“शेती माझी उपासना” - पद्मश्री सुभाष शर्मा

विवेक मराठी    08-Feb-2025
Total Views |
@वसंत फुटाणे  9422958767
 
vivek 
काळ्या आईच्या सेवेसाठी सुभाष शर्मा तत्पर आहेत. देशाने मातीच्या सुपीकतेकडे दुर्लक्ष करू नये, जल, जंगल, जमीन, बियाणे या बाबी व्यापाराच्या नव्हे तर निसर्गाने आपल्याला वापरायला दिलेली ती ठेव आहे. पुढच्या पिढ्यांना ती आपल्याला सोपवायची आहे. हा संदेश पद्मश्री सुभाष शर्मा त्यांच्या कामातून सातत्याने समाजात देत असतात.
नापीक जमिनीचा देश आपले स्वातंत्र्य कसे टिकविणार? हा प्रश्न भल्याभल्यांच्या मनात नसेल आला, पण या माणसाने शेती करताना मातीची काळजी आधी घेतली. त्यासाठी समपातळी (कंटूर) बांधबंदिस्ती केली, पेरणीही कंटूरनुसारच केली. त्याला शेण-गोमूत्राच्या पशुमूत्राच्या सुयोग्य व्यवस्थापनाची जोड दिली होती. त्यामुळे रासायनिक शेतीमुळे बिघडलेली जमीन हळूहळू सुपीक होत गेली. सुपीक मातीच्या जोडीला ओलाव्याची (मृदाजल) जोड मिळाली. (पावसाचे पाणी शेतातच अधिकाधिक कसे जिरेल यासाठी ही सुभाष शर्मा सतत प्रयत्नशील आहेत.) बियाणेही घरचेच वापरले. माती, पाणी आणि बियाणे यांचा उत्तम मेळ शर्माज यांनी बसवला. याचा परिणाम काय झाला?
 
 
एकदा हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन शर्मा यांचे शेत पाहायला आले. तेव्हा ते यवतमाळ शहराजवळील शेतात कार्यरत होते. अतिशय हलक्या, उताराच्या जमिनीवरील त्यांची कंटूरची शेती पाहून डॉ. स्वामीनाथन यांच्या तोंडून फक्त एकच
शब्द निघाला- Excellent..
 
शर्माजींच्या कामाचा गाभा आहे ‘माती, पाणी व्यवस्थापन’. शेण-मूत्र, काडीकचरा - पालापाचोळा हे जमिनीचं भोजन आहे. ते जमिनीला परत केलं तर बाहेरच्या निविष्ठांची गरजच नाही. हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांची शेती स्वावलंबी आहे. आधुनिक बी-बियाणे, रासायनिक खते इ. न वापरताही उत्पादनवाढ शक्य आहे. हे त्यांच्या कामातून जगाला त्यांनी दाखवून दिलं. पर्यावरण संवर्धन हा मुद्दाही त्यातून साधला जातो. त्यांच्या कोथिंबिरीच्या शेतात प्रचंड प्रमाणात आम्ही मधमाशा पाहिल्या आहेत. (बीटी कापूस परिसरात वाढल्यापासून मधमाशांची संख्या त्यांच्याहीकडे रोडावली आहे)
 
 
सुयोग्य व्यवस्थापन हे शर्माजींचे वैशिष्ट्य आहे. पेरणी केव्हा आणि कशी करायची, बाजारात माल केव्हा जायला हवा, शेण-पशुमूत्रापासून तयार झालेले संजीवक (जीवामृत) किती प्रमाणात वापरावे इ. बारकावे आहेत. परिस्थितीनुसार यात बदल करावे लागतात. सेंद्रीय शेतीत रासायनिक शेेतीसारखे ठोकताळे नसतात. जातीने सतत निरीक्षणे करावी लागतात. त्यानुसार बदल करावे लागतात. उदा. जमीन जशी उत्तरोत्तर सुपीक होत जाईल तसतसे संजीवक(जीवामृत)मधील गो-पशुमूत्राचे प्रमाण कमी करावे लागेल, अन्यथा अधिक नत्र पुरवठा होऊन पिकांची कायिक वाढ अधिक होऊन उत्पादन घटू शकते. हा इशारा सुभाष शर्मा कसा काय देऊ शकतात? त्यासाठी प्रयोगशाळेतील तपासण्या नव्हे तर निरीक्षणे महत्वाची आहेत. शेतीला फक्त व्यवसाय समजू नये, ती उपासना मानावी. शेती जगण्याचे साधन आहेच, पण तिला ओरबाडू नका, लोभ करू नका हा संदेश त्यांच्या बोलण्यातून, कृतीतून मिळत असतो. मजुरांशी असलेले संबंधही अव्दितीयच आहेत. ‘परिश्रमानुसार मोबदला’ हे सूत्र इथे आहे. पेरणी, खुरपणी (निंदण), कापणी इ. कामाचे त्यांनी दर (कोष्टक) ठरविले, त्यानुसार काम चालते. मजुरांच्या सुखदुःखात ते सहभागी होतात, मजुरांना त्यांनी भारतभ्रमणही घडवले आहे.
 
 
रासायनिक शेती सुरू असताना त्यांच्या शेतात निवासी असणारी कुटुंबे सतत आजारी पडत, पण आज तशी स्थिती नाही. अन्न, हवा, पाणी त्यांना पैसेवाल्या, शहरवासियांपेक्षा उत्तम मिळतं, इतर मजुरांपेक्षा रोजीही अधिक असते, निवासव्यवस्था कामाच्या ठिकाणी शेतावरच आहे.
 
 
शर्मा यांंच्या शेतात परप्रांतातील शेतकरीसुद्धा प्रचंड संख्येत येऊन गेलेत व येत आहेत. कृषी अधिकार्‍यांची प्रशिक्षण शिबिरे सुद्धा झालीत. त्यांच्या कामाचा परिणाम देशभर नक्कीच झाला, होत आहे. मला स्वतःला सुद्धा त्यांच्या शेतातून दरवेळी नवं शिकायला मिळतं. (मी 40 वर्षांपासून रसायनमुक्त / सेंद्रीय शेती करतो.)
 
 
किटकनाशकांच्या जोडीला आता सर्वत्र तणनाशकांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. यातील रसायनांचे अंश शेजारच्या शेतातून शर्मा यांच्या शेतात येणे अटळ आहे. त्यामुळे यांच्या विहिरीचे पाणीही दिवसेंदिवस अधिक प्रदूषित होत राहणार, शिवाय शेजारच्या किटकनाशकांच्या वापरामुळे मित्रकिडीही घटू शकतात. या पुढे ड्रोनद्वारे फवारणी गावोगावी होईल. त्यातील घातक रसायने पाणवठे दूषित करू शकतात. शिवाय एखादा कुबुद्धीग्रस्त मुद्दाम सेंद्रीय शेताच्या काठाने रात्रीबेरात्रीसुद्धा ड्रोनद्वारे उपद्व्याप करू शकतो. या सर्व शक्यतांचा विचार व्हायला हवा. तंत्रज्ञानाच्या/सोयीच्या नावाने आपण काय स्वीकारतो आहोत? आपले शेतकरी तेवढे जागृत, सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत का? कासारगोड (केरळ) परिसरातील वनविभागाने काजू लागवडीवर केलेल्या ’एंडोसल्फान’ फवारणीचे अतिभयंकर परिणाम जनतेला का आयुष्यभर भोगावे लागत आहेत? तसेही यवतमाळ जिल्ह्यात मूत्रपिंडविकार (unknown Cronic kidney Disease) अधिक असल्याच्या बातम्या आहेत. श्रीलंकेसारखी भारतातही ही समस्या वाढत आहे. म्हणून धोरणकर्त्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा; सेंद्रीय शेती टिकण्यासाठी काही पथ्ये पाळावीच लागतील. आपल्या देशात याबाबत अजून फारसा विचार झालेला नाही.
 
 
दिल्लीकर मित्रांने सांगितलेला किस्सा -
 
एक मोठं सेंद्रिय शेतीचं शेत, भरपूर प्रचार झालेलं. आमचे मित्र पाहायला गेले. यमुनेच्या काठावरील ते शेत आहे. ओलीत कसे करता? यमुनेचं पाणी वापरतो. यमुना प्रदूषणमुक्त झाली का? ते पाणी पिण्यालायक आहे का? आमच्या सर्वच मोठ्या नद्यांची ही स्थिती आहे. जलप्रदूषण हा मोठा प्रश्न आहे. आज युरियाचे अंश सर्वत्र भूजलात आहेत. पंजाबमधील बटाला, भटिंडा परिसरातील एकाही विहिरीचे पाणी पिण्यालायक उरले नाही. उद्या ही परिस्थिती अनेक राज्यांत गंभीर स्वरूप धारण करू शकते.
 
 
सुभाष शर्मा यांच्यासारख्या प्रयोगवीरांनी सिद्ध करून दाखवलेल्या शेती पद्धतीचा मनःपूर्वक स्वीकार केला नाही तर आपणा सर्वांचे भविष्य कसे असेल? आताच गावोगावी मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, कर्करोग हे आजार वाढत आहेत. या आजारांचा कृषी रसायनांशी संबंध जुळत असल्याचे निष्कर्ष आहेत. यास्तव सर्व समाजघटकांनी शेतकरी, ग्राहक आणि सरकार यांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा, ही विनंती.
 
 
पारंपरिक बियाण्यांचे जतन आणि प्रसार करण्यांसाठी नागपूर आणि सेवाग्राम परिसरात दरवर्षी बीजोत्सवाचे आयोजन होत असते. यात शेतकरी-ग्राहक संमेलन, सेंद्रीय/नैसर्गिक शेतीच्या अनुभवांची देवाण-घेवाण, सेंद्रीय शेतमाल प्रदर्शन इ. उपक्रम असतात. शर्मा अशा उपक्रमांना नुसतेच हजर राहात नाहीत तर या जनाधारित कार्याला आर्थिक सहयोग सुद्धा करतात. सेंद्रीय/नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यास ते तत्पर आहेत.
 
 
शर्मा यांचे काम एकहाती आहे. ते एकटेच शेती सांभाळतात, प्रवासही करतात आणि ते ही स्वबळावर. कोणत्याही देणग्या, निधी शिवाय हे कसं शक्य आहे? त्यांचं नियोजन, कौशल्य आणि काळ्या आईबद्दलची निष्ठा इथे काम करते. भूमातेनं मला एवढं दिलं तर तिचा हिस्सा तिला परत केलाच पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो. भूमातेचा हिस्सा म्हणजे शेणखत, काडीकचर्‍याचे कंपोस्ट खत इ.
 
 
शर्मा यांची शेती आरंभापासून भाजीपाल्याची आहे. यवतमाळ शहर जवळ असल्याने विक्री तुलनेत सोपी आहे. तेथे ते आपला माल खुल्या बाजारातच विक्रीसाठी पाठवतात. सेंद्रीय आहे म्हणून अधिक दराची अपेक्षाही नाही करीत. पण लिलावात शर्मा यांचा माल ग्राहकांच्या, अडत्यांच्या ओळखीचा आहे; आपोआप चढ़ा भाव मिळणारच.
 
 
एकीकडे शहरात सेंद्रीय मालाच्या अव्वाचे सव्वा दाम असतात, सामान्यजनांच्या ते आवाक्यातील नसते. अशी परिस्थिती महानगरांमध्ये असते, तर दुसरीकडे सेंद्रीय शेतकरी त्यांच्या मालाची, परिश्रमाची कदर करून योग्य मोबदल्याची अपेक्षा करीत आहे. नेहमीच शेतकरी आणि ग्राहकांमधील वितरण व्यवस्थेची साखळी हा चिंतेचा विषय अडचणीचाही असतो. ग्राहकांनी आपले गट स्थापन करून थेट शेतकर्‍यांशी संपर्क साधला, आपआपल्या गटाला आवश्यक मालाच्या वितरणाची जबाबदारी स्वीकारली तर ग्राहकांना योग्य दरात खात्रीची वस्तू मिळू शकते. शिवाय ग्राहक आणि शेतकर्‍यांमध्ये नातं निर्माण होईल. यातून सर्वांचं भलंच होईल. शर्मा यांच्या सारख्यांच्या कामाला खरी साथ हवी आहे, ती ग्राहकांची व आम जनतेची. आज प्लॅस्टिकची समस्या महाभयंकर रूप धारण करीत आहे. शुद्ध माल पाहिजे पॅकिंग, लेबल, प्रमाणिकरण इ. हनुमानाचं शेपूट लांबतच जातं. शिवाय यात लबाडी होणारच नाही, याची खात्री नसते.
 
 
विद्वतेपेक्षा निष्ठा महत्वाची आहे. काळ्या आईच्या सेवेसाठी शर्मा तत्पर आहेत. देशाने मातीच्या सुपीकतेकडे दुर्लक्ष करू नये, जल, जंगल, जमीन, बियाणे या बाबी व्यापाराच्या नव्हे तर निसर्गाने आपल्याला वापरायला दिलेली ती ठेव आहे. पुढच्या पिढ्यांना ती आपल्याला सोपवायची आहे. हा संदेश सुभाष शर्मांच्या कामातून समाजात जात आहे.
 
 
तरुण पिढीला पद्मश्री सुभाष शर्मा यांच्या कार्याचा आणि विचारांचा परिचय होण्यासाठी शाळा, महाविद्यालयांनी, किमान कृषी महाविद्यालयांनी, कृषी विज्ञान केंद्रांनी तरी प्रयत्न करावेत. त्यांच्या कार्याचा सन्मान अशा प्रकारे झाला तर अधिक चांगले होईल असे वाटते.
sapress.marathi@gmail.com