नानासाहेब धर्माधिकारी

01 Mar 2025 11:44:51
@रिद्धी निलेश बांदिवडेकर
 

nanasaheb dharmadhikari 
नानासाहेब धर्माधिकारी उर्फ नारायण धर्माधिकारी यांना सर्वच ओळखतात. आपल्या आडनावाप्रमाणे त्यांनी धर्मजागृतीचे काम केले. त्यांच्या कामाची गौरवगाथा सांगणारा हा लेख.
 
आज खूप मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार झालेला आहे. अध्यात्माचे धडे देऊन नानांनी सामान्यजनांना योग्य दिशा दाखवल्या आहेत. मार्गदर्शन केले आहे. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान, स्त्रियांवरील अत्याचार, जातिभेद अशा समस्यांवर नानांनी आपल्या संस्कारांनी समस्या निराकरण केले आहे. त्यामुळे नानांनी लाखो भक्तांना परमार्थाकडे वळण्याचा मार्ग दाखवला, असे म्हटल्यास चुकीचे राहणार नाही. 
 
महाराष्ट्रातील रेवदंडा येथे 1 मार्च 1922 रोजी नानासाहेबांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे.त्यांचे मूळ आडनाव शांडिल्य असे होते. दर्यासारंग आंग्रे यांनी धर्माधिकारी ही पदवी दिली, तेव्हापासून त्यांचे नाव धर्माधिकारी असे पडले आणि त्यांनी त्या नावाला समर्पक असे कार्य केले. धर्मजागृतीसाठी कार्य करताना श्री बैठकीची संकल्पना अमलात आणली. 1943 साली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे ‘श्रीसमर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती’ स्थापन केली. सोमवार दि. 8 ऑक्टोबर 1943 रोजी मुंबई येथील गोरेगाव येथे प्रथम श्री बैठक सुरू करण्यात आली. बैठकीत होणार्‍या अध्यात्माचा प्रसार आज जगभर चालू आहे. मराठी भाषेतून बैठका सुरू झाल्या, आज हिंदी, तामिळ, बंगाली, कन्नड भाषांतून निरूपण केले जाते. सुरुवातीच्या बैठकांमध्ये केवळ महिला आणि पुरुषच असत, मात्र त्यानंतर याचा प्रभाव इतका वाढला की बालोपासनासुद्धा सुरू केल्या गेल्या. आज खूप मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार झालेला आहे. अध्यात्माचे धडे देऊन नानांनी सामान्यजनांना योग्य दिशा दाखवल्या आहेत. मार्गदर्शन केले आहे. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान, स्त्रियांवरील अत्याचार, जातिभेद अशा समस्यांवर नानांनी आपल्या संस्कारांनी समस्या निराकरण केले आहे. त्यामुळे नानांनी लाखो भक्तांना परमार्थाकडे वळण्याचा मार्ग दाखवला, असे म्हटल्यास चुकीचे राहणार नाही.
 
 
नानासाहेबांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले असले, तरी त्यांनी चांगल्या मूल्यांतून केवळ आपल्या अपत्यांनाच नाही, तर पूर्ण समाजाला सुसंस्कृत केले. अध्यात्माचे धडे देताना नानासाहेबांनी शेकडो खेडी, गावे, वनवासी भाग व्यसनमुक्त केला. त्या भागात संस्काराचे बीज पेरून समाजाची प्रगती केली. या कार्यासाठी त्यांना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. हजारो श्रीसदस्यांसमोर हा सन्मान देण्यात आला.
 
 
श्री. नानासाहेब यांनी समाजातील ज्ञानाची ज्योत पेटवून अज्ञानाचा अंधकार दूर करण्याचा प्रयत्न केला. संतांच्या वाङ्मयाच्या आधारावर शिकवण देऊन त्यांनी जनजागृती केली. आपल्या सामाजिक आणि देशाच्या ऋणांची जाणीव करून देताना नेहमी ते म्हणत की “देशाने मला काय दिले यापेक्षा मी देशाला काय दिले? हे पाहणे जास्त महत्त्वाचे.” मनुष्य ही एकच जात आहे आणि मानवता हा एकच धर्म आहे, असे ते मानत. त्यांच्या संस्कारातून त्यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि एकता निर्माण केली. त्यांचा असा विश्वास आहे की समाजात परिवर्तन करायचे असेल, तर संतांचे विचार समाजात सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजेत. यासाठी यांनी भारतीय समाजरचनेचा, संस्कृतीचा, परंपरांचा, चाली-रूढी-प्रथांमधील त्रुटींचा आणि मर्यादांचा बारकाईने अभ्यास केला व अज्ञानाचा अंधकार दूर केला.
 
 
डॉ.श्री. नानासाहेबांची व्यापक व अभूतपूर्व शिकवण सर्वदूर पोहोचवण्यासाठी अप्पासाहेबांनी डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान संस्थेची स्थापना केली. डॉ.श्री. नानासाहेबांनी आपल्या निरपेक्ष भूमिकेतून आणि समाजप्रबोधनातून समाजसेवा करण्याचे जीवनव्रत स्वीकारून या कार्यामध्ये आपली संपूर्ण हयात व्यतीत केलेली आहे. अनेक सामाजिक संस्थांनी त्यांच्या या कार्याची अत्यंत कृतज्ञतापूर्वक नोंद घेऊन त्यांना अनेक पुरस्कार प्रदान केले. डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने गरजू मुलांना नि:शुल्क साहित्याचे वाटप, आदिवासी लोकांना जातीच्या दाखल्याचे वाटप, आदिवासी जनतेला शिधापत्रिका वाटप, माळीण दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, संजय गांधी उद्यानात कुरण व्यवस्थापन, अनेक ठिकाणी पाणपोया, गारंबी धरणाचे गाळ काढण्याचे काम करून जनतेच्या विकासात मदत केली व सामाजिक सुधारणा केली.
 
 
वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या वाढत्या गरजा यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर फार मोठ्या प्रमाणात ताण पडतो आहे. जागतिक स्तरावर वाढलेले औद्योगिकीकरण, वाढलेली रहदारी, जंगलतोड यामुळे प्रदूषण वाढत चालले आहे. त्यामुळे जीवसृष्टीला अनेक आजार भोगावे लागत आहे. जमिनीची होणारी धूप, वन्य जिवांची घरे नष्ट होणे, ओझोनच्या थराला पडणारी छिद्रे यामुळे सजीवांचे जीवन धोक्यात आले आहे. ही हानी लक्षात घेऊन पर्यावरणाचे संतुलन पुन्हा साधण्यासाठी डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान पर्यावरण संरक्षण, संवर्धन, संतुलन टिकवण्यासाठी कार्य करत आहे. त्यासाठी त्यांनी वृक्षारोपण, झाडे लावा झाडे जगवा, ग्रामस्वच्छता अभियान, तलाव आणि विहिरी यातील गाळ काढणे अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले. भविष्यात पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी या उपक्रमामार्फत जनजागृती केली जाते. होळकरवाडी, लोणावळा, माणगाव, पनवेल, मुरुड, ठाणे, माथेरान येथे वृक्षारोपण केले, इतकेच नव्हे, तर त्याचे संवर्धनदेखील केले. कारण पर्यावरणाच्या असंतुलनाचे निर्मूलन करण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे जाणीवपूर्वक केलेले वृक्षारोपण आणि संगोपन होय. वृक्षामुळे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड यांचे वातावरणातील संतुलन साधण्यास फार मोठा उपयोग होतो. तसेच जिवांच्या संवर्धनासाठी फायदा होतो. केवळ वृक्षरोपण नाही, तर त्याबरोबर वृक्षांचे संगोपन आणि जतन तेवढेच महत्त्वाचे आहे, असे नानासाहेबांनी आपल्या कार्यातून दर्शवले. पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे हे अचूकपणे जाणून सर्वांना वेळोवेळी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. डॉ.श्री. अप्पासाहेब म्हणतात की, “बीज रुजवणे जेवढे गरजेचे आहे, तेवढीच त्याची निगा राखणे, देखभाल करणे गरजेचे आहे.” नानासाहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्री समर्थकांनी दहा लाख वृक्षांची लागवड केली आणि त्यांची देखभाल केली.
 
 
शहरी आणि ग्रामीण भागातील, तसेच डोंगराळ भागातील सर्वसामान्यांना उत्तम आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे वेळोवेळी नि:शुल्क आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. नि:शुल्क औषधांचा पुरवठादेखील केला जातो. अस्थिरोग, स्त्रीरोग, दंतचिकित्सा, हृदयरोग, पोटांचे विकार, मधुमेह, रक्तदाब, त्वचारोग यासारख्या विविध व्याधींनी ग्रस्त रुग्णांना, रोगांची निदान परीक्षा करून वैद्यकीय सल्ला देण्यात येतो. या रुग्णांना पुढील उपचारासाठी डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटल येथे पाठवण्यात येते. 20 डिसेंबर 2023 रोजी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. दीड लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली. 1500पेक्षा जास्त तज्ज्ञ आणि निष्णात डॉक्टर्स, 5000पेक्षा जास्त रुग्णसेवक, कर्मचारी आणि स्वयंसेवक यात सहभागी झालेले होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये या महाशिबिराची नोंद करण्यात आली.
 
 
संजय गांधी उद्यानातील तुळशी तलाव परिसरात तृणभक्षक प्राण्यांसाठी कुरण व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात आला. जंगलातील मांसभक्षक आणि तृणभक्षक प्राणी आणि वनस्पती एकमेकांवर अवलंबून असतात. अखाद्य वनस्पती काढून टाकून त्या ठिकाणी मोतीचुरा गवत, रान पोहा, चोपटी गवत इत्यादी तृणभक्षक खातील अशा वनस्पतीची लागवड केल्यास तृणभक्षक प्राण्यांना अन्न मिळेल, त्यांची संख्या वाढेल, अन्नसाखळी अबाधित राहून मानवी वस्तीवर हल्ले थांबतील, असा त्यामागील हेतू.
 
 
सुशिक्षित असूनही समाजात विविध अंधश्रद्धा, अज्ञान, अनिष्ट रूढी, अघोरी परंपरा पाळल्या जातात, म्हणून डॉ.श्री. नानासाहेबांनी अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केले. अज्ञानापोटी अंधश्रद्धेच्या कचाट्यात अडकलेला समाज त्यांनी स्वत: पाहिला. स्वत:च्या अपयशाचे, आजाराचे कारण दैवात किवा जादूटोण्यात समजतो, अशा दिशाहीन झालेल्या व्यक्तींना भानावर आणण्यासाठी संतसाहित्यावर आधारित शिकवण द्यायला हवी, असे त्यांना वाटू लागले. याचा निर्धार करून, जनसामान्यांमध्ये ही शिकवण रुजवण्यासाठी ते आयुष्यभर अत्यंत नि:स्पृहतेने अखंडपणे कार्यरत होते. प्रत्येकाचे अज्ञान हे या समस्येचे मूळ आहे. अज्ञानी मनुष्याला संस्काराने हाताळले पाहिजे. संतपरंपरेची शाश्वत शिकवण एकदा अंतरी रुजली की मनुष्य बुद्धिवादी निरीक्षक होतो. प्रत्येक परिस्थितीकडे तो डोळसपणे बघतो. स्वत:च्या संकटावर मात करण्याची ताकद या संस्कारातून मिळते.डॉ.श्री. नानासाहेब यांनी सात दशकांपूर्वी आरंभलेली श्री बैठकीची व्यवस्था आजही सुरळीत चालू आहे. या बैठकीतून लोकांना आत्मिक, धार्मिक पाठबळ मिळाले आहे. या शाश्वत बैठकीतून मानवाला मानसिक दुर्बलतेतून सामर्थ्यामध्ये आणते.
 
 
इतकेच नाही, तर प्रतिष्ठानने जलसाठ्यातील गाळ काढून स्वच्छता अभियान राबविले आहे. नानासाहेबांनी पनवेलमध्ये वडाळे तलाव स्वच्छता अभियान, पनवेलमधील धानसर तलाव स्वच्छता अभियान, महाडमधील वारंगी गावातील विहीर स्वच्छता अभियान, कर्जत येथील तलावाचे सुशोभीकरण, नागाव येथील पोखरण स्वच्छता, मुरुड-जंजिरा येथील गारंबी धरण स्वच्छता अभियान अशा अनेक उपक्रमांअंतर्गत सामाजिक, धार्मिक विकास आणि जनजागृती केली. त्यांच्या कार्याने अनेकांना प्रेरणा मिळावी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटावा असे योगदान त्यांनी केले. दि. 8 जुलै 2008 रोजी हा ज्ञानसूर्य मावळला. पण आजही त्यांच्या मुलांनी त्यांचे कार्य पुढे नेले आणि नेत राहतील.
 
8693007301
 
सौजन्य - राष्ट्रोत्थान ग्रंथ
Powered By Sangraha 9.0