@उदय शेवडे
भारतीयांच्या श्रद्धा किती चिवट आहेत याची प्रचिती देणारा हा कुंभ दरिद्री नारायणापासून नवकोट नारायणापर्यंत सगळ्यांना सामावून घेणारा आहे. सगळ्या प्रकारचा भारतीय समाज इथे वावरताना दिसतो, समरसतेचे अनोखे दर्शन यात घडतेच पण इथे व्यवस्था असो नसो, श्रद्धा जपणारा आणि होणारा त्रास, हालअपेष्टा याची अजिबात तक्रार न करणारा भाविक बघितला की आपले मन स्तिमित होऊन जाते एवढे निश्चित.
ठरावीक अंतराने देशातल्या चार वेगवेगळ्या ठिकाणी होणारा कुंभमेळा हा आपल्या देशाच्या दृष्टीने, हजारो वर्षे सुरू असलेला सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि धार्मिक, पारंपरिक सोहळा आहे त्याचे एक खगोलीय कारण आणि महत्त्वही आहे हे विशेष.
कुंभमेळ्याचे वर्णन लहानपणापासून वाचत आलोय आणि आता या माहिती आणि सामाजिक माध्यमाच्या काळात तर त्या विषयीचा माहितीचा कुंभही ऐकायला-वाचायला मिळतो आहे.
मी आस्तिक असलो तरी शक्यतो गर्दीची धार्मिक ठिकाणे टाळतो. त्यामुळे कुंभमेळ्याला कधी जाण्याचा विचार केला नव्हता पण एखादी गोष्ट आपल्या नशिबात असली की तो योग साधायचा, संधीसाधू व्हायचं हे मात्र पक्क ठरवतो. मला या निमित्ताने इथे चार दिवस राहण्याची संधी मिळाली. संस्कार भारतीच्या प्रचारकांची इथे बैठक हे एक प्रमुख कारण शिवाय संस्कार भारतीचा इथे भव्य मंडप होता त्यात सांस्कृतिक कार्यक्रम होते. या पार्श्वभूमीवर इथे जाण्याची संधी योगायोगाने मिळाली.
त्यात महत्त्वाचा असा एक कार्यक्रम म्हणजे बुधवार, दिनांक 22 जानेवारीला भारतातील विविध राज्यांच्या वीरागंनाची त्या त्या वेशभूषेसह शोभायात्रा होती. त्याचे नाव होते राष्ट्ररत्ना शोभायात्रा. निमित्त होते यंदा संत मीराबाई, राणी दुर्गावती आणि लोकमाता अहिल्यादेवी यांची जन्मशताब्दी. (जयंती शताब्दी) या व्यतिरिक्त लोकमाता अहिल्यादेवींवरचे नाटक, काही नृत्य कार्यक्रम, गीत संगीत असे कार्यक्रम भारताच्या राज्यांतील आणि स्थानिक कलावंतांचे कार्यक्रम 10 फेब्रुवारीपर्यंत होत आहेत.
इथे झालेल्या वेगळा विचार देणार्या अनोख्या शोभायात्रेत सहभागी होण्याची संधी मिळाली. देशातील 16 राज्यांतून 107 वीरांगनांच्या वेषात प्रतिनिधित्त्व झाले. यातल्या 80 टक्के वीरांगना या माहिती नसलेल्या किंवा अप्रसिद्ध होत्या. त्यात शास्त्रज्ञ, अंतराळ वीर, वैद्यकीय क्षेत्र, कला क्षेत्र आदी विविध क्षेत्रांतील महिला होत्या. त्यांची नावे अणि थोडक्यात माहिती देणारे छोटे फलक संबंधितांनी हाती धरले होते. स्त्रीशक्तीची वेगळी अनुभूती यातून मिळालीच त्या निमित्ताने त्यांचे स्मरण आणि अभिवादन करता आले. त्यात 157 महिला आणि 109 पुरुष सम्मिलित झाले. ही शोभायात्रा जवळच असलेल्या गंगेच्या किनारी झाली. त्या ठिकाणी गंगा आरती आणि वंदेमातरम् होऊन याची सांगता झाली. अतिशय वेगळा आणि रोमांचक असा हा अनुभव होता.

हा कुंभ प्रामुख्याने धार्मिक, अध्यात्मिक कारणासाठी असला तरी या विषयाशी संबंधित संस्थांव्यातिरिक्त अशा अनेक सेवा, कला, आरोग्य इ. संस्थांसाठी सुद्धा इथे जागा वितरीत केली जाते. तिथे मोठे मोठे मंडप आणि राहुट्या, तंबू यांची उभारणी केली जाते. त्या ठिकाणी त्या त्या संस्थांना आपापले कार्यक्रम (त्यात प्रामुख्याने भजन, कीर्तन, प्रवचन, करमणूक कार्यक्रम, संस्थांची माहिती देणारी छोटी केंद्रे असतात.) करण्यासाठी मंच आणि राहण्याची व्यवस्था असते.
यंदा जवळ जवळ 14000 संस्थांना जागा दिल्या होत्या. (गेल्या वर्षी 6000 संस्था होत्या.) गंगेच्या खोर्यातला (किनारा) विस्तीर्ण असा भूभाग इथे संपादित केला आहे व त्याची रचना 25 वेगवेगळ्या क्षेत्रात केली आहे. वर्षानुवर्षे अनुभव असल्याने ही रचना अतिशय नियोजनबद्ध आणि व्यवस्थित अशी केली आहे.
काटकोनात भव्य आणि रुंद रस्ते, सर्व रचना खोर्यात असल्याने नदीची वाळू आणि धूळ मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा त्रास होऊ नये, वाहने रुतू नयेत म्हणून सर्व रस्त्यांवर पोलादी प्लेट्स टाकल्या आहेत. शिवाय धूळ उडू नये म्हणून पाणी मारण्याची व्यवस्था (सडा) आहे. कडेला पुरेशा संख्येने प्रसाधन गृहे, त्या दृष्टीने पाण्याची व्यवस्था केलेली आहे. प्लास्टिक प्रदूषण होणार नाही याची विशेष काळजी घेतलेली दिसली. नागरिकही त्याला चांगला प्रतिसाद देत होते.
स्वच्छता आणि सुरक्षितता याकडे विशेष लक्ष दिले आहे याची पदोपदी अनुभूती मिळत होती. काही ठिकाणी किरकोळ संख्येने नागरिक मात्र त्याला गालबोट लावताना दिसत होते, त्याठिकाणी पोलीस नियंत्रित करत होते. स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस यांची संख्या भरपूर होती. परवाना असलेल्या वाहनांनाच कुंभ परिसरात प्रवेश आहे.
प्रत्येक क्षेत्रात इथे आलेल्या विविध संस्थांना जागा दिली आहेच (अगदी काँगेस पक्षाचा मंडपही इथे आहे.)शिवाय एक भव्य आणि सुसज्ज चिकित्सालय आणि जन आश्रयस्थळ अशा दोन व्यवस्थाही आहे. त्यात चिकित्सालयात आरोग्याच्या दृष्टीने प्रारंभिक वैद्यकीय मदत, सबंधित डॉक्टर्स, कर्मचारी पुरेशा संख्येने आहेत. इथे औषधे निःशुल्क दिली जातात. अतिशय टापटीप आणि स्वच्छ अशी व्यवस्था आहे तर जनाश्रय स्थळ इथे अतिशय स्वस्तात राहण्याची, (प्रसाधन व्यवस्थेसह) सोय सामूहिक पद्धतीने केली आहे. त्यात पलंग, गादी, उशी, ब्लँकेट अशा छान व्यवस्था आहेत. शिवाय या सर्व संस्थांनी आपापल्या जागेत आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार सर्वसामान्य ते पंचतारांकित राहुट्यांमध्ये सशुल्क/निःशुल्क राहण्याची व्यवस्था केली आहे. याशिवाय प्रत्येक विभागात शासकीय अधिकार्याचे कार्यलय आणि पोलिस चौकी आहेत.
जेवणाच्या दृष्टीने आपापल्या संस्था आपल्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करतात. त्या व्यतिरिक्त हॉटेल्स आणि स्नॅक सेंटर्स आहेत. अनेक ठिकाणी मोफत अन्नदान, लंगर, अन्नछत्र असतात. त्यामुळे पैसे असोत किंवा नसोत इथे कोणीही उपाशी रहात नाही. अर्थात खवय्येगिरीसाठी इथे कोणी येत नाही. त्यांची भूक वेगळी असते. ती भागणे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
रावत सरकारचा (धार्मिक संस्था) मंडप पाहण्या व्यतिरिक्त मी धार्मिक मंडपात गेलो नाही. अर्थात वेळही नव्हता. हा मंडपही संस्कार भारतीच्या मंडपाशेजारीच असल्याने तिथे मात्र गेलो. तिथे दिवसभर धार्मिक विधी सुरू होते. स्पष्ट आवाजात विविध स्तोत्रे, श्लोक, ऋचा शिवाय ध्वनीक्षेपकावर शास्त्रीय संगीत गायनवादन होते हे विशेष. त्यामुळे वातावरणात एक भारलेपण असायचे.
कलेच्या दृष्टीने तीन ठिकाणी जाता आले : एक म्हणजे उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाच्या वतीने राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती देणारा मंडप. त्याचे नाव होते उत्तर प्रदेश मंडपम्. त्यात तिथल्या प्रमुख मंदिरांची भव्य प्रतिकृती होतीच, शिवाय सर्व पंथ उपपंथ (हिंदू-अहिंदू) यांची मंदिरे, प्रार्थनास्थळे यांची नकाशासह कसे जायचे याची माहिती देणारी अप्रतिम प्रदर्शनी होती. ऊळसळींरश्र र्घीालह ह्यातून कुंभ दर्शन होते.
दुसरा आणि तिसरा मंडप हे अनुक्रमे उप्र सरकार (कलाग्राम) आणि केंद्र सरकार (कलाकुंज) यांचे आहेत. उत्तर प्रदेशातील आणि उर्वरित देशातील सर्व कलांची भव्य प्रदर्शनी होती. त्यात चित्र, शिल्प, संगीतवाद्य, स्थानिक कला, मृदा कला, स्थापत्य कला अशा सगळ्यांना स्थान होते.
या तिन्ही ठिकाणी आवर्जून गेलेच पाहिजे असे हे मंडप आहेत. या तिन्ही मंडपांची रचना अतिशय उच्च अशा दर्जाची होतीच. मांडणी ही अतिशय आकर्षक अशा स्वरूपाची, काही ठिकाणी माहिती देण्यासाठी कर्मचारी होते. विशेष म्हणजे इथेही प्रचंड गर्दी होती.
अनेक ठिकाणी त्या त्या संस्थेचे कार्यक्रम म्हणजे भजन, प्रवचन, कीर्तन, धार्मिक विधी असे कार्यक्रम दिवसभर सुरू असतात. अनेक भाविक, अनुयायी यात सहभागी होताना दिसले.
एक वेगळा अनुभव.....इथे फिरताना दोन सोलापूरच्या तरुणी भेटल्या, वय साधारण 18 ते 20 च्या आसपास असावे. त्यांना मी विचारले, का यावेसे वाटले? आणि कशा आल्यात? त्यांचे उत्तर यायची इच्छा झाली, येण्याचे आरक्षण मिळाले पण परतीचे नाही......मग तुम्ही कशा जाणार? हे विचारल्यावर ‘जाऊ कशाही’ असे उत्तर मिळाले. मला त्यांच्या धाडसाचे कौतुक वाटले. तरुणाई मोठ्या प्रमाणावर दिसली हे विशेष.
अजून एक दृश्य पाहून मनस्वी आनंद झाला. एक तरुण मुलगा आपल्या वृद्ध वडिलांना घेऊन आला होता. तो बाबांना धरून गंगेच्या पात्रात उतरला. पाण्यात त्यांना धरून डुबकी मारायला सांगितली. नंतर त्यांना अंघोळ घातली. तेव्हा दोघांच्या चेहेर्यावर जे ते तृप्ततेचे आणि कृतकृत्य झाल्याचे भाव होते ते मी विसरू शकत नाही. काय वाटलं असेल त्या बाबांना आणि त्या मुलाला? ते त्यांच्या चेहेर्यावर दिसत होते.
144 वर्षांनी येणार्या या महाकुंभाचा आणि संगमावर पवित्र स्नानाचा अनुभव घ्यायला मिळाला. येताना वाराणसीच्या काशी विश्वनाथाचे दर्शन आणि नावेतून गंगेच्या तीरावरील सर्व घाटांचे विलोभनीय दर्शन आणि जलप्रवासाचा आनंद घेता आला.
भारतीयांच्या श्रद्धा (आणि जगातही) किती चिवट आहेत याची प्रचिती देणारा हा कुंभ दरिद्री नारायणापासून नवकोट नारायणापर्यंत सगळ्यांना सामावून घेणारा आहे. सगळ्या प्रकारचा भारतीय समाज इथे वावरताना दिसतो, समरसतेचे अनोखे दर्शन यात घडतेच; पण इथे व्यवस्था असो नसो, सरकार कोणाचेही असो याकडे दुर्लक्ष करून श्रद्धा जपणारा आणि होणारा त्रास, हाल अपेष्टा याची अजिबात तक्रार न करणारा भाविक बघितला की आपले मन स्तिमित होऊन जाते एवढे निश्चित.