गिलान बार सिंड्रोम (GBS) - उद्रेक आणि काही प्रश्न

08 Feb 2025 12:52:45
@डॉ. प्रिया देशपांडे
HMPV या आजाराची भिती ओसरत असतानाच GBS म्हणजे गिलान बार या आजाराचा उद्रेक झाला आहे. याविषयी सर्वात महत्त्वाची म्हणजे, वैद्यकीय क्षेत्राला गेली अनेक दशके या आजाराविषयी माहिती आहे. मात्र हा आजार संसर्गजन्य नसल्याने तसेच हा दुर्मिळ आजार असल्याने या आजाराचा उद्रेक होणे ही घटना नवी आहे. यानिमित्त अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, मात्र एकजुटीने आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याचा प्रतिकार करायला हवा.

GBS
 
2025 या नव्या वर्षाची सुरुवात नवनवीन आजारांच्या माहितीने होत आहे. नुकतेच आपण HMPV हा काय प्रकार आहे हे समजून घेतले होते आणि आता पुणे परिसरात ज्या GBS म्हणजे गिलान बार / गुलियन बारे/ गियां बरे सिंड्रोम या आजाराचा उद्रेक झाला आहे, त्याविषयी अधिक माहिती घेऊया. याविषयी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, हा आजारदेखील नवा आजार नाही. वैद्यकीय क्षेत्राला गेली अनेक दशके याविषयी माहिती आहे. मात्र हा आजार संसर्गजन्य नसल्याने तसेच हा दुर्मिळ आजार असल्याने या आजाराचा उद्रेक होणे ही घटना नवी आहे.
 
 
हा आजार संसर्गजन्य नसला तरी अजूनही या आजाराचे रुग्ण का वाढताना दिसत आहेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या आठवड्यात एकूण रुग्णसंख्या 166 झाली आहे, तसेच पाच संशयित रुग्णांचा मृत्यूदेखील झाला आहे. ICU मध्ये असलेले एकूण 48 रुग्ण गंभीर असून त्यातील 21 रुग्ण अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. रुग्णसंख्या वाढण्याचे कारण आपण दोन प्रकारे समजून घेऊ शकतो.
 
1. GBS जरी संसर्गजन्य आजार नसला तरी देखील तो होण्याचे मूळ कारण हा कोणता ना कोणता संसर्ग हेच असते. म्हणजेच जर मूळ संसर्ग बर्‍याच लोकांना झालेला असेल तर पुढील काही आठवडे GBS सापडत राहणार. त्यानंतर ती संख्या कमी होईल. त्यानुसार आता नव्या रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
 
 
2. हा उद्रेक झाल्यानंतर त्याविषयी समजून घेण्यासाठी तसेच सर्व रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी या आजाराचे सक्रिय सर्वेक्षण तसेच नोंदीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातील सर्व दवाखान्यांमध्ये या आजाराचे रुग्ण नोंदवले जात आहेत. तसेच त्यांच्याविषयी माहिती सरकारकडे कळवली जाऊ लागली आहे. मीडियादेखील याविषयी बातम्या देत असल्याने ही झालेली वाढ सर्वांपर्यंत पोहोचते.
 
 
GBS
 
GBSउद्रेक आणि त्याचे कारण समजून घेण्यासाठी आता WHOची टीम पुण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अभ्यास होईल आणि या उद्रेकाचे कारण समजून घेता येईल.
 
आजाराची माहिती आणि घ्यावयाची काळजी
 
GBS म्हणजे काय?
 
गिलान बार सिंड्रोम ( Guillain-Barre-Syndrome) म्हणजे GBS हा एक दुर्मिळ परंतु गंभीर स्वरूपाचा ऑटोइम्युन (autoimmune) आजार आहे. या आजाराचे मुख्य लक्षण हे पॅरालिसीस किंवा लकवा मारल्यासारखे असते आणि त्याचे कारण neuropathy (मज्जासंस्थेचा रोग) आहे. हा एक दीर्घकालीन आजार आहे. या आजाराने कमकुवत झालेले शरीरातील स्नायू पुन्हा दुरुस्त होण्यासाठी काही आठवडे किंवा महिनेदेखील लागू शकतात. हा आजार संसर्गजन्य नाही.
 
GBS आजार का होतो?
 
GBS हा स्व-प्रतिकाराचा म्हणजे ऑटोइम्यून (स्वयंप्रतिकार) आजार आहे ज्यामध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती चुकीने आपल्याच नसांवर हल्ला करते. सहसा हा आजार होण्यापूर्वी 1 ते 4 आठवड्यांमध्ये एखादे पोटाचे किंवा श्वसनसंस्थेचे इन्फेक्शन होते आणि ते झाल्यानंतर ज्या अँटीबॉडी तयार होतात, त्यातील काही नसांच्या विरुद्ध देखील हल्ला करू लागतात. हे प्रतिजन अनुकरणामुळे (antigen mimicry) होते. त्या रोगजंतूमधील एखादे antigen हे मानवी नसांमधील gangliosidesया पेशींसारखे असते. त्यामुळे त्या विरुद्ध तयार झालेल्या अँटीबोडीज या आपल्याच नसांवर परिणाम करतात.
 
या हल्ल्यामुळे नर्व्हच्या भोवती असलेलं मायलीन शीट (अस्तर) नष्ट होतं किंवा कधी कधी प्रत्यक्ष नसादेखील दुखावल्या जातात (axonal injury). त्यामुळे विविध स्नायूंपर्यंत नर्व्ह संदेश देण्यात अडथळा निर्माण होतो आणि मग त्यामुळे स्नायूंमध्ये शिथिलता येते, ते काम करेनासे होतात - म्हणजेच शरीराला लकवा मारल्यासारखे चित्र दिसते. या आजारामध्ये रुग्णाचा मेंदू व्यवस्थित काम करत असतो फक्त त्याच्या इच्छेनुसार त्याला त्याचे शरीर हलवता येत नाही तसेच कधीकधी बोलणे किंवा श्वास घेणे हेही बंद होऊ शकते.
 
हा आजार कोणत्या कारणाने होऊ शकतो?
 
हा आजार इम्युनिटीशी संबंधित असल्याने हा होण्यापूर्वी साधारण एक ते चार आठवड्यामध्ये इम्युनिटी सक्रिय झालेली असते. त्यासाठी पुढीलपैकी कोणतेही कारण असू शकते.
 
व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन (उदा. सर्दी, फ्लू, जुलाब, पोट बिघडणे)
 
कॅम्पिलोबॅक्टर जेज्यूनी बॅक्टेरिया या पोटाचा विकार निर्माण करणार्‍या जिवाणूमुळे साधारण 40 % केसेस होतात. सायटोमेगालो व्हायरस, एब्स्टिन बार व्हायरस यामुळे 35% केसेस होतात. मायकोप्लाझ्मा तसेच फ्लू, झिका व्हायरस आणि कोविड व्हायरस संसर्गानंतरदेखील हा आजार आढळून आला आहे. बर्‍याचदा हा संसर्ग अतिशय सौम्य असतो व त्यामुळे रुग्णाला याची जाणीव होत नाही.
 
लसीकरणानंतर
 
ही अतिशय अत्यंत दुर्मिळ घटना असते. फ्लूसारख्या आजाराच्या लसीकरणानंतर याच्या काही केसेस आढळून येऊ शकतात, मात्र त्या फ्लू आजारापेक्षा कमी असतात.
 
शस्त्रक्रियेनंतर किंवा इतर वैद्यकीय प्रक्रियेनंतर
 
यानंतरही काही दुर्मिळ वेळा असे घडू शकते.
 
GBS चे प्रकार कोणते?
 
GBS चे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वर्गीकरण केले गेले आहे. हे प्रकार मुख्यतः लक्षणे, प्रभावित मज्जातंतू, आणि आजाराच्या स्वरूपावर आधारित असतात.
 
अ‍ॅक्युट इनफ्लॅमेटरी डिमायेलिनेटिंग पॉलीन्युरोपथी (AIDP)
 
हा GBSचा सर्वात सामान्य प्रकार आहे. यात मज्जातंतूंचे संरक्षणात्मक आवरण (मायेलिन) नष्ट होते ज्यामुळे स्नायूंमध्ये कमकुवतपणा निर्माण होतो. यामध्ये लक्षणे सहसा पायांपासून सुरुवात होऊन हळूहळू शरीराच्या वरच्या भागाकडे जातात.
 

GBS 
 
अ‍ॅक्युट मोटर अ‍ॅक्सोनल न्युरोपथी (AMAN)
 
यामध्ये केवळ स्नायूच्या हालचालींसाठी जबाबदार असलेल्या मोटर नर्व्ह प्रभावित होतात, त्यामुळे कमजोरी जाणवते. मायेलिनमध्ये नुकसान न होता थेट मज्जातंतूंच्या अक्षांवर (
axon
) परिणाम होतो. काही रुग्णांमध्ये ही लक्षणे गंभीर स्वरूपाची असतात आणि वेगाने शरीरावर परिणाम करतात. हा ॠइड चा प्रकार बरा होण्यासाठी जास्त काळ लागतो.
 
अ‍ॅक्युट मोटर आणि सेन्सरी अ‍ॅक्सोनल न्युरोपथी (AMSAN)
 
हा AMSAN चा एक अधिक गंभीर प्रकार आहे, ज्यामध्ये मोटर आणि सेन्सरी (संवेदी) मज्जातंतू दोन्ही प्रभावित होतात. यामुळे रुग्णाला स्नायू कमकुवतपणा आणि संवेदनांवर प्रभाव (सुई भोसकल्यासारखे वाटणे, मुंग्या येणे) जाणवतो. हा प्रकार बहुतेकदा गंभीर असतो आणि त्यातून पूर्ण बरे होण्यास सर्वाधिक वेळ लागू शकतो.
 
 
मिलर फिशर सिंड्रोम (MFS)
 
हा GBS चा एक दुर्मिळ प्रकार आहे, जो मुख्यतः डोळ्यांच्या स्नायूंवर परिणाम करतो.
 
ब्रॅचिअल आणि क्रॅनियल न्युरोपथी
 
हा प्रकार सहसा GBS च्या इतर प्रकारांपेक्षा कमी आढळतो. यात विशेषतः खांदा आणि चेहर्‍याच्या स्नायूंवर परिणाम होतो, ज्यामुळे बोलणे, चावणे आणि गिळण्यास त्रास होतो. हा प्रकार काही वेळा मिलर फिशर सिंड्रोमसह संबंधित असतो.
 
GBS हा सिंड्रोम म्हणजे लक्षण समुच्चय आहे. सर्व प्रकारांची लक्षणे डॉक्टरांना माहित असल्यास लवकर निदान व उपचार होऊ शकतात. काही प्रकार सौम्य असतात आणि काही अधिक गंभीर स्वरूपाचे असतात, त्यामुळे वेळीच उपचार करणे महत्त्वाचे ठरते. तसेच आजाराचा कालावधीदेखील वेगवेगळ्या असल्याने रुग्णाला त्याविषयी कल्पना येऊ शकते.
 
GB सिंड्रोमची लक्षणं कोणती?
 
GBS ची लक्षणं हळूहळू वाढत जाणारी असतात आणि सामान्यतः शरीराच्या खालच्या भागापासून (पाय) वरच्या भागाकडे (हात आणि चेहरा) पसरतात. GBS कोणत्या नसांना बाधित करत आहे, त्यानुसार लक्षणे बदलतात.
 
सुरुवातीची लक्षणं:
 
दोन्ही पायांमध्ये सुन्नपणा किंवा मुंग्या येणे.
 
पायातून चपला निसटून जाणे
 
हलकी वेदना किंवा अस्वस्थता. (मुलांमध्ये आढळू शकते)
 
हातापायांमध्ये जडपणा किंवा जाणीव कमी होणे
 
उभे राहणे त्रासदायक वाटते
 
लक्षणे कमी न होता एक-दोन दिवसांमध्ये त्याची वाढ होण्यास सुरुवात होते. ही लक्षणे अगदी साधी असल्याने यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.
 
प्रगतीशील लक्षणं:
 
ही लक्षणे शरीराच्या दोन्ही बाजूंमध्ये सारख्या प्रमाणातच दिसून येतात. प्राथमिक लक्षणानंतर ही वाढत जाणारी लक्षणे सुरू होतात आणि साधारण दोन आठवड्यात सर्वाधिक परिणाम दिसून येतो.
 
स्नायूंमध्ये कमकुवतपणा (पाय, हात, चेहरा) आल्याने हालचाल न करता येणे.
 
हालचालींमध्ये अडथळा किंवा असमर्थता.
 
संतुलन बिघडणं.
 
गिळताना किंवा बोलताना त्रास होणं.
 
लघवी करता न येणे.
 
गंभीर लक्षणं:
 
केवळ हाता-पायाऐवजी इतरही नसा बाधित झाल्या असतील तर गंभीर लक्षणेदेखील दिसून येतात. जसे -
 
श्वास घेण्यास त्रास (रेस्पिरेटरी फेल्युअर).
 
हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता.
 
रक्तदाबामध्ये अत्याधिक चढ-उतार.
 
यापैकी कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. आजाराचे निदान जेवढ्या लवकर होईल तसेच जेवढ्या लवकर उपचारांना सुरुवात होईल तेवढाच कमी काळ हा आजार बरा होण्यासाठी लागेल. आजाराचे निदान करण्यासाठी पाठीच्या मज्जारज्जूभोवतीचे पाणी म्हणजे CSF तपासले जाते, रक्ताच्या आणि नर्व्ह कंडक्शनच्या तपासण्या केल्या जातात. मात्र आजाराचे निदान हे मुख्यतः लक्षणांवरूनच केले जाते. यासाठी कोणतीही खात्रीशीर तपासणी नाही. मात्र वरील लक्षणे असताना DTR म्हणजे deep tendon reflexes कमी किंवा नाहीसे झाले असतील तर या आजारासाठी संशयित समजले जाते.
 
 
लक्षणांची सुरुवात झाल्यानंतर साधारणपणे दोन ते चार आठवड्यांनंतर लक्षणे कमी होऊ लागतात. मात्र शिथिल झालेल्या स्नायूंमध्ये पुन्हा ताकद निर्माण होणे आणि शरीरातील मज्जातंतू पुन्हा योग्य प्रकारे काम करू लागणे यासाठी काही आठवडे किंवा महिन्यांचा काळ लागू शकतो. प्रत्येक रुग्णासाठी लक्षणे वेगळी असू शकतात, त्यांचे प्रमाण कमी अधिक असू शकते आणि त्यानुसार बरे होण्याचा कालावधी देखील वेगळा असू शकतो. गंभीर लक्षणे निर्माण झाल्यास 3-10% रुग्ण दगावू शकतात.
 
GB सिंड्रोममध्ये काय काळजी घ्याल?
 
 
GBS ची उपचारपद्धती हे एक टीम वर्क असते. आजाराच्या उपचारासोबतच गुंतागुंत टाळण्यासाठीदेखील हॉस्पिटलमध्ये काळजी घेतली जाते.
 
इम्युनोथेरपी:
 
शरीराच्या प्रतिकारशक्तीचा हल्ला कमी करण्यासाठी औषधं दिली जातात. यामध्ये इम्युनिटी व्यवस्थित काम करावी यासाठी इम्यूनोग्लोब्युलिन (IVIG) हे अँटिबॉडीचे औषध शिरेवाटे दिले जाते. याचा डोस वजनानुसार ठरत असल्याने हा प्रकार खर्चिक आहे. त्याचप्रमाणे काही वेळा रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा बदलणे असाही उपाय केला जातो.
 
व्हेंटिलेटर सपोर्ट:
 
छातीच्या पडद्याला लकवा मारल्याने श्वसनासाठी अडचण आल्यास व्हेंटिलेटरचा उपयोग होतो. रुग्ण सर्व लक्षणे कमी होईपर्यंत काही आठवडे व्हेंटिलेटरवर असू शकतात. या काळात गुंतागुंत होण्याची सर्वात जास्त शक्यता असते.
 
फिजिओथेरपी:
 
स्नायूंच्या हालचालींची क्षमता सुधारण्यासाठी तसेच स्नायू कमकुवत होऊ नयेत यासाठी अगदी सुरुवातीपासून फिजिओथेरपी केली जाते. रुग्ण स्वतः हालचाल करू शकत नसल्याने रुग्णाचे सर्व स्नायू व सांधे हलते राहण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमित व्यायाम करून घेणे आवश्यक आहे.
 
गुंतागुंती बाबत उपचार :
 
रुग्ण हा सुरुवातीला आयसीयुमध्ये आणि नंतर काही आठवडे सतत शय्याबद्ध (झोपून) असल्याने इतरही विविध अडचणी निर्माण होतात. त्या टाळण्यासाठी प्रयत्न करणे तसेच गुंतागुंत झाल्यास त्याबाबत उपचार करणे आवश्यक असते.
 
 
- सतत झोपून असल्याने पाठीवर जखमा होऊ शकतात. यासाठी एअरबेड वापरावा तसेच रुग्णाला दर दोन तासांनी वेगळ्या स्थितीमध्ये ठेवावे. सतत पाठीवर झोपू देऊ नये.
 
- लघवीचे किंवा फुफ्फुसाचे इन्फेक्शन होऊ शकते. संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेचे सर्व निकष पाळायला हवेत.
 
- रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याने त्याला हलवणे कठीण जाते. तसेच तो बोलू शकत नाही. रुग्णाशी संवाद करण्यासाठी विविध मार्ग शोधायला हवेत. जसे प्रश्न विचारल्यावर हो किंवा नाही यासाठी डोळ्यांची हालचाल करणे.
 
मानसिक आधार:
 
या गंभीर व दीर्घकालीन आजाराच्या परिणामी मानसिक तणाव किंवा नैराश्य जाणवतं. अशा वेळी कुटुंबीय आणि मित्रांचा मोठा आधार असू शकतो. आवश्यकतेनुसार तज्ज्ञांची मदतही घ्यावी.
 
या आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या अनुभवांचा आधार वाटू शकतो. निलेश अभंग हे 3-4 महिने व्हेंटिलेटरवर होते मात्र त्यानंतर जिद्दीने त्यांनी स्नायूंची पूर्ण ताकद परत मिळवली. त्यांच्या या प्रवासाविषयी फेसबुक व युट्युबवर माहिती उपलब्ध आहे.
 
संस्थांचा आधार :
 
या दुर्मिळ आजाराच्या रुग्णांसाठी सहाय्य करणार्‍या काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांच्याकडून सहाय्य मिळू शकते. उदा.www.gbs-cidp.org ही आंतरराष्ट्रीय संस्था अशा रुग्णांसाठी कार्य करत आहे. या संस्थेची भारतामध्ये ही शाखा आहे. GBS CIDP India या नावाचे त्यांचे फेसबुक पेजदेखील आहे. यांच्याशी संपर्क केल्यास या आजाराबाबत अधिक माहिती व मार्गदर्शन मिळू शकते. GBSमधून बरे होण्यासाठी वेळ लागतो, परंतु बहुतेक रुग्ण 6 महिने ते 1 वर्षाच्या काळात बहुतांशपणे बरे होतात.
 
 
GBS होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?
 
GB सिंड्रोम कोणालाही होऊ शकतो. पुरुषांमध्ये याचे प्रमाण अधिक दिसून येते आणि वय वाढताना याचे प्रमाणही वाढू शकते.
- संसर्गजन्य आजारांपासून स्वत:ला दूर ठेवणे हा GBS टाळण्याचा मुख्य प्रतिबंधात्मक उपाय आहे. यासाठी आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारायला हवी.
 
- ताणतणाव कमी ठेवून शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी.
 
- पोटाच्या व्याधी होऊ नयेत यासाठी बाहेरचे अन्नपदार्थ सहसा न खाणे, खाल्ल्यास ते चांगल्या ठिकाणाहून खाणे, न शिजवलेले बाहेरील पदार्थ न खाणे व शुद्ध पाणी पिणे महत्वाचे आहे.
 
- शिजवलेले आणि कच्चे अन्न यांची सरमिसळ होऊ न देणे महत्वाचे. त्यासाठी हातांची स्वच्छता महत्वाची.
 GBS उद्रेकामुळे निर्माण झालेले प्रश्न
 
GBSचा असा उद्रेक का झाला?
 
यापूर्वी फ्रेंच सिल्वानियामध्ये झिकाची साथ सुरू असताना आणि पेरूमध्ये C. jejuni ची साथ सुरु असताना GBSचे उद्रेक आढळले होते. पुण्यामधील उद्रेकापूर्वी कोणत्याही संसर्गाचा उद्रेक आढळलेला नाही. मात्र पाण्यातून संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. अधिक अभ्यासानंतर माहिती मिळू शकेल.
 
GBS आणि सार्वजनिक आरोग्याचा काय संबध आहे?
 
दूषित पाणी किंवा दूषित अन्न (विशेषतः पोल्ट्रीजन्य पदार्थ) यातून संसर्ग पसरल्याने GBS ही दुर्मिळ गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पाणीसुरक्षा आणि अन्नसुरक्षा सर्वांनी गंभीरतेने पाळण्याची गोष्ट आहे हा धडा यातून घ्यायला हवा. अन्यथा भविष्यात इतर ठिकाणीदेखील असे चित्र दिसू शकते.
 
 
इम्युनिटी मजबूत करण्यासाठी विविध संसर्ग होऊ देणे शहाणपणाचे असते का?
 
असा सल्ला बरेच स्वयंघोषित तज्ज्ञ देत असतात. मात्र इम्युनिटी हे एक शस्त्र आहे. ती सतत active असेल तरी शरीराचे नुकसान करू शकते आणि कोणत्या संसार्गानंतर अशा प्रकारे स्व-प्रतिकार सुरु होऊ शकतो हे आपण जाणत नाही. त्यामुळे स्वच्छतेचे आणि रोग-प्रतिबंधनाचे नियम पाळण्यातच शहाणपणा आहे.
 
 
GBS उद्रेकानंतर योग्य ते धडे घेऊन सरकार आणि लोकांनी स्वतःमध्ये सुधारणा केल्यास अशा संसर्ग-निर्मित संकटापासून आपण सर्व सुरक्षित राहू शकतो. अशा संकटकाळी सर्वांनी एकजुटीने आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याचा प्रतिकार करायला हवा.
लेखिका एम.डी. रोगप्रतिबंधकशास्त्र तज्ज्ञ असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे कार्यरत आहेत.
 
drprdeshpande2@gmail.com
Powered By Sangraha 9.0