचे आहे. कुलधर्म, जातीधर्म, समाजधर्म, चार आश्रम, विविध विधिनिषेध यातून आपली जीवनव्यवस्था लक्षात येते. जीवनदर्शन तसेच जीवनमूल्ये अमूर्त अथवा निराकार असतात, पण जीवनव्यवस्था सगुण-साकार आणि मूर्त असते. हिंदू संस्कृतीत अनुभूतीला अनन्यसाधारण महत्त्व असते. उदाहरणार्थ, माणसामाणसांत भेदभाव करू नये, सर्व जीव, जगदीशाचेच आविष्कार आहेत, एकेक स्त्री मातृरूप आहे वगैरे मूल्ये केवळ चिंतनात नव्हे तर वर्तनात प्रकटवित भाषणातून समता, न्याय, माणुसकी, या मूल्यांचा सदैव गौरव, पण आचरणात मात्र विषमता, अन्याय, आणि अमानुषता यांचा साक्षात्कार यालाच ढोंग म्हणतात. गाडगे महाराजांचा जो दाखला निवेदिताताईंनी दिला आहे तो किती गहिरा आहे. हे महाराज ना शिकलेले होते, ना धनिक होते, ना भपकेबाज वेशात वावरत होते, पण त्यांचे वर्तन आपल्या हिंदू जीवनमूल्यांच्या नित्य व्यवहारात उतरविणारे म्हणून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरही गाडगे महाराजांसमोर नतमस्तक व्हायचे. रामकृष्ण परमहंस यांच्याविषयी विवेकानंद, अखंडानंद अशा शिकल्या सवरलेल्या व्यक्तींना अपरंपार श्रद्धा वाटत असे. कारण हिंदू जीवनदर्शन, हिंदू जीवनमूल्ये यांचेच मंगल दर्शन विवेकानंदाना या गुरुवर्यांमध्ये होत असे. तात्पर्य, जीवनव्यवस्था अनमोल आहे.
निवेदिताताई वाचकांना सांगतात ते खरेच आहे. दुसर्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जग दोन परस्परविरोधी गटात विभागले गेले. सोविएत युनियन म्हणजे S.U. तर युनायटेड स्टेट्स U.S. पहिला गट मार्क्सवादाचे माहात्म्य अधोरेखित करणारा तर दुसरा गट भांडवलशाहीचा भक्त; पण भौतिकतावाद दोन्ही गटांना श्रेयस्कर! मग या दोहोंनी सांगण्यात सुरुवात केली की, अध्यात्मवाद, धर्म-संस्कृती-सभ्यता सब झूठ आहे. या दोन्ही गटांचे प्रवक्ते धर्मसंस्कृतीवर हल्ले करण्यासाठी पुढे सरसावले. आर्थिक विकास करण्यासाठी धर्म-संस्कृती गुंडाळून ठेवा. पुरोगामित्वाच्या विजयासाठी या प्राचीन कल्पना त्याज्य माना! नेमक्या याच काळात भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला. भारतातल्या सुशिक्षित शटलकॉक्सनी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन पाश्चिमात्यांची ’री’ ओढण्यास सुरुवात केली. one size fits for all या सूत्राच्या प्रकाशात भारतासारख्या देशांनी पश्चिमी वस्त्रे-आभूषणे परिधान करावीत हाच धोशा मग वाजूगाजू लागला. तेव्हा कांचीकामकोटी पीठाच्या तत्कालीन शंकराचार्यांनी प्रश्न विचारला. when will our freedom be converted into independence? आमची मुक्तता स्वतंत्रतेमध्ये कधी परिवर्तित होणार? आपण आपल्या स्वत:च्या तंत्राने कधी वागणार? निवेदिताताई आपल्यास माहिती देतात की, युनाइटेड नेशन्सला ’बान कि मून’ हे कर्णधार लाभले अन् त्यांनी एकाच मापाचे पाप करू नका... एकेक देशाला स्वतःच्या संस्कृतीच्या प्रकाशात वाटचाल करू द्या, युरो-अमेरिकन प्रतिमान जगातल्या सर्व राष्ट्रांसमोर आदर्श म्हणून ठेवू नका... हेच ध्रुपद आळवण्यास आरंभ केला. (पान क्र 30) “किंबहुना भारतीय संस्कृतीच जगाच्या विकासासाठी मार्गदर्शक आहे हेही सांगण्यास मून महाशयांनी पुढाकार घेतला. वर्तमानात कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. पर्यावरणीय असमतोल वाढतोय. पंथोपंथांकडून अतिरेकी, हिंसक कारवाया वाढताहेत. या प्रश्नांच्या निराकरणासाठी भारतीय संस्कृतीच मार्गदर्शन करू शकते.”(पान क्र. 33) युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या संस्थेने सन 1989 पासून प्रतिवर्षी प्रतिवृत्ते छापण्याचा प्रघात पडला आहे. ही प्रतिवृत्ते भारतीय संस्कृतीने गौरविलेले एकात्मता, सर्वसमावेशकता वगैरे मूल्यांची प्रशंसा करण्यात व्यग्र आहेत. सारांश, विकासप्रक्रियेत संस्कृती अनमोल आहे.
निवेदिता भिडेजींनी धर्म संकल्पनेची केलेली सखोल चिकित्सा ही दीनदयाळजी उपाध्याय यांच्या चिंतनाची स्मृती जागविणारी ठरली आहे. व्यक्तिमत्त्वाने कुल, ग्राम, देश, विश्व व चराचर अशा व्यापक वर्तुळांच्या हितासाठी संकुचित, स्वार्थी, कोत्या वर्तुळांचा त्याग केला तर तेच धर्माचरण होते. (पहा पाने क्र. 112 ते 121) पांडवांकडे कुंतीमाता होती. ती सरळ कर्णाच्या तंबूत शिरून त्याला सांगते, “माझ्या विवाहापूर्वी मी तुला जन्म दिलाय, तेव्हा पुत्रा, आईकडे ये,” कुंतीमातेला ठाऊक नव्हते का, की लग्नपूर्व काळात कुणा स्त्रीने अपत्याला जन्म दिला तर अवघे जग तिला पापी, व्यभिचारिणी म्हणते? पण कुंतीमाता मात्र स्वतःच्या कीर्तीवर, प्रतिष्ठेवर तुळशीपत्र ठेवते व समूहाच्या हिताला प्राधान्य देते. उलटपक्षी कौरवांकडे कर्ण होता, भीष्म व द्रोण होते. या सर्वांना समूहहिताला लाथाडून वैयक्तिक कीर्तीला गौरविणे योग्य वाटले म्हणून तर विजय पांडवांचा झाला; कौरव मात्र पराजित झाले. दीनदयाळजी म्हणतात, “यतो धर्मस्ततो जयः” या पंक्तीचा अर्थ समूहधर्माची महती गाणारा आहे. निवेदिताताई तरी कुठे वेगळे काही सांगताहेत?
कर्मसिद्धांत म्हणजे काय?
पुस्तकाच्या तिसर्या भागातले सातवे प्रकरण कर्मसिद्धांताची थोरवी गाणारे आहे. या प्रकरणाची 135 ते 156 क्रमांकाची पाने वाचल्यानंतर कुणाही वाचकाला लोकमान्यांच्या गीतारहस्यात ‘कर्मविपाक आणि आत्मस्वातंत्र्य’ या शीर्षकाच्या मनोप्रकरणाचे स्मरण होईल. लोकमान्य टिळक या प्रकरणात वाचकांना माहिती देतात, की कर्मसिद्धांत म्हणजे माणसाला जखडून ठेवणार्या जणू बेड्या आहेत. कोणत्याही मनुष्याला ‘आपण केलेल्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते. या जन्मात नाही तर नंतरच्या जन्मात! या अर्थाने कर्माच्या बेड्या पुढल्या जन्मातही जखडून ठेवतात. दुसरा जन्म माणसाला मिळाला याचा अर्थ तुमच्या आत्म्याने वेगळ्या शरीरात प्रवेश केला. पण इथेच टिळक महाराज सांगतात की, या माणसाचे शरीर बदलले तरी आत्मा तोच आहे व हा आत्मा परमात्म्याचे रूप असल्याने तो तर पूर्णपणे स्वतंत्र आहे. त्याला काही बेड्या-बंधनानी जखडून टाकले जात नाही. साहजिकच ज्या कर्माची फळे भोगण्यास प्रारंभ झाला आहे व म्हणून ज्यांना प्रारब्ध म्हणतात, त्या कर्मांचा त्याग करण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीस पुनर्जन्मानंतरही उपलब्ध आहे. या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करून संबंधित माणसाने जर मायासृष्टीचा त्याग केला व ब्रह्मसृष्टीचा स्वीकार केला तर त्याच्या जीवनाचे सोनेच होईल. लोकमान्य म्हणतात, “यासाठीच निरपेक्ष कर्म करा! वैयक्तिक लाभाकडे दुर्लक्ष करून सर्व कर्मे ईश्वरचरणी समर्पित करा!” निवेदिताताईंनी तिसर्या भागातल्या सातव्या प्रकरणाला मथळा दिला आहे, तो असा - "The choice is yours" सापेक्ष कर्म करायचे की निरपेक्ष कर्म आपले म्हणायचे? निवड तुमच्या हातात आहे. तुमचा आत्मा स्वतंत्र आहे! लोकमान्यांच्या ‘आत्मस्वातंत्र्य’ संकल्पनेवर निवेदिता भिडे यांनी केवढा सार्थ युक्तिवाद शब्दबद्ध केला आहे!
हिंदू संस्कृतीतला स्त्रीविचार!
भारतीय संस्कृतीवरच्या या पुस्तकात लेखिकेने वाचकांच्या गळ्यात योग्य दृष्टीकोन उतरविण्याचे प्रशंसनीय प्रयत्न केले आहेत. मोगल काळात परक्या आक्रमकांनी भारतातल्या मंदिरावर व महिलांवर बेछुट हल्ले केले. अशा हल्ल्यांपासून आपल्या भगिनींचे रक्षण व्हावे म्हणून स्त्रियांनी घरातच राहावे, त्यांचे विवाह बालपणीच करावेत वगैरे बंधने आपल्या पूर्वजांनी स्वीकारली हे विशद करून निवेदिताताई तुम्हा आम्हाला सांगतात - “आता काळ बदललाय. यापुढे स्त्रियांना घरातच कोंडून ठेवण्याची, बालविवाह करण्याची काहीही आवश्यकता नाही. ॠग्वेदात पन्नास महिला ॠषींची जंत्रीच वाचायला मिळते.” (पान क्र.161) इथे ‘कामिनीकांचनविरह’ याचा अर्थ, ‘स्त्रिया व सुवर्ण यांचा त्याग करायचा.‘ हा अर्थ अपुरा आहे. कारण ‘कामिनी’ म्हणजे 'Lust' म्हणजेच ‘कामवासना‘ (पान क्र.159) सोळा संस्कारांमध्ये पुंसावन संस्कार असतात; पण स्त्रीच्या गरोदरावस्थेत दुसर्या व चौथ्या महिन्यांत हा संस्कार करून ‘या स्त्रीच्या पोटी केवळ पुरुषच जन्माला यावा ही इच्छा बाळगायची हाही अर्थ चुकीचा आहे.” (पान क्र. 230) पुंसावन या शब्दात ‘पु’ हा उपसर्ग आहे व पुरुष म्हणजे मनुष्य हे समीकरण लक्षात ठेवले पाहिजे. सारांश... स्त्री लग्नापूर्वी माहेरी असते तेव्हा तिचा जन्मदाता म्हणतो “ही परक्याची ठेव आहे,” ती लग्न करून सासरी गेली की, तिचा नवरा म्हणतो :- “स्त्री म्हणजे पुरुषाच्या मार्गातली धोंड आहे.” यासंदर्भात लेखिका विनवते ः ‘स्त्रीला परक्याची ठेव मानू नका वा पुरुषाच्या रस्त्यातली धोंड मानू नका, तिला माणूस म्हणून सन्मानित करा!”
Indian Culture हे पुस्तक निश्चितच वाचनीय व संग्राह्य आहे. सर्वोच्च न्यायालयातले एक जाणकार, ख्यातनाम विधीज्ञ साई दीपक यांनी पुस्तकासाठी चार शब्द लिहिले आहेत. तसेच मा. मोहनराव भागवतांनी ‘या पुस्तकाची सर्व भारतीय भाषांमधून भाषांतरे व्हावीत, सगळ्यांनीच या पुस्तकाचे गहिरे अध्ययन करावे’ अशी शिफारस केली आहे.‘
निवेदिता भिडे यांचे हार्दिक अभिनंदन केले पाहिजे. खरं म्हणजे त्यांना मनापासून मुक्त धन्यवाद दिले पाहिजेत. हिंदुत्वनिष्ठांनी निवेदिताताईंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून स्वतःची अध्ययनशीलता, चिंतनशीलता अधिक कसदार केली पाहिजे. ही काळाची गरज आहे. तसेच वर्तमानाची शर्त आहे.